Saturday, 2 May 2020

मन कामरंगी रंगले


मन कामरंगी रंगले  
डॉ. शंतनू अभ्यंकर

व्यसने आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. दारू, सिगरेट, चरस, गांजा अशी चार दोन नावंही माहीत आहेत. सिगरेट मधील  निकोटीन, दारूतील इथिल अल्कोहोल वगैरे पदार्थ मादक आहेत आणि  व्यसनकारक आहेत.  पण  व्यसनासाठी कोणतातरी मादक पदार्थच  हवा असं नाही. ‘मद’  चढणे महत्वाचं. उदाहरणार्थ  जुगारी. जुगाऱ्यांत  कोणताही मादक पदार्थ बाहेरून शरीरात जात नाही पण जुगाराचं  व्यसन लागतं. युधिष्ठीराला जुगाराचं  जबरदस्त व्यसन होतं. त्यामुळे त्याचं राज्य गेलं, ऐश्वर्य गेलं, भाऊ आणि पत्नीही गेली.
अशा सवयींमधे मद चढतो तो मेंदूतील काही पदार्थांमुळे.  असे  पदार्थ  मेंदूतच तयार होतात   आणि सारासार विवेकाचे अपहरण करतात. जुगाराचं जसं व्यसन लागतं, तसं पोर्नचंही व्यसन लागू शकतं. म्हणजे माणूस जुगारी बनतो, जगात शिंके, फुंके, थुंके (अनुक्रमे तपकिर, बिडी, तंबाकूवाले) असतात किंवा कोणी  दारुड्या बनतो, तसा पोर्नाड्याही बनू शकतो. दारुड्या बनायचा मार्ग जसा  चव, चटक, चस्का आणि व्यसन असा जातो तसंच पोर्नचंही आहे. 
कामूकता तर निसर्गानी आपल्या मेंदूत कोरलेली त्यामुळे ‘असल्या’ कलाकृती म्हणजे  एव्हरग्रीन मामला.  सर्व प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीत कामशिल्पे आहेत, कामवासनेचं दैवीकरण अथवा दानवीकरण आहे आणि काम साहित्यही आहे. पोर्न म्हणजे भावनाहीन, शारीर,  रुक्ष, कोरडा, रोकडा, संभोग आणि त्यातील  कसरती आणि  विकृती फक्त.

नेटवर इतकं सगळं चकटफू मिळत असताना पैसे भरून पोर्न बघतं  तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल, पण  चटकफूने हौस भागत नाही असे महाभाग बरेच असतात. एकदा पोर्नचं वेड लागलं  की हे पेड साइट्सवर जातातच जातात. हे आणि ‘ह्या’ सुद्धा. पोर्नाडया होणं  ही काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही. बायका जशा क्वचित पण दारूच्या अथवा इतर व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात तशा त्या पोर्नच्याही आहारी जाऊ शकतात.
पोरांना तर ह्या उघड्यानागड्या  विश्वाची ओळख आता लहान वयातच होऊ लागली आहे. घरच्यांशी  संबंध तणावपूर्ण असतील, कुढत रहायचा स्वभाव असेल, तर पोर्नशी गट्टी अगदी आश्वासक वाटू शकते. मित्रांच्या आग्रहाने  कुतूहल म्हणून पाहिलेली क्लिप पुढे व्यसनांकडे नेते. हे कुतूहल, ही जिज्ञासा, हे तर नैसर्गिक. पण ह्याला योग्य प्रतिसाद शाळा कॉलेज मधील शिक्षणात नसतोच. त्यामुळे उपलब्ध ज्ञानसागराचे, म्हणजे पोर्नसागराचे, पाणी पिऊन ज्ञानाची तहान भागवली जाते. त्यावरच आजच्या मुलामुलींच्या लैंगिकतेचे पोषण होत असते. शेवटी सागराचे पाणी खारटच असते. ते काही पिण्यायोग्य नाहीच.   
पोरांसारखेच थोरही इथे आहेत. हे  पोर्न-रतिरत होताच, ह्यांच्या  पोक्त ढेरीची जागा सिक्स पॅक अॅबस् घेतात आणि ह्यांची तरारलेली  कामेच्छा मुसमुसलेल्या मदनिकांच्या तांड्याचीही कामना भागवू शकते; निदान कल्पनेत तरी.   
