चक्रधर
डॉ. शंतनू अभ्यंकर,
वाई.
जिल्हा सातारा. पिन
४१२८०३.
मो.क्र. ९८२२०१०३४९
‘सर, साष्टांग
नमस्कार!’ गाडीचे दार अदबीनं उघडून तो जरा वाकून उभा होता. तो माझ्या मित्राचा
ड्रायव्हर. मित्रानी मला व्याख्यानाला बोलावलं होतं आणि माझ्या गाडीची काही गोची झाल्याने
स्वतःची गाडी ड्रायव्हरही पाठवला होता. तो हा. सर्वप्रथम नजरेत भरली ती त्याची
नसलेली उंची. अत्यंत ठेंगणा ठुसका होता तो. हात लांडे, पाय लांडे, मानही लांडी.
डोकं जणू डायरेक्ट खांद्यालाच जोडलं होतं.
माझ्याकडेच काय सगळ्या जगाकडेच वर मान करून बघत होता. होता तरतरीत. छान
शर्ट, पँण्ट, बूट, स्वेटर आणि हो त्यांनी चक्क टाय घातला होता. माझ्यापेक्षा तोच
स्मार्ट दिसत होता. इतके सगळं नीटनेटकं असल्यामुळे की काय शाळेला बाहेर पडणाऱ्या
मुलासारखा दिसत होता तो. दिसायलाही पोरगेलासाच होता. उत्साहही तेवढाच होता.
त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तरी होतं की नाही कुणास ठाऊक. पण आता मित्रानी
पाठवलाय म्हटल्यावर मी काही विचारलं नाही.
‘सर, साष्टांग
नमस्कार!’
‘आं!’
‘सर, साष्टांग
नमस्कार. दंडवत सर.’
‘नमस्कार.’ माझा
अस्फुट नमस्कार.
‘सर, साष्टांग
नमस्कार!’ पुन्हा एकदा त्याचं शाब्दिक लोटांगण.
‘सर, आय अॅम
ड्रायव्हर ऑफ युवर फ्रेंड.’ आता इंग्रजीत शिरला गडी. माझा लॅपटॉप चपळाईने मागच्या
सीटवर ठेवत तो पुन्हा दाराशी आला, झुकला आणि म्हणाला,
‘माय नेम इज चक्रधर.
प्लीज सिट इन कार, सर.’ मला जरा गंमत वाटली. मी गाडीत बसताच हा तुरुतुरु चालत
टूणकन उडी मारून गाडीत बसला. गाडीत बसताक्षणी त्यानी गाडी अगदी सुसाट सोडली. आणि गाडीबरोबरच
स्वतःही सुटला.
‘सर एक प्रश्न
विचारू?’
‘हो, विचार की.’ मी
आपला बेसावध. पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती.
‘सर, तुम्ही सुखी
आहात?’
‘आं?’ अगदीच
अनपेक्षित प्रश्न. मला आपलं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ आठवलं; ‘सुखी माणसाचा
सदरा’ आठवला. मी काही उघडा नव्हतो, चांगला ‘आदिदास’चा टी शर्ट घालून होतो आणि वर ब्लेझरही; म्हणजे नाहीच की मी सुखी. मला काय
उत्तर द्यावे कळेना. पण अनोळखी ड्रायव्हर
माणसाला, ‘मी सुखी नाही’ हे मी कोणत्या तोंडाने सांगणार? शेवटी उलट प्रश्न विचारून
मी कशीबशी सुरवात केली.
‘मी सुखी आहे का?
आहे, बऱ्यापैकी आहे.’ ‘बऱ्यापैकी’ वर बऱ्यापैकी जोर देत मी म्हणालो.
हो, उगाच संपूर्ण
सुखी आहे वगैरे सांगायला नको. एखादा असला माथेफिरू तर वाटेत निर्मनुष्य ठिकाणी
गाडी थांबवून माझा खून-बीन करायचा. कुणाच्या मनात कोणता सैतान थैमान घालत असेल ते
सांगता येत नाही.
‘सैतानाची हाकारे
तुमच्या कर्णी न पडोत सर, तुम्ही संपन्न होवा.’
बापरे ह्याच्याही
वाक्यात हा सैतान आला की. ह्याला कसं कळलं माझ्या मनातलं? मनकवडा दिसतोय.
‘सर, तुमच्या गाढवीस
फुटू दे पान्हा!! जसा फुटला यहोबाच्या गाढवीस.’
