Monday, 28 October 2019

दु:ख पहाता जवापाडे। सुख पर्वताएवढे।


दु:ख पहाता जवापाडे।  सुख पर्वताएवढे।
स्टीफन पिंकर कृत ‘एनलाईटनमेंट  नाऊ’ या पुस्तकाचा परिचय.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.


‘सूख पहाता जवापाडे  दु:ख पर्वताएवढे’, असं तुकारामबुवांनी म्हटलेलंच आहे. जगात ‘सुख थोडे दुख फार’, हा लोकप्रिय समज. पण पिंकर त्याच्या नव्या ‘एनलाईटनमेंट  नाऊ’ या पुस्तकात म्हणतो, ‘दु:ख पहाता जवापाडे,  सुख पर्वताएवढे’!  त्याच्यामते हे जग झक्कपैकी सुधारत चाललं आहे, चक्क ज्ञानोदय झाला  आहे, उत्तरोत्तर प्रगती होते आहे, असं तो ठामपणे सांगतो. माणसाच्या जरतारी आयुष्याचे वस्त्र आता अंगभर  सुखाच्या  शंभर धाग्यांनी विणले आहे, दु:खाच्या एका  धाग्याची किनार तेवढी आहे.  पिंकर सांगतो ज्ञानयुगाचा आजचा अवतार बाळसेदार आहे आणि बाळाचे भविष्य उज्वल आहे; असा आत्यंतिक आशावादी सूर तो धरून आहे.   त्याच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ आकडेवारीही  तो  सादर करतो. ‘बेटर एंजल्स ऑफ अवर टाइम्स’ ह्या त्याच्या, यापूर्वीच्या पुस्तकात तर अशी आकडेवारी हारीने सापडेल.
स्टीफन पिंकर हे विचारविश्वातील एक भारदस्त नाव. मुळात भाषा हा याच्या अभ्यासाचा विषय, पण इतिहास, उत्क्रांती आणि एकूणच मानवी समाज यानेही त्याला भुरळ घातलेली. त्याचं ताजं पुस्तक याची साक्ष देतं. ‘एनलाईटनमेंट नाऊ’ (आजचे ज्ञानयुग) , हा  चांगला पाचशेच्यावर पाने असलेला जाडजूड ग्रंथ आहे; आणि जगात ‘दु:ख थोडे, सुख फार’, असं पटवून देणारा  आहे. अर्थात असं पटवून देणारा आहे, का पटवू  पहाणारा आहे हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. 
पिंकर म्हणतो, समजा, ज्या  वृत्तपत्राचा अंक दर  पन्नास वर्षांनी निघतो, अशा एका  वृत्तपत्राचे तुम्ही  संपादक आहात आणि आता  उद्याचा अंकाचा  मथळा तुम्हाला ठरवायचा  आहे; तर तुम्ही गेल्या अर्धशतकातील सर्वात महत्वाची बातमी कोणती ठरवाल? काय मथळा निवडाल? चंद्रावर पाऊल? देवीचे निर्मूलन? पोलिओचे  उच्चाटन? घटती गरीबी आणि भूक? संगणक क्रांती? का इराणचे युद्ध? काश्मीर? तापमानवाढ? का आणखी काही? अर्थातच काही तरी चांगलं घडल्याची बातमी तुम्ही पहिली  द्याल, हीच शक्यता जास्त. 
नुसतीच प्रगती होत आहे एवढेच प्रतिपादून तो थांबत नाही तर ही घडण्यासाठी ज्या  गोष्टी कारणीभूत झाल्या त्याही मांडतो. त्याच्या मते, विज्ञान, विवेकवाद, उदारमतवाद आणि मानवतावाद ही ह्या प्रगतीची चाके आहेत. ह्या साऱ्यांच्या परिणामी एक सुष्टचक्र  फिरू लागले आहे. या चाकांना तेलपाणी करत राहिलं की हे सुष्टचक्र अव्याहतपणे सुरू राहील असा ठाम विश्वास देतो पिंकर.
आपला भवताल समजावून घ्यायला माणूस आता, परंपरा, श्रुतीस्मृतिपुराणोक्त वचने, संतवचने, साक्षात्कार, ग्रंथप्रमाण्य, गूढविद्या; हे  असलं काही वापरत नाही. सतराव्या शतकातील विचारमंथनाचे हे  नवनीत. दिसतं तसं आणि  तेवढंच नसतं, आपल्या पूर्वजांच्या मतापेक्षाही तर्कबुद्धीने विश्वाची संगती नीट लावता  येते, हे या विचारधारेचे भक्कम मूळ. विज्ञान, विवेकवाद, उदारमतवाद आणि मानवतावाद हीच आज आपली विश्लेषणाची आयुधे आहेत. विज्ञानाची; गृहीतक मांडणे, ते वस्तुस्थितीशी ताडून पहाणे आणि त्यानुसार ते  ग्राह्य वा त्याज्य ठरवणे; ही पद्धती तर आदर्शच.
मानवतावाद म्हणजे विज्ञान आणि विवेकाच्या  संयोगाने उमललेलं तत्वज्ञान. मानवतावादाची नीतीमूल्ये विवेक आणि विज्ञानावर पोसली गेलेली. मानवतावाद   स्त्री-पुरुष असा लिंगभेद, गोरे-काळे असा वंशभेद, अव्यंग-सव्यंग असा शारीरभेद, असे सारेच भेद संपुष्टात आणतो. कैदी, गुन्हेगार, बालके, रोगिष्ट, समलैंगिक इतकेच काय पण अन्य सजीव;  अशा साऱ्यांच्या हक्काची  जाणीव आणि त्यांचा सारासार विचार यात अनुस्यूत आहे. ह्या पूर्वीच्या कोणत्याही तत्वज्ञानाने वा मानव हितकारी असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या धर्माने, असले काही सांगितलेले नाही.  फक्त आपल्या टोळीचे, आपल्या जातीचे, आपल्या वंशाचे, देशाचे, वर्णाचे, हित पाहते, जोपासते अशी नीतीकल्पना सांगितली आहे. त्यापायी  इतरांना पीडा पोहोचवण्याचे अधिकार सांगितले आहेत; द्वेष, पीडा, हिंसा  यांना चक्क संस्थात्मक रूप दिले आहे. आताची नीतीकल्पना अधिक उन्नत, अधिक उदार, अधिक उदात्त नाही का? ही प्रगती नाही का?   

