चुकवू नये असं काही...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२०१०३४९
आजकाल दिवस राहीले रे
राहीले, की हातभर तपासण्या ह्या ठरलेल्याच. ही यादी बघूनच सासूबाई इत्यादी माणसं सवयीनं
हतबुद्ध होतात, त्याचे पैसे ऐकून माना टाकतात आणि ‘आमच्या काळी एवढ्या पैशात आख्खं
बाळंतपण’ झाल्याच्या कथा सांगतात. सासुबाईंच्या या तक्रारीला अनेक छटा असतात. कधी
अत्याधुनिक तपासण्यांविषयी कौतुक, आदर आणि आश्चर्य असतं तर कधी ही लुटारूगिरी नाही
कशावरून असा अभिनिवेश. कधी कधी तर आपल्यावेळी आपल्याला ह्यातलं काही वाट्याला आलं
नाही म्हणून सुप्त असूयासुध्दा असते. या खर्चाला मग आडून आडून विरोध केला जातो. जे
आणि जेवढं आपल्याला मिळालं ते आणि तेवढंच सुनेला मिळावं असा सूर असतो. जास्त तर
नकोच नको. पण त्याच वेळी स्वतःचं औषधपाणी मात्र यथायोग्य चालू असतं. ‘माज्या सासूला बिलड प्रेशर आणि डायबीटीजचं औषध
मिळालं न्हाय तवा म्या बी घेनार न्हाय!’
अशी भूमिका मात्र सासूबाई घेत नाहीत.
इतक्या सगळ्या तपासण्यांची
गरज असते का?, हा वेगळा प्रश्न आहे. पण इतकं करूनही, काही वेळा काही महत्वाच्या
तपासण्या बड्या-बड्या ठिकाणीही केल्या जात नाहीत. काही वेळा (पेशंटचे) पैसे वाचवण्यासाठी
डॉक्टर सांगत नाहीत. काही वेळा त्या त्या भागात ती तपासणी करण्याचा रिवाज नसतो.
फार तपासण्या सांगितल्या की पेशंट तपासण्या तर करणार नाहीतच पण परस्पर डॉक्टर बदलतील;
ही साधार भीतीही असते. हा कट प्रॅक्टिसचा भाग असावा अशी शंकाही लगेच पेशंटच्या
मनात येणार. ह्या सगळ्या संशयकल्लोळात काही तपासण्या केल्याच जात नाहीत.
कारण काहीही असो
सर्वसाधारणपणे टाळली जाणारी पण चुकवू नये अशी तपासणी मी सुचवू इच्छितो. पेशंटनीच
ह्या टेस्टचा आग्रह धरायला हवा. हिमोग्लोबिनची तपासणी सर्वांचीच केली जाते. पण ही
अपुरी आहे. या बरोबर ‘पीबीएस’ही व्हायलाच हवी आणि ‘एच.बी. इलेक्ट्रोफोरेसीस’ ही तपासणीही व्हायला हवी. ‘एच.बी.
इलेक्ट्रोफोरेसीस’ ही खूप खूप महत्वाची आहे. थॅलेसेमिया आणि असे इतर काही विकार या
चाचणीत कळतात.
भारतात ‘थॅलेसेमिया मायनर’
हा साधारण ३ ते ४% जनतेत आढळतो. बोहरी, सिंधी, पंजाबी जनात तो अधिक प्रमाणात आहे.
थॅलेसेमिया मायनर या आजारात आईच्या अंगात रक्त (हिमोग्लोबिन) कमी असतं आणि काही
केल्या ते वाढत नाही. नॉर्मली, शरीरात रक्त तयार होत असतं आणि नष्टही होत असतं. याचा
समतोल साधला जातो आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण १२ ग्रॅम पर्यंत राखलं जातं.
थॅलेसेमियासारख्या आजारात हा तोल ढळतो. काही अनुवंशिक दोषामुळे रक्त नष्ट होण्याचं
प्रमाण वाढतं आणि अंगात (कायमच) हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी रहातं. याला ‘थॅलेसेमिया
मायनर’ असं म्हणतात. हा सौम्य आजार आहे. गर्भारशीला काही थेट त्रास होत नाही.
लहानपणापासूनच कमी रक्तात भागवायची तिच्या शरीराला सवय होऊन जाते. लागलंच तर रक्त
भरावं लागतं.
मात्र असा सौम्य, अर्धामुर्धा,
(थॅलेसेमिया मायनर) आजार आई आणि बाबा दोघांना असेल, तर मात्र होणाऱ्या बाळाला ‘पूर्ण
आजार’ (थॅलेसेमिया मेजर) होण्याची शक्यता असते. ‘पूर्ण आजारात’ रक्त नष्ट होण्याचं
प्रमाण एवढं असतं, की सतत रक्त भरल्याशिवाय बाळ जगू शकत नाही. जन्मानंतर काही दिवस
बरे जातात. मग बाळांचं रक्त कमी-कमी होऊ लागतं. रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया
शरीराकडून आपोआप वेगवान केली जाते. पण हा प्रयत्न अपुरा पडतो. रक्त भरलं की ते मूल
तेवढ्यापुरतं ताजंतवानं होतं. पण हे उधारीचं रक्त शरीरात फार काळ टिकत नाही. तेही
नष्ट होतंच. पुन्हा रक्ताचा दुष्काळ सुरु. अशक्त, किरकिरं, पोट फुगलेलं, पांढरं
फटक पडलेलं, मरणपंथाला लागलेलं हे मूल बघवत नाही. मुलाबरोबर आख्ख कुटुंबच जणू
आजारी पडतं. असह्य शारीरिक, आर्थिक, भावनिक ताणातून पिळवटून निघतं. रक्ताच्या बाटलीला टांगलेला हा जीव लवकरच जगाचा
निरोप घेतो. आता आधुनिक उपचारांमुळे कांही मुलं जगतात, तगतात. पण हे क्वचित, खूप
खूप खर्चिक आणि बेभरवशाचं. हे सगळं सोसण्यापेक्षा तपासणी केलेली लाखपटीनी चांगली.