क्काय? माझ्या गाढवीस
फुटू दे पान्हा? पण माझ्याकडे गाढवी नाहीये आणि हा यहोबा कोण? जाउ दे, असेल कोणी ह्याच्या रानातला देव. जास्त
विचारलं तर हा अजूनच अंगात आल्यासारखं करेल म्हणून मी गप्प बसलो. पण एकुणात माणूस
इंटरेस्टिंग वाटला. मूर्ती बटू, पण बोलण्याचा उत्साह म्हणजे उंच उसळते कारंजेच जणू. गाडी
चालवण्यासाठी सीटवर उशी ठेऊन तो उच्चासनावर बसला होता. शिवाय पाठीलाही एक
टेकू होताच. त्याशिवाय त्याचे पायच नीट पोहोचले नसते. मी काही बोलत नाही
म्हटल्यावर गाडीच्याच वेगाने त्यांनी बोलायला सुरवात केली.
‘सर,
बऱ्यापैकी दुःखी असाल तर, करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता
ही धारण करा; एकमेकांचे
सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे
असल्यास आपसात क्षमा करा. म्हणजे तुम्ही व्हाल संपूर्ण सुखी. देव
देखील हेवा करेल तुमचा. प्रभूचे कृपाछत्र नित्य तुमच्यावर राहो.’ पहिल्या दमात
त्यांनी मला बऱ्यापैकी दु:खी ठरवून वर आशीर्वादही दिला होता. कावळ्याच्या शापानी
गाय मरत नाही, पण ह्या बैलोबाच्या आशीर्वादानी गाढवी तरी पान्हावते का हा प्रश्न
मला छळत होता. पण ह्याचं बोलणं संपता संपेना. अखंडपणे तो बोलत होता. बरेचसे कुठले
कुठले पाठ केलेले छापील पॅराग्राफ होते बहुतेक. त्यात व्याकरण, विशेषणे वगैरेबाबत
आनंदच होता.
‘सर एखाद्या
व्यक्तीच्या चेतनेवर शब्दांचा खूप मोठा प्रभाव असतो. विशेषतः जेंव्हा भगवंताकडे
वळणे येते, तेंव्हा बऱ्याचदा म्हटले जाते की प्रार्थना नशीब आणि जीवन बदलू शकते.
हे खरेच खरे आहे. हे ही खरे आहे की विश्वास ठेवणारा प्रार्थना मागतो. त्याला पहिजे
असते एक अगदी मजबूत प्रार्थना. बरोबर ना सर?’
मी इतका मजबूत चक्रावलो
होतो की अस्फुट आवाजात ‘बरोबर’ एवढं पुटपुटण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही. पण
त्याची बडबड अखंडपणे चालू होती. मी पेंगत असल्यासारख केलं, चुळबुळ केली, गाडीतलं
एक शिळं वर्तमानपत्र चाळलं, पण हा पठ्ठ्या थांबायचं नाव घेईना.
‘सर, बरेचदा भौतिक
वस्तूंच्या विनंत्यांची चौकशी केली जाते. अखेरीस विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी
त्याची आंतरिक, भौतिकपेक्षा जास्त महत्वाची असते.’
‘क्काय?’
‘सर समृद्धी, आंतरिक
समृद्धी.’
‘हां, हो, बरोबर.’
‘सर लक्षात ठेवा,
सर्वसाधारण सर्व काही सत्य आहे आणि अध्यात्मिक विकास पृथ्वीवरील उत्थित सुविधांवर
स्थित आहे! माणसाला सुखासाठी काय हवं सर? एक, निरोगी अन्न; दोन, निरोगी झोप आणि
तीन, निरोगी उबदार घर! या जटील उपक्रमात देवाला प्रार्थित करायचे विसरू नका सर;
प्रार्थित करायचे विसरू नका; प्रार्थित करायचे कधीही विसरू नका.’ बऱ्याच वेळाने
अखेर तो समेवर आला. शापबीप देऊन एक्झिट घेणाऱ्या पात्रासारखा तो तीनतीनदा एकच
वाक्य म्हणत होता. मला वाटलं संपलं आता पण कसचं काय, अजून त्याचा मुद्दा संपला
नव्हताच.
‘स्वतःच्या
समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना सामान्य आहे. परंतु सर्वच आत्म्यांची मोक्ष
मिळण्याची विनंती प्राधान्य असावी. असे प्राधान्य देऊन तुम्ही लोकांवर प्रीती धारण
करा सर, तुम्ही लोकांवर प्रीती धारण करा, प्रीती धारण करा.’ पुन्हा तिहाई.
हा इतका उपदेश एका
दमात मी पहिल्यांदाच ऐकला. ऐकून ऐकून दमलो मी. पण ह्याची टकळी काही थांबायला तयार
नाही. मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत
मोबाईलमध्ये तोंड घातलं.
‘सर, एक सांगू?’
‘हं’
‘आयुष्य नावाची स्क्रीन जेंव्हा लो बॅटरी
दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेंव्हा पॉवरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.’
अचानक ध्यानीमनी नसता, त्यानी हे सुभाषित फेकलं. मी दचकलो.
