गर्भस्य
कथा रम्या
डॉ.
शंतनू अभ्यंकर, मोबाईल ९८२२० १०३४९
“काय
करा हे मी तुम्हांला सांगितलं, तसं आता काय करू नका हेही सांगतो” या वाक्याशी
येईपर्यंत माझ्या आवाजाला एक विशिष्ठ धार चढलेली असते. थोडी दमदाटी, थोडी समजूत,
थोडं आर्जव असा मिश्र खमाज लागतो. माझ्या उजव्या हाताची तर्जनी जोरजोरात नाचवत उपस्थित
नजरांना नजर देत मी म्हणतो, ‘काय वाट्टेल ते झालं तरी गावठी, झाडपाल्याचं औषध करू
नका. कोणी सांगेल काडी घालून खाली करून देते, कोणी पोट चोळून खाली करून देते
म्हणतील; पण कृपा करून यातलं काही करू नका.” माझा आवाज आणखी चढतो, भेदक होतो. डोळे
वटारले जातात आणि मी म्हणतो... “असं केलंत तर तुमच्या मुलीचे प्राण जातील! ती मरेल!”
समोरचे पालक दचकतात, पण मनातल्या मनात.
परिस्थितीनं त्यांना पार हतबल केलेले असतं. या वाक्यानंही न दचाकण्याइतके ते निबर
झालेले असतात. करणार काय? लेकीला लग्नापूर्वीच चांगले पाचच्या वर महिने गेलेले
असतात! पाचव्यानंतर गर्भपात करणं बेकायदेशीर आहे. सबब “तुम्ही मुलीला ती प्रसूत
होईपर्यंत महिलाश्रमात ठेवा आणि प्रसुती झाल्यावर मूल अनाथाश्रमाला देऊन तुम्ही
मुलीला घरी आणा.” मी पोटतिडकीने सांगत असतो. हा मार्ग सनदशीर आणि मुलीच्या
दृष्टीने सर्वात सुरक्षित आहे हे मला पटत असतं, पण त्यांना जाम पटत नाही. मी
तऱ्हेतऱ्हेने माझा मुद्दा मांडत असतो आणि ते मख्ख बसलेले असतात. “तुम्हीच कायतरी
करा, मुलीला मोकळी करा!” एवढंच त्यांचं पालुपद. मीही माझा हेका सोडत नाही, कारण
माझ्या डोळ्यासमोर सोनाली जाधव तरळत असते.
सोनाली जाधव. तरणीताठी, उफाड्याची, देखणी,
सतत विनाकारण हसणारी, जगात चिंता आहे हे गावीच नसणारी. दोन घट्ट वेण्या, छाती जरा
जास्त पुढे काढून चालण्याची ढब, शाळेच्या युनिफॉर्ममध्येच मधल्या सुट्टीत,
रणरणत्या उन्हात, धापा टाकत माझ्या केबिनमध्ये घुसली होती ती. म्हणाली, “डॉक्टर मला दिवस गेलेत! खाली
करायचंय, काय घ्याल?” तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो.
“नाव काय तुझं?” चेहऱ्यावर काही न दाखवता मी
विचारलं.
“सोनाली जाधव.”
“कितवीला आहेस?”
“सहावीत. पण दोनदा फ्येल झाल्येय!” तिनं
गडबडीनं खुलासा करत ती ‘मोठी’ असल्याचं स्पष्ट केलं.
“आई-वडील?”
“शेतात आहेत.”
“बरोबर नाही आले ते?”
“बरोबर कोणी नाही.”
“किती महिने गेलेत?”
“असतील दीड न्हाईतर दोन.. मागच्या आठवड्यात
लय उलट्या झाल्या.”
“तू आई-वडिलांना घेऊन येशील?”
“दोघांना?”
असं वाटावं, की कुणा एकाला ही आणू शकणार
आहे.
“कोणीही एक आलं तरी चालेल?”
“पण घरी हे कसं सांगणार?”
