Thursday 15 March 2018

प्रकरण २ नर-मादीचा आदीम झगडा


प्रकरण २
नर-मादीचा आदीम झगडा
जेराड डायमंड ह्यांच्या 'व्हाय इज सेक्स फन?' ह्या बेफाट पुस्तकाचे रसाळ भाषांतर


मागच्या प्रकरणात आपण पाहिले की, मानवी कामव्यवहार समजावून घेण्याची सुरवातच आपल्याला आपला मानवकेंद्री दृष्टीकोन त्यागून करावी लागेल. माणसात समागमानंतर सहसा आई-बाप एकत्र नांदतात आणि एकत्र मुले वाढवतात. हे प्राणीसृष्टीत अपवादात्मकच म्हणायचे. मुलांच्या संगोपनात मानवी  आई-बापाचा समसमान वाट असतो असा कुणाचाच दावा नाही. बहुतेक समाजात आणि घरात संगोपनातील सहभाग असमानच असतो. पण बापाचा थोडासा का असेना, वाटा असतोच; कधी अन्नाच्या रुपात, कधी संरक्षणाच्या तर कधी जमीनजुमल्यावर वारसाहक्काच्या रुपात. बापाची ही जबाबदारी आपण इतकी गृहीत धरली आहे की तिचा कायद्यातही अंतर्भाव आहे. घटस्फोटानंतरही मुलांच्या सांभाळाची जबाबदारी पित्यावर असतेच आणि एखादी कुमारी माताही बाळाच्या जैविक बापाविरुद्ध असा दावा करू शकते.
पण हा खास आपला मानवी दृष्टीकोन. क्षमा करा, पण स्त्रीपुरुषांचे समान हक्क वगैरे कल्पना जरा बाजूला ठेवल्या,  तर प्राणीसृष्टीत आणि विशेषतः सस्तन प्राण्यात, आपणच सर्वांहुनी निराळे आहोत. आपले बालसंगोपनाचे कायदे वाचून जिराफ, ओरांग-उटांग, प्रभृती सस्तन प्रजाती आपल्याला वेड्यातच काढतील. रेतनाचा कार्यभाग उरकला की बहुतेक सस्तन प्रजातीतील नर, मादीत वा पिलांत गुंतून पडत नाहीत. ते फळवण्यायोग्य अशा  अन्य माद्यांच्या शोधात निघतात. सस्तनच असे नाही तर एकूणच नर जातीचा पिल्ले पोसण्यातला सहभाग हा (असलाच तर) मादीपेक्षा यथातथाच असतो.


या नरप्रधान रचनेला काही अपवादही आहेत. फालारोप्स आणि बुट्टेरी सँडपायपर सारख्या पक्ष्यात, पक्षीबुवा अंडी उबवतात, पिलांची काळजी घेतात आणि पक्षीणीबाई पुन्हा जुगायला नवा पक्षीबुवा शोधतात, पुन्हा अंडी घालतात आणि ती नव्या जोडीदाराकडे सोपवून टाकतात. ह्या पुन्हा हुंदडायला मोकळ्या. काही मत्स्य नर (समुद्रअश्व आणि स्टिकलबॅक मासे) आणि उभयचरातील काही नर (उदाः दाई बेडूक, Midwife Toads) घरट्यात, तोंडात, खास पिशवीत किंवा पाठीवर आपले बिऱ्हाड वहात असतात. म्हणजे सर्वसाधारणपणे मादी पालकत्वाची जबाबदारी वहाताना दिसते आणि त्याचवेळी याला  अपवादही दिसतात. या दोहोंची एकाच वेळी संगती लावायची कशी?
वर्तन-नियामक जनुके असोत, हिवताप-प्रतीकारक जनुके असोत वा दंत पंक्तीत बसवणारी जनुके असोत; अशा साऱ्यासाऱ्यांवर नैसर्गिक निवडीचा प्रभाव असतो हे एकदा पक्के लक्षात आले, की वरील प्रश्नाचा उलगडा झालाच म्हणून समजा. ज्या वागण्याने एखाद्या प्रजातीचा  जनुक-वारसा अग्रेषित होतो, तशाच वागण्याने दुसऱ्या प्रजातीचा होईलच असे नाही. नुकतेच एकत्र येऊन बीजफलन साधलेल्या दांपत्याने आता पुढे कसे वागायचे, याची ‘निवड करायची आहे’.  अंडी वाऱ्यावर सोडून त्याच किंवा भिन्न जोडीदारासवे  पुनःश्च जुगावे काय? का जुगणे सोडून पालकगिरी पत्करावी? पालकगिरी पत्करली तर पिल्लू कदाचित जगेल वाचेल.


 पालकत्व पत्करायचे असेल तर पुढे प्रश्न येतो; आई-बाबा दोघेही हे करू शकतात किंवा फक्त आई अथवा फक्त बाबा हे स्वीकारू शकतात. उलटपक्षी पिलांना वाऱ्यावर सोडून जर दहातले एक पिल्लू जगत असेल आणि त्याच्या लालन-पालन-पोषणाऐवजी त्याच वेळात आणखी हजार अंडी फळवता येत असतील; तर पहिल्याची तमा बाळगायची कशाला? त्यापेक्षा अंडी फळवणे फायद्याचे. एकुणात निवड करणे गुंतागुंतीचेच.
मी ‘निवड करणे’ असे म्हटले आहे. यातून माणसाप्रमाणे प्राणी देखील  सर्व पर्यायांचा साधक बाधक विचार करून, जाणीवपूर्वक,  सर्वात हितकर पर्याय निवडतात असे ध्वनित होते आहे. अर्थातच असे काही घडत नाही. हे तथाकथित हितकर निर्णय हे त्या त्या प्राण्यांच्या शरीर-रचनेत, शरीर-कार्यात खरेतर  निसर्गतःच कोरलेले असतात (Programmed). म्हणजे कांगारूबाईंनी पोटच्या पिशवीत बाळ संगोपनाची ‘निवड केली आहे’ आणि कांगारूबुवांनी नाही. इतर सगळेच किंवा बरेचसे वर्तन-पर्याय दोघांनाही  उपलब्ध आहेत, पण उपजत बुद्धीनुसार, उपजत कोरलेल्या आज्ञावलीनुसार, प्राणी पिल्लांची काळजी घेतात (किंवा घेत नाहीत) आणि उपजत आज्ञावली, एकाच प्रजातीच्या नर-मादीमध्ये वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ अल्बॅट्रॉस पक्ष्यात आई-बाबा दोघे पिल्ले सांभाळतात. शहामृगातील बाबा शहामृग हे काम करतात, आई नाही. हमिंगबर्ड आया हे काम करतात, पण बाबा हमिगबर्ड नाही आणि ब्रश-टर्कीत तर आईही नाही आणि बाबाही नाही, कोणीच पिल्लांना खाऊपिऊ घालत नाही. काया-मनाने माता पिता दोघेही सक्षम आहेत, चारा आणू शकतात, पण ‘पिल्लांना चारा दया’ ही आज्ञावलीच त्यांच्यात नाही.


पालकत्वासाठी सुयोग्य शरीररचना, शरीरक्रीया आणि उपजत समज, ह्या साऱ्याची जनुकीय आज्ञावली नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाली आहे. ह्या साऱ्याला प्रजनन पूरक व्यूहरचनेचे (Reproductive Strategy) स्वरूप आहे. म्हणजे जनुकीय उत्परिवर्तनामुळे (Mutation) किंवा पुनर्रचनेमुळे (पुनर्संकन, Recombination) पिल्लांना चारा आणण्याची ही निसर्गदत्त वृत्ती वाढेल अथवा कमी होईल. शिवाय त्याच प्रजातीतील नर-मादी दोहोंमध्ये दोन्हीही दिशांनी हे बदल होऊ शकतात. ह्या बदलांच्या परिणामी किती पिले तगतील, वाढतील, आई-बापाकडून मिळालेली जनुके पुढे संक्रमित करतील, हे ठरत असते. ज्याला चारा मिळेल ते पिल्लू  जगेल हे तर उघडच आहे पण त्याबरोबर हे ही लक्षात घेतले पाहिजे की ज्या पालकाची बालसंगोपनातून सुटका होईल, त्याला/तिला स्वतःची जनुके संक्रमित करण्याच्या नवनवीन संधी मिळतील. म्हणजेच बालसंगोपन करवून घेणाऱ्या जनुकांचा परिणाम, हा शेवटी जन्मदात्यांची जनुके पुढे नेणाऱ्या पिल्लांच्या संख्येवर होत असतो. आपण पहाणार आहोत की जनुकीय वारसांची संख्या वाढेल का कमी होईल, हे इतर अनेक जैविक आणि पर्यवरणीय घटकांवर अवलंबून असते.
जगण्याला, तगण्याला उपकारक असे उपजत वर्तन घडवणारी किंवा असे शारीर बदल घडवणारी जनुके असतील तीच प्रजा वर्धिष्णू होते. नैसर्गिक निवडीमुळे असेच बदल पिढ्यांपिढ्या उगाळले जातात. बदलवाल्यांची पिल्लावळ वाढते. असे बदल त्या त्या प्रजातीच्या जनुकात वज्रलेप होतात. (Genetically Programmed)


