बायकांत पुरुष लांबोडा
डॉ. शंतनू अभ्यंकर
मी आहे ऑब्स्टेट्रीशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट, प्रसूती आणि
स्त्रीआरोग्यतज्ञ, म्हणजे बायकांचा डॉक्टर. प्रेमानी अशा डॉक्टरला ओबीजीवायएन् म्हणतात. मराठीत ‘गायनॅक’, ‘लेडीजचे डॉक्टर’, नुसतंच ‘लेडीज’ किंवा काही
महाभाग ‘आमच्या बायकोचे लेडीज’ असं सुद्धा म्हणतात हो! पुरुष आणि बायकांचा डॉक्टर
म्हटल्यावर बायका, आणि पुरुषही, जरा वेगळ्याच नजरेनी बघतात. मग मला ‘घरात
घरकोंबडा, बायकात पुरुष लांबोडा’, हा चिडवाचीडवीचा मंत्र आठवतो. मी विचार करतो का
बरे गायनॅक निवडले मी? नवीनच लग्न झालं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन कशात मिळणार ते अजून ठरायचं होतं, आम्ही गेलो महाबळेश्वरला. तिथे
शिरस्त्याप्रमाणे ज्योतिषी भेटले आणि माझ्या बायकोला सांगू लागले, ‘तुम्ही जपा,
यांना आयुष्यात बऱ्याच बायकांपासून बराच त्रास आहे.’ पुढे मी
गायनेकॉलॉजीस्ट झाल्यामुळे त्या
ज्योतिष्याची बत्तिशी शब्दश: खरी ठरली. बऱ्याच बायकांचा बराच त्रास मला सोसावा लागला.
आमच्या विभागाची बातच न्यारी. बाकी विभागात काम तसं
शांततेत चालते. आरडाओरडा करणारे पेशंट, इंजेक्शनच्या एका शॉटमध्ये गपगार होतात. हृदयविकाराच्या
तीव्र वेदनेने तळमळणारे मॉर्फीनच्या डोससरशी शांत पहुडतात. पॉयजन पिवून आलेले ‘पाम’
आणि ‘अॅट्रोपीन’ दिलं की गप होतात. वेडाचे झटकेवाले तर सिनेमात दाखवतात तसे इकडून
इंजेक्शन दिलं की लगेच तिकडून झोपी जातात. अतिरक्तस्रावाने अत्यवस्थ आणि अस्वस्थ
पेशंट चार सलाईन गेले की टकामका बघायला लागतात. पण प्रसूतीविभागाची बातच न्यारी.
इतरत्र डॉक्टर ‘थांबलं का दुखायचे?’ असं विचारतात इथे, ‘लागलं का दुखायला?’ असे
विचारतात!
एकेकाळी वैद्यकीत मेडिसिन आणि
सर्जरी अशी उभी फूट होती. आज हा फरक फुटकळ म्हणावा असा शिल्लक आहे. मेडिसिनवाले
म्हणजे निव्वळ औषध देणारे, फिजीशियन. ऑपरेशन करणारे ते सर्जन. निव्वळ औषध देऊन
पेशंट बरा करणे हे बुद्धीवैभव आणि सर्जरी म्हणजे हस्तलाघव. प्रत्यक्ष पोट फाडून
काय कोणीही पोटदुखी थांबवेल, पण निव्वळ दवा देऊन दुवा घेऊन जातो तो खरा. त्यामुळे
फिजिशियन मंडळी, सर्जन लोकांना दुर्जन समजायची. अजूनही समजतात. शिवाय औषधवाले या भूतलावर आधी अवतरलेले, सर्जन नंतर.
त्यामुळे औषधवाले सिनिअर. एके काळी सर्जरी
म्हणजे भेसूर आणि भयंकर प्रकार होता. इतका, की तेंव्हाचे पूर्वग्रह आजही ठसा ठेऊन
आहेत. आजही सिस्टर लोकांना शिकवतात, समजा फिजिशियन आणि सर्जन एकाच वेळी वॉर्डात
आले तर सिनिअर सिस्टरनी फिजिशियन बरोबर जायचं आणि ज्युनिअर सिस्टरनी सर्जन बरोबर! गायनॅक
शिकायचं तर तुम्ही फिजीशीयनही होता आणि सर्जनही होता. बुद्धीवैभव आणि हस्तलाघव
दोन्ही हवं इथे. शिवाय इथे एकाच वेळेला दोन जीवांची काळजी वहायची असते. हे ही वैद्यक शास्त्रात अनन्य असं. असं काय काय वाटत
होते, म्हणून मी गायनकॉलॉजी निवडलं.
