Showing posts with label दवाखाना. Show all posts
Showing posts with label दवाखाना. Show all posts

Wednesday, 26 September 2018

चक्रधर


चक्रधर
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
जिल्हा सातारा. पिन ४१२८०३.
मो.क्र. ९८२२०१०३४९


‘सर, साष्टांग नमस्कार!’ गाडीचे दार अदबीनं उघडून तो जरा वाकून उभा होता. तो माझ्या मित्राचा ड्रायव्हर. मित्रानी मला व्याख्यानाला बोलावलं होतं आणि माझ्या गाडीची काही गोची झाल्याने स्वतःची गाडी ड्रायव्हरही पाठवला होता. तो हा. सर्वप्रथम नजरेत भरली ती त्याची नसलेली उंची. अत्यंत ठेंगणा ठुसका होता तो. हात लांडे, पाय लांडे, मानही लांडी. डोकं जणू डायरेक्ट खांद्यालाच जोडलं होतं.  माझ्याकडेच काय सगळ्या जगाकडेच वर मान करून बघत होता. होता तरतरीत. छान शर्ट, पँण्ट, बूट, स्वेटर आणि हो त्यांनी चक्क टाय घातला होता. माझ्यापेक्षा तोच स्मार्ट दिसत होता. इतके सगळं नीटनेटकं असल्यामुळे की काय शाळेला बाहेर पडणाऱ्या मुलासारखा दिसत होता तो. दिसायलाही पोरगेलासाच होता. उत्साहही तेवढाच होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तरी होतं की नाही कुणास ठाऊक. पण आता मित्रानी पाठवलाय म्हटल्यावर मी काही विचारलं नाही.
‘सर, साष्टांग नमस्कार!’
‘आं!’
‘सर, साष्टांग नमस्कार. दंडवत सर.’
‘नमस्कार.’ माझा अस्फुट नमस्कार.
‘सर, साष्टांग नमस्कार!’ पुन्हा एकदा त्याचं शाब्दिक लोटांगण.
‘सर, आय अॅम ड्रायव्हर ऑफ युवर फ्रेंड.’ आता इंग्रजीत शिरला गडी. माझा लॅपटॉप चपळाईने मागच्या सीटवर ठेवत तो पुन्हा दाराशी आला, झुकला आणि म्हणाला,
‘माय नेम इज चक्रधर. प्लीज सिट इन कार, सर.’ मला जरा गंमत वाटली. मी गाडीत बसताच हा तुरुतुरु चालत टूणकन उडी मारून गाडीत बसला. गाडीत बसताक्षणी त्यानी गाडी अगदी सुसाट सोडली. आणि गाडीबरोबरच स्वतःही सुटला.
‘सर एक प्रश्न विचारू?’
‘हो, विचार की.’ मी आपला बेसावध. पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती.
‘सर, तुम्ही सुखी आहात?’
‘आं?’ अगदीच अनपेक्षित प्रश्न. मला आपलं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ आठवलं; ‘सुखी माणसाचा सदरा’ आठवला. मी काही उघडा नव्हतो, चांगला ‘आदिदास’चा टी शर्ट घालून होतो आणि  वर ब्लेझरही; म्हणजे नाहीच की मी सुखी. मला काय उत्तर द्यावे कळेना. पण अनोळखी  ड्रायव्हर माणसाला, ‘मी सुखी नाही’ हे मी कोणत्या तोंडाने सांगणार? शेवटी उलट प्रश्न विचारून मी कशीबशी सुरवात केली.
‘मी सुखी आहे का? आहे, बऱ्यापैकी आहे.’ ‘बऱ्यापैकी’ वर बऱ्यापैकी जोर देत मी म्हणालो.
हो, उगाच संपूर्ण सुखी आहे वगैरे सांगायला नको. एखादा असला माथेफिरू तर वाटेत निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून माझा खून-बीन करायचा. कुणाच्या मनात कोणता सैतान थैमान घालत असेल ते सांगता येत नाही.
‘सैतानाची हाकारे तुमच्या कर्णी न पडोत सर, तुम्ही संपन्न होवा.’
बापरे ह्याच्याही वाक्यात हा सैतान आला की. ह्याला कसं कळलं माझ्या मनातलं? मनकवडा दिसतोय.
‘सर, तुमच्या गाढवीस फुटू दे पान्हा!! जसा फुटला यहोबाच्या गाढवीस.’
क्काय? माझ्या गाढवीस फुटू दे पान्हा? पण माझ्याकडे गाढवी नाहीये आणि हा यहोबा कोण?  जाउ दे, असेल कोणी ह्याच्या रानातला देव. जास्त विचारलं तर हा अजूनच अंगात आल्यासारखं करेल म्हणून मी गप्प बसलो. पण एकुणात माणूस इंटरेस्टिंग वाटला. मूर्ती बटू, पण बोलण्याचा  उत्साह म्हणजे उंच उसळते कारंजेच जणू. गाडी चालवण्यासाठी सीटवर  उशी ठेऊन  तो उच्चासनावर बसला होता. शिवाय पाठीलाही एक टेकू होताच. त्याशिवाय त्याचे पायच नीट पोहोचले नसते. मी काही बोलत नाही म्हटल्यावर गाडीच्याच वेगाने त्यांनी बोलायला सुरवात केली.
‘सर, बऱ्यापैकी दुःखी असाल तर, करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा. म्हणजे तुम्ही व्हाल संपूर्ण सुखी. देव देखील हेवा करेल तुमचा. प्रभूचे कृपाछत्र नित्य तुमच्यावर राहो.’ पहिल्या दमात त्यांनी मला बऱ्यापैकी दु:खी ठरवून वर आशीर्वादही दिला होता. कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही, पण ह्या बैलोबाच्या आशीर्वादानी गाढवी तरी पान्हावते का हा प्रश्न मला छळत होता. पण ह्याचं बोलणं संपता संपेना. अखंडपणे तो बोलत होता. बरेचसे कुठले कुठले पाठ केलेले छापील पॅराग्राफ होते बहुतेक. त्यात व्याकरण, विशेषणे वगैरेबाबत आनंदच होता.
‘सर एखाद्या व्यक्तीच्या चेतनेवर शब्दांचा खूप मोठा प्रभाव असतो. विशेषतः जेंव्हा भगवंताकडे वळणे येते, तेंव्हा बऱ्याचदा म्हटले जाते की प्रार्थना नशीब आणि जीवन बदलू शकते. हे खरेच खरे आहे. हे ही खरे आहे की विश्वास ठेवणारा प्रार्थना मागतो. त्याला पहिजे असते एक अगदी मजबूत प्रार्थना. बरोबर ना सर?’
मी इतका मजबूत चक्रावलो होतो की अस्फुट आवाजात ‘बरोबर’ एवढं पुटपुटण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही. पण त्याची बडबड अखंडपणे चालू होती. मी पेंगत असल्यासारख केलं, चुळबुळ केली, गाडीतलं एक शिळं वर्तमानपत्र चाळलं, पण हा पठ्ठ्या थांबायचं नाव घेईना.
‘सर, बरेचदा भौतिक वस्तूंच्या विनंत्यांची चौकशी केली जाते. अखेरीस विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी त्याची आंतरिक, भौतिकपेक्षा जास्त महत्वाची असते.’
