कठीण समय येता कोण कामास येतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर
ऐनवेळी कुणाचे फाटले वा निसटले;
ऐनवेळी कुणाचे सरले वा
विसरले
नकळत-कळत जेंव्हा भोग-संभोग होतो,
कठीण समय येता कोण कामास येतो?
मुळात गर्भ निरोधक
साधने वापरायचीच नाहीत. वापरली तर नीट सर्व समजून घेऊन वापरायची नाहीत असा आपला
खाक्या.
गोळ्यांनी म्हणे वजन वाढते, खायला विसरतात,
म्हणून नको! कॉपर टी ची भीती वाटते म्हणून नको!! इंजेक्शननी पाळी अनियमित येते
म्हणून नको!!! असा हा नन्नाचा पाढा. कितीही समजावून सांगितलं तरी गैरसमजाची जळमटं
काही हटत नाहीत.
‘आता’ मुले नकोतचवाली
जोडपी सरळ ऑपरेशन करून घेतात. पण ‘आत्ता’ नको (नंतर हवं)वाली मंडळी नन्नाचा पाढा
म्हणत बरेचदा निरोध वा काल-निर्णय पद्धत अवलंबतात किंवा काहीच गर्भनिरोधक वापरत
नाहीत. मग घोटाळे होत राहतात.
कधी ‘निरोध’ नसतो, कधी
असतो पण वापरला जात नाही, कधी निसटतो, फाटतो... मग नको असताना दिवस राहण्याची भीती
वाटू लागते! कधी अचानक इकडून येणं होतं, मागणी होते. कधी ‘काल-निर्णय’चा निर्णय
चुकतो. कधी ‘नकळत सारे घडले’ या शिवाय अन्य काहीही सबब नसते. नको असताना दिवस
रहाण्याची भीती वाटू लागते!! कधी कुण्या अभागीनिवर जोर जबरदस्ती होते; तिला यातून
दिवस तर गेले नसतील ना ही कुशंका डोकावते!! मोठा कठीण समय येऊन ठेपतो.
अशा परिस्थितीत
गर्भधारणा टाळता येईल अशा पद्धती आता उपलब्ध आहेत. कठीण समय येता आपात्कालीन गर्भ
निरोधक साधने उपयोगी पडतात.
गोळी किंवा तांबी
अशा स्वरुपात ही साधने उपलब्ध आहेत.
जर गर्भ संभवाची भीती
असेल तर अशा संबधानंतर शक्यतो बारा तासाच्या आत ही गोळी (LEVONORGESTREL 1.5mg)
घ्यायची असते. याला ना डॉक्टरी सल्ल्याची गरज ना कोणत्याही वैद्यकीय तपासणीची! जेवढ्या
लवकर गोळी घेतली जाईल तेवढं उत्तम. अन्य कोणतीही औषधे चालू असतील वा अन्य आजार
असेल तरीही ही गोळी घ्यायला हरकत नाही. अतिशय सुरक्षित अशी ही गोळी आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकते.
जर गोळी घेतल्यानंतर
२ तासात उलटी वगैरे झाली तर मात्र उलटी होऊ नये, असं औषध घेऊन मग पुन्हा ही गोळी
घ्यावी.
दिवस राहणार नाहीत, अशी
ऐंशी टक्के खात्री आपण बाळगू शकतो. मात्र ८०%च्या भरोश्यावर रहाण्यात अर्थ नाही.
अपेशी २०%त आपण आहोत का, हे जाणून घेणं महत्वाचे आहे. कारण गोळीमुळेही पाळी थोडी
पुढे जाते आणि दिवस राहिले तर जातेच जाते. तेव्हा पुढच्या पाळीला आठवड्याभरापेक्षा
जास्त ‘उशीर’ झाला तर दिवस गेले आहेत का ते तपासून घेणे इष्ट.
आणखी एक महत्वाची
गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संबधानंतर १२ तासात गोळी घेतली गेली तर उत्तमच. मात्र
उशिरात उशीरा ही गोळी ७२ तासापर्यंत घेता येते. मात्र जेवढ्या लवकर घ्याल तितकी
परिणामकारकता अधिक.
शिवाय गोळी
घेतल्यानंतर पुढे नेहमीची गर्भ निरोधक साधने वापरायलाच हवीत. गर्भसंभव थांबवण्याची
गोळीची क्षमता ही गोळी घेण्याआधीच्या ७२ तासातल्या संबधाला लागू पडते. गोळी
घेतल्यानंतर जर संबंध व्हायचा झाला तर त्यापासून होणारी गर्भधारणा ही गोळी रोखू
शकत नाही. एकाच महिन्यात वारंवार ही गोळी वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे पाळी पुढे जाते आणि गर्भसंभव होण्याचीही शक्यता रहाते.
गोळीचेही प्रकार
उपलब्ध आहेत. १ गोळी घेण्यापासून ५० गोळ्या घेण्यापर्यंतचे डोस आहेत. नेहमीच्या
गर्भ निरोधक गोळ्याही या कमी वापरता येतात. पण माहिती सुटसुटीत असावी म्हणून केवळ
एकाच पद्धतीची गोळी सांगितली आहे. सर्व माहिती LEVONORGESTREL 1.5mg या गोळीसाठी
दिलेली आहे.
गोळी ऐवजी संबधानंतरच्या
५ दिवसांत तांबी बसवली तरीही गर्भ धारणा टाळता येते.
त्यातूनही जर दिवस
गेलेच तर गर्भपाताच्याही गोळ्या मिळतात, त्या डॉक्टरी सल्ल्याने घ्याव्यात.
वरील सर्व प्रकार आपात्कालीन
स्थितीत वापरायचे आहेत. एरवी नाही. या पद्धती ‘फेल जाण्याची’ शक्यता बरीच आहे
(२०%). नियमित वापरायच्या पद्धतीत (गोळ्या/तांबी/इंजेक्शन) मध्ये हे प्रमाण १% पेक्षा
कमी आहे. तेव्हा या आपत्कालीन गोळ्या नियमित वापरणे चुकीचे आहे.
एस.टी.च्या मागच्या
खिडकीतून एरवीही ये जा करता येते. पण आपण दारानेच ये जा करतो. मागची खिडकी
‘अपघाताचे वेळीच’ वापरायची असते. तसंच काहीसं हे आहे!
-डॉ.शंतनू अभ्यंकर
No comments:
Post a Comment