अग्गोबाई! अरेच्चा!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई,
जि. सातारा. पिन. ४१२ ८०३
मो.क्र. ९८२२० १०३४९
‘महिलासाठी खास व्हायग्रा’
आलंय बरं का बाजारात. नेहमीप्रमाणे ते सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. पण येईल
लवकरच, इंडियात. भारतात यायला थोडा आणखी वेळ लागेल.
बातमीनुसार हे खास
स्त्रियांसाठी निर्माण केलेलं कामेच्छावर्धक आहे. चांगलं देवाब्राम्ह्णांच्या
साक्षीनं लग्न तर झालंय पण तिला आता ‘ह्यात’ काही इंटरेस्ट उरला नाही, ही स्थिती
बरेचदा आढळते. ‘निष्काम कर्मयोग’ हा एक प्रॉब्लेमंच आहे, निदान या क्षेत्रात. आज
काय डोकं दुखतंय, उद्या कंबर, परवा आणखी काही; हे असंच चालू रहातं मग. लांब रहावं
म्हटलं तर नवऱ्याला वैताग, जवळ येऊ द्यावं म्हटलं तर बायकोला वैताग आणि डॉक्टरांना
सांगावं म्हटलं तर त्यांनाही हे सगळं ऐकून घ्यायला आणि औषध द्यायला कटकटीचंच वाटतं.
बायकांच्या काम-निरसतेवर
आधीही एक औषध होतं; टेस्टॉस्टेरॉन; म्हणजे तेच ते, पुरुष ज्या संप्रेरकामुळे
‘पुरुष’ बनतो ते! हा नर-रस नारीला कामेच्छा वर्धक ठरतो. पण तो देणं जरा गोचीकारकच
असतं. तो वापरता येतो त्यातल्या त्यात पाळी बंद झालेल्या बायकांच्यात. आता मुळात अशा हरी हरी
करायच्या वयात हरित मन राखणाऱ्या किती? शिवाय त्याचे नको नको ते साईड इफेक्ट असतात.
त्या मुळे हे टेस्टॉस्टेरॉन काही या क्षेत्रातलं मान्यताप्राप्त औषध नाही. म्ह्णून
या नव्या औषधाचं, फ्लिबेनसेरीनचं कवतिक.
फ्लिबेनसेरीन हे काही,
टेस्टॉस्टेरॉनसारखं, संप्रेरक नाही. मेंदूतल्या नसानसात होणाऱ्या संदेशवहनात ढवळाढवळ
करून ते कामेच्छावर्धक परीणाम साधतं. ते पुरुष संप्रेरक वगैरे नसल्यामुळे सगळ्या
वयातल्या स्त्रियांना चालतं. पण सगळ्यांप्रती सारखाच परिणाम होतो असं मात्र नाही.
भाग्याची अंगठी जशी कुणाला लाभते , कुणाला नाही; तसाच हा प्रकार. परिणाम जाणवायलाही
किमान महिनाभर गोळ्या घ्याव्या लागतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लिबेनसेरीनने ‘इच्छा’ वाढली तरी ‘तृप्ती’ची गॅरँटी नाही.
ह्या फ्लिबेनसेरीननी
प्रश्नांचं एक मोठं मोहोळच उठवलंय.
मुळात बायका हीच एक
डोकेदुखी असल्याचं सार्वजनिक मत आहे, त्यात बायकांचा अभ्यास म्हणजे आणखी डोकेदुखी
आणि त्यातही ह्या असल्या बाबतीतला अभ्यास म्हणजे विचारायलाच नको. या बाबतीतला
शास्त्रीय अभ्यास सुरु झाला मोकळ्या ढाकळ्या अमेरिकेत. तिथल्या मास्टर्स आणि
जॉन्सन जोडीनं कामचक्र वर्णीलं आहे. कामातूरता (arousal), उच्चस्तर अवस्था (plateau),
कामतृप्ती (orgasm) आणि कामशमन
(resolution) अशा टप्प्यांमधून कामक्रीडा जात असते. रोजमेरी बसून वगैरे संशोधकांनी
लैंगिक उत्तेजना (stimulus) मग कामातूरता (arousal) मग कामेच्छा (desire) आणि मग
कामतृप्ती (orgasm) असा क्रम मांडला आहे. रोजमेरी यांच्या मते पुरुषांची कामतृप्ती
वीर्यपतनाशी संपते. स्त्रियांतमात्र कामतृप्ती (orgasm) हा शेवट नसून त्याद्वारे जोडीदाराशी मानसिक, भावनीक, प्रेममय तादात्म्य हा
कळसाध्याय आहे.
