ज्युलिअस आणि सीझर
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
ज्युलिअसही सीझर आणि ते
जगप्रसिद्ध ऑपरेशनही सीझर; मग त्यांचा एकमेकांची संबंध असावा काय? दंतकथा फक्त
उपलब्ध आहेत. या ज्युलिअस सीझरच्या कोण्या बापजाद्याचा जन्म ‘सीझर’ने झाला होता. म्हणून
याला त्या आज्याचं नाव ठेवलं म्हणे. आणि म्हणूनच
ऑपरेशनचे नावही सीझर. काही असंही सांगतात की याचा स्वतःचाच
जन्म मुळी यौनमार्गे न होता, उदरमार्गे झाला होता. पण कोणीच यावर विश्वास
ठेवत नाही. कारण असं की याची आई पुढे बरीच वर्ष हयात असल्याचा पुरावा आहे!! ज्या
बाईचे पोट फाडून बाळ जन्माला आणलंय, अशी जननी तात्काळ जन्मभूमीतच चिरनिद्रा घेत असे. असा तो काळ होता.
पोट फाडून बाळ काढलं तर आई
मरायलाच हवी! ...आणि ज्युलिअस सीझरची आई तर पुढे बराच काळ
होती, म्हणजे ज्युलिअसचा जन्म सीझरद्वारे झालेला नाही!!
इतक्या टोकाच्या परिस्थितीत
हे ऑपरेशन केलं जायचं. अर्थात निर्जंतुकीकरण, भूल, प्रतिजैविके, रक्त वगैरे काही
काही नसताना दुसरं काय होणार? सगळं काही राम भरोसे. किंवा जो कोणी तारणहार देव किंवा संत असेल त्याच्या
भरोसे. आपल्याकडे जशा धनाची, धान्याची, शक्तीची, युक्तीची अशा
वेगवेगळ्या देवता आहेत तसे ख्रिश्चन धर्मात विविध संत आहेत. फक्त आकाशातल्या एकट्यादुकट्या बापावर त्यांचेही भागत नाहीच. संत सीझेरीअस
नामे निव्वळ सिझरवेळी आळवायचा खास संत आहे. याला नमोनमः केल्याने सीझर
सुखरूप पार पडते म्हणतात.
उदरी बाळ तसेच असताना
दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता जुन्यापुराण्या काळात. त्यातून पोट
फाडून बाळ काढायला सुरवात झाली. पुढे आई मरायला टेकली आहे किंवा मेलीच आहे आणि बाळ मात्र तग धरून आहे अशा वेळी हा प्रकार
केला जायचा. एक अखेरचा प्रयत्न फक्त. हे
नेमकं कसं करावं याचं तंत्रही सर्वज्ञात नव्हते. कसे असेल? मेडिकल कॉलेज वगैरे
काही नव्हते त्यावेळी. काही धाडसी,
उत्साही महाभाग काळजावर दगड ठेउनच हे काम उरकायचे. पोट फाडा, बाळ काढा आणि पोट
शिवा अशा तीनच पायऱ्यांचे हे ऑपरेशन. पोट उघडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत; थराखाली
थर उघडत जाणे, कमीतकमी रक्तवाहिन्या आडव्या येतील अशा मार्गाने आत शिरणे; वगैरे
प्रकार नंतर आले. पोट शिवायचे तेही दाभणाने! भूलबील नव्हतीच. ती बाई इतकी अर्धमेली
झालेली असायची की मुळात तीच अर्धवट बेशुद्धावस्थेत असायची. मग वेगळी भूल कशाला?