‘क्काय?’
‘सर समृद्धी, आंतरिक समृद्धी.’
‘हां, हो, बरोबर.’
‘सर लक्षात ठेवा, सर्वसाधारण सर्व काही सत्य आहे आणि अध्यात्मिक विकास पृथ्वीवरील उत्थित सुविधांवर स्थित आहे! माणसाला सुखासाठी काय हवं सर? एक, निरोगी अन्न; दोन, निरोगी झोप आणि तीन, निरोगी उबदार घर! या जटील उपक्रमात देवाला प्रार्थित करायचे विसरू नका सर; प्रार्थित करायचे विसरू नका; प्रार्थित करायचे कधीही विसरू नका.’ बऱ्याच वेळाने अखेर तो समेवर आला. शापबीप देऊन एक्झिट घेणाऱ्या पात्रासारखा तो तीनतीनदा एकच वाक्य म्हणत होता. मला वाटलं संपलं आता पण कसचं काय, अजून त्याचा मुद्दा संपला नव्हताच.
‘स्वतःच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना सामान्य आहे. परंतु सर्वच आत्म्यांची मोक्ष मिळण्याची विनंती प्राधान्य असावी. असे प्राधान्य देऊन तुम्ही लोकांवर प्रीती धारण करा सर, तुम्ही लोकांवर प्रीती धारण करा, प्रीती धारण करा.’ पुन्हा तिहाई.
हा इतका उपदेश एका दमात मी पहिल्यांदाच ऐकला. ऐकून ऐकून दमलो मी. पण ह्याची टकळी काही थांबायला तयार नाही.  मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये तोंड घातलं.
‘सर, एक सांगू?’
‘हं’ 
‘आयुष्य नावाची स्क्रीन जेंव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेंव्हा पॉवरबँक  बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.’ अचानक ध्यानीमनी नसता, त्यानी हे सुभाषित फेकलं. मी दचकलो.
‘क्काय?’
पुढे त्याने मैत्री या विषयावर मला अर्धा तास सुनावलं. मुक्कामी पोहोचेपर्यंत त्याने माझी पार हालत करून ठेवली. शेवटी मित्राकडे पोहोचलो तेंव्हाच हा गप्प झाला. तरीही गाडी पार्क करता करता त्याने एक सुभाषित डागलेच; ‘मातीचे मडके आणि मैत्री यांची किंमत फक्त बनवणाऱ्यांनाच माहिती असते सर, इतरांना नाही!’
पोचल्या पोचल्या मित्राचा प्रश्न,
काय आमच्या ड्रायव्हर सायबांनी त्रास नाही दिला?’
त्याच्या ड्रायव्हरनी मला कसा आणि किती छळला असणार याची त्याला पूर्ण कल्पना होती हे प्रश्नाच्या टोन वरूनच मी ताडले होते.
‘उपद्रव नाही पण उपदेश खूप दिला. जाऊ दे, ड्रायव्हरने मालकाला उपदेश करायची परंपरा महाभारतापासून चालत आली आहे! शेवटी ‘तो’ही चक्रधर आणि हाही चक्रधर.’ मी.
आम्ही दोघेही दिलखुलास हसलो. ‘चक्रधर’ही जरा ओशाळला पण हसला. हा मित्राचा ड्रायव्हर, वॉर्डबॉय, ब्रदर ई. ई. नवीनच लागला होता. चुणचुणीत होता.  दोनच आठवड्यात तो माझ्याकडे आला. अचानक. कामाला ठेऊन घ्या म्हणून. त्याला त्या मूळच्या गावात रहायचं नव्हतं. काही तरी भांडण झालं होतं. मित्राकडून एकदा खात्री केली आणि बडबड न करण्याच्या अटीवर मी त्याला ठेऊन घेतला. आला तो हरकाम्या म्हणून. पडेल ते काम करीन म्हणाला आणि दहा वर्ष अक्षरशः त्यांनी पडेल ते काम केलं. शिक्षण म्हणाल तर दहावी नापास, पण दवाखान्यातली बहुतेक सगळी कामं त्यानी हुशारीनं आत्मसात केली होती.
दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी फोनवरूनच त्यानी राउंड सांगितला.
‘सर, ती मांगाची बाई आहे न तिला रात्री उलटी झाली आणि ती कोल्हाट्याची  बाई, सलाईन लावलवतं ती, ती घरी जायला मागतेय.’
‘कोण कोल्हाट्याची बाई?’ नावापेक्षा किंवा आजारापेक्षा याला जात महत्वाची वाटत होती. ‘कोणाला डिस्चार्ज हवाय? ती लक्ष्मीबाई?’
‘ती नाय, ती तर कासाराची आहे...! ती कुडाळकर म्हणतोय मी, तिला डिस्चार्ज हवाय. आज शनीच्या पारावर तिला उपासना आहे.’
ही जातीनिहाय राउंड मी पहिल्यांदाच ऐकत होतो. पहिल्याच रात्री, पहिल्या फटक्यात त्याला पेशंटचा जाच आणि जात दोन्ही माहित झालं होतं.
‘बरं, ते मी आल्यावर बघून सांगतो. अरे पण  ते पंचपोर पेशंटचं बाळ कसं आहे? त्याला काल डीहायड्रेशन होतं.’
‘ते एकदम टकाटक आहे की. त्याची हगवण थांबलीय जणू. रातभर त्या लेकराला दिलं की साखर मीठ पाणी. त्याच्या आईनी त्याचा चांगला प्रतिपाळ केला.’
तरीच, या माणसाच्या बोलण्यात काही तरी वेगळं आहे, काही तरी वेगळं आहे, असं मला सारखं वाटायचं; पण काय ते आजवर लक्षात आलं नव्हतं. आत्ता अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याच्या भाषेत काही खास शब्द होते. लेकरू, उपासना, प्रतिपाळ. पण हे त्याने कुठून उचलले होते ते ह्याचा खुलासा पुढच्याच वाक्यात झाला.
‘त्यांचा सण आहे ना उद्या; त्याला डिस्चार्ज देऊ या सर. त्ये आमच्यातलेच ना?’
‘तुमच्यातले म्हणजे?’
‘म्हणजे किरीस्तांव!’
‘उद्या रविवार तर आहे’
‘म्हणूनच ना सर!’
‘म्हणजे?’
‘उद्या ‘झावळ्यांचा रविवार’ आहे सर. प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा दिल्या. ते म्हणाले प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! विजयी राजा घोड्यावर असे पण प्रभू गाढवाच्या शिंगरावर बसून आला. हे त्याच्या लीनतेचे प्रतिक आहे. या दिवसापासून आमचा पवित्र सप्ताह सुरु होतो. या आठवड्यात शुभ शुक्रवार, मौदी गुरुवार, इस्टर रविवार  आणि अंजीराचा सोमवार असे दिवस साजरे होतात. होसान्ना, होसान्ना, सर!’
‘काय?’
होसान्ना, होसान्ना.’
‘ते कळलं, पण म्हणजे काय?’
‘म्हणजे प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो.’ एवढं बोलून तो प्रवचनात शिरला

