Showing posts with label तपासण्या. Show all posts
Showing posts with label तपासण्या. Show all posts

Monday, 3 July 2017

चुकवू नये असं काही...

चुकवू नये असं काही...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२०१०३४९

आजकाल दिवस राहीले रे राहीले, की हातभर तपासण्या ह्या ठरलेल्याच. ही यादी बघूनच सासूबाई इत्यादी माणसं सवयीनं हतबुद्ध होतात, त्याचे पैसे ऐकून माना टाकतात आणि ‘आमच्या काळी एवढ्या पैशात आख्खं बाळंतपण’ झाल्याच्या कथा सांगतात. सासुबाईंच्या या तक्रारीला अनेक छटा असतात. कधी अत्याधुनिक तपासण्यांविषयी कौतुक, आदर आणि आश्चर्य असतं तर कधी ही लुटारूगिरी नाही कशावरून असा अभिनिवेश. कधी कधी तर  आपल्यावेळी आपल्याला ह्यातलं काही वाट्याला आलं नाही म्हणून सुप्त असूयासुध्दा असते. या खर्चाला मग आडून आडून विरोध केला जातो. जे आणि जेवढं आपल्याला मिळालं ते आणि तेवढंच सुनेला मिळावं असा सूर असतो. जास्त तर नकोच नको. पण त्याच वेळी स्वतःचं औषधपाणी मात्र यथायोग्य चालू असतं.  ‘माज्या सासूला बिलड प्रेशर आणि डायबीटीजचं औषध मिळालं न्हाय तवा म्या बी  घेनार न्हाय!’ अशी भूमिका मात्र सासूबाई घेत नाहीत.
इतक्या सगळ्या तपासण्यांची गरज असते का?, हा वेगळा प्रश्न आहे. पण इतकं करूनही, काही वेळा काही महत्वाच्या तपासण्या बड्या-बड्या ठिकाणीही केल्या जात नाहीत. काही वेळा (पेशंटचे) पैसे वाचवण्यासाठी डॉक्टर सांगत नाहीत. काही वेळा त्या त्या भागात ती तपासणी करण्याचा रिवाज नसतो. फार तपासण्या सांगितल्या की पेशंट तपासण्या तर करणार नाहीतच पण परस्पर डॉक्टर बदलतील; ही साधार भीतीही असते. हा कट प्रॅक्टिसचा भाग असावा अशी शंकाही लगेच पेशंटच्या मनात येणार. ह्या सगळ्या संशयकल्लोळात काही तपासण्या केल्याच जात नाहीत.
कारण काहीही असो सर्वसाधारणपणे टाळली जाणारी पण चुकवू नये अशी तपासणी मी सुचवू इच्छितो. पेशंटनीच ह्या टेस्टचा आग्रह धरायला हवा. हिमोग्लोबिनची तपासणी सर्वांचीच केली जाते. पण ही अपुरी आहे. या बरोबर ‘पीबीएस’ही व्हायलाच हवी आणि ‘एच.बी. इलेक्ट्रोफोरेसीस’ ही  तपासणीही व्हायला हवी. ‘एच.बी. इलेक्ट्रोफोरेसीस’ ही खूप खूप महत्वाची आहे. थॅलेसेमिया आणि असे इतर काही विकार या चाचणीत कळतात.
भारतात ‘थॅलेसेमिया मायनर’ हा साधारण ३ ते ४% जनतेत आढळतो. बोहरी, सिंधी, पंजाबी जनात तो अधिक प्रमाणात आहे. थॅलेसेमिया मायनर या आजारात आईच्या अंगात रक्त (हिमोग्लोबिन) कमी असतं आणि काही केल्या ते वाढत नाही. नॉर्मली, शरीरात रक्त तयार होत असतं आणि नष्टही होत असतं. याचा समतोल साधला जातो आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण १२ ग्रॅम पर्यंत राखलं जातं. थॅलेसेमियासारख्या आजारात हा तोल ढळतो. काही अनुवंशिक दोषामुळे रक्त नष्ट होण्याचं प्रमाण वाढतं आणि अंगात (कायमच) हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी रहातं. याला ‘थॅलेसेमिया मायनर’ असं म्हणतात. हा सौम्य आजार आहे. गर्भारशीला काही थेट त्रास होत नाही. लहानपणापासूनच कमी रक्तात भागवायची तिच्या शरीराला सवय होऊन जाते. लागलंच तर रक्त भरावं लागतं.
