Wednesday, 26 September 2018

चाफेकर बंधू


चाफेकर बंधू
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

ते ही चाफेकर बंधु आणि हे ही चाफेकर बंधू. ते दामोदर हरी, बाळकृष्ण हरी, शिवराम हरी; आणि हे; दाउद रहीम, बशीर रहीम आणि सलीम रहीम चाफेकर. चाफेकर आडनावाच्या माणसाचे नाव दाउद किंवा बशीर किंवा सलीम असू शकते आणि कुणा चाफेकराच्या बापाचे नाव रहीम असू शकते; हे पहिल्यांदा कळले तेंव्हा  हा कल्चरल शॉक होता मला.  हे बंधू महाडचे. हे आणि ह्यांच्यामुळे त्या भागातले अनेक माझे पेशंट झालेले. बोटीवर मजूर म्हणून चाकरी हा बहुतेकांचा व्यवसाय.
पण चाफेकर बंधू खास पेशंट. कारण ते माझे वडिलोपार्जित पेशंट. बाबा जनरल प्रॅक्टीस करायचे. तेंव्हाच्या शिरस्त्याप्रमाणे डोळ्यातल्या मोतीबिंदुपासून  ते टाचेतल्या काट्यापर्यंत सगळी ऑपरेशनं एकहाती करायचे. त्या जमान्यातले रहीम चाफेकर हे बाबांचे अगदी घट्ट पेशंट. पुढे हे चाफेकर बंधू माझे पेशंट.
‘तुझ्या बाबान् आमच्या घरातल्या सात माणसाचा पोट फाडलेला हाय.’ अशी माझ्या वडीलांची कीर्ती मलाच अभिमानाने सांगणारे. मी ‘पेशालिस्ट’ झाल्यामुळे बाबांसारखी ‘सर्वां आप्रेशने’ करत नाही हे ऐकून हळहळणारे पण तरीही ‘कायबी लागला तर तुला आधी दावू, मंग तू सांगशीला थितं न्हंतर जाउ’ असं बजावणारे.
सह्याद्री ओलांडून महाडची ही फ्यामिली मजल दरमजल करत माझ्या दवाखान्यात डेरेदाखल झाली की मोठा गहजब उडतो.
आल्या आल्या सिस्टरना ‘बऱ्या हांव ना?’ अशी साद घालणार.
‘बऱ्याव! बऱ्याव!!’ पण एवढ्यावर चाफेकरांचे समाधान होत नाही.
‘न्हवरा बेष हाय ना?’
‘हो.’
‘आणि मुलां?’
‘छान आहेत.’
‘सासू बेस असां नां?’
‘हो हो.’
असां अजून? असां कसां?’ चाफेकर ठरलेला जोक मारणार. असं करत करत सगळ्या खानदानाची विचारपूस झाली की,
‘डागदर हाय आत का जेवूक गेलां?’
‘नाही, आहेत की.’
‘अजून नाय गेला? अडीच झालें’
मग ‘काय डागदर, बाबा कसे हायेत?’ अशी सलामी देत देत थेट माझ्या केबिनमधे घुसणार. घुसणार म्हणजे घुसणार. आत दुसरे कोणी पेशंट आहेत नाहीत ह्याची पर्वा कशाला? चाफेकर तर घरच्या दवाखान्यात आलेले. ‘हे पहा, तू शिस्टरशीक आमास रूम दावायला सांग. आमी एवढ्या लांबचा परवास करून आलंय. आमी ज्येवतय आणि मग तुला दाखवतंय. तू जेउक ये पाहू, आमी बी उरकून घेतांय’
थोड्याच वेळात दवाखान्याबाहेरच्या शेडमध्ये, पीठ, मीठ, शिधा बाहेर येणार. पाटा-वरवंटा वाजू लागणार, नाचणीच्या भाकरीचा आणि तिखट सुकट बोंबील शिजल्याचा घमघमाट हॉस्पिटल भरून रहाणार. लांबूनच कोणीही ओळखावं. महाडचे पेशंट आले बरं का.