ज्ञानयुगाचा उगम
इसवी सन 1000 ते 1800 पर्यन्त जगात सर्वत्र जैसे थे परिस्थिति राहिलेली दिसते. असलीच तर समृद्धीची बेटे होती. समृद्धी ही सार्वत्रिक, जगद्व्यापी बाब नव्हती.  पण छपाईमुळे भलताच फरक पडला. युरोपभर आणि वसाहतींमध्ये माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण सुरू झाली. ज्ञान आणि माहिती प्रथमच स्वस्त झाली, सामान्यांच्या आवाक्यात आली. औद्योगिक क्रांतीच्या आधी फळफळलेलं एकमेव असं  हे छपाईचे क्षेत्र. युरोपात क्रुसेड्सची (धर्मयुद्धांची) आठवण ताजी होती. त्यातील निष्फळ  नरसंहार निराश करणारा  होता. हे आता पुनः नको अशी भावना स्वार होती. असे अनेक घटक होते. त्यातून सतराव्या शतकात ‘एज ऑफ रीसन’, तर्क-विवेकाचं युग, विज्ञानयुग  अवतरलं. औद्योगिक क्रांती झाली.   त्यातूनच पुढे  हे ज्ञानयुग (एज ऑफ एनलाइटनमेंट) साध्य  झालं. 
माणसाची खरी प्रगती झाली ती त्याच्या मेंदूच्या अफाट शक्यतांमुळे. शेती, पशूपालन, भाषा, लिपी आणि काय काय शोधलं मेंदुनी या. धर्म, तत्वज्ञान, कला, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ही देखिल या मेंदूचीच करामत. इतकंच काय पण उच्चार स्वातंत्र्य, मानवी हक्क, आणि परस्पर  सहकार्यावर आधारित राजकीय व्यवस्था ही देखील मानवी मेंदूचीच करामत.
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति’ असं म्हटलं आहे पण पिंकर सांगतो, जगाच्या कल्याणा संस्थांच्या विभूति.  प्रगत आणि प्रगतिशील  राज्यसंस्था, अर्थसंस्था, न्यायसंस्था यांनीही प्रगतीला हातभार लावलेला आहे. पोलिओच्या लसीचा   शोध महत्वाचा खरंच पण ही लस सर्वदूर पोहोचवण्यात जागतिक आरोग्य संघटना, देशोदेशीची सरकारे, रोटरी क्लब, बिल गेट्स फाउंडेशन सारख्या संस्था यांचेही योगदान आहेच की.


