Friday, 6 November 2015

च्यायला

च्यायला
                       डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक,वाई.  मोबा: ९८२२० १०३४९


                लखनौच्या झगमगाटातून टॅक्सी बाहेर आली आणि एका आडमाप स्पीड ब्रेकरवर गचका खाऊन एका एकलकोंडया रस्त्याला लागली. लखनवी मेहमानवाजीची तारीफ ऐकून असलो, तरी उत्तरप्रदेश म्हणजे अनागोंदी हे समीकरण मनात होतच. टॅक्सीवाला आपल्याला फिरवत तर नाही ना, या विचारात रस्त्यावरच्या खुणा मी मनात बिंबवण्याच्या प्रयत्नात होतो. इतक्यात पाटी दिसली; रायबरेली ५८ कि.मी. मग इंदिराबाई आणि त्यांची कारकीर्द आठवत असताना टॅक्सी उजवीकडे वळली आणि दिव्याच्या उजेडात अक्षरे चमकली: ‘संजय गांधी स्नातकोत्तर आयुर्विज्ञान संस्था, जेनेटिक्स् विभाग.’ माणसांची जन्मजन्मांतरीची नाती गुंफणारे ते डी.एन.ए.चे चिरपरिचित गोफ त्या विभागाच्या पाटीवर झळकत होते.
               माझ्या चित्तवृत्ती उल्हासित झाल्या. जेनेटीक्सच्या एका पंधरा दिवसांच्या कोर्ससाठी मी इथे प्रवेश घेतला होता. तसं माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जेनेटिक्सच्या ज्ञानानं काही फारसा फरक पडणार नव्हता. जे ज्ञान आणि कौशल्य मला प्राप्त होणार होतं, त्याचा वापर करण्याची वेळ क्वचितच येणार होती. पण जेनेटीक्सबद्दल एक सुप्त आकर्षण होतं मला. निव्वळ मानवीच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीचं नियंत्रण त्या डी.एन.ए.च्या दोन दोऱ्याचे गोफ साधतात, हे अचंबित करणारं होतं. यातलं विज्ञान तर आव्हानात्मक होतंच पण त्यातलं काव्य मला अधिक भावत होतं. त्यातच माहितीच्या स्फोटामुळे अनेकविध शक्यता निर्माण झाल्या होत्या. कुठलं झाड कुठे वाढेल, फळेल, फुलेल, एवढचं नाही, तर कुणाचा जीव कुणावर जडेल, फळेल आणि फुलेल हेही जणू काही भविष्यात ओळखता येणार होतं.
                 झाडाझुडपांनी वेढलेला ओसाड रस्ता संपताच एका बैठ्या इमारतीपुढे टॅक्सी उभी राहिली. सगळीकडे किर्र शांतता होती. ‘अतिथी निवास’ अशा पाटीवर एक बल्ब तळपत होता. लांब झाडीतून हॉस्पिटलच्या उत्तुंग इमारती माना वर करून करून परिसर न्याहाळत होत्या. त्यांच्या खिडक्यांचे सहस्त्र डोळे अंधारात चमकत होते. लांबवर हिरवळीवर चार खुर्च्याच्या संगतीत बसलेला एक माणूस माझ्याकडे मान वळवून पाहत होता. माझ्या येण्यानं त्याचा एकांत संपला होता. पण हे त्याला आवडलं नसावं, असं मला आपलं उगीचच वाटलं. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला आणि त्यानं मान वळवली.
                “आप है डॉक्टर शांतनुजी अबयंकर?” स्वागत कक्षातील कोणी कर्मचारी मला पाहून पुढे आला. आगत-स्वागत, खोली ताब्यात घेणं वगैरे सोपस्कार आटपून मी जरा ताजातवाना झालो.
              खोलीच्या खिडकीतून तो हिरवळीवरचा माणूस आता मला पाठमोरा दिसत होता. अजूनही फोनवर तो कुणाशी आणि काय काय बोलत होता कुणास ठाऊक; पण त्याचं सगळं अंग थरथरत होत. तो हसतोय का हमसून हमसून रडतोय, हे काही कळत नव्हतं. उद्यापासूनच्या कोर्ससाठी काही वाचन करायचं होतं. पण मग खोलीत एकटंच कुठे वाचत बसणार, म्हणून फाईल घेऊन मी व्हरांड्यात जाऊन खुर्ची शोधत होतो. इतक्यात लाईट गेले!
              उजेडाने अंग काढून घेताच आसपासची सृष्टी अधिकच गहिरी झाली. रातकिड्यांनी टिपेचा सूर लावला, आभाळात चांदण्यांचा खच पडला आणि आता पुढे काय करावं अशा विचारात मी इकडे तिकडे बघत असतानाच हिरवळीवरच्या खुर्च्यांच्या दिशेने हाक आली. “आईये डागदर साब! आइये ‘मराठी माणूस’!!”
               या अजब हाकेनं मी दचकलो. त्या हिरवळीवरच्या माणसाशी बोलणं आता भागच होतं. जरा नाखुशीनेच मी तिथे पोहचलो. माझ्यासाठी अदबीनं खुर्ची पुढे करत त्यानं स्वतःची ओळख करून दिली; “मी डॉ.खन्ना. From Gwalior. Presently working with the government of Pondichery.”
             शेकहॅन्ड करत बसतानाच मी विचारलं, “लेकिन आपने ये कैसे जान लिया की मैं महाराष्ट्र से हूं?”
              “आप की गाली से!”
              “मतलब? मैने कब गाली दी?”
              “आप बाहर आए और बिजली चली गयी!”
              “तो?”
               “तो आप बोले ‘च्यायला’!!
              च्यायला तो महाराष्ट्र की निशाणी है!”
              आम्ही दोघं मोकळेपणानं हसलो आणि मग गप्पांचा ओघ वाहता झाला.

