Tuesday 11 August 2020

स्तन्य अन्य आणि तारतम्य

स्तन्य, अन्य आणि तारतम्य.
डॉ. शंतनू अभ्यंकर,वाई. 
मो.नं. ९८२२०१०३४९  

आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते! ‘माँ का दूध’ प्यायलेल्या मुलाचे उत्तम भरणपोषण होत असते यात शंकाच नाही.  पूर्वतयारी, शिक्षण, सकारात्मक दृष्टीकोन, वेळ, डॉक्टरी आणि सरकारी धोरण अशी सगळी गुंतवणूक केली तर त्यावर मिळणारा घसघशीत  लाभांश म्हणजे यशस्वी स्तनपान. 
स्तनपान सर्वोत्तमच. ठिकठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ हवेतच.  पण त्यालाही काही सन्मान्य अपवाद आपण मान्य करायला हवेत. सर्वच्या सर्व आयांनी, सर्वच्या सर्व  बाळांना, किमान सहा महिने फक्त आणि फक्त अंगावरचेच दुध द्यायला हवे; ह्या सामान्यज्ञानाला काही अटीशर्ती लागू करण्याची वेळ आली आहे.
मुळात असा  सरसकट सल्ला देण्यात त्या आईचे मत आणि कुवत (शारीरिक आणि आर्थिक) लक्षातच घेतली जात नाही. कित्येक आयांना आर्थिक वा कौटुंबिक परिस्थितीमुळे पुन्हा नोकरी/शिक्षण सुरु ठेवणं भाग असतं. सहा महिने घरात रहाणं शक्य नसतं. आईच्या वेळेची किंमत धरली, प्रसंगी  नोकरी, सोडणं, जाणं, प्रमोशन हुकणं, न घेणं, पगारवाढीची संधी हुकणं, हे हिशोबात धरलं तर लक्षात येईल की  स्तनपान स्वस्तही नाही, फुकट तर नाहीच नाही. 
स्तनपानाच्या गुणगौरव करताना अशा मनाविरुद्ध स्तनपान न देऊ शकणाऱ्या स्त्रियांच्या मनात आपण प्रचंड अपराधगंड निर्माण करत असतो. बाळाला सुविहित आहार देणे ही जशी  आईची जबाबदारी आहे तशी बाबांची आणि  त्या कुटुंबाचीसुद्धा आहे; काही कारणांनी बाळाला स्तन्य पाजणे शक्य नसेल तर अन्य काही पाजण्यास मुभा आहे, हा संदेश ठळक करायला हवा. इतकंच काय, मूल होऊ न देणं हा जर एखादीचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, तर मुलाला अंगावर न पाजणं हा देखील वैयक्तिक निर्णय असू शकतो. अशा निर्णयाला कोणतीही मूल्यपट्टी न लावणारेच धोरण असायला हवे. 
जन्मतः कमी वजन असलेली बाळे, कमी दिवसाची बाळे, एका वेळी खूप कमी दुध घेऊ शकतात. मोठ्ठा भोकाडसुद्धा पसरण्याची ताकद नसते त्यांची. नीट लुचून ओढण्याची शक्ती नसते त्यांना. त्यांना सारखं तासा दोन तासाला पाजावं लागतं. हा प्रकार तीन ते चार महिने करावा लागतो. हे खूप कष्टाचं आणि दमवणूक करणारं काम आहे. इथे स्तन्य आणि ते शक्य न झाल्यास डॉक्टरी सल्ल्याने अन्य हे पर्याय आहेत. पाजीन तर छातीशी नाहीतर उपाशी हे धोरण इथे  योग्य नाही. बाळ तृप्त असणं महत्वाचं मग त्याला पावडरचे दुध द्यावे लागले तरी बेहत्तर.
जी गोष्ट कमी वजनाच्या बाळांची तीच पैलवान साईजच्या बाळांची. त्यात आईला मधुमेह असेल तर प्रश्न आणखी बिकट होतो. अशा बाळांना सतत कडकडून भूक लागते आणि वेळेत भूक नाही भागवली तर यांची शुगर अचानक खूप कमी होते. अशा बाळांना आवश्यक तेंव्हा वरचे दुध द्यायला हवे. दुग्धचक्र सुरु होई पर्यंत तर नक्कीच द्यायला हवे.    