‘क्काय?’
पुढे त्याने मैत्री या विषयावर मला
अर्धा तास सुनावलं. मुक्कामी पोहोचेपर्यंत त्याने माझी पार हालत करून ठेवली. शेवटी मित्राकडे पोहोचलो तेंव्हाच हा गप्प झाला. तरीही गाडी पार्क
करता करता त्याने एक सुभाषित डागलेच; ‘मातीचे मडके आणि मैत्री यांची किंमत फक्त
बनवणाऱ्यांनाच माहिती असते सर, इतरांना नाही!’
पोचल्या पोचल्या मित्राचा प्रश्न,
‘काय आमच्या ड्रायव्हर सायबांनी त्रास नाही न दिला?’
त्याच्या
ड्रायव्हरनी मला कसा आणि किती छळला असणार याची त्याला पूर्ण कल्पना होती हे
प्रश्नाच्या टोन वरूनच मी ताडले होते.
‘उपद्रव नाही पण
उपदेश खूप दिला. जाऊ दे, ड्रायव्हरने मालकाला उपदेश करायची परंपरा महाभारतापासून
चालत आली आहे! शेवटी ‘तो’ही चक्रधर आणि हाही चक्रधर.’ मी.
आम्ही दोघेही
दिलखुलास हसलो. ‘चक्रधर’ही जरा ओशाळला पण हसला. हा मित्राचा ड्रायव्हर, वॉर्डबॉय,
ब्रदर ई. ई. नवीनच लागला होता. चुणचुणीत होता. दोनच आठवड्यात तो माझ्याकडे आला. अचानक. कामाला
ठेऊन घ्या म्हणून. त्याला त्या मूळच्या गावात रहायचं नव्हतं. काही तरी भांडण झालं
होतं. मित्राकडून एकदा खात्री केली आणि बडबड न करण्याच्या अटीवर मी त्याला ठेऊन
घेतला. आला तो हरकाम्या म्हणून. पडेल ते काम करीन म्हणाला आणि दहा वर्ष अक्षरशः
त्यांनी पडेल ते काम केलं. शिक्षण म्हणाल तर दहावी नापास, पण दवाखान्यातली बहुतेक
सगळी कामं त्यानी हुशारीनं आत्मसात केली होती.
दुसऱ्याच दिवशी सक्काळी
सक्काळी फोनवरूनच त्यानी राउंड सांगितला.
‘सर, ती मांगाची बाई
आहे न तिला रात्री उलटी झाली आणि ती कोल्हाट्याची बाई, सलाईन लावलवतं ती, ती घरी जायला मागतेय.’
‘कोण कोल्हाट्याची बाई?’
नावापेक्षा किंवा आजारापेक्षा याला जात महत्वाची वाटत होती. ‘कोणाला डिस्चार्ज
हवाय? ती लक्ष्मीबाई?’
‘ती नाय, ती तर कासाराची
आहे...! ती कुडाळकर म्हणतोय मी, तिला डिस्चार्ज हवाय. आज शनीच्या पारावर तिला
उपासना आहे.’
ही जातीनिहाय राउंड मी
पहिल्यांदाच ऐकत होतो. पहिल्याच रात्री, पहिल्या फटक्यात त्याला पेशंटचा जाच आणि
जात दोन्ही माहित झालं होतं.
‘बरं, ते मी आल्यावर
बघून सांगतो. अरे पण ते पंचपोर पेशंटचं
बाळ कसं आहे? त्याला काल डीहायड्रेशन होतं.’
‘ते एकदम टकाटक आहे
की. त्याची हगवण थांबलीय जणू. रातभर त्या लेकराला दिलं की साखर मीठ पाणी. त्याच्या
आईनी त्याचा चांगला प्रतिपाळ केला.’
तरीच, या माणसाच्या
बोलण्यात काही तरी वेगळं आहे, काही तरी वेगळं आहे, असं मला सारखं वाटायचं; पण काय
ते आजवर लक्षात आलं नव्हतं. आत्ता अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याच्या
भाषेत काही खास शब्द होते. लेकरू, उपासना, प्रतिपाळ. पण हे त्याने कुठून उचलले
होते ते ह्याचा खुलासा पुढच्याच वाक्यात झाला.
‘त्यांचा सण आहे ना
उद्या; त्याला डिस्चार्ज देऊ या सर. त्ये आमच्यातलेच ना?’
‘तुमच्यातले म्हणजे?’
‘म्हणजे किरीस्तांव!’
‘उद्या रविवार तर
आहे’
‘म्हणूनच ना सर!’
‘म्हणजे?’
‘उद्या ‘झावळ्यांचा
रविवार’ आहे सर. प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या
झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा
दिल्या.
