Monday, 31 July 2017

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२०१०३४९

पुनवेचा चंद्र उगवलेला असतो, हृदयी प्रीतीचा दर्या उसळलेला असतो, दाही दिशा खुललेल्या अन् वनीवनी कुमुदिनी फुललेल्या असतात, नववधू मनी अधीर झालेली असते आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असतो... आणि अशाच वेळी प्रश्न पडतो, आता गर्भ निरोधक कुठलं वापरावं बरं?
कसं धाडकन जमिनीवर आदळल्यासारखं वाटलं ना? पण ह्या प्रश्नाचं उत्तर जे वेळीच शोधत नाहीत तेही असेच आदळतात. 
लग्न ठरल्यावर बाकी सगळ्याचा विचार होतो. देणंघेणं, मानपान, हुंडाबिंडा, वऱ्हाडी-वाजंत्री, बिऱ्हाड-बाजलं, पोषाख-बिषाख, इव्हेंट मॅनेजर... काही विचारायची सोय नाही. फक्त एका गोष्टीबद्दल सारे चिडीचूप असतात. सुरवातीला गर्भ निरोधक कोणतं वापरावं? एखादी, एरवी आगाऊ किंवा ढॅण-ढॅण समजली गेलेली आत्या, विषय काढते पण कोणीच तिकडे लक्ष देत नाही. या बाबतीत सल्ला घ्यायला आधीच डॉक्टरकडे जाण्याची फारशी पद्धत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की डॉक्टर लाजतील वगैरे. तसं काही नसतं. डॉक्टरी सल्ला घेणं महत्वाचं आहे. तो जरूर घ्यावा.
नवविवाहित जोडप्यांसाठी सर्वात बेस्ट गर्भनिरोधक म्हणजे गोळ्या! लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्ह पिल्स.
इतर पद्धतींचे तोटे जास्त आणि फायदे कमी अशी परिस्थिती आहे.
लग्नात व्रात्य मित्रांकडून, सप्रेम भेट म्हणून, हमखास दिलं जाणारं ‘निरोध’, ऐनवेळी वापरावं लागतं. बऱ्याच जणांना असं ऐन मोक्याच्या वेळी टाईम प्लीज म्हणणं जमत नाही. मग घोटाळे होतात. (अपयशाचं प्रमाण १५%). हनिमूनचे दिवस म्हणजे नकळत सारे घडण्याचे दिवस. अशावेळी सदासर्वदा खिशापाकिटात निरोध बाळगून रहाणारा दक्ष पुरुष विरळाच. निरोधचा वापर हे ही एक कौशल्य आहे आणि हे आत्मसात करायला थोडा प्रयत्न लागतो. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उताविळांना हे कसं साधणार? पहिल्याच प्रयत्नात सगळं जमेल असं नाही. पहिल्याच प्रयत्नात संभोग जमेल असंही नाही; पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.  शिवाय ह्याच्या वापरामध्ये स्पर्श, तापमान इ. संवेदना कमी होतात. नव्या नवलाईच्या क्षणी हे कसं बरं मान्य होणार? काही महाभागांनी तर निरोधसह समागम म्हणजे कागदसकट चॉकलेट खाण्यासारखं आहे, असा खट्याळ शेरा मारून ठेवला आहे. हे वापरताना  नैसर्गिक वंगण उपलब्ध होत नाही, त्यामुळे काहीतरी पदार्थ वंगण म्हणून वापरावा लागतो. अगदी निरोध ‘चीकनाईयुक्त’ असला तरीही. हा पदार्थ तैलयुक्त असून चालत नाही. त्यासाठी काही खास क्रीम्स उपलब्ध आहेत.  पण हे माहित नसतं. मग बेडरूम मध्ये हमखास उपलब्ध असलेला पदार्थ, म्हणजे कोल्ड क्रीम, वापरलं जातं. पण कोणताही तैलयुक्त पदार्थ हा निरोधला हानी पोहोचवतो. निरोधमधल्या लॅटेक्सला या तैलयुक्त पदार्थानी बारीक छिद्र पडतात. परिणामी काय होऊ शकत हे आपण जाणताच. आणखीही एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निरोध हे पुरुषांच्या ताब्यात असलेलं गर्भ निरोधक आहे. एखाद्यानी हे असलं काही नको असं ठरवलं, की बायका त्याबद्दल विशेष काही करू शकत नाहीत. ही श्रींची इच्छा म्हटल्यावर सौ त्यात काही बोलू शकत नाहीत.