टाके घालून फक्त पोटाची त्वचा शिवली जायची. याहून अधिक काही शिवायला वेळही नसायचा
आणि काळ तर शेजारीच आ वासून उभा असायचा. टाकेही केवळ बाहेर घातले जात. कारण आत
टाके घातले तर काढायचे कसे हा प्रश्न होता. आज आम्ही सीझर करताना आठ थर उघडतो आणि
तितकेच पुन्हा शिवून टाकतो! आमच्या हाताशी पोटातल्या पोटात विरघळणारे धागेदोरे
आहेत. आमचे पूर्वसुरी सुताचे किंवा तागाचे धागे वापरत. सगळे टाके कुजत. पण गर्भपिशवी टाके न घालता तशीच सोडून दिली तर आतल्या आत प्रचंड रक्तस्राव व्हायचा. हे टाळण्यासाठी एद्युअर्दो
पोरोनी तर थेट पिशवीच छाटून टाकायचा प्रयोगही करून
पहिला. पण व्यर्थ. यातून ती निभावून गेलीच तर जखमांत पू
व्हायचा. आधीच अर्धमेली झालेली ती यात
बहुतेकदा पूर्ण मरायची. पुढे केहरर आणि सँगर प्रभृतींनी पिशवीला टाके घालायचे तंत्र विकसित केले आणि जरा जास्त बायका जगायला
लागल्या.
ही शस्त्रक्रिया काही फक्त
युरोपमधले हुशार लोकंच करत होते असं नाही. पण युरोपमधल्या हुशार लोकांचा तसा
गैरसमज मात्र होता. अगदी आफ्रिकेतील आदिम जमातींनीसुद्धा असे प्रयत्न केल्याचे पुरावे
आहेत. अर्थात अपयशाची रड सगळीकडे सारखीच. सीझरविषयक भारतीय दंतकथाही आहे. ‘प्लॅस्टिक सर्जरी’चा शोध आपल्याला लागल्याचा पुरावा आहेच; त्यापुढे
सीझरची काय कथा? चंद्रगुप्ताचा मुलगा, बिंदुसाराचा
जन्म म्हणे उदरभेद पद्धतीने झाला होता आणि हे कर्म उरकलं होतं, भेदनीतीचा जनक आर्य
चाणाक्याने; असं म्हणतात. बिंदुसाराच्या आईने, दुर्धरेने
एकदा पतीच्या पानातील अन्न खाल्ले. चंद्रगुप्ताला कोणतीही विषबाधा होऊ नये म्हणून
चाणक्य म्हणे त्याच्या अन्नात रोज थोडं थोडं विष कालवायचा. हळू हळू चंद्रगुप्त
जास्त जास्त विष विनासायास पचवू लागला. दुर्धरेला याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे
तिला बिचारीला ते विष बाधलं आणि पार मरणपंथाला लागली ती. नेमकं चाणाक्याने हे पाहिलं आणि काय होतंय ते त्या चाणाक्षाच्या लगेचच लक्षात आलं.
तात्काळ त्याने पोट फाडून बिंदुसाराला आईवेगळे केले. दुर्धरा गेली पण बिंदुसार
वाचला! अशीच काहीशी कथा इराणचा पुराणपुरुष रुस्तम याच्याही बद्दल आहे. आयर्लंडच्या
उलस्टर पुराणात फारबीद फरबेंड बद्दलही आहे. ज्यूंच्या ‘ताल्मूद’ या प्राचीन
ग्रंथातही आहे. इतकंच कशाला, ‘एलिअन व्हर्सेस प्रीडेटर’ या आधुनिक पुराणात तर ‘एलिअन’ बीज
आईच्या तोंडातून पोटात जातं, काही क्षणात वाढतं आणि आणि पोट फाडून जन्म घेतं!! बघावा
तो महापुरुष आपला आईचे पोट फाडूनच अवनीवर अवतार घेता झालेला दिसतो. पूर्वीपेक्षा
आता सीझरचं प्रमाण कितीतरी वाढलं आहे पण महापुरुषांचे प्रमाण काही तितकेसे वाढलेले
दिसत नाही.
स्विझरलँण्डमधील जेकब
न्युफरची बायको यातून बचावल्याची नोंद आहे. जगलेली आणि आपल्याला ज्ञात असलेली ही
पहिली. हिच्या पतीनीच ऐनवेळी सीझर करून हिला सोडवली. तो होता डुक्कर-कसाई.
