Thursday 12 November 2015

जमात जी.पीं.ची

जमात जी.पीं.ची
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, पिन. ४१२ ८०३.
मोबाईल क्र. ९८२२०१०३४९

    एक दिलखुलास संध्याकाळ उमलत असते. डॉक्टरांचे घोळके हास्यविनोदात रमलेले असतात. शीत तापमानाच्या उष्ण पेयांचा आस्वाद सोबतीला असतोच. अशाच एखाद्या घोळक्यातून अचानक हास्यस्फोट होतो. अगदी भला मोठा हास्यस्फोट, एक दोन स्फोटग्रस्त मंडळी लोटपोट हसून जमीनदोस्त होतात आणि टाळ्या घेत-देत दाद दिली जाते... ‘या जि.पीं.ची डोकी मोठी और चालतात बरं!’
              जी.पी. ही एक वेगळीच जमात आहे. एम्.बी.बी.एस्. जी.पी. आता कमी झाले आहेत. बहुतेक बी.ए.एम्.एस्. किंवा बी.एच्.एम्.एस्. डीग्रीवाले असतात. बहुतेकांच्या बायकाही अशाच. बहुतेकजणांनी एम्.बी.बी.एस्.ची स्वप्नं पाहिलेली असतात. प्रवेश थोडक्यात हुकलेला असतो. किंवा अपत्याला डॉक्टरंच करायचं असा चंग पालकांनी बांधलेला असतो. काहींची घरची प्रॅक्टीस असते. गादीला वारसा हवा असतो. काही तालेवार घरचे असतात. प्रॅक्टीस नाही केली तरी चालेल पण नावामागे ‘डॉ.’ असल्यास लग्नाच्या बाजारात मुलाचा भाव आणि मुलीची पत वाढते असा हिशोब असतो. काही मात्र भक्तिभावाने मिळालेल्या अॅडमिशनने पावन होऊ पहातात. मनोभावे अभ्यासही करतात. कॉलेजची फुलपाखरी वर्षं भुर्रकन उडून जातात आणि सोनेरी स्वप्नांवरचा वर्ख त्याहीपेक्षा झर्रकन् झडून जातो.
            सिनिअर मंडळींकडून काय काय ऐकायला, पहायला मिळतं ते अविश्वसनीय असतं. अचंबित करणारं असतं. भयसूचकही असतं. ज्यांच्याकडून शिकायचं ते शिक्षक आणि जिथून शिकायचं ते दवाखाने (असलेच तर) रिते असतात. शिकवणे म्हणजे ‘मोले घातले रडाया’ सारखा प्रकार. जे शिकवलं जातं त्यावर शिकवणाऱ्यांचाच पूर्ण विश्वास नसतो. स्वतः वर्गात घातलेल्या दळणावर ह्यांची स्वतःचीच चूल पेटत नाही आणि पोळी पिकत नाही. बरेचसे शिक्षक हे जी.पी. करतात हे सत्य मग रिचवलं जातं. व्यवहारी मंडळी यातून मग काय घ्यायचा तो बोध घेतात आणि भावूक मंडळी थोड्या उशिराने का होईना हे हलाहल पचवतात.
            पदवीच्या भेंडोळ्यात विद्यापीठानं ठासून भरलेलं ज्ञान, हे दोन वेळा पोट भरायला निरुपयोगी आहे ह्या निर्णयाप्रत बहुसंख्य मंडळी येतात... आणि मग जी.पी. करण्याच्या दृष्टीने व्यूह मांडला जातो... मांडावाच लागतो.
             गावातल्या एम्.डी./एम्.एस्. डॉक्टरांकडे मग धाव घेतली जाते. मिळेल त्या पगारात, पडेल ती कामं करण्याची तयारी असते या मुलांची. स्वस्तातले हुशार हरकामे मिळाल्यामुळे ‘पेशालिस्ट’ डॉक्टरही खूष आणि वैद्यक विश्वात डोकावून पहाण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थीही खूष. वर्गातल्या पोपटपंचीला आता प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळते. वर्गातल्या शिक्षणाची खुमारी वाढते. तहानलेली ही मुलं मग आधाशासारखं कामावर तुटून पडतात. झपाटून ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करतात. आया, नर्सेस, डॉक्टर वगैरेंची सारी काम टिपकागदासारखी टिपून घेतात. ‘मी’पण अर्पूनच ती दवाखान्यात काम करतात. त्यांना कसलाही गंड नसतो. असलाच तर न्यूनगंडच असतो. एम्.डी./एम्.एस्. मंडळी त्यांच्या कामावर खूष असतात. २-४ वर्षे एकाच ठिकाणी राहिली तर ही मुलं डॉक्टरांच्या अनुपस्थित ८०% कामं निश्चितपणे सांभाळू शकतात. अगदी आत्मविश्वासपूर्वक, बिनचूकपणे.