येणार ते सगळा गोतावळा बरोबर घेऊन. सगळ्या भावांच्या बायका, पोरंबाळं, सासू-सासरे, मेव्हणे, पावणे, सगळे. तीन भावांपैकी आता दोघंच आहेत. दोघं भाऊ अचानक गेले. मला आठवतंय, एके दिवशी दाउद चाफेकर आला आणि ओक्साबोक्शी रडायलाच लागला. मला काही कळेना, बऱ्याच वेळानी नीट  बोलता येण्याइतका तो सावरला. म्हणाला, तिघेही भाऊ एकत्रच बोटीवर होते. काँगोच्या बंदरात बोट असताना दोघा भावांना ताप यायला लागला. तिथल्या डॉक्टरनी त्यांना ‘क्वारान’ केला होता. ‘क्वारंनटाईन’ म्हणायचं होतं त्याला. ताप प्लेगचा होता, त्यामुळे कुणालाही भेटायला बंदी. प्रवास चालू, तापही चालू. पुढे बोटीवर असा पेशंट आहे म्हटल्यावर तर, बोट मादागास्करच्या बंदरातही येऊ देईनात. ह्यांना काही मदत मिळायच्या आत, दोघांचाही  खेळ खल्लास. बोटीवरच. बायको आणि पाच-पाच मुलांचे पोशिंदे पहाता पहाता गतप्राण झाले होते. हा हादरला. दोन्ही भावांचे मृतदेहही याच्या ताब्यात मिळाले नाहीत. त्यांची रोगीष्ट शरीरे इतरांना घातक ठरू शकत होती. नियमानुसार सीलबंद पेटीत घालून ती तिथल्यातिथे समुद्रार्पण करण्यात आली. ह्यांनी घरी तार केली. तार पोहोचायच्या आत कंपनीचा नुकसान भरपाईची चेक घरी पोहोचला होता आणि हे पैसे म्हणजे काही तरी बक्षिस आहे असं समजून घरी आनंदोत्सव सुरु होता.
झाल्या प्रकारानं हा खचला पण घरी नाही बसला. स्वतःचा आणि दोन्ही भावांचा संसार निगुतीनं आणि टुकीनं सावरत राहिला. एक बरं होतं. पोरं भरमसाठ होती. त्यामुळे पाठोपाठ ती हाताशी आली, बोटीवर लागली आणि पै-पैसा घरी पाठवू लागली. दिसामासांनी चाफेकराची परिस्थिती कूस पालटू लागली. कोणी पोरगा घरी आला की खिशात पैसा खुळखुळू लागायचा. मग हौसेची आजारपणं घेऊन हा सारा काफिला वाई पिकनिक आणि औषधोपचार अशा संयुक्त सफरीवर कूच करायचा.
आले की लगेच चौकशा. इतक्या चौकश्या की विचारायची सोय नाही. आपपरभाव असा काही मामलाच नाही तेंव्हा सारे प्रश्न खुलेआम. कोणी नवीन सिस्टर दिसली की चाफेकर सुरु,
‘लगीन कधी झालां?’
‘तीन वर्ष.’
‘मुलां किती?’
‘दोन.’
‘मुलगे?’
‘दोन.’
‘दोन्ही मुलगेच?’
‘हो.’
‘मुलगी नाय?’
‘नाही.’
‘नाय!! असा कसा? भावाला भन नको? आप्रेशन केल्यांव?’
अशी उलटतपासणी घ्यायला चाफेकरला सिस्टरच पाहिजे असं नाही. माझ्या पत्नीलाही त्यांनी पहिल्या भेटीत अगदी हेच प्रश्न विचारले होते. जाताना निरोप समारंभही असाच आपुलकीने पार पडणार. मी, सिस्टर, मावश्या, स्वीपर सगळ्यांना ‘येत्यांव हां आमी येत्यांव, याद ठेवा.’ असं सांगून जाणार. वर मला सांगणार, आता म्होरच्या बाऱ्याला बायकोला तुमच्या म्होरं हानतो! एकदा तुमच्या म्होरं हानला की ती बेष  होणार. गेल्या बारीला मुलीला हानला, ती आता बेष हाय, मंगशी म्हेवणीला हानला, ती बी बेष हाये; आता बायकोला हानला की झाला! येत्यांव हां, बायकोला हानला की नीट तपासा तिला.’ हानला म्हणजे  आणला हे आता मला माहित झालं आहे.