त्यामुळे त्याला शरीररचनेचं थोडंबहुत ज्ञान होतं, म्हणून त्याच्या हातून जरा
सबुरीनी, निटसपणे आणि नेकीनी ते ऑपरेशन झालं असावं आणि म्हणून सौ. न्युफर
वाचली; असा आपला एक तर्क. नाहीतर जेकबवर
‘विधुरव्या’ची कुऱ्हाड कोसळलीच असती. वराह विच्छेदनात तरबेज असल्यामुळे त्याला बाईचे अंतरंग कळले
असं मी सुचवलंय खरं, पण कुणी राग मानू नये. सर्व सस्तन प्राण्यांची शरीररचना
साधारण एकसारखीच असते, एवढंच सुचवायचंय मला. नाहीतर ती बाई वाचलीच कशी हा प्रश्न
निरुत्तर करणारा! पण ही बाई नुसती वाचलीच नाही तर पुढे पाच पोरांना जन्म दिला
तिनी. धन्य ती बाई आणि धन्य तिची ती कूस!!
पुढे शरीररचनेच्या
अभ्यासासाठी शवविच्छेदन युरोपमान्य झालं
आणि स्वतःच्या शरीराची ओळख झाली माणसाला. भुलीच्या शोधानी तर क्रांतीच केली.
त्यामुळे उदरभेद, गर्भाशय छेद, प्रसूती आणि सर्व थरांना टाके घालत घालत ऑपरेशनची सांगता
हे सारं शक्य झालं. हातपाय झाडत किंचाळणाऱ्या बाईचे सीझर करणे किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी.
पण कल्पना कशाला, त्या काळच्या
सर्जरीची दारूण परिस्थिती अनेकांनी लिहून
ठेवली आहे. पायाला गॅस-गँग्रीन झालं म्हणून एका माणसाचा पाय तोडायचा होता. नाहीतर
तो शंभर टक्के मरणार. चौकात हीsss गर्दी जमली. चिक्क्क्कार दारू पाजून त्या माणसाला ‘आउट’ करण्यात आलं. आपली
कुऱ्हाड परजत मग सर्जन आले. सिंहाच्या काळजाच्या
चार माणसांनी त्या माणसाला, आपल्या पोलादी पंजांनी जखडून ठेवलं आणि
पहाणाऱ्या गर्दीच्या डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच एका घावात त्याच्या पायाचे
दोन तुकडे केले गेले. पण त्या माणसाला धोधो रक्तस्राव झाला आणि तो तिथल्यातिथे
गेला! हे पाहून गर्दीतला एकजण भोवळ येऊन पडला आणि तत्काळ गतप्राण झाला आणि ह्या
कुऱ्हाडीचे पाते कुणा असिस्टंटास चाटून गेल्याने पुढे गॅस-गँग्रीन होऊन तोही मेला!!
एकाच ऑपरेशनचा ३००% मृत्यूदर झाला की हा!!! थोडक्यात रम्य भूतकाळाच्या नावाने, ‘गेले ते दिन
गेले’ असे उसासे टाकणाऱ्यांनी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. असो.
अगदी १८७० पर्यंत ही
शस्त्रक्रिया अंदाजानी केली जायची, तंत्रशुद्ध अशी तत्वे अजून ठरायची होती.
बेंबीपासून खाली पोट उभे उघडून, गर्भपिशवीही उभीच छेदली जायची. आता दोन्ही छेद
आडवे असतात. हे जरा करायला किचकट आहे पण उभे चिरण्यापेक्षा य पटींनी सुरक्षित आहे.