                      डॉ.खन्ना होते बालरोगतज्ज्ञ. मध्यम उंची, मध्यम बांधा मध्यम केस, चौकड्यांचा नाईट गाऊन. थोडासा मेकअप् केला असता तर अगदी लक्ष्मणच्या व्यंगचित्रात शोभले असते खास. गप्पांची मैफल जमवण्यात अगदी वाकबगार होता हा माणूस. ग्वाल्हेरच्या चाळीत लहानाचा मोठा झालेला. तिथल्याच मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेला. पुढे इंग्लंड, इराण, कतार वगैरे जग फिरून पाँडीचरी सरकारच्या सेवेत असलेला. माझ्यासारखे तेही ‘जेनेटिक्स- जेनेटिक्स’ खेळायला आले होते.
               स्वतःबद्दल भरभरून बोलणाऱ्या या आसामीला माझ्यात मात्र विशेष रस नव्हता. माझी छान प्रॅक्टिस, छान दवाखाना, छान बायको, छान मुलं वगैरे बाबत त्यांनी काहीच विचारलं नाही आणि मी काही बोललो, तर काहीतरी विचित्रासारखे प्रश्न विचारत होते. मधेच त्यांनी मी ‘केसरी’ वाचतो का ? असं विचारलं. ‘मुंडावळ्या’ हा शब्द त्यांना पाहिजे होता. मऊ भात, साजूक तूप, मेतकूट वगैरे बाबतीतही त्यांना खूपच उत्सुकता होती. नऊवारीत बायका सगळ्यात सेक्सी दिसतात, असं त्यांचं मत मला त्यांनी न विचारताच ऐकवलं. मध्येच एकदा ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे’ही ओळ त्यांनी ‘वरे एक त्यांचा दुजा शोक वाहे’ अशी ऐकवली. मराठी संस्कृतीबद्दल आदर, कौतुक, कुतूहल आणि अज्ञान याचं हे रसायन सुरूवातीला आंबटगोड लागलं, तरी नंतर नंतर कडवट लागायला लागलं. शेवटी गाडी गणपती उत्सवावर घसरली आणि दुर्वा, केवडा, आरती करता करता त्यांनी मला चक्क उकडीच्या मोदकाची रेसिपी विचारली.
                   मी चक्रावून गेलो. “मोदक मला खाता येतात, करता येत नाहीत”, हे सांगितलं आणि “मराठी संस्कृतीबद्दल तुम्हाला एवढी उत्सुकता कशी?” हे मी ‘नसत्या चांभार चौकशा कशाला?’च्या सुरात विचारलं.
              एक दीर्घ उसासा टाकून डॉ.खन्ना बोलू लागले.. “१६०० सालची गोष्ट ग्वाल्हेरच्या एका साध्या चाळीत राहत होतो. मेडीकलला होतो. त्यावेळी घुमा होतो.”
                     यावर मी हसलो. आजच्या त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता कधीकाळी ते घुमे होते, यावर विश्वास बसणं कठीणंच होतं.
               “म्हणजे आजच्यापेक्षा थोडा कमी बोलायचो.” माझ्या हसण्याचा रोख ओळखून ते म्हणाले. पुढे अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांचा जीवनपटच माझ्यासमोर उलगडला आणि अगदी प्रामाणिकपणे, निष्कपट भावनेने मोकळ्याढाकळ्या शैलीत.
