Monday 30 October 2017

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर

हवी तेवढी मुलं झालेली असतात. ती मोठीही झालेली असतात. रांधा, वाढा, उष्टी काढा करून कातावलेला जीव जरा निवांत झालेला असतो. मग मनात येतं, एकदा मुलं झाली की गर्भपिशवीचं काही काम नाही. हा अवयव नुसतातच शरीराला भार. उलट दर महिन्याला पाळी येणार, त्याच्या आधी, नंतर, काही ना काही त्रास होणार, प्रवास आणि सणासुदीला पाळीचा प्रश्न सोडवावा लागणार. अशा असंख्य कटकटी तेवढया उरणार. त्यातून घरी-दारी, शेजारी-पाजारी कुणाला कँन्सर झाला असेल तर मग ह्या बाईपाठीमागे कॅन्सरच्या भीतीचा ब्रम्हराक्षस लागतो. शेजारणीचे डोळे आले की ‘वासाने’ आपले येतात पण शेजारणीचा कॅन्सर काही ‘वासानी’ पसरत नाही. पण अशा विचाराने मुले-बाळे झाल्यावर, पिशवीचे हे ‘जड झाले ओझे’ काही ना काही खुसपट काढून उतरवून टाकण्याकडे महिलांचा कल असतो. रांधा, वाढा झाल्यावर आता ‘पिशवी काढा’च्या दिशेनी प्रवास सुरु होतो. बेंबीच्या खाली आणि गुडघ्याच्यावर, कोणतीही तक्रार असेल तर त्यावर पिशवी काढणे हा अक्सीर इलाज म्हणून सुचवला जातो. चुटकीसरशी स्वीकारला जातो. हे चुकीचं आहे.
म्हणूनच खालील तीन वाक्य प्रत्येक स्त्रीनी आपल्या मनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवली पाहिजेत.
१.              प्रत्येक बारीक सारीक तक्रारीसाठी पिशवी काढणे हा उपाय असू शकत नाही.
२.              पिशवी काढली की पिशवीचा कँन्सर टळतो पण अनावश्यक ऑपरेशनचे तोटे अधिक आहेत.
३.              पिशवीचा कँन्सर टाळण्यासाठी पिशवी काढणे, हा उपाय अयोग्य आहे.
मग योग्य उपाय काय आहे? पॅपिनीकोलोव्ह स्मिअर तपासणी, यालाच म्हणतात पॅप स्मिअर.
 पण पॅप स्मिअरबद्दल  नंतर सांगतो, आधी थोडसं गर्भपिशवीच्या कॅन्सरविषयी. गर्भपिशवीचा कॅन्सर असा काही एकच एक आजार नाही. गर्भ पिशवीचे वेगवेगळे भाग आहेत आणि त्या सर्व भागांना विविध कॅन्सरची बाधा होऊ शकते. पण होणाऱ्या प्रत्येक कॅन्सरची चिंता करण्याची गरज नसते कारण यातले बरेचसे कॅन्सर हे अति दुर्मिळ आहेत.  सर्वात कॉमन आहे तो गर्भपिशवीच्या तोंडाचा, म्हणजे ग्रीवेचा कॅन्सर, यालाच म्हणतात सर्व्हायकल कॅन्सर. या कॅन्सरचं लवकरात लवकर, म्हणजे तो डोळ्याला दिसण्याअगोदर कैक वर्ष आधी, निदान हे या पॅप स्मिअर तपासणीने होते.

पॅप स्मिअर ही एक ‘स्क्रिनिंग टेस्ट’ आहे! ‘स्क्रिनिंग टेस्ट’ म्हणजे ‘चाचणी’ नव्हे तर ‘चाचपणी’ असते. अशा टेस्टमधून आपल्याला नेमकं निदान होत नाही. पण पेशंटला आजार असण्याची शक्यता आहे का, ते कळतं. अशी ‘अवाजवी शक्यता’ असलेल्या पेशंटची पुढे आणखी सखोल नेमके निदान होईल अशी चाचणी केली जाते. आधी सर्वांची ‘चाचपणी’ आणि मग गरजेनुसार ‘नैदानिक चाचणी’, अशी द्विस्तरीय रचना मुद्दाम वापरली जाते. सर्व्हायकल कॅन्सरचं  नेमकं निदान करणाऱ्या तपासण्या (Diagnostic tests) ह्या महाग असतात. त्यात एका छोटयाश्या ऑपरेशनने, सर्व्हिक्सचा तुकडा काढून तपासावा लागतो (सर्व्हायकल बायोप्सी). तो तपासायला पॅथॉलॉजीस्ट लागतो. हे अर्थात खूप खार्चिक आहे. म्हणून मग ‘आधी चाचपणी आणि मग  गरजेप्रमाणे नैदानिक चाचणी’ असं धोरण अवलंबिले जाते. ह्या धोरणामुळे वेळ, पैसा आणि त्रास वाचतो. मोजक्या अतिजोखीमवाल्यांकडे अधिक काटेकोर लक्ष पुरवता येते आणि  बिनजोखीमवाल्या निर्धास्त राहू शकतात. बिनजोखीमवाल्यांचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रास वाचतो.
पॅप स्मिअरमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (ग्रीवा, Cervix) पेशी तपासल्या जातात. इथे कॅन्सरच्या दिशेने चालू लागलेल्या पेशी सापडल्या तर पुढे कॅन्सर होऊ शकेल असं भाकित वर्तवता येतं. हे भाकित शंभर टक्के खरं ठरेल असं नाही. काही उपचार करून ह्या वाममार्गी लागलेल्या पेशींना पुन्हा मूळपदावर आणणं शक्य होतं. काही तर आपण होऊन बिकटवाट सोडून धोपटमार्ग धरतात आणि पुन्हा सुतासारख्या सरळ वागायला लागतात. पेशींप्रमाणेच इथे एच.पी.व्ही. (Human Papilomma Virus) हा विषाणू वास करून आहे का हेही तपासता येतं. ग्रीवेतल्या तरण्याताठ्या पेशींना फसवून कॅन्सरच्या वाटेला लावणारा हाच तो खलनायक. हा असेल तर कॅन्सरची भीती वाढते. लहान वयात लग्न झालेल्या, वारंवार आणि भारंभार मुलं झालेल्या, गुप्तरोग असलेल्या, बाहेरख्याली पतीशी रत झालेल्या, वेगवेगळ्या गुप्तरोगांनी ग्रासलेल्या किंवा अनेकांबरोबर शरीर संबंध आलेल्या; अशा बायकांत हा कॅन्सर जास्त आढळून येतो. पॅप स्मिअर म्हणजे जणू ‘पाप’ स्मिअर आहे. केलेली सारी पातके त्यात दिसतात! वर वर्णिलेल्या पापांमध्ये  एच.पी.व्ही. नामे करून विषाणूची लागण सहज होते. तेंव्हा खरा गुन्हेगार हा विषाणू आहे.

ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. पाळी, गर्भधारणा, वय, इन्फेक्शन्स, अशा कारणानी ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. सूक्ष्मदर्शकाखाली बघताना कधी यांचे पातळ थर, एकावर एक पोती रचल्यासारखे दिसतात, तर कधी या उंच खांबांसारख्या दिसायला लागतात. वारंवार होणाऱ्या या रूपांतरात कधी कधी गफलती होतात. काही काही पेशी एच.पी.व्ही.शी सलगी करतात आणि कॅन्सरनामे राक्षसिणीचे रूप घेतात. हे बदलते रूप आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो, अभ्यासू शकतो. हा राक्षसिणीचा मेकअप चढवायला त्यांना बरीच वर्ष लागतात. प्रथमावस्थेपासून कॅन्सरपर्यंतचा प्रवास दहा ते पंधरा वर्षांचा असतो. हाच ह्या आजाराचा वीकपॉईंट आहे. एवढया मोठया कालावधीत हे बदल पॅप स्मिअर सारख्या तपासणीत लक्षात येतात आणि योग्य ती पावले उचलून कॅन्सर टाळता येतो.
 अगदी सुरवातीच्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला योग्य उपचार केले तर या मायावी पेशी पुन्हा पहिले रूप धारण करतात. किरकोळ बदल असतील तर औषधे आणि भारी बदल असतील तर स्थानिक ऑपरेशन असं उपचाराचं स्वरूप असतं. मग त्या बाईला कॅन्सर होतच नाही. पण ह्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला जर आपण दुर्लक्ष केलं तर ह्या मायावी राक्षसीणी तिथे वाढत रहातात. हळूहळू खोलखोल शिरतात आणि पेशंट कॅन्सरच्या भक्ष्यस्थानी पडते.

टेस्ट कशी करतात?
एखाद्या ब्रश किंवा चमच्यासारख्या उपकरणानी ग्रीवेच्या पेशी घेऊन त्या तपासल्या जातात. पेशींच्या रूपाचा अभ्यास केला जातो. एच.पी.व्ही. आहे का याचीही परीक्षा केली जाते. यासाठी ना भूल दयावी लागते ना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. एरवी आतून तपासणी केली जाते तशीच काहीशी ही तपासणी आहे.

टेस्ट कधी करतात?
सर्वसाधारणपणे सुरवातीला वर्षातून एकदा आणि नंतर दर तीन वर्षानी. पण नेमका कालावधी डॉक्टरांच्या सल्ल्यानी ठरवता येईल.

पॅप तपासणीचा रिपोर्ट ‘शंकास्पद’ आला तर?
‘कॅन्सर’ असा रिपोर्ट आला तरच त्याचा अर्थ ‘कॅन्सर’ असा होतो. ‘शंकास्पद’  रिपोर्टचा अर्थ ‘शंकास्पद’ असाच होतो.  शंकास्पद बदल बरेचदा काही कालावधीनी आपोआप नॉर्मल होऊन जातात. क्वचित याची धाव  कॅन्सरपर्यंत जाते. पण ही धावही कूर्मगतीने असते. बरेचदा खात्री करण्यासाठी अशा शंकास्पद रिपोर्टवाल्या पेशंटच्या ग्रीवेचा तुकडा काढून तपासला जातो. यासाठी काही वेळा कॉल्पोस्कोप या यंत्राची मदत घेतली जाते. यातही कॅन्सर वा त्यासदृश रिपोर्ट आला तरी काही वेळा जागच्या जागी ऑपरेशन करून तो भाग काढून टाकता येतो. अगदी पुढे मुलंबाळंसुद्धा होऊ शकतात. पुढे पॅप तपासणी मात्र करतंच रहावं लागतं.

ही तपासणी कितपत बिनचूक असते?
हा प्रश्न अगदी योग्य आहे. सर्वच टेस्ट प्रमाणे ह्याही टेस्ट मधे डावं उजवं होऊ शकतं. कधी सारं काही ठीक असताना ‘घोटाळा’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स पॉझीटीव्ह) तर कधी सारं काही बिनसलेलं असताना ‘आल इज वेल’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स निगेटिव्ह). हे प्रकार टाळण्यासाठी पॅप तपासणी आधी दोन दिवस संबंध टाळायला हवेत. कोणतीही योनीमार्गात ठेवायची औषधे वा प्रसाधने टाळायला हवीत. पाळीच्या दरम्यान ही टेस्ट करू नये.
डॉ. शंतनू अभ्यंकर
प्रथम प्रसिद्धी दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, ३१/१०/१७
या आणि अशाच लेखनासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


No comments:

Post a Comment