“सांगावंच लागेल. कायद्यानं तुम्ही सज्ञान
नाही. १८ वर्षांखालील असल्याने अॅबॉर्शन करायला कायदेशीर पालकांची, म्हणजे आईवडीलांची
सही लागते.”
“लांबचा मामा चालेल?”
म्हणजे हिचा मित्र हाच लांबचा मामा. मला
मामा बनवायला बघते काय?
“नाही, आई किंवा वडील पाहिजेत.”
“बघा नं जमतंय का डॉक्टर...” आता आवाजात
अजीजी.
मी “नाही जमत” असं तुटक उत्तर देऊन
टेबलावरची बेल खण् खण् वाजवतो. माझ्या बेलचा आणि देहबोलीचा तिच्यावर काहीच परिणाम
होत नाही.
“तुम्हीच हे करू शकता डॉक्टर... प्लीऽऽज..”
“तुम्ही आईवडिलांना घेऊन या, मगच मी
तुम्हाला तपासतो आणि सांगतो.”
दार उघडतं, सिस्टर आत ओघळतात आणि उघड्या
दारातून बाहेरच्या गर्दीचा कोलाहलही. मग मी अस्वस्थ होतो. बाहेरच्या नजरा
डॉक्टरभेटीसाठी नंबर लागण्याची वाट बघत असतात, पण हिला मात्र त्या नजरा तिच्याकडेच
संशयाने बघताहेत असं वाटतं. पण क्षणभरात ती लगेच सावरते, ताठ होते आणि निश्चयाने
ताडताड निघून जाते.
पेशंटची रीघ सुरु होते ती अगदी पाच
वाजेपर्यंत. कुणाला असलेलं नकोय तर कुणाला हवं असताना राहात नाहीये; कुणाला
पांढऱ्याचा त्रास तर कुणाला लालचा. पहिल्यापासून नवव्यापर्यंत महिने, तक्रारी,
सोनोग्राफ्या, तपासण्या, पेशंटनी घेतलेल्या माझ्या उलटतपासण्या.. वेळ कसा गेला हे
समजलंच नाही.. मध्येच एक डिलिव्हरी, एक क्युरेटींग... ५ वाजता मी राउंड घेऊन जिना
उतरू लागलो तर जिन्याच्या अंधारातून सोनाली जाधव अचानक पुढ्यात उगवली....
“डॉक्टर, प्लीज, बघा ना.” तिची आर्जवं. जिन्याच्या दुसऱ्या टोकाला दोन धट्टीकट्टी जवान
पोरं उभी होती. त्यांची नजर भलतीकडे, पण लक्ष आमच्याकडे लागलं आहे हे मी क्षणात
ताडलं. हेच ‘ते’ असावेत. “आई-वडिलांपैकी कोणालाही घेऊन ये; नाही तर तुझं वय १८
पेक्षा जास्त असल्याचा पुरावा तरी घेऊन ये.” मी निक्षून सांगितलं आणि तिच्या
प्रतिक्रियेची वाट न बघता माझी वाट गडबडीने चालू लागलो.
कामाच्या रामरगाड्यात मला ह्या घटनेचा
विसरही पडला. अशा चौकश्या नित्याच्याच. विशेषतः नव्यानं प्रक्टिसमध्ये जम
बसावणाऱ्याकडे. अशा डॉक्टरला प्रॅक्टीस हवी असते आणि अशा पेशंटला सस्त्यातली,
झटपट, गुपचूप आणि लवचिक सेवा. ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’ यातला
प्रकार. मीही त्यावेळी म्हसोबा असल्याने अशा सटवाया नेहमीच्याच. अशा विवाहपूर्व
गर्भार राहिलेल्या मुलींना ‘कुंती’ म्हणण्याचा प्रघात आम्ही कॉलेजमध्ये
असल्यापासून आहे. थोडी गंमत, थोडी कुचेष्टा आणि आगंतुक कानसेनांपासून गुप्तता
पाळण्याचा प्रयत्न, अशा साऱ्या छटा या कुंती नावामध्ये होत्या.