माझा दवाखाना त्यांच्यासाठी दवाखाना नव्हता, लॉजिंग बोर्डिंग होतं. एका पेशंटला दाखल केला की तेवढ्या  पुण्याईवर दहा पंधराजणांची फुल फॅमिली मुक्कामी रहाणार. इकडे मी पेशंटचं लागेल ते करणार आणि तिकडे ते पिक्चर बघणार, चार-चार, पाच-पाच पिशव्या गच्च भरून भाजी घेणार, हरतऱ्हेचा  बाजार करणार, अगदी केरसुणी सुद्धा घेणार. सुरवातीला आलेले नातेवाईक मौजमजा करून झाली की परतणार. मग लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी बॅच येणार. त्यांनाही विविध खऱ्याखोट्या आजारांनी, तक्रारींनी ग्रासलेलं असणार. कुणाच्या ‘काळजात धकाकी होतंय’, तर कुणाचा ‘माथा मोप उकलतांय’ तर कुणाला ‘अंगावरून पांढराव्हाईट्ट बिलडींग होतांय’!  तो पाढा माझ्यासमोर वाचून झाला की हौसेहौसेनं सगळे औषधं लिहून घेणार. चढाओढीनं तपासण्या सांगा म्हणणार. एखाद्याला एखादी तपासणी नको म्हटलं की मनोमन दुःखीकष्टी होणार. आघाडीवर लढाईला निघाल्याच्या तोऱ्यात शी शू तपासायला जाणार. थुंकी तपासायला सांगितलं तर बाकीचे थुंकी झेलायलाही तयार. जत्रेत फोटो काढावा तशा लगबगीनी एक्सरे काढून घेणार, सोनोग्राफी करणार. यात कशात काहीही  निघालं, की त्या माणसाचं कोण कौतुक. एखादं मेडल, ढाल किंवा गदा मिरवावी तसा तो रिपोर्ट मिरवणार. त्या माणसाची जीवापाड काळजी घेणार. मायेनं ओथंबलेल्या शब्दात त्याची विचारपूस करणार. किरकोळ आजाऱ्याला मरणासन्न असल्याची वागणूक. त्याची प्रत्येक इच्छा जणू अखेरची इच्छा. त्याचा प्रत्येक शब्द झेलणार. सारं अत्यंत आपुलकीने प्रेमाने करणार. चाफेकराची आणि त्याच्या बायकोची गडबड बघत रहावी.
आपला अवजड देह सांभाळत, बुरखा सावरत ही बाई सगळ्यांची उठबस करणार. आकारात हा हिच्या बरोब्बर उलट. अंगयष्टी म्हणजे अक्षरश: यष्टी. उंच, शेलाटी अंगकाठी. बुरख्यात गुंडाळलेल्या गलेलठ्ठ बायकोसमोर चाफेकर म्हणजे डोलकाठीच दिसायचा. बुजगावण्याला कपडे घातल्यासारखा अवतार त्याचा. लांबच लांब सदरा, पायघोळ पायजमा किंवा लुंगी, जाकीट, गोल टोपी, खांद्यावर चौकड्याचा रुमाल, आणि भरघोस दाढी विथ नो मिशी; असा कोणाही खानास शोभेल असा पेहराव. पण रूप मात्र अगदी चाफेकरी, गोरा, घारा, उंच, नाकेला. आवाज अत्यंत मृदू, मुलायम, आर्जवी, मिठ्ठास गोड. अशा मधाळ आवाजात तो डॉक्टरची स्तुती सांगू लागला की काय वर्णावे.
‘लंडनशी व्हतं तवा पोटात दुखला, बोटीवरचा डागदर म्हणाला, आप्रेशन लागणार, अपेंड्याचा किडा हाय. मया काय त्याच्याकडून काढून घेतला नाय. तिथून बोट दरबानला थांबली तिथे दाकीवला, तिथ्ये बी तेच! मी म्हणला हिथे नाय ओप्रेशन करूसा, मला सोडा मी आपला वाईस जाईन, अबिंकरास दावीन. त्यानि संगीत्ला तर तां खरा. मंगशी म्हमईला बोट आली का, की कंपनीच्या इस्पितळास बी गेला न्हायी. लागलीच हिकडे आला. आता तुमीच काय ते बगा आन तो अपेंन्ड्या काडा.’
एवढं बोलून, रुंद हसून, पिशवीतून हा फॉरेनहून आणलेली भेटवस्तू काढून देणार. जुना जमाना तो, इम्पोर्टेड कापडाचंही कौतुक असण्याचा. एकदा त्यांनी लुंगी दिली! सुळसुळीत टेरिलीनच्या कापडाची लुंगी. इम्पोर्टेड! तिच्यावर एक  नेत्रदीपक मोर प्रिंटलेला होता. लालभडक, पिवळाजर्द, जांभळागर्द, हिरवागार, निळाशार, अशा गडद सप्तरंगात प्रिंटलेल्या त्या मोरानी, रंगांची उधळण असह्य होऊन, ‘नो मोर’ असं म्हणत, स्वतःच डोळे मिटले होते.
सप्तसागर ओलांडून चाफेकर बंधू आले की मला आपले कुसुमाग्रज आठवतात.
‘मार्ग आमचा रोखू न शकती, धन अथवा दारा, घराची वा वितभर कारा...
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती.’
पण मग विषण्ण भाव दाटून येतो.  यांचा मार्ग रोखायला धन होतेच कुठे. असलीच तर भातखाचराची शेती, तीही सामायीकीत आणि थोड्या  कोंबड्या. एवढीच दौलत. दौलत येणार ती समुद्रात, बोटीवर राबराब राबुनच. घराची काराही वीतभर म्हणजे खरोखरच वीतभर. त्यात भर पडलीच तर बोटीवर काम करणाऱ्याच्या घरी पडणार. दारासुद्धा असून नसल्यासारखी. सहा-सहा महिने नवरा समुद्रावर मग दोनेक महिने घरी की पुन्हा बोटीवर. बहुतेकांना मुलंबाळं होण्यात प्रॉब्लेम. आजारामुळे नाही, अ-सहवासामुळे. सात नभाखाली फिरूनही क्षितीज बितीज निर्मिण्याचं भाग्य यांच्या भाळी नाही. हे कोलंबस नाहीत. हे आपले मजूर. अनाम मजूर. कोलंबसच्या बोटीवरही असतीलच की चाफेकर, आपल्याला कुठे त्यांची नावं माहित आहेत.
पण दाउद चाफेकर कोलंबस नसला तरी त्याच्या घरी मात्र कोलंबस आहे बरं. स्वतःच्या बायकोला, त्याच्या शब्दात ‘मागारीणीला’ हा कोलंबस म्हणायचा. कारण काय, तर तिचं सारखं काहीतरी हरवलेलं असायचं आणि ही कायम शोध मोहिमेवर असायची. नुकतीच हातात ठेवलेली औषधाची चिठ्ठीसुद्धा तिला लगेच सापडायची नाही. तिच्या बुरख्याच्या तंबूत तीही हरवून जाईल असं मला वाटायचं. त्या पट्टीतून दिसणारी तिची ‘या डोळ्यांची दोन पाखरे’सुद्धा सतत हरवलेले भाव घेऊन असायची. पण कोलंबसपेक्षा गलबताचीच उपमा तिला शोभून दिसली असती. बुरख्यात गुंडाळलेलं शरीराचं धूड सांभाळत ती, एकदा एका पायावर आणि एकदा पायावर सारा भार सावरत सावरत यायची, तेंव्हा दुरून ती गलबतासारखीच भासायची.
या बायको नावाच्या गलबताचं, चाफेकर म्हणजे बंदर होता. एकदा ही जोडी, आणि आश्चर्य म्हणजे फक्त जोडीच आली आणि चाफेकरीण तावातावानं बोलायला लागली. चाफेकरचे कोणतेतरी  ऑपरेशन महाडला झालं होतं आणि हे तिला मुळीच पसंत नव्हतं एवढंच मला कळलं. माझ्या सल्याशिवाय झालेले ऑपरेशन म्हणजे काहीतरी बिघडलेलंच असणार अशी तिची पक्की खात्री होती. म्हणून ती आज तो प्रॉब्लेम सोडवायला चाफेकरला खास घेऊन आली होती.
‘कसलं ऑपरेशन झालं चाफेकर?’
‘आप्रेशन ना? पिस्तुलाचा झाल्यांव!’ ओशाळत चाफेकर म्हणाला.
‘कसलं?’ मी जरा चमकलोच.
‘पिस्तुलाचा.’ चाफेकर शांत. वेगवेगळी लोकं येतात, त्यांची भाषा वेगवेगळी असते, आणि शब्दही काहींचे अगदी खास आणि वेगळे असतात. पण कितीही कल्पना ताणली तरी हा चिपाडासारखा माणूस आपल्या अवयवाला पिस्तुल म्हणेल हे काही मला पटेना. म्हणजे, त्यानी तसं म्हणायला माझी काही हरकत नव्हती. काही का म्हणेना, पिस्तुलंच काय रायफल किंवा तोफ म्हणले असते तरी चाललं असतं. पण मला हसू येत होतं. ते जाम दाबता येत नव्हतं.  कितीही हसू आलं तरी हसायचं नाही हा तर अंगी मुरवलेला व्यावसायिक बाणा. त्यामुळे मी चेहरा कोरा ठेवण्याच्या आटोकाट प्रयत्नात. पण फिसकन् हसू फुटेल अशी धास्ती वाटत होती. कुकरच्या शिट्टीसारखी आतून फुस्स फुस्स वर येत होती.
