Saturday, 15 June 2019

आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!


आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!
भाषांतर डॉ. शंतनू अभ्यंकर
मूळ लेखक डॉ. प्रणव कोडीयाल.
प्रिय पेशंटचे हिंसक नातेवाईकहो,
मनःपूर्वक अभिनंदन. डॉ पारिबाह मुखोपाध्याय यांचावर यशस्वी हल्ला करून, देशातल्या सर्वात अकार्यक्षम जमातीविरुद्ध, डॉक्टरांविरुद्ध, पुकारलेल्या लढाईत,  तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. बस् एक पाउल आणि तुम्ही यशशिखरावर असाल.
छान! आज प्रथमच डॉक्टरांना जवळजवळ  देहांत प्रायश्चित्त देऊन, तुम्ही अगदी  कर्तृत्वाचा कळस गाठला आहे. मरणासन्न पेशंटला न वाचवल्याबद्दल ही शिक्षा रास्तच म्हणायची.
गेली काही दशके तुमच्या ह्या अव्याहत लढाईचा मीही एक साक्षीदार आहे.
सुरवातीला तुमच्या हाती फारसं काही लागलं नाही. शिवीगाळ, कोर्टबाजी इतकंच काय ते साधलं. पण तुम्ही चिकाटी सोडली नाही. हॉस्पिटल जाळ, खळ्ळखटॅक घडव, हे ही मग सहज जमायला लागलं. पण...पण हॉस्पिटलमधला स्टाफ मात्र बचावत होता.
पण तुम्ही मागे हटला नाहीत, धक्काबुक्की, कानशिलात लगावणे आणि पुढे पुढे तर बेदम मारहाणही जमू लागली की तुम्हाला. पण ह्यातही पुरतं समाधान नव्हतं. ते जखमी डॉक्टर लेकाचे बरेबिरे व्हायचे आणि पुन्हा मुकाट रुग्णसेवेला लागायचे.
पण गेल्या सोमवारी शेवटी तो सोनियाचा क्षण आला. एका नराधम डॉक्टरला तुम्ही शेवटी यमसदनाचे दर्शन घडवलेच.
नुकताच डॉ. झालेल्या परीबाहाची कवटी चांगलीच चेचलीत की तुम्ही. चांगला बशीभर पोचा आला कवटीला. मेंदूचाही चेंदामेंदा झाला असता, पण थोडक्यात बचावला. मेंदूही आणि परीबाहही. तो वाचला. तुमचेच नशिब फुटके, दुसरे काय. आचके देत देत मरणारा डॉक्टर बघायचं भाग्य थोडक्यात हुकलं.
असो. पुन्हा संधी येईलच की. पुढचा गनीम नक्कीच थेट यमसदनी.
...आणि हो चिंता नसावी. या आगळीकीबद्दल डॉक्टर वगळता कोsssणी तुम्हाला काsssही म्हणणार नाही. सारा देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. दशकानुदशके हे नालायक डॉक्टर सगळेच्या सगळे जीव वाचवण्यात घोर अपयशी ठरत आहेत आणि तुम्ही चरफडत बसलाय.
वर त्यांच्या ह्या निरुपयोगी उपचाराची फी भरताय तुम्ही. अहो पैसे मोजले की पाणीपुरीवालासुद्धा तुमच्या पसंतीची पाणी पुरी पुढ्यात ठेवतो. पण डॉक्टरांची शिरजोरी किती. कोणात प्राण फुंका म्हटले तर तेवढे सुद्धा करायला नको. माथी भडकतील नाही तर काय? पण आता थोडाच धीर धरा. आता विजय टप्प्यात आला आहे. एखाद्या डॉक्टरचा सर्वांसमक्ष जाहीर खून करूनही तुम्ही सहीसलामत सुटणार. दानव करो आणि असं होवो.
इथून पुढे सारं सोपंच तर आहे. गंभीर आजाऱ्याला दवाखान्यात नेतानाच बरोबर चार सशस्त्र गुंड घेऊनच जा. नाही वाचला पेशंट तर डॉक्टरचा तिथल्या तिथे शिरच्छेद केल्याचे तरी समाधान मिळेल. शिवाय आधी थोडे हालहाल करण्याचा पर्यायही आहेच.
काहीही कायदेशीर कारवाई होणार नाही. कायदा कागदारच आहे की आपल्याकडे. आजवर ह्या कारणे कोणाला शिक्षा झाली आहे; की ती तुम्हाला होईल? तेंव्हा चालू दे. आतासुद्धा पहालच तुम्ही डॉ. मुखोपाध्याय यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल कोणाही दोषीला जबर शिक्षा होणार नाही.
डॉक्टर मारल्याबद्दल मिडीयाही मूग गिळून बसेल. डॉक्टर कसे केसेस बिघडवतात, कसे पेशंट मारतात, त्यांना कसं नागवतात ह्याबद्दल लोकशिक्षण करण्यातच तर त्यांचा सगळा वेळ जातो.
आणि राजकरण्याची तर चिंताच सोडा. डॉक्टर म्हणजे गठ्ठा मते नाहीत, तुम्ही म्हणजे गठ्ठा मते. मिडियासमोर आणि डॉक्टरांच्या संघटनांसाठी चार सहानुभूतीचे शब्द ते पुटपुटतील आणि पुन्हा सारं कसं शांत शांत होईल.
समाजाचे काय घेऊन बसलाय राव? आजवर इतके हल्ले झाले; पण जनसामान्यांचा एक तरी मोर्चा? मोर्चा जाऊ दे, मान्यवरांकडून एक तरी दणदणीत निषेध? नाही.
उलट सोशल मिडियावर डॉक्टरांचे दुर्दैव साजरे करणारे मेसेज फिरायला लागतात. लुटारुंना बरी अद्दल घडली म्हणत फिदीफिदी हसतात.
पण मग डॉक्टरांचे काय? हॅ! त्यांना तर मुळीच भिक घालू नका. तारुण्याची सारी वर्ष आणि नंतरही बिच्चारे अभ्यासात घालवतात. ते बिचारे किरकोळ सेवाभावी जीव, तुमच्यासारखे बलवान आणि शूरवीर थोडेच आहेत ते? अरे ला कारे म्हणताना सुद्धा जीभ रेटत नाही त्यांची, ते हात कुठला उगारणार? तेंव्हा रान मोकळंच आहे.
शिवाय बेमुदत बंद ठेऊन डॉक्टर तुम्हाला वेठीस धरू शकत नाहीत. लगेच हृदयशून्य डॉक्टरांच्या संपामुळे अत्यवस्थ पेशंटचे व्हिडीओ फिरायला सुरवात. लगेच आपमतलबी डॉक्टर कसे आरोग्य व्यवस्था संपवू पहात आहे, म्हणत प्रशासन कण्हून दाखवणार.
आपल्या देशात रुग्णसेवेची गरज आहेच आहे पण डॉक्टर नसले तरी बिघडत नाही.
तेंव्हा चालू दे. संपूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवा. पहिला बळी आता होऊनच जाऊ दे. शिवाय हा नरमेध अखंड चालू रहाणार आहे. कारण कोणी ना कोणी, कधी ना कधी, मरणारच; आणि नवीन बळीचा डॉक्टर मिळणारच; आणि डॉक्टरला बलीवेदीवर चढवायला सारे उत्सुक आहेतच.


No comments:

Post a Comment