एके दिवशी दुपारी मोबाईल ओळखीची धून गाऊ
लागला. माझा मित्र डॉ. सागर याचा फोन होता.
“बोल सागर.”
“एक कुंती आहे, septic abortion आहे, gasping आहे. ये लगेच.”
मी तडकाफडकी निघालो. कुंती आणि gasping
म्हणजे भलताच गंभीर मामला होता. कायदेशीररीत्या गर्भपात करायचा तर तसा परवाना
लागतो. डॉ. सागर हा गायनॉकॉलॉजिस्ट नव्हता; होता सर्जन. त्याच्याकडे असा परवाना
नव्हता. गावाकडच्या प्रथेनुसार तो येईल त्या पेशंटवर (येतील ते) उपचार करायचा.
अपेंडिक्स, हर्निया वगैरेची ऑपरेशन्स लीलया करायचा. तसाच गर्भपात, गर्भपिशवी काढणे
वगैरेही करायचा. अति उत्साहाच्या भरात त्याच्या हातून काहीना काही गोच्या होत
राहायच्या. मग समव्यावसायिक मित्रांना बोलावून सारं निस्तरणं ह्यात त्याचा हातखंडा
होता. मुळात अशी कुंती त्यानं स्वीकारायला नको होती. (आमच्यासारखा तज्ज्ञ गायनॉकॉलॉजिस्टनी
मग काय करायचं?) आता अॅबॉर्शन होऊन वर इन्फेक्शन झालंय, म्हणजे ह्याच्या हातूनच
काहीतरी झालं असणार. निर्जंतुकीकरण करताना निष्काळजीपणा झाला असणार.
ह्याच्या दवाखान्यात इतकी गर्दी, की
निष्काळजीपणा स्वाभाविकच म्हणायचा. (आणि त्या गर्दीबद्दलची माझी असूयाही तितकीच
स्वाभाविक.) आता पोलीसी खटलं मागे लागणार. बेकायदा गर्भपात आणि त्यातून मृत्यू
म्हणजे पोलिसांची चंगळच. ह्या झेंगटातून सुटण्यासाठीच सागरने माझा धावा केला होता.
इतका सगळा विचार होईपर्यंत मी सागरच्या
दवाखान्यात पोहोचलो देखील. तिथे नेहमीचीच गर्दी, गडबड, गोंधळ वगैरे...! हा
पठ्ठ्याही त्याच्या केबिनमध्येच पेशंट तपासत असल्याचं बाहेरच्या सिस्टरनी
सांगितलं.
मी त्याच्या केबिनमध्ये शिरताच तपासत्या
पेशंटमधून डोकं वर काढून तो मला म्हणाला, “सुटुपॅक!”
एखादा रुग्ण दगावला असं सांगणारा हा
कॉलेजमधला सांकेतिक शब्द. ‘सुटुपॅक’ हे शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या एका
धाग्याचे नाव आहे. ‘सुटला’ म्हणण्याची ही वैद्यकीय तऱ्हा.
“काय?” स्वतःच्या दवाखान्यात स्वतःच्या
पेशंटचा असा अपमृत्यू झाल्यानंतरही हा हिमनगासारखा शांत कसा?
“अरे, आणली तेव्हा pulseless आणि gasping
होती. तुला फोन केला आणि arrest मध्ये गेली ती गेलीच. Beyond salvageच होती रे
ती!”
पुढ्यातला पेशंट हे सारं माझ्या इतकंच कान
देऊन ऐकतोय, हे लक्षात येताच तो सावरला. पेशंटला आणि नातेवाईकांना बाहेर जायला
सांगून मला तो झाली घटना सांगू लागला.
“झेड.पी.च्या शाळेतील मुलगी आहे. Thirty two
weeksची तरी pregnancy असेल.”
“अरे, पण मग तू कशाला abort करायला गेलास?”
“मी कशाला काय करतोय? कुठेतरी quack कडे
जाऊन vagina त काड्या घालून आलेत.”
“काय?”