‘येशू आणि त्याचे शिष्य जेरूसलेमजवळच्या बेथांनी या गावी होते. त्यांनी बेथफागे गावातून याहोबाकडच्या पान्हावलेल्या  गाढवीचे शिंगरू आणले.’

‘अच्छा म्हणजे ‘तो’ यहोबा म्हणजे ‘हा’ याहोबा होय?’ अचानक मला पान्हा फुटलेल्या गाढवीचा  मालक याहोबा आठवला.
‘काय सर?’
‘काही नाही. मी राउंड घेतला की देईन डिस्चार्ज.’
त्याचं हे असलं बोलणं ऐकलं की मला हसूच यायचं. तो बोलायचा ती मायबोली नसून बाय(बल)बोली होती. देवाचा शब्द शब्दशः भाषांतरल्यामुळे गचाळ शब्दरचना सगळी. ‘आपण शिकलेला नाही पण वाचलेला आहे’, असं नेहमी  म्हणायचा तो. पण ते निव्वळ वाचन होतं व्यासंग नव्हता. एकांगी, ख्रिस्तमार्गी, उथळ वाचन. वाचन, पारायण आणि पाठांतर.
पण बुद्धिमान तर तो होताच त्याला संधी मिळाली नव्हती एवढंच. माझ्याकडे संधी मिळताच त्यांनी जे जे शक्य होतं ते कौशल्य आत्मसात केलं. आला ड्रायव्हर म्हणून, मग एक्सरे शिकला आणि एक्सरे काढायला लागला, लॅबमधलं काम शिकला आणि तिथे मदत करू लागला, ऑपरेशनला अॅसिस्ट करू लागला, एंडोस्कोप घेतला मी तर हा त्यातले  बारकावे शिकला. काम अगदी मनापासून करायचा तो. अगदी बिनचूक आणि  महत्वाचे म्हणजे झालीच जर चूक तर ती कबूल करायचा. एका वहीत आपली चूक लिहून ठेवायचा. हा बहुतेक खिश्चन संस्काराचा परिणाम. मला दर दोन तीन महिन्यांनी वही दाखवायचा, क्षमा मागायचा. आणखी शंका विचारून आणखी शिकवा म्हणायचा. कोणी पेशंटनी डॉ. चक्रधर अशी हाक मारली की मोहरून जायचा. स्वतःच्या पैशांनी हौसेनी त्यांनी स्थेथोस्कोप आणि थर्मामीटर घेतला होता. वेळीच शिकला असता तर खूप चांगला डॉक्टर झाला असता तो असं मला मनापासून वाटायचं.
लवकरच डॉक्टर जे करतात ते त्यानी केलं. आपलं हुनर वापरून एक नर्स पटवून लग्न केलं. कुटुंब नियोजन आणि गर्भपात याला याचा कडाडून विरोध. मुले म्हणजे देवाघरची देन वगैरे...! मग काय होणार? लग्न होताच चार वर्षात चार मुली झाल्या त्याला. पाठोपाठ. मुलीच्या बापाचा म्हणून जो काही परंपरागत चेहरा असतो, तो मुखवटा ह्याने कायम धारण केलेला. होणाऱ्या प्रत्येक मुलीगणिक मुखवटा घट्ट घट्ट बसत गेला.  सतत चेहेऱ्यावर चिंता, अजीजी, लाचारी, गुळचट बोलणे आणि काही हवं असेल तर  अगदी राग येईल इतका विनय. सतत आपल्याला काही फुकट मिळतय का याचा विचार. जुने कपडे, कागद, कप, जे मिळेल ते. जरा एखादी वस्तू बिनवापराची आहे असं लक्षात यायचा अवकाश, याची भुभूक्षित नजर पडलीच तिच्यावर. सुताच्या चटया, वेताच्या तट्या, प्लास्टिक पट्या काहीही चालायचं त्याला. वर विचारणार...
‘सर, लागणार नसेल ना?’
म्हणजे आपण ओळखायचं, की ‘घेऊन जाऊ का?’ असा प्रश्न आहे हा.
आपण, ‘हो, लागणार आहे’, असं म्हटलं की ‘जेंव्हा लागणार नसेल तेंव्हा सांगा. मी नेईन. मुलींना होईल.’ हे याचं ठरलेलं उत्तर. जे ते याला मुलींसाठी हवे असणार. कुठे बाहेर गेलो तर आपण काही खरेदी करणे म्हणजे चोरीच जणू. ह्याची आशाळभूत नजर सतत आपल्या पाठीवर वळवळत असल्यासारखी आपल्या मागेमागे फिरणार. सदैव असमाधानी अशी याची वृत्ती.
देवाच्या पुत्राला क्रुसावर चढताना झालं नसेल एवढं याचं पुत्रहीनतेचं दु:ख. त्यामुळे की काय, त्याच्या  गाईला गोऱ्हा झाला तर कोण कौतुक सांगायला लागला. एखाद्याने आपल्या पोराचे करावे तसे त्याच्या गोर्ह्याचं कौतुक चालायचं. त्याच्या डोक्यावर चंद्र आहे. तो चलाख आणि चंचल आहे. सुलक्षणी आहे. आज असा पळाला. आज एवढे खाल्ले. आज असा हिसडा दिला. आज गूळ खाल्ला. आज पायातल्या काट्याचा नायटा झाला. बेंदराला बेस्ट दिसत होता. आज फोटो काढला. ह्याच्या पाकिटात फोटो; पोरींचा नाही ह्याचा आणि त्या खोंडाचा. फोटोतल्या त्या तरण्याबांड वांड खोंडापुढे हा पार थोटूक दिसत होता. खरंतर याच्या मुली मोठ्या गुणाच्या होत्या. शाळेत चमकत होत्या. पण ह्याला शल्य स्वतःला मुलगा नसल्याचं...आणि मला तो असल्याचं! एकदा मला फोनवर बोलताना ऐकलन त्याने. काही निमित्तानं कोल्हापूरला जाण्याचं बोलणं चाललं होतं. ह्याचे लगेच सुरु झाले,
‘चला सर जाऊ या की.’
मला वाटलं मोठी आता मोठी झाली होती, तिला काही साज वगैरे घ्यायचा असेल.  पण कसचा साज आणि कसचं काय, त्याला कोल्हापूरला जायचं होतं ते तिथे बैलाला झुली उत्तम मिळतात म्हणून.
तसं पाहिलं तर त्याच्या येशूने त्याला काही कमी दिलं नव्हतं. एकुलता एक होता. घरची शेतीवाडी होती. ती आईबापच करत असत. हा आपला असाच गोळा करून जगायला बाहेर पडल्यासारखा. आला दिवस ढकलायचा. उद्याचे नियोजन नाही. ना पैशाचे, ना मुलाबाळांचे, ना कसले.  ख्रिसमस उद्यावर आला की आज पीठ, मीठ शोधायला लागणार. सतत कर्जबाजरी. माझ्याकडून, स्टाफकडून, पेशंटकडून, माझ्या मित्रांकडून कायम उचल घेतलेली. मला मागताना तोरा असा की जणू त्याचे हक्काचे पैसे मी देत नाहीये. त्याच्या  सतत कुठल्या कुठल्या बँकांचे, पतसंस्थांचे लोक याचा माग काढत माझ्या दारात. याचे पैसे कापून आम्हाला द्या हा त्यांचा तगादा. सगळीकडे माझं नाव सांगितलेलं. लोकांनी, आहे यांच्याकडे कामाला तेंव्हा देईल पैसे, या भावनेने पैसे दिलेले. मला विचारणे नाही की सांगणे नाही. कुणी दारात विचारायला आलं म्हणून वरमणे नाही की शरमणे नाही. लोकं याला बोलबोल म्हणता पैसे द्यायचे. एवढे कर्ज असून हा माणूस एके दिवशी गाडी घेऊन आला. सेकंड हँड. केवळ मिठ्ठास बोलीवर त्याने ही कमाई केली होती.
त्याची ती बायबल छाप भाषा दिवसेंदिवस अधिकाधिक बायबल छाप व्हायला लागली होती आणि हा अधिकाधिक ख्रिस्तमय. रविवार तर त्याच्या हक्काचा सुट्टीचा दिवस ठरूनच गेला होता. बाकीचा स्टाफ रविवारी आळीपाळीने ड्युट्या करत असे पण हा रविवारी माझी उपासना असते असं सांगून कधीही फिरकायचा नाही. क्रुसावर टांगलेला येशू आधी त्याच्या खोलीतल्या खिळ्यावर होता फक्त. आता तो दवाखान्यातल्या प्रत्येक खिळ्यावर टांगलेला दिसायला लागला. प्रार्थनेला तर सुमारच राहिला नाही. तोंडात सतत जप, खिशात सतत जपमाळ, त्याच्या शब्दात सांगायचं तर रोझरी. जरा हाताला काम नसेल की जपमाळ ओढणे सुरु. शिवाय कुणाशीही बोलताना  तोंडात सतत आशीर्वाद. तो ही पुटपुटणे वगैरे भानगड नाही, अगदी खणखणीत आवाजात. सतत ‘देव तुझे भले करो!’, ‘देव तुझे कल्याण करो’; देव यांव्व करो आणि त्यांव्व करो. देव ह्याचा आज्ञेत असल्यासारखा याचा अविर्भाव. चेहऱ्यावरही भाव असा की आता यांनी सांगीतलंय ना, म्हणजे करणारच देव भलं. त्याची काय टाप आहे, चक्रधराची आज्ञा मोडण्याची. तुम्ही मागा अथवा नका मागू हा आपला ज्याला त्याला आशीर्वाद देत सुटायचा. साक्षात देव जरी याच्या पुढे उभा राहिला असता, तरी याने त्यालाही, ‘देव तुझे भले करो’ असा आशीर्वाद दिला असता.
बाळाला इंजेक्शन दिले की चोळता चोळता हा म्हणणार, ‘देव ह्याची वेदना लगेच कमी करेल बघ. बघ माई, तुझ्या लेकराला झटक्यात बरं वाटेल, तो पुन्हा पूर्वीसारखा हसू खेळू लागेल.’
एकदा एका बाळाला आयसीयुत शिफ्ट केलं. मी आणि माझा आयसीयुतला मित्र लढत होतो, त्याला सलाईन लाव, ओटू लाव, कसली कसली इंजक्शने दे, निरनिराळी मशीन्स जोड, तऱ्हेतऱ्हेच्या  टेस्ट कर, रिपोर्टच्या मागे लाग, रिपोर्ट आल्यावर त्यानुसार डोसेस बदल. बाळाच्या काळजाची धडधड कमी होत होती आणि आमच्या काळजाची वाढत होती. त्याची जगण्याची आणि आमची त्याला जगवण्याची अथक धडपड चालू होती. बाहेर नातेवाइकांचा गलबला वाढतच चालला होता आणि हा पठ्ठ्या; सुरवातीला मदत केलीन त्यानी आणि मग अचानक नाहीसाच झाला. हे आजकाल त्याचं नेहमीचच झालं होतं. ऐन वक्ताला हा गायब. सगळे सिनिअर झाले की असेच वागतात. त्याला पुन्हा बोलवायला जायलाही आम्हाला उसंत नव्हती. त्याच्यावर चरफडत आम्ही आमचं काम सुरु ठेवलं.
