Showing posts with label वाचन. Show all posts
Showing posts with label वाचन. Show all posts

Tuesday, 19 February 2019

पुस्तकांची 'शामची आई'


पुस्तकांची ‘शामची आई’
डॉ. शंतनू अभ्यंकर

खूप वर्षापूर्वीची गोष्ट. मी लहान होतो तेंव्हा. तेंव्हा बाबा आपले सारखे टेबलाची बसून काहीतरी लिहित असायचे. मी विचारलं तर म्हणाले अब्राहम कोव्हूर नावाच्या माणसाचं एक पुस्तक आहे, ‘बिगॉन गॉडमेन’, त्याच भाषांतर करतोय. मला खरंतर काही विशेष कळलं नाही. ‘बिगॉन’चाही अर्थ मला कळला नाही आणि ‘गॉडमेन’चाही नाही. मग त्यांनी फोड करून सांगितलं की बिगॉन म्हणजे चले जाव, आणि गॉडमेन म्हणजे बुवाबाजी करणारे बुवा. तोपर्यंत माझ्यालेखी चलेजाव हे ब्रिटिशांपुरतच मर्यादित होतं.
होता होता हे पुस्तक पूर्ण झालं. ते म्हणे भलतंच स्फोटक होत. या कोव्हूरनी सगळे चमत्कार वगैरे म्हणजे हातचलाखी असते असं सांगायला सुरवात केली होती. नव्हे तसं ते सिद्धच करून दाखवायचे. आपले या लढ्यातील अनुभव त्यांनी लिहिले होते. मग काय, बाबांना निजताना गोष्ट सांगा म्हटलं की, रोज रातीला एक एक चमत्कार आणि त्याचे पितळ कसे उघडं पाडलं याची सुरस आणि चमत्कारिक कथा, असा सिलसिला सुरु झाला. ते पुस्तक, ते अनुभव भन्नाटच होते.
पुढे ते पुस्तक पूर्ण झालं. अनेक प्रकाशकांनी नाकारलं. पण तर्कतीर्थांना (लक्ष्मणशास्त्री जोशी) पसंत पडलं. त्यामुळे साहित्य संस्कृती मंडळानी स्वीकारलं. बस्स, इतकंच. पुढे प्रसिद्ध झालं  का नाही, खपलं का नाही, कशाकशाचा थांग लागेना. लेखक-प्रत वगैरेचा तर पत्ताच नाही. फार मागे लागल्यावर तिथल्या क्लार्कचा असा समज झाला की हे मानधनासाठी मागे लागले आहेत. तेंव्हा त्यांनी मानधनाचा चेक दिला पाठवून. पण प्रश्न तो नव्हता. आपलं पुस्तक निदान आपल्या हातात पडावं एवढी तरी इच्छा असतेच की. पण या साध्या इच्छेची महत्वाकांक्षा व्हायची वेळ आली, पण पुस्तकाची प्रत काही मिळालीच नाही.
मधूनच कोणी वाचक भेटायचा, कोणी चाहता सांगायचा, ‘वाचलं बरं का पुस्तक तुमचं!’ बाबा म्हणणार, ‘अरे, अजून मी पण नाही वाचलं.’
‘अहो छान आहे, वाचा तुम्ही!!!’
कोणी सांगणार, ‘आहे आमच्याकडे.’
बाबा म्हणणार, ‘प्रत पाठवा की मला, निदान बघायला तरी, किंवा झेरॉक्स पाठवा. ट.ख. वेगळा देईन’
पण नुसतंच हो, पुढे कृती शून्य.
पुस्तक आणि लेखक यांची जन्मतः झालेली ताटातूट काही संपायचं नाव घेईना.