शेवटी मी हसू दाबण्यासाठी पुढचा प्रश्न विचारला, ‘कुठे झालंय ऑपरेशन?’
‘आपला महारशीच झाल्यांव. त्ये द्येशमुखाचा पोरगा आल्यांव न डागदर होऊन, त्यो म्हनला ब्येस करून द्येत्यांव. मी हिकडशीच निगलावता, पर काय करणार, पाउस मोप आमच्या हिकडे, गाड्या बंद, घाटात दरडी पडलेल्या आन तरास मला मोप झालेला, मंग दावला त्याला. पिस्तुलाचा तरास लई ताप देणारा हो, शत्रूला बी होऊ नाय!’ एवढं बोलून तो गर्रकन् वळला आणि स्वतःच्या पार्श्वभागाकडे बोट दाखवत म्हणतो कसा,
‘एके दिशी पिस्तुलातून भळांभळां पानी यायला लागलांशी.’
मला काही कळेना याचं पिस्तुल या दिशेला कुठे गेलं?  बरं त्याच्यात काही दिशादोष म्हणावा तर हा चार मुलांचा आणि तेवढ्याच मुलींचा बाप!
‘निट सांग चाफेकर, कुठून पाणी गेलं? कसलं ऑपरेशन?’
‘सांगितल्यांव ना, पिस्तुलातून पाणी गेल्यांव, तवा  पिस्तुलाचा ऑपरेशन केल्यांव!’
‘पिस्तुलाचा?’
‘आपला पिस्तुला अस्त्यांव ना त्येचा.’ अचानक माझी ट्यूब पेटली. ‘पिस्तुला’ म्हणजे 'फिस्च्युला’ म्हणायचं होतं त्याला!! मला हुश्श झालं. त्याला तपासून ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगितल्यावर तो माझ्या पायाच पडायला लागला. निव्वळ दुसऱ्याने केलेलं ऑपरेशन व्यवस्थित आहे ह्या सर्टीफीकेटसाठी पाया पडणे, म्हणजे जरा जास्तच होत होतं. पण चाफेकर ऐकायला तयार नव्हता. माझ्या सल्याशिवाय ऑपरेशन केल्याचं पाप त्याच्या भावूक मनाला डाचत होतं.
भावूक तर तो होताच पण भाविकही होता. भाविक तर इतका की काही विचारू नका. पाच वेळा नमाज, कुराण पठण, सतत तसबीनी जप हे तर चालायचंच. टोपी, दाढी हे तर मस्टच. पण एकट्या अल्लावर भार नको म्हणून की काय, तो सगळीकडचे देव करायचा. वाईला आला की ढोल्या गणपतीला जाऊन येणार, कृष्णाबाईचा उत्सव चालू असेल तर तिलाही एकदा दर्शन देऊन येणार. वाडीतला पीर, सुलतानपुरातली मशीद, निमजग्यावरचा दर्गा असं सगळीकडे फिरून एक मिनी तीर्थयात्रा उरकून येणार. कोणी काही प्रसाद म्हणून दिलं, की आत्यंतिक भक्तिभावाने, डोळे मिटून, प्रार्थना पुटपुटत भक्षण करणार. सगळीकडे त्याला देवच देव दिसत होते. वाटेतल्या उंबराच्या झाडाला, शेंदूर माखल्या दगडाला, वडाखालच्या मारुतीला ह्याचा नमस्कार ठरलेला. शप्पथ घेणार ती ‘दर्याशप्पथ!’ अशी. अल्ला, प्लस हे सगळे जमेस धरता, त्याच्या देवांची संख्या तेहतीस कोटी प्लस होती.
एकदा ह्याचा सीटी स्कॅन करायचा होता. मला म्हणाला, ‘डागदर, तू माज्या बरुबर आत पत्तूर यांव हां, मला भय वाटतांय.’ मी गेलो. हा बाहेर थांबला होता. आधी मी त्याला ओळखलंच नाही. दवाखान्याच्या चट्टेरीपट्टेरी कपड्यात, टोपी नाही, एका हातात लघवीची पिशवी आणि एका हातात केस पेपरची फाईल. चपला घासत, गाऊन सावरत कसाबसा चाफेकर मशीनपाशी पोहोचला. त्या टेबलवर कसं झोपायचं हे सांगण्यासाठी  मी त्याला म्हणालो, ‘हं, चाफेकर, इकडे डोकं ठेवायचं.’ शांतपणे त्यानी चपला काढल्या, फाईल अन् लघवीची पिशवी मला धरायला दिली, गाऊन सावरला आणि डोळे मिटून, हात जोडून, अत्यंत भक्तिभावाने, मशीनवर  डोकं ठेवलं. 
