गर्भपातावर बोलू काही
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
शंभरपैकी ऐंशी गर्भपात पहिल्या तीन महिन्यात होतात. तेंव्हा अशा गर्भपातांवर
बोलू काही.
मूल हवंहवंस असताना गर्भपात झाला की सगळे अगदी नाराज होतात. नाराज होण्यासारखंच
आहे हे. मूल म्हणजे एक नवं स्वप्न. उद्याची आशा. वंश सातत्याची शक्यता. म्हातारपणाची
काठी. पालकत्वाचा अद्वितीय आनंद. निव्वळ कल्पनेनीच आनंदाची कारंजी उडायला लागतात.
शिवाय मूल म्हणजे मातृ-पितृऋणातून, कुटुंबऋणातून, समाजऋणातून मुक्ती. एक कौटुंबिक
उत्सव. भरपूर कौतुक, भारंभार प्रेम, अपरंपार वात्सल्य. या उलट गर्भपात म्हणजे या
सगळ्यावर पाणी, आनंदावर विरजण, चिडचिड, हताशा.
का होतो गर्भपात? सहसा कारण कळत नाही. मग कोणी तरी काही तरी सांगतं, मग मनात
तेच घेऊन बसायचं.
‘गाडीवरून प्रवास केला म्हणून झालं...’
‘एसटीतून माहेरी गेली म्हणून झालं...’
‘बादली उचलल्यामुळे झालं...’
‘लहान मुलाची (आणि सहसा हे नेमकं नणंदेचंच असतं) लाथ लागली...’
‘तरी मी सांगत होते पपई खाऊ नको, केळं खाऊ नको... पण नव्या मुली आता ऐकतात का
कुणाचं? त्यातून मी सासू. म्हणजे हे नातं किती अवघड...’
‘वर्षभर गोळ्या खात होती ना प्लॅनिंगच्या, त्या मुळेच. देव चांगलं देत होता
तेंव्हा नको म्हणायचं, मग आता हवं म्हणालं की मिळत नाही, बसा आता.’
‘त्या दिवशी डॉक्टरकडे जाण्यापूर्वीच मी ओळखलं होतं. आता जपा, लांब रहा, असं
सांगितलं होतं. पण ऐकणार कोण? आदल्या रात्री संबंध आला असणार. दुसऱ्या दिवशी सकाळी
झालंच ब्लीडींग सुरु.’
वरीलपैकी कशानेही गर्भपात होत नाही! प्रवास, जड काम (म्हणजे बायकांच्या भाषेत
बादली उचलणे), शरीर संबंध, गर्भनिरोधक गोळ्या कशाकशाने गर्भपात होत नाही. पपई,
केळी ही देखील उगीचच बदनाम झालेली फळं आहेत. पोटातला गर्भ आईपेक्षा कितीतरी अधिक
सुरक्षित वातावरणात वाढत असतो. बाळाची लाथ लागूनही आई ठणठणीत असेल तर गर्भही
ठणठणीत आहे असं बेलाशक समजावं. हे लक्षात न घेता, गर्भपात झाला की त्या बाईला बोल
लावले जातात. तिलाच जबाबदार धरलं जातं. वरची सारी चर्चा चालू रहाते. यात अनेक गफलती
आहेत.
बहुतेकदा (७०%) असा गर्भपात होतो तो गर्भातच काही तरी मोठा दोष असल्याने.
त्यामुळे असा गर्भपात हा निसर्गाचा फिल्टर आहे. जे हीन आहे ते आधीच पडून जातं.
चांगलं तेवढं टिकतं. इतकी सगळी मुलं धडधाकट निपजतात या मागचं इंगित हे आहे. असे
गर्भपात झाले नसते तर अनेकांना वेडीविद्री मुलं झाली असती. इतरही काही कारणं
असतात, गर्भपिशवीतले काही दोष, काही आजार, पण क्वचित.
श्रमानी गर्भपात होत नाही त्यामुळे अर्थातच तो विश्रांतीनी टळत नाही. आपण
खरंतर जंगलात रहाणारे प्राणी. बिनशेपटीची माकडंच आपण. आज आपण भाषा बोलतो, आणि एवढी
प्रगती केली आहे म्हणून मी हे लिहीतो आहे आणि तुम्ही हे वाचता आहात. नाहीतर या
वेळी तुम्ही आणि मी, दोघेही आता पुढच्या भुकेला रानडुक्कर वगैरे काही मिळतंय का,
हे शोधत रानोमाळ हिंडत असतो. ह्या कष्टाच्यामानानी बादली उचलणे वगैरे घरगुती कामं
म्हणजे कीस झाड की पत्ती. आपल्या जंगली पूर्वजांपेक्षा आज आपण काहीच कष्ट करत
नाही. त्यामुळे विश्रांतीनी काही फरक पडत नाही. पायरीसुद्धा न उतरू देणं, पाणीही
जागेवर देणं, असली थेरं करून काहीही साधत नाही.
राहिले दिवस की झालं‘च’ पाहिजे मूल, ही सर्वांचीच सदिच्छा असते. तसं होणारच
असं आपण मनोमन गृहीत धरून चालतो. हे गृहीतकच चुकीचं आहे. अवैज्ञानिक आहे. माणूस हा
निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचे कायदे-कानून माणसालाही लागू आहेत. नवी पिढी निर्माण
करण्याची निसर्गाची पद्धत ही खूपच उधळ माधळ करणारी आणि इम्परफेक्ट आहे. माणसानी
निर्माण केलेल्या कारखान्यात एका पाठोपाठ एक लाखो वस्तू बिनचूक तयार होऊ शकतात. इनफॅक्ट
या आकडेवारीवर त्या त्या कारखान्याची कार्यक्षमता जोखतात. पण मानव निर्माण करणारा
आपल्या शरीरातला कारखाना, या निकषावर कमअस्सल ठरतो. हा निसर्गनिर्मित कारखाना आहेच
मुळी असा.