ते म्हणाले प्रभूच्या
नावाने येणारा राजा धन्यवादित असो! विजयी राजा घोड्यावर असे पण
प्रभू गाढवाच्या शिंगरावर बसून आला. हे त्याच्या लीनतेचे प्रतिक आहे. या
दिवसापासून आमचा पवित्र सप्ताह सुरु होतो. या आठवड्यात शुभ शुक्रवार, मौदी
गुरुवार, इस्टर रविवार आणि अंजीराचा
सोमवार असे दिवस साजरे होतात. होसान्ना, होसान्ना, सर!’
‘काय?’
‘होसान्ना, होसान्ना.’
‘ते
कळलं, पण म्हणजे काय?’
‘म्हणजे
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो.’ एवढं बोलून तो प्रवचनात शिरला
‘येशू आणि त्याचे शिष्य जेरूसलेमजवळच्या
बेथांनी या गावी होते. त्यांनी बेथफागे गावातून याहोबाकडच्या पान्हावलेल्या गाढवीचे शिंगरू आणले.’
‘अच्छा म्हणजे ‘तो’ यहोबा
म्हणजे ‘हा’ याहोबा होय?’ अचानक मला पान्हा फुटलेल्या गाढवीचा मालक याहोबा आठवला.
‘काय
सर?’
‘काही
नाही. मी राउंड घेतला की देईन डिस्चार्ज.’
त्याचं हे असलं
बोलणं ऐकलं की मला हसूच यायचं. तो बोलायचा ती मायबोली नसून बाय(बल)बोली होती.
देवाचा शब्द शब्दशः भाषांतरल्यामुळे गचाळ शब्दरचना सगळी. ‘आपण शिकलेला नाही पण
वाचलेला आहे’, असं नेहमी म्हणायचा तो. पण
ते निव्वळ वाचन होतं व्यासंग नव्हता. एकांगी, ख्रिस्तमार्गी, उथळ वाचन. वाचन,
पारायण आणि पाठांतर.
पण बुद्धिमान तर तो होताच
त्याला संधी मिळाली नव्हती एवढंच. माझ्याकडे संधी मिळताच त्यांनी जे जे शक्य होतं
ते कौशल्य आत्मसात केलं. आला ड्रायव्हर म्हणून, मग एक्सरे शिकला आणि एक्सरे
काढायला लागला, लॅबमधलं काम शिकला आणि तिथे मदत करू लागला, ऑपरेशनला अॅसिस्ट करू
लागला, एंडोस्कोप घेतला मी तर हा त्यातले बारकावे शिकला. काम अगदी मनापासून करायचा तो.
अगदी बिनचूक आणि महत्वाचे म्हणजे झालीच जर
चूक तर ती कबूल करायचा. एका वहीत आपली चूक लिहून ठेवायचा. हा बहुतेक खिश्चन
संस्काराचा परिणाम. मला दर दोन तीन महिन्यांनी वही दाखवायचा, क्षमा मागायचा. आणखी
शंका विचारून आणखी शिकवा म्हणायचा. कोणी पेशंटनी डॉ. चक्रधर अशी हाक मारली की
मोहरून जायचा. स्वतःच्या पैशांनी हौसेनी त्यांनी स्थेथोस्कोप आणि थर्मामीटर घेतला
होता. वेळीच शिकला असता तर खूप चांगला डॉक्टर झाला असता तो असं मला मनापासून
वाटायचं.
लवकरच डॉक्टर जे
करतात ते त्यानी केलं. आपलं हुनर वापरून एक नर्स पटवून लग्न केलं. कुटुंब नियोजन
आणि गर्भपात याला याचा कडाडून विरोध. मुले म्हणजे देवाघरची देन वगैरे...! मग काय
होणार? लग्न होताच चार वर्षात चार मुली झाल्या त्याला. पाठोपाठ. मुलीच्या बापाचा
म्हणून जो काही परंपरागत चेहरा असतो, तो मुखवटा ह्याने कायम धारण केलेला. होणाऱ्या
प्रत्येक मुलीगणिक मुखवटा घट्ट घट्ट बसत गेला. सतत चेहेऱ्यावर चिंता, अजीजी, लाचारी, गुळचट बोलणे
आणि काही हवं असेल तर अगदी राग येईल इतका
विनय. सतत आपल्याला काही फुकट मिळतय का याचा विचार. जुने कपडे, कागद, कप, जे मिळेल
ते. जरा एखादी वस्तू बिनवापराची आहे असं लक्षात यायचा अवकाश, याची भुभूक्षित नजर
पडलीच तिच्यावर. सुताच्या चटया, वेताच्या तट्या, प्लास्टिक पट्या काहीही चालायचं
त्याला. वर विचारणार...
‘सर, लागणार नसेल
ना?’