स्त्रीयांमध्ये आधी लैंगिक
उत्तेजना (stimulus) मग कामातूरता (arousal) आणि मग कामेच्छा (desire) असा क्रम
आहे आणि पहिल्या दोन पायऱ्या या सर्वस्वी वातावरण आणि जोडप्याच्या वागणुकीवर
अवलंबून आहेत. गोळीवर नाहीत. गोळी खाल्यामुळे डायरेक्ट तिसरा अंक सुरु होणार काय?
आणि झाला तरी पहिले दोन अंक न बघता तिसऱ्याची रंगत ती काय असणार? पुरुषांचे
कामविचार, कामाचार ‘नाही संभोगसुख तर नाही
प्रेमभावना’ या घोषवाक्यानुसार चालतात. पण स्त्रियांचं याच्या नेमकं उलट असतं;
‘प्रेमभावाशिवाय निरर्थक आहे संभोग’ हे त्याचं घोषवाक्य. हे प्रेम, समर्पण,
तादात्म्य ह्या गोळीनीच काय गोळीबारानेही साधता येणार नाही. फ्लीबेनसेरीन म्हणजे
काही वशीकरण गुटी नाही.
लैगिक आचारात, ‘नॉर्मल कामासक्ती’
कशाला म्हणायचं, हे एक त्रांगडंच आहे. नॉर्मल म्हणायचं कशाला, आणि ते मोजायचं कसं?
अमुक इतक्या मिठ्या? तमुक इतके मुके? का अमुक अमुक काळात तमुक तमुक, कामुक चाळे?
का अमुक वेळात तमुक वेळा संभोग? नॉर्मल कामासक्ती ठरवता ठरवता एवढी त्रेधा
उडते तर कामनिरसता कशाला म्हणायचं हे
ठरवणंही अवघड. शिवाय हा समागम कुणाशी? कसा? निव्वळ यौनमैथुन? का गुदमैथुनही? आणि
मग मुखमैथुन? शिवाय हस्तमैथुनाचं काय?
चालेल का नाही? आणि समलिंगीसंबंध? एखाद्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला फ्लीबेनसेरीन
द्यायचं का नाही?
यातल्या काही किंवा
सगळ्याला अनैसर्गिक मानणारी जनता आहे; या साऱ्याचा सुखेनैव उपभोग घेणारीही जनता
आहे. ‘त्याची/तिची तयारी आहे, माझा होकार आहे, मग हरकत घेणारे तुम्ही कोण?’ हा
त्यांचा प्रश्न आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र असं मानतं की परस्पर सहमतीनं आणि पुरेशी
स्वच्छता बाळगून हे होत असेल तर कुणी मधे पडायचं कारणंच काय?
एकपतीव्रत/एकपत्नीव्रत हाच
सध्याचा प्रस्थापित, समाजमान्य लैंगिक व्यवहार आहे. ‘व्रत’ म्हटलं की त्याबरोबर
‘वैकल्य’ही आलंच. वैकल्य म्हणजे स्वतः जाणून बुजून भोगलेला त्रास. जीवशास्त्राला
अशी दाट शंका, नव्हे खात्रीच आहे, की माणूस हा मूलतः अनेक जोडीदार राखणारा प्राणी
आहे. तेव्हा माणसानं स्वतःवर लादलेलं एकपती/पत्नीव्रताचं बंधन हे अनैसर्गिक असून,
एक ‘वैकल्य’च आहे. तेव्हा कालानुक्रमे एकाच जोडीदाराबद्दलची असोशी कमी होत जाणारच;
कामेच्छा सरत जाणारच. नभात चंद्रमा जरी तोच असला आणि एकांती कामीनीही जरी तीच असली
तरी ‘ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी’; असा अनुभव येणारच. आता यावर गोळी हे
उत्तर असूच शकत नाही.
मुळात कामेच्छा उगवते कोठून
हेच धड माहीत नाही तर काम निरसतेचा काय अभ्यास करणार कप्पाळ! कामेच्छेवर परिणाम
घडवणाऱ्या अनेक बाबी आहेत. आजारपण, वय, वयानुरूप कमी कमी होणारी संप्रेरके, नात्यातील
ताणतणाव, भांडणे, नैराश्य निवारक औषधांच सेवन, धार्मिक-सांस्कृतिक समजुती, कमअस्सल
स्व-प्रतिमा...वगैरे, वगैरे. शिवाय तिची तयारी आणि त्याचा होकार; किंवा, तिचा
होकार आणि त्याची तैयारी, ह्याचंही टायमिंग जुळायला हवं. गोळीनी हे नक्कीच होणार
नाही.