              एवढे दिवस एका ठिकाणी सहसा कुणी टिकत नाही. सहा महिने फिजिशियन, सहा महीने सर्जन, आणि सहा महिने पेडिएट्रीशिअन असा अनुभवाचा फॉर्म्युला जी.पी. सुरु करण्यासाठी पुरेसा समजला जातो. मुली मात्र बऱ्याच काळ एकेका दवाखान्यात दिसतात; विशेषतः स्त्री रोग तज्ञांकडे. त्यांचंही बरोबर आहे. ‘बाई आहे’ आणि ‘डॉक्टर आहे’ एवढ्या क्वॉलिफिकेशनवर त्या ‘बायकांच्या डॉक्टर’ म्हणून सहज एस्टॅब्लिश होतात, दणकून प्रॅक्टीस करतात. बक्कळ पैसा कमावतात. बरेचदा नवऱ्यापेक्षा जास्त! ही संधी मुलांना नसते. ते असे ‘श्री रोग तज्ञ’ होऊ शकत नाहीत. लिंगभेद म्हणतात तो हाच. ही डॉक्टरांना पेशंटकडून मिळणारी लिंगभेदी वागणूक!! अशा स्वयंघोषित Gynecologist बायकांना पेशालिस्टांच्या जगात Womenologist म्हंटलं जातं. कारण त्यांना स्त्रीरोगशास्त्रापेक्षा स्त्रियांची अधिक माहिती असते (They know more about women than about gynecology!)
              अशा पद्धतीने २-३ वर्ष कष्टपूर्वक मिळवलेलं ज्ञान पाजळत हा येरू जी.पी. व्हायला तयार होतो. या मंडळींची गीता आणि गाथा म्हणजे CIMS/MIMS आणि Golwala. ही पुस्तकांची नावे आहेत. यात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आजारांवर, सर्वसाधारणपणे करण्याच्या उपचारांची, सर्वसाधारण रूपरेषा दिलेली असते. ही पुस्तके आवर्जून जवळ बाळगली जातात. यथावकाश डॉक्टरोपयोगी, रुग्णोपयोगी, इंजेक्शनोपयोगी, सलाइनोपयोगी साहित्याची जुळणी झाली की दवाखाना थाटला जातो.
              कमी फी, भरपूर उधारी आणि सगळ्या तक्रारींवर औषध हे सुरुवातीचे यु.एस.पी. (unique selling proposition) असतात. हे केलं नाही तर दवाखान्यात कुत्रं देखील फिरकत नाही. शिवाय वाताचे इंजेक्शन (Inj Calcium), शक्तीचे इंजेक्शन (Inj B12), अशक्तपणासाठी सलाईन (म्हणजे खरंतर मिठाचं पाणी) वगैरे मालही विक्रीला असतो.
            अंगी धाडस आणि थोडासा पूर्वानुभव असेल तर यातली काही मंडळी Penicillinची इंजेक्शन देतात. किंबहूना काही दशकांपूर्वी ही इंजेक्शन देणारे आणि न देणारे असे जीपींचे दोन वर्ग होते. देणाऱ्यांकडे, न देणारे आदरानं पहात असत. आता अॅन्टीबायोटिक्सचे इतके आणि इतके सुरक्षित प्रकार आले आहेत की Penicillin मागे पडलं आहे. याचप्रमाणे जागेवर भूल देवून बारीक सारीक ऑपरेशने करणारे आणि न करणारे, शिरेतून इंजेक्शन देणारे आणि न देणारे, स्टिरॉइडस् देणारे आणि न देणारे असेही वर्गीकरण करता येईल. अफाट दारिद्र्य, अचाट अज्ञान आणि फुकट पण अनास्थेनं ओतप्रोत भरलेली सरकारी आरोग्यसेवा, या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिस चालली नाही तरच नवल! प्रॅक्टिस चालते, अगदी धो धो चालते.
            सुरुवातीला बरेच टक्के टोणपे खावे लागतात. ‘गरीबकी बीबी सबकी भाभी’, या न्यायानं सगळ्यांशी छान जुळूवुन घेतलं जातं. पेशंटशी, केमिस्टशी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हशी, जवळच्या बड्या हॉस्पिटलशी, पेशालिस्ट डॉक्टरांशी वगैरे... या सगळ्यांत डॉक्टरांना टोप्या घालण्यात वस्ताद म्हणजे पेशंट! पण लवकरच अनुभवाच्या पाठशाळेतील विचार धन गाठीला लागतं. ‘पहिल्या पाच वाक्यातील कोणत्याही एका वाक्यात पेशंटने डॉक्टरांची स्तुती केली,  तर तो या खेपेला पैसे देणार नाही असे समजावे!’ हे असेच एक विचार मौक्तिक.
                अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला सोडवून घेण्यात ही मंडळी वाकबगार असतात. एकदा इंजेक्शन देताना पुरेशी काळजी न घेतल्यामुळे त्या ठिकाणी गळू झालं. पेशंट थंडी, ताप, वेदना वगैरेंनी हैराण होऊन शिव्या घालायला म्हणून परत आला; पण डॉक्टरांनी शांत चित्तानं, सुहास्य वदनानं त्याचं स्वागत केलं आणि मधाळ भाषेत त्याला समजावलं की, ‘बाबारे, ज्यास तू गळू समजतोस ते अन्य काही नसून, तुझ्या शरीरातली सगळी घाण मी माझ्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे एका बिंदूपाशी आणून ठेविली आहे. आता त्या घाणीचा निचरा करताच तुला तात्काळ आराम पडेल.’ डॉक्टरांनी गळू कापल्यावर अर्थातच पेशंटला तात्काळ आराम पडला!!
               दिसामासानी प्रॅक्टिस वाढत जाते. चिकाटी, धडाडी, कष्टाळूपणाच्या प्रमाणात मग दवाखान्याचीही वाढ होते. सुरुवातीला निव्वळ बाकडी आणि मग सलाईच्या खाटा असणाऱ्या दवाखान्यात आता डिलिव्हरीचं टेबल येतं, पाठोपाठ ‘कुरटेशन’ची (Curetting) हत्यारे येतात. गर्भपात, हर्निया, अपेंडिक्स, टॉन्सिल्स अशा शस्त्रक्रिया पेशालिस्टांना बोलावून सुरु केल्या जातात. ही सारी विन-विन सिच्युएशन असते. अशा दवाखान्यामुळे पेशंटला घरानजिक आणि स्वस्त सेवा मिळते. जी.पी.लाही चार पैसे मिळतात आणि व्हिजिटिंग पेशालिस्टलाही दोन(च) पैसे मिळतात. पेशलिस्टांना स्वतःच्या दवाखान्यातल्यापेक्षा कमी मिळतात. कौशल्याच्या मानाने फारच कमी मिळतात. पण शेवटी ज्याच्या हाती पेशंट तो XXX! कल्हई करणं सोपं आहे पण कल्हईला भांडी जमवणं अवघड आहे... आणि कल्हईला भांडी जमवण्याचं कसब ह्या जी.पीं.कडे असतंच असतं.
              त्यातील काही धाडसी मंडळी मग एक पाऊल पुढे जातात. स्वतः निरनिराळ्या शस्त्रक्रिया शिकतात आणि करतात सुद्धा. यांना दाद द्यायला पाहिजे. आमचे सर्जरीचे सर सांगायचे की सर्जरी ही नाहक glorify केलेली branch आहे. सर्जरी गवंडीकामाइतकीच सोपी आहे. एकाच प्रकारची शस्त्रक्रिया पाहून, अॅसिस्ट करून कुणालाही ती करता येऊ शकते. म्हटलं तर खरं आहे; पण जेमतेम क्वॉलिफीकेशन असताना, पेशंटच्या जीवाची जोखीम घेवून शस्त्रक्रिया करणं, यासाठी XXत दम असावा लागतो आणि तो जी.पीं.च्या xxत तो असतो.