                ग्वाल्हेरला त्यांच्या शेजारीच साठे म्हणून एक मराठी घर  होतं आणि त्या घरात मनोरमा नावाची तारुण्याच्या ऐन बहरतील शेजारीणही होती. अशा परिस्थितीत जे व्हायचं तेच झालं. दोघांनीही एकमेकांना मनोमन पसंत केलं. चोरटे कटाक्ष, चोरटं हसू आणि चोरटे स्पर्श यापुढे मात्र प्रेमाची गाडी सरकेना. ग्वाल्हेरच्या मध्यमवर्गीय चाळीत ६० साली एवढचं शक्य होतं. एकमेकांशी बोलणं, फिरणं वगैरे दूरची बात. शिवाय मितभाषी खन्ना कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते आणि पास झाल्याशिवाय मुलीला मागणी घालणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. आपल्या आईजवळ मात्र त्यांनी हे सारं सांगितलं. तिचा अजिबात विरोध नव्हता. फक्त ‘परीक्षेनंतर बघू’ असाच पोक्त सल्ला तिनेही दिला. पण खन्नांचा साठेंच्या घरातील राबता वाढतच गेला. ते निमित्तालाच टेकले होते. मनोरमाच्या मनातही वेगळं काही नव्हतं; हे तिच्या देहबोलीतून स्पष्टच दिसत होतं.
              मग मनोरमाबरोबर मनोरमाच्या घरानंही डॉ.खन्नांचा मनात घर केलं. नित्याने येणारा ‘केसरी’ असो की मनोरमेच्या आई-वडीलांची मुंडावळ्या घातलेली तसबीर असो; मऊ भाताची रटरट असो की उकडीच्या मोदकांचा नैवेद्य; डॉ.खन्नांच्या मनात या साऱ्या गोष्टींनी रूप, ध्वनी, रस आणि गंधामार्फत ठाण मांडलं. आपल्या प्रियतमेसाठी मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा प्रेममय अभ्यास त्यांनी सुरु केला. जरा काही घडलं-बिघडलं, की ‘च्यायला’ ही त्यांच्या जिभेवर येऊ लागलं. पण काही म्हणता काही केल्या हे मूकं प्रेम पुढे काही सरकेना. अभ्यास, अंतरजातीय, अंतरधर्मीय आणि अंतरप्रांतीय प्रेमाचं टेन्शन, घरची बेताची परिस्थिती, आईवडिलांप्रती वाटणारी जबाबदारी या साऱ्या गुंत्यात प्रेमाच्या रेशीमधाग्यांची पार गुंतवळ होऊन गेली. मनोरमेनं काही करण्याचा प्रश्नच नव्हता! ती मुलगी होती; परंपरेनं आणि मनोधारणेनं, सामाजिक संकेतानं आणि चाळीतल्या नीतिनियमानं पाहिलं पाऊल पुरुषानेच उचलणं अभिप्रेत होतं.
               परीक्षेचं वेळापत्रक लागलं आणि डॉ.खन्ना चाळ सोडून अभ्यासासाठी होस्टेलवर मुक्कमी गेले. तिकडे परीक्षा ऐन भरात आलेली आणि इकडे सारं अघटीतच झालं. मनोरमाचे वडील अचानक जागच्या जागी कोसळले आणि गेलेच. इंदूर आणि दिल्लीहून तिचे दोन्ही मामा आले. आपल्या विधवा बहिणीवरील प्रसंग त्यांनी ओळखला. घरातला कर्ता पुरुष गेलेला; आधीच बेतासबात असलेली परिस्थिती आणि त्यात अशी आडवयाची पोर घरात. महिन्यात शुभकार्य उरकलं नाही, तर पुढे वर्षभर काही करता येणार नाही असा दंडक. दोन्ही मामांनी मग एक चांगलंसं; मनोरमेला शोभेलसं स्थळ शोधलं आणि वडील गेल्याच्या अठराव्या दिवशीच तिचं लग्न उरकून टाकलं. पुढे आठवडाभरानं परीक्षा संपवून घरी आल्यावरच खन्नांना हे सारं समजलं.
