जावे पुस्तकांच्या गावा
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९
पाचगणीजवळ भिलारला, म्हणजे
माझ्याजवळच पुस्तकांचं गाव होतंय हे वाचून मला खूप आनंद झाला. मुळात मी पुस्तकातला
किडा. त्यातून अशा प्रकारे जवळच पुस्तकांचा साठा मिळाल्यावर काय विचारता.
पण जावून करणार काय? एखादं
पुस्तक वाचायला कधी अख्खा दिवस लागेल तर कधी दोन चार दिवस, तर कधी जास्त. तेवढे
दिवस निवांत तिथे रहायला हवं. मग मात्र मजा आहे. कधी झोपाळ्यावर झुलत, तर कधी
खुर्चीत डुलत; कधी चिवड्याचे बोकाणे भरत, तर कधी गुलाबी थंडीत कॉफीचे वाफाळते
घुटके घेत; असं आपण वाचू शकतो. मग हे सगळं करायला आसपास पुस्तकाचं गाव कशाला हवं?
ज्याला वाचायचंय तो एकदा पुस्तकात शिरला की आसपास गावंच काय वेगळं विश्वच उभं रहातं
की.
पण तरीही मला वाटतं गाव हवंच.
कारण पुस्तकांचं गाव हे एक संस्कार देतं. सुट्टीमधे मज्जा करताना, शॉपिंग, खाणेपिणे,
आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी अशी चैन करताना हे पुस्तकांचं गाव पर्यटकांना भेटतं. मग, ‘बघू
तरी काय आहे’ अशी उत्सुकता चाळवली जाते. सहज म्हणून चाळताचाळता किती प्रकारची
पुस्तकं असू शकतात ते समजतं. वाचन, हा ही मौजेचा भाग आहे हे समजतं. शिवाय अशा
निसर्गरम्य ठिकाणी वाचन आणि निसर्ग-वाचन जोडीनं घडतं. त्यामुळे कल्पना चमकदार आणि
लाजवाब आहे.
कधीतरी आधी वाचलेली पुस्तकं
इथे अचानक हातात येतील, त्यांची पाने चाळताचाळता, स्मृतींची पानेही चाळली जातील.
काहींना मोठ्यांनी वाचायला आवडतं, तीही हौस इथे मोकळेपणी भागवता येईल. चार पावलं
इकडे तिकडे गेलं की ‘होल वावर इज आवर’! त्यामुळे कोणी शिरा ताणताणून ऐतिहासिक नाटकातील लंबीचौडी स्वगतं म्हणताना
दिसला तर आश्चर्य वाटू नये.
एखादं ग्रंथालय पालथं घालणं
आणि पुस्तकांचा गाव पालथा घालणं यात फरक आहे. ग्रंथालय म्हणजे सारं शिस्तशीर, शांत
शांत. आय.सी.यू.त जाउन पुस्तकांना भेटल्यासारखं. इथे म्हणजे घरी जाऊन मित्राला
कडकडून भेटल्यासारखं आहे. शिवाय सोबतीला चहा पोहे वगैरे, वगैरे, वगैरे... (बाकीचे ‘वगैरे’
ज्याने त्याने आपापल्या कल्पनाशक्तीने भरून काढावेत.) अर्थात पैसे देऊन हं! पंचवीस
घरं/ हॉटेलं इथे पुस्तकांनी सजलेली आहेत. त्यांची अंगणं-भिंती साहित्य विषयक
चित्रांनी नटलेली आहेत. आपण खाऊ शकता, पिऊ शकता, राहू शकता, वाचू शकता.
इथे येतात बरेचसे अमराठी.
गुजराथी जास्त. मुंबईवाले. यांना अन्नाची भूक भारी. ‘ओरे जीग्नेसभाय आईस्क्रीम
जोवानु’; हे हरघडी कानावर पडत असतं. या
खालोखाल पुण्यातील, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कुटुंबवत्सल माणसं, आया,
आज्या, आजोबे, पोरंसोरं असा लवाजमा घेऊन किंवा काही तरी ‘प्रसंग’ साजरा करायला
येणारे मित्र/कुटुंबांचे थवे. शिवाय शाळांच्या ट्रीप हाही एक मोठा वर्ग. शाळांच्या
ट्रीप इथे नक्कीच येतील. कोणताही सरकारी फतवा नसताना येतील. इथून स्फूर्ती घेऊन
काही मुलं तरी आपापल्या शाळेतल्या ग्रंथालयाचा सजग उपयोग शिकतील, करतील; अशी
खात्री वाटते.
पण एक अडचण अशी की, इथे
आहेत ती फक्त मराठी पुस्तकं. अर्थातच शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फतचा हा
उपक्रम आहे. मराठीला उत्तेजन देण्यासाठीच आहे. स्तुत्य आहेच आहे. पण येणारे बरेचसे
पुस्तकं बाहेरूनच बघतात. पिंजऱ्यातला वाघ किंवा साप किंवा माकड बघावं तसं. बाल चमूची
या पुस्तकांशी दोस्ती शक्यच नाही. एक तर बहुतेक इंग्लिश मिडीयमवाले, म्हणजे
मराठीची टोटल बोंब! उरलेले सेमी-इंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्हीची टोटल
बोंब किंवा बेटर स्टिल, बोंबाबोंब!! आणि मग त्यातूनही उरलेले मराठी माध्यमवाले!!!
ह्या मुलांना मात्र इथे अंतरीच्या ओळखीचं, अभ्यासक्रमातल्या ओळखीचं, असं बरंच काही
गवसेल. ही भाषेची अडचण लक्षात घेऊन आता, अन्य भाषिक पुस्तके, देशभरातील अकादमी
पुरस्कार प्राप्त पुस्तके इथे येणार असा सांगावा आहे.
सध्या मात्र शालेय ट्रीप
वगैरे अशा झुंडीने येणाऱ्या वाचकांची वेगळी अशी सोय नाही. पुस्तकांच्या प्रत्येक
घरात इतकी पोरं कशी मावणार? पण अशी सोय होऊ घातली आहे म्हणे. पावसाळयात
येणाऱ्यांसाठीही काही खास सोय लागणार आहे. गावांनी दिलेल्या चार एकर जागेत या सुविधा
उभ्या रहातील असं दिसतं.
पुस्तकं इथे विक्रीसाठी
नाहीत. ही मोठीच गोची आहे. खरंतर एखादं मनात भरलेलं पुस्तक विकत घेण्याची सोय असती
तर बरं झालं असतं. सरकारी योजनेत हे नसलं तरी इथली माणसं हुन्नरी आहेत. त्यांनी स्ट्रॉबेरी
पिकवून, जिथे पिकते तिथेच ती विकूनही दाखवली आहे. त्यांना जे विकतं तेच कसं
पिकवायचं याची उत्तम जाण आहे. लवकरच इथे पर्यटकांच्या मागणीनुसार, इंग्रजी बुकेही
येतील, विक्रीही सुरु होईल, हे निश्चित. दुर्मिळ पुस्तकं हाती लागणं ही
पुस्तकवेड्यांसाठी पर्वणीच. तो योग सध्यातरी पुण्या-मुंबईच्या फुटपाथवर जुळून
येण्याचा योग जास्त. पण इथे पुस्तकांच्या गावी, भिलारमधेही कोणी विचक्षण विक्रेता
निपजेल, रद्दीतही काही मौक्तिके असतात हे त्याला उमजेल आणि अनवट पुस्तकांची आणि
वाचनवेड्यांशी अवचित गाठ पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हर घरी विभागवार पुस्तके
आहेत. म्हणजे एखाद्या घरी कादंबरी तर फक्त कादंबरी आढळेल. एखाद्या घरी इतिहास तर
इतिहास. त्यामुळे इतिहास चाळून झाल्यावर नाटकाची भूक चाळवली गेली तर ‘नाटक-घर’
शोधत जावं लागतं. खरतर सर्वच ठिकाणी विविध पुस्तकं असूनही चालेल.
‘हे ऑन द वे’, हे इंग्लंडातील गाव हे ह्या
उपक्रमाचं स्फूर्तीस्थान. ठायीठायी पुस्तकांची दुकानं, (इंग्लंडला म्हणतातच मुळी ‘नेशन
ऑफ शॉपकीपर्स’), तिथे आरामात पुस्तकं पहात (ती विकतही घेणारे) पर्यटक, वेळोवेळी
भरणाऱ्या पुस्तकजत्रा/यात्रा, साहित्यिक समारंभ, प्रकाशन समारंभ, ‘लेखक आपल्या
भेटीला’ असे कार्यक्रम; असा सदोदित शाई-कागदाचा उत्सव तिथे भरलेला असतो. असंच
काहीसं इथे व्हावं हे तो सरकारची आणि माननीय मंत्रीमहोदय विनोद तावडेजींची इच्छा. पण
प्रकाशन सभागृह, काव्यकट्टा, कथाकथनासाठी वगैरे खुला रंगमंच, भाषण वगैरेसाठी मुक्त
व्यासपीठ असं इथे अजूनही काही नाही. हे
सगळं बनवू घातलंय असं ह्या उपक्रमाचे कर्तेधर्ते, विश्वकोशातील अधिकारी, श्री.
जगतानंद भटकर यांचं म्हणणं. इथे मराठी साहित्य संमेलन भरवलं तर त्या निमित्त ह्या
साऱ्या सोयी झटपट होऊन जातील असं सुचवावस वाटतं.
शेवटी ज्यांना वाचायचं असतं
ते वाचतच असतात आणि ज्यांना वाचायचं नसतं ते असल्या उपक्रमांना बधत नाहीत. प्रश्न
मधल्याअधल्यांचा आहे. या मिषानी अशी माळरानावरची मंडळी पुस्तकांच्या ‘निबिड कांतार
जठरी’ शिरतील असं वाटतं.
पूर्वप्रसिद्धी:- महा अनुभव जून २०१७
No comments:
Post a Comment