‘चाफेकर, इथे डोकं ठेव म्हणजे नमस्कार नाही करायचाय, इथे डोकं ठेऊन झोपायचं.’ मी खुलासा केला.
ह्याच सीटी स्कॅन वेळच्या आजारातून चाफेकर बरा झाला आणि काही महिन्यातच पुतणीच्या लग्नाचं बोलावणं करायला आला. ‘आमी गरीब हाय हां डागदर, पण शादीला यांव हां.’ उर्दू मिश्रित हिंदी मजकुरातली, ‘जश्ने-शादी’ असं छापलेली, काबा, चांदतारा, ७८६ आणि उंटाचं चित्र असलेली एक पत्रिका, माझ्या हाती ठेऊन गेला. मी आवर्जून गेलो. गेल्यागेल्या मला बाजूला घेऊन गंगाजलाची एक सीलबंद बाटली त्याने मला दिली. नुकताच तो गावातल्या कुण्या शेटजीबरोबर, ड्रायव्हर म्हणून काशीपर्यंत जाऊन आला होता. तिथे त्या शेटजीबरोबर यानेही आपल्या दोन्ही भावांचं श्राद्ध घातलं होतं म्हणे! माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच, त्यानी लगेच एक्सप्लेनेशन दिलं, ‘दर्यात बॉड्या टाकल्या ना, मंगशी दिवस कसा करायचा त्ये काय हितल्या मुल्लाला नीट ठांव नव्हतां. तेनी तवा कायतरी आरदीवट केलांन. माजा मन काय भरलां नाय. काशीस कसा, त्यांशी समदा ठांव होतां. तवा मी बोल्लो हितं पुन्ना दिवस घालू. घातले! गुर्जी बोलला आता मुक्ती झाली. त्या गुर्जीनीच ही बोटल दिलीन. ठ्येवा.’ मुक्त झालेले हे चाफेकर बंधूचे आत्मे, आता  नेमके जन्नतमध्ये जाणार का काशीतील गुस्ताखीबद्दल जहान्नममध्ये, असा प्रश्न मला पडला. इतक्यात लग्नाचा मुहूर्त झाला. लग्न म्हणजे एक प्रकारच होता. तिथे स्वागताला दाराशी केळीचे खुंट होते, नवरा बायकोची हळद लावून झाली होती, मंगळसूत्र होतं, बूट पळवण्याचा कार्यक्रम होता, ‘कबूल, कबूल, कबूल’ होतं आणि भावभिनी बिदाई तर होतीच होती.
चाफेकरच्या कोणत्यातरी बापजाद्यानी, परिस्थितीच्या कोणत्यातरी रेट्यात धर्मांतर करून इस्लाम आपलासा केला होता हे उघड होतं. मला वाटायचं की एकदा विचारावं त्याला की, ‘तुझं आडनाव तर स्पष्ट सांगतंय की तुम्ही मूळचे हिंदू म्हणून, मग आता ‘दामोदर हरी’, ‘बाळकृष्ण हरी’ किंवा ‘शिवराम हरी’ वगैरे  ऐवजी, ‘दाउद रहीम’, ‘बशीर रहीम’ किंवा ‘सलीम रहीम’ असं नाव लावताना कसंसंच नाही का वाटत?’ पण अर्थातच मी हा प्रश्न विचारला नाही. झाडाफुलात, दगडधोंड्यात, समुद्रात आणि सीटी स्कॅन मशीनमध्ये देव पहाणारा, गंगेच्या किनारी मुक्ती शोधणारा हा माणूस; मला उगीच त्याला ओरखडा काढायचा नव्हता. तो जो होता त्यात तो सुखी होता. ‘दामोदर हरी’ काय किंवा ‘दाउद रहीम’ काय, त्याच्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नव्हता. माझ्याही आयुष्यात पडणार नव्हता. तो सह्याद्री लंघून अबीनकरांस दावायला येतच रहाणार होता आणि मीही सह्याद्री लंघून त्याच्याकडे जातच रहाणार होतो.


No comments:

Post a Comment