Thursday 26 October 2017

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

आजकाल डॉक्टरना शिव्या घालणे, मारहाण करणे, राजरोस चालू असते. कट प्रॅक्टिस, अति नफा, औषधकंपन्यांशी असलेले साटेलोटे, रुग्णाची हेळसांड झाल्याचे आरोप हे तर नेहमीचेच. ह्या साऱ्यात अजिबात तथ्य नाही असं नाही. हे आरोप सर्व पॅथीच्या डॉक्टरना झेलावे लागतात. पण या पेक्षा थोडया वेगळ्या प्रश्नाकडे मी वळणार आहे.
आजकाल  अॅलोपॅथीला शिव्या घालायची फॅशन बोकाळली आहे. कोणतंही वृत्तपत्र, आरोग्य पुरवणी, टीव्ही चॅनेल, मासिकं, पुस्तकं बघा, सर्वत्र हा एककलमी कार्यक्रम जोमात चाललेला दिसतो. अॅलोपॅथी किती कमअस्सल, किती घातक, किती बेभरवशाची असा सगळा आव असतो. अशा आरोपांचा समाचार घेण्याचा माझा विचार आहे. तरी बरं आज अॅलोपॅथीच्याच वापराने १९४७साली निव्वळ ३७ वर्ष असलेलं आपलं आयुर्मान आता तब्बल ६७ वर्ष झालं आहे.
सुरवातीलाच हे स्पष्ट केलं पाहिजे की, अॅलोपॅथी ही संज्ञाच मुळात साफ चुकीची आणि गैरलागू आहे. अॅलोपॅथी म्हणजे ‘विरुद्ध’ किंवा ‘विपरीत’ उपचार. पेशंटला जे होतंय ते होऊ नये एवढंच औषध देणारे शास्त्र म्हणजे अॅलोपॅथी. डोकेदुखीला वेदनाशामक आणि तापला ज्वरशामक देणे एवढीच याची धाव. त्या काळची उपचार पद्धती होतीच तशी जहाल. रुग्णांना मारझोड करणे. तीव्र मात्रेत रेचके (जुलाब होतील अशी औषधे) किंवा वमनके (उलटया होतील अशी औषधे) देणे, जळवा लावणे, रक्तस्राव घडवणे वगैरे प्रकार सर्रास चालत. आजच्या अॅलोपॅथीमध्ये यातलं काहीसुद्धा शिल्लक नाही. नित्यनूतन विज्ञानाच्या पावलावर पाउल ठेवत, आज अॅलोपॅथी इतकी बदलली आहे की आज अॅलोपॅथी अस्तित्वात नसून ‘अधुनिक वैद्यकी’ला अॅलोपॅथी म्हटलं जातं. इथेही अॅलोपॅथी हा शब्द निव्वळ प्रचलित आहे म्हणून वापरला आहे. तो आधुनिक वैद्यक याच अर्थाने घ्यावा.
आज कोणी असह्य डोकं दुखतंय अशी तक्रार केली तर निव्वळ क्रोसिनची गोळी देऊन कोणी थांबत नाही. त्या मागचं  कारण शोधायला अनेकानेक तपासण्या केल्या जातात. डोकेदुखीची अनेक कारणे संभवतात; घट्ट टोपी घालण्यापासून ते ब्रेन ट्युमरपर्यंत. काही तरी संभाव्य निदान हाती आल्यावर उपाय योजले जातात. चष्म्याचा नंबर देणे, दाढ काढणे, ब्लडप्रेशरसाठीचे औषध, नैराश्यनिवारक गोळी,  इथपासून ते रोबोटिक ब्रेन सर्जरी पर्यंत असं या उपचारांचं काहीही स्वरूप असू शकतं. ‘विरुद्धउपचार’वाली अॅलोपॅथी ही नक्कीच नाही. हे आहे आधुनिक वैद्यक.