म्हणजे आपण ओळखायचं,
की ‘घेऊन जाऊ का?’ असा प्रश्न आहे हा.
आपण, ‘हो, लागणार
आहे’, असं म्हटलं की ‘जेंव्हा लागणार नसेल तेंव्हा सांगा. मी नेईन. मुलींना होईल.’
हे याचं ठरलेलं उत्तर. जे ते याला मुलींसाठी हवे असणार. कुठे बाहेर गेलो तर आपण
काही खरेदी करणे म्हणजे चोरीच जणू. ह्याची आशाळभूत नजर सतत आपल्या पाठीवर वळवळत
असल्यासारखी आपल्या मागेमागे फिरणार. सदैव असमाधानी अशी याची वृत्ती.
देवाच्या पुत्राला
क्रुसावर चढताना झालं नसेल एवढं याचं पुत्रहीनतेचं दु:ख. त्यामुळे की काय,
त्याच्या गाईला गोऱ्हा झाला तर कोण कौतुक
सांगायला लागला. एखाद्याने आपल्या पोराचे करावे तसे त्याच्या गोर्ह्याचं कौतुक
चालायचं. त्याच्या डोक्यावर चंद्र आहे. तो चलाख आणि चंचल आहे. सुलक्षणी आहे. आज
असा पळाला. आज एवढे खाल्ले. आज असा हिसडा दिला. आज गूळ खाल्ला. आज पायातल्या
काट्याचा नायटा झाला. बेंदराला बेस्ट दिसत होता. आज फोटो काढला. ह्याच्या पाकिटात
फोटो; पोरींचा नाही ह्याचा आणि त्या खोंडाचा. फोटोतल्या त्या तरण्याबांड वांड
खोंडापुढे हा पार थोटूक दिसत होता. खरंतर याच्या मुली मोठ्या गुणाच्या होत्या.
शाळेत चमकत होत्या. पण ह्याला शल्य स्वतःला मुलगा नसल्याचं...आणि मला तो असल्याचं!
एकदा मला फोनवर बोलताना ऐकलन त्याने. काही निमित्तानं कोल्हापूरला जाण्याचं बोलणं
चाललं होतं. ह्याचे लगेच सुरु झाले,
‘चला सर जाऊ या की.’
मला वाटलं मोठी आता
मोठी झाली होती, तिला काही साज वगैरे घ्यायचा असेल. पण कसचा साज आणि कसचं काय, त्याला कोल्हापूरला
जायचं होतं ते तिथे बैलाला झुली उत्तम मिळतात म्हणून.
तसं पाहिलं तर
त्याच्या येशूने त्याला काही कमी दिलं नव्हतं. एकुलता एक होता. घरची शेतीवाडी
होती. ती आईबापच करत असत. हा आपला असाच गोळा करून जगायला बाहेर पडल्यासारखा. आला
दिवस ढकलायचा. उद्याचे नियोजन नाही. ना पैशाचे, ना मुलाबाळांचे, ना कसले. ख्रिसमस उद्यावर आला की आज पीठ, मीठ शोधायला लागणार.
सतत कर्जबाजरी. माझ्याकडून, स्टाफकडून, पेशंटकडून, माझ्या मित्रांकडून कायम उचल
घेतलेली. मला मागताना तोरा असा की जणू त्याचे हक्काचे पैसे मी देत नाहीये.
त्याच्या सतत कुठल्या कुठल्या बँकांचे,
पतसंस्थांचे लोक याचा माग काढत माझ्या दारात. याचे पैसे कापून आम्हाला द्या हा
त्यांचा तगादा. सगळीकडे माझं नाव सांगितलेलं. लोकांनी, आहे यांच्याकडे कामाला तेंव्हा
देईल पैसे, या भावनेने पैसे दिलेले. मला विचारणे नाही की सांगणे नाही. कुणी दारात
विचारायला आलं म्हणून वरमणे नाही की शरमणे नाही. लोकं याला बोलबोल म्हणता पैसे
द्यायचे. एवढे कर्ज असून हा माणूस एके दिवशी गाडी घेऊन आला. सेकंड हँड. केवळ
मिठ्ठास बोलीवर त्याने ही कमाई केली होती.
त्याची ती बायबल छाप
भाषा दिवसेंदिवस अधिकाधिक बायबल छाप व्हायला लागली होती आणि हा अधिकाधिक
ख्रिस्तमय. रविवार तर त्याच्या हक्काचा सुट्टीचा दिवस ठरूनच गेला होता. बाकीचा
स्टाफ रविवारी आळीपाळीने ड्युट्या करत असे पण हा रविवारी माझी उपासना असते असं
सांगून कधीही फिरकायचा नाही. क्रुसावर टांगलेला येशू आधी त्याच्या खोलीतल्या
खिळ्यावर होता फक्त. आता तो दवाखान्यातल्या प्रत्येक खिळ्यावर टांगलेला दिसायला लागला.