आंब्याचं झाडच बघाना. त्याचा मोहोर
आणि आंबे म्हणजे नवं झाड निर्माण करणाऱा कारखानाच. एकेका आंब्याला किती तरी मोहोर
येतो. डहाळी डहाळीवर इवली इवली फुलं झुलत असतात. या प्रत्येक फुलातून अंतिमतः
आंब्याचं झाड तयार होतं का? (आणि जर झालं
तर आपल्याला पृथ्वीवर जागा उरेल का?) कितीतरी मोहोर गळून पडतो. काही वाऱ्यानी,
काही पावसानी, कितीतरी आपण खुडतो देवाला म्हणून, मग कैऱ्या लगडल्या की त्यातल्याही
कित्येक आपोआप गळून पडणार, गारपीट होणार, काही आपण खाणार, अगदी लोणचं सुद्धा
घालणार. पाडाला आलीच एखादी तर ती नक्कीच पाडणार, खाणार. कित्येक पिकलेले आंबे अशा
जागी पडणार की तिथे त्या कोयी रुजुच शकणार नाहीत. ‘घुम्मटगोल आंब्यावरती पानोपानी
मोहोर गरोदर’ जर येईल तर त्यातल्या एखाद्या कोयीतून एखादं झाड येणार.
त्यालाही, खाणारे तोडणारे असे शत्रू आहेत. उन्हाळे पावसाळे असे शत्रू आहेत. थोडक्यात
एका आंब्याला बाळ व्हायला बरेच सायास पडतात. माणसाची परिस्थिती इतकी वाईट नाही.
तरीही दिवस राहिले की बाळ होण्याची शक्यता १००% कधीच नसते. तुम्हाला आश्चर्य वाटेल
पण दिवस आहेत हे कळायच्या आतच मुळी ५०% गर्भ नष्ट होतात! आपल्याला त्याचा पत्तासुद्धा
लागत नाही. दिवस आहेत हे कळल्यावर सुमारे १५% गर्भ पडून जातात. उरलेल्या ८५% तही
काही गर्भ पतन पावतातच. पण तीन महिन्यांनंतर हे कमी प्रमाणात घडतं. पहिले तीन
महिने, दिवस आहेत हे घरात सुद्धा बोलायचं नाही, असा प्रघात होता आपल्याकडे. तो कदाचित
या व्यावहारिक शहाणपणातूनच आला होता. पण आता फेसबुक आणि व्हॉत्सअॅपच्या जमान्यात युरीन
टेस्ट पॉझीटिव्ह आली रे आली की जणू जन्मोत्सवच सुरू होतो. हे गैर आहे. सबुरी
महत्वाची आहे. पुढे जर गर्भ नीट वाढलाच नाही, नीट रुजलाच नाही, तर मग मोठाच भ्रमनिरास
होतो. जास्तच वाईट वाटतं. हे टाळायला हवं.
गर्भ ‘पडतो’ असा शब्दप्रयोग असल्यामुळे अनेकांना असं वाटतं, की गर्भ म्हणजे
टेबलाच्या कडेला ठेवलेला बॉल आहे आणि जर्रा धक्का लागला की तो पडतो. असं काही नस्से.
अशा पद्धतीनी गर्भपात होत नाही. जेंव्हा शरीराला तो गर्भ नकोसा असतो, त्या वेळी तो
शरीरातून जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक बाहेर ढकलला जातो. थोड्या अप्रिय शब्दात
सांगायचं तर, लाथ मारून बाहेर काढण्यात येतो. गर्भपात ही गुरुत्वाकर्षणामुळे घडणारी
घटना नाही. इट इज अॅन अॅक्टीव्ह प्रोसेस. बाईला उलटी टांगली तरी जिचा गर्भ पडायचाय
तिचा पडेलच. त्यामुळे काही विशिष्ठ आजार आणि त्यांचे उपचार वगळता, कम्प्लीट बेडरेस्ट,
कसली कसली औषधं, इंजेक्शनं यात काही तरी केल्याचं समाधान हा भाग जास्त आहे.
वैज्ञानिक पुरावा शून्य. एखाद्या डॉक्टरनी असे लटिके उपचार सुचवले नाहीत तर पेशंट
सरळ उठून दुसरा डॉक्टर गाठतात आणि त्याच्या ज्ञान-कौशल्याची स्तोत्रे गातात. बहुतेकदा
पेशंटना, ‘गर्भपात अटळ आहे, आपण विशेष काही करू शकत नाही’, हे कटू सत्य पचत नाही.
काही तरी प्रयत्न चालू असल्याचं कृतक समाधान त्यांना हवं असतं. हे समाधान हिरावून
घेणारा प्रामाणिक डॉक्टर तर मुळीच नको असतो. अशामुळे मग कृतक उपचारांचं फावतं.
त्यामुळेच झालाच एखाद्यावेळी गर्भपात, तर त्याकडे मोठया फिलोसॉफिकली बघायला
हवं. कदाचित सदोष संततीपासून मुक्ती मिळाल्याबद्दल स्वतःच अभिनंदनही करायला हवं.
‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कभी ज़मीं तो कभी आसमाँ नही मिलता...’ असं
एखादं गाणं गुणगुणायला हवं.
वारंवार गर्भपात ही मात्र अलग चीज आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.
प्रथम प्रसिद्धी दिव्य मराठी मधुरिमा पुरवणी ५/९/१७
या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
<shantanuabhyankar.blogspot.in>
No comments:
Post a Comment