जोसेफ लिस्टरनी ऑपरेशन निर्जंतुकपणे करण्याचा तंत्र आणि मंत्र दिला (१८८०). सीझरनंतर, एकूणच ऑपरेशननंतर, जगण्यावाचण्याची शक्यता एकदम वाढली. पुढे
ऑक्सिटोसीन उपलब्ध झाले (१९५१) आणि रक्तस्रावाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. ऑक्सिटोसीन
हे एक संप्रेरक (होर्मोन) आहे. याच्या उपस्थितीत गर्भपिशवी आकुंचन पावते. पिशवी
घट्ट आवळली जाणे रक्तस्राव थांबण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. नुसते टाके घालून
रक्तस्राव थांबत नाही. हे इंजेक्शन आता सीझरवेळी आणि नॉर्मल डिलिव्हरीवेळी सुद्धा
सर्रास वापरले जाते. हे इंजेक्शन नसते तर तिन्ही जगाचे कित्येक स्वामी आईविना
भिकारीच निपजले असते. रक्तस्राव कमी करण्यात भुलीच्या तंत्राचा मोठा वाटा आहे. सुरवातीला भूलीसाठी क्लोरोफोर्म वापरत. ही काही
आदर्श भूलौषधी नाही. पण तेंव्हा तेवढीच उपलब्ध होती. अगदी महाराणी व्हिक्टोरियानेसुद्धा,
राजपुत्र लिओपोल्डच्या जन्मावेळी (१८५३), वेदनाशामक म्हणून मोठ्या धीरोदात्तपणे क्लोरोफोर्म हुंगून आपल्या प्रजाजनांसमोर आदर्श
घालून दिला. तिच्या ह्या कृत्यानंतर इंग्लंडात भुलीचा वापर झटक्यात वाढला. पण क्लोरोफोर्मने गर्भपिशवी नीट आकुंचन पावत
नाही. उलट प्रसरण पावते. आता स्पायनल किंवा एपीड्युरल पद्धतीनी भूल दिली जाते. यात
पेशंट जागी असते पण कमरेखालचा भाग बधीर होतो. संपूर्ण भूल देण्यापेक्षा आईसाठी आणि
बाळासाठी ही पद्धत खूप खूप सुरक्षित आहे. अँन्टीबायोटिक्सच्या शोधानंतर, रक्त संक्रमण उपलब्ध झाल्यानंतर आणि काही
तांत्रिक बदल झाल्याने; आता हे ऑपरेशन इतके सुरक्षित झाले आहे की नॉर्मल डिलिव्हरी
शक्य असतानाही ठरवून सीझर करवून घेणारी कुटुंबे आहेत.
बाळ पोटात जर उपाशी, अशक्त,
आजारी, गुदमरलेले, अॅनिमिक वगैरे असेल तर हा शोध आता सोनोग्राफी आणि अन्य
तंत्रांनी खूप लवकर लागतो आणि वेळीच सीझर करून बाळावर पुढील उपचार सुरु करता
येतात. तीस एक वर्षांपूर्वी हे असलं काही नव्हतं. बाईच्या पोटावरून
हाताने चाचपून काय शोध लागेल तेवढाच. पोटात गर्भपिशवी, पिशवीत पाणी आणि पाण्यात तरंगणारे
बाळ; तेंव्हा ढेरी कुरवाळण्याने
काय आणि किती माहिती मिळत असेल, तुम्हीच कल्पना करा. म्हणूनच
सुरवात जरी आईचा जीव
वाचवण्यासाठी म्हणून झाली असली तरी हल्ली हे ऑपरेशन बाळाच्या काळजीपोटी अधिक वेळा केलं जातं. वेळेत निदान आणि सुरक्षित जन्म झाल्याने अनेक बाळांचं मोठेपणही
आरोग्यानंदात जातं. इहलोकीची यात्रा ही, प्रस्थान नीट ठेवले, की निदान सुरवात तरी छान
होते.
एकाच कृतीमागील हेतू किती
बदलतात बघा. उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता,
जुन्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. म्हणजे परलोकीचे
व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून हा आटापिटा. पण आता मात्र याच आट्यापिट्याने
इहलोकीचे आयुष्य सुकर होते आहे.
मराठी मधील काही उत्तम ब्लॉग मध्ये तुमचा पण ब्लॉग आहे डॉक्टर साहेब...लिहीत रहा....☺️
ReplyDelete