Tuesday, 25 July 2017

व्यंगोबानाथाची कहाणी

व्यंगोबानाथाची कहाणी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई


ऐका व्यंगोबानाथा तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथे दोन शेजारणी रहात होत्या. एकीचं नाव सुलाबाई तर दुसरीचं भुलाबाई. दोघीही सख्ख्या मैतरिणी. एके वर्षी काय झालं, दोघी गरत्या राहिल्या. नवमासानी दोघीही प्रसवल्या. दोघींच्याही घरी आनंदी आनंद झाला. साऱ्यांनी पेढे वाटले. पण हाय रे दैवा! काय हे दुर्दैव!! थोड्याच वेळात साऱ्या आनंदावर विरजण पडले. दोघींच्याही मुलांना पाठीवर आवाळू होते. आवळ्याएवढे लिबलिबीत आवाळू. मणके मुळी जुळलेलेच नव्हते. बाळाचे पाय अशक्तसे हलत होते. लघवीची धार जेमतेम उडत होती. ही सारी मणके उघडे असण्याची किमया होती. दोघीही हताश झाल्या.
सुलाबाई कर्माला दोष देऊन गप्प बसली. घरची होती तालेवार. पण सासूचं त्वांड कोण धरणार. सासू म्हणाली, ‘तुझंच पाप भोवले पोराला. व्यंगोबाचा कोप झाला. गिराण आलं गिराण गेलं. तू काहीच नाही पाळलं. उलट तेंव्हा उलटून बोललीस. आता भोग आपल्या कर्माची फळं.’
काही दिवस असे गेले. सुलाबाईने मनाचा हिय्या केला. नवऱ्याला पटवले. शेजारच्या गावात कोणी बैरागी आला होता. त्याची पूजा झाली. काही गुण नाही. पलीकडच्या गावात पीर होता. त्याचा नवस झाला पण फेडायची वेळ आली नाही. करता, करता लांब लांब प्रवास घडू लागला. वैद्य झाले हकीम झाले. साधू, संत, फकीर झाले. आशा-निराशेचे झोके झाले. गंडे, दोरे, ताईत झाले. अंगारे, धुपारे, उतारे झाले. उतार काही पडेना आजार काही हटेना. मूल मुळी चालेना, मुळी बाळसं धरेना. त्याच्या पायात ताकद नव्हती. रांगतंय कसलं? फरफट तेवढी होती. पुढे ते वारंवार आजारी पडू लागलं. बाकी घर त्याचा दुस्वास करू लागलं. माय तेवढी माया धरून होती. कोण म्हणे मुळावर आलंय, कोण म्हणे घराला खायला आलंय. सुलाबाई नुसती रडत राही, खंगत राही, मनाने भंगत राही. पुढे ते मूल गेले. डोक्याला हात लावून, नशिबाला बोल लावून, सारे काही उरकले.
यातच पुन्हा दिवस गेले. आता डोळेच पांढरे झाले. पुन्हा असे झाले तर? हीच चिंता दिवसभर. पुन्हा सारे सारे केले. तंत्र, मंत्र, उपासतापास, जपतप, व्रतवैकल्ये सगळे सगळे झाले. गिराण आले गिराण गेले. सुलाबाईनी सगळे केले. रात्रभर टक्क जागी. नाही अन्न नाही पाणी. पण पुन्हा तसेच घडले. तसलंच मूल देवानी धाडले. बाळापाठी आवाळू वाढले. गिराण पाळूनही व्यंगोबा नडला. व्यंगोबाचा फेरा पडला.
भुलाबाईची कथाच न्यारी. तिची सारीच तऱ्हा न्यारी. भुलाबाईनी काय केलं? दळणाच्या डब्यामागे चार पैसे साठले होते. कनवटीला लावून तिनी इस्पितळ गाठले होते. बाळाचा एक्सरे झाला. डॉक्टर म्हणे सीटीस्कॅन करा. बाळाचा सीटीस्कॅन झाला. डॉक्टर म्हणे एम.आर.आय. करा. बाळाचा एम.आर.आय. झाला. बाळांचं ऑपरेशन झालं. बाळ बरंच सुधारलं. वर्षाच्या अखेरीस धरू धरू चालू लागलं. डॉक्टर म्हणे, भुलाबाय, पुढच्या वेळी सावध ऱ्हाय. नवऱ्याचं रक्त तपासू. तुमचंही रक्त तपासू. भुलाबाय समजे, डॉक्टर हाय रक्तपिपासू. पै-पैसा वहात होता. नवा तपास सामने होता. शेवटी सारे रिपोर्ट आले. तेंव्हा कळले, भुलाबाईला मधुमेह होता. बाळातील व्यंग हा त्याचाच प्रताप होता. गोड दुखण्याचा दुखरा खेळ. असा सगळा लागला मेळ. पुढच्यावेळी ती शहाणी झाली. आधीच डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले साखर सांभाळा. तो पर्यंत दिवस टाळा. इंन्शुलीनची सुई दिली. साखर आटोक्यात आली. फोलिक अॅसिडची मात्रा दिली. मगच भुलाबाय गरती राहिली. यथाकाल प्रसूत झाली. नक्षत्रावाणी लेक झाली. दुनिया आनंदानी भरली.
इतक्यामधे काय झाले? शेजारीण दारी आली. ही होती पिचलेली. व्यंगोबाच्या फेऱ्यानी खचलेली. शेजीबाई म्हणे, ‘अगं अगं भुले, काय वसा घेतलास ते सांग तरी मले. माझी कूसही आहे रिती. दोन झाली पण दोन्ही गेली. मागच्यासाली सुलाबायला भेटले. तिच्या सांगण्यासारके केले सारे. पण फळ काही नाही हाती. मी रिती, ती आहे रिती.’
