Tuesday, 19 February 2019

पुस्तकांची 'शामची आई'


पुस्तकांची ‘शामची आई’
डॉ. शंतनू अभ्यंकर

खूप वर्षापूर्वीची गोष्ट. मी लहान होतो तेंव्हा. तेंव्हा बाबा आपले सारखे टेबलाची बसून काहीतरी लिहित असायचे. मी विचारलं तर म्हणाले अब्राहम कोव्हूर नावाच्या माणसाचं एक पुस्तक आहे, ‘बिगॉन गॉडमेन’, त्याच भाषांतर करतोय. मला खरंतर काही विशेष कळलं नाही. ‘बिगॉन’चाही अर्थ मला कळला नाही आणि ‘गॉडमेन’चाही नाही. मग त्यांनी फोड करून सांगितलं की बिगॉन म्हणजे चले जाव, आणि गॉडमेन म्हणजे बुवाबाजी करणारे बुवा. तोपर्यंत माझ्यालेखी चलेजाव हे ब्रिटिशांपुरतच मर्यादित होतं.
होता होता हे पुस्तक पूर्ण झालं. ते म्हणे भलतंच स्फोटक होत. या कोव्हूरनी सगळे चमत्कार वगैरे म्हणजे हातचलाखी असते असं सांगायला सुरवात केली होती. नव्हे तसं ते सिद्धच करून दाखवायचे. आपले या लढ्यातील अनुभव त्यांनी लिहिले होते. मग काय, बाबांना निजताना गोष्ट सांगा म्हटलं की, रोज रातीला एक एक चमत्कार आणि त्याचे पितळ कसे उघडं पाडलं याची सुरस आणि चमत्कारिक कथा, असा सिलसिला सुरु झाला. ते पुस्तक, ते अनुभव भन्नाटच होते.
पुढे ते पुस्तक पूर्ण झालं. अनेक प्रकाशकांनी नाकारलं. पण तर्कतीर्थांना (लक्ष्मणशास्त्री जोशी) पसंत पडलं. त्यामुळे साहित्य संस्कृती मंडळानी स्वीकारलं. बस्स, इतकंच. पुढे प्रसिद्ध झालं  का नाही, खपलं का नाही, कशाकशाचा थांग लागेना. लेखक-प्रत वगैरेचा तर पत्ताच नाही. फार मागे लागल्यावर तिथल्या क्लार्कचा असा समज झाला की हे मानधनासाठी मागे लागले आहेत. तेंव्हा त्यांनी मानधनाचा चेक दिला पाठवून. पण प्रश्न तो नव्हता. आपलं पुस्तक निदान आपल्या हातात पडावं एवढी तरी इच्छा असतेच की. पण या साध्या इच्छेची महत्वाकांक्षा व्हायची वेळ आली, पण पुस्तकाची प्रत काही मिळालीच नाही.
मधूनच कोणी वाचक भेटायचा, कोणी चाहता सांगायचा, ‘वाचलं बरं का पुस्तक तुमचं!’ बाबा म्हणणार, ‘अरे, अजून मी पण नाही वाचलं.’
‘अहो छान आहे, वाचा तुम्ही!!!’
कोणी सांगणार, ‘आहे आमच्याकडे.’
बाबा म्हणणार, ‘प्रत पाठवा की मला, निदान बघायला तरी, किंवा झेरॉक्स पाठवा. ट.ख. वेगळा देईन’
पण नुसतंच हो, पुढे कृती शून्य.
पुस्तक आणि लेखक यांची जन्मतः झालेली ताटातूट काही संपायचं नाव घेईना.
बाबांनी त्यांना वेळ मिळेल तसा फॉलोअप ठेवला. अगदी मधु मंगेश कर्णिकांचा सुद्धा वशिला लावला. एकदा ते पुस्तक, मंडळाच्या गोदामात असल्याचं कळलं. पण तेवढंच. साहित्य संस्कृती मंडळाच्या सरकारी जगड्व्याळ कामात एखादं पुस्तक म्हणजे कीस झाड की पत्ती. स्वीकारलेली सारीच पुस्तके काही महामंडळ स्वतः प्रसिद्ध करत नाही. इतर प्रकाशकांनाही देते. तसं ह्या पुस्तकाचं झालंय असं कळलं एकदा. पण कोण प्रकाशक, त्याची प्रत मंडळाकडे तरी असायला हवी ना, वगैरे चौकशीची फारशी कुणी दादच घेतली नाही. शेवटी कंटाळून, वैतागून बाबांनी चौकशी करायचा नादच सोडून दिला. डोंबिवलीच्या एका ग्रंथालयात प्रत असल्याचं असंच सांगोवांगी कळलं. मग तिथल्या परिचितांशी संपर्क साधून शोधायला लावलं. ते पुस्तक होतं पण खराब झाल्यामुळे पूर्वीच कंडम केल्याचं समजलं.
मग एके दिवशी काय झालं, फेबुवर  मंजिरी जोशी वैद्य म्हणून पार्ल्याच्या ग्रंथपाल आहेत, त्यांची पोस्ट एक पोस्ट माझ्या वाचनात आली. नव्या पुस्तकांना जागा करण्यासाठी त्यांनी जुनी, मागणी नसणारी पुस्तके एका कपाटात घातली आणि ते कपात दिलं गॅलरीत ठेऊन. पण बसल्या टेबलावरून त्यांना ते नाराज कपाट सतत दिसत होतं, सतत खुणावत होतं, सतत सतावत होतं. हळूहळू त्या पुस्तकांचे हुंदके ऐकू येऊ लागले. अस्वस्थ जोशीबाईंना  त्या पुस्तकांचे आर्त असह्य झाले आणि त्यांनी ते कपाट दाटीवाटीने पण आतच बसवले. वाचून मला गलबलून आले. अर्थातच मी पोस्ट लाईकली. मग आम्ही फेबु फ्रेंड झालो. एकमेकांचे लिखाण आम्ही वाचत असू. लाईकणे, कमेण्टणे होत असे पण एवढेच.  