थोडक्यात वर नमूद
कारणांपैकी कशानी तरी कामेच्छा गेली तर ती गोळीनी थोडीच परत येणार आहे? मदन आणि
रतीचे सूरच जर जुळत नसतील तर कितीही गोळ्या खाल्या तरी मदनबाण हुकणारच, रती कटाक्ष
चुकणारच. ना मदन रतीरत होणार ना रती मदनरंगी रंगणार!
पण आपण कितीही आदळआपट केली,
तरी काम विकार असतात हे सत्य आहे. त्यांचा जमेल तितका आणि जमेल तसा अभ्यास करायला
हवा, हे ही सत्य आहे. अशाच अभ्यासातून जी आहेत ती औषधं निपजली आहेत, हे ही सत्य
आहे. अभ्यास अवघड असला, तरी अशक्य नक्कीच नाही. तसं तर गर्भनिरोधन, टेस्ट ट्यूब
बेबी वगैरे अशक्यच होतं एके काळी. तेव्हा प्रयत्ने किम् दरिद्रता?
अभ्यास करायचा तर
कामनिरसतेची व्याख्या करायला हवी. ‘एखाद्या स्त्रीला, कायम वा वारंवार, कामेच्छा होत नसेल आणि तिला किंवा
जोडीदाराला ह्याचा त्रास जाणवत असेल, तरच ह्याला कामनिरसता म्हणता येईल’; अशी एक
सर्वमान्य व्याख्या आहे. निव्वळ एखादीला काम
क्रीडेबाबत अनिच्छा आहे, पण या बाबत तिची काsssही तक्रार नाही, त्याचीही तिच्याबद्दल
नाही आणि दोघांची एकमेकाबद्दलही काही तक्रार नाही; तर मग हा काही ‘आजार’ समजला जात
नाही. पण याच परिस्थितीचा जर कुणाला जाच वाटायला लागला, तर ह्याला आजाराचं लेबल
लावून, उपायाचा शोध घेणं आवश्यक आहे. बहुतेक कामविकारांच्या व्याख्या अशाच असतात.
संबंधित व्यक्तीला जर प्राप्त परिस्थितीचा त्रास होत नसेल, तर वैद्यकशास्त्रानं
तिथे नाक न खुपसणंच उत्तम. व्याख्येपाठोपाठ या विषयावरचे अनेक अभ्यास प्रसिद्ध
झाले. काही अभ्यासकांच्या मते तब्बल ४३% महिलांना हा ‘त्रास’ जडला आहे म्हणे!
हे आकडे पहाता या अवस्थेला ‘विकृती’
म्हणण्याऐवजी ‘सहज प्रकृती’ का म्हणू नये असाही प्रश्न आहे. रे मोयनिहान या
पत्रकाराने ब्रिटीश मेडिकल जर्नल मधील आपल्या निबंधात असा खुला आरोप केला आहे की शास्त्रज्ञांनी
काम-निरसतेवर औषध वगैरे काही शोधलं नसून; एक
तथाकथित औषध खपवण्यासाठी साठी, ‘काम-निरसता’ ह्या आजाराचा शोध औषध कंपन्यांनी
लावला आहे. या आजाराची व्याख्या करू पहाणारे आणि यावर औषध शोधणारे सगळेच औषध
कंपन्यांना मतलेले आहेत. निसर्गतःच कमी अधिक होणारी कामासक्ती, आजाराच्या
व्याख्येत कोंबून, त्यावर ‘इलाज’ विकण्याचा
हा धंदा, गोरखधंदा आहे! जी गोष्ट ४३% जनतेला
लागू आहे, त्याला ‘आजार’ कसं म्हणावं बरं? उलट एका सुंदर आणि आत्यंतिक
व्यक्तीनिष्ठ अनुभवाचं हे टोकाचं वैद्यकीयीकरण आहे! शुद्ध बाजारीकरण आहे!!
पण अभ्यासक म्हणतात जिचं
जळतं तिला कळतं. प्रत्यक्ष रुग्णांचे अनुभव न बघता निव्वळ लांबून शेरेबाजी करणं
सोपं आहे, प्रसिद्धीही सहज मिळते पण अंतीमतः ते अहीताचंच आहे. व्यसनाधीनता,
नैराश्य एवढंच काय वयानुरूप होणारी गुडघ्याची झीज आणि गुडघेदुखीही, आधी आजारात
मोडली जात नव्हती. पण या साऱ्यावर आज अभ्यास आहेत, उपाय आहेत आणि या पासून फायदा
झालेले शेकडो लोक आहेत. तेव्हा अभ्यासली कामनिरसता आणि शोधलं औषध तर त्यात एवढं बावचळण्यासारखं
काय आहे? प्रवास चुकत माकत, ठेचकाळतंच होणार आहे, पण म्हणून आधीच हात पाय गाळून
बसून कसं चालेल? औषधांचे शोध लागतात तसे आजारांचेही लागतात हे सत्यच आहे.