पोर्नच्या ठिणगी शिवाय कुणात ज्वाला  उठत नसते, कोणाला समलैंगिक प्रणय प्रिय असतो पण त्याची प्रचिती घेता  येत नसते, कोणाची मुखमैथुनाची भूक आ वासून उभी असते, शारीरिक/मानसिक व्याधीमुळे कुणी समागमालाच पारखे  असते; मग असे सगळे पोर्न रंगी रंगतात. बरेचसे काम आटोपलं की यातून दूर होतात. काही त्याच्या पूर्ण कह्यात जातात, भजनी लागतात.    
कॉम्प्युटरमुळे  ‘मूषकस्पर्शेमात्र’ शक्य होणारे  पोर्न, मोबाईलमुळे  आता ‘अंगुलीस्पर्शेमात्र’    दृश्यमान होते आहे.  पिवळ्या कव्हरातली मासिकं आणि छापील  चित्रांपेक्षा चलतचित्र कितीतरी मादक, कामूक, उत्तान, अश्लील, भडक आणि  प्रक्षोभक. पोर्न व्हिडिओ बघताना तुम्ही थेट दाराच्या भोकालाच  डोळा लावलेला असतो. दुसऱ्याचं  सुख  पाहून तुम्ही सुखावत असता. (केवढी ही आध्यात्मिक पहुंच)  शिवाय चालू दृश्य बदलण्याची शक्ती तुमच्याकडे असते. रोड बायका आवडेनाश्या झाल्या की जाड बायका बघायच्या, त्या आवडेनाशा झाल्या की समूहमीलन.  मनुष्यप्राण्यांचा कंटाळा आला तर  मनुष्य आणि प्राण्यांच्या क्लिप आहेतच. कल्पनातीत दृश्यांचा सततचा  मारा चालू असल्याने कल्पनेलाही काही काम रहात नाही. भावनांचा कडेलोट तर  होऊ द्यायचा नाही पण भावनांच्या टकमक टोकावरून सतत विहरत रहायचं (एड्जिंग) अशी कसरत काही मंडळी करत रहातात. तासंतास. साईट मागून साईट पहात  जायचं आणि बऱ्याच वेळ हा खेळ झाल्यावर एकदाचं  मोकळं व्हायचं. ‘तृप्तीशीलते’चा अगदी अंत पहायचा, असा हा खेळ.
इतर अंमली पदार्थांचे काहीना काही दुष्परिणाम असतात, अॅसिडिटी होते, उलट्या होतात,  त्यामुळे का होईना पण व्यसनी माणसे इच्छा होऊनही  दिवसरात्र व्यसन करत नाहीत. नाईलाजाने का  होईना, जरा दमानी घेतात.  पोर्नाड्यांचं तसं नाही. दिवसभर बघत बसलं तरी चलता है. 
व्यसन हा सारा मेंदूतील आनंदपर्यवसायी  रसायनांचा प्रताप आहे. डोपामीन यातले लीडर. भरपेट सुग्रास भोजन असो, झक्कास दर्दभरा व्यायाम असो  किंवा असीम सुखाचा संभोग असो या साऱ्यानंतर जी, ‘सुखासवे होऊनी अनावर’ अवस्था प्राप्त होते, ती  डोपामीनमुळे. डोपामीन आपल्याला नाविन्यात सुख शोधायला प्रेरित करतं. माणसाचे धाडस, शोधकवृत्ती, नाविन्याची ओढ ही डोपामिनची देन.  यामुळे पोर्न साईटसची  अनेक पाने एकाच वेळी ओपन केली जातात. संपूर्ण क्लिप क्वचितच पहिली जाते. थोड्याच वेळात कंटाळा आला की नवा  गडी नवा राज. नवीन काही दिसल्याशिवाय, पोर्नची किक बसतच नाही. आपल्या बापजादयांनी अनेक जन्मात केले नसतील इतके जोडीदार एखाददोन  तासात  नेटवर भेटतात.
ही तर अनैसर्गिक उत्तेजना. पोर्नमुळे अनैसर्गिक स्तरावर डोपामीन जाते आणि ती पातळी  अनैसर्गिक काळापर्यंत टिकून रहाते. ह्या साऱ्या हाय व्हॉल्टेज खेळात नॉरएपीनेफ्रीन, कोर्टीसॉल वगैरे रस स्रवतात  आणि डोपामीनकृत सारा  अनुभव शतगुणीत  करतात. पोर्नने जितकं  डोपामीन वाढते तितके ते इतर कशानीच वाढत नाही त्यामुळे इंटरनेट गेम्स किंवा इतर अशा नेटवरच्या व्यसनांपेक्षा पोर्नची चटक सहज लागते.