बाबांनी त्यांना वेळ मिळेल तसा फॉलोअप ठेवला. अगदी मधु मंगेश कर्णिकांचा सुद्धा वशिला लावला. एकदा ते पुस्तक, मंडळाच्या गोदामात असल्याचं कळलं. पण तेवढंच. साहित्य संस्कृती मंडळाच्या सरकारी जगड्व्याळ कामात एखादं पुस्तक म्हणजे कीस झाड की पत्ती. स्वीकारलेली सारीच पुस्तके काही महामंडळ स्वतः प्रसिद्ध करत नाही. इतर प्रकाशकांनाही देते. तसं ह्या पुस्तकाचं झालंय असं कळलं एकदा. पण कोण प्रकाशक, त्याची प्रत मंडळाकडे तरी असायला हवी ना, वगैरे चौकशीची फारशी कुणी दादच घेतली नाही. शेवटी कंटाळून, वैतागून बाबांनी चौकशी करायचा नादच सोडून दिला. डोंबिवलीच्या एका ग्रंथालयात प्रत असल्याचं असंच सांगोवांगी कळलं. मग तिथल्या परिचितांशी संपर्क साधून शोधायला लावलं. ते पुस्तक होतं पण खराब झाल्यामुळे पूर्वीच कंडम केल्याचं समजलं.
मग एके दिवशी काय झालं, फेबुवर  मंजिरी जोशी वैद्य म्हणून पार्ल्याच्या ग्रंथपाल आहेत, त्यांची पोस्ट एक पोस्ट माझ्या वाचनात आली. नव्या पुस्तकांना जागा करण्यासाठी त्यांनी जुनी, मागणी नसणारी पुस्तके एका कपाटात घातली आणि ते कपात दिलं गॅलरीत ठेऊन. पण बसल्या टेबलावरून त्यांना ते नाराज कपाट सतत दिसत होतं, सतत खुणावत होतं, सतत सतावत होतं. हळूहळू त्या पुस्तकांचे हुंदके ऐकू येऊ लागले. अस्वस्थ जोशीबाईंना  त्या पुस्तकांचे आर्त असह्य झाले आणि त्यांनी ते कपाट दाटीवाटीने पण आतच बसवले. वाचून मला गलबलून आले. अर्थातच मी पोस्ट लाईकली. मग आम्ही फेबु फ्रेंड झालो. एकमेकांचे लिखाण आम्ही वाचत असू. लाईकणे, कमेण्टणे होत असे पण एवढेच.  
एके दिवशी फेबुच्या विन्डोत यांचा मेसेज दाखल झाला. त्यांचं काम होतं माझ्याकडे. काम काय, तर एक दुर्मिळ पुस्तक म्हणे वाईच्या टिळक स्मारक ग्रंथालयात आहे ते त्यांना, म्हणजे त्यांच्या कुणा वाचकाला हवं होतं. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या लायब्ररीत कुठले पुस्तक आहे हे ऑनलाईन बघता येतं. तसं बघून त्यांनी ते पुस्तक वाईच्या लायब्ररीत असल्याचा शोध लावला होता. मग मी वाईचा म्हणून मला मेसेज केला होता. लायब्ररीशी ऋणानुबंध असल्याने मी लगेचच पुस्तक मिळवीन असं सांगितलं. त्यावर त्या बाई जे बोलल्या, ते फार दुर्मिळ आणि भारी होतं. त्या सांगत होत्या,