पास झालो आणि प्रॅक्टीसमध्ये
पडलो. थोड्याच दिवसात जोरात चालायला लागली की प्रॅक्टीस. दिसामासांनी वाढायला
लागली म्हणा ना. नवीन प्रॅक्टिस सुरु करणाऱ्या गायनॅकॉलॉजीस्टला उदार आश्रय
देण्याचे काम सहसा भानगडीतली जोडपी करत असतात. दिवस राहिले की गुपचूप गर्भपात
करण्याचा प्रश्न येतो. नव्या दवाखान्यात तसा शुकशुकाट असतो, त्यामुळे आपले काम बिनबोभाटपणे
उरकणे त्यांना सोयीचे जाते. शिवाय पैसेही माफक घेतले जातात. मग पुढे कोणी ओळखीतले
लोक येतात, मग त्यांच्या ओळखीपाळखीनी कोणी येतात...पण जसजसं डॉक्टरचं वय वाढतं तसं
पेशंटचं सरासरी वयसुद्धा वाढतं. तरण्याताठया
डॉक्टरकडे थेट पिशवी काढायला सहसा कोणी येत नाही.
आधी डिलिव्हरीला आलेल्या बायका, मूल बंद करायच्या ऑपरेशनसाठी येतात. पुढे त्यांचं
वय वाढलं की पाळी संबंधी तक्रारी घेऊन येतात, मेनोपॉजच्या तक्रारी घेऊन येतात,
पिशवी काढायला येतात. मग लेकी-सुनांना घेऊन
येतात, जावा-भावजयांना घेऊन येतात. पेशंटचे आणि डॉक्टरांचे केस
एकत्रच पांढरे होतात. दोघांचे असे भावबंध जुळलेले असतात. गर्भभाराने मुसमुसलेल्या
कोणा नवयौवनेची आई सांगते, ‘अहो, हिची डिलिव्हरी तुमच्याच
हातची!’ तेंव्हा मोहरून जायला होतं.
बायका आपल्या अत्यंत खाजगी प्रश्नांसाठी एका
परपुरुषाकडे मोठ्या विश्वासाने येतात, याचं अप्रूप वाटते अनेकांना. मलाही वाटायचं. मग लक्षात आले की पुरुष प्रधानतेमुळे एकूणच प्रसूती, ऑपरेशन
अशा जोखमीच्या कामात पुरुषांवर अधिक विश्वास ठेवला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीचा
म्हणा किंवा पूर्वसुरीच्या विश्वासार्हतेचा म्हणा, फायदा होतो मला. शिवाय
महाराष्ट्राला डॉ.बी.एन.पुरंदरे, डॉ.व्ही.एन.शिरोडकर, डॉ.ए.व्ही.उमराणीकर अशा
पुरुष स्त्रीआरोग्यतज्ञांची एक लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आदरणीय परंपरा आहे. त्या
परंपरेचा मी पाईक. पण या परंपरेचा प्रभाव बराचसा पश्चिम महाराष्ट्रापुरताच सीमित
आहे. विदर्भ मराठवाड्यात सारे स्त्रीराज्य. एखादा पुरुष सापडणार, तोंडी
लावण्यापुरता. काही ठिकाणी तर पुरुष डॉक्टर बायकोच्या किंवा इतर बायकांच्या
दवाखानो-दवाखानी जाऊन ऑपरेशन करून देतात. स्वतःचा दवाखाना काढतच नाहीत.
पुरुष स्त्रीआरोग्यतज्ञ
म्हणून भलतेच जबाबदारीने वागावे लागते. वागण्याबोलण्यावर बऱ्याच मर्यादा येतात. बाई
डॉक्टरांचे बरे असते, ‘अय्या, साडी काय छान आहे!’ किंवा ‘ड्रेसवरचं तूच भरलंस का?’
