दोन घडीचा डाव...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई,
सातारा. पिन ४१२ ८०३; मो. क्र. ९८२२०
१०३४९
नाळ पडत आली होती. मी पटकन
ते बेंबीशी लोंबणारं वाळकं बोंडूक उपटलं आणि कचऱ्यात दिलं टाकून. बाळाची आई आणि
आजी अगदी नाराज झाल्या.
‘ते हवं होतं डागदर’, त्या
पुटपुटल्या.
‘कशाला?’
‘पाचवी पुजायला!’
गावाकडे अजूनही चालतो हा
प्रकार. बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या
दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते.
जर सटवाई पाचव्या दिवशी
भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका
समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या
देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार.
या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं,
अन्यथा नाही.
बाळाचं नाव ठेवायचं तेही
बाराव्या दिवशी. ‘मुलगा झाला तर तुझं नाव ठेवीन रे, गणपतीबाप्पा’, हे नवसासाठी.
अडचणीत असताना. एरवी जन्माआधी बाळाच्या नावाचा विचार सुद्धा करायचा नाही. कारण बाळाचं
नाव ठेवणं म्हणजे त्याला एक व्यक्तित्व देणं, नातं जोडणं, कुटुंबाचा भाग मानणं. हे
सगळं सदा भलतच अनिश्चित. त्यामुळे हे सगळं सावकाश, आस्ते आस्ते, जपून, बारा दिवसानंतर.
अशा समाजात तान्ह्या बाळाचा
मृत्यू ही कितीतरी नियमितपणे घडणारी घटना असणार. स्वातंत्र्याच्या दशकात, शेकडा
वीस मुलं वर्षाच्या आत मरायची! आज हा दर शेकडा ३ पेक्षा कमी आहे. पूर्वी हा मुळी
नियमच होता, अपवाद नाही. ‘फूल तो गिरते ही है, फल नही
गिरने चाहिये’, ही म्हण बरंच काही
सांगून जाते.
जन्मल्यानंतर काही काळात होणारे मृत्यू हे
बरेचदा कमी वजनामुळे, कमी दिवसामुळे आणि बाळंतपणातील घोटाळ्यामुळे होतात. जंतू
बिंतु नंतर. इतक्या झटपट आपला प्रभाव दाखवण्याची संधी जंतूंना मिळत नाही.
बाळंतपणासाठीच्या सुविधा पुरवल्या की ह्याच्या आसपास घडणारे मृत्यू टळतात.
मांडीवर आपलंच मेलेलं
मूल घेऊन बसलेली, शोक करणारी आई, हे दृष्य अशा समाजात नेहमीचंच, अगदी शाळेतल्या मुलानंही कधी ना कधी
तरी पाहिलेलं. ‘राजहंस माझा निजला’ ही कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात असते
ती अशाच समाजात. या कवितेत नुकतंच वैधव्य आलेल्या बाईचं मूलही
नुकतंच गेलेलं आहे. ते मांडीवर घेऊन ती
ते ‘नेऊ’ पहाणाऱ्यांस बजावते आहे, ‘राजहंस माझा निजला’.
करु नका गलबला अगदी,
लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा
वाजवूं नका पाऊल,
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला
अतिशय करूणरसप्रधान अशी ही कविता
आहे. पण कल्पना करा ‘राजहंस माझा निजला’ ही कविता पुन्हा पाठ्यपुस्तकात आली तर
त्यातलं कारुण्य आजच्या मुलांनाच काय पण शिक्षकांनाही भावणार नाही. यात कारुण्य
कमी आणि भीषणता जास्त आहे असं काही तरी त्याचं मत होईल!