कामनिरसता बहुआयामी आहेच, त्याचे उपायही तसेच असतील. गोळी हा फक्त एक पर्याय आहे. औषधांचा
उपचार हा, समुपदेशन वगैरे अन्य
उपायांबरोबर करायचा आहे. तेव्हा गोली को गोली मारो, वगैरे फिजूल आहे.
दुसरीकडे स्त्रीवाद्यांचा
प्रत्येक गोष्टीला आक्षेप आहे. त्यांच्या मते बायकांना काय वाटतं ते आजवर पुरुषच
परस्पर ठरवत आलेत. स्त्रियांची कामभावना कामतृप्ती वगैरे निव्वळ पुरुषी
दृष्टीकोनातून अभ्यासली गेली आहे. बहुसंख्य संशोधक हे पुरुष असल्यामुळे असं
होणारच. अगदी वैद्यकीय महाविद्यालयातल्या शरीरशास्त्राच्या पुस्तकातील स्त्रीजननेंद्रियांच्या
चित्राला सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. या चित्रांमध्ये योनीमार्ग अगदी रुंद
दाखवलेला असतो. वास्तविक तो अगदी फटीसारखा असतो. शिश्निका हा स्त्रीचा सर्वात
महत्वाचा काम-अवयव असतो, पण वैद्यकीय पुस्तकात ह्या शिष्निकेला काडी इतकीही किंमत
दिलेली नसते. पुरुषकेंद्री कामविज्ञानाचा भर यौनसंबंध कसे सौख्यपूर्ण होतील यावर
आहे तर स्त्रियांचे कामसौख्य शिष्निकेच्या मर्दनात सामावले आहे. लिंगाचा
योनीमार्गात प्रवेश होणं, समागम होणं, स्त्रीला कमी महत्वाचं आहे. (योनीमार्गाच्या
बाहेरच्या तीन चार सेंटीमीटर पल्याड स्पर्श संवेदनाच नसतात पण लिंगाच्या लांबीला
पुरुषांच्या नजरेत अवास्तव महत्व आहे. लिंगवर्धक, निरुपयोगी (पण प्रसंगी उपद्रवी)
उपायांच मार्केट चांगलंच तेजीत आहे.) बरेच पुरुष वीर्यपतन झालं की हतवीर्य होऊन
झोपून जातात. स्त्रीच्या कामतृप्तीसाठी शिश्निका मर्दनाची जबाबदारी त्यांच्या
गावीही नसते. आपली ही गरज नवऱ्याच्या कानावर घालण्या इतका संवादही नसतो. गोळीमुळे
कामेच्छा वाढली तरी तृप्तीची ग्यारेंटी नाही ते या मुळेच. ‘तरुण आहे रात्र अजुनी,
तू असा निजलास का रे? अजुनी मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?’ हा अनुभव
आपल्याला वाटतो त्या पेक्षा सार्वत्रिक आहे!!
या क्षेत्रातल्या शास्त्रीय
अभ्यासाला बळ आलं ते व्हायग्रा च्या यशामुळे. १९९८ मध्ये व्हायग्राचा जन्म झाला.
लिंगाला ताठरता येण्यासाठी हे चांगलंच लागू पडलं. हे नसांवर नाही तर लिंगाला
होणाऱ्या रक्तपुरवठयावर परिणाम करतं. लिंगाला होणारा रक्त पुरवठा व्हायग्राने
वाढतो आणि परिणामी लिंगाची ताठरता वाढते. पुरुषांना फायदा होतो तर स्त्रियांनाही
काही ना काही तरी फायदा असणारच; अशा विचारांनी ह्याही दिशेनी संशोधन जोरात सुरु
झालं. आठ वर्षाच्या अथक परिश्रमनंतर ‘व्हायग्रा’फेम फायझर कंपनीनी व्हायग्राचा
स्त्रियांच्या कामविकारांवर काहीही उपयोग नसल्याचं सांगत, संशोधन थांबवलं.
याबाबतीत जननेंन्द्रीयांवर नाही तर मेंदूवर असर करणारं औषध हवं असं या टीमचं मत
पडलं. फ्लिबेनसेरीन हे नेमकं असंच औषध आहे. मूलतः नैराश्य निवारक म्हणून
अभ्यासलेल्या या औषधाचा हा कामेच्छावर्धक पैलू लक्षात आल्यावर त्या दिशेनं संशोधन
सुरु झालं.