एके दिवशी फेबुच्या विन्डोत यांचा मेसेज दाखल झाला. त्यांचं काम होतं माझ्याकडे. काम काय, तर एक दुर्मिळ पुस्तक म्हणे वाईच्या टिळक स्मारक ग्रंथालयात आहे ते त्यांना, म्हणजे त्यांच्या कुणा वाचकाला हवं होतं. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या लायब्ररीत कुठले पुस्तक आहे हे ऑनलाईन बघता येतं. तसं बघून त्यांनी ते पुस्तक वाईच्या लायब्ररीत असल्याचा शोध लावला होता. मग मी वाईचा म्हणून मला मेसेज केला होता. लायब्ररीशी ऋणानुबंध असल्याने मी लगेचच पुस्तक मिळवीन असं सांगितलं. त्यावर त्या बाई जे बोलल्या, ते फार दुर्मिळ आणि भारी होतं. त्या सांगत होत्या,
‘हे पुस्तक खूप दुर्मिळ आहे. फक्त वाईच्याच लायब्ररीत आहे. ती प्रत आता जपून वापरायला हवी. ती प्रत तुम्ही लगेच झेरॉक्सला देऊ नका. ती आधी नुसती बघा. तिला बाईंडिंग असेल तर त्याच्या दोऱ्यामुळे पुस्तक पूर्ण उघडणार नाही. मग झेरॉक्स नीट येणार नाही. घडीच्या बाजूचे शब्द जातील. तेंव्हा झेरॉक्सवाला बाईंडिंग सोडवेल आणि मग ते पुन्हा पहिल्यासारखे जमेल ना जमेल... त्यामुळे तुम्ही आधी ते पुस्तक बाईंडिंगवाल्याला दाखवा. तो दोरा सोडवून पुन्हा व्यवस्थित बायडिंग करेल ना हे त्याला स्पष्ट आणि खात्रीनी विचारा आणि मगंच पुस्तक झेरॉक्सला द्या!!’
माझ्या मनात आलं, ही तर पुस्तकांची शामची आई. मायाळू, ममताळू, ग्रंथप्रेमी ग्रंथपाल. मोठ्या काळजीनी, प्रेमानी, आपुलकीनी आणि निगुतिनी पुस्तकांचं करणारी, त्यांना जपणारी. पुस्तकांना चालता येत असतं तर त्यांच्या पायांना घाण लागू नये म्हणून हिनी पदराच्या पायघड्याही घातल्या असत्या. तिकडून त्यांच्या सूचना चालूच होत्या,
‘...आणि झेरॉक्स काढणार असाल तर दोन काढा. एक तुमच्या लायब्ररीत ठेवा. एक मला पाठवा. पण इथून पुढे मूळ प्रत कुणाला देऊ नका असं बजावा तुमच्या लायब्रेरियनला. द्यायची झालं तर झेरॉक्स द्या म्हणजे मूळ प्रत खराब होणार नाही. जपायला हवं ते पुस्तक आता.’
इतकं सगळं बोलल्यावर पत्थरालाही पाझर फुटेल. मलाही फुटला. मी तडक सगळीकडे जाऊन जातीने चौकशा करून, पुस्तक घेऊन, बायडींग खोलून, झेरॉक्स काढून, पुन्हा बायंडून, त्यांना झेरॉक्स पाठवून दिली. प्रत मिळताच आनंदविभोर होऊन त्यांचा फोन आला. बोलता बोलता बाबांच्या जन्मतः ताटातूट झालेल्या पुस्तकाचा विषय निघाला.
त्या म्हणाल्या थांबा, मी प्रयत्न करते. आणि काय आश्चर्य, चारच दिवसात त्यांनी त्या पुस्तकाचा छडा लावला होता. पार्ल्याहून फोर्टात जाऊन त्यांनी पुस्तक मिळवले होते. त्याची झेरॉक्स करून त्या ती मला पाठवण्याच्या बेतात होत्या. माझा आनंद गगनात मावेना. माझा अधीर आवाज ऐकून त्या म्हणाल्या, ‘बाबांना सांगितलंत का तुम्ही? पुस्तक मिळाल्याचं?’
‘नाही. अहो मलाच आता कळतंय.’
‘मग माझं ऐका, अजिबात सांगू नका. मी त्यांना छान गिफ्टव्रॅप करून पाठवते पुस्तक. तुम्ही त्यांना द्या, आणि ते पार्सल उघडतील त्याचा व्हिडीओ काढा. मला शेअर करा तो व्हिडीओ. आपलं पुस्तक मिळाल्यावरचे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला पहायचे आहेत!’
अर्थातच मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या सूचनांबरहुकुम सगळा सोहोळा पार पडला. त्यांना तो व्हिडीओ पाठवला. हरवलेल्या मुलाची बापाशी भेट घालून दिल्याने पुस्तकांच्या शामच्या आईच्या गालावरून घळाघळा अश्रू ओघळले असतील नक्कीच.

2 comments:

  1. khup chan sir,,,mala mahit nhavate evd chan lihta tumhi khup sundar

    ReplyDelete
  2. कसलं भारी आहे हे!

    ReplyDelete