Saturday, 21 November 2015

शेल्फारी डॉट कॉम या साईटबद्दल सातारा आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं माझं भाषण.


शेल्फारी डॉट कॉम

भेळेचा कागदही वाचल्याशिवाय न टाकणाऱ्या माझ्यासारख्या पुस्तकातल्या  किड्याला सातत्यानं खाद्य पुरवणारी साईट म्हणजे शेल्फारी डॉट कॉम. पण भेळेचा कागदही टाकाऊ नसतो हे खरच आहे. एकदा अशाच एका कागदावर ‘लिंग बदला’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘नर’चं लिंग ‘वानर’ असं बदललेलं होतं. त्या भेळेपेक्षा हा विनोद चटकदार होता.
शेल्फारीवर तुम्ही गेलात की एक बुकाचं शेल्फच तुमच्या नावानं टाकलं जातं.
आपण वाचलेली पुस्तक या शेल्फात आपणच हारीनं लावायची, आवड नावड कळवायची. आवडलेली पुस्तकं का आवडली आणि नावडलेली का आवडली नाहीत याची चर्चाही आपण करू शकतो. या चर्चेत अन्य समानधर्मा मंडळी बसल्या कॉम्प्यूटरवरून सहभागी होऊ शकतात. भारतीयांच्या संदर्भात बोलायचं तर सध्या चेतन भगत हा इथला ई-सम्राट  आहे. शिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम याचं ‘अग्निपंख’ ही नेटकरांच्या मनात सातत्यानं आहेच. ‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ अशा आवेशात बलशाली, समृद्ध आणि महासत्ता भारत असं स्वप्न पेरणाऱ्या कलामांना सलाम करणारी अनेक पत्रं आपण इथे वाचू शकतो. या पत्रातला मजकूर किंवा अन्य काही भावलं तर ते मित्राला ई-मेल करायची किंवा डाउनलोड करायचीही इथे सोय आहे. पुस्तकाचं व्यसन असणाऱ्या अन्य मित्रांनाही आपण या साईटवर आमंत्रित करू शकतो. शेल्फारीचं साप्ताहिक माहिती पत्रकही  आपल्या ई-टपालात येऊन पडायची सोय आहे. आपल्या वाचण्यातल्या किंवा आवडत्या पुस्तकांबद्दल अन्य शेल्फारीकरांनी काही अभिप्राय पोस्ट केला की त्याची सूचनाही आपल्याला ताबडतोब मिळते. मुख्य म्हणजे हे सारे अभिप्राय वगैरे प्रायः सामान्य भाषेत असतात. क्लिष्ट, गुंतागुंतीची, शब्दबंबाळ भाषा; समीक्षा, सौंदर्यशास्त्र वगैरेतल्या विद्वतजड संज्ञा वगैरे प्रकार नाही. सामान्य वाचकांनी सामान्य वाचकांसाठी चालवलेली ही साईट आहे. इंग्रजी साहित्य हे अभ्यास म्हणून नाही तर ध्यास म्हणून वाचणाऱ्यांसाठी ही साईट म्हणजे, पुलंच्या काकाजींच्या भाषेत ‘मोठा मझा आहे’; आणि पी.जी. वूडहाउसच्या भाषेत सांगायचं तर ‘it gives a song on your lips and a spring in your stride! एखाद्या लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव अर्धवट आठवत असेल तर तेवढ्याही सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया या साईटवर साधली आहे. आपण जॅकल असा शब्द दिला की शीर्षकात जॅकल असलेल्या पुस्तकांची आणि संबंधित लेखकांची यादीच आपल्यासमोर झळकते. ही एक मोठीच सोय आहे. विशेषतः प्रा. विसरभोळे लोकांसाठी. आवडलेलं पुस्तक इथल्या ‘ई’कानातून ‘ई’कत घ्यायचीही सोय आहे. इकानावरून आठवलं पु. भा. भावे दुकान ऐवजी विकान हा शब्द वापरत म्हणे. दुकान या शब्दाची व्युत्पत्ती मराठीशी नातं सांगणारी नाही म्हणून हा बदल. पण आता इंटरनेटच्या ई-बाजारात दुकानही गेलं, विकानही गेलं, हाती उरलं ईकान!

या साईटचा पत्ता मला माझ्या हॉन्कॉन्ग मधल्या मित्रानं दिला, त्याला त्याच्या मेलबोर्नच्या मित्रानी ह्या साईटची शिफारस केली होती आणि या मेलबोर्नकराला आमच्या शेजारच्या वाईकर  प्राध्यापकांनी आमंत्रित केलं होतं. जग जवळ आलं म्हणतात ते हे असं. तुम्हीही या साईटवर जाऊ शकता. कुणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. जा आणि पुस्तकांच्या आणि पुस्तक प्रेमींच्या गर्दीत हरवून आणि हरखून जा.

No comments:

Post a Comment