 हे डोपामीन  मेंदूच्या आनंदडोही आनंदतरंग निर्माण करतं आणि मग हा अनुभव अधिकाधिक हवाहवासा वाटायला लागतो. जेवणखाण, व्यायाम, सेक्स हे हवेहवेसे वाटले तर  बरेच आहे की. कोणत्याही सजीवाच्या अस्तित्वाशी  निगडीत आहे हे. यावर अनेक प्रयोग झाले आहेत. डोपामीनची ही  आगेबढो सांगणारी शाबासकी जर काढून घेतली,  तर अन्नपाण्यावरची वासना उडते, मादी पुढ्यात आली तरी तिकडे ढुकूनही पहिलं जात नाही. निदान उंदीर तरी असं करतात!!
पण माणूस काही फार लांब नाही. माणसातही, डोपामिनचा हा झरा आहे मूळचाची खरा! उत्क्रांतीच्या पहिल्या टप्यातील  याचा  उद्गम. आपल्या बहुतेक आशाआकांक्षांचे; भय, क्रोध, सत्ताकांक्षा,   आनंदाभिलाषा,  कामासक्तीचे   हे उगमस्थान आणि म्हणूनच सुखलालसेशी थेट नातं असणाऱ्या व्यसनांचेही हेच उगम स्थान. 
पण ह्या आनंदाची प्रतिक्रिया दोन स्वरूपाची असते.  एक; आनंदानुभूती, आवड (Like) निर्माण होणे आणि दोन; गरज (Want) निर्माण  होणे. ह्या भिन्न आणि प्रसंगी  परस्परविरोधी प्रतिक्रिया.
आवड केंद्र अन्न, व्यायाम किंवा सेक्सने जसं उद्दीपीत होतं, तसंच  सिगरेटचा झुरका, मादक पदार्थ आणि पोर्ननेही उद्दीपित होतं.  व्यसनाचा पहिलं कश  सुखाचा भासतो तो यामुळेच. थोडक्यात आवड केंद्र जसं सकारात्मक  संवेदनांनी उद्दिपित होतं तसं ते वाइटानेही  उद्दिपित होतं. अर्थात चांगले आणि वाईट ह्या आपल्या संकल्पना आहेत. आदिमानवाच्या  दृष्टीने  असलं काही नव्हतं.

सुखानुभूतीनंतर येते ते समाधान.  ते लाभते ओपिऑइड गटातील रसायनांमुळे. तृष्णा भागल्यानंतरची तृप्ती, कामतृप्ती, ही सारी ओपिऑइडसची कमाल. तृप्ती नसेल तर  सदैव असमाधान राहील, सदैव अतृप्ती राहील आणि सदैव उपभोगाची लालसा आपला जीवनव्यवहार व्यापून बसेल. म्हणजेच कामसौख्याची, अन्नाची, आनंदाची इच्छा जशी हवी तशी इच्छापूर्तीची भावनाही हवी. नाही तर निव्वळ इच्छेपोटी वहावत  जाऊ आपण. तृप्तीमुळे समाधान लाभते आणि सुख शोधायची गरज, धडपड,  आटोक्यात रहाते.
पण ओपिऑइडस आणि डोपामीनमध्ये डोपामीनचे पारडे जड असते. भरपेट जेवून, तृप्तीची ढेकर देऊनही वेटरने ‘चॉकलेट आइसक्रीम आणू का?’ विचारताच होकार जातो तो त्यामुळेच. तृप्तीच्या भावनेवर लालसेने मात केलेली असते. अन्नाची ही कथा तर कामभावनेनी तर काय होत असेल? अन्न महत्वाचे खरेच पण पुनरुत्पादन हा तर  जीवनाचा अंतिम हेतु. त्यामुळे मीठभाकरी नंतर उडतात ते डोपामीनचे सुखाचे  तुषार आणि पोर्ननी येतो तो  डोपामिनचा  महापूर. यात ओपिऑइड्सची तृप्तीची भावनाच  वाहून जाते.