पण हे सारं संशोधन
सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलं. औषध कंपन्यांच्या आश्रयाने ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द स्टडी ऑफ वुमेन्स
सेक्सुअल हेल्थ’ अशा भारदस्त नावाची एक संस्था देखील स्थापन झाली. औषध कंपन्यांची
तळी उचलून धरणं हे हिचं काम. लगोलग विरुद्ध गटाकडून लैंगीकतेच्या या
वैद्यकीयीकरणाविरुद्ध, बाजारीकरणाविरुद्ध चळवळी सुरु झाल्या.
फ्लिबेनसेरीनचा जन्म २००९चा
पण एफ.डी.ए. मान्यता मिळायला २०१५ उजाडलं. छप्पन प्रश्न आणि सतराशे साठ शंका.
शिवाय यात मोठं अर्थकारण, औषधकारण, स्त्रीकारण, पुरुषकारण गुंतलेलं. एफ.डी.ए.च्या
मान्यतेला जसजसा वेळ लागायला लागला तसतसं वेगवेगळी मंडळी आपआपली मत अधिकाधिक
चढाओढीनं मांडायला लागली. कंपन्यांच्या आश्रीतांनी मान्यता ताबडतोब मिळावी असा सूर
लावला तर स्त्रीवादी आघाडीतल्या ‘आवर बॉडीज
आवर सेल्फ्स’वाल्यांनी अमान्यता ताबडतोब मिळावी असा!
‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द
स्टडी ऑफ वुमेन्स सेक्सुअल हेल्थ’नं चार हजारावर सह्यांचं निवेदनच एफ.डी.ए.ला
पाठवलं. ताबडतोब मान्यता मिळावी असं ह्यात हिरीरीनं मांडलं होतं. मग सह्यांची
प्रतीमोहीम निघाली. पण मान्यता देवू नये म्हणणाऱ्या ६५२च सह्या मिळाल्या. वय,
नातेसंबध, प्रणय वगैरेमुळे सुस्तावलेली कामेच्छा जर गोळीसरशी जागृत होणार असेल तर
ही तारुण्यगुटी हवीच होती सगळ्यांना. ‘फायदा नाही झाला तर नाही वापरली गोळी पण
उपलब्ध असायला काय हरकत आहे?’ असा हा विचार.
स्त्रीवाद्यांविरुद्ध एका
गटानी ‘फिट्मफाट मोहीम’ (even the score) राबवली. ‘स्त्रियांसाठी जीवनावश्यक नसेना
का, पण ‘काम-जीवनावश्यक’ असलेल्या औषधाला मान्यता देण्यात, जाणून बुजून दिरंगाई
होते आहे! हा मुळी एफ.डी.ए.च्या लिंगभेदी दृष्टीकोनाचा सणसणीत पुरावाच आहे!!’ असा
सनसनाटी आरोप केला गेला. ‘मेली पुरुषांसाठी तेवढी हीsss सारी औषधं (त्या वेळी
पुरुषांसाठी काम विकारांसाठी तब्बल २६ औषध मान्य होती.) आणि आम्हां बायकांना काहीच
नाही? पुरुषी षड्यंत्रच आहे मुळी हे! बायकांची वेळ आली की अस्सेच कच खातात मेले
सगळे पुरुष! आत्ताच्या आत्ता मान्यता दया, दया, दया!!!’ असा एकूण युक्तीवाद होता. पुढे
या फिट्टमंफाटवाल्यांनी सोळा खासदारही आपल्या बाजूला जुंपले, साठहजारावर सह्या
गोळा केल्या, आणि प्रचाराची राळ उडवून दिली.
एकूणच मान्यता दिली तरी
पुरुषी षड्यंत्र आणि न द्यावी तरीही पुरुषी षड्यंत्र असा मामला होता. या द्वादश
यंत्रात पुरुष अगदी भरडून निघत होते! २०१४च्या ऑक्टोबरमध्ये एफ.डी.ए.ने या प्रकरणी
दोन दिवस सुनावणी घेतली. अनेक संस्था, गट, तज्ञ, अधिकारी यांच्यासह काही कामनिरसताग्रस्त
अशा पेशंट बायकाही तिथे हजर होत्या. अर्थात त्यांच्या येण्याजाण्याचा खर्च
स्प्राउट या औषधकंपनीनी केला होता!
शेवटी १८ विरुद्ध ६ असा
निकाल फ्लिबेनसेरीनच्या बाजूनं लागला!!
दुसऱ्याच दिवशी फ्लिबेनसेरीन
बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर ४६% ने वधारले!!!
No comments:
Post a Comment