              माझे एक जी.पी. मित्र हर्नियाची शस्त्रक्रिया फार सुरेख करतात. काही सर्जनही त्यांची सर्जरी बघायला येऊन गेलेत. आम्ही त्यांना म्हणतो देखील तुमचे बोधवाक्य ‘सर्वेपि सुखिनः संतुl सर्वे संतु हर्नियामहाःll’ असं असायला हवं. एक जण एका विख्यात न्यूरोसर्जनकडे दशकानुदशके आहेत आणि आता बऱ्याचशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही हेच हाताळतात. एकांनी ३४ वर्ष तालुक्याच्या ठिकाणी ब्लड बँक चालवली, बदलत्या कायद्यांमुळे ती बंद करावी लागली पण त्यांचे काही शिष्य अजूनही अन्यत्र ब्लड बँकींगच्या क्षेत्रात पाय रोवून आहेत. सर्जनच्या पदरी बघून बघून शिकलेली काहीजण उरलेल्या वेळात अॅनेस्थेशियाची प्रॅक्टिस करतात. उत्तम करतात.
              मुळात फार महागड्या तपासण्या परवडणारे पेशंट जी.पीं.कडे जातच नाहीत. अगदी मोजक्याच तपासण्यांमध्ये स्वतःची कौशल्ये पणाला लावून यांना निदान करावं लागतं. काही अभ्यासू मंडळी अगदी लीलया ही कामगिरी पार पाडतात. कॉलेज सुटलं तरी यांची पुस्तकाशी जोडलेली नाळ तुटत नाही. आपण जे करतोय ते आधुनिक ज्ञानाशी सुसंगत आणि योग्यच असावं असा यांचा आग्रह असतो. मग डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेस, ज्येष्ठांशी सल्ला मसलत, प्रत्येक केसच्यावेळी सविस्तर चर्चा, वगैरेतून हे स्वतःच स्वतःला तैय्यार करतात. पण अगदी कौशल्याची कमाल दाखवून जरी यांनी योग्य निदान केलं, आणि पेशंटला योग्य त्या प्रथमोपचारासह ICU, वगैरेत पाठवलं तरी यशाचे धनी होण्याचं भाग्य यांना लाभत नाही. श्रेय हे नेहमीच वलयांकित इस्पितळे पळवतात. अपश्रेयाचे धनी  मात्र हे! ही खंत फार बोचणारी असते. बरेचदा बड्या डिग्रीवाल्या डॉक्टरांपेक्षा यांची कामगिरी उजवी असते, पण लक्षात कोण घेतो?
             अर्थात अशी परिस्थिती अपवादात्मकच. बरेचदा अनुभव उलटा येतो. सुचेल त्या निदानानुसार, सुचतील ती औषधे दिल्याने बरेच घोटाळे झालेले असतात. पेशंटची परिस्थिती विचित्र झालेली असते. दरवेळी अगदी जीवावर बेतणारं किंवा गंभीरच काहीतरी होतं असं नाही पण किरकोळ घोटाळ्यांच्या त्रास पेशंटलाच भोगावा लागतो.
            असे पेशंट मग पेशालिस्टांकडे दाखवायला जातात; किंवा रितसर चिठ्ठी देवून पाठवले जातात. इथे मात्र पेशालिस्टांचा कस लागतो. पदार्थ नव्यानं तयार करणं सोपं आहे, बिघडलेला पदार्थ दुरुस्त करणं अवघड आहे. असंच काहीसं होतं. मोठ्या हिकमतीनं त्यांना योग्य निदान आणि उपाय योजना सुचवावी लागते. गंभीर घोटाळा नसेल तर बहुतेकवेळा सारं काही सावरून घ्यावं लागतं. जी.पीं.च्या चुकांवर पांघरूण घालावं लागतं. थोडक्यात तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला.
                 याला अनेक कारणे आहेत. एक तर जी.पी.कडून झालेल्या चुका निस्तरणं महत्वाचं असतं. त्यामुळे त्या चुका पेशंट देखत उगाळून पेशंटच्या मनातला अविश्वास आणि भीती फक्त वाढते. अन्य फायदा शून्य. काय गोची झाली याची समज जी.पी.ला स्वतंत्रपणे करून दिली जातेच. यामुळे पुन्हा अशी चूक टाळणं काही अंशी शक्य होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतेक पेशलिस्टांची प्रॅक्टिस जी.पीं.कडून येणाऱ्या रतीबावर अवलंबून असते. त्यामुळे जी.पी.ना दुखावणे पेशलिस्टांना परवडत नाही. खाजगीत त्यांची कितीही टवाळी केली तरी प्रत्यक्ष भेटीत ‘या सर! बसा सर!! काय म्हणताय सर!!!’ असाच मामला असतो. एकुणात ‘सर सर झाडावर आणि सरसर खाली’ असा मामला!!
               जी.पीं.चा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची पेशंटच्या मनोविश्वावर, भावविश्वावर भलतीच हुकुमत असते. एखादया पेशालिस्ट विरुद्ध चवताळलेला पेशंट शांत करायला ह्या जी.पी. लोकांच्या वाक्चातुर्याचा चांगला उपयोग होतो. पेशंटच्या मनात असलेला समज, गैर आहे हे ते सहजपणे पटवून देतात. त्याचबरोबर मनात आणलं तर एखादया पेशालिस्टाविषयी गैरसमज पसरवूही शकतात. हे सारं पेशालिस्ट ओळखून असतात त्यामुळे ते जी.पीं.ना थोडे फार वचकून असतात.
               जी.पी. आणि पेशालिस्ट यांच्यात आर्थिक हितसंबंधही असतात. गाव किती व्यापारी आहे यावर याचं प्रमाण ठरतं. मुंबईसारख्या व्यापारी राजधानीत अर्थातच सारेच हिशोब काटेकोर असतात. ‘माझे वडील जरी असले तरी तुमच्याकडे मी त्यांना पेशंट म्हणून पाठवलं होतं. त्यांना तुम्ही फुकट तपासलंत हा तुमचा चांगुलपणा आहे. त्याला मी जबाबदार नाही. वडिलांच्याही नावाचा कट मला मिळालाच पाहिजे!’ अशी ठणकावून मागणी करणारे जी.पी. भेटतात.
                कट प्रॅक्टिस, अनावश्यक इंजेक्शने, सलाईन, कमअस्सल (आणि केवळ म्हणूनच) स्वस्त औषधांचा वापर (यांना बॉम्बे मार्केटची औषधे म्हणतात) वगैरेंच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले जातात. जी.पीं.च म्हणणं असं की निव्वळ पेशंट तपासून औषध लिहून दिलं, तर पेशंट आम्हाला काहीच पैसे देत नाहीत (‘सुई नाहीतर कसले पैसे?’); दिले तरी निम्मेच देतात (‘डॉक्टर, पैसे असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो?’); उधारी बुडवतात (‘यवडी वांगी ठ्यून घ्या आन त्यो मागचा आकडा कटाप करा!’); काहींना भरपूर वेळ द्यावा लागतो (‘तुमच्या त्या पेशालिस्टांना बोलायला सुद्धा वेळ नव्हता. त्यांनी या तपासण्या केल्यात, आता तुम्हीच त्या समजावून सांगा’) आणि जी.पीं.च्या वेळेलाही मोल असतं याची जाणीव रुग्णांना नसते. त्यांना तात्काळ गुण हवा असतो (‘उद्या पेरणीला/गिरणीला जाता आलं पाहिजे बरं का? स्टाँग मधीबी स्टाँग इंजेक्शन दया’); आम्ही सलाईन नाही म्हणलं तर ते उठून दुसरा डॉक्टर गाठतात, त्यांना सलाईनचं व्यसनचं लागलेलं असतं (‘एक बाटली तरी चढवाच, लई अशक्तपणा आलाय’)... अशा अनिष्ट रुग्ण संस्कृतीमुळे डॉक्टरांनाही अनिष्ट प्रकार करावे लागतात. पण सुई, सलाईन वगैरेंच्या सत्वगुणाबद्दलच्या आधुनिक अंधश्रध्दांना हीच मंडळी खतपाणी घालत असतात हे विसरलं जातं.