ते मूल वाचलं. मी आणि माझ्या मित्रांनी बऱ्याच हिकमतीनं त्याला स्टेबल केलं. हे सांगायला आम्ही बाहेर आलो तो काय;  चक्रधर बाहेर झाडाखाली नातेवाईकांच्या  घोळक्यापुढे  बसून चक्क देवाची करुणा भाकत होता. गुडघे टेकून, डोळे मिटून, आत्यंतिक श्रध्देनं आणि खड्या आवाजात ह्याचं सुरु होतं,
‘हे परमेश्वरा तुझी दया आकाशाहून उंच आहे, तुझे सत्य ढगांपर्यंत पोचते.’ पहाता पहाता तो गायला लागला,
‘चित्ती प्रभूला धरणे; प्रभूला आवडते ते आचरणे,
आपुले हित विस्मरणे, परहित केवळ आपुले गणणे,
ही खरी प्रभूसेवा, ही जनसेवा, मान्य ठरो ही देवा.’
                  बाळ आता सुखरूप असल्याचे शुभवर्तमान कळताच त्या नातेवाईकांनी पाय धरले, पण आमचे नाही; चक्रधरचे. सुरवातीला मी चक्रावून गेलो. पण मग लक्षात आलं की हतबल, निराधार, निराश, परिस्थितीशरण नातेवाईकांना त्यानी अचानक एक आधार पुरवला होता. खरंतर हे सुद्धा आम्हां डॉक्टरांचं काम, पण हे करायला आम्हाला फुरसद होती कुठे? नुसतंच डोक्याला हात लावून चिंता करत बसण्यापेक्षा भजन करण्यानी बाळाच्या उपचारात सहभागी असल्याचा फील दिला होता त्यानी, नातेवाईकांना. ओक्साबोक्शी रडणारी बाळाची माता,  पिऊन आलेला पिता आणि अत्यवस्थ चिमुरड्याच्या पंधरा वीस अस्वस्थ नातेवाईकांना  त्यानी प्रार्थनेत गुंगवून टाकले होते.
हळू हळू हे प्रकार वाढतच गेले. दर रविवारी ह्याच्या  बिऱ्हाडी येशूचा दरबारही भरू लागला. थोड्याच दिवसात साऱ्या गावात गवगवा झाला. याच्यापाशी का कुणास पण ठाऊक लोकं मन मोकळं करायची. अगदी खुलेपणानं बोलायची. मग हाही समस्यापूर्तीसाठी काहीबाही तोडगे सांगायचा. लोकांची अडलीनडली कामं मार्गी लावायचा. त्याच्या ओळखी जबरदस्त. कुठल्या सरकारी हापिसातून दस्त काढायचा असो की कुणाला कुठल्या परक्या गावात अचानक पै पैशाची गरज पडो. हा सगळी जुळवाजुळव करून देणार. सरकारी दवाखान्यात पोस्ट मोर्टेम करणारा मुजावर ह्याचा मित्र, माझाही प्रत्येक मित्र ह्याच्या खास ओळखीचा आणि राज्यपाल आले उन्हाळ्यात महाबळेश्वरला; तर याला थेट राज्यपाल भेट घडली! ह्यांनी काढलेले कुठलसं येशूचं चित्र त्यांनी ठेऊनही घेतलं. ह्याच्या बायकोचा कोणी लांबचा भाऊ महाबळेश्वरला राजभवनवर खानसामा आहे. त्या भावाची बायको आणि राज्यपालांच्या पत्नी गाववाल्या निघाल्या. मग काय हा गेला की चित्र घेऊन. आता जोरूच्या, गाववालीच्या, नवऱ्याचा, भाऊ म्हटल्यावर,  राज्यपालही भेटले म्हणे त्याला आणि ते चित्रही ठेऊनही घेतलं. का? तर तेही सिरीअन ख्रिश्चन अन् हाही सिरीयन ख्रिश्चन!!  तेंव्हा ही तो येशूची इच्छा.
एका वर्षी मला ख्रिसमस इव्हला बोलावलन. एकूण त्याच्या बोलावण्याच्या पद्धतीतून हे निमंत्रण मनापासून नाही हे कळतच होतं पण मी अगदी मनापासून गेलो. हा रहातो त्या खबदाडीत एक चर्च आहे हे मला त्या दिवशीच कळलं. एकूणच त्या गिरीजाघराला नव्याने उर्जितावस्था आल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ही देवाच्या ह्या चक्रधर नामे मेंढराचीच करामत असावी. बऱ्याच वेळ प्रार्थना झाली. खच्चून गर्दी होती. मला आश्चर्य वाटलं. दानपेटीही फिरवण्यात आली. मी खिशात हात घातला तर पाकीट नाही! नेमका बिन पाकिटाचा मी बाहेर पडलेलो. आता काय करायचं या विवंचनेत असतानाच त्यानी ती पेटी माझ्यापर्यंत येऊच दिली नाही. त्यानी माझी गोची ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही त्यांनी पेटी माझ्यापर्यंत पोहोचायच्या आत माघारी वळवली होती. का? माझा पैसा त्याला नको होता का? मन चिंती ते वैरी न चिंती, पण असंच काही तरी होतं. गेले वर्ष दोन वर्ष, काहीतरी खदखदत होतं त्याच्या मनात. माझ्या विषयीच्या  प्रेमादराची जागा आता आकस आणि असूयेनी घेतली होती. ही मोठी विचित्र अवस्था होती. आपण ज्याला लहानाचा मोठा केला, शिकवला, तो मुलगा असा एकदम घुमा, आपल्यापासून एकदम फटकून, वागायला लागला की कसंतरीच होतं नाही का. स्वतःचा मुलगा असं वागला, तर त्याला खडसावून विचारता तरी येतं. हा तर कोण कुठचा परका. पण त्याचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं, बिघडत चाललं होतं.
त्याला कामाबाबत काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही. कोणी स्टाफनी त्याच्या विरुद्ध ब्र काढायचा नाही, सगळ्यांनी ह्याला दबून रहायचं, अशी ह्याची सत्ता. सत्ता कसली मत्ताच ही. याचा मला राग येत होता. पण रागावलं वगैरे तर तो आता खुशाल दुरुत्तरे करत होता. इतरांना असं करायला चिथावणी देत होता. त्याच काय कुठे बिनसलं होतं, त्याला काय कुठे कमी पडत होतं हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण तो असमाधानी होता, अस्वस्थ होता हे नक्की. गुरुस्थानी असणारा मी आता त्याचा नंबर एकचा शत्रू असल्यासारखं झालं होतं. देव देव करणं तर प्रचंड वाढलं होतं. त्याला दुसरं काही सुचेना दुसरं काही दिसेना. दहावी पास असलो तर कुठल्याशा चर्चमध्ये काम मिळेल असं त्याला कळलं. मग त्यांनी हाच ध्यास घेतला. कसाबसा नववी झाला होता तो. दहावीला बाहेरून बसायचं असं त्याच्या मनानी घेतलं आणि त्यांनी जे पुस्तक हातात धरलं ते पाठ होईपर्यंत ठेवलंच नाही. सगळी पुस्तके पाठ करणे ही त्याची अभ्यासाची स्टाईल. मराठी पाठ, इंग्रजी पाठ, इतिहास, भूगोल इतकंच काय गणितेही पाठ केली होती त्यानी. मग काय दहावी सहज पास झाला तो. पास झाला आणि एके दिवशी, ‘उद्या पासून मी कामावर येणार नाही!’ एवढे एकच वाक्य बोलून निघून गेला. दहा वर्ष काम करून कुणी असं, ना सत्कार ना नमस्कार गेलं, की विचित्र वाटणारच. मलाही वाटलं. पण क्षणभरच. तो गेला आणि मला एकदम सुटल्यासारखे वाटले. सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारखा तो माझ्या मानगुटीवर बसला होता. जाम सोडत नव्हता. दहा वर्ष तो होता हे बरोबर, पण त्यातली गेली काही वर्ष तो असून नसल्यासारखाच होता. त्याच लक्ष कामात नव्हतंच. काहीतरी जगावेगळं  करायचा त्याचा प्रयत्न होता असं जाणवायचं, पण काय ते मला कधीच ओळखता आलं नाही.
तो गेला तो गेलाच.
आता तो गेल्यालाच मुळी दहा बारा वर्ष झाली असतील. एके दिवशी  टीव्ही सुरु केला, अगदी सहज, तर चक्क कोणतातरी धार्मिक चॅनेल लागलेला. मी पहातच राहिलो. तोच होता तो, चक्रधर. स्वारी अगदी नटली होती; सूट, बूट, टाय. आता कोणी भलताच बडा ख्रिस्ती बुवा झाला होता. येशूच्या कृपेने आपण दहावी, बारावी, पुढे चर्चच्या कॉलेजमधून धर्मशास्त्रात एम.ए., पी.एच.डी. झाल्याचं तो सांगत होता. डॉक्टरकी पर्यंतची  आपली यशोगाथा मांडत होता. देवाने अनुग्रह केल्याचे सांगत होता. त्यामुळेच दुखःमुक्तीची शक्ती प्राप्त झाल्याचं सांगत होता.
आता मुख्य कार्यक्रम सुरु झाला. आजाऱ्याना रोगमुक्त करण्याचा. वेगवेगळे आजारी लोक स्टेजवर आणले जात होते. हा हातवारे करत प्रार्थना ओरडत होता. त्यांच्या हातापायावर, छातीपोटावर, हात फिरवत होता. त्यांना म्हणे तपासत होता. डोळे मिटून म्हणे त्यांच्या शरीरात डोकावत होता. हवेत हात हलवून प्रार्थना म्हणून त्यांच्यावर इलाज  करत होता. त्यांना तुम्ही आता रोगमुक्त झाल्याचं सांगत होता. तेही तात्काळ आपण रोगमुक्तीची प्रचीती आल्याचं जाहीर करत होते. तत्क्षणी जमाव जल्लोष करत होता. चक्रधर अगदी अखंड, भडाभडा बोलत होता. त्याला ते सगळं पाठच असावं. जोरजोरात हातवारे करत तो माईकमध्ये ओरडत होता. भलताच त्वेषाने आणि आवेशाने. तो बरळत होता. कॅमेरा आता गर्दीत शिरला. खच्चून गर्दी होती. सगळी गर्दी भारावून ह्याची बडबड ऐकत होती. तो त्याची भंकस, भकत होता. भक्तगण, गणंग होऊन त्याच्या आरड्याओरड्यात तल्लीन होत होते. त्याच्या इशाऱ्यासरशी हात काय हलवत होते, बेभान नाचत काय होते, भेसूर ओरडत काय होते, बेसूर गात काय होते; अर्थात हे दृश्य तर नेहेमीचंच होतं. कोणत्याही जमावाला असं एकच मन असतं,  असं एकच शरीर असतं. असा एकच मेंदू असतो. इथेही सगळ्यांना जणू एकच मन आणि एकच शरीर होतं आणि त्यांचा मेंदू होता डॉ. चक्रधर.




