प्रेग्नन्सी आणि सेक्स
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९
दिवस राहिले की नेहेमीच विचारायला हवा आणि क्वचितच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे; ‘आता शरीर संबंध आले तर
चालतील का?’ हा प्रश्न मनात असतो, ओठापर्यंत येतो पण बाहेर मात्र क्वचितच पडतो;
मात्र खचितच पडायला हवा.
पण एखादयाने विचारला जरी प्रश्न, तरी त्याच ‘हो’ किंवा ‘नाही’
एवढं त्रोटक उत्तर देता येत नाही. ह्याचं उत्तर चांगलं लांबलचक आहे. संभोग, सेक्स
वगैरेबाबतीत मूलभूत दृष्टीकोन समजावून सांगणे आहे. शिवाय शरीर संबंध हे जोडप्यात
घडत असल्याने उत्तर दोघांच्या कानी पडणे आवश्यक आहे. बरेचदा नवरोजी सोबत नसतात,
तेंव्हा निव्वळ बायकोला काही सांगणं फारसं परिणामकारक ठरत नाही. किंवा बायकोला
बाहेर बसायला सांगून नवरोजी हा प्रश्न डॉक्टरांच्या कानात कुजबुजतात. डॉक्टर जे
सांगतात ते ‘जसंच्या तसं’ जोडीदाराच्या कानावर घालणं अवघडच. मग डॉक्टर आपलं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून
नेतात.
तेंव्हा सादर आहे दोघांनाही माहिती हवं असं संपूर्ण उत्तर.
सुरवातीच्या काही महिन्यात तर सेक्स म्हणजे त्या स्त्रीच्या
दृष्टीनी संकटच असतं. प्रचंड मळमळत असतं. पोटात नुसतं ढवळून येत असतं. साध्या
प्रवासानी काही काळ मळमळलं तरी आपण कोण वैतागतो. काही म्हणजे काही करावसं वाटत
नाही. मग दिवस-दिवस हा त्रास काढणाऱ्या बाईला तर काय होत असेल? अशा वेळी तिनी
रतिसुखाला होकार देणं अपेक्षित तरी आहे का? पण ही गोष्ट पुरुष समजावून घेत नाहीत.
बायका सहसा इतक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मग बेबनाव सुरु होतो.
सुरवातीला खूप थकवाही जाणवतो. एरवीची सवयीची कामही आता जाचक
वाटायला लागतात. खूप झोप येते. रात्र झाली की झोपायचं, रात्री झोपून झोपून कंटाळा
आला म्हणून दिवसा झोपायचं, पुन्हा रात्र झाली, की रात्र झाली म्हणून झोपायचं; अशी
स्थिती होते. त्यातून उलटीसाठी गोळ्या दिल्या असतात, त्यानीही झोप येते. या झोपेचा
निराळा अर्थ काढला जातो. आता त्या स्त्रीला कामेच्छाच उरली नाही अशी समजूत करून
घेतली जाते.
गरोदरपणात स्त्रीचं रूप खूप खूप बदलतं. इतकं की
तिचाच तिच्या बदललेल्या रूपावर विश्वास बसत नाही.
‘लावण्य
जातेस उतू। वायाच चालला ऋतू।
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना।
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।।’
अशी कवींनी सृष्टीसौंदर्याची तारीफ केली असली तरीही या
कालावधीतले अनेक बदल मुळीच सुसह्य नसतात.
बरेचदा गालावर, नाकावर एक मोठा काळा डाग येतो (Malesma),
दिसायला भारी वाईट दिसतो. पोटावर बेंबीपासून खाली जणू कोळश्यानी ओढावी अशी एक काळी
रेघ उमटते (Linea Nigra). ही देखील विद्रूप दिसते. एकूणच त्वचा काळवंडते.