आणि अगदी नॉर्मल वजनाच्या बाळांनासुद्धा जन्मतः भूक तर लागते, दुधाची तर गरज असतेच मात्र ते पुरेशा प्रमाणात येत मात्र नाही; हा तर नेहमीचाच अनुभव. यावर आम्हा  डॉक्टरांचे पढीत उत्तर, ‘जेवढे येतंय तेवढं पुरतंय!!’ पुरेसं दुध येण्यासाठी वेळ लागतोच. बाळाने सतत अंगावर लुचत रहाणे हा दुध येण्यासाठीचा सर्वात स्ट्राँग स्टिमुलस आहे. पण दर दोन तासांनी बाळाला पाजा असं सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. मुळातच थकलेली ती नवप्रसवा दिवसरात्र जागरण करून रडकुंडीला येते.  आपल्याला नीट जमत नाहीये असं वाटून अगदी निराश होते. बाळाला दुध न देता येण्यानं  न्यूनगंड वाटायला लागतो. या मानसिकतेने उलट दुध आटते. प्रौढ वयातील प्रसूती, इतर आजार, सीझर, सासर विरुद्ध माहेर अशी नि:शब्द जुगलबंदी, ‘पुन्हा मुलगीच!!!’; अशा अनेक गोष्टींनी आया आधीच कावलेल्या असतात. त्यात दुध न मिळाल्याने बाळाला काही व्हायला लागलं की प्रश्न आणखी बिकट होतात. जंगी पूर्वतयारी करुनही बऱ्याच आयांना सुरवातीला नाही येत पुरेसं दुध. यात त्यांचा काय दोष? त्यांच्या बाळांचा काय दोष?    
निव्वळ स्तनपानाच्या हट्टापायी बाळ कळत नकळत उपाशीही ठेवलं जातं. उपाशी, अतृप्त बाळाला काय काय व्हायला लागतं. कित्येकदा रडून दुध मागायचंही त्राण त्यात रहात नाही. ते मलूल होतं, कोमेजतं, त्याच्या रक्तातली साखर उतरते, सोडियम वाढते,  मग त्याला झटके येतात, मेंदूवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. क्वचित मूल दगावतं  सुद्धा!  स्तनपानाचा अनाठायी आग्रह दुराग्रह ठरु शकतो तो असा. 
स्तनपान विरुद्ध पावडर असा हा सामना नाहीच्चे. अशा सामन्यात स्तनपानाची सरशी होणार हे जगजाहीर आहे. पण ‘पावडरचे दुध’  का (अचानक रक्तातली साखर कमी झाल्यामुळे  बाळाला) ‘शिरेवाटे ग्लुकोज’?; अशी दुविधा असेल तर पावडरचे दुध द्यायला काय हरकत आहे?  
सुरवातीच्या या अडचणींची, मातांच्या कष्टाची, जाणीव आपल्या परंपरेला आहे. ‘ओली दाई’, गाई-म्हशीचे दुध,  असे पर्याय आपल्या परंपरेत आहेत. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा  पावडरचे दूध हे आईच्या दुधाशी अधिक मिळतेजुळते असते. त्यातील घटक तोलूनमापून, पारखून, निर्जंतुक करून  घातलेले असतात.  त्यामुळे आईच्या दुधानंतर याचा नंबर लागतो.   बाळाला पावडरचे दुध दिल्याने त्रास होतो तो दुध पावडरपेक्षा; पावडर-पाण्याच्या  चुकीच्या प्रमाणामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याबाबत आपण बरीच प्रगती केली आहे तेंव्हा योग्य प्रमाणात आणि कडक स्वच्छता पाळून बनवलेलं पावडरचं दुध हा चांगला पर्याय आहे. जिथे असतील तिथे दुग्धपेढ्या हाही एक पर्याय आहे. 
दुध निर्माण होणे, पान्हा फुटणे वगैरे क्रीया नैसर्गिक जरी असल्या तरी हे चक्र सुरु व्हायला वेळ लागू शकतो आणि अशा वेळी बाळाला उपाशी ठेवणे धोक्याचे आहे. अर्थात एकदा हे चक्र सुरु झाले की हे सुष्टचक्र फिरते ठेवणे  खूप सोपे असते. एकदा हे झाले की वरचे दुध बंद करायला हवं. या बाबतीत आधीपासूनच आईचे, कुटुंबाचे शिक्षण, तयारी, शंकासमाधान हे खूप महत्वाचे ठरते. 
पावडरच्या दुधाचा अनाठायी आग्रह धरणारी, बाजारधार्जिणी, नफेखोर  धोरणे वाईटच आहेत पण आईचे दुध अमृत आहे म्हणून पावडरचं दुध म्हणजे विष नाही. प्रसंगोपात अमृततुल्य आहे असं  म्हणू आपण. प्रत्येक स्त्रीच्या आणि कुटुंबाच्या  इच्छेनुसार, शक्यतेनुसार, कुवतीनुसार आणि बाळाच्या परिस्थितिनुसार  प्रयत्नपूर्वक   स्तन्य;  डॉक्टरी सल्ल्यानेच, आपात्काली   अन्य; अशी दोन्हीची  तारतम्यानी सांगड घालण्यात साऱ्यांचेच सौख्य सामावले आहे.

No comments:

Post a Comment