भुलाबाईनी धीर दिला. दवाखान्याचा पत्ता दिला. व्यंगोबाचा वसा तिनी शेजीबाईला सांगितला. ‘डॉक्टर गाठ, तपास कर. शेवटपर्यंत धीर धर. उतू नको मातु नको घेतला वसा टाकू नको.’
‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.’
शेजीबाई लगबग बाहेर पडली. दवाखान्याची पायरी चढली. डॉक्टर म्हणे, ‘सांगू काय? आधीच्याचा रिपोर्ट कुठाय?’
‘कसला रिपोर्ट आणि कसलं काय. तपास मुळी केलाच न्हाय. व्यंगोबानाथाचा प्रताप सारा. नाही उपाय तर तपास कशाला? जायचं ते नशीबानी गेलं. जे व्हायचं तेच झालं. हाती काहीच नाही आलं. पहिलं झालं ते गेलं. दुसरं झालं तेही गेलं. नेमकं व्यंग ठाऊक नाही, फोटो नाही. एक्सरे नाही. सोनोग्राफी, सिटी, एमआरआय काही नाही. बाळाचं रक्त तपासलं नाही. गेलं, नेलं, नदी काठी पुरलं. त्याचं काहीच नाही उरलं.’
डॉक्टर म्हणे, ‘असं कसं? शवविच्छेदनही हवं होतं.’ शेजीबाई शहारली. कल्पनेनीच घाबरली.
डॉक्टर म्हणे, ‘तसं नव्हे. निसर्गाचे हे उखाणे. सुटतील तेवढे सोडवायला हवे. तपास केला तर कारण सापडेल कदाचित. सापडले कारण, तर उपाय असेल कदाचित.’
शेजीबाई बुचकळ्यात पडली. डॉक्टरला विचारती झाली, ‘शोधूनही काही सापडलं नाही, तर कायरे सांगणार तु ही?’
डॉक्टर म्हणे, ‘सापडलं नाही तर सांगीन तसं. पण खोटंनाटं सांगणार नाही. नसलेलं कारण जोडणार नाही. माहित नाही तर माहित नाही म्हणू. अज्ञान आधी मान्य करू. दोघं मिळून पुन्हा शोधू. अज्ञान मान्य करण्यामध्ये विज्ञानाचा उगम आहे.’
शेजीबाईला थोडंच कळलं. बरचसं नाहीच वळलं. तपासण्यांची फैर झडली. दोष काही आढळला नाही. आशीर्वाद आणि शुभेच्छांशिवाय डॉक्टरकडे शब्द नाही. शेजीबाई हिरमुसली. पदरात तोंड खुपसून मुसमुसली.
 डॉक्टर म्हणे, ‘उगी रहाणे जे जे होईल ते ते पहाणे. मोठा काही दोष नाही, हा दिलासा कमी नाही. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा  भरला आहे असंही म्हणता येतं.  पुढे सारं होईल छान, ही शक्यता मनी जाण. आता तू एवढं कर. खा, पी, पुष्ट हो. मिश्री, दारू शिवू नको. कुठलंही औषध सावधपणे घे. रुबेलाची लस घे. आयोडीनवालं मीठ माग. फोलिक अॅसिड घेऊ लाग. तीन महिने नवरा लांब. व्यंगोबानाथाचा हाच वसा सगळ्यांना सांग.’
शेजीबाई गोंधळली. ‘डॉक्टर, डॉक्टर सांगा आता, सुलाबायचा इस्कोट झाला. भुलाबायचं झालं भलं. पण भुलाबायच्या मार्गानी माला अजून नाही फळं! कोणाची चूक आणि कोण बरोबर? कोण आहे लबाड आणि कोण आहे खरं?’
डॉक्टर म्हणे, ‘कान देवून ऐक. सुलाबायचा वसा साधासा. वड्याचं तेल वांग्याला लावती. काहीही बिनसलं तरी दैवाले बोलती. गिराण, नजर असली कारणं जोडती. भुलाबायचा वसा न्यारा. तोच व्हावा सर्वाना प्यारा.’
 ‘डॉक्टर तुम्ही सांगताय खरं, पण मनात माझ्या भलतंच येतं. मी केला की तपास सारा. कारण नाहीच की सापडलं तुम्हा.’
डॉक्टर म्हणे, ‘तरीबी त्येच. कळलं नाही हे मान्य करणं केंव्हाही ब्येस! चुकीचं कारण जोडलं की थांबतो शोध. मग चुकीच्याच कारणातून चुकीचा बोध. शेजीबाई तुला राहील पुन्हा. तपासून तपासून लावता येईल छडा. कहाणीचा ह्या, हाच आहे धडा. निसर्गानं व्यंगाचा घातला जर उखाणा, तर सोडून देऊ नका, सोडवून बघा.’
पुढे शेजीबाईनं काय केलं? भुलाबाईचा वसा घेतला. दिवस राहिले, तपास योजला. व्यंगोबाचा छडा लागला. त्याच्यावरती उपाय योजला. शेजीबाई प्रसवली. नाकी डोळी नीटस बाळ. दाट जावळ, रुंद कपाळ. अवघा आनंद झाला. व्यंगोबाचा फेरा टळला.
तर अशी ही व्यंगोबानाथाची कहाणी. वसा वसला मनोभावे. भाग्य धावत घरा आले. भुलाबाई आणि शेजीप्रमाणे तुमच्याही घरी भाग्य येओ. अशा रीतीने ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.




No comments:

Post a Comment