... मग प्रगती दिसत का नाही?
इतकं सगळं भलं घडतय तर मग ते आपल्याला जाणवत कसं नाही? पिंकर काहीही म्हणत असला तरी आसपास सर्वत्र दु:ख, दैन्य, नैराश्य माजलेलं दिसतंय की आपल्याला, त्याचं काय? पिंकर समजावतो, माध्यमं नाकारात्मकतेवर पोसली जातात. आपला भवताल आपल्याला कळतो तो मुख्यत्वे बातम्यांमुळे आणि बातम्या ही गोष्टच मुळी भल्यापेक्षा बुऱ्यावर पोसली जाणारी आहे. सारं काही आलबेल आहे, यात बातमीमूल्य काहीच नाही. त्यामुळे भलं ठेवतात झाकून आणि बुरं पहातात वाकून. बुऱ्याचे   तेवढे चर्वीतचर्वण अखंड चालू रहाते. दुःख, दैन्य, दारिद्र्य, नीच-अधम कृत्ये हीच बातम्यांचे विषय असतात. याच चष्म्यातून आपण जगाकडे पहातो. जे आपल्याला दाखवलं जातं तेवढेच जग आहे अशी समजूत करून बसतो. जगात कुठे ना कुठे, काही ना काही, वाईट घडतंच. तेंव्हा वार्ता विघ्नाची सदैव हाजिर असणारच. एकूणच जग अधिकाधिक वाईट होत आहे असा समज दृढ केला जातो. खरंतर  वैयक्तिकरित्या माणूस आज अधिक सुरक्षित, अधिक  सुपोषित, अधिक सुस्थितीत आहे, पण सतत खून, बलात्कार, युद्ध, मारामारी यांच्याच बातम्या आपल्यावर आदळत असल्याने आपली विचारशक्ती भ्रमित झाली आहे.
जरा शांत चित्तानी पेपरच्या मथळ्यांपेक्षा आकडेवारीवर नजर  टाकली तर या भ्रमाचा निरास होईल. प्रगतीच्या अनेक परी आणि अनेक पदर तो दाखवतो. आयू, आरोग्य, असमानता,  आतंक, पर्यावरण, युद्ध, सुरक्षा, लोकशाही व्यवस्था, सामानाधिकार, ज्ञान, जीवनशैली, आनंद  असे सुखाचे, प्रगतीचे  दीड-डझन निकष आणि अनुरूप आकडेवारी तो सादर करतो  आणि प्रत्येक रकान्यात विज्ञान, विवेक, मानवता, यांचा जय होत असून प्रगतीच होते आहे हे दाखवून देतो.