Friday, 10 June 2016

फादर टेरेसा

फादर टेरेसा
डॉ. शंतनू अभ्यंकर,वाई. सातारा. ४१२ ८०३.
या आणि अशाच shantanuabhyankar.blogspot.in हा माझा ब्लॉग जरूर वाचा.

त्या दवाखान्यात दोन प्रसिद्ध नर्सेस होत्या. एक होती मदर टेरेसा आणि एक होती फादर टेरेसा. नावाप्रमाणेच मदर टेरेसा सोज्वळ, प्रेमळ आणि लोकप्रिय होती आणि फादर टेरेसा होती खाष्ट आणि दुष्ट. मदर टेरेसा होती बुटकी, कृश आणि नाजूक तर फादर टेरेसा होती ऊंच, धिप्पाड आणि केसाळ. आवाज, वागणं, बोलणंही स्त्री सुलभ वगैरे नाही तर चक्क पुरुषी. नर्स कसली नरसोबाच तो… म्हणून ही फादर टेरेसा.

पैकी मदर टेरेसा ही मदर टेरेसा सारखीच असल्यामुळे तिच्या कहाणीत काहीच दम नाहीये. त्यामुळे तुम्हाला तीची कहाणी आवडणारही नाही आणि मी ती सांगणारही नाही.  सोज्वळ, सहृदय, पेशंट वर माया करणाऱ्या सिस्टरची कसली आलीय गोष्ट? या उलट फादर टेरेसा. हिचा लौकीक सर्वदूर पसरलेला होता. पेशंटला तर ही निव्वळ डोळे वटारूनच गप्प करायची. आम्हा ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टरना निव्वळ अनुल्लेखानी किंवा एकदोन तिरक्या शेऱ्यांनी ठार मारायची ती. अन्य सिस्टरांच्यात जिभेचा दांडपट्टा चालवून ती स्थान राखून होती आणि सिनिअर डॉक्टर भीक नको पण कुत्रं आवर या न्यायानी तीच्यापासून चार हात लांब असायचे. येणे प्रमाणे व्यूहरचना असल्यामुळे ती ज्या गायनॅक थिएटरची इन्चार्ज होती तिथे तिची अनिर्बंध सत्ता नसती तरच नवल.

पण तिचे अवगुण होते तसे गुणही होतेच होते. ती ड्युटीवर असेल तर अमुक एक गोष्ट मिळाली नाही असं कधीच व्हायचं नाही. तिच्या राज्यात प्रत्येक वस्तूला एक जागा होती आणि प्रत्येक जागेवर एक वस्तू. नजरेच्या एका कटाक्षात तिला कुठे काय नाहीये हे बरोब्बर समजायचं. मग ती वस्तू जागेवर येईपर्यंत हिचं आकांड तांडव सुरु. सर्जरीला असिस्ट करायला ही असेल तर मजाच मजा. निव्वळ हात पुढे करताच अपेक्षित इंस्ट्रुमेंट हातात हजर. प्रत्येक सर्जरीची प्रत्येक स्टेप हिला पाठ. त्यातले पाठभेदही पाठ. अमका सर्जन ही स्टेप कशी  करतो, तमका कशी करतो हे ही पाठ. शिवाय ऐन वेळी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या तिला माहित होत्या. ‘न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असाच तिचा तोरा. एका बाजूला आम्हा ज्युनीअर डॉक्टरना आमची जागा दाखवून देत देत, सिनिअरना छान मदत करायची ती. हात जलद, हालचाली झपाझप आणि त्याच बरोबर हेड-एंड कडे, भुलीच्या डॉक्टरांकडेही, ही लक्ष ठेऊन असायची. सलाईन संपलं, पेशंटचे डोळे उघडे आहेत त्यात ऑईंटमेंट टाका, ओटूचं (ऑक्सिजन) प्रेशर ढपलंय, अॅनॅस्थेशियाचा टॉपअप् डोस लागणार, अशा सूचना सुरु असायच्या. शिवाय कुठल्या थिएटर मध्ये कुठली केस घेतली आहे, पुढे कोणची घेणार, त्याची तयारी, ह्या वरही लक्ष. काही कमी पडलं तर कुणाच्या लक्षातही येणार नाही अशा, सुगृहिणीच्या सफाइनी, ती वस्तू हजर करणार. सगळं झाल्यावर दाणेदार अक्षरात सविस्तर नोंदी करणार. आमच्या अर्वाच्य अक्षरापुढे फादरचं सुवाच्य अक्षर फारच उठून दिसे. कधी एकाही सॅम्पलवर नाव चुकणार नाही की एकही नोंद चुकणार नाही.

कामाला वाघ होती ती. एकदा तिनी आणि मी मिळून एका रात्रीत पाठोपाठ अकरा सीझर केली. एकाही सीझरला एकही गोष्ट कमी पडली नाही. तिनी ते सगळं झाल्यावर पुन्हा सगळी स्वच्छता करून, धुवून, ड्रम लावून  दुसऱ्या दिवशीच्या दहा ऑपरेशनसाठी ट्रॉली लावून ठेवल्या. हे सगळं ‘मुली’ हाताशी नसताना.

‘मुली’ म्हणजे नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट मुली. ‘मुली’ ह्याच नावानी ह्या ओळखल्या जात. ‘मुली’ ह्या मुळी सर्व नर्सिंगकामाच्या आधारस्तंभ. एकदा ह्या मुली आल्या, की सर्व सिस्टर मंडळी सुटकेचा निश्वास सोडून शांतपणे रजिस्टर भरणे, डबा खाणे, स्वेटर विणणे वगैरे करण्यात मश्गुल व्हायच्या. ह्या मुलींना सुट्टी असली की मात्र सर्व कामं उरकता उरकता सिस्टर लोकांची पार कंबर मोडून जायची. या मुलींच्या येण्याजाण्यावर फादरची सक्त नजर असायची. वेळेआधी जायचं तर नाहीच पण जाण्याची तयारीही करायची नाही असा कडक नियम होता. स्वतः फादरही हा नियम पाळायची. डब्याची पिशवी घेणं, केस नीटनेटके करणं, काही काही अलाउड नव्हतं. एकदा अशाच एका मुलीला फादरनी ड्युटी संपायची वाट पहाताना पकडलं. रन काढायला तयारीत असलेल्या बॅट्समनसारखी, ही वॉर्डाच्या क्रिझवर  काट्या वर काटा यायची वाट पहात होती. तिला पाहून फादर तणतणू लागली.
‘काय गं, कुठे एवढं जायचं असतं लगाबगा? बारा नंतर जर्रा थांबलीस तर तुझं काय रूप बीप बदलतं की काय; त्या सिंड्रेला सारखं? बारानंतर काय चेटकीत रुपांतर होतं काय तुझं?’
हे ऐकताच सगळा वॉर्ड फिदीफिदी हसू लागला. पुढे तर या मुलीचं नावच सिंड्रेला पडलं.
     
इतरांना अशी नावं ठेवण्यातच फादरची हयात गेली होती. ‘कुंती’ हे ही असंच एक नाव. कुंती हा खास कोड वर्ड, अविवाहित पण गरोदर मुलीसाठी. कुंती म्हणजे फादर टेरेसाला पर्वणीच. तिथे अशा अडल्या मुली भरपूर. कारण सर्वकाही फुकट. त्यामुळे फादर टेरेसाला अनेकदा सेवेची संधी देणाऱ्याही अनेकजणी! वेळेत आल्या तर गर्भपात, नाहीतर अशा मुलींसाठी तिथे वसतीगृह होतं. तिथे राहून पुढे प्रसूती झाली की ह्या मुली आपआपली बाळं रीतसर तिथल्या अनाथाश्रमाला देऊन मोकळ्या मनानं, मोकळ्या शरीरानं घरी जाऊ शकत. अशी कुंती आली की,  तिच्या ह्या पापाबद्दल ही बाई त्या मुलीला अशी काही बोलायची, अशी काही बोलायची की विचारायची सोय नाही. काही वाक्य मात्र गंमतीशीर असायची... ‘अशी कशी गं तू? असे कसे आधीच दिवस जातात? आं? नेमकं करता काय तुम्ही?...’ बहुतेक जणी टेरेसाच्या बोलण्यानीच गर्भगळीत होत. आमचं औषध निव्वळ निमित्तमात्र. असल्या मुलींबद्दल फादर टेरेसाच्या मनात काडी इतकीही सहानुभूती नसायची. त्यांना हिडीस फिडीस करत, हाकलत हाकलत, शाब्दिक आणि शारीरिक फटकारे देत,   हीचं सगळ काम चालायचं. त्या मुलींना त्यांच्या पापाची शिक्षा देण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या शिरावर घ्यायची. आधीच अडचणीत असलेल्या ह्या अभागिनी हिच्या या दुखाःवरच्या डागण्या सहन न होऊन हमसाहमशी रडायच्या. मग तर हिला आणखीनच चेव यायचा. आपल्या औषधाची मात्रा बरोब्बर लागू पडली आहे असं तिला वाटायचं. अनीती, पाप, संस्कार, कलीयुग वगैरे शब्दांची हत्यार परजत ती पुन्हा पुन्हा हल्ला करायची. आधीच नामोहरम झालेल्या शत्रूला आणखी नामोहरम करायची. तिला यात प्रचंड सात्विक समाधान लाभायचं. अनीती, पाप, संस्कार, कलीयुग वगैरेचा प्रभाव, ‘परिस्थिती’ नामे आणखी एक घटक नियंत्रित करत असतो हे तिच्या गावीही नसायचं.  

स्वतःची वचकदार, कडक, हुकुमशाही प्रतिमा तिला अति प्रिय होती. परिस्थितीनुसार ही प्रतिमाही बदलायची; पण अगदी तात्पुरती. एकदा कोणी परदेशी पाहुणे व्हिजिटला आले. त्यांच्या पुढेपुढे करण्यात तिचा अख्खा दिवस गेला. एकदम, अचानक सुहासिनी, सुमधुरभाषीणीच झाली तिची. तिची ही रंगावृत्ती बघून आम्हाला खूप गंमत वाटली. त्या परदेशी बाई जाता जाता म्हणतात कशा,
‘सिस्टर यु आर सो मेलो, सो सॉफ्ट, इट इस डिफिक्ल्ट टू बिलीव्ह दॅट यू आर द नर्स इंचार्ज!’ (‘तुम्ही इतक्या गोड आहात की तुम्ही मुख्य सिस्टर आहात हे पटतच नाही!’)
हे आपलं कौतुक आहे हेच तिला कळलं नाही. सिस्टर म्हणजे कशी टेरर हवी हेच तिच्या डोक्यात.
‘नो,नो,नो...’ ती चवताळली, ‘आय अॅम व्हेरी स्ट्रिक्ट. नो नोंसेंस आय टॉलरेट. आय व्हेरी व्हेरी...’ पुढे तिला शब्द सापडेनात.

एकूणच भाषा या प्रकारानी फादरला बराच त्रास दिला होता. हिला शब्द कोड्याचा नाद होता आणि समर्थांच्या दासबोधाचा. दासबोधावरच्या काही परीक्षा द्यायची ती. पण दासबोध वाचूनही हिची शब्दसंपदा अगदी मर्यादितच होती. साधे सोपे शब्द हिला यायचे नाहीत. संध्याकाळी ‘संध्यानंद’ मधलं महा शब्दकोडं घेऊन फादर टेरेसा टेबलाशी ठाण मांडून बसलेली असे. मी आलो की तिची पृच्छा सुरु. “सssर, ‘क’ पासून सुरु होणारा आणि ‘ता’ नी संपणारा काव्य ह्या अर्थी शब्द कोणता?”