अॅलोपॅथीवर आरोप करताना सगळ्यात बाऊ केला जातो तो औषधांच्या साईड इफेक्टचा. अॅलोपॅथीच्या औषधांना साईड इफेक्ट असतात हे सत्यच आहे पण त्याचा अर्थ ‘इतर’ औषधांना ते नसतात असं म्हणणं हा सत्यापलाप आहे. ‘आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीत’ हे विधान म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. कोणतेही औषध हे शेवटी एक अथवा अनेक रसायनाचं मिश्रण असते. मग त्याच्या ललाटी ते अॅलोपॅथीचे आहे का अन्य पॅथीचं हे छापल्याने त्याच्या रासायनिक घटकात, गुणधर्मात आणि त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामात काही फरक पडत नाही. रसायनशास्त्राच्या भाषेत नावडतीचं मीठही खारटच असतं. ह्या रसायनांचे काही परिणाम हवेहवेसे असतात, औषधी असतात. बरेचसे नको असले तरी चालतील अशा स्वरूपाचे असतात. तर काही अगदी त्रासदायक असतात (हेच ते साईड इफेक्ट). आम्ही दिलेल्या अमुक अमुक ‘रसायनाचे’ म्हणजेच औषधाचे, सुपरिणाम तेवढेच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुष्परिणाम सुप्त राहतील, असा दावा कसा काय शक्य आहे? उलट ज्या औषधाचे काहीच दुष्परिणाम नाहीत त्याचे मुळात परिणाम तरी आहेत का नाही अशी शंका घ्यायला हवी!
प्रत्येक औषधाच्या चांगल्या वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत, अभ्यास आहेत. उलट अशा सखोल अभ्यासामुळे हे दुष्परिणाम कमीतकमी कसे होतील, टाळता कसे येतील, अशा दिशेनी संशोधन व्ह्यायला मदतच होते. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपाया आहे हे तुम्ही पाहू शकता. साईड इफेक्ट आहेत हे मान्य करण्यात कमीपणा कसला? असलाच तर प्रामाणिकपणा आहे. अॅलोपॅथीच्या प्रत्येक औषधाच्या लेबलवर ही यादी दिलेली असते. कायद्यानी तर तसं बंधन आहेच पण पुस्तकांतून अशी माहिती द्यावी असं काही कायद्यानी बंधन नाही. पुस्तकात तर इथ्यंभूत माहिती असते. अशी यादी अन्य कुठल्या पॅथीच्या औषधावर दिसते का हो? त्या बाटल्यात नेमकं काय आणि किती प्रमाणात आहे, हे तरी स्पष्टपणे लिहिलेले असते का? बिनअॅलोपॅथीवाल्या बाटल्यातील रसायने सर्वगुणसंपन्न आणि अॅलोपॅथीच्या बाटल्यातली तेवढी सर्व-अवगुणसंपन्न असं कसं शक्य आहे? आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीतच म्हणणं ही खरंतर आत्मवंचना आहे. स्वतःच स्वतःला फसवणं आहे आणि असे जाहीर दावे करणे म्हणजे रुग्णांनाही फसवणं आहे.
शिवाय होणारे सगळेच साईड इफेक्ट वाईटच असतात असंही नाही; काही वेळा चांगलेही असतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रीबीजग्रंथीचा कॅन्सर टळतो, गर्भपिशवीच्या अस्तराचा कॅन्सर टळतो, पाळीच्या वेळी अत्यंत कमी अंगावरून जातं. हे सगळे या गोळ्यांचे सु-साईड इफेक्टच आहेत. तेंव्हा साईड इफेक्टच्या बागुलबुवाला डरायचं काम नाही. उलट साईड इफेक्ट नाहीतच असला अचाट आणि  अशास्त्रीय दावा करणारे डरावने आहेत हे निश्चित.
जी गोष्ट साईड इफेक्टची तीच गोष्ट ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’ या नावाने खपवल्या जाणाऱ्या औषधांची. जे जे ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’, ते ते सेफ आणि उपयुक्त, इतकी बाळबोध कल्पना सोडून द्यायला हवी. नॅचरल असलेल्या सगळ्याच गोष्टी काही चांगल्या नसतात. स्वाईन फ्ल्यूची लागण, सर्पदंश, काही कंदमुळे खाल्याने होणारी विषबाधासुद्धा नॅचरलच आहे पण सुरक्षित नाही.
