Tuesday 2 April 2019

आहे मनोहर तरी....


आहे मनोहर तरी गमते उदास...                        
डॉ. शंतनू अभ्यंकर

‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे धृवपद असणारी, सारे काही मनोहर असूनही छोटेसे न्यूनहि मनाला उदास करते असे सांगणारी, कवी सरस्वतीकंठाभरण, यांची एक सुंदर कविता आहे. प्रसूतीपश्चात औदासिन्य दाटून आलेली आई बघीतली की मला हमखास ती कविता आठवते, आणि त्याच चालीवर म्हणावेसे वाटते,
माता ममतामूर्त स्वरूप आनंदकंद
विचलित चित्ती किती ये दाटून खंत
तान्हा कान्हा कुशीत परंतु घेरी नैराश्य रास
आहे मनोहर तरी गमते उदास

नुकतीच डिलीव्हरी झाली आहे. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सगळे काही छान चालू आहे, सगळे जिथल्या तिथे आहे. पण ही मात्र अशी उदास आहे. इतकी काळजी करते, कशाची ते कळत नाही, पण करते. काही बोलत नाही. आता बोललेच नाही तर आपल्याला तरी कसे कळणार? तिला अगदी थकून जायला होते, काही करायचा उत्साहच वाटत नाही. स्वतःच तर सोडाच पण  बाळाचंही काहीच करावेसे वाटत नाही. उलट तिला सारखा राग येतो, स्वतःचा, बाळाचा, नवऱ्याचा, सगळ्या जगाचा.
ह्याला म्हणतात ‘पोस्टपार्टम ब्लूज’ (बेबी ब्लूज.) प्रसूतीनंतर उद्भवणारा नैराश्याचा एक प्रकार.
चानक पडलेली नवीन जबाबदारी, बाळाचे करायची अजिबातच सवय नसणे वगैरेमुळे ‘नवजात आई’ जरा वैतागलेली, निराश असते, काळजीत असते, कुढत असते, थकलेली असते. पण माहेरची माया, बाळाचे रुटीन मार्गी लागणे, असे झाले की आठवड्या दोन आठवड्यात हे सारे मळभ भुर्रर्र उडून जाते. ८०% आया ह्या अनुभवातून जातात. बहुतेक सहज निभावून जातात. काहींही उपचार लागत नाहीत. काहींना मात्र नैराश्य ग्रासते. ह्याचेच तीव्र स्वरूप म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. हे नैराश्य ब्लूजपेक्षा कितीतरी कडक. ती स्त्री मानसिकदृष्ट्या अगदी पंगु बनून जाते.
या मागचे नेमके कारण अज्ञात आहे. एकच एक कारण आहे असेही नाही. शारीरिक आणि भावनिक अशी दोन्ही कारणे आपला प्रभाव दाखवतात. आईनी अमुक एक गोष्ट केली अथवा तमुक एक गोष्ट केली नाही म्हणून हे दुखणे उद्भवते असे नाही. ‘ती उगाचच टेन्शन घेते’, हे लाडके कारणही गैरलागू आहे. तेंव्हा, ‘तू फार टेन्शन घेऊ नकोस!’ अशा छापाच्या सल्याचा काही उपयोग होत नाही. उलट घरच्यांची समंजस साथ इथे मोलाची ठरते. तिची वेगळी वागणूक सगळ्यात आधी त्यांच्याच तर लक्षात येते. तिच्याशी बोलणे, करणे, प्रसंग पडल्यास बाळाची काळजी घेणे, हे तेच तर करू शकतात.
प्रसूतीपश्चात इस्ट्रॉजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी झपकन खाली येते आणि परिणामी मेंदूत हा केमिकल लोच्या होतो असे म्हणतात. शिवाय तान्हे मूल सांभाळता सांभाळता झोपेचे पार खोबरे होऊन जाते. तीन-तीन, चार-चार दिवस झोप तर सोडाच, पण थोडी विश्रांतीही मिळत नाही. यानेही त्रास होतो. हा त्रास तऱ्हेतऱ्हेचा असतो. निराश, दु:खीकष्टी, रितेरिते वाटणे, बारीकसारीक कारणावरून किंवा अगदी विनाकारण रडू येणे, सतत चिंता, किरकिरेपणा, अस्वस्थता, निद्रानाश किंवा अती झोप. विस्मरण, अनिर्णय, लक्ष न लागणे, आवडीचे छंदही नकोसे वाटणे, खाखा सुटणे अथवा भूक मरणे, एकलकोंडेपणा, बाळही नकोसे वाटणे, आणि बाळाला किंवा स्वतःलाच इजा करावीशी वाटणे! अगदी आत्महत्येचे किंवा भ्रूणहत्येचे विचारही मनात डोकावून जातात!! अगदी क्वचित तशी कृतीही घडू शकते!!!