               ज्ञान आणि फाजील आत्मविश्वास यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. त्यामुळे बेधडक-देधडक उपचार करणारे फार. विशेषतः खेडापाड्यात (डॉ.भाषेत पेरिफेरीला). मग पिटोसीन नावचं इंजेक्शन शक्तीसाठी टोचलं जातं. ह्या इंजेक्शनमुळे प्रसुती कळा वाढतात, या न्यायाने ‘मसल पॉवरसाठी’ हे टोचलं जातं! खरं तर ह्या औषधाचा परिणाम निव्वळ गर्भ पिशवीच्या स्नायूंवर, आणि तोही निव्वळ गरोदरपणात  होतो!! इंजेक्शन हिमॅक्सील हे अचानक रक्तस्राव झाल्यास रक्त उपलब्ध होइपर्यंत म्हणून वापरलं जातं. पण धडधाकट माणसाला भारीतलं सलाईन म्हणून हिमॅक्सील लावणारे महाभाग आहेत! याचा परिणाम शून्य, उलट दुष्परिणाम होण्याचीच शक्यता जास्त. या आणि अशा जी.पीं.बद्दलच्या कथा/दंतकथा सतत चर्चेत असतात. अशाच एका जी.पी.ला अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेची इतकी चटक लागली,  की शेवटी तालुका पत्रात ‘अमुक भागात अपेंडिक्सची दुर्घर साथ’ अशी मार्मिक बातमी छापून आली. या बातमीचा ‘उतारा’ साथीवर लगेच लागू पडला. संपादक महाशयांनी मग ‘साथ आटोक्यात’ असंही छापून वर्मी घाव घातला.
               अज्ञान आणि फाजील आत्मविश्वास यांच्यातील सेतू म्हणून यांच्याकडे व्यवहारी शहाणपणही बक्कळ असतं. अशाच एका जी.पी.कडे एकदा डाव्या पायाला फ्रॅक्चर असताना उजव्या पायाला प्लॅस्टर घालण्यात आलं. पेशंटला खाटेवर टाकताच नातेवाईक बिथरले. पण या आसामीने थंडपणे त्यांना समजावलं, ‘हे प्लॅस्टर कच्चं आहे. नुसतं मापाला घातलं आहे. मोडलेल्या पायाचं माप कसं घेणार? तेव्हा आता माप घेवून झालं की हे काढून मोडलेल्या पायाला प्लॅस्टर करण्यात येईल!’ वर ‘ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात नाक खुपसू नये!’ हे ही सांगायला डॉक्टर महाशय विसरले नाहीत. (जाता जाता आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट एवढीच की हीच, अगदी हीच कथा, मी ससूनमध्ये घडल्याचंही ऐकलं आहे!)
                  अशी तयारी कमावण्यात थोडी निडर वृत्तीही असावी लागते. अनुभवही लागतो. अनुभव हा उत्तम गुरु असला तरी चुकांच्या रुपाने कॅपिटेशन फी भरपूर वसूल करतो. त्यामुळे काही मनुजे या माहौलमध्ये मूळ धरत नाहीत. त्यांची प्रॅक्टिसही मग रडत खडत चालते किंवा जोरात चालली तरी त्यात त्यांचे चित्त रमत नाही. ते तृप्त नसतात. मग ते शेती, घरचा व्यवसाय सांभाळणे, मल्टी लेव्हल मार्केटींग, ब्युटीपार्लर, हेल्थ क्लब, जनता संपर्क अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापन, मेडिकल सर्जीकलचे होलसेल दुकान, सनदी अधिकारी, राजकारण, अभिनय वगैरे असंख्य क्षेत्रात संधी दिसताच शिरतात आणि यशस्वी होतात. या सर्व क्षेत्रात माझ्या थेट परिचयाची जी.पी. मंडळी आहेत. त्यांच्या स्वकष्टार्जित यशाचं मला विलक्षण कौतुक तर आहेच पण आदरही आहे.