 एखादं औषध निसर्गात तयार सापडलं म्हणून ते आपोआप गुणकारी आणि सुरक्षित ठरत नाही आणि कारखान्यात बनवल्यामुळे तेच थेट खलनायकही ठरत नाही. कोणतेही रसायन हे निसर्गात सापडो वा कारखान्यात बनो, त्याचे गुणधर्म तेच असतात. हा तर शालेय रसायनशास्त्रात शिकवला जाणारा प्राथमिक सिद्धांत आहे. भल्याभल्यांना याचा विसर पडतो आणि ते अशा जाहिरातींना भुलतात. पूर्वी इन्सुलिन गुरांपासून, डुकरांपासून बनत असे. अगदी ‘नॅचरल’ इन्सुलिन. पण ह्याचे दुष्परिणाम फार. त्यामुळे आजचे ‘मानवी’ इन्सुलिन आले हे कारखान्यात बनतं.  पण हे पूर्वीच्या इन्सुलिनपेक्षा कित्येक पट सुरक्षित आहे. केवळ ‘नॅचरल’ आहे ह्या मिषाने गुरा/डुकराचे इन्सुलिन सध्या कोणी विकत नाही. कारण नॅचरलपेक्षा भारी असं मानवी इन्सुलिन आता आपण बनवलं आहे. ही जेनेटिक इंजिनिअरीगची किमया. कारखान्यात हे ‘मानवी’ इन्सुलिन बनवतात तिथे पाळलेले बॅक्टेरीया. मग आता हे ‘नॅचरल’ म्हणावं काय? का बॅक्टेरीया हे एका वर्गीकरणानुसार वनस्पतींमध्ये मोडतात, तेंव्हा याला ‘हर्बल’ म्हणू या का?
 ‘हर्बल’ हे ही असंच एक फसवं लेबल. ‘जे जे हर्बल ते ते उत्तम’ अशी काही तरी या जाहिरातदारांनी ग्राहकांची पक्की समजूत करून दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर आजची अॅलोपॅथीची कित्येक औषधे हर्बलच आहेत. अॅट्रोपीन हे अत्यंत उपयुक्त औषध, अट्रोपा बेलाडोना या वनस्पतीपासून मिळालं आहे. हृदयविकारावरील डिजीटॅलीस, मलेरियावरील क्विनीन, प्रसूतीवेळी वापरलं जाणारं मिथार्जीन ही देखील मूलतः हर्बल औषधेच आहेत. इतकंच कशाला हीच व्याख्या लावायची म्हटली तर पेनिसिलिन हे ही हर्बलच आहे की! ‘पेनिसिलियम नोटाटम’ या बुरशीपासून पेनिसिलीन बनतं. पण ‘घ्या हो घ्या, पेनिसिलीन घ्या, आमचं हर्बल पेनिसिलीन घ्या’ अशी जाहिरात तुम्ही कधी बघितली आहे का? ‘पेनिसिलीन वापरा कारण ते अमुक अमुक अभ्यासानुसार सुरक्षित आणि गुणकारी असून या या मर्यादांच्या आधीन राहून त्याचा योग्य तो उपयोग करा’, अशीच अॅलोपॅथीची नम्र आणि नेमकी मांडणी असते. अशा मांडणीचा आदर करायचा सोडून हर्बलचा झेंडा नाचवणाऱ्यांना काय म्हणावं?