“सगळा vagina puss नी भरलाय, जाम वास
मारतोय. आतून तपासलं तर काड्या हाताला लागतायेत!”
“बापरे! पोलिसांना inform केलंस?”
“नाही रे, कशाला?”
“वेडा का काय? Septic abortion आणि death is
a serious matter.”
“पाच महिन्यांपूर्वी गेली होती म्हणे
तुझ्याकडे...?”
“आं!! सोनाली जाधव का नाव तिचं?”
“अंहं. वनिता चंदने!”
“तीच ती असेल, तर नाव खोटं सांगितलं तिने
मला. कसल्या तयारीच्या असतात या पोरी.”
“तुझ्याकडे तू सांगितलंस आईवडिलांची सही
पाहिजे.”
“मग बरोबरच आहे, minor आहे ती, कायद्यानं
सज्ञान नाही.”
“तुझं बरोबरच आहे. पण ही घरी सांगायला
घाबरली आणि मग अशा कुठेतरी जाऊन काड्या घालून घेतल्या!!”
“तीच ती असणार. अशी एक केस आईवडिलांना घेऊन
यायला सांगून परत पाठविली होती मी. तिच्याबरोबर २ बॉयफ्रेंड होते..”
धाडकन् दार उघडून दोन पोरं आत आली.
सागरला म्हणाली, “नेऊ का बॉडी?” आणि मला
पाहताच जागच्या जागी थिजून उभी राहिली.
तीच ती दोघं ‘सोनाली जाधव’बरोबर माझ्या
दवाखान्यात आलेली. मुर्दाड चेहऱ्यांनी ती दोघं उभी होती.
सागरनं त्यांना बाहेर थांबायला सांगून वर
दटावलं. दार बंद होता होता तो मला म्हणाला.. “बाहेर कोपऱ्यात उभे होते ते तिचे
आईवडील.”
ती मुलं आता येता येता उघडमिट करणाऱ्या
दारातून मला त्यांचं ओझरतं दर्शन झालं होतं, पण त्यांचे चेहरे माझ्या मनावर
तप्तमुद्राच उमटवून गेले. निर्विकारपणाचे बुरखे पांघरलेले ते चेहरे. पण त्या
बुरख्याच्या आरपार आतलं सगळंच दिसत होतं. साऱ्या दुनियेची विषण्णता, पराभव, शरम,
राग, हतबलता यांचा उसळता डोंब दाटला होता त्यांच्या चेहऱ्यावर. एकेक भावनेची एकेक
लाट बाकीच्यांना मागं सारत चेहऱ्यावर उमटण्यासाठी उसळत होती. त्यांच्या बाकी
शरीरात जीवच नव्हता जणू. भिंतीवर ठोकलेल्या बिनदोऱ्याच्या कठपुतळी बाहुल्यासारखी
ती दोघं जिन्याखालच्या कोपऱ्यात भिंतीला लोंबत टेकली होती. त्यांच्या दोऱ्या
नियतीने कापल्या होत्या जणू. पोटच्या गोळ्याचा असा अंत त्यांनी स्वप्नातही कल्पिला
नव्हता. एका उमलत्या जीवाचा करुण अंत पाहून माझ्या पोटात कालवाकालव होत होती.
उगीचच नजर डॉ. सागरच्या बंद दरवाज्याकडे वळत होती. त्या दरवाज्यावरती चिकटवलेली
शुभ्रवस्त्रांवृता नर्स माझ्याकडे डोळे वटारून पाहत, तोंडावर बोट ठेवून सांगत
होती, ‘शांतता राखा’.
पुन्हा एकदा दार उघडलं आणि दोन पोलीस आत
आले. पुढे काय रामायण घडणार ह्याची कल्पना असल्याने मी तिथून निघालो. माझ्या
दवाखान्यात माझी वाट बघणारी गर्दी मला दिसत होती.
संध्याकाळी उशिरा दवाखान्यात सगळी झाकपाक
झाल्यावर शिरस्त्याप्रमाणे आम्ही मित्र कॉफीच्या अड्ड्यावर जमलो. डॉ. सागरने मग
‘सोनाली जाधव’ च्या कथेतल्या रिकाम्या जागा भरल्या.