‘हे पुस्तक खूप दुर्मिळ आहे. फक्त वाईच्याच लायब्ररीत आहे. ती प्रत आता जपून वापरायला हवी. ती प्रत तुम्ही लगेच झेरॉक्सला देऊ नका. ती आधी नुसती बघा. तिला बाईंडिंग असेल तर त्याच्या दोऱ्यामुळे पुस्तक पूर्ण उघडणार नाही. मग झेरॉक्स नीट येणार नाही. घडीच्या बाजूचे शब्द जातील. तेंव्हा झेरॉक्सवाला बाईंडिंग सोडवेल आणि मग ते पुन्हा पहिल्यासारखे जमेल ना जमेल... त्यामुळे तुम्ही आधी ते पुस्तक बाईंडिंगवाल्याला दाखवा. तो दोरा सोडवून पुन्हा व्यवस्थित बायडिंग करेल ना हे त्याला स्पष्ट आणि खात्रीनी विचारा आणि मगंच पुस्तक झेरॉक्सला द्या!!’
माझ्या मनात आलं, ही तर पुस्तकांची शामची आई. मायाळू, ममताळू, ग्रंथप्रेमी ग्रंथपाल. मोठ्या काळजीनी, प्रेमानी, आपुलकीनी आणि निगुतिनी पुस्तकांचं करणारी, त्यांना जपणारी. पुस्तकांना चालता येत असतं तर त्यांच्या पायांना घाण लागू नये म्हणून हिनी पदराच्या पायघड्याही घातल्या असत्या. तिकडून त्यांच्या सूचना चालूच होत्या,
‘...आणि झेरॉक्स काढणार असाल तर दोन काढा. एक तुमच्या लायब्ररीत ठेवा. एक मला पाठवा. पण इथून पुढे मूळ प्रत कुणाला देऊ नका असं बजावा तुमच्या लायब्रेरियनला. द्यायची झालं तर झेरॉक्स द्या म्हणजे मूळ प्रत खराब होणार नाही. जपायला हवं ते पुस्तक आता.’
इतकं सगळं बोलल्यावर पत्थरालाही पाझर फुटेल. मलाही फुटला. मी तडक सगळीकडे जाऊन जातीने चौकशा करून, पुस्तक घेऊन, बायडींग खोलून, झेरॉक्स काढून, पुन्हा बायंडून, त्यांना झेरॉक्स पाठवून दिली. प्रत मिळताच आनंदविभोर होऊन त्यांचा फोन आला. बोलता बोलता बाबांच्या जन्मतः ताटातूट झालेल्या पुस्तकाचा विषय निघाला.
त्या म्हणाल्या थांबा, मी प्रयत्न करते. आणि काय आश्चर्य, चारच दिवसात त्यांनी त्या पुस्तकाचा छडा लावला होता. पार्ल्याहून फोर्टात जाऊन त्यांनी पुस्तक मिळवले होते. त्याची झेरॉक्स करून त्या ती मला पाठवण्याच्या बेतात होत्या. माझा आनंद गगनात मावेना. माझा अधीर आवाज ऐकून त्या म्हणाल्या, ‘बाबांना सांगितलंत का तुम्ही? पुस्तक मिळाल्याचं?’
‘नाही. अहो मलाच आता कळतंय.’
‘मग माझं ऐका, अजिबात सांगू नका. मी त्यांना छान गिफ्टव्रॅप करून पाठवते पुस्तक. तुम्ही त्यांना द्या, आणि ते पार्सल उघडतील त्याचा व्हिडीओ काढा. मला शेअर करा तो व्हिडीओ. आपलं पुस्तक मिळाल्यावरचे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला पहायचे आहेत!’
अर्थातच मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या सूचनांबरहुकुम सगळा सोहोळा पार पडला. त्यांना तो व्हिडीओ पाठवला. हरवलेल्या मुलाची बापाशी भेट घालून दिल्याने पुस्तकांच्या शामच्या आईच्या गालावरून घळाघळा अश्रू ओघळले असतील नक्कीच.