होलिस्टिक हाही असाच एक शब्दविभ्रम नेहमी वापरला जातो. आमची पॅथी म्हणजे होलिस्टिक उपचार; पर्यायानी अॅलोपॅथी होलिस्टिक नाही असं सतत सुचवलं जात. ही होलिस्टिक ही काय भानगड आहे ते जरा नीट समजावून घेऊ या. होलिस्टिक म्हणजे काया आणि मन यांचा एकत्रित विचार करुन केलेले उपचार. काहीजण यात सर्व पॅथ्यांनी मिळून केलेले उपचार किंवा अध्यात्मिक किंवा दैवी आशयही शोधतात. पण आपण आपले ‘माइंड अँण्ड बॉडी’ याबद्दलच बोलू. आम्ही होलिस्टिक आहोत सबब तुम्ही, म्हणजे अॅलोपॅथीवाले, होलिस्टिक नाही असा सूर असतो. तुम्ही भले होलिस्टिक आणि काय काय असा पण त्याचा अर्थ अॅलोपॅथी बिन-होलिस्टिक असा कसा होतो? अॅलोपॅथीला होलिस्टिक म्हणायला काय हरकत आहे?
समजा एखाद्याला वारंवार फंगल (बुरशी) इन्फेक्शन झालं तर तो स्किन स्पेशॅलीस्ट काय फक्त  तेवढयापुरतच औषध देवून गप्प बसतो? मध्यमवयीन, जाडगुल्या माणसाला, वारंवार फंगल इन्फेक्शन होतंय, म्हटल्यावर त्या स्कीनवाल्याला लगेचच डायबेटीसची शंका येते. त्या तपासणीत डायबेटीस निघाला की ती औषध सुरु करावी लागतात. डायबेटीस तज्ञही निव्वळ शुगर लेव्हल नॉर्मल यावी अशी औषधे देऊन थांबत नाही. डायबेटीसचे डोळ्यावर होणारे परिणाम हे पेशंटला काही व्हायच्या आधीच ओळखता येतात, ह्याची कल्पना असल्यामुळे तो त्या माणसाला डोळे तपासायला पाठवतो. कदाचित तिन्ही डॉक्टर हे लक्षात घेतात, की हा जाडगुला माणूस नैराश्यानी घेरलेला आहे आणि त्यातच हे डायबेटीसचं निदान झाल्यामुळे आणखी खचलाय; सबब त्याला मानसोपचाराची गरज असू शकते. आता हे काय होलिस्टिक उपचार म्हणायचे नाहीत तर काय म्हणायचे? निव्वळ चार वेगवेगळे डॉक्टर त्याच्यावर उपचार करताहेत याचा अर्थ, त्यांनी त्याच्या शरीराचे चार तुकडे करून आपापसात वाटून घेतलेत, असा होत नाही. एका डॉक्टरनी अख्खा पेशंट तपासला तर ते होलिस्टिक आणि चार डॉक्टरनी मिळून आपापल्या ज्ञान आणि कौशल्यानुसार त्याच्या विविध विकारांवर विविधांगी उपचार सुचवले, तर ते म्हणे ह्या पेशंटकडे ‘पेशंट अॅज अ होल’ बघतच नाहीयेत. तुकड्यातुकड्यांनी बघताहेत. असं कसं? स्किन, डायबेटीस, डोळे आणि मनतज्ञ असे चार डॉक्टर त्याला तपासतात ते काही त्यांना पेशंटच्या शरीराचे तुकडे करून, एकेक तुकडा  तपासायची सैतानी वखवख सुटल्येय म्हणून नाही. या प्रत्येक क्षेत्रात काम करायचं तर एवढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य लागतं की कोणा एकाच माणसाला हे सगळं समजावून घेणं आणि प्रभावीपणे वापरणं शक्य नाही. अॅलोपॅथीत वेगवेगळे तज्ञ आहेत या मागचं कारण हे आहे. अॅलोपॅथी वगळता अन्य पॅथीत ते जवळपास नाहीत ह्या मागचंही कारण हेच आहे. आज निव्वळ डोळ्याची सोनोग्राफी करणारे, निव्वळ प्रसूतीवेळी भूल देणारे, निव्वळ हाताची ऑपरेशन करणारे वेगवेगळे डॉक्टर आहेत. वैद्यकीच्या तेवढयातेवढया क्षेत्रातही तज्ञ होण्यासाठी  आयुष्य वेचावं लागतं आणि तरीही बरंच काही अस्पर्श रहातं, एवढाच याचा अर्थ.