प्रार्थनेला तर सुमारच राहिला नाही. तोंडात सतत जप, खिशात सतत जपमाळ, त्याच्या शब्दात
सांगायचं तर रोझरी. जरा हाताला काम नसेल की जपमाळ ओढणे सुरु. शिवाय कुणाशीही
बोलताना तोंडात सतत आशीर्वाद. तो ही
पुटपुटणे वगैरे भानगड नाही, अगदी खणखणीत आवाजात. सतत ‘देव तुझे भले करो!’, ‘देव
तुझे कल्याण करो’; देव यांव्व करो आणि त्यांव्व करो. देव ह्याचा आज्ञेत
असल्यासारखा याचा अविर्भाव. चेहऱ्यावरही भाव असा की आता यांनी सांगीतलंय ना,
म्हणजे करणारच देव भलं. त्याची काय टाप आहे, चक्रधराची आज्ञा मोडण्याची. तुम्ही मागा
अथवा नका मागू हा आपला ज्याला त्याला आशीर्वाद देत सुटायचा. साक्षात देव जरी
याच्या पुढे उभा राहिला असता, तरी याने त्यालाही, ‘देव तुझे भले करो’ असा आशीर्वाद
दिला असता.
बाळाला इंजेक्शन
दिले की चोळता चोळता हा म्हणणार, ‘देव ह्याची वेदना लगेच कमी करेल बघ. बघ माई,
तुझ्या लेकराला झटक्यात बरं वाटेल, तो पुन्हा पूर्वीसारखा हसू खेळू लागेल.’
एकदा एका बाळाला
आयसीयुत शिफ्ट केलं. मी आणि माझा आयसीयुतला मित्र लढत होतो, त्याला सलाईन लाव, ओटू
लाव, कसली कसली इंजक्शने दे, निरनिराळी मशीन्स जोड, तऱ्हेतऱ्हेच्या टेस्ट कर, रिपोर्टच्या मागे लाग, रिपोर्ट
आल्यावर त्यानुसार डोसेस बदल. बाळाच्या काळजाची धडधड कमी होत होती आणि आमच्या
काळजाची वाढत होती. त्याची जगण्याची आणि आमची त्याला जगवण्याची अथक धडपड चालू
होती. बाहेर नातेवाइकांचा गलबला वाढतच चालला होता आणि हा पठ्ठ्या; सुरवातीला मदत
केलीन त्यानी आणि मग अचानक नाहीसाच झाला. हे आजकाल त्याचं नेहमीचच झालं होतं. ऐन
वक्ताला हा गायब. सगळे सिनिअर झाले की असेच वागतात. त्याला पुन्हा बोलवायला
जायलाही आम्हाला उसंत नव्हती. त्याच्यावर चरफडत आम्ही आमचं काम सुरु ठेवलं.
ते मूल वाचलं. मी
आणि माझ्या मित्रांनी बऱ्याच हिकमतीनं त्याला स्टेबल केलं. हे सांगायला आम्ही
बाहेर आलो तो काय; चक्रधर बाहेर झाडाखाली
नातेवाईकांच्या घोळक्यापुढे बसून चक्क देवाची करुणा भाकत होता. गुडघे टेकून,
डोळे मिटून, आत्यंतिक श्रध्देनं आणि खड्या आवाजात ह्याचं सुरु होतं,
‘हे परमेश्वरा तुझी
दया आकाशाहून उंच आहे, तुझे सत्य ढगांपर्यंत पोचते.’ पहाता पहाता तो गायला लागला,
‘चित्ती प्रभूला
धरणे; प्रभूला आवडते ते आचरणे,
आपुले हित विस्मरणे,
परहित केवळ आपुले गणणे,
ही खरी प्रभूसेवा,
ही जनसेवा, मान्य ठरो ही देवा.’
बाळ
आता सुखरूप असल्याचे शुभवर्तमान कळताच त्या नातेवाईकांनी पाय धरले, पण आमचे नाही; चक्रधरचे.
सुरवातीला मी चक्रावून गेलो. पण मग लक्षात आलं की हतबल, निराधार, निराश,
परिस्थितीशरण नातेवाईकांना त्यानी अचानक एक आधार पुरवला होता. खरंतर हे सुद्धा
आम्हां डॉक्टरांचं काम, पण हे करायला आम्हाला फुरसद होती कुठे? नुसतंच डोक्याला
हात लावून चिंता करत बसण्यापेक्षा भजन करण्यानी बाळाच्या उपचारात सहभागी असल्याचा
फील दिला होता त्यानी, नातेवाईकांना. ओक्साबोक्शी रडणारी बाळाची माता, पिऊन आलेला पिता आणि अत्यवस्थ चिमुरड्याच्या पंधरा
वीस अस्वस्थ नातेवाईकांना त्यानी प्रार्थनेत
गुंगवून टाकले होते.