शेतात पेरलेलं उगवेल की
नाही हे सांगणं जसं मुष्कील, तसंच हे मानवी बीजही उगवेल की नाही हे सांगणं
मुष्कील. मूल तर सोडाच, आई वाचेल का नाही हेही सांगता यायचं नाही. बाळं पटापटा
मरायची तशा आयाही पटापटा मरायच्या. १९४७ साली शंभरातल्या दोन आया बाळंतपणात
मरायच्या आणि पन्नास एक तरी पुढे महिना दोन महिने अंथरूण धरायच्या. बाळंतरोग
नावाचा रोगच होता. तो आता इतिहासजमा झाला जणू. आज हजारात एखादी आई मरते. हा ही दर
खूपच जास्त समजला जातो. प्रगत देशात हा लाखात दोन-पाच एवढा आहे. बाळंतपण म्हणजे दुसरा जन्मच असं म्हणायचे ते
काही खोटं नव्हतं. बाळंतीण होणं ही सत्वपरीक्षाच होती. ती उत्तीर्ण होणारीला मान
आणि वारंवार उत्तीर्ण होणारीला मरातब मिळणं स्वाभाविकच. बहुप्रसवेचा सन्मान आणि
वांझोटीचा धिक्कार ही समाजात उत्क्रांत झालेली भावना आहे. बहुप्रसवा असणं
फायद्याचं होतं, बहुप्रसवा असणं धोक्याचंही होतं. बाळंतपण ही जोखीम होती त्या स्त्रीनं
घेतलेली. कुटुंबांसाठी, वंशासाठी अशी जीवाची जोखीम घेणारी स्त्री वंदनीय ठरली यात
नवल ते काय? जगातल्या सर्व देशात हौतात्म्याचा सन्मान केला जातो. ‘देशासाठी मेलास
तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास’ वगैरे...! देशासाठी प्रसंगी प्राणांचीही
आहुती द्यायला या मुळे माणूस उद्युक्त होतो. तसंच काहीसं हे. ‘स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी!’ किंवा ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ वगैरे. मातृत्वाचा
इतका पराकोटीचा गौरव, मातृत्वाची जोखीम स्वीकारणारी मनोभूमी तयार करतो. भरपूर
संतती असलेली बाई शुभशकुनी आणि अजिबात नसलेली अपशकुनी हे सगळं ओघानंच येतं मग. जिवतीचं
चित्रही असंच, बहुप्रसवा स्त्रीचा नितांत गौरव करणारं आणि अप्रसवा, निःसंतानांना
हीन लेखणारं. निःसंतान स्त्रीयांना (आणि पुरुषांनाही) जेरीस आणणारे असे कितीतरी
वाक्प्रचार, प्रथा, परंपरा सांगाव्यात. अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद असो की
प्रत्येक अपत्य-शक्य स्त्रीची नारळाने ओटी भरणे असो, वांझोटीच्या नजरेपासून मूल
लपवणे असो की निसंतान पुरुषाच्या पौरुषत्वाबद्दलच शंका घेणे असो.
सारी सुखं हात जोडून पुढे उभी
असताना गोष्टीतल्या राजाला दुखः मूलबाळ नसल्याचं, त्यातही मुलगा नसल्याचं. बऱ्याच
स्तोत्रांच फलित, बऱ्याच व्रतवैकल्यांचा हेतू, बऱ्याच कहाण्यांचं सार एकच, संतती,
इच्छित संतती, भरपूर संतती, घराचं नांदतं गाजतं ‘गोकुळ’ होणे.
प्रत्येक बाईला सरासरी
पाच-सात मुलं व्हायची. बाळंतीणीची खोली म्हणून एक वेगळी खोलीच असायची प्रत्येक
वाडयात. एका कुटुंबात जननक्षम बायका असायच्या ४ ते ५. म्हणजे ३२ वर्षाच्या सरासरी
आयुष्यात माणसे सुमारे ३२ जन्म बघायची. लग्न लवकर, मूलही लवकर, त्यामुळे सासू-सुनेची
बाळंतपणही एका वेळी व्हायची.
३२ जन्म आणि सुमारे तितकेच मृत्यू याची देही याची
डोळां बघायची माणसं. यातल्या बहुतेक मरणांची (आणि काही जन्मांची सुद्धा), कारणं
अज्ञात, अनाकलनीय.
मृत्यू इतका सातत्यानं जवळ
असायचा की वंशवृद्धी हे जीवनध्येय होणं यात नवल ते काय? सरासरी आयुर्मानच मुळी ३२
वर्ष होतं स्वातंत्र्याच्या वेळी. तेच
१९८० साली होतं ४८. आता ६६ वर्ष आहे. अमेरीकेत सध्या आहे ७८ वर्ष.