आधीच्या बाळंतपणात असलाच त्रास झालेल्या,  मुळात नैराश्य अथवा काही ना काही मानसिक आजार असलेल्या, घरात कुणाला असा त्रास असलेल्यांना याची बाधा होण्याची शक्यता अधिक. अशांनी ही बाब मुळीच लपवू नये. आधीच कल्पना असेल तर यांना प्रसूती नंतर लगेचच औषधे सुरु करता येतात. नेमका याच काळात, नोकरी जाणे, कोणी जवळचे माणूस दगावणे असा काही आर्थिक किंवा वैयक्तिक फटका बसला किंवा कमी दिवसाची होणे, सव्यंग मूल होणे, असे काही धक्कादायक घडले तर आधीच दोलायमान असलेली मनःस्थिती पूर्ण ढासळते. बरेचदा गरोदरपण नकोसे असते. असल्या लादलेल्या मातृत्वात मन रमत नाही. अशा परिस्थितीत सौभाग्यवतींना नवऱ्याची भक्कम साथ असणे खूप भाग्याचे.
बाहेरची बाधा, दृष्ट लागणे, करणी अशी कारणे आपोआपच चिकटवली जातात. सगळे काही सुरळीत असताना हे अचानक असे झाले की मन धास्तावलेले असते. मग इथेच बाबा-बुवांचे फावते. अर्थात गरजेच्या मानानी मानसोपचार तज्ञ कमी आहेत हे ही ह्या हतबलतेमागचे कारण आहे. पण दीर्घकालीन नुकसान टाळायचे असेल तर  योग्य उपचार घेणे केंव्हाही चांगले.
सुदैवाने या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मानसतज्ञ काही मार्गदर्शन करतात, बोलतात, समजावून सांगतात, मनातले नकारात्मक विचार ओळखायला आणि बदलायला शिकवतात (Cognitive Behavioral Therapy). नातेसंबंध सुधारायला शिकवतात. हे सगळं करता येतं. पेशंटला खूप आराम वाटतो.
स्वभावाला औषध असतं! नैराश्य निवारक औषधे असतात. काही आठवडेतरी घ्यावी लागतात. अंगावरच्या दुधातून यातील काही अंश बाळापर्यंत पोहोचू शकतो तेंव्हा हा सगळा विचार करूनच औषधे दिली जातात. त्यामुळे जी दिली जातील ती घेतलीही जातील हे बघणे आवश्यक आहे. बरे वाटल्यावर पुढे सहा महिने तरी औषधे घ्यावी लागतात. आता बरं वाटतय, आता कशाला औषध, असा विचार करू नये कारण औषधे नीट घेतली नाहीत तर नैराश्य राशीला बसते. काही महिने किंवा काही वर्षसुद्धा ते टिकते. ती स्त्री आपल्या मुलाची नीट काळजी घेऊ शकत नाही. मग बाळाचीही सगळी आबाळ होते. मोठे होता होता त्याच्या वर्तनात अनेक दोष उत्पन्न होतात.
ज्यांना ज्यांना मानसतज्ञांची मदत लागते ते सगळे ठार वेडे असतात, अशा भ्रमात राहू नये. सर्दी झाली की आपण डॉक्टरकडे जातो आणि लवकर बरे होतो. तसेच मन कधीकधी  ‘दर्दी’ होते. डॉक्टरी मदतीने आपण लवकर बरे होऊ शकतो. खुले आम मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. उलट तसे जाहीरपणे सांगावे. मोकळेपणी सांगाल तर या भोवतीचा नसता संकोच आणि फाजील आडपडदा दूर व्हायला मदत होईल. इतर कुणाला अशा मदतीची गरज असेल तर त्यांची भीड चेपेल. समाज मनमोकळा होईल. अशा प्रश्नात(ही), ‘इसे दुवा की नही दवाकी जरुरत है’ हेच खरे.



1 comment:

  1. पालक मेळावा कधी असतो? आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे. माहिती कुठे मिळेल?

    ReplyDelete