Tuesday, 6 June 2017

जावे पुस्तकांच्या गावा

जावे पुस्तकांच्या गावा
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९
पाचगणीजवळ भिलारला, म्हणजे माझ्याजवळच पुस्तकांचं गाव होतंय हे वाचून मला खूप आनंद झाला. मुळात मी पुस्तकातला किडा. त्यातून अशा प्रकारे जवळच पुस्तकांचा साठा मिळाल्यावर काय विचारता.
पण जावून करणार काय? एखादं पुस्तक वाचायला कधी अख्खा दिवस लागेल तर कधी दोन चार दिवस, तर कधी जास्त. तेवढे दिवस निवांत तिथे रहायला हवं. मग मात्र मजा आहे. कधी झोपाळ्यावर झुलत, तर कधी खुर्चीत डुलत; कधी चिवड्याचे बोकाणे भरत, तर कधी गुलाबी थंडीत कॉफीचे वाफाळते घुटके घेत; असं आपण वाचू शकतो. मग हे सगळं करायला आसपास पुस्तकाचं गाव कशाला हवं? ज्याला वाचायचंय तो एकदा पुस्तकात शिरला की आसपास गावंच काय वेगळं विश्वच उभं रहातं की.
पण तरीही मला वाटतं गाव हवंच. कारण पुस्तकांचं गाव हे एक संस्कार देतं. सुट्टीमधे मज्जा करताना, शॉपिंग, खाणेपिणे, आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी अशी चैन करताना हे पुस्तकांचं गाव पर्यटकांना भेटतं. मग, ‘बघू तरी काय आहे’ अशी उत्सुकता चाळवली जाते. सहज म्हणून चाळताचाळता किती प्रकारची पुस्तकं असू शकतात ते समजतं. वाचन, हा ही मौजेचा भाग आहे हे समजतं. शिवाय अशा निसर्गरम्य ठिकाणी वाचन आणि निसर्ग-वाचन जोडीनं घडतं. त्यामुळे कल्पना चमकदार आणि लाजवाब आहे.
कधीतरी आधी वाचलेली पुस्तकं इथे अचानक हातात येतील, त्यांची पाने चाळताचाळता, स्मृतींची पानेही चाळली जातील. काहींना मोठ्यांनी वाचायला आवडतं, तीही हौस इथे मोकळेपणी भागवता येईल. चार पावलं इकडे तिकडे गेलं की ‘होल वावर इज आवर’! त्यामुळे कोणी शिरा ताणताणून  ऐतिहासिक नाटकातील लंबीचौडी स्वगतं म्हणताना दिसला तर आश्चर्य वाटू नये.
एखादं ग्रंथालय पालथं घालणं आणि पुस्तकांचा गाव पालथा घालणं यात फरक आहे. ग्रंथालय म्हणजे सारं शिस्तशीर, शांत शांत. आय.सी.यू.त जाउन पुस्तकांना भेटल्यासारखं. इथे म्हणजे घरी जाऊन मित्राला कडकडून भेटल्यासारखं आहे. शिवाय सोबतीला चहा पोहे वगैरे, वगैरे, वगैरे... (बाकीचे ‘वगैरे’ ज्याने त्याने आपापल्या कल्पनाशक्तीने भरून काढावेत.) अर्थात पैसे देऊन हं! पंचवीस घरं/ हॉटेलं इथे पुस्तकांनी सजलेली आहेत. त्यांची अंगणं-भिंती साहित्य विषयक चित्रांनी नटलेली आहेत. आपण खाऊ शकता, पिऊ शकता, राहू शकता, वाचू शकता.
इथे येतात बरेचसे अमराठी. गुजराथी जास्त. मुंबईवाले. यांना अन्नाची भूक भारी. ‘ओरे जीग्नेसभाय आईस्क्रीम जोवानु’;  हे हरघडी कानावर पडत असतं. या खालोखाल पुण्यातील, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कुटुंबवत्सल माणसं, आया, आज्या, आजोबे, पोरंसोरं असा लवाजमा घेऊन किंवा काही तरी ‘प्रसंग’ साजरा करायला येणारे मित्र/कुटुंबांचे थवे. शिवाय शाळांच्या ट्रीप हाही एक मोठा वर्ग. शाळांच्या ट्रीप इथे नक्कीच येतील. कोणताही सरकारी फतवा नसताना येतील. इथून स्फूर्ती घेऊन काही मुलं तरी आपापल्या शाळेतल्या ग्रंथालयाचा सजग उपयोग शिकतील, करतील; अशी खात्री वाटते.
पण एक अडचण अशी की, इथे आहेत ती फक्त मराठी पुस्तकं. अर्थातच शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फतचा हा उपक्रम आहे. मराठीला उत्तेजन देण्यासाठीच आहे. स्तुत्य आहेच आहे. पण येणारे बरेचसे पुस्तकं बाहेरूनच बघतात. पिंजऱ्यातला वाघ किंवा साप किंवा माकड बघावं तसं. बाल चमूची या पुस्तकांशी दोस्ती शक्यच नाही. एक तर बहुतेक इंग्लिश मिडीयमवाले, म्हणजे मराठीची टोटल बोंब! उरलेले सेमी-इंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्हीची टोटल बोंब किंवा बेटर स्टिल, बोंबाबोंब!! आणि मग त्यातूनही उरलेले मराठी माध्यमवाले!!! ह्या मुलांना मात्र इथे अंतरीच्या ओळखीचं, अभ्यासक्रमातल्या ओळखीचं, असं बरंच काही गवसेल. ही भाषेची अडचण लक्षात घेऊन आता, अन्य भाषिक पुस्तके, देशभरातील अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तके इथे येणार असा सांगावा आहे.
सध्या मात्र शालेय ट्रीप वगैरे अशा झुंडीने येणाऱ्या वाचकांची वेगळी अशी सोय नाही. पुस्तकांच्या प्रत्येक घरात इतकी पोरं कशी मावणार? पण अशी सोय होऊ घातली आहे म्हणे. पावसाळयात येणाऱ्यांसाठीही काही खास सोय लागणार आहे. गावांनी दिलेल्या चार एकर जागेत या सुविधा उभ्या रहातील असं दिसतं.
पुस्तकं इथे विक्रीसाठी नाहीत. ही मोठीच गोची आहे. खरंतर एखादं मनात भरलेलं पुस्तक विकत घेण्याची सोय असती तर बरं झालं असतं. सरकारी योजनेत हे नसलं तरी इथली माणसं हुन्नरी आहेत. त्यांनी स्ट्रॉबेरी पिकवून, जिथे पिकते तिथेच ती विकूनही दाखवली आहे. त्यांना जे विकतं तेच कसं पिकवायचं याची उत्तम जाण आहे. लवकरच इथे पर्यटकांच्या मागणीनुसार, इंग्रजी बुकेही येतील, विक्रीही सुरु होईल, हे निश्चित. दुर्मिळ पुस्तकं हाती लागणं ही पुस्तकवेड्यांसाठी पर्वणीच. तो योग सध्यातरी पुण्या-मुंबईच्या फुटपाथवर जुळून येण्याचा योग जास्त. पण इथे पुस्तकांच्या गावी, भिलारमधेही कोणी विचक्षण विक्रेता निपजेल, रद्दीतही काही मौक्तिके असतात हे त्याला उमजेल आणि अनवट पुस्तकांची आणि वाचनवेड्यांशी अवचित गाठ पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हर घरी विभागवार पुस्तके आहेत. म्हणजे एखाद्या घरी कादंबरी तर फक्त कादंबरी आढळेल. एखाद्या घरी इतिहास तर इतिहास. त्यामुळे इतिहास चाळून झाल्यावर नाटकाची भूक चाळवली गेली तर ‘नाटक-घर’ शोधत जावं लागतं. खरतर सर्वच ठिकाणी विविध पुस्तकं असूनही चालेल.
 ‘हे ऑन द वे’, हे इंग्लंडातील गाव हे ह्या उपक्रमाचं स्फूर्तीस्थान. ठायीठायी  पुस्तकांची दुकानं, (इंग्लंडला म्हणतातच मुळी ‘नेशन ऑफ शॉपकीपर्स’), तिथे आरामात पुस्तकं पहात (ती विकतही घेणारे) पर्यटक, वेळोवेळी भरणाऱ्या पुस्तकजत्रा/यात्रा, साहित्यिक समारंभ, प्रकाशन समारंभ, ‘लेखक आपल्या भेटीला’ असे कार्यक्रम; असा सदोदित शाई-कागदाचा उत्सव तिथे भरलेला असतो. असंच काहीसं इथे व्हावं हे तो सरकारची आणि माननीय मंत्रीमहोदय विनोद तावडेजींची इच्छा. पण प्रकाशन सभागृह, काव्यकट्टा, कथाकथनासाठी वगैरे खुला रंगमंच, भाषण वगैरेसाठी मुक्त व्यासपीठ असं  इथे अजूनही काही नाही. हे सगळं बनवू घातलंय असं ह्या उपक्रमाचे कर्तेधर्ते, विश्वकोशातील अधिकारी, श्री. जगतानंद भटकर यांचं म्हणणं. इथे मराठी साहित्य संमेलन भरवलं तर त्या निमित्त ह्या साऱ्या सोयी झटपट होऊन जातील असं सुचवावस वाटतं.
शेवटी ज्यांना वाचायचं असतं ते वाचतच असतात आणि ज्यांना वाचायचं नसतं ते असल्या उपक्रमांना बधत नाहीत. प्रश्न मधल्याअधल्यांचा आहे. या मिषानी अशी माळरानावरची मंडळी पुस्तकांच्या ‘निबिड कांतार जठरी’ शिरतील असं वाटतं.

पूर्वप्रसिद्धी:-  महा अनुभव जून २०१७


Saturday, 21 November 2015

शेल्फारी डॉट कॉम या साईटबद्दल सातारा आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं माझं भाषण.


शेल्फारी डॉट कॉम

भेळेचा कागदही वाचल्याशिवाय न टाकणाऱ्या माझ्यासारख्या पुस्तकातल्या  किड्याला सातत्यानं खाद्य पुरवणारी साईट म्हणजे शेल्फारी डॉट कॉम. पण भेळेचा कागदही टाकाऊ नसतो हे खरच आहे. एकदा अशाच एका कागदावर ‘लिंग बदला’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘नर’चं लिंग ‘वानर’ असं बदललेलं होतं. त्या भेळेपेक्षा हा विनोद चटकदार होता.
शेल्फारीवर तुम्ही गेलात की एक बुकाचं शेल्फच तुमच्या नावानं टाकलं जातं.
आपण वाचलेली पुस्तक या शेल्फात आपणच हारीनं लावायची, आवड नावड कळवायची. आवडलेली पुस्तकं का आवडली आणि नावडलेली का आवडली नाहीत याची चर्चाही आपण करू शकतो. या चर्चेत अन्य समानधर्मा मंडळी बसल्या कॉम्प्यूटरवरून सहभागी होऊ शकतात. भारतीयांच्या संदर्भात बोलायचं तर सध्या चेतन भगत हा इथला ई-सम्राट  आहे. शिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम याचं ‘अग्निपंख’ ही नेटकरांच्या मनात सातत्यानं आहेच. ‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ अशा आवेशात बलशाली, समृद्ध आणि महासत्ता भारत असं स्वप्न पेरणाऱ्या कलामांना सलाम करणारी अनेक पत्रं आपण इथे वाचू शकतो. या पत्रातला मजकूर किंवा अन्य काही भावलं तर ते मित्राला ई-मेल करायची किंवा डाउनलोड करायचीही इथे सोय आहे. पुस्तकाचं व्यसन असणाऱ्या अन्य मित्रांनाही आपण या साईटवर आमंत्रित करू शकतो. शेल्फारीचं साप्ताहिक माहिती पत्रकही  आपल्या ई-टपालात येऊन पडायची सोय आहे. आपल्या वाचण्यातल्या किंवा आवडत्या पुस्तकांबद्दल अन्य शेल्फारीकरांनी काही अभिप्राय पोस्ट केला की त्याची सूचनाही आपल्याला ताबडतोब मिळते. मुख्य म्हणजे हे सारे अभिप्राय वगैरे प्रायः सामान्य भाषेत असतात. क्लिष्ट, गुंतागुंतीची, शब्दबंबाळ भाषा; समीक्षा, सौंदर्यशास्त्र वगैरेतल्या विद्वतजड संज्ञा वगैरे प्रकार नाही. सामान्य वाचकांनी सामान्य वाचकांसाठी चालवलेली ही साईट आहे. इंग्रजी साहित्य हे अभ्यास म्हणून नाही तर ध्यास म्हणून वाचणाऱ्यांसाठी ही साईट म्हणजे, पुलंच्या काकाजींच्या भाषेत ‘मोठा मझा आहे’; आणि पी.जी. वूडहाउसच्या भाषेत सांगायचं तर ‘it gives a song on your lips and a spring in your stride!’  एखाद्या लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव अर्धवट आठवत असेल तर तेवढ्याही सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया या साईटवर साधली आहे. आपण जॅकल असा शब्द दिला की शीर्षकात जॅकल असलेल्या पुस्तकांची आणि संबंधित लेखकांची यादीच आपल्यासमोर झळकते. ही एक मोठीच सोय आहे. विशेषतः प्रा. विसरभोळे लोकांसाठी. आवडलेलं पुस्तक इथल्या ‘ई’कानातून ‘ई’कत घ्यायचीही सोय आहे. इकानावरून आठवलं पु. भा. भावे दुकान ऐवजी विकान हा शब्द वापरत म्हणे. दुकान या शब्दाची व्युत्पत्ती मराठीशी नातं सांगणारी नाही म्हणून हा बदल. पण आता इंटरनेटच्या ई-बाजारात दुकानही गेलं, विकानही गेलं, हाती उरलं ईकान!

या साईटचा पत्ता मला माझ्या हॉन्कॉन्ग मधल्या मित्रानं दिला, त्याला त्याच्या मेलबोर्नच्या मित्रानी ह्या साईटची शिफारस केली होती आणि या मेलबोर्नकराला आमच्या शेजारच्या वाईकर  प्राध्यापकांनी आमंत्रित केलं होतं. जग जवळ आलं म्हणतात ते हे असं. तुम्हीही या साईटवर जाऊ शकता. कुणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. जा आणि पुस्तकांच्या आणि पुस्तक प्रेमींच्या गर्दीत हरवून आणि हरखून जा.