Monday, 25 May 2020

अज्ञानकोश

अशीच एक आठवण.
मी लहान असताना एकदा बाबांचे शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराडयातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, पण तिथल्या एका पुस्तकाकडे मात्र माझं लक्ष खिळून राहिलं.
ते पुस्तक होतं ‘अज्ञानकोश’ (Encyclopaedia of ignorance)! माझ्या नजरेतली उत्सुकता पाहून शास्त्रीजींनीच मला समजावून सांगितलं.
ते संपादित करत होते तो विश्वकोश, तो तर ज्ञानाचा कोश, सतत वर्धिष्णू होणारा आणि हा होता अज्ञानकोश. मानवी ज्ञानाच्या कक्षा जसजशा विस्तारत जातील तसतसा आक्रसत जाणारा हा कोश. प्रत्येक नव्या शोधाबरोबर, यातले एकेक पान गळावया लागणार. निदान त्या कोशकारांनी सुरवातीला तरी तसं म्हटलं होतं. पण असं थोडंच असतं? ज्ञानाचं क्षितिज विस्तारत जातं तसंतसं आज्ञानाचंही क्षितिज विस्तारत जातं. आपल्याला काय काय कळलेले नाही हे नव्यानी कळायला लागतं. त्यामुळे हा आज्ञानकोशही प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू होत जाणारा.
म्हणूनच की काय, त्याचं मुखपृष्ठ तर अत्यंत चतुराईनं चितारलं होतं. एक माणूस एक जिना चढतो आहे. विटांच्या एका चौकोनी बांधकामावर असलेला हा चौकोनात फिरणारा जिना. म्हणजे एक चक्कर मारली की माणूस पुन्हा तिथेच. नीट पहिलं तर असं लक्षात येतं की या जिन्याला मुळी अंतच नाही. म्हणजे पायऱ्यांची चढण कधी संपतच नाही. अखंडपणे त्याचा शोधाचा प्रवास चालूच आहे; असा दृष्टीभ्रम त्या चित्रकाराने सहेतुक साधलेला.
बऱ्याच वर्षानी हे पुस्तक मला ऑनलाइन भेटलं. मी ते ऑनलाईनच चाळलं. हे पुस्तक १९७० साली प्रसिद्ध झालंय. नवी आवृत्ती मात्र नाही. त्यासुमारास ज्ञानशिखरावर असलेल्या अनेकांनी या कोशासाठी लिखाण केलेलं. हा अज्ञानकोश आहे. तेंव्हा आपापल्या क्षेत्रात अज्ञात काय आहे यावर या लेखात भाष्य आहे. सध्या आम्हाला हे माहीत नाही पण येत्या काही काळात हे अज्ञान दूर होईल अशी आशा आहे. क्षितिजावर फटफटू लागले आहे. ज्ञानाची प्रभा लवकरच दिसो लागेल अशी आशा आहे, असं सांगणारे हे लेख आहेत.
निरनिराळ्या ज्ञानशाखांबद्दल सुमारे साठ लेख आहेत. पानांच्या रचनेबद्दल आहे, माणसाच्या उत्पत्तीबद्दल आहे; गुरुत्वाकर्षणाच्या कोड्यापासून ते माणसं व्यसनी का बनतात? अशा अनेक विषयावरील लेख आहेत.
ह्यात अल्बर्ट आइनस्टाईनचा लेख आहे. स्टीफन हॉकिंगचा आहे. अनेकजण आज्ञातावर लिहिता लिहिता अंतर्मुख झाले आहेत. निश्चित समजल्या जाणाऱ्या विज्ञानाची अणूगर्भातील अनिश्चिततेशी नुकतीच गाठ पडली होती. त्या काळातील हे पुस्तक. डी.एन.ए.च्या रचनेचा शोध लावणारा फ्रांन्सिस क्रीक इथे आहे. ‘अदृश्य रेणु कसे घडतात हे आपल्याला माहीत आहे पण दृश्य अवयव कसे घडतात हे मात्र अद्याप अज्ञात. मेंदू आणि त्याचे कार्य तर अजून कित्येक योजने दूर आहे.’ असं तो बजावतो.
अज्ञानाचा कोश ही भन्नाटच कल्पना आहे. अज्ञानाची जाण खूप महत्वाची आहे बरं. पूर्वी नव्यानेच लोकं दूर दूर बोटी हाकू लागले आणि नवनवे प्रदेश पादाक्रांत करू लागले. ह्या लोकांनी नव्या प्रदेशाचे नकाशे बनवले होते (१४५९). यात किनाऱ्याकडील ज्ञात भूभाग अगदी नीट रेखाटलेला असे आणि जो भाग अजून अज्ञात आहे त्या भागात, भुतेखेते, अप्सरा, चित्रविचित्र प्राणी अशी अगदी रेलचेल असे. पण साठ सत्तर वर्षानंतरचा (१५२५) नकाशा पहिला तर तो बराचसा मोकळा मोकळा दिसतो. जे माहीत नाही त्या जागा चक्क मोकळ्या सोडलेल्या दिसतात. आज आपल्याला ह्यात काही विशेष वाटत नाही पण स्वतःच्या कर्तृत्वाकडे पहाण्याचा एक वेगळा आयाम यात दिसतो. अमुक एक गोष्ट माहीत नाही अशी जाहीर कबुली ह्यात दिसते. असं म्हणतात की ‘अज्ञानाचा शोध’; ‘अरेच्च्या ह्या ह्या गोष्टी आपल्याला महितच नाहीत बरं का’; हा शोध मानवाला लागलेला एक अत्यंत महत्वाचा शोध आहे. अज्ञानाचा स्वीकार ह्यात दिसतो आणि अज्ञानाच्या कबुलीजबाबानंतरच ज्ञानाकडे प्रवास सुरू होतो, नाही का?

1 comment:

  1. Please share link for where to see the book "Encyclopaedia of Ignorance".

    Thank you

    ReplyDelete