मेंदूतील सीआरईबी मुळे देखील (Cyclic Adenosine Monophosphate Response Element Binding Protein)  सुखाची भावना  ओसरते, ‘समाधान’ आणि ‘तृप्ती’ जाणवते. पण अतिसेवनाने, मग ते तंबाखूचे असो वा पोर्नचे, सीआरईबी कितीही वाढले तरी तृप्ती काही मिळत नाही. सीआरईबीचा ब्रेक फेल होतो.  आता  अधिकाधिक ‘घेतल्या’शिवाय नशा चढतच नाही. नित्याचे आयुष्य आता रसहीन वाटू लागते. गप्पा, सहली, खेळ, छंद अशी साऱ्याचीच आस ओसरते.   व्यसनी माणसं सहसा कंटाळलेली, जगापासून फटकून वागणारी आणि नैराश्यग्रस्त असतात ते यामुळे.  
पूर्वी अशी समजूत होती की लहानपणीच काय तो  मेंदूचा विकास होतो. पुढे आजार किंवा मार लागला तरच त्यात काही बदल होतो. पण आता मेंदूच्या कार्याबद्दल आपल्या डोक्यात बराच प्रकाश पडला आहे.  मेंदूचे कार्य, हे नवनव्या सर्किटच्या मदतीने चालतं. नवी सर्किटस्  निर्माण होतात आणि जुनी नष्टही होतात. अनेकदा एकाच पायवाटेनी गेलं की ती  रुंद होते, आवकजावक सहज होते. पायवाटेची वाट बनते, वाटेचा रस्ता बनतो, रस्त्याचा हमरस्ता. अशीच मेंदूतही अधिक वापरली जाणारी सर्किट अधिक भक्कम होतात. त्याच्या बरोबरीने वापरली जाणारी सर्किट सुद्धा पोसली जातात. न वापरलेली लेचीपेची होतात.  
कोणत्याही कारणानी  मनाची तल्लीन अवस्था झाली की हे सर्किटचं जोडकाम अधिक जोमाने होते. हे घडवणारे रसायन डेल्टा फॉस बी. छंद, गप्पा, वाचन, स्पर्धात्मक खेळ अशा  कितीतरी गोष्टीत आपण तल्लीन होऊन जातो.  कोणतेही नवे कौशल्य शिकायचे तरी डेल्टा फॉस बी हवे आणि पण एखादी सवय लागायला, चटक लागायला, चळ लागायला, व्यसन लागायलाही डेल्टा फॉस बी हवे. म्हणजे व्यासंग आणि व्यसन यातील सीमारेषा किती पुसट आहे पहा.
डेल्टा फॉस बी; कृती आणि सुखस्मृति यांची यांची सर्किट जोडणारे  हे रसायन. मग मेंदू पुन्हा पुन्हा त्याच अनुभूतीची ‘मागणी’ करू लागतो.  कोणत्याही व्यसनाची ‘तल्लफ’ येते ती अशी. ह्या सर्किटस्  मध्ये निव्वळ नशेच्या आठवणी घर करून असतात असं नाही. नशेशी निगडीत अशा इतरही गोष्टी घट्ट रुतून बसलेल्या असतात. पोर्न पहाणे हा अनुभव आता तत्संबंधी दृश्य, ध्वनि, वास, संवेदना, भावना ह्यांच्यात  गुंफला जातो. हस्तमैथुन, स्खलन  आणि कामतृप्ती आता पोर्न-दर्शनाशी एकरूप होते. आता दुसऱ्या काही कामानिमित्त तुम्ही लॅपटॉप उघडलात तरी सय पोर्नचीच येते. तो कॉम्प्युटरच्या  बटणाचा आवाज, तो  उजळणारा   पडदा, ती इंटरनेट जोडलं गेल्याची खूण  सारं काही ‘सुचवून  पोर्न जाते’. एखाद्या दारुड्याला पगाराचा दिवस हे ट्रीगर असू शकेल तर  एखाद्या पोर्नाड्याला घरात एकांत मिळण्याची शक्यता, हे ट्रीगर असू शकेल.  हळूहळू जिकडे तिकडे चोहीकडे   पोर्न बघायला सुचवणारे संकेत आपोआपच दिसू लागतात आणि या संकेतांना प्रतिसाद दिल्याशिवाय दिलाची तगमग थांबतच नाही.