हळू हळू हे प्रकार
वाढतच गेले. दर रविवारी ह्याच्या बिऱ्हाडी येशूचा दरबारही भरू लागला. थोड्याच
दिवसात साऱ्या गावात गवगवा झाला. याच्यापाशी का कुणास पण ठाऊक लोकं मन मोकळं
करायची. अगदी खुलेपणानं बोलायची. मग हाही समस्यापूर्तीसाठी काहीबाही तोडगे
सांगायचा. लोकांची अडलीनडली कामं मार्गी लावायचा. त्याच्या ओळखी जबरदस्त. कुठल्या
सरकारी हापिसातून दस्त काढायचा असो की कुणाला कुठल्या परक्या गावात अचानक पै
पैशाची गरज पडो. हा सगळी जुळवाजुळव करून देणार. सरकारी दवाखान्यात पोस्ट मोर्टेम
करणारा मुजावर ह्याचा मित्र, माझाही प्रत्येक मित्र ह्याच्या खास ओळखीचा आणि राज्यपाल
आले उन्हाळ्यात महाबळेश्वरला; तर याला थेट राज्यपाल भेट घडली! ह्यांनी काढलेले
कुठलसं येशूचं चित्र त्यांनी ठेऊनही घेतलं. ह्याच्या बायकोचा कोणी लांबचा भाऊ
महाबळेश्वरला राजभवनवर खानसामा आहे. त्या भावाची बायको आणि राज्यपालांच्या पत्नी
गाववाल्या निघाल्या. मग काय हा गेला की चित्र घेऊन. आता जोरूच्या, गाववालीच्या,
नवऱ्याचा, भाऊ म्हटल्यावर, राज्यपालही
भेटले म्हणे त्याला आणि ते चित्रही ठेऊनही घेतलं. का? तर तेही सिरीअन ख्रिश्चन अन्
हाही सिरीयन ख्रिश्चन!! तेंव्हा ही तो
येशूची इच्छा.
एका वर्षी मला
ख्रिसमस इव्हला बोलावलन. एकूण त्याच्या बोलावण्याच्या पद्धतीतून हे निमंत्रण
मनापासून नाही हे कळतच होतं पण मी अगदी मनापासून गेलो. हा रहातो त्या खबदाडीत एक
चर्च आहे हे मला त्या दिवशीच कळलं. एकूणच त्या गिरीजाघराला नव्याने उर्जितावस्था
आल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ही देवाच्या ह्या चक्रधर नामे मेंढराचीच करामत
असावी. बऱ्याच वेळ प्रार्थना झाली. खच्चून गर्दी होती. मला आश्चर्य वाटलं. दानपेटीही
फिरवण्यात आली. मी खिशात हात घातला तर पाकीट नाही! नेमका बिन पाकिटाचा मी बाहेर
पडलेलो. आता काय करायचं या विवंचनेत असतानाच त्यानी ती पेटी माझ्यापर्यंत येऊच
दिली नाही. त्यानी माझी गोची ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही त्यांनी पेटी
माझ्यापर्यंत पोहोचायच्या आत माघारी वळवली होती. का? माझा पैसा त्याला नको होता
का? मन चिंती ते वैरी न चिंती, पण असंच काही तरी होतं. गेले वर्ष दोन वर्ष,
काहीतरी खदखदत होतं त्याच्या मनात. माझ्या विषयीच्या प्रेमादराची जागा आता आकस आणि असूयेनी घेतली
होती. ही मोठी विचित्र अवस्था होती. आपण ज्याला लहानाचा मोठा केला, शिकवला, तो
मुलगा असा एकदम घुमा, आपल्यापासून एकदम फटकून, वागायला लागला की कसंतरीच होतं नाही
का. स्वतःचा मुलगा असं वागला, तर त्याला खडसावून विचारता तरी येतं. हा तर कोण
कुठचा परका. पण त्याचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं, बिघडत चाललं होतं.
त्याला कामाबाबत
काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही. कोणी स्टाफनी त्याच्या विरुद्ध ब्र काढायचा
नाही, सगळ्यांनी ह्याला दबून रहायचं, अशी ह्याची सत्ता. सत्ता कसली मत्ताच ही. याचा
मला राग येत होता. पण रागावलं वगैरे तर तो आता खुशाल दुरुत्तरे करत होता. इतरांना
असं करायला चिथावणी देत होता. त्याच काय कुठे बिनसलं होतं, त्याला काय कुठे कमी
पडत होतं हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण तो असमाधानी होता, अस्वस्थ होता हे नक्की.