प्रगतीच प्रगती
भौतिक प्रगती तर ठायी ठायी दिसतेच आहे. जगात आज भुकेने आणि कुपोषणाने मरतात त्याहीपेक्षा जास्त माणसे अति-पोषणाने मरतात. उपासमारीची समस्या असण्यापेक्षा ही बरी.  उपासमारी अजूनही आहे, पण ती युद्धग्रस्त अथवा अतिदुर्गम  अशा प्रदेशात आहे. दुष्काळ, साथी  आणि माणसे किडयामुंग्यांसारखी मरणे हा आता इतिहास आहे. साथीच्या आजारापेक्षा अधिक माणसे आज वृद्धापकाळाने मरतात.  आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आयुर्मानाशी असतो. मानवी सरासरी आयुर्मान आता 71 वर्ष आहे, पूर्वी बहुतेक काळ ते 30 वर्षाच्या आसपासच  होतं.   साक्षरता प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण युद्ध आटली आहेत! युद्धात मरणाऱ्यांपेक्षा आत्महत्या करणाऱ्यांची संख्या आज अधिक भरते.  किरकोळ चोऱ्यामाऱ्या, खूनदरोडे  कमी झाले आहेत. हे सगळं आकडेवारीनिशी सिद्ध करतो पिंकर. दरोडे आणि खूनखराबा मध्ययुगापासून उतरणीला लागला होता. पण आधुनिक युगात व्यावसायिक पोलिसदले आली, फौजदारी न्यायालये आली आणि आता तर डिजिटल पोलीसिंगमुळे गुन्हेगार गुन्हा करू धजत नाहीत. शिक्षाही आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. हात पाय कलम करणे, हत्तीच्या पायी देणे, चाबकाचे फटके हे प्रकार तर जवळपास बंदच झाले आहेत. शिक्षा आता पूर्वीपेक्षा  सौम्य आहेत.   गुन्ह्याच्या, पापाच्या प्रमाणात आहेत. किरकोळ गुन्ह्यासाठी कडक शिक्षा फर्मावली तर गुन्हेगार उलटा विचार करतात. लूटमार केली तरी फासावर जाणार आहोत मग नुसतंच लुटण्यापेक्षा  थेट मारूनच टाकू ना! आणि मग निव्वळ एकच खून  का, साक्षीदारांनाही यमसदनी  पाठवू, जे  व्हायचे ते होईल.  किरकोळ गुन्ह्याला कडक शिक्षा हे विपरीत प्रोत्साहन ठरते, ते असे.  

पिंकर आणि अतिआशावाद
पिंकरला अनेकांनी ‘पानग्लोस’ची उपमा दिली आहे. व्हॉलटेअरचे हे पात्र, अति-आशावादी म्हणून प्रसिद्ध आहे.  आपण उत्तमात उत्तम जगात असून आसपास आहे ते उत्तमच आहे असा ठाम विश्वास पानग्लोस बाळगून असतो. पिंकर म्हणतो पानग्लोस कुठला आशावादी, तो तर निराशावादी होता! मी आशावादी आहे.  आहे ते उत्तमात उत्तम आहे अशी पानग्लोसची समजूत होती. मी आहे हे आधीपेक्षा उत्तम आहे असं म्हणतोच पण  हे का उत्तम आहे ह्याचा  अभ्यास केला तर हे अधिक उत्तम होईल, अशी आशा बाळगून आहे. मी विवेकी आशावाद बाळगून आहे. जगात निराशावादी लोकांना, चिंतातुर जंतूंना  उगीचच विचारवंत आणि अधिक प्रगल्भ वगैरे समजलं जातं. त्यामुळे चिंता करणे विश्वाची हा काहींचा बाणा बनतो. पण हे काही खरं नाही.
पण याचा अर्थ, सारे काही आलबेल असून आता स्वस्थ बसावे आणि बसूनी  गिळावे, असा होत नाही. या प्रवासातही अनेक धक्के आपल्या वाट्याला आले आहेत. दुसरे महायुद्ध, आफ्रिकेत एड्सने घातलेला हैदोस आणि इतर कितीतरी. इतिहाची चाल एकरेषीय नसते, सततचे हेलकावे ठरलेले. उत्तरोत्तर प्रगती याचा अर्थ उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगलाच उगवेल असा नाही. दमन, दुष्काळ आणि दुरवस्था ओढवणारच नाही असे नाही. पण कालच्यापेक्षा उद्याचे दमन, दुष्काळ आणि दुरवस्था बरी  असेल असे तो सांगतो. यासाठी  तो आकडेवारीही देतो. आज वंचित, पीडित जनतेचा आवाज दाबणे कालच्यापेक्षा अवघड झाले  आहे. आज दुष्काळ पडला तर जगभरातून मदतीचा ओघ तिथे पोहोचतो.  आजची गरीबीही  कालच्या  गरीबीपेक्षा किती तरी ‘श्रीमंत’ गरीबी आहे... अशी कितीतरी विधाने तो पुराव्यानिशी शाबीत करतो.  