असे विचारून थेट पेशंटच्या काळजाला हात घालता येतो. पण हेच आम्ही म्हटलं तर? साडी
खरंचच छान असते, एम्ब्रॉयडरी सुबक असते पण बोलण्याची चोरी! चार लोकांत कमरेखालचे
विनोद सांगणे तर सोडाच, जोरजोरात हसून दाद देणेही मुश्कील. सारखी मनात भीती, की
लोकांना काय वाटेल? अरेच्च्या, हा आपल्या बायको-मुलीबद्दल असाच विचार तर नसेल करत?
त्यामुळे अत्यंत घट्ट मित्रांच्या मैफलीतही मोजून मापून बोलावं लागतं. अपवाद फक्त
डॉक्टर मित्रांच्या टोळक्यांचा. अर्थात कमी अधिक प्रमाणात सर्वच डॉक्टरना हे पथ्य
पाळावं लागतं. त्यामुळेच डॉक्टर लोक निव्वळ डॉक्टर लोकांच्या पार्टीत अधिक खुलतात.
एकदा एका मित्राच्या
दुकानात जायचा प्रसंग आला. दुकान कसलं तर स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचं. कसली
कसली कापडं होती त्याच्या दुकानात. अगदी लांडीलुटकी, तलम, पारदर्शक. नाईटसूट्स
होते, स्विमसूट्स होते आणि काय काय होतं...! कामाला बऱ्याचशा सेल्सगर्ल्स आणि एकच सेल्समन. पण हा जो मॅन होता
तो सगळ्यात जास्त कमिशन मिळवायचा. सगळ्यात जास्त माल खपवायचा. पण त्या कपड्यांइतकच
ह्याच बोलणेही तलम, मुलायम; चेहरा आणि वृत्ती पारदर्शी. चेहऱ्यावरची रेषही ढळू न
देता हा एक एक कपडा दाखवायचा. ती झुळझुळीत वस्त्र आपल्या अंगावर कशी दिसतील ह्या
कल्पनेत गिऱ्हाईक मश्गुल असायचं, मग तो त्यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी घालायचा. ‘हा
गाऊन शोभून दिसेल तुम्हाला’, असं बिनधास्तपणे सुचवायचा. पण त्याच्या बोलण्यात
नाजाकतच अशी होती की समोरच्या बाईला आणि
असलाच तर तिच्या नवऱ्याला काहीही वावगं वाटायचं नाही. स्त्रीआरोग्यतज्ञ पुरुषांना
ही कला अंगी बाणवावी लागते.
क्वचित कोणी पेशंट येते आणि
सगळ्या तक्रारी वगैरे सांगून झाल्यावर तपासणीला बिचकते, ‘लेडीज डॉक्टर नाहीत का?’
असा प्रश्न येतो. किंवा ‘तपासणी नको, तुम्ही तशीच ट्रिटमेंट द्या’, अशी मागणी
होते. शक्य असेल तेंव्हा कोणी असिस्टंट बाई पेशंट तपासतात आणि हे शक्य नसेल तर मी
ठामपणे आणि नम्रपणे नकार देतो. ‘लेडीज’ डॉक्टरसाठी अन्यत्र जायला सांगतो पण आवश्यक
ती तपासणी न करता कधीच, कोणालाच, कोणतेच औषध देत नाही.
हळू हळू ऋणानुबंध जुळत
जातात. बोलण्यात वागण्यात मोकळेपणा येतो. कधी कळवळून कोणी, ‘नवऱ्याला चार दिवस
‘लांब रहायला’ सांगा हो, मला आताशा खूप त्रास होतो’, असं विनवते. कधी ‘पुढच्यावेळी
मी ह्यांना घेऊन येते. तेवढं दारूचं सांगा हो त्यांना. सारखे पीत बसतात. तुम्ही
सांगितलं की ऐकतील’, अशी भाबडी अपेक्षा येते. वर, ‘मी सांगितलंय असं सांगू नका
हं.’ अशी अट तर असतेच असते. शिवाय कमरेवरचा प्रत्येक काळानिळा
डाग खुर्चीची कड लागल्याने उमटत नाही, प्रत्येक चटका काही तव्यामुळे बसलेला नसतो,
मनगटावरचा प्रत्येक ओरखडा बांगडी फुटल्याने उठत नसतो आणि प्रत्येक वेळी बांगडी
काही काम करतानाच फुटते असं नाही; हे आता मला सवयीनी लक्षात येऊ लागलं आहे. नुसतं
‘काय होतंय?’ ह्या प्रश्नानी पेशंटचे डोळे भरून येतात. मी ओळखतो ज्यांनी करायला
हवी, त्यांनी अशी साधी चौकशीही केलेली नसते. एक हतबलता ग्रासून टाकते मला.