निपलभोवती, मायांगाभोवती काळेपणा वाढतो. शरीरातल्या वाढत्या मेलानिन ह्या
द्रव्याच्या ह्या खुणा. प्रसूतीनंतर या
मावळतात. पण किंचित मागमूस राहु शकतो, राहतोच. पुढे पुढे पोटावर, मांड्यांवर,
स्तनावर, पांढऱ्या रेघा उमटतात (Strie Gravisarum). हे चट्टेपट्टे अगदी विचित्र
दिसतात. ह्या रेघा उठतात त्या पोटाची त्वचा अति ताणल्यामुळे. त्वचेचा आतला पापुद्रा
चक्क विरतो. कधी खाज सुटते, कधी लाली येते. किरकोळ औषधांनी हा त्रास थांबतो. पण
खुणा येऊ नयेत किंवा आलेल्या पूर्ण जाव्यात असं औषध नाहीये. असूच शकत नाही. कारण
पोट तर वाढणारच आणि त्यामुळे त्वचा तर विरणारच. म्हणूनच अशा हेतूने विकल्या जाणाऱ्या
औषधांची कामगिरी यथातथाच आहे. त्वचेच्या
बदलत्या रंगरूपाबरोबरच पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येते, केसही गळायला लागतात. या
पाठोपाठ शरीराची ढब बदलते. सरळ ताठ उभं रहाताच येत नाही. पुढे पोक काढून उभं रहावं
लागतं. स्तनांचा आकार वाढतो, ते खाली ओघळतात आणि अगदी काखेपर्यंत या गाठी वाढतात.
यामुळे बेडौलपणा येतो. स्तनांना हुळहुळेपणा येतो. एरवी हवेहवेसे स्वर्गीय वाटणारे
स्पर्श, आता नकोसेच नाही तर तापदायक वाटायला लागतात. स्तनातून अगदी सुरुवातीपासून
चीक बाहेर पडतो. हे लक्षात येताच काहींना उगीचच ओशाळल्यासारखं होतं. योनी
स्त्रावातही बरेच बदल होतात. त्या स्त्रावाचं प्रमाण आणि गंध बदलतो. योनी मार्गाला
आणि एकुणच स्त्रीअवयवांना वाढलेला रक्तपुरवठा
हे ह्याचं प्रमुख कारण. रक्त पुरवठा इतका वाढतो की कधी कधी अलगद
स्पर्शानेही रक्तस्त्राव सुरु होतो. मग कोण धावपळ, हा रक्तस्त्राव गर्भाशी थेट
संबंधित नाही अशी खात्री होईपर्यंत कोण काळजी.
ह्या साऱ्याचा स्त्रीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अधिक
गहिरा असतो. अनेकींना स्वतःबद्दल विलक्षण न्यूनगंड वाटायला लागतो. ‘आता आपण पूर्वीसारख्या
आकर्षक, सुंदर दिसत नाही; निस्तेज, काळवंडलेली कांती, बांधाही बेढब, आता हे सारं
पूर्वीसारखं होणं जाम अवघड. आता आपण आपल्या नवऱ्याला पूर्वी इतक्याच आवडू का?’,
अशी चिंता भेडसावायला लागते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. अशा वेळी
नवऱ्यानी दिलेला विश्वास हा लाखमोलाचा ठरतो. पुरुषांनी हा मुद्दा लक्षात ठेवायला
हवा, आचरणात आणायला हवा.
ह्या बरोबर इतरही अनेक प्रकारच्या ‘भीत्या’ अशा जोडप्याला
छळत असतात. गर्भपात होईल, कमी दिवसाची प्रसूती होईल, अशी भीती वाटत असते. इतर काही
बाधा नसेल तर संबंधामुळे ना गर्भपात होतो ना कमी दिवसाची प्रसूती. बाळाला इजा होईल अशीही भीती सतावत असते.
शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इजा होऊ शकत नाही. बाळाला इन्फेक्शन होईल अशीही भीती
वाटत असते. पण शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इन्फेक्शनही होत नाही. नवऱ्याच्या
शरीरातील जंतू थेट बाळाला टोचले जात नाहीत. समजा नवऱ्याला काही इन्फेक्शन असेल,
उदाः एचआयव्ही, तर ते आधी आईला होते आणि आईच्या रक्तातून ते बाळापर्यंत पोहोचते.
पण बहुतेकदा नाहीच पोहोचत. ‘नउ मास नउ दिवस रक्तामासाचा घास करून मी तुला लहानाचा
मोठा केला’; असं सिनेमातल्या आया जरी म्हणत असल्या, तरी प्रत्यक्षात आईचं रक्त आणि
बाळाचं रक्त हे दोन वेगवेगळ्या पाईपलाईन मधून फिरत असतं. आईचं रक्त, बाळाच्या शरीरात खेळतबिळत नसतं. आई आणि बाळाच्या रक्ताचा
थेट संपर्क येत नाही. अतिपातळ, अतिसूक्ष्म पडद्याद्वारे आवश्यक व अनावश्यक
पदार्थांची देवाणघेवाण तेवढी होत रहाते. आईच्या शरीरातील जंतुंना बाळापर्यंत
पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. हा पडदाही भेदावा लागतो. काहीच
जंतुंना, काहीच वेळी हे साधतं. बहुतेकदा नाहीच साधत.