पिंकर आणि पर्यावरणवाद
पिंकरला हे मान्यच आहे की शेतीचा शोध लावल्यापासून ही वसुंधरा माणसाने ओरबाडायला सुरवात केली आहे. औद्योगिक क्रांती  म्हणजे तर कहर आहे, दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होते आहे आणि अंतिमतः सर्वनाश अटळ आहे. माणूस आणि त्याची प्रगती हाच या भुईला  भार आहे. आपण पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास  केला आहे. हे खरंच  आहे आणि ह्याची जाणीव आपल्याला विविध पर्यावरण चळवळींनी करून दिली आहे. पण पर्यावरणापायी प्रगतीला सरसकट धोपटणे हे काही खरे नाही. आधुनिक विवेकी पर्यावरणवादाचा तो पुरस्कार करतो. पर्यावरणाचा ऱ्हास ही   आपल्या प्रचंड प्रगतीची किंमत आहे. दुप्पट आयूर्मान, गुलामीतून मुक्तता, स्त्रियांची चुलीपासून सुटका, मुलांची शेतीकामातून शाळेत रवानगी, या साऱ्याच्या बदल्यात आपण पर्यावरणाला  हानी पोहोचवली आहे. याला इलाज नाही. घर संपूर्णतः केरमुक्त ठेवायचं  तर त्यात होणारी श्रमाची आणि वेळेची गुंतवणूक आपल्याला परवडणारच नाही. त्यामुळे थोडाफार कचरा आपण चालवून घेतो. तसंच हे. पर्यावरण अमूल्य आहेच पण मानवी प्रगतीला, संपन्नतेला  काही किंमत आहेच की. जेनेटिकली बदल केलेल्या पिकांना केलेला विरोध, हा म्हणूनच आंधळा विरोध ठरतो. अधिक उत्पन्न देणारी, कीटकरोधक शक्ति असलेली आणि कमी खतं लागणारी अशी वाणं आवश्यक आहेत. जे जे नैसर्गिक ते ते आपोआपच चांगलं आणि जे जे मानवनिर्मित ते ते आपोआपच हानीकारक ही विभागणी फारच प्राथमिक, बालिश आणि काहीशी हास्यास्पद आहे. उलट नवपर्यावरणवाद हे जाणून आहे की समृद्धी असेल तर पर्यावरणही समृद्ध असते. वीजेचंच ज्याला अप्रूप तो समाज वाट्टेल त्या पर्यावरणीय किमतीला ती घेणारच. वीज मुबलक उपलब्ध झाली की मग पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा विचार येतो. त्यामुळेच जगात जिथे दारिद्रय नांदतं तिथे पर्यावरण जास्त खराब आहे. निव्वळ श्रीमंतांनी आपली घाण त्यांच्यावर ढकलली आहे असं नाहीये. हवेचे किंवा पाण्याचे प्रदूषण काही निर्यात करता येत नाही. गरीबाघरी सर्वात प्रदूषित असते ती स्वयंपाकघरातील धूर भरली हवा आणि  पिण्याचे पाणी. 
पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि अशा वेळी सर्वात स्वच्छ आणि प्रचंड ऊर्जा पुरवणारा  स्त्रोत म्हणजे अणुऊर्जा. स्वस्त आणि प्रचंड ऊर्जा वापरून युरोप अमेरिकेने प्रगती केली. आता भारत आणि चीनसारखे देश, आम्हालाही अशी संधी  हवी, ऐनवेळी तापमानवाढीचं  निमित्त काढून आमची संधी  हिरावून घेणारे, आम्हाला शहाजोगपणे शहाणपणा  शिकवणारे, तुम्ही कोण असं विचारत आहेत. अणुऊर्जा स्वस्त आणि शुद्ध आहे पण अणुअपघाताची कृष्णछाया आपले मन व्यापून टाकते. चेर्नोबिल, फुकुशिमा हे आघात ताजे आहेत. पण एकूण हिशोब केला तर औष्णिक वीजकेंद्रातून होणाऱ्या रोजच्या प्रदूषणाशी तुलना करता हे अपघात परवडले म्हणायचे. अपघातात माणसे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर मरतात, अपघातात नुकसान अचानक आणि मोठ्या प्रमाणावर होते; पण याचा अर्थ एरवी ते होत नसते असे नाही. कोळशाच्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणातून, ऊर्जेच्या आभावामुळे होणाऱ्या संधिहननातून,  क्षणोक्षणी शेकडो  लोक बाधित होत असतात. फक्त त्यांची हेडलाईन होत नाही, एवढंच. हे सगळं  विचारात घेतलं  तर कोळशाच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवण्यापेक्षा अणुऊर्जेचा जुगार अधिक फायद्याचा आहे.