पुन्हा शेवटचे अंथरूण धरणे
ते मरणे, ह्यातलं अंतर अगदी कमी होत तेंव्हा. शामच्या आईची आणि शामची भेट, खरोखरच,
नाहीच व्हायची. दुसऱ्या कुणाची ‘आssई’ अशी हाकही भारी दुखःकारी असायची, ते या
कोवळ्या वयातल्या आघाता मुळेच.
जखम, जंतू, ताप, खलास!
कुठलेतरी कारण...ताप, अती ताप, अति-अति ताप, खलास!! जुलाब, डीहायड्रेशन जुलाब,
डीहायड्रेशन, खलास!!! असा सगळा मामला. कुपोषण, अॅनिमिया, शास्त्रीय ज्ञानाचा,
उपचारांचा अभाव ह्या सगळ्याची काळीकुट्ट चौकट प्रत्येक मरणाला लाभलेली. सर्पदंश,
सेप्टिक, साथीचे आजार, यात पटापट माणसं मरून घ्यायची. सकाळी खांदेकरी म्हणून
आलेल्यालाच संध्याकाळी कसा खांदा द्यावा लागला याची रसभरीत वर्णनं आपण इतिहासात
वाचली आहेत. ‘महीना झाला व्हेन्टीलेटर वर आहेत’, वगैरे भानगड नाही. शेवटच्या
आजारपणाचा खर्चही कमी होता तो त्यामुळेच. त्यावेळी तेराव्याच्या जेवणाचा खर्च हा
डोईजड होता, आजारपणाचा नाही.
म्हाताऱ्याच खुब्याचं हाड
मोडलं की पुढे १५ दिवसात खेळ आटोपायचा. अशी माणसं हाड मोडल्यानं मरायची नाहीत. पण अंथरुणाला खिळल्याने, छातीत जंतुसंसर्ग होऊन,
न्यूमोनियानं मरायची. आता सांध्याच्या ऑपरेशन मुळे सांधा सांधला जातो पण त्याहून
महत्वाचं म्हणजे माणूस तत्काळ स्वतःच्या पायावर उभा रहातो. एकदम ‘पंगुम् लंघयते
गिरिम्’ असंच होऊन जातं. मरण टळतं ते सांधा बदलल्यामुळे नाही तर माणूस हिंडता
झाल्याने. अंथरुणाला खिळण्याची बात नस्से आणि खिळलंच कोणी अंथरुणाला की त्याची
यथास्थित काळजी घेण्याचं शास्त्र भलतंच
विकसित झालंय.
जगणं मरणं हे आता एका श्वासाचं
अंतर नाही राहीलं. मधे व्हेन्टिलेटर आहे, डायलेसिस आहे, अँन्गिओग्राफ़ी/प्लास्टी
आहे, पेसमेकर आहे, केमो/रेडीओ आहे. थकल्या भागल्या अवयवांसाठी अनेकानेक आधार आहेत.
क्वचित हे तापकारक होतं. मरण बरं पण उपचार नको असं होतं, नाही असं नाही, पण
बहुतेकदा हे उपचार तापहारकच ठरतात.
आरोग्याची व्याख्याच मुळी
अशी आहे की, ‘सामाजिक आणि आर्थिक दृष्टया उत्पादक काम करणारी कोणतीही व्यक्ती’ ही
आरोग्यसंपन्न समजली पाहिजे. आधुनिक वैद्यकीच्या साथीनं जगणारे बहुतेक जण या
व्याख्येनुसार आरोग्यसंपन्न ठरतात.
आजच्या पिढीला जननसोहळा आणि
मरणसोहळा कमीतकमी अनुभवाला येतो. ‘आजकाल आयुष्यात अनिश्चितता वाढली आहे. सकाळी
घराबाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल याची शाश्वती नसते’, वगैरे बोललं जातं,
पण आकडेवारी वेगळंच दाखवते. कमावत्या वयात, उमेदीच्या वयात एखाद्याचा मृत्यू होणही
अघटीतच. पण हेही आता आणखी कमी वेळा घडतं. हार्ट अॅटक, अपघात वगैरे जालीम शत्रू
जमेस धरूनही आकडेवारी हेच दर्शवते की कमावत्या वयात माणसं कमी दगावतात. आयुर्मान
वाढलं याचा अर्थ संध्याकाळी माणसं सुरक्षित घरी पोहोचण्याचं प्रमाण वाढलं असाच
होतो. आणि आयुर्मान काही थोडंथोडकं नाही चांगलं दुपटीहून अधिक वाढलं आहे.
वाढल्या आयुर्मानाचे काही
कल्पनेबाहेरचे परिणाम आहेत. उदाः नियमित पाळी किंवा ट्रॅव्ह्लवाल्यांची तेजी! नियमित पाळी ही वाढत्या आयुर्मानाची, उशिरा
लग्नाची, कुटुंब नियोजनाची देन आहे. शतकभरापूर्वी नियमित पाळी हा प्रकार नव्हता. आपल्या
खापरपणजीची कहाणी आठवा. बहुतेकदा लग्न हे पाळी यायच्या आधीच झालेलं. पाळी आली रे
आली की सासरी रवानगी. लगेच गरोदरपण, की पाळी बंद. लगेच बाळाला पाजायला, की पाळी
बंद. हे होई तोवर पुन्हा दिवस, पुन्हा पाळी बंद; पुन्हा अंगावर पाजणे, पुन्हा पाळी
बंद; पुन्हा दिवस, पुन्हा अंगावर पाजणे... असं आपले चालूच. म्हणजे नियमित पाळी ही
भानगडच नाही. शेवटी पाळी तरी जायची नाहीतर पणजी तरी जायची! पण पाळी आधी पणजीच
जाण्याची शक्यता जास्त.
म्हणजे निसर्गावस्थेत
नियमित पाळी ही ‘अनैसर्गिक’ गोष्ट आहे. पाळी बंद होऊन पुढे जगणं हे ही ‘अनैसर्गिक’
आहे. रानटी अवस्थेत असं होत नाही. १९४७ साली सरासरी आयुष्य ३२ वर्ष त्यामुळे पाळी
न येणारी बाई अगदी क्वचित दिसायची. मुळात असायचीच नाही आणि असली तर जराजर्जर
झाल्यामुळे बहुदा घरात घरात असल्यामुळे दिसायची तर नाहीच नाही. आज भारतात पाळी
येणाऱ्या महिलांपेक्षा न येणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
त्या काळी साठी शांत हा
उत्सवचा दिवस, आणि सहस्रचंद्रदर्शन म्हणजे
महोत्सव. आता मुळी रिटायरमेंटच वयच साठ. म्हणजे मालकाला खात्री आहे की साठी
होईपर्यंत हा माणूस पगार देण्याइतपत काम नक्की करू शकेल. वाढत्या आरोग्यपूर्ण
आयुष्याचा हा परिणाम. साठी झाली की माणसं खुशीत असतात. दुसरी इनिंग सुरु झाली
म्हणतात. मजेत लांब लांब ट्रीपला जातात. ट्रॅव्ह्ल वाले चांगलेच गबर होतात. ‘माझा
प्रवास’ वाले गोडसे गुरुजी यात्रेला बाहेर पडले तर घरी कोण हलकल्लोळ माजला.
काशीयात्रा म्हणजे सगळी निरवानिरव करूनच करायची यात्रा होती. आता युरोप,
सिंगापूरच्या ट्रिपा पत्ते खेळता खेळता ठरतात आणि कोपऱ्यावरच्या न्हाव्याकडे जावं
इतक्या सहजतेने लोक जाऊन येतात.
जीवन ऐसे नाव असणारा हा दोन
घडीचा डाव आता चांगला चार घडीचा झाला आहे. बदलत्या जीवनशैली बरोबर मरणशैलीही बदलली
आहे. उगीच पूर्वीच्या काळी असं नव्हतं असं म्हणून कुढण्यात काय अर्थ आहे?
पूर्वीच्या काळी असं नव्हतंच. तो काळ गेला आता आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्याची वेळ
आली आहे.
No comments:
Post a Comment