काही मजेदार संवादही
झडतात...
‘डॉक्टर हा पहा, ओळखलत का
याला?’ शेजारच्या शेंबड्या, नखं खाणाऱ्या, चुळबुळ्या, बावळट्ट कार्ट्याकडे बोट दाखवत कोणी विचारतं. अर्थातच मी
त्याला कसा ओळखणार? मी आपला मान डोलावतो. ‘अहो तुमच्यामुळेच झालाय हा!!
ह्याच्याकडे बघीतलं ना की रोज मला तुमची आठवण येते. थँक्यू हां डॉक्टर’ माझा हा
कृतज्ञतापूर्वक उल्लेख ऐकून मी भांबावतो.
कोणी बाई रंगात येऊन आपल्या
तक्रारींचा पाढा वाचत असते, अचानक खाजगी सूर लागतो आणि ‘अहो ते आपल्याला पांढरं
नाही का जाsssत, तस्सं होतंय मला!’ ती बाई खुसफुसते.
‘आपल्याला’ म्हटल्यावर मी दचकतो पण तिला जाणवू न देता. चेहरा कोरा ठेऊन माझं काम
चालू रहातं.
एकीला बरं वाटलं की ती दुसरीला घेऊन येते. तिचा
आजार माझ्याशी, म्हणजे माझ्या स्पेश्यालिटीशी संबंधित असतोच असं नाही. पण अपेक्षा
मात्र मी तपासावी अशी असते. मग मी म्हणतो, ‘हे बघा, गुडघ्याच्यावर आणि बेंबीच्या खाली
एवढ्याच भागातलं कळतं मला. बाकी टाच
दुखते, छातीत धडधड होते वगैरे मी तपासत नाही.’ किंवा सांगतो, ‘अहो आमचं साडीचं
दुकान आहे आणि तुम्ही मटणाचा भाव विचारताय!’ हसत हसत मग पेशंट माझा निरोप घेतात.
अशीच एक नवयौवना, नवपरिणीता,
माझ्याकडे दाखवायला म्हणून सासू हौसेनी घेऊन आली. सासूबाईंनी लगालगा पुढे येऊन तीचं
नावबीव सांगून पेपरबिपर काढला. सिस्टरना सगळ्या तक्रारी सविस्तर सांगितल्या आणि
नंबर येताच दाराशी आपल्या सुनेसह त्या उभ्या दिसल्या मला. सासूबाई माझ्याच पेशंट, अगदी उत्तम परिचयाच्या.
त्यांच्या इतर लेकी, सुना, बहिणी, विहिणी ह्याही माझ्या पेशंट. किरकोळ तक्रार
असेलही पण मुख्य हेतू डॉक्टरना नवीन सून दाखवणे हाच असणार हेही मी लगेचच ओळखलं. पण
गुबगुबीत, झुलत्या खुर्चीवर मला पाहताच सून बावचळली. तिथल्या तिथेच खिळून
राहिली. ती काही जागची हलेचना. त्यांनी टोकताच ती पुटपुटली, ‘मैने नैच्च तपास्नेका!
डागदर तो मरद है!’ यावर त्या सासुबाईंनी रीतसर समजूत घालताना काय
म्हणावं? खणखणीत आवाजात दारातूनच सासूबाई गरजल्या, ‘अरीsss येsss? ये कहां मरद है
भलाsss;’ क्षणात बाहेर सन्नाटा पसरला आणि मग बाहेरच्या बाकांवर दाबलेलं हसू फसफसू
लागलं. मी अस्वस्थ झालो. सावकाशपणे सासूबाईंनी वाक्य पुरं केलं, ‘अरीsss, ये कहां
मरद है भलाsss? ये तो डागदर है, इन्कू क्या शर्माना?’