पिंकर आणि डावे उजवे  
डाव्यांच्या आणि उजव्यांच्या खोडी पिंकर बरोब्बर दाखवून देतो. यात तो डावेउजवे करत नाही.   डावे, उजवे असे सारेच कळपानी  रहातात. कोणत्याही नव्या विचाराचा,  समस्यापूर्तीचा, स्वीकार अथवा धिक्कार स्वतंत्रबुद्धीने करत नाहीत. आपल्या मूळ वैचारिक ढाच्याशी काय जुळतंय ह्यावर त्यांची भूमिका ठरते.  विरुद्धार्थी पुरावा ते साफ नाकारतात किंवा त्याकडे डोळेझाक तरी करतात. एवढेच नाही तर ते  विरोधकांचे दानवीकरण करतात. वैचारिकदृष्ट्या निरुपद्रवी निष्कर्ष बरोबर काढतात.  उदा: एखाद्या मलमाचा मुरूमावर उपयोग आहे वा  नाही, हे खालील आकडेवारीवरुन सांगा म्हटले की बरोबर निष्कर्ष काढतात.  पण कोणत्याही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नाकडे आपापल्या चष्म्यातून पहातात. ही काही पिंकरने जाताजाता टाकलेली मताची पिंक नाही.  अनेक प्रयोग उद्धृत करून पिंकरने आपला दावा भक्कम केला आहे.  यावर उपाय मात्र अवघड आहे. अशी परिस्थिति आहे, असू शकते,  हे मान्य करणं ही पहिली पायरी. उजव्यांसाठी डाव्यांनी आणि डाव्यांसाठी उजव्यांनी प्रवक्ता म्हणून युक्तिवाद करून पहाणे हा आणखी एक उपाय.  
कोणत्याही धोरणाचे मूल्यमापन निरपेक्षपणे व्हायला हवं. अर्थात जो हेतु आहे तो मुळात साध्य होतोय ना, ही अपेक्षा ठेवलीच पाहिजे, या अपेक्षेच्या प्रकाशात तर धोरण तपासणी व्हायला हवी. आपापल्या इजमचे चष्मे लावून नाही. माणूस मुळात विवेकी प्राणी नाही. त्यामुळे विवेक हे मूल्य शिकावं, शिकवावं, रुजवावं, फुलवावं लागतं. आपोआप ते उगवून येणं अवघडच.

मानव्यविद्यांची  झाडाझडती
एकूणच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र वगैरे मानव्यविद्यांच्या सध्याच्या अभ्यासपद्धतीबद्दल पिंकर अतिशय असमाधानी  आहे. मानव्यविद्यांचा  अभ्यासही विज्ञानाच्या शिस्तबद्धतेने व्हायला हवा असं त्याचं सांगणे आहे. शब्दबंबाळ, जडजंबाळ, विद्वजड,  गूढ, परिभाषा त्याला मान्य नाही. आधुनिक उदारमतवादी संस्थांप्रती  टोकाचा  दुस्वास  आणि जग उत्तरोत्तर रसातळाला  चाललंय हा जबरदस्त निराशावाद, ही यांची वैचारिक मालमत्ता. मुळात उदारमतवादी विचारांमुळेच मानव्यविद्या बहरल्या आहेत हे यांच्या गावीही नाही. 


ज्ञानयुगाचे वाटाडे आणि विरोधक
ज्ञानयुगाच्या वाटाड्यातही एकमत नव्हतच. अपेक्षितही नव्हतं. ज्ञानयुग म्हणजे कोणता नवा  पंथ, धर्म वा  एकच एक विचारधारा नाही. एडमंड बर्क तर म्हणतो माणूस हा मुळातच अ‘तर्क्य’ प्राणी आहे. तेंव्हा तर्काधिष्ठित समाजबिमाज घडवण्याची उठाठेव कशाला? उलट काही अविवेकी प्रथापरांपरांमुळेच समाज शाबूत आहे. वरकरणी वृथा वाटणाऱ्या अशा परंपरा जपलेल्याच बऱ्या. पिंकर हे सारं मान्य करतो पण बजावून सांगतो की या ज्ञानमंथनातून जी प्रगतीची  तत्व वर आली ती महत्वाची. बाकी पाण्यावरच्या  तरंगांकडे  आणि बुडबुड्यांकडे लक्ष देण्यात हशील नाही.
ज्ञानयुगाला विरोधही झाला. ज्ञानयुग हे व्यक्तीला महत्व देणारे, तिच्या प्रामाणिकपणावर सदसद्विवेकवर विसंबून रहाणारे आहे. त्यामुळे आपल्या आणि समाजाच्या जडणघडणीसाठी  देवाधर्मावर अवलंबून असणाऱ्यांना, विज्ञानाच्या विचार पद्धतीचं वावडं असणाऱ्यांना,  ज्ञानयुग नकोसं वाटतं.

