Monday 11 March 2019

पण लक्षात कोण घेतो?


पण लक्षात कोण घेतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

बाळाची काळजी घेण्याच्या, जितकी घरे तितक्या तऱ्हा असतील. बाळ म्हणजे सृजनाची खूण, भविष्याची ठेव, पूर्वजांच्या ऋणाची परतफेड...पण ह्या काव्यात्म, रेशमी अनुभवाला गैरसमजुतींची कसर अगदी सहज लागते. पण लक्षात कोण घेतो?
आता हेच पहा ना, जन्मतः बाळाला अंघोळ घाललायची कित्ती कित्ती घाई. नुकतेच जन्मलेले बाळ अतिशय बेंगरूळ दिसते. ते टयांह्यां टयांह्यां रडत असते, ओले असते. केस चिकटलेले, चेहरा, डोकं जरा चेपलेलं, सर्वांगावर चिकटा चिकटलेला, रक्त लागलेलं, डोळे घट्ट मिटलेले; असं ते बाळ पहाताच आईच्या काळजात चर्रर्र होतं. हेची फळ काय मम तपाला, असं म्हणत ती मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेते. पाहिजे होतं मिल्कपावडरच्या डब्यावरचं गुटगुटीत बाळ आणि पदरात पडलं हे ध्यान!! पण चिंता नसावी. बाळ आपलं रूप झपाट्यानी पालटतं आणि काही दिवसात अगदी राजस दिसायला लागतं. त्याला सजवायची, घाई करू नये. जन्मतः बाळाला तेल माखून, न्हाऊ घालून, त्याच्या अंगावरचा चिकटा काढून, पॉलिश करून घेण्याची काही गरज नसते. उलट पहिले एकदोन दिवस बाळाला मुळी अंघोळ घालूच नये. त्याच्या अंगावरचा पांढरा चिकटा त्याच्या संरक्षणासाठी असतो. त्यांनी उबही रहायला मदत होते. तो काढून उलट तोटाच होतो. तेंव्हा तो आपोआप सुकून, पडू द्यावा.
जी गोष्ट अंघोळीची तीच तेलाची. जिथे भोक दिसेल तिथे तेल घालायची आपल्या समाजाला वाईट्ट खोड आहे. त्यामुळे बाळाच्या नाकात, कानात, बेंबीत, शीच्या जागी, शूच्या जागी, तेलाचे थेंब सोडले की ‘अंगाला लावणाऱ्या बायांना’ कृतकृत्य वाटतं. खरंतर बाळाच्या कुठल्याही भोकात काहीही घालायची गरज नसते. दिसेल त्या भोकात तेल घालायला बाळ म्हणजे काय शिवणयंत्र  आहे?
पण तेल आणि त्याचे गुणधर्म याचं वेडच आहे. अगदी जगभरातल्या लोकांना. कुठल्याही सफरीला गेलात की लगेच स्थानिक तेल विकणारे  भेटतात. इजिप्तच्या कमल-तेलापासून ते लंकेतल्या दालचिनी-तेलापर्यंत अनेक विक्रेते मला भेटले आहेत. कोणत्याही तेलात केस गळायचे थांबतात, सांधेदुखी पळून जाते आणि संडासला साफ होते! हे तीन गुण किमान असतातच.  बाकी मग तसला ‘स्टॅमिना’ वाढवण्यापासून ते चिरतारुण्यापर्यंत काहीही असू शकतं!! असो.
बाळाच्या कानात तेल ओतले तर कानाचा पडदा तेवढ्या वजनानेही फाटू शकतो. अगदी कांद्याच्या सालीइतका पातळ असतो कानाचा पडदा. तेलाचं वजन तो फाटायला पुरेसं असतं. मग हे तेल मध्यकर्णात जातं. या तेलाच्या थरावर बुरशी इत्यादी जंतू वाढतात. नाजूक अंतर्कर्णाची चांगलीच नासधूस करतात. बाळाची श्रवणशक्ती कमी होते, ते समाजात, शाळेत, मागे पडते आणि पुढे दुर्दैवाची मालिकाच सुरु होते. मुलाच्या आणि कुटुंबियांच्या अंतःकरणाची नासधूस होते. पण सांगूनही हौसेहौसेनी तेल घालणाऱ्या आज्ज्या, रोज भेटतात मला. वर सांगतात तेल घालत्यामुळे कानात मळ साठत नाही. मुळात मळ हा तिथले नैसर्गिक स्त्राव आणि धूळ याचं मिश्रण असतं. चावणे, चोखणे अशा जबड्याच्या हालचालींमुळे जो काही मळ असतो तो आपोआप बाहेर येतो. तो काढण्याची गरज नसते. त्यातून तान्ह्याबाळाचा आणि धुळीचा संपर्क तो किती? पण लक्षात कोण घेतो?