               काही मंडळी स्वतः प्रॅक्टिस करण्याऐवजी एखादया पेशालिस्टाचे कायमस्वरूपी असिस्टंट म्हणून काम करतात. समुपदेशन, फॉलोअपचे पेशंट पहाणं, ICU त इमर्जन्सी ड्यूटी म्हणून काम करणं, असं काहीतरी ते झट्दिशी आत्मसात करतात आणि पेशालिस्टांचे उजवे-डावे हातच बनून जातात. ही रचना उभयपक्षी फायद्याची असते. जी.पीं.ना एक सुरक्षित घरटं मिळतं. कोणत्याही चुकांची त्यांच्यावर थेट जबाबदारी नसते. जे शिकलो, त्याच क्षेत्रात काम केल्यामुळे आत्मसन्मान राखला जातो. ‘अयशस्वी डॉक्टर’ असा शिक्का बसत नाही. मनापासून वैद्यकी आवडत असेल तर व्यावसायिक समाधानही मिळतं. पण तरीही आता यापुढे कितीही करतूद दाखवली तरी असिस्टंटचे आपण कन्सलटंट कदापि होणार नाही, याचा सल असतोच. अगदी खोल, ठसठसणारा.
               पेशालिस्टांचं तर असिस्टंट फौजेशिवाय पानंही हलत नाही. सर्व लिखापढीची कामं ही मंडळी करतात. रेकॉर्ड नीट सांभाळतात. डॉक्टरांच्या ऐवजी वेळोवेळी प्रकट होतात आणि पेशंट गणाची आस्थेनं पण प्रसन्न चित्ताने बोळवण करतात. ICUतल्या पेशंटवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. बदलत्या परिस्थितीनुसार उपचार बदलतात किंवा निदान योग्यवेळी पेशालिस्टांना कळवतात. (त्याहून महत्वाचं म्हणजे अयोग्यवेळी कळवत नाहीत).
                                   सारीच मंडळी अशी अतिकुशल असतात का? नाही. सुरुवातीला नाहीच नाही. नंतर होतात. ICUचं जग यांनी कॉलेजमध्ये शिकलेलंही नसतं आणि पाहिलेलंही नसतं. कायद्याने त्यांना आधुनिक औषधे (म्हणजे अॅलोपॅथीची) वापरायला परवानगी नाही. पण (कुणाच्या तरी देखरेखीखाली) ICU/हॉस्पिटलमधे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करण्याची मुभा आहे. याचं कारण आपल्याकडे असलेली परिचारिका आणि पॅरामेडीकल लोकांची तीव्र टंचाई. नर्सेस मिळत नाहीत, पण त्यांच्या पगारात डॉक्टर मिळतात! भारतात डॉक्टर जास्त आणि नर्सेस अल्प आहेत. परदेशात वरील सर्व कामं त्या त्या पेशालिस्टांच्या पेशालिस्ट नर्सेस करतात. यामध्ये भारत एक पाऊल पुढे आहे. ही कामं आमचे डॉक्टर करतात! कमी तिथे आम्ही, या न्यायानं ह्या डॉक्टरांनी ही क्षेत्रं व्यापली आहेत.
                   या क्षेत्रातल्या मुली सुखी म्हणायच्या. इथे पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरुषांना तोटा होतो. कुटुंबाच्या आमदनीमध्ये पुरुषाची भूमिका दुय्यम असून चालत नाही. त्यामुळे लेच्यापेच्या पदवीच्या बळावर पुरुषांना सतत झुंजत रहावं लागतं. त्यांच्या ज्ञानाचं तोकडेपण वेळोवेळी समाजापुढे उघडं पडत असतं. त्यांचा नामोल्लेखही थंडीतापाचे डॉक्टर, साधे डॉक्टर, सुईचे डॉक्टर असा होतो. हे न्यून पाठीवरील कुबडासारखं झाकू म्हणता झाकता येत नाही.