इतक्या वर्षानंतर काही
विपरीत अनुभवही गाठीशी आहेत. एकदा एक बाई स्तनातल्या नसलेल्या गाठीबद्दल तक्रार
घेऊन वारंवार यायला लागल्या. शेजारच्या बाईला ब्रेस्ट कँसर झालाय म्हणून ह्यांना
संशयपिशाच्चाने पछाडलेले. निदान तसं त्या सांगत तरी होत्या. तपासून सारं काही
नॉर्मल आहे हे सांगूनही त्या तिसऱ्यांदा हजर! मग मी काय समजायचे ते समजलो. त्यांची
ही तपासणीची हौस मला महागात पडली असती. सिस्टरकरवी त्यांची तपासणी करून, जरा
दरडावून, त्यांना कटा म्हणून सांगितलं, तर त्यांनी भलताच सूर लावला. आरोप सुरू
केले, डंबाजी सुरू केली. शेवटी सीसीटीव्हीच्या हजेरीची जाणीव करून देताच त्या ज्या
गेल्या त्या पुन्हा फिरकल्या नाहीत. असं काही वाट्याला आलं की एक पुरुष स्त्रीआरोग्य
तज्ञ म्हणून तुम्ही किती हतबल आहात, असुक्षित आहात, हे लक्षात येतं. पण त्याच वेळी स्त्रियांना अशा प्रसंगांना वेळोवेळी सामोरं जावं असणार अशी विषण्ण
जाणीवही होते. एखाद्या छोट्याश्या खोट्या आरोपानेही
तुमचं कसं क्षणात वाट्टोळ होऊ शकतं, हे लक्षात येतं. बदनामीची टांगती तलवार सर्वच
डॉक्टरवर सतत असतेच पण अशा प्रसंगात त्या तलवारीची लखलख डोळे दिपवते. त्यामुळे
शेजारी सिस्टर हजर असल्याशिवाय पेशंट तपासतच नाही आम्ही.
स्त्री आरोग्य तज्ञ जरी असलो तरी पुरुषांची संबंध येतोच. मुख्यत्वे
नवरे मंडळींशी. बायकोसाठी रक्तदान करा म्हटलं की अंतर्धान पावणारे, मुलगी झाली म्हणून
दवाखान्याकडे अजिबात न फिरकणारे, संभोग हा शक्तीचा आणि सक्तीचा प्रयोग मानणारे नवरे
माहीत आहेतच आपल्याला. पण बायकोचा कवितासंग्रह
वणवण करत खपवणारे, तिच्यापेक्षा उत्साहानी साडीखरेदीसाठी दिवस दिवस न्यौच्छावर करणारे,
रोज साडीच्या निऱ्या काढून वर मॅचिंग पिना शोधून देणारे, मालकीणबाईंची नियमित बोलणी खाणारेही
मालक असतात. काही काळजी घेणारे
असतात तसे काही काळजी करणारे असतात. बायकोला काहीही जरी झालं तरी हे प्रचंड
चिंतेत पडतात. असाच एका काळजीवाहू नवरा, ‘हिची
डाव्या पायाची करंगळी हुळहुळल्यासारखी होतेय की काय, असं वाटतंय’, अशी तक्रार घेऊन
आला होता. ‘मलाही औषध दिल्यासारखं करावं की काय, असं वाटतंय’, असं म्हणत मी त्याला
उलट टपाली परत पाठवला होता.
स्त्री आरोग्यतज्ञ आणि
पुरुष असल्याचा काही फायदाही होतो. मूल न
होणाऱ्या जोडप्यातील पुरुषाची तपासणी सहज करता येते. कोणीही बाई कितीही शिकलेली
असली आणि कोणीही पुरुष कितीही समजूतदार असला, तरी बाईकडून पुरुष आपली शारीरिक
तपासणी करून घेणे अशक्य. आम्हाला मात्र हे सहज शक्य होतं. एवढंच काय पुरुष
आमच्याशी मनमोकळेपणानी बोलतात. बायकोबद्दलच्या तक्रारी सांगतात.
अर्थात बायकाही काही कमी
नसतात. डॉक्टरपुढे सुतासारख्या सरळ असणाऱ्या बायकांना घरी जाताच काय काय व्हायला
लागतं. यात ‘कसंसच होणं’ हा सर्वात कॉमन आजार. अजूनही भल्या भल्या धन्वंतरींना
याचे निदान झालेले नाही. मग पुढच्या वेळी नवरा माझ्या समोरच बायकोला म्हणतो, ‘तुला
काय होतंय ते आत्ताच सांग. मग पुन्हा घरी
गेल्यावर तुझी...’ वाक्य पुरे होण्याच्या आत ती फणकाऱ्यानी निघून जाते. हा
पुटपुटतो, ‘साला बायको आहे का सायको काही कळतच नाहीये.’ गगनभेदी हसत जोरदार टाळी
द्यायची उर्मी, मी महत्प्रयासानी गाडून
टाकतो. अशा बायकोग्रस्त पुरुषांची उदाहरणेही कमी नाहीत. एकानी मला बायको
सुधारण्याच्या गोळ्या मागितल्या. मी हसत हसत म्हटलं, ‘माझ्याकडे नाहीत पण,
तुम्हाला कुठे मिळाल्या तर माझ्यासाठी सुद्धा चार पाकीटं घेऊन या!!’ ह्या
गृहस्थाला काडी इतकाही पाचपोच नाही, त्यांनी हा विनोद स्वतःच्या बायकोला सांगितला
आणि तिथून तो आस्मादिकांच्या बायकोच्या कानावर आला. बायको जाम बिघडली, परिणामी मला
माझ्यात बरीच सुधारणा करावी लागली.
बाई डॉक्टरला विचारता येत
नाहीत असे अनेक प्रश्न ही पुरुष मंडळी आम्हाला विचारत असतात. व्हर्जिन, हायमेन आणि
हायमेन पुन्हा निर्माण करून देणारी हायमेनोप्लास्टी ही शस्त्रक्रीया, हे तर
उत्सुकतेचे शिखरबिंदू. अशी शस्त्रक्रिया मला करता येते म्हटल्यावर एका मित्राने,
‘तू नुसताच सर्जनशील नसून सील-सर्जनही आहेस अशी’ कोटी केली होती. काही विचारतात,
‘एवढे कसे हो तुम्ही बिझी?’ मी सांगतो अहो, मला बिझी ठेवण्यासाठी भारतीय पुरुष
अहोरात्र झटत आहेत!’ ह्यातली खोच लक्षात येताच लोकं मनमुराद हसतात. मग पुढचा सवाल
येतो, ‘पण तुम्हाला रात्री अपरात्री उठावं लागतं...?’ मी म्हणतो ‘हो ना, ज्या
गोष्टीची सुरवात रात्री होते तिचा शेवटही रात्रीच होतो!!’
खरंतर डॉक्टरकीत कसला आला
आहे स्त्रीपुरुष भेदभाव? पण आपला सामाजिक शहाणपणा असा की तुम्ही त्या वंशाचे नसलात
तर तुम्ही त्यांचे प्रश्न समजावून घ्यायला नालायक ठरता. कोणी राजकीय नेता हा
शेतकऱ्याचा मुलगा नाही म्हणजे त्याला शेतीचे प्रश्न कळतच नाहीत, असली आपली समज. गरीबीतून
वर आलेला सामाजिक न्याय मंत्री आम्हाला अधिक न्याय्य वाटतो, जणू गर्भश्रीमंत माणूस
दैन्य अभ्यासून उपाय योजूच शकत नाही. कित्येकदा
महिलाच महिलांवर अन्याय करतात पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फक्त महिलाच नेमली
जाते. या न्यायानी फक्त चार-आठ बाळंतपण आणि आठ-दहा विविध आजारातून तावून सुलाखून
निघालेलीच कोणी स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्र तज्ञ व्हायला लायक ठरेल.
हमाम में सब नंगे है तसंच
हॉस्पिटलमें भी सब नंगे है. पहिल्या वर्षी डिसेक्शन हॉलमध्ये नग्न मनुष्यदेहाचे दर्शन
होताच मन चरकते. पुढे ह्या नवद्वारी देहाची नश्वरता पदोपदी दिसत रहाते.
पुढ्यातल्या पेशंटला भवताप मुक्त कसं करता येईल एवढीच भावना उरते. बाई-बुवा,
लहान-थोर, काळा-गोरा हे भेद औषधापुरते; म्हणजे जिथे आजार आणि उपचार
या भेदांवर अवलंबून आहेत; एवढ्यापुरतेच उरतात. पुरुषही उत्तम स्त्रीआरोग्य आणि
प्रसूतीशास्त्रतज्ञ होऊ शकतात ते यामुळेच.
मस्तच!
ReplyDeleteएका डॉक्टरच्या नजरेतून पेशंट आणि सभोवतालचे जग कसं दिसतं याची छान कल्पना येतेय तुमचा लेख वाचून.
lovely and lively write up. You have great talent Dr. Shantanu.
ReplyDeleteBest wishes