नाकातही तेल घालायची आवश्यकता नसते. उलट तेलाचा अंश श्वसनमार्गात जाऊन न्युमोनिया झाल्याची उदाहरणे आहेत. केमिकल न्युमोनायटीस म्हणतात त्याला.
बेंबीवर तेलही असेच अनावश्यक. तिथेही तेल घातलं की नाळेचं ओलं बोंडूक वाळण्याची क्रिया मंदावते. ओली, लुसलुशीत, निर्जीव, नाळ म्हणजे जंतुना मोकळे रानच की. नाळेला ड्रेसिंग करणे, पट्टी बांधणे, गोमय (म्हणजे गाईचे शेण) लावणे, सारं काही निषिद्ध आहे. गाय कितीही पवित्र असली तरीही. नाळ पडल्यावर कधी कधी बेंबी ओलसर रहाते. खडेमिठाचा खडा त्यावर धरला की ही ओल शोषली जाते. विशेष काही करावं लागत नाही.
तेल लावण्या पाठोपाठ अंघोळ येते. बाळराजांची अंघोळ म्हणजे तर काय शाही स्नान! एरवी चांगल्या कर्त्याधर्त्या बायका बाळाला अंघोळ घालायला बाई का लावतात हे एक न सुटलेलं कोडं आहे. एरवी ह्या बायका अगदी कर्तृत्ववान वगैरे असतात. विमाने उडवतात, बंदूक चालवतात, लाखोंचे व्यवहार ह्यांच्या सहीने होतात; पण बाळाला अंघोळ घालायला ह्यांना खास बाई लागते. ती सुद्धा कोणतीही कामवाली चालते. चार घरी धुणीभांडी करणे, चार घरी अंगाला लावायला जाणे, आणि स्वतःची चार मुले असणे, एवढेच ह्यांचे क्वालिफिकेशन. बाळाला अगदी चोळून मोळून अंघोळ घातली जाते. तत्पूर्वी त्याला तेलानी रगडून रगडून पैलवानासारखे  मालिश केलं जाते. इतकं रगडण्याची गरज नसते. अशाने क्वचित हाड मोडल्याची, स्नायू ओढल्याची उदाहरणे आहेत. एक बाई बाळाचे हात पाय एकत्र धरून त्याला झोके देते आहे, असाही एक भयंकर व्हिडीओ एका पेशंटनी मला दाखवला होता. काय करू नये, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवायला, मी तो सेव्ह करून ठेवला आहे.
अंघोळीच्या आधी ह्या तेल लावण्याचा कितपत फायदा होतो कुणास ठाऊक. तेलाचा काही अंश हा बाळाच्या त्वचेतून शोषला जातो, त्वचा तुकतुकीत रहाते हे फायदे म्हणायचे. पण त्याच बरोबर ते बुळबुळीत होतं, हातातून निसटून अपघात होऊ शकतो हे तोटे म्हणायचे. शिवाय तेल कोणते हा तर आजकाल प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तालेवार घरात बदामाचे तेल, नाहीतर तिळाचे तेल, मग खोबरेल तेल, मग गोडं तेल अशी उतरती भाजणी आहे. खरंतर कोणतेही तेल चालतं. कृपया अर्थाचा अनर्थ करून अगदीच इंजिन ऑईल चोळू नये!
मग कढत पाण्यानी अंघोळ. त्यात बाळाला पायावर घेणे, बसवणे, डोक्यावरून पाणी घालणे, उलथे ठेऊन घालणे, पालथे ठेवून घालणे, अशा क्रिया हौसेहौसेनी केल्या जातात. हे सगळं अनावश्यक आहे आणि क्वचित धोकादायक सुद्धा. हे होईपर्यंत बाळ ठोठो बोंबलत असते, क्यांक्यां केकाटत असते. पण ह्या सगळ्यानंतर बाळ गाढ झोपते याचेच बायकांना कौतुक! झोपेल नाही तर काय? इतके रडव रडव रडवल्यावर ग्लानी येणारच की. पण रडण्यानी बाळाला व्यायाम होतो असं एका माउलीच्या, माउलीच्या, माउलीनी मला छातीठोकपणे सांगितलं होतं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचं ते छाती ठोकणे काही संपेना. शिवाय स्वतःची आठ बाळंतपणे झाल्याचा त्यांना लोकोत्तर अभिमान होता आणि माझे एकही बाळंतपण झाले नसल्याचा कांगावा अखंड चालू होता. शेवटी मी म्हटले, ‘अरे व्वा! मग रोज तासभर पाट मांडून, मांडी  घालून बसा आणि मोठ्यांदी गळा काढून तुम्हीही तोच व्यायाम करा!!’
बाळाला बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून; नाही तर त्यांनी सांगितलं असतं, की ‘मी काही तुमच्यासारखा बाहेर जात नाही. त्यामुळे मळतबिळत नाही. मला नुसतं विसळून घेतल तरी चालेल’. बाळ विसळून घेणे ही बाळाला अंघोळ घालण्याची आदर्श पद्धत. करायचं असं की टेबलावर योग्य त्या तापमानाचे पाणी एखाद्या टबमध्ये घ्यायचं आणि बाळाला त्यात हलकेच विसळून घ्यायचं. गार हवा, मग गरम पाणी, पुन्हा गार हवा अशा तापमानाच्या झोक्यांचा बाळाला त्रास होतो. तेंव्हा हे लक्षात ठेऊन सारं काही उरकायचं. अंघोळीनंतर तेल लावायचं. अशानी अंगात उब रहायला या तेलाचा उपयोग होतो.
या साऱ्या प्रकारात सर्वात अघोरी प्रकार कोणता असेल तर बाळाला धुरी देणे. रसरसत्या निखाऱ्यावर काय काय जाळून त्याचा धूर बाळाला दिला जातो. त्या धुरात काय दिव्य वायू असतील ते असोत, पण त्यात कर्बद्वीप्राणवायू आणि कर्बप्राणवायू  असतातच असतात. यांनाच मराठीत कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणतात. यातला दुसरा तर एकदा लालपेशीत शिरला की पुन्हा निघत नाही. म्हणजे ती पेशी कायमची बाद. हा प्रकार तर पूर्णतः टाळावा.
बरेचदा बाळाची छाती फुगलेली दिसते आणि ती पिळली तर किंचितसे दूधही येते. याला डाकीणीचे दूध म्हणतात आणि हे पिळून काढणे चांगले असेही समजतात. पण अशा तऱ्हेने दूध पिळणे हानीकारक ठरते. यामुळे दुधाच्या पेशींना इजा होते आणि जर मुलगी असेल, तर तिला पुढे स्तनपानाला अडचण येते. असे दूध आईच्या संप्रेरकामुळे तयार झालेले असते. ते आपोआप, आतल्याआत जिरून जाते. पिळून काढण्याने कधी कधी तिथे इन्फेक्शन होऊन गळू देखील उद्भवू शकते तेंव्हा असे करू नये.
तान्ह्या मुलीच्या बाह्यांगातून थोडा रक्तस्राव झाल्याचही दिसू शकतं. हा ही आईच्या संप्रेरकांचा प्रताप. ह्यालाही काहीही करायची गरज नसते. हा ही स्त्राव आपोआप थांबतो. जुजबी स्वच्छतेपलीकडे काही करावे लागत नाही. उगाच आश्चर्याचे चित्कार काढू नयेत. पदर तोंडावर धरून ‘पदर आल्याची’ अस्फुट चर्चा करू नये. ती फिजूल आहे.
बाळाच्या डोळ्यात काजळ घालणेही असेच चुकीचे आहे. शिवाय ते डायरेक्ट बचाकभर घातलेले असते. त्या काजळातून डोळे शोधावे लागतात. घरी केलेले, चांदीच्या वाटीवर धरलेलं असलं तरीही काजळाची गरज नाहीच. काजळामुळे डोळे मोठे होत असते तर चिन्यांनी आणि जपान्यांनी आपल्याकडून कित्तीतरी काजळ आयात केलं असतं! काजळ घालणारी बोटे अस्वच्छ असली तर डोळ्याला इन्फेक्शन होते, कधी बोट डोळ्याला लागते, काजळीचे कण डोळा ते नाक अशा सूक्ष्म अश्रूनलिकेत अडकून ती वाट बंद होते; असे अनेक प्रकार संभवतात. दृष्ट लागू नये म्हणून हा प्रकार आवश्यक आहे म्हणे. काय काजळ तीट लावायचं ते इतरत्र लावा. पार अंगभर ठिपके ठिपके काढून बाळाचा बिबट्या करा. पण प्लीज डोळ्यात काही घालू नका.
असाच बाळाची टाळू भरणे नावाचा एक प्रकार आहे. हा करू दिला नाही तर आलेल्या बाईचा डायरेक्ट अपमान होतो म्हणे. लगेच तिचा पापड मोडतो. यात आलेली बाई बाळाच्या डोक्यावर तेल थापटते. तेल राहून, केस चिकटून, खवडे झाले तरी चालतील पण टाळू भरणार म्हणजे भरणार! मुळात तेलानी असं काही होत नाही. टाळू न भरणाऱ्या इतर संस्कृती या पृथ्वीतलावर नांदत आहेत. त्यांच्या अपत्यांची टाळकी टाळू न भरताही शाबूत आहेत. बाळाची टाळू म्हणजे त्याच्या कवटीच्या हाडातील मऊ मोकळे अंतर असते. बाळाचा वाढता मेंदू मावावा म्हणून अशी सोय असते. शिवाय प्रसुतीच्या वेळी अशा लिबलिबीत लवचिक कवटीमुळे बाळाचे डोके थोडे निमुळते होते आणि सुलभतेने बाहेर येते. पुढे १८ महिन्यापर्यंत ही जागा हाडांनी भरून जाते, चांगली टणक होते. तेल थापटून टाळू भरून येत नाही. शिवाय जर भरून येत असेल तर मग एकच का? अशी किमान अजून एक  जागा असते बाळाच्या डोईस. कमी दिवसाच्या बाळाला तर अधिक असतात. त्याही भराव्यात. पण बायकांना या जागांचा पत्ता नसल्यामुळे सारा भर माथ्यावर तेल थापटण्याकडे. बिच्चाऱ्या बाकीच्या टाळू! मुकाट्यानी आपोआप भरून येतात.
बाळाला भेटायला येणारेही असेच उच्छाद आणतात. मुळात भेटायची, बाळ पहायची उत्सुकता असणे यात गैर काही नाही. माकडातही अशी वागणूक शास्त्रज्ञांनी नोंदवली आहे! पण जावं ते थोड्या दिवसांनी, जरा आई आणि बाळ स्थिरस्थावर झाल्यावर. तात्काळ भेटायला गेलं नाही तर आपलं महत्व कमी होईल असं काहींना वाटतं. मग दवाखान्यातच भेटायला जायचं, हात साबणाने स्वच्छ न धुताच बाळाला मांडीवर घ्यायचं, त्याला मांडीवर घेऊन डोलवायचं, त्याच्या हातात मळकी नोट ठेवायची, मग ते ती नोट तात्काळ तोंडात घालणार...!!! अशी सगळी गंमत चालू रहाते.
येणारे जाणारे तरी किती, त्याला काही सुमारच नाही. त्या आईला ना पुरेशी विश्रांती मिळते, ना बाळाला घ्यायला वगैरे पुरेसा निवांतपणा, ना प्रायव्हसी. काही समाजात तान्ह्या बाळाला अजिबात बघायला जात नाहीत, गेले तरी हात लावत नाहीत. हे बेस्ट आहे. काही लोकांत मात्र येईल ती बाई बाळ हाताळणार, त्याला तेल लावून त्याची टाळू भरणार. वर असं काही टाळावं म्हणलं तर तिचा अपमान होणार.  मेलीनं मूल माझ्या मांडीवर दिलं नाही म्हणणार.
अशा किती गोष्टी सांगाव्यात? एक ना अनेक. शेवटी मी तर माझ्या दवाखान्यात प्रत्येक खोलीबाहेर पाटी लावून टाकली आहे...
मी तर इवले इवले मूल; अगदी नाजूक नाजूक फूल.
भेटण्यासाठी तुम्ही आतुर; पण डॉक्टर मात्र चिंतातूर.
बाहेरून येता कुठून कुठून; कपडे, अंग, हात मळवून.
आत्ता भेट फक्त लांबून, नंतर बोलावीन हाक मारून.
ह्यानी मात्र भलताच फरक पडला आहे. एरवी येणारे यायचे, काय करायचे ते करायचे आणि जायचे. आता येणारे येतात, काय करायचे ते करतात आणि जाताना मला सांगून जातात, ‘डॉक्टर, तुम्ही कविता छान करता हं!’




2 comments:

  1. i like your article really it is happening sir plz guide to us how to care baby as we have to do housework. olny Dettol is sufficient for handwash? eagerly awaiting for reply

    Thank you sir

    ReplyDelete
  2. Dear Dr Shantanu ji,
    Doing excellent job.👍
    Let every mother &
    Mother's of these mothers follow your scientific advice for Child's well-being..
    Appreciated your straightforward words
    Keep it up..
    -- Dr Shitalprasad, Sangli

    ReplyDelete