मात्र असा सौम्य, अर्धामुर्धा, (थॅलेसेमिया मायनर) आजार आई आणि बाबा दोघांना असेल, तर मात्र होणाऱ्या बाळाला ‘पूर्ण आजार’ (थॅलेसेमिया मेजर) होण्याची शक्यता असते. ‘पूर्ण आजारात’ रक्त नष्ट होण्याचं प्रमाण एवढं असतं, की सतत रक्त भरल्याशिवाय बाळ जगू शकत नाही. जन्मानंतर काही दिवस बरे जातात. मग बाळांचं रक्त कमी-कमी होऊ लागतं. रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया शरीराकडून आपोआप वेगवान केली जाते. पण हा प्रयत्न अपुरा पडतो. रक्त भरलं की ते मूल तेवढ्यापुरतं ताजंतवानं होतं. पण हे उधारीचं रक्त शरीरात फार काळ टिकत नाही. तेही नष्ट होतंच. पुन्हा रक्ताचा दुष्काळ सुरु. अशक्त, किरकिरं, पोट फुगलेलं, पांढरं फटक पडलेलं, मरणपंथाला लागलेलं हे मूल बघवत नाही. मुलाबरोबर आख्ख कुटुंबच जणू आजारी पडतं. असह्य शारीरिक, आर्थिक, भावनिक ताणातून पिळवटून निघतं.  रक्ताच्या बाटलीला टांगलेला हा जीव लवकरच जगाचा निरोप घेतो. आता आधुनिक उपचारांमुळे कांही मुलं जगतात, तगतात. पण हे क्वचित, खूप खूप खर्चिक आणि बेभरवशाचं. हे सगळं सोसण्यापेक्षा तपासणी केलेली लाखपटीनी चांगली.
टेस्ट असतात दोन प्रकारच्या, एचबी इलेक्ट्रोफोरेसीस आणि क्रोमॅटोग्राफी. पहिली स्वस्त (सुमारे रू ५००/-), पण जरा कमी माहिती देणारी. दुसरी महाग (सुमारे रू १०००/-), पण बिनचूक, खात्रीशीर. बिनचूक टेस्ट करून घेतली तर उत्तमच. पण निदान स्वस्त टेस्ट करणं अत्यावश्यक आहे. हीही परवडत नसेल, तर निव्वळ ‘पीबीएस’ नीट अभ्यासून पुढील तपासणीची आवश्यकता आहे का नाही याचा अंदाज डॉक्टर सांगू शकतात. किमान एवढं तरी करणं गरजेचं आहे. स्वस्त, महाग हे सापेक्ष शब्द आहेत. ज्यांना मरणासन्न मूल जन्माला घालणं टाळता येतं, त्यांच्या दृष्टीनी ह्या तपासणीची किंमत अमूल्य असते. आयुष्यात ही तपासणी फक्त एकदाच करावी लागते. तोच रिपोर्ट जन्मभर चालतो. तो काही बदलत नाही.
अशा आजारी मुलाचा जन्म टाळणं हे फक्त आणि फक्त अशी टेस्ट करूनच शक्य आहे. आई आणि बाबांना, दोघांनाही अर्धा आजार असेल तर मुलाला पूर्ण आजार (थॅलेसेमिया मेजर) असण्याची शक्यता असते २५%.
या जोडप्याची ५०% मुलं ही ‘थॅलेसेमिया मायनर’  प्रकारचा म्हणजे सौम्य आजार घेऊन जन्मतात. ही मुलं त्यांच्या आई-बाबांसारखी असतात. ह्यांना काहीही विशेष त्रास होत नाही. पण ही मंडळी हा आजार पुढील पिढीत संक्रमित करू शकतात. ह्यांनी जोडीदार निवडताना मात्र ‘मायनर’ जोडीदार टाळला पाहिजे.
२५% संतती ही ‘नॉर्मल’ असते. अनुवंशिकतेच्या द्यूतामधले हे थॅलेसेमियामुक्त, व्याधीमुक्त  विजेते.
मायनर दांपत्याला तिसऱ्या महिन्यात बाळाच्या वारेचा तुकडा तपासून वा नंतर गर्भजल परीक्षा करून, बाळ थॅलेसेमिया मेजरग्रस्त आहे का थॅलेसेमिया मायनर आहे का नॉर्मल; ह्याची खात्री करून घेता येते. मुलाला हा जीवघेणा आजार आहे असं कळलं, तर गर्भपात करून घेता येतो. मायनर वा नॉर्मल असेल तर मूल होऊ देता येतं. मात्र दर गरोदरपणात वार/गर्भजल चाचणी करावी लागते. दरवेळी मुलात जीवघेणा आजार असण्याची शक्यता २५% असते. हा आजार टाळण्याचा सध्या उपलब्ध असलेला हा एकमात्र मार्ग आहे. म्हणून म्हणतो, चुकवू नये अशी ही तपासणी आहे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितली नाही तर तुम्ही डॉक्टरना सुचवा पण तपासणी चुकवू नका.
वरील विवेचन हे थॅलेसेमियाबद्दल असलं तरी ते सिकल सेल अॅनिमिया व तत्सम आजारांनाही लागू पडतं. आपल्याकडे विदर्भात सिकल सेल अॅनिमिया फार.