मधूनच तिला इंग्लिश शब्दकोडं सोडवायची सुरसुरी यायची. एकदा तर धमाल आणि कमाल दोन्ही झाली. ‘स्त्रीशी संबंधित आणि  ‘UNT’ नी शेवट होणारा, चार अक्षरी शब्द कोणता?’ हा तिचा सवाल होता. (अपेक्षित उत्तर होत ‘A’. AUNT) अश्लील आणि फाजील डोक्याच्या सर्व रेसिडेंट डॉक्टरांच्या मनात पहिलं उत्तर आलं ‘C’ (CUNT, स्त्री बाह्यांगासाठीचा हा अश्लील शब्द). पण आपण ‘C’ सुचवला तर पुढे ही त्याचा अर्थ विचारणार आणि मग काय सांगणार? या पेचात पडल्यामुळे जो तो तिला, ‘नाही येत’ असं सांगून कटवत होता. कटवत होता आणि गालातल्या गालात, पण खदाखदा हसत होता! फादरही आता इरेला पेटली. सगळ्या वॉर्डातून फिरून तिनी झाडून साऱ्या रेसिडेंटना करमणूक पुरवली.  इतक्यात तिकडून मदर टेरेसा आली आणि तिनी झटकन ‘A’ हा पर्याय सुचवून सगळी गंमत घालवली!

उत्साहाच्या भरात फादर टेरेसा असा दैदिप्यमान परफॉरर्मंस द्यायची की ज्याचं नाव ते. एकदा एका उत्तरप्रदेशी भैयीणीवरही तिनी असाच आपल्या हिंदी भाषेचा प्रयोग केला. ‘संडासला खडा होतो का?’ असं विचारण्यासाठी तिनी खणखणीत आवाजात, ‘संडास को खडा होता है क्या?’ असा खडा सवाल केला. ह्यावर त्या भैयीणीची चर्या ढळली. थोडं इकडे तिकडे बघत, खालच्या आवाजात ती म्हणते कशी, ‘नाsssही मैंडम, संडास तो हम बैठकेही करत हैं! संडास करते समय खडा होना तो ठीक नाsssही लागत!’ वर कसानुसा चेहरा करून तिनी फादरलाच खालच्या आवाजात सवाल केला, ‘आपकी क्या राय होगी?’

एके रात्री गंमतच झाली. जुलाब होतायत म्हणून राणी नलावडे नावाची पेशंट अॅडमिट झाली. झाली म्हणजे केली गेली. रात्रीचा अंमल सगळ्यांच्यावर चढला असल्यामुळे अंमळ घोळच झाला. रात्रभर सलाइनचा अभिषेक झाल्यामुळे सकाळी ताजीतवानी झालेली ‘राणी’ लेडीज वॉर्डच्या बाथरूम मध्ये चक्क घोटून घोटून दाढी करताना सापडली! तपासाअंती राणी नलावडे हा हिजडा लेडीज वॉर्डात अॅडमिट झाल्याचं निष्पन्न झालं. अॅडमिशनच्या वेळी फादर टेरेसा ड्युटीवर होती. पेशंट जेन्ट्स वॉर्डात पाठवा अशा नोंदी असूनही हिनीच उत्साहाच्या भरात तिला लेडीज वॉर्डात पाठवलं होतं. उलट डॉक्टरांचा ‘चर्खमू’पणा आता उघड करायला मिळेल म्हणून ही मनात मांडे खात होती. पण घात झाला.

एखाद्या बडया हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डातून पेशंट दुसऱ्या वॉर्डात जाणे ही एक मोठी प्रोसीजर असते. डॉक्टरच्या ऑर्डर, सिस्टरच्या ऑर्डर, दिले-घेतलेल्याचे हिशोब असं बरंच काही काही करावं लागतं. त्यातून डिलिव्हरीच्या पेशंटला ताप आला म्हणून तापाच्या वॉर्डात, किंवा तापाच्या बाईला डिलिव्हरीच्या कळा सुरु झाल्या म्हणून उलट, हे सहजशक्य आहे. पण लेडीज वॉर्डात रात्री बाई म्हणून अॅडमिट केलेलं माणूस सकाळी बाप्या म्हणून शिफ्ट करायचं हे म्हणजे आक्रीतच. प्रकरणाला हळूहळू भलताच रंग चढायला लागला. जेन्ट्स वॉर्डची सिस्टर म्हणाली, ‘डॉक्टरांची नोंद असल्याशिवाय मी नाही पेशंट इथे घेणार’. डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही तर आधीच जेन्ट्स वॉर्डला पाठवा असं लिहिलेलं आहे. आणखी वेगळी काय नोंद करणार? फादर टेरेसानीच काय ते लीहून द्यावं.’ फादर टेरेसाला काही म्हणायला वावच नव्हता.

इकडे लेडीज वॉर्डात राणीचे संडासात हेलपाटे सुरु होते. पण आता त्या संडासात जायला तिथल्या सर्व पेशंटनी नकार दिला! हे प्रकरण आता ह्याही दिशेनी तुंबू लागलं.

फादर टेरेसाला कोणी म्हणजे कोणीच मदत केली नाही. उलट अगदी गरीब बिचारी होई पर्यंत सगळ्यानी तिला ह्या प्रकरणी छळलं. हेड ऑफ द युनिट, हेड ऑफ द डिपार्टमेंट, हॉस्पिटल सुपरीटेंडेंट असं करत करत हे प्रकरण डीनपर्यंत गेलं. शेवटी आपल्या अधिकारात डीननी ‘राणी नलावडे’च्या लिंगात कागदोपत्री बदल केला आणि अखेर ती/तो जेन्ट्स वॉर्डात डेरेदाखल झाली/ला. जुलाबानी कोमेजलेला पण गुलाबी लुगड्यात गुंडाळलेला हा नरदेह पाहून आता जेन्टस् वॉर्डात धमाल उडाली. बेशुद्ध जेन्ट्स शुद्धीवर आले आणि शुद्धीतले बेशुद्ध पडले. राणीनंही मोठ्या टेचात, इथल्या पेक्षा तिथेच मला बरंSSS वाटत असल्याच जाहीर केलं.  शेवटी कालचा गोंधळ बरा होता हे लक्षात घेऊन, राणीचे जुलाब थांबले आहेत, आता बरं वाटत आहे, असं जाहीर करून तातडीनी डिस्चार्ज देण्यात आला.
           
    तिचा आगाऊपणा बरेचदा असा तिच्याच अंगाशी यायचा पण फादरनी कधी त्यापासून धडा घेतला नाही. घटनाही कशा सतारीच्या तारा जुळाव्यात तशा जुळून यायच्या. एकदा काय झालं, ऐन उन्ह्याळ्याचे दिवस होते. बाहेर ऊन मी म्हणत होतं. मात्र त्या अवाढव्य हॉस्पिटलमधली एक खोली मात्र गारेगार होती. तिथे नव्यानीच प्राणप्रतिष्ठा झालेलं सोनोग्राफीचं मशीन विराजमान होतं. नुकतेच हे अत्याधुनिक तंत्र शिकून आलेले एक ज्येष्ठ डॉक्टर तयारी करत होते.  पेशंटची ‘आतून’ म्हणजे योनीमार्गे तपासणी करायची होती. त्यानुसार निव्वळ चादर पांघरून तिला झोपवलं होतं. नव्या तंत्राबद्दल काहीही माहीत नसतानाही फादर टेरेसाची अखंड टकळी चालू होती.

आतून सोनोग्राफी करताना त्या सोनोग्राफीच्या प्रोबवर प्लास्टिकचं आवरण चढवणं आवश्यक असतं. असं स्वस्त, मस्त आणि एकदा वापरून फेकून देण्याजोगं आवरण, म्हणजे कंडोम. यामुळे प्रोब स्वच्छ रहातो, पुन्हा पुन्हा वापरता येतो. आता पितामह डॉक्टरनी खिशातून कंडोम काढला. उघडला. त्याचं ते आता नेमकं काय करणार याची काहीच कल्पना नसल्यामुळे फादर टेरेसा सर्द झाली. अंधार, ए.सी., कोपऱ्यातली शांत खोली, ‘तैयार’ असलेली पेशंट आणि शांतपणे खिशातून बाहेर येणारा कंडोम याची तिनी काय संगती जुळवायची ती जुळवली आणि पटकन बोलून गेली; ‘ह्याची काही गरज नाही डॉक्टर, तिनी कॉपर टी बसवलेली आहे!’ हे फादर-वचन ऐकताच पितामह जागच्याजागी थिजून गेले. हसावं का रडावं तेच कळेना त्यांना. या गुस्ताखी बद्दल फादरला नुसत्या नजरेनीच त्यांनी क्रुसावर चढवलं आणि संयमाची पराकाष्ठा करत शांतपणे तपासणी उरकली.
     