डेल्टा फॉस बीचा पूर आला की मेंदूतील पेशीत काही जनुकीय बदल घडतात. या बदलांमुळे  पोर्न, ही आता शरीराची अनिवार्य गरज बनते. पहिल्यासारखी मज्जा  साधता साधत नाही पण तगमग थांबता थांबत नाही, असे सर्किटस आता जुळून येतात. सुख कमीकमी पण इच्छा अधिकाधिक अशी अवस्था येते.   एके काळचे हॉट पोर्न आता सपक आणि कंटाळवाणे वाटायला  लागते. कोणत्याही व्यसनाप्रमाणे मग तेवढ्याच किकसाठी जास्त जास्त डोस लागू लागतो. मग अधिक वेळ पोर्न पहाणे, अधिक हार्डकोर, अधिक हिंस्त्र, अधिक विकृत पोर्न पहाणे हाच मार्ग उरतो. त्या शिवाय ‘मजा’ येतच नाही.  मेंदूचे हे री-वायरिंग तरुण वयात अगदी सहज होते.  त्यामुळे तरुण मुले  सहजपणे पोर्नाडी बनतात. पण याचा अर्थ बाकीचे अस्पर्श रहातात असा नाही.  
हे व्यसन असंच चालू राहिलं तर मेंदूत सर्किटस् अगदी  कोरली  जातात म्हणा ना.  हे कोरीवकाम खोडून काढणं अगदी अवघड होऊन बसतं मग. हे असलं कोरीवकाम करण्यात पोर्न अगदी माहीर. प्रत्यक्ष समागमही त्यापुढे फिका ठरेल. का? कारण  प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!!
प्रत्यक्षाहून  इथे प्रतिमा उत्कट असल्याने प्रतिमेतच मन गुंतून पडतं. भारतीय मानसिकतेला गोऱ्या रंगाची,  टंच युरोपीय अंगाची आणि भल्या मोठ्या लिंगाची  भुरळ फार. मग आपण, किंवा आपली, किंवा आपला, ह्या आदर्श मापात नाही म्हणून कुढणं  सुरू होतं. स्वतःच्या आणि जोडीदाराच्या शरीराचा त्याच्या सुरूप आणि कुरूपतेसह स्वीकार जमतच नाही. सततच्या विचित्र तुलनेतून न्यूनगंड तयार होतो.
 खऱ्याखुऱ्या मैथुनात आता मौज वाटेनाशी होते. जेंव्हा प्रत्यक्ष सेक्स करायची संधी  सामोरी येते तेंव्हा पोर्नाडे गोंधळलेले असतात. प्रत्यक्षातील सेक्स त्यांना सपक,  बेचव, दुय्यम, कंटाळवाणा, मिळीमिळीत आणि अनावश्यक वाटायला लागतो. मग पोर्नशिवाय लिंगाला  ताठरताच येत नाही.  वीर्यपतन व्हायला खूप वेळ लागतो किंवा प्रयत्न करूनही वीर्यपतन आणि कामपूर्ती होता होत नाही. पोर्न साईटचा थरार सतत आठवत रहातो.
 प्रत्यक्षातली नारी काही बटण दाबताच नग्न होत नाही. सहसा प्रेम, जिव्हाळा, विश्वास, आदर, नातेसंबंध असा पाया रचावा तेंव्हा कुठे संभोगाचा कळसाध्याय साध्य होणार. हे भलतेच वेळखाऊ, महागडे  आणि कष्टाचे काम.   नाती जोडणे, ती टिकवणे, त्यासाठी थोडा स्वार्थत्याग करणे हे सगळेच पोर्नाडयांना  दूरस्थ वाटू लागते. त्या मानानी पोर्न हा बिनभांडवली धंदा.
मुळात नॉर्मलची व्याख्याच आता बदलून जाते. गुदसंभोग आणि मग स्त्रीच्या चेहऱ्यावर स्खलन,  हेच जर वारंवार पहात  राहिलं तर  हीच ‘काम’गिरी खरी अशी खात्रीच होते. मग हे किंवा असलं काही जमलं नाही किंवा जमवता आलं नाही, तर आपल्या किंवा जोडीदाराच्या किंवा दोघांच्या कामगिरीबद्दल विषाद दाटून येतो.