                आता वेळ निघून गेली होती. आईला त्यांनी छेडलं, पण “जहाँ गृहस्थी उज़ड गई वहाँ मैं पंजाबन् अपनी रट् कैसे लगती?” हा तिचा प्रश्न. पुढे सारेच दशादिशांना पांगले. वर्षभरातच मनोरमेच्या घरी पाळणा हलला आणि तिच्या सोबतीला म्हणून साठेबाई गेल्या ते बिऱ्हाडबाजलं आवरूनच. डॉ.खन्नाही बालरोगतज्ज्ञ झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही इंग्लड, कतार, इराक, पाँडेचरी वगैरेत राहून सध्या पुन्हा ग्वाल्हेर मुक्कमी होते. या साऱ्या प्रवासात डॉ.खन्नांना लग्न करायला वेळच मिळाला नाही किंवा त्यांनी तो मिळू दिला नाही. जी अनुभूती मनोरमेच्या त्यावेळेच्या ओझरत्या सहवासात मिळत होती, ती इतर बायकांच्या शरीरसंगातही मिळत नव्हती.
               आज इथे पोहचताच त्यांच्या आईने त्यांना मोबाईलवर एक वेगळीच बातमी दिली. पंचवीस वर्षांनंतर साठेबाई ग्वाल्हेरला परत आल्या होत्या. मनोरमा दिल्लीत होती! तिचा फोन नंबरही आईनं दिला. धडधडत्या काळजानं त्यांनी फोन केला. तो उचलला मनोरमाच्या मुलीनं, श्वेतानं. मनोरमा गाडी चालवत होती. लेकीला बारावीच्या क्लासला सोडायला चालली होती. कुणाचा फोन वगैरे सांगितल्यावर ‘मम्मी नंतर फोन करेल’, असं सांगून तिनं फोन ठेवला. पाचच मिनिटांत मनोरमाचाच फोन आला. “जी बोलीए” असं जेमतेम म्हणत ती जी रडायला लागली ते पुढे पंधरा मिनिट थांबेचना. डॉ.खन्नाही इथे मुसमुसत रडत होते. जे कधी एकमेकांना शब्दांत सांगता आलं नव्हतं, ते मोबाईलवरच्या हुंदक्यातून स्पष्ट होत होतं. दोन जिवांचे गुंफलेले रेशिमधागे गुंततच जात होते. या साऱ्या संवादात शब्द नव्हते. एक जीव लखनौच्या जेनेटिक्स सेंटरच्या हिरवळीवर आणि दुसरा दिल्लीच्या कुठल्याशा पार्कींग लॉटमध्ये. बऱ्याच वेळानं दोघं भानावर आले. परस्परांची भौतिक चौकशी झाली आणि ‘असाल तिथे सारे सुखी रहा’, या शुभेच्छांनी संभाषणाची सांगता झाली.
                   इतकं हलकं तरल त्यांना कधीच वाटलं नव्हतं. आपली प्रियतमा तिच्या संसारात सुखी आहे, ही भावना मनाला सुखावत होती. प्रौढपणी सारेच संदर्भ किती बदलतात! त्या हिरवळीवर मग साठ्यांच सारं घर रस-रंग-गंधासकट डॉ.ख्न्नांच्या मनात रुंजी घालू लागलं.
                केसरी आणि मुंडावळ्या, मऊ भात आणि मोदक सारं अचानक त्यांच्या विचारांचे विषय झाले आणि त्यात कानावर माझी शिवी आली, ‘च्यायला!’
                 ह्या ‘च्यायला’नं ख्न्नांच्या अंत:करणातील ती तार बरोब्बर छेडली आणि त्यांच्या आठवणींच्या मैफलीत मला शरीक करून घेतलं त्यांनी.
                 माझ्या मनात आलं; मी कोण कुठला अपरिचित माणूस आणि या माणसानं आपलं आयुष्यभर जपलेल गूज माझ्यासमोर का बरं उघडं करावं? मला ठाऊक नाही, पण पुढे पंधरा दिवस जेनेटिक्स विभागात डीएनएचे ते जन्मजन्मांतरीचे गोफ सर्व काही व्यापून होते आणि माझ्या मनात प्रत्येकाचे गुंतलेपण रुजवत होते.
डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक,वाई.  मोबा: ९८२२० १०३४९


2 comments:

  1. जबरदस्त कथा आहे सर,आज सकाळीच मी रेडिओ वर ऐकली. शेवटपर्यंत जागेवर बसवुन ठेवले होते. 💯👌👍☺🙏

    ReplyDelete
  2. सर मस्त लिहलं वाचून संपवलं टॉप to bottom☺️

    ReplyDelete