नवविवाहीतांमध्ये कॉपर टी (तांबी) हाही  पर्याय सुलभ नाही. ती सहजपणे बसवण्यासाठी योनीमार्ग रुंद असावा लागतो, गर्भ पिशवीचे तोंडही किंचित उघडे असावे लागते. सुरवातीला असं नसतं. लग्नाआधीच काही कॉपर टी बसवता येत नाही. त्यामुळे मधुचंद्राच्या रात्री आणि नंतरही बऱ्याच काळ ही पद्धत बाद आहे.
निव्वळ प्रोजेस्टेरॉन हा  घटक असलेल्या काही गोळ्या, इंजेक्शने, शरीरात त्वचेखाली बसवायच्या काड्या, योनीमार्गात ठेवायच्या रिंग असेही विविध प्रकार आहेत. परिणामकारक आहेत. (अपयशाचं प्रमाण ०.३%) पण या साऱ्यांनी पाळी अनियमित येते. अशी अनियमित पाळी ही त्या स्त्रीला आणि तिच्या सासर-माहेरला बहुधा अमान्य असते. ‘मुलीला नीट पाळी येतच नव्हती, हे लपवून ठेवण्यात आलं’, असाही अनाठायी आरोप होऊ शकतो. सबब याही पद्धती एकगठ्ठा नापास ठरतात.
गर्भ निरोधनाच्या ‘नैसर्गिक’ पद्धती या रकान्यात काही पद्धती आहेत. ‘गर्भ निरोधनाची नैसर्गिक पद्धत’ हा वदतोव्याघात आहे. मुळात गर्भधारणा ‘नैसर्गिक’ आहे आणि गर्भनिरोधन अनैसर्गिक! ते असो. पण मुलं ही देवाघरची फुलं असून जेवढी आपल्या पदरी पडतील तेवढी स्वीकारायची असं प्रेषितांनी सांगितल्याचं काहींचं म्हणणं असतं. अशी धर्मभोळी मंडळी मग कोणतंही, मानवनिर्मित गर्भनिरोधक वापरणं धर्मद्रोह समजतात. मानवकल्पित गर्भ निरोधन, म्हणजे ‘नैसर्गिक पद्धती’ मात्र चालतात म्हणे!
भारताच्या राष्ट्रपित्याला प्रिय अशी ब्रम्हचर्य ही यातील अग्रणी आणि अर्थात आत्ताच्या संदर्भात अप्रस्तुत.
योनीबाहेर स्खलन होईल अशी काळजी घेणे, हा यातला एक प्रकार. यात दिवस रहाण्याची शक्यता तब्बल २०% असते. कामतृप्ती न झाल्याने यात पुरेपूर कामानंद मिळत नाही हा ही  तोटा आहे.
स्त्रीबीज महिन्यात एकदाच तयार होते आणि त्यासुमारास संबंध आल्यास दिवस रहातात, अन्यथा नाही. ही बाब लक्षात घेऊन महिन्यातले ‘ते’ दिवस वगळून अन्य दिवशी समागम करणे अशीही एक चाल प्रचलित आहे. पाळी अतिशय नियमित असेल तर निव्वळ तारखेवरून अंदाज बांधता येतो. योनीस्त्राव तपासणे, शरीराचे तापमान पहाणे, अशाही पद्धती आहेत. यात अनेक खाचाखोचा आहेत.  यातही कामक्रीडेतील उत्स्फूर्तता निघून जाते आणि वेळापत्रकानुसार ‘कामगिरी’ उरकावी लागते. यातही अपयशाचं प्रमाण २०% आहे. एकूणच नैसर्गिक गर्भनिरोधन हे बेभरवशाचं, अवसानघातकी आणि ‘अनैसर्गिक’ आहे. यासाठी उभयपक्षी उच्च कोटीचा संयम आणि पराकोटीचा निश्चय लागतो. थोडक्यात जनसामन्यांसाठी या पद्धती कुचकामी आहेत.
रहाता राहिल्या गोळ्या. या आधीच घेता येतात, नव्हे आधीच घ्यायच्या असतात. संभोगाच्या वेळी मधेच टाईम प्लीज अशी भानगड नाही. अत्यंत खात्रीशीर आहेत. अपयशाचं प्रमाण निव्वळ ०.१%! अत्यंत सुरक्षित आहेत. एकदा गोळ्या घेतल्या, की या पापाची शिक्षा म्हणून, आपल्याला नंतर मूल होणार नाही अशी अनेकांची समजूत असते. घरातल्या मोठ्यांचा गोळ्यांना विरोध हा मुख्यत्वे या कारणानी असतो. गोळ्यांनी असं दूरगामी वंध्यत्व वगैरे काही येत नाही. गोळ्यांचा परिणाम तात्कालीक असतो. म्हणून तर त्या रोज आणि महिनोंमहीने घ्याव्या लागतात. उलट पी.सी.ओ.डी. सारख्या आजारात गोळ्या घेतल्यानी नंतर संतती संभव वाढतो!
‘आधी दोन वर्ष गोळ्या घेतल्या आणि आता रहात नाहीये!’... अशा छापाच्या कमेंट्स अज्ञानातून उगम पावतात. दिवस रहाणारच आहेत या गृहितकाआधारे गोळ्या सुरु केलेल्या असतात. दिवस रहाण्याची क्षमता त्या जोडप्यानी मुळी सिद्धच केलेली नसते. दिवस न रहाण्यामागे गोळ्या हे कारण कधीच नसतं. दुसऱ्या काही कारणानी दिवस रहात नसतात, त्याचं खापर मात्र गोळ्यांवर फोडलं जातं.
गोळ्यांचा आणखी एक गुणधर्म खूप खूप महत्वाचा आहे. गोळ्यांचा परिणाम हा ताबडतोब सुरु होत नाही. गोळ्या महिनाभर नियमित घेतल्याचा एकत्रित परिणाम म्हणून दिवस जात नाहीत. आजची गोळी आजच्या दिवसापुरती असं नाहीये. तेंव्हा पहिल्या महिन्यात गोळ्या आणि शिवाय आणखी काही गर्भनिरोधक वापरावे लागते किंवा पहिल्या महिन्यात संभोग टाळावा लागतो. नव्यानीच लग्न झालेल्या जोडप्याला संभोग टाळणं तर शक्य नाही. त्यामुळे केवळ गोळ्यांवर विसंबून रहायचं तर लग्नाआधी/मधुचंद्राआधी किमान महिनाभर या गोळ्या घेणं आवश्यक आहे. तेंव्हा कुठे इष्ट वेळी त्यांचा इष्ट परिणाम होईल. पण यासाठी आधी नियोजन हवं. मूल नको हा निर्णय त्या जोडप्यांनी घेतलेला हवा. त्यासाठी गोळ्या वापरायच्या हाही निर्णय झालेला हवा. यासाठी भावी पती-पत्नीमधे संवाद आणि चर्चा हवी. ह्या प्रश्नाची चर्चा करण्याइतका मोकळेपणा हवा. ‘डार्लिंग, आपल्याला बेबी कधी हवं?’ असं विचारल्यावर नुसतंच लाजायची सवय आता मुलींनी सोडून द्यायला हवी. होणाऱ्या नवऱ्यानी हा प्रश्न केला नाही तर स्वतः हा प्रश्न विचारायला हवा... आणि मुलींकडून  असा बोल्ड प्रश्न आला तर मुलांनीही डायरेक्ट बेशुद्ध पडायची सवय सोडून द्यायला हवी.
थोडक्यात नववधू मनी अधीर झालेली असताना आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असताना, ‘आता गर्भ निरोधक कुठलं वापरावं बरं?’ हा  प्रश्न पडताच कामा नये. ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच बोहल्यावर चढायचंय.





पद्धत
अपयशाचं प्रमाण
(पद्धत वापरूनही पहिल्याच वर्षात किती जोडप्यांना दिवस रहातात?)
निरोध
१५%
नैसर्गिक पद्धती
२०%
निव्वळ प्रोजेस्टेरॉन युक्त औषधे
०.३%
कॉपर टी
०.८%
लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्ह पिल्स (गोळ्या)
०.१%
(अनियमित वापरल्यास ५%)
कोणतीही पद्धत न वापरल्यास
८५%

प्रथम प्रसिद्धी, दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, १/८/१७
या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

No comments:

Post a Comment