आणखीही एक सूचना. ही तपासणी लग्नाआधी केली तर मायनरग्रस्तांना आलेली मायनरग्रस्त स्थळं नाकारता येतील. मायनर-मायनर विवाह टाळले म्हणजे पुढचं सगळं रामायण टळेल. आधुनिक पत्रिकेतला हा ‘नॉट अलाउड’ विवाह ठरतो. त्यांनी इतर धट्याकट्यांशी लग्न करायला हरकत नाही. ह्यामुळे मेजर आजार टळतो. पण अशातही  संततीला ‘मायनर’  आजार संक्रमित होऊ शकतो. यांनी विशेष बिघडत नाही. वर उल्लेखल्याप्रमाणे मायनरवाल्यांनी जोडीदार निवडताना काळजी घेतली की झालं. लग्नापूर्वी पत्रिका पहाण्याचा सार्वजनिक मूर्खपणा जाता जात नाही आणि आधुनिक पत्रिकेच्या नावाखाली गुरुजी मंडळीच ब्लड ग्रुप वगैरे तपासण्या करायला सांगतात. ब्लड ग्रुपचा संबंध ना वैवाहिक सौख्याशी आहे ना संतती सौख्याशी. या तपासणीचा संबंध थेट संतती-स्वास्थ्याशी आहे. तेंव्हा ब्लड ग्रुप तपासला नाही तरी चालेल, गर्भसंस्कारी पुजेअर्चेला फाटा दिला तरी चालेल, पण ही तपासणी करावीच करावी. 

Tuesday, 20 June 2017

माझं बाळ नॉर्मल आहे का हो डॉक्टर?

माझं बाळ नॉर्मल आहे का हो डॉक्टर?
डॉ. शंतनू  अभ्यंकर, वाई,
मो. क्र. ९८२२० १०३४९

सोनोग्राफी करताना हा प्रश्न नेहमीचाच. अगदी स्वभाविक. निरागसपणे विचारलेला. पण डॉक्टरची महा-गोची करणारा. कारण ‘नॉर्मल’ म्हणायचं कशाला हा एक यक्षप्रश्नच आहे. पेशंटच्या मनातला नॉर्मलचा अर्थ आणि डॉक्टरच्या भाषेतला नॉर्मलचा अर्थ यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो!! डॉक्टरच्या भाषेत नॉर्मल याचा अर्थ त्या त्या तपासणीच्या मर्यादेत जेवढं समजतं, तेवढंच नॉर्मल आहे असा होतो. पेशंटच्या मनातला अर्थ मात्र, ‘आत्ता तर तर सगळं काही ठणठणीत आहेच, पण या पुढेही हे असंच असणार आहे!’ असा काही तरी असतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे, छाप हा अर्थ पुढे अनेक अनर्थांना जन्म देतो.
लोकांना असं वाटतं की सोनोग्राफीत सगळं सगळं दिसतं. असं काही नसतं. अनेक गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत.
सुरवातीला सगळेच अवयव अति-बारीक असतात त्यामुळे काहीच दिसत नाही. मग बाळाचं हृदय लुकलुकताना दिसतं. जीव रुजतोय याची ही पहिलीवाहिली आश्वासक खुण. मग मेंदू, लघवीची पिशवी असं काय काय दिसायला लागतं. कारण इथे ‘पाणी’ असतं. ज्या अवयवात ‘पाणी’ भरलेलं असतं अशा जागा आधी दिसतात. मेंदूत पाण्यानी भरलेली पोकळी असते, मूत्राशयात लघवी असते, म्हणून हे अवयव सहज दिसतात. इतरही अवयव असतात पण ते दिसत नाहीत. अवतीभोवती पाणी असलेलं बाळही छान दिसतं. सोनोग्राफी म्हणजे प्रतिध्वनींनी बनलेली प्रतिमा. अन्य प्रतिध्वनींच्या ‘पार्श्वकल्लोळा’वर ज्या भागाचा  प्रतिध्वनी उठून दिसतो तो तो भाग आपल्याला दिसतो. बाळ पाण्यात तरंगत असतं. पाण्याच्या प्रतिध्वनीच्या पार्श्वकल्लोळावर बाळाचे प्रतिध्वनी अगदी उठून दिसतात. बाळाची बाह्यरेषा अगदी छान दिसते. कित्येक डॉक्टरांच्या फायलींवर अशी चित्र आज विराजमान आहेत. पण बाळाच्या आतले अवयव हे बहुतेकदा एकाच तऱ्हेचे प्रतिध्वनी देतात. त्यामुळे आतले अवयव दिसणं अवघड. त्यातही वर उल्लेखल्या प्रमाणे मेंदू, मूत्राशय वगैरे सहज दिसतात.
बाळाच्या भोवती पाणी असेल तर बाळाचा सोनोग्राफीय अभ्यास सोपा. नसेल तर फार फार अवघड. आईचं वजन जास्त असेल, पोटावर चरबी खूप असेल, पहिला सीझरचा वगैरे काही व्रण असेल, जुळं, तीळं असेल, मशीन अत्याधुनिक नसेल, तर सोनोग्राफीत अडचणी फार. शिवाय सगळं सगळं बघायला वेळही बराच लागतो. सोनोग्राफीतलं दिसणं न दिसणं हे असं अनेक घटकांवर अवलंबून आहे. बहुतेकदा त्या त्या अवयवाची रचना दिसते, पण त्या त्या अवयवाचं कार्य समजत नाही. सोनोग्राफीत फुफ्फुस आहे हे दिसेल पण बाळाला श्वास घेता येईल का? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची अदलाबदल होईल का? ते नाही दिसणार. मेंदू दिसतो, पण अक्कल नाही दिसत. डोळे दिसतात, पण नजर नाही दिसत. आतडी दिसतात, पण पचन होईल का हे सांगता येत नाही. फुफ्फुस, आतडी अशा अवयवांना पोटात काहीच काम नसतं. आईकडूनच या अवयवांची कामं होत असतात. लिव्हर, किडनी इत्यादी काम करतात, पण पूर्ण क्षमतेने नाही. त्यांच्याही कार्याची पूर्णांशाने पारख, ही जन्मल्यानंतरच होते. जन्मजात हृदयविकार हा देखील असाच एक त्रासदायक प्रकार. याचं निदान बरेचदा पाचव्या महिन्याच्या पुढेच शक्य होतं. छातीच्या पिंजऱ्यातला हा पक्षी, तो ही सतत फडफडणारा... याची नीटस तपासणी व्हावी कशी? इथं उडत्या पाखराची पिसं मोजणारेच हवेत. बाळांचं वजन हाही असाच गुंतागुंतीचा मामला. बाळाची वाढीची अंगभूत क्षमता आणि उपलब्ध पोषण याचं मिश्रण म्हणजे बाळांचं वजन. ते पुरेसं भरेल वा नाही हे आधी कसं सांगणार? पण वजन कमी आहे असं सांगितलं की हमखास विचारणा होते, ‘आधी कळलं नाही का?’
प्रसूतीपूर्व सोनोग्राफीच्या अशा अनेकानेक मर्यादा आहेत.
प्रत्येक तपासणीच्या मर्यादा प्रत्येक पेशंटला समजावून सांगणं शक्यच नसतं, आवश्यक मात्र असतं. हे समजावून सांगायचं तर शरीरशास्त्राचं काही किमान ज्ञान आधी अपेक्षित असेल, मग पुढे येईल ती अतिशय क्लिष्ट भाषा, किचकट जर-तरनी मढलेली विधानं आणि धोक्याची अनेक वळणं. परिपूर्णपणे ही माहिती द्यायची तर दोन तीन पानांचा ऐवज होईल, तो अति पातळ कागदावर, अति छोट्या टायपात छापावा लागेल. मग कर्जाच्या किंवा इंटरनेटच्या फॉर्मवर जसा ‘आय अॅग्री’ असा एक चौकोन असतो तसा चौकोन छापून त्याच्या खाली सही घ्यावी लागेल. अर्थात हे असं केलं, की कोणी ते वाचायच्या फंदात पडणार नाही. निव्वळ उपचार म्हणून सही केली जाईल, आपण बँकेच्या, इंन्स्यूरन्सच्या, जागेच्या खरेदी-विक्रीच्या, फॉर्मवर करतो तशी. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. डॉक्टरबद्दलचा वाढता अविश्वास आणि ‘आधी कळलं नाही का?’ हा नवा आजार लक्षात घेता लवकरच असे फॉर्म पावलोपावली भरून घेतले जातील असं दिसतं.
नीट विचार केला तर लक्षात येईल की, ‘बाळ नॉर्मल आहे का?’ हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे; ‘सांगता येत नाही!’ बाळ हा एक सतत विकसित होत जाणारा, वाढणारा, नवेनवे गुण निर्माण होणारा जीव आहे. ज्या स्थितीत आपण ते तपासतो त्याबद्दल आज काहीतरी सांगता येईल पण उद्या काय घडेल, याची भविष्यवाणी नाही करता येणार. उदाहरणार्थ बाळ पोटात असताना भोवतालचं पाणी पितं. ते पाणी त्याच्या पोटातून पुढे पुढे सरकतं, आतड्यात पोहोचतं. ह्या पाण्यामुळे आतड्याची वाढ होते. पुढे हा पाण्याचा, त्यातील पेशींचा लगदा आणखी पुढे सरकतो. मोठ्या आतड्याची वाढ होते. बाळाची आतडी ही अशा पद्धतीनी तयार होतात. हे सर्व व्हायला अगदी नववा महिना उजाडतो. बाळाची आतडी, त्यांची हालचाल असं सगळं सुरवातीला दिसलं तरीही पुढे तो लगदा पोहोचेल का त्यांची वाढ होईल का? याबद्दल आपण सुरवातीलाच काहीही सांगू शकत नाही.
त्यामुळे बाळ नॉर्मल आहे का नाही, हे सांगता येत नाही. हा प्रश्नच चुकीचा आहे. चुकीचा प्रश्न विचारला की उत्तरही निरुपयोगी मिळणार. आपण आता प्रश्न बदलून विचारू आणि उत्तर मिळतंय का ते बघू. ‘माझ्या बाळामधे दोष असण्याची अवाजवी शक्यता आहे का?’, हा प्रश्न शहाण्यासारखा आहे.
ह्यात बाळात दोष असण्याची ‘वाजवी’ शक्यता गृहीत धरली आहे. हे महत्वाचं आहे. आपण काहीही कृती केली तरी काही तरी गोची होण्याची शक्यता असतेच. घरातून बाहेर पडताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे का?, असा प्रश्न विचारला तर उत्तर होकारार्थीच येतं. कारण अशी शक्यता शून्य कधीच असू शकत नाही. नवजन्माचंही असंच आहे. सुमारे २% बाळांना गंभीर व्याधी (उदाः हृदयविकार) आणि २% बाळांना किरकोळ स्वरूपाच्या जन्मजात व्याधी (एखादं बोटं जादा असणं) असतात. सोनोग्राफीत बाळ ‘नॉर्मल’ आहे असं सांगितलं जातं तेंव्हा त्याचा अर्थ, ‘बाळात दोष असण्याची अवाजवी शक्यता नाही’ एवढाच असतो. वाजवी शक्यता ही गृहीतच आहे.
वरील विवेचन सोनोग्राफी संदर्भात असलं तरी सर्व तपासण्या उपचार-प्रणालींना ते लागू आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत, त्या समजावून घेणं इष्टं आहे पण अवघड आहे. ‘आधी कळलं नाही का?’ ही भूमिका सोपी आहे आणि सोयीस्कर आहे. एकूणच तनमनाचा थांग कधीच गाठता येणार नाही हे मान्य करतानाच वैद्यकशास्त्राचा प्रयत्न धोका कमी करण्याचा असतो, तो शून्य कधीच होऊ शकत नाही.
“ज्ञानमार्गी ही बुद्धी सदा राहो, शल्यकर्मी कौशल्य प्राप्त होवो
थांग नाही तन-मनाच्या तळाचा, थिटे सारे पण यत्न सदा राहो.”
हे वैद्यक विश्वाचं प्रेरणागीत आहे.

पूर्वप्रसिद्धी दिव्य मराठी २०/०६/२०१७. या आणि अशाच इतर लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा <shantanuabhyankar.blogspot.in>