गुरुस्थानी असणारा मी आता त्याचा नंबर एकचा शत्रू असल्यासारखं झालं होतं. देव देव
करणं तर प्रचंड वाढलं होतं. त्याला दुसरं काही सुचेना दुसरं काही दिसेना. दहावी पास
असलो तर कुठल्याशा चर्चमध्ये काम मिळेल असं त्याला कळलं. मग त्यांनी हाच ध्यास
घेतला. कसाबसा नववी झाला होता तो. दहावीला बाहेरून बसायचं असं त्याच्या मनानी
घेतलं आणि त्यांनी जे पुस्तक हातात धरलं ते पाठ होईपर्यंत ठेवलंच नाही. सगळी
पुस्तके पाठ करणे ही त्याची अभ्यासाची स्टाईल. मराठी पाठ, इंग्रजी पाठ, इतिहास,
भूगोल इतकंच काय गणितेही पाठ केली होती त्यानी. मग काय दहावी सहज पास झाला तो. पास
झाला आणि एके दिवशी, ‘उद्या पासून मी कामावर येणार नाही!’ एवढे एकच वाक्य बोलून
निघून गेला. दहा वर्ष काम करून कुणी असं, ना सत्कार ना नमस्कार गेलं, की विचित्र
वाटणारच. मलाही वाटलं. पण क्षणभरच. तो गेला आणि मला एकदम सुटल्यासारखे वाटले.
सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारखा तो माझ्या मानगुटीवर बसला होता.
जाम सोडत नव्हता. दहा वर्ष तो होता हे बरोबर, पण त्यातली गेली काही वर्ष तो असून
नसल्यासारखाच होता. त्याच लक्ष कामात नव्हतंच. काहीतरी जगावेगळं करायचा त्याचा प्रयत्न होता असं जाणवायचं, पण
काय ते मला कधीच ओळखता आलं नाही.
तो गेला तो गेलाच.
आता तो गेल्यालाच
मुळी दहा बारा वर्ष झाली असतील. एके दिवशी
टीव्ही सुरु केला, अगदी सहज, तर चक्क
कोणतातरी धार्मिक चॅनेल लागलेला. मी पहातच राहिलो. तोच होता तो, चक्रधर. स्वारी
अगदी नटली होती; सूट, बूट, टाय. आता कोणी भलताच बडा ख्रिस्ती बुवा झाला होता.
येशूच्या कृपेने आपण दहावी, बारावी, पुढे चर्चच्या कॉलेजमधून धर्मशास्त्रात एम.ए.,
पी.एच.डी. झाल्याचं तो सांगत होता. डॉक्टरकी पर्यंतची आपली यशोगाथा मांडत होता. देवाने अनुग्रह
केल्याचे सांगत होता. त्यामुळेच दुखःमुक्तीची शक्ती प्राप्त झाल्याचं सांगत होता.
आता मुख्य कार्यक्रम
सुरु झाला. आजाऱ्याना रोगमुक्त करण्याचा. वेगवेगळे आजारी लोक स्टेजवर आणले जात होते.
हा हातवारे करत प्रार्थना ओरडत होता. त्यांच्या हातापायावर, छातीपोटावर, हात फिरवत
होता. त्यांना म्हणे तपासत होता. डोळे मिटून म्हणे त्यांच्या शरीरात डोकावत होता.
हवेत हात हलवून प्रार्थना म्हणून त्यांच्यावर इलाज करत होता. त्यांना तुम्ही आता रोगमुक्त झाल्याचं
सांगत होता. तेही तात्काळ आपण रोगमुक्तीची प्रचीती आल्याचं जाहीर करत होते.
तत्क्षणी जमाव जल्लोष करत होता. चक्रधर अगदी अखंड, भडाभडा बोलत होता. त्याला ते
सगळं पाठच असावं. जोरजोरात हातवारे करत तो माईकमध्ये ओरडत होता. भलताच त्वेषाने
आणि आवेशाने. तो बरळत होता. कॅमेरा आता गर्दीत शिरला. खच्चून गर्दी होती. सगळी
गर्दी भारावून ह्याची बडबड ऐकत होती. तो त्याची भंकस, भकत होता. भक्तगण, गणंग होऊन
त्याच्या आरड्याओरड्यात तल्लीन होत होते. त्याच्या इशाऱ्यासरशी हात काय हलवत होते,
बेभान नाचत काय होते, भेसूर ओरडत काय होते, बेसूर गात काय होते; अर्थात हे दृश्य
तर नेहेमीचंच होतं. कोणत्याही जमावाला असं एकच मन असतं, असं एकच शरीर असतं. असा एकच मेंदू असतो. इथेही सगळ्यांना
जणू एकच मन आणि एकच शरीर होतं आणि त्यांचा मेंदू होता डॉ. चक्रधर.
No comments:
Post a Comment