                  मुलींची मात्र झाकली मुठ सव्वालाखाची, सहज खपून जाते. सुस्वरूप असतात त्या एम्.बी.बी.एस्/एम्.डी./एम्.एस्. डॉक्टर नवरा करतात. (मुलांना ही सोय नाही. त्यांना एम्.डी./एम्.एस्. बायका मिळत नाहीत.) असे विवाह बहुतेकदा सजातीय असतात. जातीत उच्चशिक्षित मुलगी नाही. परजातीतली चालत नाही, मग तडजोड म्हणून अशा मुलींना वरलं जातं. जे काम बाहेरच्या दवाखान्यात पगारावर करतात ते ह्या बायका नवऱ्याच्या दवाखान्यात आपण होऊन करतात. नर्स, व्यवस्थापक, कौन्सिलर, हिशोबनीस अशा सर्व क्षेत्रात पारंगत होतात. स्त्री, सखी, सचिव, भार्या अशी चौपदरी भूमिका बेफाट निभावतात. घर आणि दवाखाना असा तोल छान सांभाळतात. अगदी उच्चशिक्षित बायकोही अशी साथ देईल का नाही हे सांगता येत नाही. बहुदा नाहीच देणार. तिला स्वतःची प्रॅक्टीसही सांभाळायची असते.
                    गेली ३० वर्षे मी वैद्यकीशी संबधित आहे. जे पहिलं, ऐकलं आणि अनुभवलं त्या जी.पी.नामे जमातीविषयी ही काही निरीक्षणं. आता वाटतंय की, संपादकांनी जी.पीं.बद्दल लिहा असं सांगितलं म्हणून जी.पी. आणि स्पेशालिस्ट असे शब्द आले. उद्या स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट असा लेख लिहायला सांगितला तर तपशीलातले बदल वगळता हाच लेख लागू पडेल.
               बी.ए.एम्.एस्. आणि बी.एच्.एम्.एस्. कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा झरा आता आटु लागला आहे. नव्या युगात चलाख मुलांना अनेक क्षेत्रं खुणावत आहेत. डॉक्टरकीही आता पूर्वीइतकी वलयांकित राहिलेली नाही. डॉक्टरांच्या रामबाण इलाजाबरोबरच त्यांच्या कृष्णकृत्यांचीही चर्चा असते. कित्येक होमिओपॅथिक कॉलेजं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसेंदिवस कायदेही कडक होत आहेत. तुम्ही बी.ए.एम्.एस्. करून वर एम्.डी.(आयुर्वेदीय स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र) जरी झाला तरी तुम्हाला सोनोग्राफी, गर्भपात वा नसबंदी करण्याची कायदेशीर परवानगी नाही!! या मंडळींना अॅलोपॅथीची औषधे वापरायलाही परवानगी नाही, मात्र हा कायदा कठोरपणे अंमलात आणला जात नाही. पण एखादा कोर्टात गेला तर डॉक्टर दोषी ठरतो. थोडक्यात भिन्न पॅथीय प्रॅक्टीस करणाऱ्यांवर अशा कायद्याची छाया गडद होत आहे. त्यामुळे कायमचा तणाव राहतो.
               प्रत्येक बॅचमधील, अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मंडळी शुद्ध आयुर्वेद किंवा शुद्ध होमिओपॅथीची प्रॅक्टीस करतात. ते जे करतात त्याची वैज्ञानिक वैधता हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल, पण त्यांनी प्रसृत केलेले लेख, माहिती पुस्तिका, जाहिराती वगैरेतील अतिरंजीत दावे, अर्धवैज्ञानिक, अर्धसत्य विधाने पाहता या उपचार पद्धती प्रश्नचिन्हांकित आहेत हे  निश्चित.
              एकेकाळी जी.पी.हे फॅमिली डॉक्टर होते. फॅमिली डॉक्टर ही किती उपयुक्त आणि चांगली संस्था होती असं स्मरणरंजन सगळयांनाच भावतं. मंडळी मग आपापल्या डॉक्टरच्या नावे कढ काढतात. एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून ती संस्था उत्क्रांती झाली होती अशी रचना डॉक्टरनी किंवा समाजानी जाणीवपूर्वक निर्माण केलेली नव्हती. जीवनशैली बदलली. विद्युतगती, अवास्तव अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता अशा वातावरणात फॅमिली डॉक्टर ही संस्था लयाला गेली यात नवल ते कसलं? ‘लोकशाहीमध्ये लोकांच्या लायकीप्रमाणे त्यांना राज्यकर्ते लाभतात’ असं म्हणतात. तसंच काहीसं वैद्यक विश्वाचंही आहे. लोकांना डॉक्टरही त्यांच्या लायकीप्रमाणेच मिळतात.  


प्रथम प्रसिद्धी :- अंतर्नाद, सप्टेंबर २०१०.  

1 comment: