साधी अॅस्पिरीनची गोळी.
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.
साधी अॅस्पिरीनची गोळी, पण
किती बहुगुणी. तिचे कौतुक काय वर्णावे? वेद्नामुक्तीपासून ते हृदयविकार
मुक्तीपर्यंत आणि वारंवार गर्भपात टाळण्यापासून ते आतड्याचा कॅन्सर टाळण्यापर्यंत
ह्या गोळीची दौड. साधी अॅस्पिरीनची गोळी. आठ आण्याला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती
महान.
शास्त्रीय नाव अॅसीटील सॅलीसिलीक
अॅसिड. पण हे बारसं करणाऱ्या शास्त्राचा शोध अगदी अलीकडचा. हा शोध लागायच्या आधीपासून
काही वनस्पतीमध्ये असलेले तापहारक, वेदनाहारक आणि सूजहारक गुणधर्म जगाला माहित
होते. जाई, पावटा, वाटाणा, लवंग, काही तृणे अशा कशा कशाचा रस, काढा; ताप, सूज, ठणका यावर चांगला
गुणकारी ठरायचा. युरोपात विलोच्या खोडाचं चूर्ण या साऱ्यावर अत्यंत गुणकारी म्हणून
पिढ्यानपिढ्या प्रसिद्ध होतं. अगदी हिप्पोक्रेटेसनेही याचा उल्लेख केलेला आहे. दलदलीच्या
प्रदेशात ताप थंडीचे आजार फार (उदाः मलेरिया). देवाने त्याच प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतींमध्ये
ताप थंडीचं औषध दडवलेलं असणार असा एक सिद्धांत होता. याला म्हणतात ‘डॉक्ट्रीन ऑफ
सिग्नेचर’. विलोचं झाडही नेमकं तापाथंडीच्या प्रदेशात आढळणारं. तेंव्हा डॉक्ट्रीन
ऑफ सिग्नेचरला साजेसच होतं हे.
डॉक्ट्रीन ऑफ सिग्नेचर
वगैरे गैरसमज असून, विलोचे हे गुण त्यातल्या सॅलीसिलीक अॅसिडचे, हे खूप खूप नंतर (१८२९) स्पष्ट
झालं. मग पुढे १८७४ साली सॅलीसिलीक अॅसिड प्रयोगशाळेत
बनवण्यात यश आलं. एकोणीसाव्या शतकात याचा शास्त्रशुद्ध शोध सुरु झाला. झालं असं की
एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला नेपोलिअनने पेरूहून होणारी सिंकोनाची आयात बंद
केली. सिंकोना या झाडापासून हे औषध मुबलक आणि सहज बनत असे. पण हा मार्ग बंद
झाल्यावर युरोपातील वनस्पतींवर पुन्हा संशोधन सुरु झालं. विलोचे झाड पुन्हा
महत्वाचं ठरलं. विलोच्या लॅटीन नावावरूनच तर त्याच्या अर्काला, सॅलीसीन हे नाव
देण्यात आलं आणि स्पायरेशिया जातीच्या (Genus) झुडपात सॅलीसिलिक अॅसिड भरपूर;
म्हणून नाव अॅस्पिरीन.
हे खाताच बऱ्याच जणांना
उलटया मळमळ, चक्कर असे त्रास सुरु झाले. म्हणजे आजही अॅस्पिरीनमुळे आपल्याला कधी
कधी जे होतं तेच. पण ह्याचं प्रमाण अतीच होतं. बायर कंपनीचा औषधक्षेत्रातला प्रवेश
याच सुमाराचा. आपल्या पदरच्या फेलिक्स हॉफमन नामे शास्त्रज्ञावर, त्यांनी हे
अॅस्पिरीन सौम्य पण परिणामकारी बनवण्याची कामगिरी सोपवली. हॉफमनचे वडीलच कित्येक
दिवस सांधेदुखीसाठी हे औषध घेत होते आणि त्याच्या दुष्परिणामांना तोंड देत होते.
त्यामुळे हॉफमनसाठी हे निव्वळ वैज्ञानिक नाही, तर वैयक्तिक आव्हान ठरले. त्यातून आलं
अॅस्पिरीनचं आजचं प्रारूप, अॅसीटील सॅलीसिलीक अॅसिड. सॅलीसिलीक अॅसिडला, अॅसीटीलचं
शेपूट जोडताच त्या मर्कटाचं रुपांतर जणू दासमारुतीत झालं. ह्यामुळे होणारी
अॅसिडीटी कमी झाली, ते पचायला सौम्य झालं, असं बरंच काहीबाही झालं. हे सपुच्छ
अॅस्पिरीन निर्वेधपणे पोटातून शोषले जात
होते, एकदा शरीरात शिरल्यावर पुन्हा मूळ रुपात परिवर्तीत होत होते आणि आपले काम
चोख करत होते. अॅस्पिरीनचा हा वेषांतराचा प्रयोग भलताच यशस्वी ठरला.
६ मार्च १८९९ ला हे औषध रीतसर रजिस्टर झालं.
१९०० साली ते भुकटीच्या ऐवजी गोळीच्या रुपात उपलब्ध झालं. लवकरच ते दणकून प्रसिद्ध
पावलं. चक्क लोकाश्रय मिळाला अॅस्पिरीनला. डॉक्टरी चिट्ठीशिवाय ते मिळू लागलं
(१९१५). बायर कंपनीचं हे अपत्य, जगभर प्रसिद्ध पावलं, नावाजलं गेलं, खच्चून खपलं. जगाच्या
पाठीवर कुठेही जा, अॅस्पिरीनची गोळी मिळणारच. असं म्हणतात की प्रवासात जर एकच कोणतीतरी
गोळी बरोबर घ्यायला परवानगी असेल तर अॅस्पिरीनची न्यावी.
खपलं तरीही ते काम कसं करतं
ते काही कळलं नव्हतं. ह्या द्रव्याचा उपयोग माहित होता, युरोपीयन आजीबाईंच्या
बटव्यात होतच हे, पण कार्यकारणभाव ठाऊक नव्हता. पण औषध गुणकारी आणि सुरक्षित असणे
महत्वाचे, कार्यकारणभाव माहित नसला तरी चालते. अॅस्पिरीनच्या परिणामाचं हे गुह्य पुढे व्हेन, बर्गस्त्रॉम आणि
सॅमुएलसन यांनी उकललं आणि १९८२ सालचं नोबेल पारितोषिक ह्या त्रिकुटाला मिळालं.
साध्या अॅस्पिरीनच्या ह्या
गोळीमुळे, प्रोस्टाग्लाँडिन नामे द्रव्य
तयार होत नाहीत. आणि सबब वेदना थांबतात. शेवटी कोणतीही संवेदना किंवा वेदना आपल्याला ‘जाणवते’ ते ती
मेंदूपर्यंत पोहोचते म्हणून. वेदनेची ही ‘वार्ता विघ्नाची’ देण्याचे काम, प्रोस्टाग्लाँडिन नावाची द्रव्य करत असतात. ह्या निरोप्याची
निर्मितीच अॅस्पिरीनने थांबते. म्हणूनच लगेच बरे वाटते. मूळ दुखणे काही लगेच बरे
होत नाही. पण ते कोणते ते शोधायला, तपासण्या करायला, विचार करायला अवधी मिळतो. ह्या
प्रोस्टाग्लाँडिनचा कर्ता असतो सायक्लोऑक्सिजनेज. अॅस्पिरीन ह्या
सायक्लोऑक्सिजनेजच्या मानगुटीवर बसते आणि त्याला कामच करू देत नाही. त्यामुळे प्रोस्टाग्लाँडिन निर्माणच
होत नाही. अॅस्पिरीन एकदा बसले की बसले. सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते अजीबात खाली उतरत नाही. अॅस्पिरीनची
अन्य काही भावंडेही (औषधांच्या या गटाला NSAID असं लघुनाम आहे) असंच करतात पण
तात्पुरत्या काळापुरते. (उदाः आयब्यूप्रोफेन) हे आयब्यूप्रोफेन किंवा
त्याआधी आलेलं अॅसिटअमायनोफेन हे अॅस्पिरीनचे बाजारातले स्पर्धक. ह्यांच्यामुळे अॅस्पिरीनचं मार्केट खालावलं. पुढे अॅस्पिरीनचे
हृदयस्नेही गुणधर्म महत्वाचे ठरले आणि अॅस्पिरीनचं पुनरुज्जीवनच झालं जणू.
ह्या गोळीचा रक्त
साकळण्यावर परिणाम होतो हे सुरवातीला नीट माहित नव्हतं. हिच्यामुळे रक्त साकळण्याची
क्रिया लांबते. त्यामुळे मुळात न रक्त गोठण्याचा आजार असलेल्या लोकांसाठी ही
गोळी म्हणजे कर्दनकाळ. रशियाचा राजपुत्र अलेक्सेई रोमानोव्हचेच बघा ना. पठ्ठ्याला
हिमोफिलिया हा आजार होता. खेळताना गुडघ्यावर आपटला की बाहेर जरी खरचटलेलंही नसलं, तरी आतल्याआत प्रचंड रक्तस्राव ठरलेला.
मग सांधा सुजणार, प्रचंड दुखणार. ह्याचा मुका मारसुद्धा कळवळायला लावणारा. जखम
वगैरे झाली तर विचारूच नका. कोणतीही जखम, ही भळभळती जखम ठरणार. याला एकदा
वेदनानाशक म्हणून त्यावेळेची ही जादुई गुटी देण्यात आली. पण अॅस्पिरीननी वेदना
थांबते तसेच रक्तही साकळायचे थांबते. ह्याच्या अगदी जीवावर बेतायची वेळ आली.
राणीच्या खास मर्जीतला फकीर, रास्पुतिन; त्याला सांगावा गेला. त्याला ना अॅस्पिरीन
ठाऊक होती ना तीचे अव-गुणधर्म. त्याने त्याच्या स्टाईलने केस हातात घेतली. त्याने
उलटा निरोप पाठवला, ‘सर्व औषधे बंद करा!’ केली आणि औषधे न दिल्यामुळे राजपुत्र बचावला!
नकळत का होईना पण रास्पुतिनची गोळी बरोब्बर लागली. पुढे मंत्रोपचार, तंत्रोपचार
असे बरेच चाळे केले त्या रास्पुतिनने. रास्पुतिन राजपरिवाराच्या गळ्यातला ताईत
झाला. इतका की इतरांच्या चांगलाच डोळ्यावर आला. राजाविरुद्धच्या रागात
रास्पुतिनमुळे प्रचंड भर पडली. राजघराण्याच्या ऱ्हासाला असा अप्रत्यक्षरित्या अॅस्पिरीनचा
हातभार लागला आहे. पण नेमका हाच गुणधर्म लक्षात घेऊन ह्या गोळीचा वापर
हृदयविकारासाठी करण्यात येतो.
या औषधाचा हा अत्यंत घातक, अनिष्ट
परिणाम काही वेळा मात्र अत्यंत तारक, हवाहवासा, इष्ट परिणाम ठरतो. थोडक्यात ‘इफेक्ट’
आणि ‘साईड इफेक्ट’ या सापेक्ष कल्पना आहेत. धर ‘साईड इफेक्ट’चे शेपूट आणि धोपट अॅलोपॅथीला
असं करणं फारसं शहाणपणाचं नाही.
रक्त साकळल्यामुळे
हृदयाच्या रक्त वाहिन्या बंद होतात किंवा तिथला प्रवाह मंदावतो. अॅस्पिरीन दिली की
रक्त गोठत नाही त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या रहातात. हृदयाचा रक्तपुरवठा विना
व्यत्यय चालू रहातो. हा परिणाम इतका महत्वाचा आहे की आज अॅस्पिरीन डोकेदुखीसाठी
कमी आणि हृदयस्नेही म्हणून जास्त वापरली
जाते. डॉ. लॉरेन्स क्रावेन यांनी रोज अॅस्पिरीन घेतली तर हृदयविकाराचे प्रमाण घटते
असे निरीक्षण नोंदवले आणि या दिशेनी संशोधन आणि वापर सुरु झाला. रक्त साकळण्याची
क्रिया मंदावते, रक्त वहाते रहाते. त्यामुळे हृदयाप्रमाणेच, मेंदूच्या, गर्भाशयाच्या अत्यंत अरुंद
रक्तवाहिन्या रक्त साकळल्याने बंद होत नाहीत. त्यामुळे जसा हृदयविकार टळतो तसा पक्षाघात
टळतो, गर्भाचे पोषण सुधारते...!!! अॅस्पिरीनच्या या एकाच गुणधर्माचे हे बहुविध
परिणाम. पण यातही एक मेख आहे. अॅस्पिरीन
अल्प मात्रेत (७५ मिग्रॅ.) दिली तरच हा परिणाम दिसतो. वेदना थांबण्यासाठी मात्र
जास्त मात्रा लागते. त्याशिवाय ती कळ बंद होत नाही. म्हणून तर या अल्पमोली,
बहुगुणी, मितौषधी, लहानशा गोळीला ‘बेबी अॅस्पिरीन’ असं लाडाचं नाव आहे. अॅस्पिरीन
हे एनसेड (NSAID) गटातील औषध. पण या गटातील सगळीच औषधे काही हृदयस्नेही नाहीत.
काही तर चक्क काळजाला काळ आहेत. रोफेकॉक्सिब नामेकरून अॅस्पिरीनचे एक चुलत भावंड,
ह्याने असा काही उच्छाद मांडला की हे शेवटी बंद करावे लागले. बॉलीवूडमधले सख्खे
जुळे जर ‘बडा बनके एक इंस्पेक्टर और दुसरा डाकू’ होऊ शकतो तर समकुलीन औषधांची काय
कथा.
साध्या अॅस्पिरीनच्या
गोळीनं औषधाचं जग बदललं. कित्येकांना दुखःमुक्त केलं. पण ह्या साध्या
अॅस्पिरीनच्या गोळीनं डॉक्टरांचंही जग बदललं. पूर्वीच्या काळी कुठे, कसं, किती, काय केल्याने,
दुखतंय ह्यावर निदान अवलंबून असायचं. दुखतंय म्हटलं की शब्दशः छपन्न प्रश्न विचारले जात. यावरच तर पुढे निदान
आणि उपचाराचा डोलारा उभा रहाणार असे. वेदना कुरवाळण्याच्या वैद्यकविश्वाच्या ह्या पद्धतीवर
अॅस्पिरीननी पहिला घाला घातला. गोळी घेतली की मुळी दुखणे थांबायचे. मग तपासायचे
काय आणि कसे असा प्रश्न डॉक्टरना पडू
लागला. अर्थातच इतर खाणाखुणांचा शोध जारीने सुरु झाला. आजही छपन्न प्रश्न विचारा
असं शिकवलं जातं पण विविध तपासण्यांमुळे यातले पंचावन्न तरी आता गैरलागू किंवा
चक्क निरर्थक ठरतात.
इतके स्वस्त आणि परिणामकारक औषध निघाल्यावर
पेशंटच्याही अपेक्षा वाढल्या. कोणे एके काळी वेदनाशामक औषधे नव्हती, तेंव्हा
दवाखान्याला सतत रुग्णांच्या कळवळण्याचे, विव्हळण्याचे आणि कण्हण्या कुंथण्याचे
पार्श्वसंगीत असायचं. आता तर प्रसूतीसुद्धा वेदनारहित होऊ शकते.
वर्तमानात अॅस्पिरीनला स्पर्धक बरेच आहेत.
भविष्यातही यापेक्षा प्रभावी आणि यापेक्षा सुरक्षित औषधे निघतीलच पण इतिहासातील अॅस्पिरीनचे
स्थान अढळ आहे एवढे निश्चित.
No comments:
Post a Comment