आम्ही शरीरातील सर्व घटकांचे ‘संतुलन’ साधतो असंही म्हटलं जातं. अॅलोपॅथी काय असंतुलन साधते काय? कोणत्याही आय.सी.यु. मधे किंवा ऑपरेशन थिएटर मधे जाऊन बघा. ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साइ; सोडीयम, पोटॅशियम आणि क्लोराईड; इनपुट आणि आउटपुट; अॅसीटीलकोलीन आणि कोलीनईस्टरेज; या आणि अशा कित्येक घटकांचा एकाच वेळी काय सुरेख तोल साधलेला असतो ते.

अॅलोपॅथी असं मानतं की कोणत्याही आजाराचा विचार आपल्याला
1.    रोगकारक घटक (Agent),
2.    रोगी (Host) आणि
3.    त्याचे पर्यावरण (Environment)
या तीन मुद्यांच्या आधारे करता येतो. कोणत्याही आजाराचे उपचार हे;
1.    आरोग्यवर्धन (Health Promotion),
2.    रोग प्रतिबंध (Specific Protection),
3.    लवकर निदान-लवकर उपचार (Early Diagnosis & Treatment),
4.    पंगुत्व रोखणे (Disability Limitation) आणि
5.    पुनर्वसन (Rehabilitation)
या पाच स्तंभांवर उभारता येतात.
याच तत्वांवर देवीचं निर्मूलन झालं, आता पोलिओचं होऊ घातलंय. मधुमेह, रक्तदाब, इतकंच काय पण ‘रस्ते अपघात’ या आधुनिक रिपूंविरुद्ध दमनयुद्ध छेडलं जातंय तेही याच तत्वांच्या आधाराने. अॅलोपॅथी ही खऱ्या अर्थाने मानववंशाची पॅथी आहे. तिची तत्वे सर्व मानवांना समप्रमाणात लागू होतात. ती ‘चिनी’, ‘अरबी’ किंवा ‘निग्रो’ नाहीये. ती ‘होमो सेपिअन्स’साठी आहे. जसा जर्मन भौतिकशास्त्र आणि भारतीय भौतिकशास्त्र असा भेद संभवत नाही तसंच वैद्यकविज्ञानाचंही आहे; निदान असायला हवं. पण असं दिसत नाही. अनेक उपचार पद्धती ह्या त्या त्या संस्कृतीत उगवलेल्या आहेत. त्या त्या संस्कृतीनुरूप त्यांची तत्व आणि त्यावर बेतलेले आडाखे आहेत. (उदाः आपल्याकडे कोडासाठी पूर्वजन्मीचे सुकृत हेही एक कारण सांगितले आहे, हे सर्व मानवजातीस कसे लागू व्हावे बरे?) अशी सर्व मानवजातीच्या सर्व आजारांचा विचार कवेत घेईल अशी कोणतीही कल्पना वा संकल्पना या अन्य विचारांत आढळत नाही. ही एक मोठीच त्रुटी आहे.
अॅलोपॅथीला टीकेचं वावडं नाही. विरोधातूनच विज्ञानाचा विकास होत आलाय. वैज्ञानिक पुराव्यानिशी केली जाणारी कोणतीही टीका ही हितकारकच असते. पण निव्वळ शेरेबाजी, मोघम आरोप, तीरकस टोमणे ह्यांनी काहीच साध्य होत नाही.
याचा अर्थ अॅलोपॅथीमध्ये सारं काही ‘आल इज वेल’  आहे असं नाही, पण जे काही ‘वेल’ आहे त्याचं श्रेय तरी आपण अॅलोपॅथीच्या पदरात टाकायला हवं एवढंच माझं म्हणणं.

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो. क्र. ९८२२०१०३४९


No comments:

Post a Comment