काही जणांना तर होणाऱ्या बाळाचं भवितव्य काय असेल अशी
विचित्र चिंता लागून रहाते. मोठेपणी आपले बाळ कोण होईल? ते जगात आपलं नाव काढेल
ना? असे विचार मनात घोंगावू लागतात. अर्थातच इतक्या दूरची चिंता वहाणाऱ्यांच्या
कामरंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. आपला हा जो काही उद्योग चालला आहे तो बाळ
आतून बघतंय असं चित्र काही जणांना सतावतं. असा काही विचार आला की मंडळी ऐक वक्ताला
अगदी वरमून आणि शरमून जातात. अश्या लाजऱ्या लोकांसाठी हे नमूद केलंच पाहिजे की
बाळाला आतून काहीही दिसत नाही, तेंव्हा, ‘चालू दे तुमचं!’
पोकळ शंकांच्या बरोबरीने स्त्रीचे मूडही गरोदरपणात
एरवीपेक्षा(ही) पटापट बदलतात. घटकेत रडू तर घटकेत हसू असा खेळ सुरु होतो. नवऱ्याची
खूपच गोची होते. स्त्रीची कामेच्छा गरोदरपणात जरा कमी होते. होर्मोनमधील होणारे
बदल मेंदूतही आपली करामत दाखवतात. मातृभावना उफाळून येतात. पिल्लांना इजा करू
धजल्यास प्राणीही किती चवताळून अंगावर येतात. अशाच भावना निसर्गाने मानवी मेंदूतही
पेरल्या आहेत. अर्थातच कामेच्छा कमी झाली तरी संपतबींपत नाही. ही बाब पुरुषांनी
समजावून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अशा अवस्थतेत त्या स्त्रीला मानसिक आधाराची,
विश्वासाची गरज असते. ह्या कालावधीत एकमेकांबरोबर वेळ घालवणं, बाळासाठी तयारी
करणं, यात बाबांचाही सहभाग असेल तर पतीपत्नीचं नातं अधिक गहिरं होत जाईल. नात्यात
एक नवा भरजरी धागा गुंफायची संधी म्हणून याकडे पहायला हवे.
निव्वळ दिवस रहाण्याने, एक मुद्दा निर्विवादपणे सिद्ध झालेला
असतो. ‘आपल्याला दिवस राहू शकतात!’. लग्नानंतर पहिल्या वर्षात दिवस राहिले नाहीत
तर लोक त्या बाईकडे विचित्र नजरेने बघतात, दोन वर्षात राहीले नाहीत तर त्या
पुरुषालाही, ‘नको ग बाई हा मेला पुरुषाचा जन्म!’ असं होऊन जातं आणि तीन वर्षात
राहिले नाहीत तर त्यांच्या डॉक्टरलासुद्धा अशा नजरांचा सामना करावा लागतो. बायकोला
दिवस ‘रहाववू’ शकणे हे पुरुषाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचं असतं. वांझोट्या
स्त्रीची वेदना कथा कादंबऱ्यातून आणि नाटका सिनेमातून सतत कुरवाळली जाते, पण अशा
पुरुषांनाही काळजात प्रचंड ओझं घेऊन जगावं लागतं. मोकळेपणी रडणं पुरुषांना नॉट अलाउड; तेंव्हा फक्त कुढणं चालू असतं. दिवस
राहिल्यामुळे, ज्या एका आउटकमवर अख्खी लग्नसंस्था उभी आहे, ज्या बातमीची दोन्ही
घरचे आतुरतेने वाट पहात असतात, ती शक्यता आता नजरेच्या टप्यात येते. त्या
जोडप्यावरचा ताण हलका होतो. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वंशवृद्धी हा तात्कालिक
हेतू साध्य झाल्यामुळे सेक्सकडे आता निर्हेतुकपणे बघणं शक्य होतं. हा अनुभव खूप
वेगळा आणि सुंदर असतो. निव्वळ आनंदासाठी संभोग, काहीही मिळवण्यासाठी नाही. हा तर
निष्काम शृंगारयोग.
बदलत्या भूमीकेचंही दोघांना अप्रूप असतं. मित्र-मैत्रीण,
पती-पत्नी हे नातं आता आई-बाबा, बालक-पालक
असं बदलणार असतं. पण कित्येक पुरुषांना बायकोबद्दल आता सुप्त असूया वाटते.
आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत घरातील कर्ता पुरुष हाच घराचा केंद्रबिंदू असतो.