आपल्या वैयक्तिक आणि लैंगिक जीवनावर दुष्परिणाम होऊनही होऊनही पोर्नाडे पोर्नचा   सातत्यपूर्ण वापर करत सुटतात. त्यांच्या ध्यानी,  मनी, चित्ती सदैव पोर्नचाच विचार असतो. पोर्न शिवाय मुळी भागतच नाही. पोर्न नसेल तर मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता येते. चिडचिडेपणा, निद्रानाश, थकलेपणा, एकाग्रता न साधणे, नैराश्य, एकांडेपणा, आणि कामेच्छा अजिबात संपणे अशी लक्षणे दिसतात.
पोर्नाडे अति-संवेदनशिल बनतात. ते निमित्तालाच टेकलेले असतात. पोर्न वालोंको पोर्न का बहाना चाहीये. साऱ्या भवतापावर ह्या  पोर्नाड्यांनी    पोर्नचा  उतारा शोधलेला असतो. पण त्याचवेळी  पोर्नची सवय झाल्याने ते बथ्थड आणि बधीर झालेले असतात.  ‘पहला नशा, पहला खुमार’ आता  येत नाही, अधिकाधिक डोस लागतो, पण तरीही सुखाचे क्षण फक्त आणि फक्त पोर्नच्या सनिध्यातच शोधले जातात. आवड आणि इच्छा यांची फारकत झालेली असते. आवडत नसूनही इच्छा होत रहाते. ती गोष्ट  नकोशी वाटत असूनही असोशी वाटत रहाते.
व्यसनमुक्तीसाठी मेंदू रीबूट करावा लागतो. मनाचा जिर्णोद्धारच हा. संपूर्ण सॉफ्टवेअर जणू नव्याने इनस्टॉल करावे लागते. म्हणूनच  तुम्ही मानसतज्ञांना जरूर भेटा. त्यात ओशाळवाणे काहीही नाही. डॉक्टर काही, ‘तुम्हाला लाज नाही का?’, ‘असे कसे तुम्ही पतित?’ वगैरे नितीमत्तेचे डोस पाजत नाहीत. काही म्हणत नाहीत. ते त्यांचं, तुम्हाला मदत करायचं, काम इमानेइतबारे करत असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. व्यसन असेल तर त्याबरोबर इतरही मानसिक/शारीरिक आजार असू शकतात. साऱ्याचा  एकत्रित विचार करून एकात्मिक उपचार केले तर ते योग्य ठरतात. अर्धवट प्रयत्न अपुरे आणि अयशस्वी  ठरतात. तेंव्हा ह्याही कारणे डॉक्टरांची, मानसोपचार तज्ञांची मदत जरूर घेणे.

पोर्न संन्यास, एवढेच नव्हे तर तात्पुरता का होईना,  इंटरनेट संन्यास, म्हणजे फेबू, युट्यूब, व्हाटसॅप  या   साऱ्यांपासून संन्यास घेतला तर यातून लवकर बाहेर पडता  येते. मोहाचे क्षण सीमित होतात.  कधीकधी हस्तमैथुनही पूर्णतः टाळायचा सल्ला दिला  जातो. कारण हेही पोर्नची आठवण काढूनच होत असतं. व्यसनमुक्त होण्यासाठी प्रत्यक्षाचा साक्षात आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. प्रेक्षकातून टाळ्या पिटणे  सोडून स्वतः कलाकार बनायला शिकलं पाहिजे. हे शक्य आहे. शक्य असतंच.  कारण प्रत्यक्षात असलेले ह्या दिशेने जाणारे मार्ग निव्वळ न वापरल्याने अरुंद झालेले असतात. ते वापरात आले की त्यांचे पुन्हा हमरस्ते होतात.
व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रवास हा सुद्धा खाचखळग्यांनी  भरलेला असतो. पोर्नच्या  व्यसनाने भक्कम झालेली सर्किट लगेच शॉर्ट होत नाहीत. सर्किटस निर्मिणारे डेल्टा फॉस बी तर दोन-दोन महीने मेंदूत ठाण मांडून असते.  अगदी निरीच्छा गाठायला सातआठ महीने लागतात. पहिले सातआठ दिवस तर  भयंकर त्रास देतात. पण एकदा ही कळ  सोसली की व्यसन आवाक्यात येण्याची सुरवात झाली म्हणून समजा. व्यसन सुटल्यापासून  सुमारे महिन्याभराने हे मार्ग  नष्ट व्हायला सुरवात होते. संपूर्ण नष्ट मात्र कधीच होत नाहीत. पाऊलवाट उरतेच. त्यामुळे कोणत्या बेसावध क्षणी पुन्हा पाय त्या वाटेला  वळतील हे सांगता  येत नाही. अखंडपणे सावधपण असेल, तरच निश्चयाचा महामेरू टिकतो.