काही आजारांमध्ये पेशंटची तपासणी ही पेशंट खोकत असताना करायची असते. पोटातला दाब अचानक वाढला की काय होतं हे पहाणं हा हेतू. शौच्याच्या जागेत किंवा योनीमार्गात इंस्ट्रुमेंट टाकून, लाईट टाकून ही तपासणी चालते. एकदा अशीच एक तपासणी चालू होती. इंस्ट्रुमेंट इष्ट ठिकाणी घालून, लाईट लावून, खाली डॉक्टर सज्ज होते. वर फादर टेरेसाच्या सूचना चालू होत्या. त्या बाईंना,  ‘खोका’, असं सांगून झालं. पण बाई ढिम्म. विनवून झालं, पण बाई ढिम्म. खडसावून झालं, पण बाई ढिम्म. बोंबलून झालं; हेच सगळं हिंदीतून करून झालं, पण बाई ढिम्म त्या ढिम्मच. फादरनी शेवटी स्वतः खोकुन दाखवलं पण बाई ढिम्म. अनिमीष नजरेनी त्या बाई आपल्या फादरकडे बघताहेत. शेवटी फादरनी नीट समजावून सांगितलं... ‘अहो बाई, वरून जसं खोकता ना तसं खालून खोकायचं!’ पण बाई ढिम्म.

इतकं सगळं सांगूनही ही बाई काहीच ऐकत नाही हे सांगायला फादर तिच्या नातेवाईकांकडे तक्रार करायला गेली. तेंव्हा तिला त्यांनी शांतपणे सांगितलं,
‘ती ठार बहिरी  आहे!! काय सांगायचं ते खाणाखुणांनी सांगा.’
‘आता खालून खोका!’ ही सूचना फादर खाणाखुणानी कशी देणार ह्या कल्पनेनी आम्ही लोटपोट हसू लागलो.

अन्य जगप्रसिद्ध व्यक्तींच्या असतात तशा फादर टेरेसाच्या काही दंतकथाही प्रसृत होत्या. एकदा म्हणे तिनी तिच्या लहान मुलाला हॉस्पिटल दाखवायला म्हणून मोठया कौतुकानी आणलं. लॅबॉरेटरीत गेल्यावर तहान लागली म्हणून ह्या अवली चिरंजीवांनी तिथे असलेलं छोट्या डब्यांमधलं ‘पाणी’ पिलं. तेवढ्यात फादर टेरेसाचं तिकडे लक्ष गेलं. हे पोरगं चक्क पेशंटची ओळीनं मांडलेली युरीन सॅम्पल प्राशन करते झाले होते! एकच हलकल्लोळ उडाला फादर टेरेसा तर डोक्याला हात लावून मटकन खालीच बसली. आपल्या पोराला काही होईल ही काळजी त्यामागे नव्हती तर आता पेशंटला रिपोर्ट कसे द्यायचे ह्याचं तिला टेन्शन आलं होतं.

काही कॅन्सर मध्ये बेंबीशी गाठ येते. ह्याला सिस्टर मेरी नोड्यूल असं म्हणतात. डॉ. मेयो यांची असिस्टंट आणि इतरही बरंच काही असलेली ही सिस्टर मेरी. हिनी ह्या गाठीचा संबंध सर्वप्रथम लक्षात आणून दिला. त्यावर तिनी एक पेपरही लिहिला. त्या बरोबर तीचं नावही वैद्यकीच्या इतिहासात अजरामर झालं. असं काही तरी भव्य दिव्य करायची फादरला आस होती. पण कामाच्या रामरगाड्यात तिला ही आस कधी पुरी करता आली नाही. तिच्या परीनी ती नव्या नव्या योजना मांडायची पण डॉक्टर लोक बरेचदा ऐकलं न ऐकल्यासारखं करून तिला मार्गी लावायचे. तिची एक कल्पना मात्र प्रत्यक्षात आली. तिनी माता मार्गदर्शन वर्ग सुरु केले. नेटानी सुरु ठेवले.

डिस्चार्जच्या दिवशी ती सगळ्या बायकांना एकत्र बोलावून ब्रेस्ट फीडिंग बद्दल लांबलचक भाषण ठोकत असे. मुद्दे चांगलेच असत. ती करत होती ते चांगलंच होतं पण हे भाषणही समजावणीच्या सुरात नसायचं. हुकुम सोडल्या प्रमाणे ती भाषण करायची. मग प्रश्नोत्तरे व्हायची.

एकदा फादरच्या सुनेचीच डिलिव्हरी झाली. मग भाषण ठोकायला हिनी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनाच बोलावलं. तेही आले.
शेवटी सुनेनीच प्रश्न विचारला,
‘बाळाला अंगावर पाजताना खाण्यापिण्याचं काय काय पथ्य पाळावं? ’
‘काहीही पाळू नये.’ सरांचं थोडक्यात, नेमकं आणि पॉइंटशीर उत्तर! वर सरांनीच आता उलट प्रश्न केला,
‘जर काही कारणानी म्हशीचं दुध द्यावं लागलं तर म्ह्शीला काय स्पेशल पथ्यावर ठेवणार का तू?’
सून शांतपणे म्हणाली,
‘...पण सर, म्हशींना सासूबाई नसतात!!’

फादर टेरेसालाही कौटुंबिक दुखः होतीच. कधी कधी अगदी मनातलं भळाभळा बोलायची. एके दिवशी तीचं दुखः ती असंच मोकळं करत होती... कढ गळ्याशी दाटून येत होते... आवंढा गिळत ती म्हणते कशी, ‘आमच्या ह्यांचा एकच प्रॉब्लेम आहे,  माझ्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. तसं बघायला गेलं तर चांगले गुरांचे डॉक्टर आहेत!!!’

फादर टेरेसाची हयात इथेच गेली होती. आमच्या कित्येक शिक्षकांना तिनी ‘स्टुडंट-डेज  पासून टीचर-डेज’ पर्यंत बघितलं होतं. आता प्रोफेश्वरकी प्राप्त, अशा कित्येकांबरोबर,  हिनी नर्सिंगची विद्यार्थिनी असताना काम केलेलं. छेडछाड केलेली. त्यामुळे ही आपली सगळ्यांशी एकेरीतच बोलायची. आम्हा विद्यार्थ्यांना याचा भयंकर राग यायचा.  पण प्रोफेश्वर मंडळीही हे चालवून घ्यायची. जुने संबंध हे एक कारण आणि फादर टेरेसाला, कौन कितने पानी में हे ही बरोब्बर ठाऊक होतं हे आणखी एक कारण. कुणी वेळोवेळी ऑपरेशन मध्ये काय काय गोच्या केल्या, कुणाचं काय काय चुकलं, कोण कुणाशी भांडत होतं किंवा तंडत होतं, लफडी, कुलंगडी... ह्या सगळ्याचा सातबारा होता तिच्याकडे. त्यामुळे फादर टेरेसाला सगळे टरकून असायचे.

साक्षात आमच्या गुरुंना अरे तुरे आणि अगं तुगं करणारी, आमची पदोपदी मानहानी करणारी ही फादर टेरेसा रेसीडेंट लोकात भलतीच अप्रिय होती. ती रिटायर झाली त्या दिवशीच्या निरोप समारंभाला कोणी म्हणजे कोणीच गेलं नाही. चहा सामोसे असूनही नाही. चहा गार झाला. सामोसे कोमेजले. फादर टेरेसा काय समजायचं ते समजली.

फादर गेली आणि डिपार्टमेंटमधली जान गेली. निरोप समारंभावर बहिष्कार टाकून तिला शेवटी टांग घातल्याचं आम्हाला समाधान होतं आणि शेवटपर्यंत मोडेन पण वाकणार नाही या बाण्यानं काम केल्याचं तिला समाधान होतं. थोडक्यात काय विभक्त झाल्यावर दोन्ही पक्ष आपापल्या ठिकाणी सुखासमाधानानी नांदू लागले.


या आणि अशाच shantanuabhyankar.blogspot.in हा माझा ब्लॉग जरूर वाचा.