उत्क्रांतीच्या चर्चेत हा असा शब्दबंबाळपणा फार. हा कमी व्हावा म्हणून मग प्राणी ‘अमुक अमुक तोडगा निवडतात’, ‘तमुक तमुक डावपेच खेळतात’, असे मानवीकरण सुचवणारे शब्द वापरावे लागतात. पण ह्यात शब्द संकोच व्हावा एवढाच उद्देश आहे, प्राणी जाणीवपूर्वक काही मार्ग चोखाळतात असे अजिबात सुचवायचे नाहीये.
.........
बराच काळ उत्क्रांतीवाल्यांची अशी भाबडी समजूत होती की नैसर्गिक निवडीतून दरवेळी त्या अख्ख्या प्रजातीचे भले साधले जाते. खरेतर नैसर्गिक निवडीचा  प्रभाव, दिसतो तो आधी एकेकट्या सजीवावर. नैसर्गिक निवड म्हणजे, निव्वळ निरनिराळ्या प्रजातींचा/समूहांचा एकमेकांतील झगडा असे नाही, निव्वळ वेगवेगळ्या प्रजातीतील सजीवांची एकमेकांतील एकेकटी लढत असेही नाही, नैसर्गिक निवड म्हणजे; निसर्गानी आपलीच निवड करावी म्हणून जन्मदाते आणि त्यांच्या पिल्लांमधील झगडाही आहे, जोडीदारांमधील आपापसातील झगडाही आहे. कारण आई-बाप, मुले-बाळे किंवा नर-मादी  यांचे हितसंबंध मिळतेजुळते असतीलच असे नाही. समवयस्क नर-माद्यांची जनुके संक्रमित करण्यास जे धोरण यशस्वी ठरेल ते अन्य, भिन्नवयीन वा भिन्नलिंगी सजीवाला उपकारक ठरेलच असे नाही.
उदंड लेकुरे होणारे नर, तसेच माद्या, नैसर्गिक निवडीत वरचढ ठरतात, तगतात, पण हे उत्तमप्रकारे साधण्यासाठी नर मादीचे डावपेच वेगवेगळे असू शकतात. आई-बापांत आता झगडा सुरु होतो, रस्सीखेच सुरू होते. गृहकलह माजतो. अर्थात, हे सांगायला आम्हां मानवांना कुणा शास्त्रज्ञाची गरज काय?


नर-नारीच्या लढाईबाबत आपण कितीही विनोद केले, तरी हा आदीम झगडा हा विनोदही नाही आणि एखाददुसऱ्याच्या स्वभावामुळे एखादेवेळी घडणारी घटनाही नाही. जे वागणे नराच्या जनुकीय हिताचे असेल, ते नारीच्या जनुकीय हिताचे असेलच असे नाही. हेच अप्रीय सत्य मानवाच्या दुःखाचे एक कारण आहे.
पुन्हा एकदा कल्पना करा की नर-मादी नुकतेच एकत्र आले आहेत, स्त्रीबीजाचे फलन झाले आहे आणि ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा आहे. जर होणारे पिल्लू आपले आपण लहानाचे मोठे होण्याची बऱ्यापैकी खात्री असेल आणि तेवढ्या काळात   आणखी स्त्रीबीजे फळवणेही शक्य असेल, तर हे अंडे असेच वाऱ्यावर सोडून, मिळालेल्या वेळात आणखी अधिकाधिक स्त्रिया फळवण्यात, आई-बाबा दोघांचाही स्वार्थ साधला जातो. पण समजा, कोणीतरी एकानी तरी डोळ्यात तेल घालून काळजी घेतल्याशिवाय; नव्याने फळलेले बीज/घातलेले अंडे/उबवलेले अंडे/झालेले पिल्लू जगणार वाचणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता इथे एकमेकांचे  हितसंबंध  आड आले. समजा एका पालकाने दुसऱ्याच्या गळ्यात ही जबाबदारी घातली आणि तो/ती नव्याने जोडीदाराच्या शोधात गेला/गेली तर यात त्या वासनावीराचा  जनुकीय फायदा आणि पिल्ले-प्रतीपाळाचा जनुकीय तोटा आहे. सहचराचा आणि मुलाबाळांचा त्याग करून हा/ही वासनावीर पालक, स्वतःचा स्वार्थी उत्क्रांतीवाचक हेतू  साधत आहे.
अशाप्रकारे प्रतिपाळासाठी एका तरी पालकाची नितांत आवश्यकता असेल तर, संगोपन म्हणजे म्हणजे एक थंड डोक्यानी खेळली जाणारी आई-बापातली स्पर्धा आहे. प्रत्येकजण  मुलाबाळांची जबाबदारी झटकून, दुसऱ्याला संसाराच्या गाड्याला जुंपून, स्वतः सकाम  कामयोगात दंग होण्याच्या स्पर्धेत रंगून आहे. या संसारत्यागाचा खरचंच फायदा होतो का? दुसरा भोगसाथी


मिळणार का आणि पहिला/ली पिल्लं नीट सांभाळणार का, यावर हे अवलंबून आहे. जणू काही फलन-क्षणी नर-मादी एकमेकाला बजावतात, ‘मी जाणार आणि नवी शय्यासोबत शोधणार. ह्या संततीची काळजी आता तू वाहायचीस. मी जाणारच. आता  तुझं तू बघ!’ जर दोघेही बोलले तैसे चालले, तर संतती अल्पायुषी ठरते, मरते. दोघेही हरतात. पाउल मागे कोण बरे घेईल?
त्या फलित बीजात कुणाची गुंतवणूक जास्त आहे? आणि पुन्हा जुगण्याची संधी कुणाला सहजप्राप्य आहे?, यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. आधी म्हटल्याप्रमाणे कोणीच पालक विचारपूर्वक गणित  करत बसत नाही. (उलट प्राण्यांचे वागणे आणि शरीररचना यांचा अभ्यास करून त्यांनी कोणते गणित, कोणते कोडे  सोडवले आहे हे ओळखले जाते. उत्क्रांतीचा अभ्यास हा असा उलटा शोध आहे.) आई-बापाचे वर्तन हे निसर्गतः निवडले गेले आहे, घडले गेलेले आहे. आई-बापाच्या उपजत वागण्या-करण्यात, शरीररचनेत, हे जनुकीय विधिलिखित नैसर्गिक निवडीतून वारंवार कोरले गेले आहे. बहुतेक प्राणीमात्रांत आई एक पाउल मागे सरते, एकटीच पिलांचा सांभाळ करते आणि बाप जातो निघून. काही प्रजातीत बाप पिल्ले सांभाळतो आणि आई निघून जाते, तर काहींत दोघेही ही जबाबदारी वाटून घेतात. नेमके  कोण काय करणार हे तीन एकमेकांत गुंतलेल्या घटकांवर ठरत असते आणि हे घटक, प्रत्येक प्रजातीत, लिंगानुसार वेगवेगळे असतात. फलित बीजात केलेली गुंतवणूक, पिल्लू-पालन केले तर सोडाव्या लागणाऱ्या पुनःफलनाच्या संधी आणि पालनकर्त्या जोडीदाराच्या पालन-कामगिरीची खात्री, हे ते तीन घटक होत.
.........


गुंतवणूक कुठेही असो, नाते संबंधात, उद्योग-व्यवसायात किंवा शेअर बाजारात; कोणत्याही स्वरूपाची असो, पैसा, वेळ, श्रम; असे दिसते की एखाद्या चालू प्रकल्पात थोडीशीच गुंतवणक असेल तर आपण तो सहज  सोडून देऊ, पण  बरीच  गुंतवणूक असेल तर अशा प्रकल्पातून आपण सहजासहजी अंग काढून घेणार नाही. पहिल्याच प्रीतीभेटीत सूर जुळले नाहीत तर आपण ते नाते तिथेच तोडून टाकू. ‘तुम्हीच सुटे भाग जुळवा’, छापाचे कचकड्याचे खेळणे नाही जुळवता आले तर आपण ते तसेच सोडून देऊ. पण पंचविशीत पोहोचलेले लग्नाचे नाते किंवा घरदुस्तीचे महा-महागडे काम सोडण्यापूर्वी आपण दहा वेळा विचार करू.
हेच तत्व बालकांतील पालकांच्या गुंतवणुकीलाही लागू आहे. ज्या क्षणी स्त्रीबीजाशी पुंबीज संयोग पावते, त्या क्षणी निर्माण झालेल्या गर्भपेशीत नरापेक्षा मादीची गुंतवणूक अधिक असते. ह्याचे कारण बहुतेक प्रजातीत स्त्रीबीज हे पुंबीजापेक्षा कितीतरी मोठ्ठे असते. दोन्हीत जनुके असतातच पण स्त्रीबीजात  गर्भ स्वयंपोषित अवस्थेत  पोहोचेपर्यंत लागणारा, सुरवातीच्या वाढीसाठीचा शिधा असावा लागतो, अन्ननिर्मितीची यंत्रणा असावी लागते. पुंबीजात मात्र, काही दिवस पोहता येईल आणि स्त्रीबीजाशी पोहोचता येईल, अशी  शेपूट गरागरा फिरवणारी मोटर आणि त्यासाठीची बॅटरी (Energy) एवढे असले तरी पुरते.


यामुळे  फलनोत्सुक मानवी स्त्रीबीज हे फलनकर्त्या पुंबीजापेक्षा एक कोटी पट जड असते. किवी पक्ष्यात तर पक्षिणी-बीज हे किवी-पुंबीजाच्या एक कोटी, एक अब्जपट (million bilion times) मोठे असते. या दृष्टीने पाहू जाता, नवनिर्मितीसाठी साईटवर येऊन पडलेल्या कच्च्या मालात, दोघांच्या वजनाच्या तुलनेत, आईचा वाटा गण्य आणि बाबांचा नगण्य. पण याचा अर्थ फलनापूर्वीच बापाची सरशी झाली, आता दरवेळी आईच पिले सांभाळणार; असा मात्र नाही. फलनकर्त्या एका पुंबीजाबरोबर त्या पित्याच्या वीर्यात असलेले अन्य कोटी कोटी शुक्रजंतू (पुंबीज) त्याच्याच तर शरीरात तयार झालेले आहेत. हे जमेस धरता दोघांची भागीदारी समसमानच म्हणायची.
फलनक्रिया ही स्त्री-शरीरात घडली तर त्यास अंतर्गत-फलन म्हणतात आणि स्त्री शरीराबाहेर घडली तर त्यास बाह्य-फलन. मासे आणि उभयचर प्राण्यात बहुतांशी बाह्य-फलित  प्रजनन दिसते. मासा आणि मासोळी शेजारी-शेजारी, पोहत-पोहत एकाच वेळी पाण्यात बीजे सोडतात. पाण्यातच स्त्री-पुरुष बीजांचे मिलन होते. बाह्य-फलनामध्ये स्त्रीबीज/पुंबीज सोडताच, प्रत्येकाची  प्रजननातील अत्यावश्यक कामगिरी संपते. काही प्रजातीत आई वा बाप, थोडीफार काळजी घेतात. पण सहसा हे अनाथ गर्भ कुठे कुठे तरंगत रहातात. जगण्यासाठी आधाराविना धडपडत रहातात.
अंतर्गत फलन हे आपल्या अधिक परिचयाचे. नर आपले लिंग योनीमार्गात सरकवून वीर्य सोडणार. फलित बीज लगेच जन्मणार नाही.


हे स्त्री शरीरात काही काळ वाढणार आणि जगण्याच्या स्पर्धेत वाचण्याइतके झाले, की त्याला जनन मार्गातून जगात सोडले जाणार. पक्षीगणात, दिसतो तसा हा जगप्रवेश कधी भोवती कडक कवच, आत बलकरुपी अन्न, असा अंड्याच्या रुपात असेल. (बरेच सरीसृप (Reptiles) आणि मोनोट्रेम सस्तन प्राणीही उदाः ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीतील प्लॅटीपस, एकीड्न; अंडी घालतात.)   कधी गर्भ आईच्या शरीरातच वाढेल आणि अंडज रुपाऐवजी बालरूपात जगात प्रवेश करेल. हा व्हीव्हीपॅरस जन्म. मोनोट्रेम वगळता सर्व सस्तन प्राण्यांची ही खासियत. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म द्यायचा तर पोटात मोठी खासच रचना असावी लागते. गर्भाला हवे ते गर्भाकडे सोडणारा आणि गर्भाला नको ते गर्भाबाहेर काढणारा  वार हा त्यातला सर्वात गुंतागुंतीचा अवयव.
या अंतर्गत फलनामुळे आईची गुंतवणूक निव्वळ फलन योग्य स्त्री-बीजापुरती सीमित रहात नाही. पोटातल्या गर्भाची काळजीही तिला वहायची असते. स्वतःच्या शरीरातून ती कवच बनवायला कॅल्शीयम आणि बलक बनवायला अन्न पुरवते किंवा रक्तामासाचा घास भरवून चक्क गर्भ पोसते. एवढेच नाही तर गरोदरपण, बाळंतपण, यासाठी तिनी वेळही दिलेला आहे. परिणामी, बाह्यफलन क्रियेसाठी  अंडी घालणाऱ्या मादीच्या तुलनेत, अंतर्गत फलन असेल तर त्या मादीकडून, नरापेक्षा कितीतरी जास्त गुंतवणूक झालेली असते.


माणसाचेच घ्या ना, नऊमास नऊ दिवस संपता संपता त्या बाईने त्या बुवापेक्षा कितीतरी वेळ आणि श्रम त्यात ओतले आहेत. बुवांचा सहभाग मात्र वीर्यपतनाच्या क्षणापुरता. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे.
आई आणि बाबांच्या ह्या असमान सहभागामुळे, अंतर्गत फलनात, आईला अंड्याची वा अपत्याची जी पडेल ती जबाबदारी नाकारणे जड जाते. ह्या जबाबदारीची रूपे अनेक: सस्तन माद्यांनी स्तनांतून स्त्रवलेले स्तन्य, मगरीणींनी प्राणपणाने केलेली अंड्यांची राखण किंवा अजगरीणींनी उबवलेली अंडी... तरीही, कधीतरी बापालाही इतर नाद सोडावे लागतात आणि जोडीने किंवा एकट्यानेसुद्धा, अपत्य संगोपन करावे लागते.
........
‘जनक’ हे ‘पालक’ होणार की नाही, पालकत्व ‘निवडणार’ की नाही, हे तीन घटकांवर ठरते असे आपण पाहिले. बालकांत पालकांनी केलेली तुलनात्मक गुंतवणूक, हा त्यातील फक्त एक घटक आहे.  दुसरा घटक आहे, संगोपनामुळे हकनाक हुकणाऱ्या संभोगाच्या शक्यता. कल्पना करा की तुम्ही नुकतेच बाप झालेले कोणी प्राणी आहात. आता पुढे काय, याचा विचार करता करता तुम्ही  त्या इवल्या असहाय्य जीवाकडे पहात तुमच्या जनुकीय नफ्यातोट्याचा आपमतलबी ताळेबंद मांडता आहात. त्या वळवळणाऱ्या जीवात तुमची गुणसूत्र आहेत. त्याला कुशीत घेतले, पोसले तर तो जगेल. तुमचा जनुकीय वारसा पुढे जाण्याची शक्यता वाढेल.


पुनःश्च जनुक संक्रमणासाठी लगेचच काही करण्यासारखे नसेल, तर जोडीदारावर जबाबदारी ढकलण्यापेक्षा, स्वतः अपत्य संगोपन केल्याने तुमचा मतलब साधला जाईल. पण जर का ह्याच काळात दुसरा घरोबा करून, अधिक संततीद्वारे, अधिकाधिक जनुक संक्रमण शक्य असेल, तर संसारावर लाथ मारून दुसरा घरोबा करणे हाच पर्याय श्रेष्ठ ठरतो.
आता कल्पना करा, की नुकताच समागम झालेला आहे, नुकतेच स्त्रीबीजाचे फलन झाले आहे आणि माताश्री आणि पिताश्री ह्याच विचारात गढले आहेत. बाह्यफलनात कोणावरही कसलेच बंधन नाही. दुसरा जोडीदार शोधून, पुन्हा मिलनाची दोघांना मुभा आहे. त्यांच्या पुढ्यातल्या जीवांनाही संगोपनाची गरज असू शकेल, पण ती जबाबदारी दुसऱ्याच्या गळ्यात घालणे दोघांनाही तितकेच शक्य आहे.  पण जर फलन मादीत घडत असेल, तर एकदा दिवस राहिल्यावर  अंडी घालेपर्यंत किंवा बाळ जन्मेपर्यंत, त्याचे पोषण करणे तिला भागच आहे... आणि ही मादी सस्तन असेल तर पुढे स्तनपानही हिनेच द्यायचे आहे. अंगावर पाजण्याच्या  कालावधीत संभोगातून संतती संभव कमीच, तेंव्हा अपत्य संगोपनात तिचा विशेष तोटा नाही.
पण नुकताच एकीशी रतलेला नर पुन्हा पुढच्याच क्षणी दुसरीशी संग करून अधिक संततीद्वारे आपली जनुके अधिकाधिक प्रमाणात संक्रमित करू शकतो.
पुरुषाच्या एका वेळी सोडल्या जाणाऱ्या वीर्यात सुमारे ७५ ते २०० कोटी पुंबीजे (शुक्रजंतू) असतात. ही संख्या महाप्रचंड आहे.  त्याने नुकत्याच फळवलेल्या स्त्रीचा गरोदरपणाचा कालावधी २८० दिवसांचा आहे. या कालावधीत जर दर २८ दिवसांनी वीर्यपतन झाले आणि काहीतरी युक्ती करून एका स्त्रीपर्यंत फक्त एकच पुरुष बीज पोहोचवता आले, तर जगातल्या सगळ्या, म्हणजे दोन अब्ज जननक्षम स्त्रिया फळतील. इतके सगळे पुरुष, स्वतःची गर्भार भार्या सोडून, अन्य भामेवर का भाळतात, ह्याचे हे उत्क्रांतीशास्त्रातले स्पष्टीकरण. अपत्य संगोपनाला वाहून घेऊन, पुरुष अनेकानेक संभाव्य संधींवर पाणी सोडत असतो. इतरही अंतर्गत फलनवाल्या प्राण्यांच्या नर-माद्यांना, हाच तर्क लागू होतो. नरांना पुनःपुन्हा अंगसंग करण्याची संधी असते आणि या घटकामुळे प्राणीजगतातही माद्याच वात्सल्याने पिलांचा सांभाळ करतात अशी सर्वसाधारण रचना दिसते.
रहाता राहिला, परित्यक्त सहचर, जबाबदारीने पालकत्व निभावेल का ह्याचा भरवसा. अंडी-पिल्ली वाढवण्यासाठी जर वेळ, श्रम आणि अन्न पुरवायचेच आहे तर ही अंडी-पिल्ली आपली स्वतःची आहेत याची किमान खात्री हवी. ती जर दुसऱ्याची असतील तर तुम्ही उत्क्रांतीचा डाव हरल्यातच जमा आहे. स्पर्धकाला साथ देऊन तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे आहे.


स्त्रिया आणि अंतर्गत फलनवाल्या इतर माद्यांना, मूल आपलेच आहे ह्याची खात्री असतेच. स्त्रीबीज शरीरातच असते, त्याचे फलन करणारे पुंबीज बाहेरून येते आणि काही कालावधीने अंडे/पिल्लू बाहेर येते. आईच्या शरीरातच बालकांची अदलाबदल झाली वगैरे शक्यच नाही. त्यामुळे आपल्या अंड्या-पिल्लांची काळजी वहाणे हा आईच्या दृष्टीनी, फायद्याचा खेळ आहे, उत्क्रांती सुसंगत आहे.
पण सस्तन आणि अन्य अंतर्गत फलनवाल्या पित्यांना मात्र, पितृत्वाची खात्री नसते. वीर्य मादीच्या शरीरात सोडल्याची खात्री असते. काही दिवसांनी अंडी-पिल्लीही निपजतात. पण बाहेर येणारी प्रजा आपलीच आहे, आपल्या अपरोक्ष त्या मादीने अन्य नरांशी सूत जुळवलेले नाही; हे कसे समजावे? बीज-फलन करणारा तो एकमेवाद्वितीय शुक्रजंतू (पुंबीज) आपलाच का अन्य कोणाचा, हे कसे समजावे? या अटळ अनिश्चिततेमुळे, बहुतेक सस्तन नरांनी, संभोग संपताच तात्काळ गृहत्याग करून दुसरा घरोबा करणे आणि त्याही घराचे गोकुळ होणार असे दिसताच, त्याही घरधनिणीला बाळगोपाळ-पालनाला जुंपून, तिसरा घरोबा करणे; हेच उत्क्रांतीदृष्टया श्रेयस्कर मानले आहे. आपण भोगलेल्या एक वा अनेक माद्यांच्या पोटी आपलेच मूल  वाढत असेल आणि ती मादी ते एकटीने लहानाचे मोठे करेल, अशी त्या नराला आशा असते. पितृवात्सल्याचा वर्षाव करीत पित्याने पिल्ले सांभाळणे हा उत्क्रांती विसंगत जुगार झाला.
......
अर्थात आपला आणि आसपासचा अनुभव असे सांगतो की रतीक्रीडेनंतर मी नाही त्यातला, असा विश्वामित्री पावित्रा  घेण्याच्या नरांच्या वागणुकीला, काही अपवाद आहेत. हे अपवाद तीन प्रकारात मोडतात. एक अर्थात बाह्य फलनवाले. यात मादी अ-फलीत बीजे सोडते, त्यावर नर आपले वीर्य सोडतो आणि तात्काळ ह्या बीज-बीज-पुरीचा ताबा घेऊन अन्य कोणा नरवीराचे वीर्य तिथे पोहोचू नये, अशी काळजी घेतो. आता पितृत्वाच्या खात्रीने


अंड्यांवर पितृछायाछत्र धरले जाते. काही मत्स्यराव, आणि काही बेडूकराव असे एकल पालकत्व का स्वीकारतात, याचा उत्क्रांतीवाचक उलगडा हा असा आहे. उदाहरणार्थ मिडवाईफ़ बेडकातले बेडूकराव (मिडवाईफ़ म्हणजे दाई, ह्यांचे नावच दाई बेडूक) अंडी आपल्या मागच्या पायात गुंतवून ठेवतात, काच-बेडूकराव (Glass Frog) पाण्यावर वाकलेल्या एखाद्या तृणपात्यावर अंडी ठेवतात आणि त्यातून बाहेर पडणारे बेडूकमासे थेट पाण्यात पडतात. स्टिकलबॅक मासेबुवा अंडी सांभाळण्यासाठी घरटे बांधतात.
 ‘रतीक्रीडेनंतर विश्वामित्री पावित्रा’, या नरांच्या लौकिक तऱ्हेला दुसरे अपवाद असतात ते, ‘विपरीत-भूमिका-बहुपतीत्व’ (Sex Role Reversal Polyandry) पत्करणारे जीव. नावाप्रमाणे इथे नेहेमीच्या उलटी तऱ्हा दिसते. भल्याथोरल्या नराने अन्य नरांशी क्रूर स्पर्धा करत ज़नाना बाळगून असणे ही झाली नेहेमीची, बहुपत्नीत्वाची चाल. या उलट इथे भली थोरली मादी, अन्य माद्यांशी क्रूर स्पर्धा करत बऱ्याच  किरकोळ नरांना ‘बाळगून’ असते. (ज़नानाच्या चालीवर याला ‘नरनाना’ म्हणता येईल.) त्या त्या नरापाशी ती अंडी घालते आणि तो तो नर ती अंडी जीवापाड जपतो, उबवतो आणि पिल्लांचा सांभाळ करतो. या स्त्री सुलतानांची  सर्वज्ञात उदाहरणे म्हणजे जकाना, बुट्टेरी सँडपायपर किंवा विल्सन्स फालारोप्स हे द्विजगण. दहा एक फालारोप पक्षिणींचा थवा एखाद्या पक्ष्याचा मैलोंमैल पाठलाग करतो. विजयी पक्षिण आपल्या नव्या गुलामावर राखण ठेऊन असते, जेणेकरून तो फक्त तिच्याशीच संग करेल आणि होणारी प्रजा वाढवेल.



‘विपरीत-भूमिका-बहुपतीत्व’ म्हणजे त्या विजयी वनितेसाठी उत्क्रांतीतील स्वप्नपूर्तीच. नर मादीचा हा आदीम झगडा इथे तिनी जिंकला आहे. एकटीने किंवा एखाद्याच नराच्या मदतीने कधीच शक्य होणार नाही इतक्या पिलात तिने आपली जनुके संक्रमित केलेली आहेत. अन्य पक्षिणींना हरवून, गृहकृत्यदक्ष असा सुयोग्य नर मिळताच, तिच्या अंडी घालण्याच्या क्षमतेचा तिने पुरेपूर वापर केला आहे. पण ही अशी विपरीत रीत उत्क्रांत झालीच कशी? पाणपक्ष्यातले हे नरवीर या नर-मादीच्या झगड्यात पराभूत झालेच कसे? अन्य पक्षीगणात असे बहु-नर-सहचरत्व तर सोडाच, उलट बहुपत्नीत्वाची चाल असताना ह्यांच्यातच ही उरफाटी तऱ्हा का?
किनारी पक्ष्यांच्या जगावेगळ्या प्रजननशास्त्रात याचे उत्तर आहे. हे एकावेळी फक्त चार अंडी घालतात आणि त्यातून बऱ्यापैकी पंख-पिसे असलेली, डोळे उघडलेली आणि आसपास फिरून अन्न वेचू शकणारी पिल्ले निपजतात. पालकांचे मुख्य काम हे त्यांना भरवणे हे नसून त्यांना  उब देणे हे आहे. हे एकट्याने सहज करता येते. चारा भरवायला मात्र दोन्ही पालक हवेत.


अशक्त परावलंबी पिलांपेक्षा, आसपास आपले आपण अन्न शोधणारी पिल्ले व्हायची तर अंड्यातच त्यांची भरपूर वाढ झालेली हवी. म्हणजे अंडेही चांगले मोठे हवे. (कबुतरांच्या इवल्याश्या अंड्यातून अगदी अशक्त पिलू निपजते. याउलट कोंबडीचे अंडेही मोठे आणि पिलूही स्वावलंबी. म्हणूच तर व्यवसायीक कुक्कुटपालन किफायतशीर आहे, कबुतरपालन नाही.) बुट्टेरी सँडपायपरचे एक अंडे आईच्या एक पंचमांश वजनाचे भरते. चार अंडी, म्हणजे पक्षिणीचे तब्बल ८०% वजन अंड्याचेच. अगदी एकपतिव्रती पाणपक्षिणीही जरा थोराडच असतात. पण ह्या बहुपतीवाल्या, ‘नरनाना’ बाळगणाऱ्या, महा-अंडीवाल्या, अगदी रक्त-मांस अर्पून पोटात अंडी पोसतात, चांगल्या लठ्ठमुठ्ठ होतात. जर त्या नराने पिल्लुपालनाचे हलके काम पत्करले आणि मादीला पुन्हा गलेलठ्ठ व्हायला वेळ दिला तर मादीच्या या उदरभरणाचा, त्या नराला, तात्कालिक आणि दीर्घकालीन असा दोन्ही फायदा होतो.
तात्कालिक फायदा असा की, जरी पहिली अंडी भक्ष्यस्थानी पडली तरी, ती मादी, पुन्हा जुगायला, अंडी घालायला, खाऊनपिऊन लवकरच ‘तैय्यार’ होते, सक्षम होते. हा मोठाच फायदा म्हणायचा, कारण किनारीपक्षी जमीनीवर अंडी घालतात आणि बरीच अंडी-पिल्ली मृत्युमुखी पडतात. उदाहरणार्थ १९७५ साली, मिनेसोटात, पक्षीतज्ञ लेविस ओरिंग अभ्यासत असलेली, बुट्टेरी सँडपायपरची सगळीच्या सगळी घरटी एका मिंकनी (मुंगसासारखा एक प्राणी) एकाच हल्यात उध्वस्त केली. पनामातल्या जकाना पक्ष्यातही पंचावन्नपैकी बेचाळीस घरटी अपेशी ठरल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
   जोडीदारीणीला पोराबाळातून मोकळीक दिल्याचा नराला दूरगामी फायदाही होतो. विणीच्या एकाच हंगामात खुडूक होण्यापेक्षा, तीला आता तो पुढच्या हंगामातही ‘घेऊ’ शकतो. अनुभवी, संसारात मुरलेली पक्षी-जोडपी ही नवविवाहित पक्षी जोडप्यांपेक्षा जास्त निगुतीने, यशस्वीपणे  पिल्ले वाढवतात; माणसासारखेच आहे हे.


पण भविष्यातल्या वायद्याच्या भरवशावर आत्ता हात सैल सोडणे, यात आपल्यासारखेच, पक्षीही जोखीम पत्करत असतात. एकदा नराने एकट्याने पालकत्वाचा  सगळा जिम्मा घेतला की ती मादी उंडारायला मोकळीच की. समजा अंड्यांचा पहिला वाढा नष्ट झाला तर कदाचित ती केल्या उपकाराचे स्मरण ठेऊन, पुन्हा त्याच नराशी रतेल आणि अंड्यांचा दुसरा वाढाही त्याचा होईल. पण ती कदाचित स्वतःपुरता विचार करून, आणखी कोणी नर शोधेल आणि दुसरा वाढा त्या दुसऱ्याचा होईल. अशात तिचे दोन्हीही वाढेही सुखरूप वाढले तर तिचा जनुकीय वाटा दुप्पट झाला म्हणायचे.
अर्थातच अन्य माद्याही असाच विचार करणार, त्याही नरांसाठी एकमेकींशी स्पर्धा करणार. उपलब्ध नर हळूहळू कमी होत जाणार. हंगाम सरकेल तसे अधिकाधिक नर पहिल्याच पोरवड्यात गुंतून पडणार. पुढच्या वाढ्यासाठी आणि पिल्लावळीसाठी  त्यांना उसंत कुठली. सुरवातीला जेवढ्यास तेवढे नर-मादी असले तरी जसा हंगाम जातो तसे नर संसारात गुंतून पडतात आणि कामोत्सुक माद्या वाढत जातात. बुट्टेरी सँडपायपर किंवा विल्सन्स फालारोप्समधे, दर  नरामागे तरसणाऱ्या सात माद्या एवढे हे प्रमाण असू शकते. नरांच्या ह्या क्रूर टंचाईमुळे ‘विपरीत भूमिका बहुपतीत्व’ अगदी कळसाला पोहोचते. अगडबंब अंडी तयार व्हावीत म्हणून माद्या आधीच लंबोदर आहेत पण अन्य माद्यांशी दोन पंख करता यावेत म्हणून त्या महाकायही आहेत. पालकत्वाची जबाबदारी संपूर्णतः सोडून नर गटवणे एवढेच काम त्यांनी पत्करले आहे.



थोडक्यात स्वावलंबी, सबल पिल्ले, मोजकी पण भली थोरली अंडी, जमिनीवरची घरटी आणि भक्षकांमुळे होणारी सततची हानी ह्या किनारी पक्ष्यांच्या खास जीवशास्त्रीय वैशिष्ठ्यांमुळे; त्यांना गृहकृत्यदक्ष पित्याचे एकल पालकत्व आणि मातेचे गृहकृत्य-मुक्त वर्तन अनुकूल ठरते. तरीही किनारी पक्ष्यातील बऱ्याच प्रजातीतील पक्षिणींना, या बहु-नर-सहचर संधीचे सोने करता आलेले नाही. उदाहरणार्थ आर्क्टिक प्रदेशातील सँडपायपर; तिथला विणीचा हंगाम इतका अल्पकाळ असतो की एकाच हंगामात दोनदोन बाळंतपणे शक्यच नाहीत. त्यामुळे विपरीत भूमिका बहुपतीत्वाचाही प्रश्न नाही. उष्ण कटीबंधातले जकाना, दाक्षिणात्य बुट्टेरी सँडपायपर अशा मोजक्याच प्रजातीत हा प्रघात सर्रास आढळतो. मानवी कामाचाराशी दुरान्वयानेही संबंध नसला तरीही पक्ष्यातील हे प्रघात आपल्याला बरेच काही शिकवून जातात. प्रजातीचे कामचार हे त्या त्या प्रजातीच्या जीवशास्त्रीय गुणवैशिष्ठ्यांवर अवलंबून असतात, हा या ग्रंथातील गाभ्याचा विचार आहे. असा काही निष्कर्ष, थेट मानवाशी ताडून बघण्यापेक्षा पक्ष्यांशी जोडणे आपल्याला मानवते कारण पक्ष्यांना आपण नैतिक निकष लावत नाही.
.....
आपल्यासारखेच अंतर्गत फलन घडते आणि अगदी आपल्यासारखेच एकेकट्याने पिलांचे लालन-पालन, भरण-पोषण शक्य नाही, अशा प्रजातीतही नरांच्या गृहत्यागाच्या जनरीतीला अपवाद आढळतात.


पिल्लाला किंवा पिल्लू अन् पालकाला पोसायला इथे दुसऱ्या पालकाची गरज असते. एक जण चारा आणायला गेला की पिल्लं राखायची गरज असते. आसपासच्या परिसरात आपला अंमल राखायची गरज असते. पिल्लांना शिकवायची गरज असते. अशा प्रजातीत मादीला एकटीला घर आणि दार सांभाळणे शक्यच नाही. फळवलेल्या मादीला वाऱ्यावर सोडल्यास ती पिल्लं उपाशी मरतील. तेंव्हा तिला सोडून  इतर माद्यांच्या मागे लागण्यात औत्क्रांतिक फायदा शून्य. थोडक्यात आपमतलबासाठी का होईना, दोघांनी एकमेकांना धरून असणे भाग आहे.
आपल्याला परिचित अशा बऱ्याचशा उत्तर अमेरिकेतील वा युरोपातील पक्ष्यांची रीत, ही अशी असते: नर मादी एक-साथी-व्रती असतात आणि जोडीने पिल्लांचा सांभाळ करतात. माणूसही बराचसा असाच आहे. मोल मोजताच आयाबाई आणि मॉलमधे सगळे काही मिळत असूनही, एकट्यानी मूल वाढवायचे हे आव्हानात्मकच आहे. भटकत भटकत शिकार आणि कंदमुळांवर गुजराण करण्याच्या काळात, माता, पिता किंवा दोघेही हरपलेले अनाथ मूल जगण्याची शक्यता अगदी कमी होती. आपली जनुके संक्रमित व्हावीत ही माता पित्याची आकांक्षा आहे. ती फलद्रूप होण्यासाठी  मुले सांभाळणे भागच आहे. त्यामुळे मुले सांभाळण्यात आईवडिलांचा जनुकीय हितसंबंध आहे. म्हणून तर बऱ्याचशा पुरुषांनी आपल्या पत्नी आणि मुलांसाठी अन्न, निवारा आणि संरक्षणाची व्यवस्था केली आहे. यातूनच, नावापुरती एक-साथी-व्रती विवाहित जोडपी आणि क्वचित ज़नाना बाळगून असणारे शेठ-सावकार, अशी मानवी समाज व्यवस्था उदयाला आली आहे. फक्त बापच मुलांचा सांभाळ करतो अशा, गोरिला, गिब्बन आणि इतर काही अल्पसंख्य, पितृ-छत्र-धारी, सस्तन प्रजातींची कथाही, ही अशीच आहे.



जोडीने आणि गोडीने संसार असे परिचित मानवी चित्र असले तरी नर-मादीचा आदीम झगडा इथे संपत नाही. दोघांची प्रसूतीपूर्व गुंतवणूक असमान असते. त्यामुळे आई बापाचे परस्परविरोधी हितसंबंध असतातच, ताणतणाव असतातच. पिल्लू पालनात बापाचा  सहभाग असलेल्या सस्तन आणि पक्षी प्रजातीतील बापांचा, कमीतकमी कष्टण्याकडे कल असतो. मुख्यत्वे आईच्या जीवावरच पिल्ले लहानाची मोठी होतात. शेजाऱ्याच्या पत्नीवरही यांचा डोळा असतो. शेजाऱ्याचा डोळा चुकवून ते तिच्याशी संगही करतात. शेजारी बिचारा आपली समजून दुसऱ्याचीच प्रजा पोसत बसतो. स्वपत्नीच्या वर्तनावर पती बारीक नजर ठेऊन असतो ते काही उगीच नाही.
जोडीच्या संसारातील अंगभूत तणावांचे, अत्यंत बारकाईने अभ्यासले गेलेले मासलेवाईक उदाहरण म्हणजे युरोपातील पाईड फ्लायकॅचर जातीची द्विज दांपत्ये. यातले बहुतेक नर हे नावापुरते एकपत्नीव्रती असतात. अन्यत्र चोच मारता येते का, याचा सतत शोध चालू असतो आणि यात काहींना यशही येते. मानवी लैंगिकतेचा शोध घेणाऱ्या या पुस्तकातील काही पाने पुन्हा एकदा पक्षीगणाला वहायला हवीत; कारण काही पक्ष्यांची वागणूक अगदी माणसासारखी आहे आणि वागणूक माणसासारखी असली तरी त्यांच्यावर माणसासारखा अनैतिकतेचा, अश्लीलतेचा आरोप होऊ शकत नाही.
पाईड फ्लायकॅचरना बहुभार्याव्रताचा कसा फायदा होत ते पाहू या. वसंतसमयेप्राप्ते नर, घरट्यासाठी एक छानशी जागा शोधतो, त्या प्रदेशी आपला हक्क जाहीर करतो, एखादी मादी पटवतो आणि तिच्याशी जुगतो. ही प्रथम भार्या अंडे घालते. हे अंडे आपणच फळवल्याची नराला खात्री वाटते. ती आता अंडे उबवण्यात मग्न असणार, अन्य नरात तिला रस नसणार आणि तसेही ती तात्पुरती वांझच आहे अशीही त्याला खात्री वाटते. मग तो आता दुसऱ्या घरट्यासाठी जागा शोधतो, दुसरी भार्या पटवतो आणि तिच्याशी जुगतो.



आपणच तिला फळवले आहे, तीची अंडीही आपलीच आहेत असा त्याला भरवसा वाटतो. याच सुमारास प्रथम भार्येच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. आता हा नर पहिल्या पत्नीकडे परततो, तिच्या पिल्लांना चारा पाणी करतो आणि तिच्या सवतीच्या पिलांकडे जेमतेम लक्ष देतो किंवा अजिबातच लक्ष देत नाही. आकडेवारीने ही क्रूर कथा अधिक स्पष्ट होईल. चारा घेऊन, तासाभरात पहिल्या घरी सरासरी चौदा हेलपाटे होतात, तर दुसऱ्या घरी तासाभरात फक्त सात चारा-फेऱ्या होतात. जागा मिळताच बहुतेक नर दुसरा घरोबा करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यापैकी ३९% यशस्वी होतात.
अर्थात यातून जेते आणि पराजित असे दोन पक्ष तयार होतात. सुरवातीला फ्लायकॅचर नर-माद्यांची संख्या साधारण सारखीच, त्यामुळे प्रत्येकीला नर-वर मिळतो पण प्रत्येक द्विभार्या-धारी नरामागे एक दुर्दैवी नर जोडीविना उरतो. बहुभार्यावाले नर हे या स्पर्धेतले महाविजेते. यांना वर्षाला सरासरी ८.१ पिल्ले होतात उलटपक्षी एक-पत्नी-व्रतींना सरासरी ५.५ पिल्ले होतात. बहुभार्यावाले जरा वयस्क, धष्ट आणि पुष्टही असतात. उत्तम परिसरातील  उत्तमोत्तम जागा हे पटकावतात. ह्यांची पिल्लेही मग जरा धष्टपुष्ट निपजतात. त्यांचे सरासरी वजन अन्य पित्यांच्या पिल्लांपेक्षा १०%नी अधिक भरते.  सहाजिकच अशक्त पिल्लांपेक्षा ही सशक्त पिल्ले जगण्याची, तगण्याची शक्यता अधिक.


यात महा-पराजित ठरतात ते सक्तीने ब्रम्हचर्य लादले गेलेले नर. यांना ना रतीसूख, ना मूल, ना बाळ. दुसरी पत्नी म्हणून राहिलेल्या पक्षिणीही पराभूतच. प्रथम पत्नीच्या तुलनेत यांना पिल्लांचे जास्त करावे लागते. पहिलीच्या मदतीला नरही असतो. पहिलीला चाऱ्यासाठी जेंव्हा तेरा हेलपाटे पुरतात तेंव्हा दुसरीला मात्र वीस हेलपाटे मारावे लागतात. पार थकून जाते ती. इतकी, की या श्रमाने ती कधी कधी अकाली मरते. कितीही पंख-पाय आपटले तरीही एकटीने संसाराचा गाडा ओढणे अशक्य होऊन जाते. जोडीने मिळवलेले दाणापाणी आणि एकटीने मिळवलेले दाणापाणी यात फरक पडतोच. दुसरीची काही पिल्ले उपाशी मरतात. पहीलीची सरासरी ५.४ पिल्लं जगतात तर दुसरीची सरासरी ३.४ पिल्ले फक्त. जी जगतात तीही पहिलीच्या पिल्लांपेक्षा अशक्त असतात; हिवाळा, स्थलांतर वगैरे त्यांना झेपत नाही.
ही हृदयद्रावक आकडेवारी पहाता या पक्षिणी ‘दुसरेपण’ स्वीकारतातच का असा प्रश्न पडतो. वैराण क्षेत्रातील, दुबळ्या नराची पहिली होण्यापेक्षा, धट्याकट्या नराची दुर्लक्षित दुसरी होणे चांगले; मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत दुसरेपण बरे;  असा विचार ह्या पक्षिणी करतात, असा जीवशास्त्रज्ञांचा कयास होता. (विवाहित श्रीमंत पुरुष संभाव्य रखेलीला अशीच तर लालूच दाखवतात.) पण असे दिसते की पक्षिणी असा विचार करत नाहीत. त्या फसगत होऊन या जाळ्यात ओढल्या जातात.
नर-वरांच्या या चलाखीतली मेख म्हणजे, दुसरे घरटे हे पहिल्यापासून  चांगले शंभर एक यार्ड दूर असते. मधे इतरांची घरे/प्रदेश असतात. हे चलाख नर शेजारच्याच घरट्यात शेज-शेजार मुळीच शोधत नाहीत. सखी शेजारीणीशीच सूत जुळवले, तर दोन्ही घरी


जाण्यायेण्यातला वेळ वाचेल, पिल्लांकडे अधिक लक्ष देता येईल, शिवाय आसपासच येणेजाणे असल्यामुळे, आपल्या अनुपस्थितीत, आपलीच घरवाली बेवफा होणार नाही यावरही लक्ष ठेवता येईल. पण हे सगळे तोटे स्वीकारून द्विभार्यावाले नर, दूरवरची दुसरी भार्या करतात. दुसरीला पहिलीचा थांगपत्ता लागू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. या घरचा विचित्र नेमानेमच असा, की पाईड फ्लायकॅचरच्या दुसरीला पडते घ्यावेच लागते. एकदा अंडी घातल्यावर आपला जोडीदार बाहेरख्याली आहे हे कळूनही उपयोग काही नसतो. आहेत ती अंडी सोडून देण्यापेक्षा उबवणे चांगले. ही अंडी सोडून, दुसरा नर जरी गाठला, तरी तो तरी एकनिष्ठ असेल, पहिल्यापेक्षा बरा असेल कशावरुन? शेवटी इथून तिथून नर सगळे सारखेच.
पाईड फ्लायकॅचर नरांच्या उरलेल्या व्युहाला शास्त्रज्ञांनी  नीती-निरपेक्ष नाव दिले आहे, ‘बहुविध प्रजनन व्यूह’ (ब.प्र.व्यू. अर्थात Mixed Reproductive Strategy). याचा अर्थ असा की एकीशी समागम उरकल्यावर हे नर अन्य नरांनी पटवलेल्या माद्यांच्या मागे लागतात. घरवाला जर्रा कुठे बाहेर गेलाय असे दिसले की घरवालीशी संग करायला बघतात, बरेचदा हे जमून जाते. काही तारस्वरात गात आपला इरादा स्पष्ट करतात तर काही गुपचूप झडप घालून संधी साधतात. यात न बोलता, करूनसवरून नामानिराळे रहाणारे अधिक यशस्वी होतात.


ह्या शिंदळकीचे प्रमाण मानवी कल्पनेबाहेरचे आहे. प्रसिद्ध युरोपिअन संगीतकार मोझार्टच्या ‘डॉन जिओव्हानि’ ह्या संगीतनाट्यातला (Opera) डॉनचा चाकर, लोपेरल्लो, मादाम इलेव्हिराला मोठया टेचात सांगतो की, ‘डॉननी स्पेनमधेच एक हजार तीन स्त्रिया केल्या आहेत’. हे वाचून आपण अचंबित होतो, पण मानवी आयुर्मान बघीतले तर हे काहीच नाही. समजा डॉनला हे कर्तृत्व गाजवायला तीस वर्ष लागली असे समजले, तर त्यानी दर अकरा दिवसाला एक स्पॅनिश बाई केली असा हिशोब निघतो. उलटपक्षी जर नर पाईड फ्लायकॅचर जर्रा कुठे इकडे तिकडे गेला की तर दहाव्याच मिनिटाला दुसऱ्या नराचा डाका पडतो आणि चौतिसाव्या मिनिटाला तो मादीशी जुगलेला असतो. सुमारे एकोणतीस टक्के समागम हे असे दांपत्य-बाह्य संबंध (दां.बा.सं.) असतात आणि चोवीस टक्के पिल्ले ‘अनौरस’ असतात. बरेचदा हा चितचोर घुसखोर, स्मार्ट शेजारीच असतो.
ह्या भानगडीत पार मार खातो तो फसगत झालेला नर. त्याच्यासाठी दां.बा.सं. आणि ब.प्र.व्यू. म्हणजे उत्क्रांतीदृष्टया आफतच. त्याच्या इवल्याश्या आयुष्यातला एक हंगाम, स्वतःची जनुके नसलेल्या, अशा  दुसऱ्याच्याच पिल्लांना भरवण्यात गेलेला आहे.  दांपत्य-बाह्य-संबंध ठेवणारा बाहेरख्याली नर हा वरवर पहाता भाग्यवान वाटतो पण हा ताळेबंद इतका सोपा नाही. तुम्ही ‘बाहेर’ जाताच तुमच्याही घरात बाहेरचा घुसू शकतो. तुमच्या नारीशी त्याचा अंगसंग रंगू शकतो. पहिल्या मादीच्या आसपास दहा यार्डा दरम्यान दांपत्य-बाह्य संबंध जुळणे अवघड. पण याहून लांब जाऊन प्रयत्न केला तर सूत जुळू शकते, पण मग मागे काय होईल हे कोणी सांगावे? यामुळेच बहुपत्नीवाल्या नरासही ‘बहुविध प्रजनन व्यूह’ हा जोखमीचा असतो. दोन्ही घरी लक्ष ठेवता ठेवता त्याची पुरती तारांबळ उडते. त्यातच स्वतःचे बाहेर कुठे जुळतंय का हे हेरण्याचा त्याचा प्रयत्न जारीच असतो.


दर पंचवीस मिनिटाला हे आसपास हुंगून येतात तर दर अकरा मिनिटाला आसपासचा कोणी यांच्या घरवालीसाठी गळ टाकून बघत असतो. अर्ध्या वेळी तर हे तिसरीकडे भानगडबाजीत रमलेले असताना ह्यांच्या घरी लफडे रंगात आलेले असते.
ह्यावरुन असे वाटेल की बहुविध प्रजनन व्यूहाचा नराला विशेष फायदा नाहीच. पण हे पाईड फ्लायकॅचरबुवा भलतेच हुशार, घरट्यात आलेल्या मादीला अंगाखाली घेईपर्यंत ते तिथल्या तिथेच घुटमळत रहातात. तिच्यावर बारीक नजर ठेवतात. एकदा तिच्याशी संग फत्ते झाला की मगच हे बाहेर इश्कबाजी करायला जातात.
.......
नर-मादीच्या आदीम झगड्याचे प्राणीजगतातील हे विहंगम दर्शन, आता यात माणूस कुठे बसतो हे पाहूया. अन्य बाबतील एकमेवाद्वितीय असलेली मानवी लैंगिकता नर नारीच्या झगड्यात मात्र अन्यांसारखीच आहे. अंतर्गत फलन आणि जोडीने पालकत्व करणाऱ्या अन्य प्राणी प्रजातींशी मानवी लैंगिकता मिळतीजुळती आहे. बाह्यफलन आणि एकल पालकत्व किंवा अंडी-पिल्ली वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रजातीपेक्षा ती भिन्न आहे.


सर्व पक्षी (ब्रश टर्की वगळून) आणि अन्य सस्तन प्राण्यांप्रमाणे माणसाचे पिल्लू जन्मतः अगदी असहाय्य असते. ते स्वतंत्रपणे जगू शकत नाही. आपले आपण अन्नपाणी शोधून आई-बापाविना रहायला माणसाच्या अपत्याला इतर अनेक प्राण्यांपेक्षा खूप खूप वेळ लागतो. म्हणुनच पालकांकडून सांभाळ अत्यावश्यक ठरतो. प्रश्न एवढाच की सांभाळायचे कोणी? आईनी? बापानी? का दोघांनी?
प्राण्यांमध्ये, त्या नवजात जीवात कोणाची गुंतवणूक जास्त, पोरांची जबाबदारी घेतल्यास प्रजननाच्या कोणत्या संधी गमवाव्या लागतात आणि मातृत्वा/पितृत्वा बद्दल विश्वास; यावर याचे उत्तर ठरते हे आपण पहिले. यातल्या पहिल्या घटकाचा विचार करता, स्त्रीने पुरुषापेक्षा अधिक गुंतवणूक केलेलीच असते. फलनसमयी स्त्रीबीज हे पुरुषबीजापेक्षा कितीतरी मोठे असते. अर्थात स्खलित वीर्यातील सर्व पुरुष बीजांचा विचार केल्यास हे गणित बरोबरीचे किंवा उलटे सुद्धा होईल. फलन होताच पुढे नऊ महिने नऊ दिवस स्त्रीने एकटीच्याच बळावर गर्भ पोसायचा आहे. मग काही काळ त्याला अंगावर पाजायचे आहे. सुमारे दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागेपर्यंत, भटक्या अवस्थेतील सर्व समाजात, मूल चार चार वर्ष अंगावरच प्यायचे. मलाही अगदी स्पष्ट आठवतय, माझी पत्नी जेंव्हा आमच्या मुलाला अंगावर पाजत होती तेंव्हा फ्रीजमधले अन्नपदार्थ फटाफट संपायचे. स्तनपानाला अफाट उर्जा लागते. साधारण कष्ट करणाऱ्या पुरुषापेक्षाही स्तनदा मातेला जास्त कॅलरीज लागतात. एकूणच बायकांना स्तनपानापेक्षा जास्त उर्जेची गरज फक्त मॅरॅथॉनसाठी तयारी करताना वगैरे लागते. तेंव्हा शय्यासोबत होताच,


पतीच्या वा प्रेमिकाच्या डोळ्याला डोळा भिडवून कोणीही स्त्री, ‘हा गर्भ जगावासा वाटत असेल तर तूच त्याची काळजी घे, मी काही त्याला सांभाळणार नाही!’, असे म्हणू  शकत नाही. ही पोकळ वल्गना आहे हे त्याच्या तत्काळ लक्षात येईल.
स्त्री पुरुषांच्या बालसंगोपनातील सहभागावर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे, यामुळे वाया जाणाऱ्या प्रजननाच्या अन्य संधी. गरोदरपण आणि (भटक्या अवस्थेत) स्तनपान यासाठी स्त्रीला इतका वेळ द्यावा लागतो की दुसऱ्या अपत्याचा विचार अशक्यच. पूर्वी दिवसभर मुलाला थोड्याथोड्या वेळाने सतत अंगावर घेतले जात असे. ह्यामुळे निर्माण होणाऱ्या संप्रेरकांमुळे पाळीच बंद होत असे. भटक्यांच्या बायकांना बऱ्याच वर्षाच्या अंतराने मुले होत असत. आधुनिक समाजात, वरचे दूध पाजल्याने किंवा सोयीसाठी कमी वेळा अंगावर घेतल्याने, स्त्री काही महिन्यातच पुन्हा गर्भार राहू शकते. अशामुळे पाळीही लगेच येते. असे जरी असले तरी, अंगावर न पाजणाऱ्या आणि गर्भनिरोधक न वापरणाऱ्या ललनेचा  पाळणाही, वर्षाच्या आत क्वचितच हलतो. आयुष्यात एका बाईला डझनापेक्षा जास्त मुले क्वचितच होतात. आयुष्यात जास्तीजास्त मुले होण्याचा उच्चांक एकोणसत्तर आहे. (एकोणीसाव्या शतकातील एक मॉस्कोवासी बाई, हीला बरीच तिळी झाली). ही बायकांची महत्तम कामगिरी. पण पुरुषांची ‘काम’गिरी पुढे ही थिटी वाटायला लागेल.


जास्त नवरे केल्याने स्त्रीला अधिक मुले होत नाहीत. बहुपतित्वाची चाल अगदी मोजक्याच मानवी समाजात दिसते. अशी प्रथा असणाऱ्या तिबेटमधील ट्रे-बा जमातीचा बराच अभ्यास झाला आहे. इथलीही सरासरी पहाता, दोन नवरे असणाऱ्यांना, एक नवरावाली इतकीच मुले होतात. बहुपतीत्वाच्या चाली मागील खरे कारण हे जमिनीचे वाटप होऊ नये हे आहे. ट्रे-बा समाजात भाऊ भाऊ बरेचदा एकाच स्त्रीशी विवाहबद्ध झालेले असतात. अशाने आधीच लहान असलेलल्या शेतीचे आणखी तुकडे पडत नाहीत.
म्हणजेच  बालसंगोपनाची जबाबदारी ‘स्वीकारल्यामुळे’ स्त्रीला  प्रजननाच्या अन्य नेत्रदीपक संधींवर पाणी वगैरे सोडावे लागत नाही. या उलट फालारोप पक्षिणीने एकच नर वरल्यास तिला  सरासरी १.३ पिल्ले निपजतात, दोघांबरोबर अंगसंग रंगल्यास तिला २.२ पिल्ले होतात, तर तिघांबरोबर संधान साधले तर ३.७ पिल्ले होतात. स्त्री पुरुषात हा विशेष भेद आहे. एकाच पुरुषाने जगातल्या तमाम बायका फळवणे, हे प्रत्यक्षात नाही, तरी कल्पनेत शक्य आहे हे आपण आधी बघितलेच आहे. ट्रे-बांच्या बायकांचे बहुपतित्व हे जनुकीय दृष्ट्या आतबट्याचे आहे. याउलट मोर्मोनात असलेली बहुपत्नीत्वाची चाल मोर्मोन पुरुषांना एकोणीसाव्या शतकात भरभरून देऊन गेली. एक बायको केलेल्यांना सरासरी सात मुले होत, तर द्विभार्याधारकांना सोळा आणि त्रीभार्यावंतांना वीस अपत्ये होत होती. तिथल्या चर्चमधील प्रभूसेवकांना सरासरी पाच बायका आणि पंचवीस लेकरे असत.


बहुपत्नीत्वाचे हे फायदे तर काहीच नाहीत. आजही राजेशाहीच्या एकछत्री अंमलाखाली साऱ्याच नाड्या राजांच्या हातात असतात. ह्यांना बरीच अनौरस संतती असते आणि  त्यांचे पालनपोषण, परस्पर होत असते. ह्यांना पैची तोशीश पडत नाही.  एकोणीसाव्या शतकात हैदराबादच्या निझामाच्या भेटीचा वृतांत एका प्रवाशाने लिहिला आहे. त्या भेटी दरम्यान आठवड्याभरातच निझामाच्या चार बायका बाळंत झाल्या आणि पुढच्या आठवडयात आणखी नऊ बायका प्रसूत होणार होत्या. मोरोक्कोच्या रक्तपिपासू सम्राट इस्माईलची ह्या बाबतीतली कामगिरी उच्चांकी म्हणता येईल. आयुष्यात ह्याला सातशे पुत्र आणि साधारण तेवढ्याच कन्या झाल्या असाव्यात. कन्या कोणी मोजलेल्या नाहीत. ह्या आकडेवारीवरुन  असे दिसते की एकच नारी भोगून, तीच्यापासूनची संतती सांभाळणारा पुरुष, हा प्रचंड पर्यायी शक्यता आधीच नाकारत असतो.
बालसंगोपन बायकांना धार्जिणे आहे आणि पुरुषांना जनुकीय फायद्याचे नाही, ह्याचे उर्वरित कारण म्हणजे पितृत्वाबद्दलची सततची, रास्त, साशंकता. ही तर अंतर्गत फलन असणाऱ्या सर्व प्रजातीच्या नरांची चिंता. पोरं सांभाळताना, आपण नकळत दुसऱ्याची पोरं तर वाढवत नाही ना, ही जोखीम पुरुषांनी घेतलेलीच असते. पितृत्वाची सर्वाधिक खात्री हवी असेल तर आपल्या स्त्रीचा परपुरुषाशी संपर्क टाळणे सर्वोत्तम. समाजातल्या कित्येक  घृणास्पद, पुरुषी, चालीरीतींमागे पितृत्वाबद्दलची साशंकता, हे जीवशास्त्रीय तथ्य आहे. कौमार्याची खात्री असेल तर नवरीची किंमत जास्त, स्त्रीच्या वैवाहिक स्थितीशी निगडीत


व्यभिचाराचे कायदे (पुरुषाची वैवाहिक स्थिती गैरलागू), बायकांना सतत सोबत कोणीतरी हवे, त्यांनी चार भिंतींच्या आतच रहायला हवे, कामभावना नष्ट करणारी, स्त्रियांची शिश्निका उडवणारी, ‘खतना’ नामे स्त्रियांची सुंता, बाह्य जननेंद्रिये चक्क शिवून टाकणे... ह्या आणि अशा साऱ्या प्रथा याच भयगंडापोटी जन्मलेल्या आहेत.
गुंतवणुकीतील लिंगसापेक्ष फरक, पालकत्वामुळे वाया दवडाव्या लागणाऱ्या प्रजननाच्या अन्य शक्यता आणि पितृत्वाबद्दल साशंकता; ह्या तिनही घटकांमुळे बायका-मुलांचा परित्याग करण्याकडे, स्त्रियांपेक्षा पुरुषांचा कल जास्त असतो. पण तरीही पुरुषाला हमिंगबर्ड किंवा वाघ किंवा इतर अनेक प्रजातीतील नरासारखे, आपला कार्यभाग उरकला की गेला उडत किंवा गेला निघून, असे नाही करता येत. आपण गेलो तरी आपली परित्यक्ता पडेल ते काम करून,  आपली जनुके वाढवेल अशा निश्चिंत भावनेने इतर नर वागतात. पण माणसाच्या  लेकरांना दोन्ही पालक लागतात. पारंपारिक समाजात तर लागतातच लागतात. बापाच्या बालसंगोपनातील सहभागाला, संगोपनाशिवाय इतरही अनेक अदृष्य आयाम आहेत. ह्या साऱ्यांचा विचार आपण पाचव्या प्रकरणात करणारच आहोत. पारंपारिक समाजातील बहुतेक पुरुष आपल्या पत्नी आणि मुलांच्या कल्याणासाठी झटतच असतात. निव्वळ भक्षकांपासून नाही तर आसपासच्या भुभूक्षित पुरुषांपासूनही ते कुटुंबाचे संरक्षण करतात.  आसपासच्या पुरुषांना त्या बाईत रस असतो आणि तीची मुले (ह्यांची संभाव्य सावत्र मुले), म्हणजे ह्यांचे तापदायक जनुकीय स्पर्धक असतात. बहुतेक पुरुष कुटुंबासाठी अन्न कमावतात, कुटुंबाची शेतीवाडी सांभाळून त्यातून उत्पन्न घेतात, घर बांधतात, बागबगीचा राखतात, मुलांना, विशेषतः मुलग्यांना, त्यांचा निभाव लागेल असे शिक्षण देतात आणि एकूणच कष्टाची कामे करतात.



स्त्री-पुरुषांना पालकत्व पत्करण्याची जनुकीय किंमत चुकवावी लागते आणि दोघांसाठी ती वेगवेगळी असते. या  जीवशास्त्रीय सत्यामुळे विवाहबाह्य संबंधांकडे पहाण्याचा दोघांचा दृष्टीकोन भिन्न आहे. माणसाच्या मुलांना बापाचीही गरज आहे. तेंव्हा विवाहित स्त्रीशीच  विवाहबाह्य संबंध ठेवणे हे पुरुषाला सर्वात फायदेशीर. कारण होणारी संतती, इथे तिचा पती परस्पर पोसणार असतो. विवाहितेशी नातेबाह्य संभोग म्हणजे त्या पुरुषाचा अपत्यसंभव वधारणार पण स्त्रीचा नाही वधारणार. नातेबाह्य संबंध ठेवण्यात हा फरक निर्णायक ठरतो. अशा संबंधां संबंधी स्त्रीपुरुषांच्या प्रेरणा भिन्न असतात ते ह्या निर्णायक फरकामुळे. पुरुषांना लैंगिक वैविध्य, तात्पुरते संबंध, हे सारे भावते असे जगभरची सर्वेक्षणे सांगतात. ह्या वर्तनामुळे पुरुषांची जनुके अधिकाधिक संक्रमित होतात, पण स्त्रीची मात्र नाही. ह्या  पुरुषी वर्तनाची अशी संगती लागते. ह्याउलट, अनेक स्त्रियांचे स्वानुभवाचे बोल असे सांगतात की, विवाहबाह्य संबंधासाठी स्त्री तयार होते, ती हरपलेल्या वैवाहिक सुखासाठी. अशा स्त्रिया पुनर्विवाहाच्या किंवा दीर्घ विवाहबाह्य नात्याच्या शोधात असतात. हा दुसरा पुरुष, नवऱ्यापेक्षाही जास्त पैसाअडका, अधिक पतप्रतिष्ठा आणि चांगली जनुके बाळगून असणारा हवा असतो.

No comments:

Post a Comment