 प्रयत्न करूनही पोर्नच्या विळख्यातून सुटका होत नाही कारण  मनावर ताबा ठेवणाऱ्या, निश्चयगामी रचना कमकुवत झालेल्या असतात. मेंदूचा कपाळामागील भाग (Frontal lobe) हा विवेकी वागणुकीचा स्त्रोत. बायकोला (फार) उलटून बोलू नये, पोरांना (फार) रागावू नये, परीक्षेच्या आदली  रात्र पोर्नऐवजी पुस्तकांसोबत घालवावी; हे असले निर्णय इथे होतात. पोर्नाडे हा विवेक गमावून बसलेले असतात. योग, ध्यानधारणा वगैरेंनी ह्या निश्चयगामी रचना  सक्षम होतात. निश्चय आणि निग्रहही अंगी बाणवता येतो, पण वेळ लागतो. व्यसन सुटल्यावर अचानक बराच मोकळा वेळ मिळतो. तो खायला  उठतो. ह्याचं काय करायचं हे उमजत नाही. छंद, मैत्री, खेळ ह्यात रस  असेल तर या साऱ्याचा व्यसन सुटायला उपयोग होतो. कोणी  जवळचा  मित्र असेल तर त्याला हा प्रश्न आहे हे सांगा,  त्याचे उत्तर शोधण्याला मदत हवी आहे हे सांगा. निश्चयपथावरून आपण ढळत नाही ना, हे हा मित्र पाहील.
ज्या इंटरनेटच्या उच्छादातून  हे व्यसन लागते त्याचीच मदत घेऊन काट्याने काटा काढता  येतो.  अनेक साइट्सवर या संबंधित  सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध आहे. व्यसनमुक्तीची अॅप्प्स मिळतात. बराच उपयोग होतो. किती वेळ, काय काय पहिलं, ह्याची नोंद तुमची तुम्हाला सादर केली जाते.  अगदी सेकंदाचाही हिशोब ठेवला जातो. व्यसनमुक्त मित्र किंवा या मार्गावरचे सहप्रवासी भेटतात इथे. अन्य लोकांशी  निरोगी स्पर्धा करता येते. यशापयश ग्राफच्या रूपात मांडून येतं, त्यामुळे तुलना सहज शक्य होते. बऱ्याच काळ  पोर्नपासून लांब राहिलात की लगेच एखादं मेडल तुम्हाला बहाल केलं जातं. अशी शाबासकीची थाप महत्वाची असते. कधी मनात ‘तसला’ काही विचार आलाच तर  एका  क्लिकसरशी प्रेरणादायी सुविचारांचा, कथा कल्पनांचा रतीब सुरू होतो. ऑनलाइन मित्रही  तुम्हाला व्यसनापासून परावृत्त करायला टपलेलेच असतात.
पोर्नाड्या होण्यामागील  विज्ञान समजावून घेणं  खूप खूप महत्वाचे आहे. व्यसन हा शब्दही कुणाला नको वाटतो. आपण व्यसनी आहोत हे मान्य करणंही मग जड जातं. व्यसनच जर मान्य नसेल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही.  पण विज्ञान समजावून घेतलं तर डोपामिनचा  पूर, त्याला मिळालेला प्रतिसाद, त्याची लागलेली सवय आणि ती दूर करण्याचे मार्ग, हे सारेच आवाक्यात आहे हे  लक्षात येतं. स्वतःला,  परिस्थितीला, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा यातून बाहेर पडायचं तर आपल्याला स्वतःलाच प्रयत्न  करायला हवेत हे लक्षात येतं.
 मनच ते, ते कामरंगी रंगणारच. त्यात वाईट काही नाही. पण अनंग मदनाचे सप्तरंगी काम-धनू जर नुसत्याच काळ्या रंगात रंगून गेलं तर रंगाचा बेरंग होणारच. तेवढी सावधानता बाळगणे आवश्यक आहेच.


4 comments:

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. प्रबोधन करणार लेखन . सध्या काळाची गरज . असे लेखन पाठ्यपुस्तक यात यायला हव.

    ReplyDelete
  3. Brilliant write up, didn't know so many things.

    ReplyDelete
  4. छान लेख

    ReplyDelete