रोजची भाजी कोणची करायची हे ही त्याच्याच कलानी ठरवलं जातं. पण दिवस राहीले की
पुरुषाच्या पुढारकीत वाटेकरी निर्माण होतो. ‘चहाच्या वासानीसुद्धा मळमळत तिला,
तेंव्हा आजपासून सकाळी सगळ्यांसाठी कॉफी!’ अशा घोषणा नित्याच्याच होतात. नवेपणाचे
किती सोहळे! ते डोहाळजेवण... झोपाळ्यापासून
ते थेट चंद्रापर्यंतचं. ते फोटो. ते कौतुक. घराचा सगळा फोकस त्या बाईवर रहातो आता.
असूया म्हणून असो वा सोय म्हणून असो, या साऱ्यातून बाजूला रहाण्यापेक्षा या साऱ्यात सहभागी होणं
हे चांगला बाप होण्यासाठी उपयोगी आहे. भावी पालकांसाठी आजकाल मार्गदर्शन वर्ग असतात.
यातही बाबांची हजेरी बाबांना खूप काही शिकवून जाते. पती-पत्नीचं नातं निवळ
शरीरभोगावर आधारलेलं नाही, नसावं. हे सिद्ध करण्यासाठी एक संधी म्हणून ह्या
साऱ्याकडे पहावं.
शेवटी मूळ प्रश्न आणि त्याच्या स्पष्ट, नेमक्या उत्तराकडे.
‘गरोदरपणी संबंध कधी टाळावेत?’
- पहिले तीन महिने आणि शेवटचे दोनएक महिने संबंध टाळावेत असा सल्ला बहुसंख्य प्रसूतीतज्ञ देतात पण यालाही फारसा शास्त्रीय आधार नाही.
- काही निवडक आजारातच संभोगावर बंदी आहे. रक्तस्त्राव होत असेल/ झाला असेल, वार खाली असेल, बीपी वाढल्याने वा अन्य कारणानी संपूर्ण विश्रांतीची गरज असेल, पाणमोट फुटली असेल, पिशवीचे तोंड उघडले असेल, तर संभोग वर्ज्य आहे; एरवी नाही.
- पोटावरती दाब येणार नाही असे संभोगाचे आसन असावे. सेक्स म्हणजे निव्वळ लिंगाचा योनी मार्गात प्रवेश ही फारच मर्यादित, खुजी, संकुचित व्याख्या झाली. प्रेमंभरानी दिलेले आलिंगन, चुंबन, मर्दन, परस्परांचे हसतमैथुन, मुखमैथुन वगैरेही सेक्सचेच प्रकार आहेत. प्रयोगशील जोडपी या कालावधीत हे प्रयोग करू शकतात. पत्नीला आनंद वाटेल, सुसह्य होईल इतपतच धाव घ्यावी.
- प्रसूतीनंतर सर्व शरीर पूर्वपदावर यायला किमान दीड महिना लागतो. तेंव्हा प्रसूतीनंतर दिड महिना शरीरसंबंध टाळावेत. त्यातून पोटावर सीझरचे किंवा मायांगावर नॉर्मलवेळी सुद्धा कधी कधी घातलेले टाके दुखत असतील तर संबंध टाळणं योग्य. त्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि गर्भ निरोधक साधनांबद्दल सल्ला घेऊन कामक्रीडा सुरु करायला हरकत नाही. बाळाला अंगावर पाजायच्या काळात योनीमार्गाला कोरडेपणा येतो. यामुळे संभोगाच्या वेळी घर्षणाचा त्रास होतो, दोघांनाही होतो. यासाठी डॉक्टरी सल्ल्यांनी वंगणयुक्त मलमे वापरायला हवीत.
- कधी कधी शरीर आणि मेंदू यांचा ताळमेळ चुकतो; बाळाला पाजतापाजताच कामतृप्तीचा आनंद प्राप्त होतो. हे आईसाठी अनपेक्षित असतं. पण यात अॅबनॉर्मल काही नाही.
‘समागम’ हा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे. समागम ह्या
शब्दाचा एक अर्थ असा सांगतात की, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद घेणं
आणि देणं. हा किती सुंदर अर्थ आहे. हे साधायला हवं. ह्यासाठी उभयपक्षी सहकार आणि
पुढाकार हवा.
प्रथम प्रसिद्धी पुरुष उवाच दिवाळी २०१७
या आणि अशा लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
<shantanuabhyakar.blogspot.in>
No comments:
Post a Comment