टेस्ट असतात दोन प्रकारच्या,
एचबी इलेक्ट्रोफोरेसीस आणि क्रोमॅटोग्राफी. पहिली स्वस्त (सुमारे रू ५००/-), पण
जरा कमी माहिती देणारी. दुसरी महाग (सुमारे रू १०००/-), पण बिनचूक, खात्रीशीर.
बिनचूक टेस्ट करून घेतली तर उत्तमच. पण निदान स्वस्त टेस्ट करणं अत्यावश्यक आहे. हीही
परवडत नसेल, तर निव्वळ ‘पीबीएस’ नीट अभ्यासून पुढील तपासणीची आवश्यकता आहे का नाही
याचा अंदाज डॉक्टर सांगू शकतात. किमान एवढं तरी करणं गरजेचं आहे. स्वस्त, महाग हे
सापेक्ष शब्द आहेत. ज्यांना मरणासन्न मूल जन्माला घालणं टाळता येतं, त्यांच्या
दृष्टीनी ह्या तपासणीची किंमत अमूल्य असते. आयुष्यात ही तपासणी फक्त एकदाच करावी
लागते. तोच रिपोर्ट जन्मभर चालतो. तो काही बदलत नाही.
अशा आजारी मुलाचा जन्म टाळणं
हे फक्त आणि फक्त अशी टेस्ट करूनच शक्य आहे. आई आणि बाबांना, दोघांनाही अर्धा आजार
असेल तर मुलाला पूर्ण आजार (थॅलेसेमिया मेजर) असण्याची शक्यता असते २५%.
या जोडप्याची ५०% मुलं ही ‘थॅलेसेमिया
मायनर’ प्रकारचा म्हणजे सौम्य आजार घेऊन
जन्मतात. ही मुलं त्यांच्या आई-बाबांसारखी असतात. ह्यांना काहीही विशेष त्रास होत
नाही. पण ही मंडळी हा आजार पुढील पिढीत संक्रमित करू शकतात. ह्यांनी जोडीदार
निवडताना मात्र ‘मायनर’ जोडीदार टाळला पाहिजे.
२५% संतती ही ‘नॉर्मल’
असते. अनुवंशिकतेच्या द्यूतामधले हे थॅलेसेमियामुक्त, व्याधीमुक्त विजेते.
मायनर दांपत्याला तिसऱ्या
महिन्यात बाळाच्या वारेचा तुकडा तपासून वा नंतर गर्भजल परीक्षा करून, बाळ थॅलेसेमिया
मेजरग्रस्त आहे का थॅलेसेमिया मायनर आहे का नॉर्मल; ह्याची खात्री करून घेता येते.
मुलाला हा जीवघेणा आजार आहे असं कळलं, तर गर्भपात करून घेता येतो. मायनर वा नॉर्मल
असेल तर मूल होऊ देता येतं. मात्र दर गरोदरपणात वार/गर्भजल चाचणी करावी लागते.
दरवेळी मुलात जीवघेणा आजार असण्याची शक्यता २५% असते. हा आजार टाळण्याचा सध्या
उपलब्ध असलेला हा एकमात्र मार्ग आहे. म्हणून म्हणतो, चुकवू नये अशी ही तपासणी आहे.
तुम्हाला डॉक्टरांनी सांगितली नाही तर तुम्ही डॉक्टरना सुचवा पण तपासणी चुकवू नका.
वरील विवेचन हे
थॅलेसेमियाबद्दल असलं तरी ते सिकल सेल अॅनिमिया व तत्सम आजारांनाही लागू पडतं.
आपल्याकडे विदर्भात सिकल सेल अॅनिमिया फार.
आणखीही एक सूचना. ही तपासणी
लग्नाआधी केली तर मायनरग्रस्तांना आलेली मायनरग्रस्त स्थळं नाकारता येतील. मायनर-मायनर
विवाह टाळले म्हणजे पुढचं सगळं रामायण टळेल. आधुनिक पत्रिकेतला हा ‘नॉट अलाउड’
विवाह ठरतो. त्यांनी इतर धट्याकट्यांशी लग्न करायला हरकत नाही. ह्यामुळे मेजर आजार
टळतो. पण अशातही संततीला ‘मायनर’ आजार संक्रमित होऊ शकतो. यांनी विशेष बिघडत
नाही. वर उल्लेखल्याप्रमाणे मायनरवाल्यांनी जोडीदार निवडताना काळजी घेतली की झालं.
लग्नापूर्वी पत्रिका पहाण्याचा सार्वजनिक मूर्खपणा जाता जात नाही आणि आधुनिक
पत्रिकेच्या नावाखाली गुरुजी मंडळीच ब्लड ग्रुप वगैरे तपासण्या करायला सांगतात.
ब्लड ग्रुपचा संबंध ना वैवाहिक सौख्याशी आहे ना संतती सौख्याशी. या तपासणीचा संबंध
थेट संतती-स्वास्थ्याशी आहे. तेंव्हा ब्लड ग्रुप तपासला नाही तरी चालेल,
गर्भसंस्कारी पुजेअर्चेला फाटा दिला तरी चालेल, पण ही तपासणी करावीच करावी.
No comments:
Post a Comment