Monday, 25 February 2019

डेपो प्रोव्हेरा


डेपो प्रोव्हेरा.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

डेपो-प्रोव्हेरा नामेकरून एक चांगले गर्भ निरोधक इंजेक्शन गेली बरीच वर्ष वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. वाद अजुनही  आहेत पण आता सरकारला  ह्याची महती पटल्यामुळे नुकतेच हे सरकारी गर्भनिरोधक ताफ्यात, सामील केले गेले आहे. प्रसूतीपश्चात सुरवातीला एक दोन वर्ष घ्यायला अगदी बेष्ट आहे हे.  अर्थात एरवीही हे वेगवेगळ्या वयात घेता येईल. अगदी म्हातारं होईपर्यंत घेतलं तरी चालेल. अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आजारात हे देता येत नाही.
हे पुरेसे सुरक्षित नाही म्हणून काही स्त्रीवादी गटांचा ह्याला कडाडून विरोध होता. पण सुरक्षा सिद्ध  झाल्यावरही तो मावळला नाही, कारण मुळात ही कंपनी अमेरिकन आणि स्त्रीवादी गट रशियाशी भावनिक जवळीक असणारे! असं हे त्रांगडं होतं. हे देण्यापूर्वी नीट समुपदेशन केलं जाणार नाही, उद्दिष्टांमागे पळत  सुटलेली आरोग्यसेवा यात बायकांना नाहक गुंतवेल, तेंव्हा खाजगीत चालेल पण सरकारीत नको, असे युक्तिवाद होते. काहीसे अर्धसत्य, काहीसे अर्धलागू, काहीसे दुराग्रही. गंमत म्हणजे हा वाद चालू असताना हे खाजगीरित्या भारतात सर्रास उपलब्ध होतं. त्याला रीतसर त्या परवानग्या होत्या. पण सरकारनी हे इंजेक्शन टोचणं, काहींना बोचत होतं. त्यामुळे सरकारी  सेवेच्या लाभार्थी, म्हणजे गरीब स्त्रिया मात्र याला पारख्या होत्या. औषधातही कसं राजकारण असतं बघा!!
डेपो-प्रोव्हेरा (मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॅान अॅसिटेट) हे प्रोजेस्टेरॅान ह्या संप्रेराकासारखे औषध आहे. ‘डेपो’ हे विशेषण अशासाठी की ते शरीरात टोचल्या ठिकाणी साठून रहाते आणि हळूहळू त्यातला अंश शरीरात भिनतो. या युक्तीमुळे त्याची अॅक्शन  तीन महिने चालते. या काळात बीजनिर्मिती होऊ शकत नाही, परिणामी दिवस रहात नाहीत.
गर्भनिरोधक म्हणून हे झकास काम करते. पण... यानी पाळी अनियमित येते. म्हणजे पुढे पुढे जाते. खूप काळ इंजेक्शन घेतलं तर बंदही होते. आणि इंजेक्शन थांबवल्यावर पुन्हा सुरु होते. बाळाला अंगावर पाजणाऱ्या बायकांना हे उत्तम ठरते कारण मुळात बाळ अंगावर पीत असल्यामुळे पाळी पुढे पुढे जातच असते. शिवाय लगेच गर्भधारणा नको अशी सगळ्यांचीच धारणा असते. शिवाय बाळावर किंवा आईच्या अंगावरच्या दुधावर ह्या इंजेक्शनमुळे काहीही दुष्परिणाम होत नाही. नेहमीच्या गर्भ निरोधक गोळ्यांनी (इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही द्रव्ये असणाऱ्या गोळ्या) मात्र होतो. दूध कमी येते त्या गोळ्यांनी. म्हणून त्या देता येत नाहीत. म्हणून हे उत्तम. ना दुधावर काही परिणाम ना बाळावर. अगदी गोळीच हवी असा आग्रह असेल तर फक्त प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्याही मिळतात. पण त्या अतिशय नियमित आणि अतिशय वेळेवर घ्याव्या लागतात. बाळाचं करता करता  रोज गोळी घेणं, आणि तीही अगदी वेळेत घेणं किती अवघड, त्या पेक्षा हे बरं. इंजेक्शन जरी घ्यायचं विसरलं, तरी चांगली दोन आठवड्याची मुदत असते. त्या दरम्यान घेतलं की झालं.
डेपो-प्रोव्हेराची धाव तीन महिन्यांपर्यंत. गर्भावस्था टाळण्यासाठी इंजेक्शन दर ३ महिन्यांनी पुन्हा दिले गेले पाहिजे. डेपो-प्रोव्हेरा थांबाविल्यानंतर बीजनिर्मिती तत्काळ सुरु होत नाही. थोडा वेळ लागतो. असा थोडासा परिणाम मागे रेंगाळत असल्यामुळे, इंजेक्शन थांबवले तरी लग्गेच दिवस राहत नाहीत. क्वचित काही वेळा इंजेक्शन थांबवल्यावर, पाळी अजिबात न येता, थेट दिवस राहिल्याची उदाहरणे आहेत. अंगावर पाजणाऱ्या बायकांनाही कधी कधी असे पाळी न येता दिवस जातात. बायकांच्या भाषेत याला ‘मिंधे दिवस जाणे’ म्हणतात.
याचे काही सहपरिणामही आहेत. सहपरिणाम हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे. जसे सहप्रवासी, तसे सहपरिणाम. काही चांगले काही वाईट, पण बरेचसे निरुपद्रवी. साईड इफेक्ट हा शब्द मुद्दाम टाळला आहे. साईड इफेक्ट म्हणजे फक्त वाईट साईट परिणाम असा एक घट्ट गैरसमज रुतून बसला आहे म्हणून.   अनियमित रक्तस्त्राव किंवा स्पॅाटिंग होणे, मासिक पाळीच्या रक्तस्त्रावात घट होणे किंवा अजिबात रक्तस्त्राव न होणे वगैरे होऊ शकते. शिवाय चक्कर, मळमळ असंही काहींना होऊ शकतं. कुणाला काय होणार हे आधी ओळखता येत नाही. कित्येक बायकांना पाळी थांबली, ही इष्टपत्तीच वाटते. काही घरात मात्र पाळी येणे हा कौटुंबिक इव्हेंट असतो. अशा बायकांना हे पाळी न येणं चालत नाही. असो.  पाळी आली नाही तर दिवस नाहीत हे तपासून घेणे उत्तम. न आल्याने विशेष काही बिघडत नाही. तेंव्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल तर इंजेक्शन बेलाशक सुरु ठेऊ शकता आणि शक असल्यास ही पद्धत बंद करून दुसरी कोणती तरी पद्धत वापरायला सुरवात करता येईल. गर्भ निरोधक म्हटलं की त्यामुळे वजन वाढतं असा एक समज आहे. डेपो प्रोव्हेरामुळे वजन वाढतबिढत नाही. उलट खा-खा खाऊन आणि व्यायाम न करून, जाड झालेल्या बायकांनी मुद्दाम हा अपसमज पसरवला आहे, अशी मला दाट शंका आहे.
थोडक्यात मूल झाल्या झाल्या वर्ष दोन वर्षाची गॅप ठेवायला हे इंजेक्शन हा एक उत्तम उपाय आहे. वर्षानुवर्षे घ्यायचं असेल तरीही चालेल. लोकांच्या गरजा विविधांगी असतात, तेंव्हा साधनेही विविध गुणधर्माची हवीत असं एक तत्व आहे. या निमित्तानी एक उपयुक्त साधन उपलब्ध झाले आहे. अभिनंदन.

No comments:

Post a Comment