आजचे चकवे
कित्येक तथ्यांचा यथातथ्य अभ्यासच प्रस्थापित राजकीय वातावरणात होऊ शकत नाही. उदाहरणार्थ बुद्धिमत्ता आनुवंशिक असते, काही जमातीत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते किंवा बायका आणि पुरुष हे यांचे करियर आणि घरदार या बाबतचे दृष्टिकोन भिन्न भिन्न असतात; यांचा अभ्यास करणे ‘समानता’ हे मूल्य स्वीकारल्यामुळे अडचणीचे होते. (आपल्याकडचं उदाहरण द्यायचं तर स्त्री अथवा दलित धार्जिण्या  कायद्यांचा गैरवापर होतो का याचा अभ्यास करणं हेच तुम्ही स्त्री अथवा दलित विरोधी असल्याचा पुरावा मानला जातो.)  मग असले अभ्यास केलेच जात नाहीत. मग टोकाची, अतिरेकी, अति उजवी/डावी भूमिका घेणाऱ्यांना रान मोकळं मिळतं. मग ते त्यांच्या सोयीने ह्या प्रश्नांचा ‘अभ्यास’ करतात आणि सोयीचे निष्कर्ष मांडतात. हे व्हायचे नसेल तर कोणतेही विधान व निरीक्षण हे अभ्यासला, आव्हानाला  खुले हवे.
 आणखीही एक असाच बेफाट चकवा आहे. माध्यमे समतोल सादरीकरणाच्या नावाखाली टोकाची मतं मांडणाऱ्या कोंबडयांच्या झुंजी लावतात आणि झेपवणारा टीआरपी बघत टाळ्या पिटत रहातात. अशा प्रकारच्या समतोललाच्या  भानगडीत ज्योतिर्विदां बरोबर ज्योतिषी, मानसतज्ञांच्या सोबतीने मांत्रिक आणि शास्त्रज्ञांबरोबर धर्मज्ञ मांडीला मांडी लावून बसतात.  ह्यात आपण कोणा सवंग, अर्थहीन, तथ्यहीन,  विज्ञानविरोधी, प्रतिगामी विचारसरणीला नकळत प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय हे लक्षात घेतले जात नाही.   


पुस्तकाने काय साधले?
अशा पुस्तकाने मानवी विचारात बदल घडेल काय? पिंकरनी  सांगायचं काम केलं आहे. प्रगती होतच रहाणार असा काही निसर्गनियम नाही. तेव्हा अधोगती ही केंव्हाही शक्यच आहे. प्रगती की अधोगती, हे आपण कशाची, कोणत्या मूल्यांची निवड करतो यावर अवलंबून आहे. सर्वोत्तम निवड कोणती हे त्यानी  सुचवलं आहे. इतिहासाचा अभ्यास करून, आकडेवारीची संगती लावून सुचवलं आहे. आले पिंकरजींच्या मना  तेथे कोणाचे चालेना अशी बात नाहीये.  विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद ह्यांच्या इंधनानी प्रगतीची, सुखसमृद्धीची  एक्सप्रेस सुसाट सुटते असं दिसतंय.  अर्थात  प्रगतीचे हे सुष्टचक्र  असंच चालू रहायला हवं  असेल तर योग्य राजकीय, सामाजिक, आर्थिक  व्यवस्था चिरेबंदी रहायला हवी. शेवटी निर्णय समाजधुरीणांनी करायचा आहे. कोणाचं  धुरीणत्व, नेतृत्व पत्करायचं हे आपण  नीट ठरवायला हवं.   ही तर आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी.
अंनिस वार्तापत्र, वार्षिकांक २०१९

  








1 comment: