Friday 19 April 2019

माझा प्रवास होमिओपॅॅथी ते अलोपथी भाग २


वाईला पोचलो तो रिता, हताश आणि अपमानित. उगीच त्या ICR च्या फंदात पडलो, असे वाटायला लागले. हात दाखवून अवलक्षण. जे शास्त्र मनाला पटत नव्हते, त्यात प्रावीण्य मिळविण्याचा माझा प्रयत्नच चुकीचा होता. पण हे नाही तर दुसरे काय? या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. म्हणूनच तर मी या वाटेला गेलो होतो. पण आता हीही वाट बंद झाली होती.
खरंतर हे होमिओपॅथीप्रकरण आपल्याला झेपणार नाही, हे मला आधीच कळायला हवे होते. होमिओपॅथी नुसतीच अवैज्ञानिक नाही, तर विज्ञानविरोधीच आहे. मी विचारांची भोक्ता. घरी बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार होते. पुण्याला आल्यापास, संघटनेचे काम करीत होतो. इथे माझे विज्ञानवादी विचार अधिक धारदार झाले. विवेक सावंत, सुलभा ब्रह्मे,  श्री.न. गुत्तीकर, अरुण देशपांडे, डॉ. अनंत फडके वगैरे मंडळी इथे होती. पुस्तिकाप्रकाशन, पथनाट्य, पोस्टरप्रदर्शन, शिबिरे वगैरेमुळे माझ्या वैज्ञानिक जाणीवा प्रखर झाल्या. श्री. आनंद करंदीकर यांनी विज्ञानाच्या इतिहासावर घेतलेली लेक्चर्स, अरविंद गुप्तांनी खेळण्यांतून शिकविलेले विज्ञान या सा-यांत मी एखाद्या नवलनगरीतल्या लहानग्यासारखा हरवून जात असे, हरखून जात असे. लोकविज्ञानाचे काम मला मनापासून आवडायचे. तिथे समविचारी मित्र-मैत्रिणींची संगत होती. विज्ञानाचा आनंद घेण्याची, ते समजावून घेण्याची संधी होमिओ कॉलेजमध्ये मला कधीच मिळायची नाही. या त्रुटीची भरपाई लोकविज्ञानच्या कामातून होत होती. मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजविणारी युरेका' विज्ञानचाचणी लोकविज्ञानने सुरु केली आणि त्या युरेकानंदात मुलांबरोबरच संयोजक म्हणून मीही आकंठ बुडालो. त्यामुळेच की काय, आपण जे शिकतोय ते विज्ञान नाही, ते भ्रामक विज्ञान आहे, छद्मविज्ञान आहे, ही बोच सतत अणकुचीदार राहिली.

होमिओपॅथीच्या फुग्याला एकदाची टाचणी लागल्यावर माझी अवस्था मात्र हवा गेलेल्या फुग्यासारखी झाली. पण आता गप्प बसणं शक्य नव्हतं. घरी मी भडाभडा बोललो. पाच वर्षी केला तो पागलपणा होता हे मनोमन मान्य केले आणि येणा-या शैक्षणिक वर्षात चक्क B.Sc. ला अॅडमिशन घ्यायची ठरवली. डिसेंबरचा महिना होता. आणि एके दिवशी नव्या वर्षाचे स्वागत करणारा Illustrated Weekly of India चा जानेवारी ८७ चा अंक माझ्या हातात पडला. मुखपृष्ठकथा होती 'Against all Odds' ( विघ्ने नाना तरीही... ) हा अंक म्हणजे निराश मनात स्फुल्लिंग चेतवणारी जादूची कांडीच होती जणू. अत्यंत सामान्य परिस्थितीतील माणसे अत्यंत असामान्य संकटांना तोंड देत चिवटपणे, कशी झुंजत राहतात... आणि जिंकतात, त्याच्या एकाहून एक सरस कथा यात होत्या. साऱ्या इथल्या देशीच्या कथा, सारी इथलीच माणसं. कुणाला दोन वेळा जेवणाची भ्रांत तर कुणाला जन्मांधतेचा शाप कुणी उच्च विद्याविभूषित असूनही परिस्थितीने पंख कापलेले तर कुणी जन्मत:च हातपाय न फुटलेले, सा-यांच्या कष्टाला पारावार नाही आणि उद्याच्या आशेला सीमा नाही. एकेकाची आयुष्यभर चाललेली सत्वपरीक्षाच जणू! पण मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत ६०-७० पाने व्यापून उरलेली ही माणसं दुर्दम्य इच्छेने, ईर्षेने लढतच होती. हार मानत नव्हती, इंच इंच जिंकतच होती.
दिल्लीच्या दूधकेंद्रावर काम करणारा एक कारकून, मुलाला अपघात झालेला एकून कॅशमधले रु. ५००/- घेऊन मदतीसाठी धावला. मुलगा गेलाच; पण हा नंतर पैसे घेऊन कामावर आला तर त्याच्यावर चक्क चोरीचा आरोप ठेवला गेला. नोकरी गेली. त्याने कोर्टात दाद मागितली, खालच्या कोर्टात त्याच्या बाजूने निकाल लागला. पण नियमावर बोट ठेवून चालणा-या संवेदनाशून्य नोकरशाहीने हायकोर्टात केस ठोकली. तिथे निकाल त्याच्या विरोधात गेला. आता प्रश्न पैशाचा नव्हता. प्रतिष्ठेचा होता. काळाने हिरावलेल्या पोटच्या पोरावर केलेल्या, सच्च्या मायेचा होता. या गृहस्थाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. नोकरी तर नाहीच, याने फेरीवाल्याचा व्यवसाय केला, पडेल ती कामे केली, दरम्यान आजारपणाने गाठलेले, वाढते वय, बायको चार घरची धुण्या-भांड्याची कामे करत होती आणि हा मात्र न्यायासाठी लढत होता. घरातले सारे किडूकमिडूक विकून, देणेक-यांची तोंड चुकवत, खोपटात जगत होता. तब्बल २४ वर्षांनी खटल्याचा निकाल याच्या बाजूने लागला. दस्तुरखुद्द सरन्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड न्यायासनावर होते. त्यांनी त्यांच्या परीने न्यायाचे जास्तीत जास्त माप त्याच्या पदरात टाकले. व्यवस्थेविरुद्ध अशी एकाकी झुंज देणारा हा कोण माणूस आहे, हे मला पहायचंय, असे म्हणून त्यांनी वादीला कोर्टात उभे राहण्याचे आवाहन केले. भावनांच्या कल्लोळात, थरथरत हा उभा राहिला आणि क्षणभरात आनंदातिशयाने खुर्चीत कोसळला.
हे सारे वाचता वाचता माझी मलाच विलक्षण शरम वाटायला लागली. यांतल्या कित्येक मंडळींपेक्षा माझी परिस्थिती बरीच बरी होती. पैसे आणि प्रेम देणारे आई-वडील होते. थेट जबाबदा-या नव्हत्या. मी मात्र माझ्या चुका उगाळत बसलो होतो. होमिओपॅथी नव्हे, हे आता पक्क ठरलं होतं, पण बी. एस्ससी.चा पर्याय तितकासा आकर्षक वाटत नव्हता.
बी.एस्ससी.चं कॉलेज जूनमध्ये सुरू होणार होतं. जानेवारी चालू होता. मला मोकळा वेळ होता आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चोपड्याला होणा-या शिबिरासाठी जायचं ठरवलं. या शिबिरामुळे मी अंतर्बाह्य बदललो. अनेक प्रश्नांचा एकदम उलगडा झाला, विज्ञानवादी विचार वज्रलेप झाले. डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा.भा.ल.भोळे, शाम मानव वगैरेंनी विज्ञान, वैज्ञानिक विचारपद्धतीचा विकास, विज्ञानाचा इतिहास वगैरे त्या शिबिरात साद्यंत शिकविले. संमोहनविद्या आणि स्वसंमोहन यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. स्वसंमोहनाची ती मायावी दुनिया मला नवीनच होती. या साध्या, स्वयंसूचनेच्या तंत्रामध्ये केवढीतरी सुप्त शक्ती दडली होती. ही संमोहनविद्या माझ्या विस्कळीत मनाचा आधार ठरली. मी स्वत:ला सतत समजावत मनाचा तोल सांभाळू शकलो, ते त्या शिबिरात शिकलेल्या कौशल्यामुळेच.
शिबिर संपले. आरपार बदललेला मी गावी परतत होतो. मन शांत झाले होते. बी.एस्ससी. करण्याचा निर्णय सध्या योग्य वाटू लागला होता. पुढे एम.एस्सी., पीएच.डी. संशोधन असे विस्तारणारे क्षितिज होते. विज्ञानप्रचार/प्रसार असा आवडीचा पर्याय होता. एस्.टी.त वर्तमानपत्र चाळता चाळता एका कोप-यातल्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले आणि पुन्हा एकदा विचारांच्या कॅलिडोस्कोपला धक्का बसल्यासारखं झालं. काचा हलल्या, रचना भंगली, कोन बदलले. आता आतले चित्र बदलले, संदर्भ बदलले. मी शरीरानं तोच असलो, तरी आता दृष्टिकोन बदलला होता. त्या बातमीत मला आव्हान दिसत होतं. न भूतो न भविष्यती अशी संधी दिसत होती. बातमी होती सुप्रीम कोर्टाच्या एम.बी.बी.एस. प्रवेशाबाबतच्या एका निवाड्याची. यापुढे देशभरातून १५% जागा या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धापरीक्षेतून भरण्यात याव्यात, असा आदेश कोर्टाने दिला होता. होमिओपॅथीच्या गर्तेतून बाहेर पडण्याची ही एक संधी होती. बारावीतील पराभवाचे उट्ट काढण्याची ही एक संधी होती. अपु-या अभ्यासाचा आणि एम.बी.बी.एस.ला प्रवेश न मिळविल्याचा हा अपराधगंड मला सतत छळायचा. पुणे स्टेशनकडे जाताना एकटा असलो, तर मी ससून आणि बी.जे. मेडिकल कॉलेजकडे डोळा भरून बघायचो. त्या परिसरातील सगळे पांढरे डगले मला वंद्य होते. मग ते तिथे वॉर्डबॉय का असेनात. घरचे कोणी बरोबर असेल तर त्या वेळी या परिसराकडे मी ढुंकूनही पहात नव्हतो. गप्पा जोरात चालू ठेवायचो. उगीच कोणी बी.जे. आणि तिथे न मिळालेल्या प्रवेशाचा कोळसा उगाळू नये म्हणून ही धडपड. जे शास्त्र मी दुरून आधाशीपणे पहात होतो ते आत्मसात करण्याची ही संधी होती. प्रश्न होता या संधीचे मी सोने करतो किंवा नाही.
या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? स्पर्धापरीक्षेतील यशाबद्दल भल्याभल्यांचे अंदाज चुकतात. आंधळा खेळच तो. माझ्या हुशारीबद्दल, अॅप्टीट्युडबद्दल दाखवता येण्यासारखा एकही पुरावा माझ्याकडे नव्हता. उलट, अपयशाची आणि नैराश्याची रास सोबतीला होती. हां, एक गोष्ट होती पाचवीत अचानक मराठीतून मी थेट इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला होता आणि असं असूनही शाळेत मी चमकलो होतो, पण हे म्हणजे गल्लीतल्या गणपती उत्सवातल्या चमचा-लिंबू शर्यतीतल्या जेतेपणाच्या जोरावर, ऑलिंपिकपदकाची आशा धरण्यासारखे होते. या परीक्षेला बसायचे तर पुन:श्च हरि ओम्' म्हणून बारावीचा अभ्यास करावा लागणार. आता बारावी होऊन मला सहा वर्ष झाली होती. Sin, Cos, Tan म्हणजे काय, हेही आठवत नव्हतं. मिळालाच एम.बी.बी.एस.ला प्रवेश तर किमान साडे-पाच वर्षे शिकावे लागणार होते. पुढे एम.डी. अथवा एम.एस. व्हायचे तर आणखी तीन वर्षे. प्रवेशपरीक्षेसाठीचे एक वर्ष धरले तर किमान साडेनऊ वर्षे. तेही सतत पास होत गेलो तर! उपजीविकेसाठी पुन्हा घरच्यांवर अवलंबून राहावे लागणार, या साऱ्याचं दडपण होतं. पण सगळ्यात मोठी भीती होती ती अपयशाची. सर्वस्व पणाला लावल्याशिवाय राष्ट्रीय स्पर्धापरीक्षेला बसणे निरर्थक होते आणि नापास ठरलो तर पणाला लावलेले सर्वस्व जाणार होते.
स्पर्धापरीक्षेला बसण्याचा विचार आला आणि त्याच क्षणी माझ्या पराभवाची सवय लागलेल्या मनात शंकेची पाल डरकाळ्या फोडू लागली; स्पर्धापरीक्षा म्हणजे बेफाट काम, शिवाय हे देशपातळीवरचं सरकारी काम. त्यात लांड्यालबाड्या असणार, खाबूगिरी असणार, वशिलेबाजी तर असणारच असणार. तेव्हा तू या मार्गाला लागू नकोस!! माझ्या नकारात्मक मनाची ही हिंमत पाहून मी हबकून गेलो. एखादी पाल झटकावी तसा हा विचार मी तत्क्षणी झटकून टाकला. मी विचार केला; लांड्यालबाड्या, खाबूगिरी किंवा वशिलेबाजीमुळे काठावरच्या माणसांना पास करता येईल, पण आपण काठावर रहायचंच नाही. आपण अत्युच्च शिखरावर पोचायचं. आपल नाणं खणखणीत असेल तर चिंता कसली? विचार चांगला असला तरी तो कृतीत कसा आणायचा, याचा काहीही थांग मला नव्हता. असल्या अनेक कृतिशून्य विचारांच्या खेळण्यांशी मी आधीही  ब-याच वेळा, बराच वेळ खेळलो होतो. पण या वेळचा मी वेगळा होतो.
मी घरी आलो आणि आई-बाबांना भीतभीतच माझी कल्पना सांगितली. आणखी साडेनऊ वर्षे मला पोसायची त्यांची तयारी असणे महत्वाचे होते. क्षणाचाही विलंब न लावता बाबा म्हणाले, भले शाब्बास! बस तू परीक्षेला.' मी आश्चर्यचकित झालो. त्यांना माझ्या बोलण्यात आत्मविश्वास आणि उमेद दिसली, का नाउमेद झालेला हा मुलगा आपण जराजरी आढेवेढे घेतले, तरी जिवाचे काही बरेवाईट करून घेईल असे वाटले, हे मला आजही माहीत नाही. पण त्यांनी तत्क्षणी दिलेल्या होकाराने माझ्यात चैतन्याची लहर सळसळली. विश्वास ठेवावा असे आपल्याकडे काहीही नसताना आईबाबांनी दर्शविलेल्या विश्वासामुळे माझी जबाबदारीची जाणीव वाढली. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी तरी आपण ही लढाई जिंकलीच पाहिजे, असे वाटू लागले.
राष्ट्रीय स्पर्धापरीक्षा ही काय चीज असते, हे त्या वेळी मला नीटसे माहीत नव्हते. त्याचवेळी वाईतले एक ज्येष्ठ डॉक्टर, अण्णा दातार यांचा नातू मनोहर, अशाच परीक्षांसाठी थेट दिल्लीला जाऊन आला होता. अण्णाही त्याच्याबरोबर होते. अशा परीक्षांबद्दल ताजी व सखोल माहिती मला हवी होती. मनोहर वाईत नव्हता, तेव्हा आण्णांना भेटायचे ठरले. आण्णांनी सगळं ऐकून घेतलं आणि आपली ज्ञानवृद्ध नजर माझ्या नजरेला भिडवीत ते म्हणाले, ' हे पहा शंतनू, nothing less than 95% is going to help you, (पंचाण्णवपेक्षा कमी टक्के उपयोगाचे नाहीत!'), त्यांचे हे वाक्य माझ्या मनावर कोरले गेले. ती कातरवेळ, मावळत्या प्रकाशात उजळलेला आण्णांचा चेहरा आणि खर्जातला त्यांचा आवाज माझ्यावर खोल परिणाम करून गेला. त्या एका वाक्यात आण्णांनी माझे लक्ष्य लख्खपणे समोर धरले होते. ते साध्य करण्यासाठी किती कष्ट उपसायला हवेत. ते मला जाणवलं. पण दुसरा मार्गच नव्हता. ही कोंडी फोडायची तर एवढंच करणं शक्य होतं; आवश्यकच होतं. मी उठलो. एका दुकानातून अकरावी, बारावीची Physics, Chemistry, Biology ची सेकंडहॅन्ड पुस्तकं घेतली आणि अभ्यासाला सुरुवात केली.
मी अभ्यास सुरू केला त्याच सुमारास कॉलेजमधून प्राध्यापकपदाची संधी चालून आली. होमिओपॅथी शिकवणे मला चालण्यासारखे होते. मुख्यत्वे म्हणजे नियमित पगार मिळणार असल्याने मला उत्पन्नसुरू होणार होतं. मी २३ वर्षांचा होतो. घरी पैसे मागायची लाज वाटत होती. प्राध्यापकी हा होमिओपॅथीचा सर्वांत निरुपद्रवी आणि निरुपयोगी वापर होता. शिकवताना माझ्यापुरती एक काळजी मी नेहमी घ्यायचो. होमिओपॅथीच्या अमुक औषधाचा अमुक उपयोग होतो, असं सरळ विधान मी कदापि करायचो नाही. ‘असा असा उपयोग होतो, असं अमक्या पुस्तकात म्हटलं आहे', अशी पुस्ती जोडतच मी बोलायचो. होमिओपॅथीच्या वैधतेबाबत, उपयुक्ततेबाबत होकारात्मक संदेश माझ्याकडून अनवधानानेही जाऊ नये याची मी पुरेपूर दक्षता घेत असे. माझी ही वैचारिक कसरत पाहून कधी कधी माझे मलाच हसू फुटे, आज तर हे सारे आठवून अगदी खो खो हसू येते. वाटते, आपण किती विचित्र वागत होतो. पण असेही वाटते, की त्या वेळच्या माझ्या मन:स्थितीत हेच वागणे रास्त होते. माझ्या मनाच्या निश्चयाला पूरक होते.
हळूहळू माझ्या अभ्यासाने तपश्चर्येचे रूप धारण केले. अकरा  ते पाच कॉलेज आणि पाच ते अकरा अभ्यास असा दिनक्रम सुरू झाला. मॉडेल कॉलनीतल्या माझ्या आत्याच्या रिकाम्या बंगल्यात राहायचो. फोन, रेडिओ, पेपर, टी.व्ही. वगैरे काहीसुद्धा तिथे नव्हते. एकदा आत शिरलो की मी मेसमध्ये जाण्यापुरताच बाहेर पडायचो. परत येताच परत अभ्यासाला जुपी. मित्र, मैत्रीणी, सहकारी वगैरे कुणाकुणाला मी ह्या जागेचा पत्ता लागू दिला नाही. कुणी आलेच तर वेळ जाईल ही एक भीती आणि कुणी आले आणि १२वी ची पुस्तके पाहिली, तर गौप्यस्फोट होईल हा त्याहून मोठा भयगंड. गौप्यस्फोट अशासाठी, की मी पुन्हा एकदा बारावीचा अभ्यास करून एम.बी.बी.एस.ला प्रवेशासाठी प्रयत्न करतो आहे. हे मी कुणालाच सांगितले नव्हते. अगदी नातेवाइकांमध्येही नाही कारण अपयश आलं असतं तर माझ्या फजितीला पारावर उरला नसता आणि यशाची खात्री आधी कोण देणार?
या गुप्त साधनेमुळे माझ्यावर अनेक बंधने आली. मला कुणाचेही मार्गदर्शन घेता येईना. संपूर्ण अभ्यास मला एकलव्याच्या निष्ठेने माझा मलाच करावा लागला. माझे कितीतरी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक प्राध्यापकी करत होते. पण मला कुणाकडे जाऊन काही विचारणं नको वाटत होतं. स्वत:ची शरम वाटत होती. जसजसं खोलात शिरलो, तसं हे प्रकरण बरंच जड जाऊ लागल. या स्पर्धापरीक्षेसाठी C.B.S.C. चा अभ्यासक्रम अभिप्रेत होता. तो त्या वेळच्या HSC पेक्षा अनेकपटींनी विस्तृत आणि सखोल होता. निव्वळ १२ वी पर्यंतच्या पुस्तकांनी भागेना. पुढे कोणती वापरायची हे मला कोण सांगणार? मी कोणत्याही Science college चा विद्यार्थी नव्हतो, तेव्हा त्यांच्या Libraryचा मला उपयोग नव्हता. मग British Council Library ची मदत घेतली. तिथून Physics, Chemisrty., Biology चे जाडजूड ग्रंथ आणून अभ्यास सुरू केला. पदोपदी मला अडचणी यायच्या. पुस्तके अनंतवार वाचूनही काहीही समजायचे नाही. मी आपला त्या संकल्पनांशी झुंजत रहायचो. रात्र होऊ दे, अपरात्र होऊ दे, उत्तररात्र होऊ दे, प्रश्न संपायचे नाहीत. झपाटल्यासारखा मी अभ्यासाच्या मागे लागलेला. अनेकवेळा वाचल्यावर, सतत विचार केल्यावर, कधीतरी अचानक त्रास देणारी अवघड संकल्पना मला उमजायची, समजायची, अचानक कोंडी फुटायची. हा आनंद अनिर्वचनीय असायचा. तो तो शोध जणू मी स्वत:च लावत होतो! हा जणू नवनिर्मितीचा, नवीन शोधल्याचा 'युरेका आनंद होता. 'झपुर्झा गडे झपुर्झा' अशीच अवस्था ती! या आनंदाने माझ्या कित्येक रात्री श्रीमंत झाल्या. मला त्याचे व्यसनच लागले जणू! सुरुवातीला जाचक वाटलेला हा खेळ हळूहळू मला मनापासून आवडू लागला. शिवाय उत्तर दुस-याने समजावून देणे आणि स्वतः समजावून घेणे, यांत खूपच फरक होता. मी समजावून घेतल्यामुळे या सा-या गोष्टी माझ्या मनात पायापासून चिरेबंदी झाल्या. कायमच्या स्मरणात राहिल्या.
आनंददायक अशी आणखी एक बाब म्हणजे या स्पर्धापरीक्षेसाठी पाठांतरावर आधारित असे फारच थोडे प्रश्न विचारले जात. तुमची त्या त्या विषयाची जाण किती सखोल आहे, हे मुख्यत्वे तपासले जात असे. सगळा पेपर बहुपर्यायी असणार होता. एक प्रश्न आणि चार संभाव्य उत्तरे ब-याचदा चारपैकी दोन उत्तरे तर उघडउघडच कटाप करता येत. मागे राहिलेल्या दोनपैकी एक पर्याय निवडणे ही खरी कसोटी ठरे, Negative marking असल्यामुळे थापा मारणे परवडणारे नव्हते. मला तर मुळीच परवडणारे नव्हते. जसजशी माझी विषयांची समज वाढत गेली, तसतशी एक वेळ अशी आली, की माझी प्रश्नकर्त्यांनाच दाद जाऊ लागली. व्वा! काय खुबीदार प्रश्न आहे आणि काय चकवेदार उत्तरं सुचवली आहेत!!' ज्या दिवशी माझ्याही नकळत अशी पहिली दाद गेली, त्याच दिवशी मनात आले आहे, कुठेतरी आशा आहे. आपण यातून तरून जाऊ बहुतेक!
अनिश्चिततेचं सावट असलं, की भेदरलेलं मन अतार्किक गोष्टींमध्ये आधार शोधतं. आसपास घडणा-या प्रत्येक गोष्टीत शकुन दिसू लागतात. यांतील शुभशकुन मनाला उभारी देण्याचे, जबरदस्त किक् देण्याचे काम करतात. कित्येक 'अपयशातून यशाकडं' छापाच्या कथांमध्ये नायकांचे शकुनोत्तर मनमन्वंतर घडलेलं दिसतं. पण त्याच वेळी एखाद्या घटनेचा अपशकुन' असा अर्थ लावला तर भित्यापाठी ब्रह्मराक्षस, अशीही अवस्था होते. या दैवी संकेतांच्या भानगडीत मी मात्र अडकलो नाही. उलट, माझे वस्तुनिष्ठ संकेत माझे मी निर्माण केले होते. ठरावीक वेळ अभ्यासाची मांड न मोडणे, ठरावीक वेळेत ठरावीक अभ्यास पूर्ण होणे आणि पुढे पुढे चाचण्यांमध्ये ठरावीक पातळीवर मार्क पडणे, हे माझे शुभसंकेत होते. ‘सारे चैतन्य ओती सामर्थ्य, शकुनांना मी देईन तो अर्थ',  अशा ओळीही एका कवितेत मी त्या वेळी लिहून गेलो होतो.
गंडे, दोरे, मंत्र, तंत्र, अंगारे, धुपारे, पूजाअर्चा यांच्याही मी कधी वाटेस गेलो नाही. कधी तसं वाटलंच नाही. भविष्यकाळामुळे सातत्याने भयकंपित असायचं मन; पण जरा शांतपणे विचार केला की, सारं मळभ दूर व्हायचं. बरेच प्रश्न आपल्याला आलेच नाहीत तर ? आपल्याला न येणा-या पोर्शनवरचेच खूप प्रश्न आले तर ? पेपरच्या दिवशीच आपल्याला ताप आला तर ? कुठं अपघाताने आपलाच पेपर जळून गेला तर? शंकांची श्वापदं अहोरात्र मन कुरतडत असायची. मग मी विचार करायचो! पेपर कठीण येण्याची (संख्याशास्त्रीय) शक्यता असणारच की! ती शून्य कधीच होणार नाही. पण जितका जास्त आपण अभ्यास करू, तेवढी ही शक्यता कमी कमी होत जाते. अजिबात अभ्यास केला नाही तर १00% पेपर अवघड वाटेल आणि पूर्ण तयारीनिशी गेलो तर काठिण्यपातळी शून्याकडे झुकेल. शून्य कधीच होणार नाही. हे सारं मी गणिती भाषेत, इक्वेशनमध्येही मांडून बघे. थोडक्यात, १००% यश मिळण्याची खात्री देणारा कोणताच मार्ग नव्हता. मात्र अज्ञात पेपरकर्त्यांची करुणा भाकण्यापेक्षा, अभ्यास करणे जास्त यशदायी होतं. अभ्यास म्हणजे बॅडलक कमी करण्याचा, यशाची खात्री न देणारा आणि तरीही अपयशाची शक्यता खात्रीनं कमी कमी करण्याचा राजमार्ग, असं एक समीकरण मी मनात पक्कं ठेवलं होतं.
शिवाय अपघात होणे, पेपर जळणे छापाच्या ब्याडलकावर आपले पूर्ण नियंत्रण असूच शकत नाही. अशा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याने त्या आपण विशेष बदलू शकत नाही. त्यामुळे असले विचार करायचं मी हळूहळू प्रयत्नपूर्वक बंद केलं.
या भयंकर भयप्रद विचारापाठोपाठ सुखस्वप्नंही पाठशिवणीचा खेळ खेळायची. आपण पहिले आलो आहोत, आपल्यावर स्वर्गस्थ देवता पुष्पवृष्टी करत आहेत. आपली हुशारी पाहून अन्य पोरं परीक्षेलाच आली नाहीत... एक ना अनेक! स्वप्नांना काय तोटा? अभ्यास जमायला लागल्यावर या सुखस्वप्नरंजनात तर बराच वेळ जायला लागला. मग मात्र मी मनोमन ठरवलं, की हत्तीने माळ घातल्यामुळे सम्राटपद फक्त गोष्टीतल्या तरुणालाच मिळतं आणि सम्राटपदी पोचण्याचा हा काही खात्रीचा मार्ग नाही. सम्राटपद हे हत्तीने नाही तर कर्तृत्वाने ठरवायला हवे. सप्तपाताळांचे सगळे भोग किंवा सप्तस्वर्गांचे सगळे उपभोग, निव्वळ योगायोगाने वाट्याला येण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. राक्षस नसतो, तसेच परीराणीची जादूची कांडीही नसते. पुन्हा एकदा तोच निष्कर्ष, अभ्यासाला पर्याय नाही.
मी केलेली तयारी पुरेशी आहे किंवा नाही, हे ओळखण्याचे कोणतेही मापदंड माझ्यापाशी नव्हते. सगळा एका प्रचंड पोकळीतला कारभार. कारण तुलना करणार कोणाशी ? मला मुळी सहपाठीच कोणी नव्हते. माझा सामना बारावीच्या तगड्या पोरांशी होता. गेली निदान दोन तीन वर्ष त्यांनी अत्यंत एकलक्ष्यी पद्धतीने, शिक्षक, क्लास, पालक वगैरेंच्या साथीने कंबर कसलेली. मित्र-मैत्रिणींमध्ये चढाओढीनं अभ्यासाचे कित्येक सरावसामने झाले असणार. याविरुद्ध माझे तारू, सापडेल त्या दीपस्तंभाच्या प्रकाशात पुढची दिशा ठरविणारे, प्रसंगी भरकटलेले, शीड फाटलेले आणि  एकट्याने हाकारलेले. पण याही भीतीवर अभ्यास, अधिक अभ्यास आणि अधिकाअधिक अभ्यास हीच मात्रा होती.
मग स्पर्धापरीक्षेच्या स्वमदत पुस्तिका आणल्या. त्यांतल्या नमुना प्रश्नपत्रिका सोडवल्या. स्वत:च तपासल्या. Brilliant Tutorials च्या Postal Tutions लावल्या. त्यांच्या मटेरिअलचा फडशा पाडला. पण तरीही ' गुरूबिन कौन बतावे राह', हेच खरे. मीच पेपरसोडवून मीच ते तपासत होतो. ही तपासणी मी अत्यंत कडकपणे, निर्दयपणे करायचो. स्वयंचाचणीत स्वत:ला झुकते माप देणे, थोडीशीही सवलत देणे हे स्वतःला फसवण्यासारखे होते, वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासारखं होतं. या कठोर आत्मपरीक्षणामुळे माझी गाडी रुळावर राहण्यास फार मदत झाली. निंदकाचे घर इतक्या शेजारी असल्यामुळे माझ्यात मला उदंड उणिवा दिसायच्या. सुरुवातीला शाबासकीची संधी क्वचितच मिळायची. या साऱ्याला मी गणिती नियम लावून बघायचो. अभ्यास आणि यश यांचा आलेख कसा असेल? पॅराबोलिक? चढ्या रेषेत? Sinuous? Exponential? माझ्यापुरतं मी Sinuous असं उत्तर मी काढलं. म्हणजे सुरुवातीला प्रचंड वेळ अभ्यास पण यश जेमतेम; मग यशाची वेगे वेगे चढती कमान आणि पुन्हा शेवटी उच्च पातळीवर पण स्थिर परफॉरमन्स.
पण या कडक स्वयंतपासणीत कधी कधी गमती घडत. अति-माहितीमुळे मार्क कमी पडत! म्हणजे असं की मानवी जीवशास्त्राबाबतची सगळीच उत्तरं मला येत असत. पण प्रश्न आणि पर्याय बारावीच्या पातळीवरचेच असल्याने कधी कधी मला योग्य पर्याय निवडता येत नसे! उदा: प्रश्न असायचा, Which of these is not an excretory organ? (खालीलपैकी कोणता अवयव उत्सर्जक क्रियांत सहभागी नसतो?) पर्याय असायचे त्वचा, मूत्रपिंड, फुप्फुसे आणि वार. बारावीच्या पातळीवर पाहता वार हे उत्तर बरोबर आहे, पण गर्भाच्या दृष्टीने वारेला उत्सर्जक कामही करावे लागते. माझी गाडी इथे जरा अडखळायची. डॉक्टरकीच्या अबलख वारूवरून पायउतार होऊन बारावीच्या पायरीवर येऊन मी 'वार' या उत्तराभोवती मोठ्या फुशारकीने खूण करायचो.
साऱ्याच विषयांचे आकलन वाढले आणि हा अभ्यास मला आनंददायी वाटू लागला. अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करणारी जैवरासायनिक क्रिया (Kreb's Cycle), ही अगदी प्राथमिक जीवांपासून अतिप्रगत अशा मानवापर्यंत साधारण सारखीच आहे हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डार्विनच्या सिद्धांताने तर निसर्ग आणि मानव हे द्वैतच संपवून टाकले. मेंडेलीव्हच्या Periodic Table चे अणुगर्भाशी असलेले नाते ज्या दिवशी उलगडले, त्याच वेळी उभ्याआडव्या चौकोनांतील लयबद्ध सुंदरता प्रत्ययास आली. केप्लर, गॅलिलिओ, न्युटन आणि आईन्स्टाईनच्या नियमांतदेखील काव्य होते, नाट्य होते. होमिओ कॉलेजमध्ये झालेल्या कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर तर हे मला खूपच जाणवत होते. कुपोषण कसले ? उपासमारच ती!
हे सगळे आनंददायी असले तरी शरीर आणि मन अभ्यासाच्या ओझ्याने पिळवटून निघत होते. अभ्यासाचा असा मांड मी पूर्वी कधीच मांडला नव्हता. झिंग चढल्यासारखा मी त्यात तर्र झालो होतो. बसूनबसून चक्क ढुंगणावरी फोडू आला', दोन भरभक्कम खुर्च्या मोडल्या. अभ्यास आणि खाणे एवढेच काम असल्याने वजनही वाढले. मी दिवसेंदिवस तुसडा बनत चाललो. लोकविज्ञान संघटना आणि तिथल्या मित्रांशी संपर्क मी बंद केला होता. कॉलेजमध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझी ये-जा चालू होती. कॉलेजमधील काम मी कॉलेजमध्ये संपवून टाकायचो. मी नवीनच प्रा. झाल्याने बरेच विद्यार्थी हे माझे काही दिवसांपूर्वीचे ज्युनिअर वर्गातील मित्रच होते. पण त्यांची मैत्री सोडाच, पण सलगीसुद्धा मी टाळत होतो. न जाणो यांच्या संसर्गाने आपला अभ्यासाचा उत्साह उताराला लागायचा. वर्गातदेखील शाब्दिक आसूड फटकारत असायचो. यामुळे लवकरच विद्यार्थिवर्गात माझा दरारा पसरला आणि स्टाफमध्ये छान बदनामी झाली. यामुळे फिजूल चर्चा करण्यासाठी माझ्याकडे कोणी फिरकेनासे झाले. स्पर्धापरीक्षेशिवाय आता सगळेच विषय मला फिजूल वाटत होते. 'उरलो अभ्यासापुरता' अशी स्थिती प्राप्त झाली.
त्या रिकाम्या बंगल्यात बसूनबसून काय काय मला पाठ झाले होते. भल्या पहाटे कंपनीच्या रोंरावत येणा-या बसेस, मग शेजारच्या आजींचं खाकरणं, दूधवाले, पेपरवाले, शाळेच्या रिक्षा, शेजारच्या रेडिओची चिरपरिचित धून ते रात्री उशिराच्या काबुलीवाल्यापर्यंत. कुत्री, मांजरं एवढंच नाही तर कावळ्यांचे आवाजही मी वेगवेगळे ओळखू लागलो. बंगल्याबाहेरच्या हलत्याबोलत्या विश्वाचा आपण भाग नाही, याची खंतही वाटायची. भर उन्हात जरी कोणी जाताना दिसला तरी वाटायचं, 'किती निश्चिंत फिरतोय साला! आपल्याला नाही असं फिरता येणार’. बाहेरच्याप्रमाणे बंगल्यातली दृश्यही पाठ झाली होती. जमिनीवरचे, छतावरचे डाग पाठ झाले. कोळ्याच्या जाळ्याची डिझाइन पाठ झाली, पालीच्या शिकारीच्या फे-या पाठ झाल्या.
होता होता एके दिवशी पार शिजून निघालो मी. उन्हाळ्याचे दिवस, परीक्षा तोंडावर आणि अहोरात्र एकच ध्यास म्हटल्यावर काय होणार? अभ्यासाला तळ नव्हता त्यामुळे उपसण्याला अंत नव्हता. शेवटी शरीर थकलं, मेंदू थकला आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना एके दिवशी मी भरल्या अभ्यासातून उठून मोकाट फिरत सुटलो. फिरत फिरत मंगला टॉकीजला आलो. तिथे अमिताभचा कुठलातरी सुमारपट लागला होता. माझ्या नकळत मी तिकीट काढून थिएटरच्या अंधारात घुसलोदेखील! खरंतर बॉलीवुडपटांचं आणि माझं फारसं सख्य नाही. पण हा सिनेमा मला वेगळाच वाटला. माझ्या श्रांत मनाने ह्या मसालापटातला सगळा मसाला चट्टामट्टा करत चक्क एन्जॉय केला. त्यातला निर्बुद्ध विनोद मला गुदगुल्या करत होता आणि नायकाची अशक्यप्राय करतूद पाहून मी स्तिमित होत होतो. हाही अनुभव नवीन होता. निव्वळ अभिरूचिसंपन्न करमणुकीची अपेक्षा करणारं माझं मन थकलेपणी बॉलीवुडच्या सुमार ठेक्यावरही थिरकत होतं. पण बहुतेक तीन तास मेंदू न वापरल्यामुळे असेल, नंतर पुन्हा एकदा अभ्यास नीट सुरू झाला.
कधी आई-बाबा भेटायला आले, तर मला अगदी कानकोंड्यासारखं व्हायचं. त्यांच्याबरोबर मोकळेपणाने बोलावे, बाहेर जेवायला वगैरे जावं तर अभ्यासाचा वेळ जायचा. 'अभ्यास मागे आहे सबब येत नाही' म्हणावं, तर ते त्यांना पटेल का नाही, असं वाटायचं. माझ्या प्रयत्नांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी शंका घेणं, ही मला सर्वांत भयंकर रिस्क वाटायची. त्यांनी तसं कधीच दाखवलं नाही. पण म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती! आई-बाबांसमोर नेहमीसारखं अभ्यासाला बसायलाही मला भीती वाटायची. आपण करतो ते नाटक आहे, देखावा आहे असं तर आई-बाबांना वाटणार नाही ना? ही शंका सतत छळायची. अभ्यास करायचीही चोरी आणि न करणंही शक्य नाही. माझे प्रयत्न निकराचे, मनापासून आणि सर्व शक्तिनिशी केलेले आहेत, हे आई-बाबांपर्यंत पोचवायचं कसं, हा माझ्यापुढे मोठाच प्रश्न होता. परीक्षेतलं धवल यश ही तर कष्टाची पावतीच ठरणार होती. पण अपयश पदरी आलं तर? मग प्रयत्नांचा प्रामाणिकपणा खोटा मानायचा का? कष्ट सगळे लटके म्हणायचे? अपयशातही प्रयत्नांचा प्रामाणिकपणा पोचवायचा कसा? मलातरी या प्रश्नाचं एकच उत्तर सापडलं. फक्त परीक्षेत जिंकणं एवढाच एक मार्ग उरतो. ज्या परीक्षेसाठी आपण राबलो त्या परीक्षेलाच जर आपण उतरलो नाही, तर कष्ट प्रामाणिक नव्हते किंवा प्रामाणिक असतील तर ते पुरेसे नव्हते, एवढीच शक्यता मला दिसू लागली. तेव्हा माझी तळमळ आई-बाबांपर्यंत पोचवण्यासाठी जिंकणे एवढा एकच पर्याय शिल्लक राहिला होता. अशा प्रकारे कड्यावरचे दोर कापून टाकल्यावर मग मात्र माझ्यातला मावळा झुंजीला तैयार झाला.
कधी वाटायचं, एवढं जीवाच्या आकांताने आकाशपाताळ एक करून लढतोय, याची खरंचच गरज आहे का? एवढी तीव्रतम इच्छा धरणं आरोग्याचे लक्षण आहे की मानसिक पछाडलेपणाचं? असं इरेला पेटल्यामुळे यश मिळालं तर सारं कसं गुलाबी गुलाबी असेल; पण जर अपयश आलं तर ते थेट काळजात सलेल. तेही आयुष्यभर, बड्या बड्या तत्त्वज्ञांनी तर भावनांचे हिंदोळे हानिकारक ठरवले आहेत. मन स्थिरचित्त असावं; एक पाऊल पुढे जाऊन स्थिरचित्तच नाही, तर स्थितप्रज्ञ असावं असंही सांगितले आहे. यश-अपयश, मान-सन्मान, सुख-दुःख सारं समतोलपणे स्वीकारायला शिकवलं आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं, तर हे काही मला पटलं नाही. जिद्द पेटवण्याची, पहाड हलवण्याची, क्षितिजांशी दंगामस्ती करण्याची क्षमता ठेवीले अनंते वृत्तीने कशी येईल?
एखाद्या गोष्टीचा ध्यास माणसाला किती मुळापासून हादरवू शकतो आणि बदलवू शकतो, हेही मी अनुभवलं. मला काय म्हणायचंय हे नीट शब्दांत मांडता येईल की नाही, हे माझं मलाच समजत नाहीये. पण प्रयत्न करून पाहतो. लहानपणापासून बौद्धिक कर्तृत्वाचं गुणगान ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. आजीला वगैरे कोणत्याही कारणानं नमस्कार केला, की 'परीक्षेत पहिला नंबर येऊ दे', असा आशीर्वाद कम आशावाद कम दम मिळायचा. पुढे असं काही न घडता मी होमिओ मार्गाला लागलो. भरपूर मार्क मिळविणा-या आणि उच्च शिक्षणप्राप्त सगळ्याच माणसांच्या सगळ्याच गोष्टी मला अनुकरणीय वाटायला लागल्या. गोष्टी इतक्या थराला गेल्या, की या माणसांचे कपडे, हावभाव, रद्दीतून बनविलेल्या वह्या, दाढी, बॅगा, गाण्यांची आवड, केशरचना, बोलणे हे सगळं मी नकलून काढू लागलो. बरे, माझ्या परिचयात अशी हुशार माणसं काही थोडी नव्हती. लोकविज्ञान संघटनेत तर भरपूर होती. कोणी मीटिंगमध्ये हाताची घडी घालून जणू ध्यानस्थ बसल्यासारखा बसतो म्हणून तसं बसावं, तर पुढच्याच मीटिंगमध्ये कोणी झरझरा नोट्स काढणारा हुशार भेटे. त्याचे अनुकरण करेपर्यंत, 'अगदी लक्षपूर्वक ऐकल्यावर नोट्सची गरजच काय?' असं विचारणारा शहाणा भेटे. सगळयांसारखं सगळं करता करता माझी अगदी त्रेधा उडून जायची. माझ्यापेक्षा गरीब हुशार भेटला, की मला माझ्या सापेक्ष श्रीमंतीची लाज वाटायची आणि माझ्यापेक्षा श्रीमंत हुशार भेटला, की मला माझ्या सापेक्ष गरिबीची लाज वाटायची. होता होता बिन-इस्त्रीचा शर्ट, नवे बूट, नवा सूट, मोडकी लूना, वाईट हस्ताक्षर, अभिनय करता येणे, लख्ख गोरा रंग, अशा अनंत गोष्टींबद्दल मी आलटूनपालटून लाज आणि अभिमान बाळगू लागलो. मी अभ्यास सुरू केला आणि हा माझा आजार झटक्यात पळून गेला. आता माझ्या आयुष्याला एक हेतू होता, ध्येय होता. रस्ता माहीत नसला तरी दिशा माहीत होती. मी चाचपडत होतो, धडपडत होतो, सावरत होतो; पण जे काही होतो ते माझा मी होतो. माझ्या प्रत्येक कृतीला आणि त्याच्या परिणामांना मीच जबाबदार होतो. कोणाच्याही बाह्य अनुकरणाची आता गरज नव्हती. माझ्याच प्रकाशात मी चालत होतो. बुद्धांनी म्हटलं आहे ' अत्त दीप भव'! स्वत:च स्वत:चा प्रकाश हो! असं काहीसं झालं होतं.
अभ्यास रंगात आला तसा आणखी एक खेळ मी वर्गात खेळायचो. शिकवण्याच्या ओघात अभ्यासाच्या पाठबळावर भलताच भाव खाऊन जायचो. म्हणजे समजा सल्फर या होमिओ औषधाबाबत मला वर्गात शिकवायचं आहे; तर मी त्याचे रासायनिक गुणधर्म, त्यांची आण्विक पातळीवरील कारणे, अन्य मूलद्रव्यांबरोबरची रासायनिक प्रक्रिया वगैर बरंच भरताड बोलत राहायचो. या सा-याचा आणि त्याच्या होमीओ गुणधर्माचा काडीमात्रही संबंध नसायचा. पण माझ्या भाबड्या विद्यार्थ्यांवर मात्र माझी विद्वत्ता बघून आश्चर्यानी दहाच्या दहा बोट तोंडात घालायची वेळ येई! नुकतंच शिकूनही विस्मरणात गेलेला हा बारावीचा अभ्यास, या आपल्या मास्तरला मात्र आजमितीस मुखोद्गत आहे हे पाहून त्यांच्या नजरेतून कवतिक सांडायचं. मी आपला तेवढाच खुश!! पण हे समाधान खोटं आहे, याची पक्की जाणीव मला होतीच. वर्गातली ही फुशारकी हुशारीवर आधारित नसून, माझ्याच मूळच्या नाकर्तेपणामुळे कराव्या लागलेल्या जादा अभ्यासाच्या तपश्चर्येचं फळ आहे, हे मी जाणून होतो. पण विद्यार्थ्यांवर इंप मारायला अभ्यासाचा चांगला उपयोग झाला! या काळात माझ्या रूपागुणावर भाळून ब-याच अप्सरा (आणि त्याहीपेक्षा जास्त शूर्पणखा) हात धुऊन माझ्या मागे लागल्या. पण माझं मन अभ्यासावर जडलं होतं. त्यांचे कुठलेच विभ्रम मला विचलित करू शकले नाहीत.
आण्णा दातारांनी बजावल्याप्रमाणे खरोखरच मला ९५% च्या वर मार्क पडू लागले. परीक्षा निकट आली आणि माझ्यावरचा ताण असह्य झाला. आत्मविश्वासाचे हिंदोळे आकाशपाताळ गाठू लागले. खरंतर परीक्षेच्या चार दिवस आधी मी काय असा अभ्यास करणार होतो? आणि केला असता तरी त्याने काय असा फरक पडणार होता? माझ्याकडे अभ्यासाची पुस्तकं, वह्या मिळून पोतंभर मटेरिअल जमलं होतं. त्यातल्या काही पुस्तकांशी माझी घट्ट गट्टी झाली होती. कुठल्या पुस्तकात नेमक्या पानावर नेमक्या जागी काय मजकूर आहे, हेही मला आठवायचं आणि नाही आठवलं तर ते पान उलटून खात्री केल्याशिवाय चैन पडायचं नाही. परीक्षा मुंबईला होती. मुंबईला मी नवखा होतो. गुप्त साधनेमुळे नातेवाइकांकडे राहण्याची माझी टाप नव्हती. मी लॉजवर रहायचं ठरवलं. घरापासून मुंबईपर्यंत आणि तिथून परीक्षा संपेपर्यंतच्या वेळात छोटेमोठे अपघात, अतर्क्य योगायोगाने घडणा-या पुराणकथासदृश घटना अचानक आजारपणे वगैरेंचे कभिन्न राक्षस माझ्या मनात थैमान घालू लागले. कधी कधी तर असं वाटायचं, की घडावंच असं काही. मांडवालाच आग लागली की लग्नही नाही आणि लग्न नाही की पौरुषाची परीक्षाही टळली. शेवटी मी आईला बोलावून घेतलं. ती आली पण विशेष बोलली नाही. पण मला जरा धीर आला. कासवी आपल्या पिल्लांवर नुसत्या नजरेने माया करते म्हणतात, तसच काहीसं हे.
 भीतीने मी दोन दिवस अगोदरच मुंबई गाठली. वाटेत आईनं मला पटवलं. लॉजला राहण्याऐवजी आत्याकडे रहायचं ठरलं. मी पोतंभर पुस्तकं सोबत घेतली होती. त्यामुळे आत्या हटकणार हे निश्चित, तिला काय सांगायचं? पण तिथे मला कुणीच काही विचारलं नाही. का आलास? कुठली परीक्षा? कसली पुस्तकं? यांतला एकही प्रश्न आला नाही, आईनेच काहीतरी चावी फिरवली असणार, पण मला विद्ध करणाऱ्या विषयावर कोणीही काहीही बोललं नाही हे खरं, मुंबईला जाऊन मी शांत चित्ताने परीक्षा दिली. माझ्या बाजूने शक्य ते आणि अशक्य तेही मी सर्व काही केले होत. निकालाचा दिवस असा निश्चित नव्हता. जुलैअखेर एवढंच माहीत होतं. एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत इंडियन एक्सप्रेस चाळताना कोप-यात मला चक्क निकाल छापलेला दिसला. पाकिटात माझ्याकडे माझा सीटनंबर लिहिलेला होताच. पण उघडपणे तो नंबर ताडून पाहण्याची माझी प्राज्ञा नव्हती. मी कॉलेजमधून सटकलो. डेक्कनवर पेपर विकत घेतला आणि रूमवर आलो, आलो तरी निकाल पहायला माझी छाती धजेना. मी उगीचच गृहोपयोगी दुष्काळी कामे काढली. कपडे, केर, अगदी बाथरूमसुद्धा धुतली. मग जेव्हा काहीच करायला उरले नाही, तेव्हा पेपर काढून निकाल पहायला लागलो, शेवटाकडून उलटा उलटा! अगदी अखेरीस मला माझा नंबर सापडला!!
एक प्रदीर्घ लढाई मी एकहाती जिंकली होती.
मुक्रर केलेल्या दिवशी मी पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये साभिमान सादर झालो. कॉलेजची पायरी चढताना पहिली याद आली ती I.C.R. च्या त्या संचालकांची. असं वाटलं, जाऊन चक्क काही अपमानास्पद सुनवावं! पण मी तो मोह मोठया प्रयत्नाने टाळला. आत्ता वाटते, बरे झाले आपण असे काही केले नाही. त्यांचे निदान बरोबर होते. मी डॉक्टर, म्हणजे होमिओपॅथीचा डॉक्टर, व्हायला नालायकच होतो. खरेतर मी त्यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी मला असे अपमानाच्या आणि निराशेच्या खाईत लोटले नसते, तर होमिओपॅथीच्या गर्तेतून मी बाहेर पडू शकलोच नसतो.

No comments:

Post a Comment