दोन महिन्यांची गरोदर असताना ती माझ्याकडे
आली होती पण ती वयाने लहान (कायद्याने अज्ञान) असल्यामुळे मी तिला आईवडिलांना घेऊन
यायला सांगितलं. कायदाही मोठा विचित्र होता. कोणतीही स्त्री १६ वर्षानंतर
शरीरसंबंधास अनुमती देऊ शकते. पण जर गर्भधारणा झाली, तर गर्भपात करून घेण्याचा
कायदेशीर अधिकार तिला नाही. तो १८ वर्षांनंतर प्राप्त होतो. तत्पूर्वी
गर्भपातासाठी तिचे कायदेशीर पालकच संमती देऊ शकतात.
या साऱ्या कायदेबाजीत मला अजिबात अडकायचं
नव्हतं. सबब कायद्यावर बोट ठेवून मी मोकळा झालो. पण या विधी-लिखीतात ‘सोनाली जाधव’
मात्र अडकत गेली.
मी कटर मारल्यावर सोनाली आणि दोन जवान
पोरांनी हरप्रयत्ने गर्भपात करायचा प्रयत्न केला. कुठे पपई खा, कुठल्या बिया चघळ,
कसला काढा पी, अगदी पोटावर लाथा घालण्यापर्यंत सर्व प्रकार केले. पण ढिम्म फरक
पडेना. दरम्यान वैद्यकीय उपचार, संमती आणि पैसा याचा काही मेळ बसेना. दिसामासांनी
सोनालीच्या पोटातला गर्भ मात्र वाढत होता. मध्यंतरी घरदार सोडून ती तिघंही २-३
दिवस भिरीभिरी फिरत राहिली. आत्महत्येशिवाय त्यांना पर्याय दिसेना. हायवेवरच्या
कुठल्याशा हॉटेलमध्ये तिघंही विष पिऊन जीव देणार होते. त्या हॉटेल मालकाला
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्यांना घरी पिटाळलं. इतकं सगळं
होईपर्यंत घरच्यांना कुणकुण लागलीच होती. तिला कोंडून ठेवणं, मारझोड करणं वगैरे
रीतसर झाल्यावर हिच्या आईनीच तिला त्या मुलांच्या मदतीने डोंगरावरच्या
दरेवाडीतल्या बाईकडे नेऊन ‘औषध’ घेऊन दिलं. त्यातून उद्भवलेलं आजारपण अब्रूपायी
आठवडाभर घरातच अंगावर काढलं. शेवटी जेव्हा ती मरणपंथाला लागली, तेव्हा आईवडिलांचा
जीव राहीना. तिला दवाखान्यात आणली, तो ती गेलीच.
पुढे पोलीस पंचनामा, पोस्टमॉर्टेम
वगैरेंमुळे जी गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळू द्यायची नव्हती, ती जगजाहीर
झाली. आईवडिलांनी, त्या दोन मुलांनी वगैरे सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणी कानावर
हात ठेवले. तिला गर्भ राहिल्याचं, तो पाडल्याचं वगैरे त्यांना माहित नसल्याचं
त्यांनी सांगितलं. आई-वडिलांनी बॉडी ताब्यात मिळताच तिला थंडपणे अग्नी दिला.
कोरड्या मनाने आणि कोरड्या डोळ्यांनी. त्यांच्या लेखी लेकीचा अंत हे एक दुःस्वप्न
होतं. घाटावरून घरी जाताच ते संपणार होतं.
दोन दिवसांनी पेपरमध्ये त्या दोन मुलांनी
स्मशानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची सनसनाटी बातमी छापून आली. मृत
व्यक्तींच्या खिशात अथवा घरी चिठ्ठीचपाटी न सापडल्यानं आत्महत्येचं कारण पोलिसांना
कळू शकलं नव्हतं.
No comments:
Post a Comment