Wednesday 21 March 2018

प्रकरण ३ पिते का न पाजती पिलांना?

प्रकरण ३
पिते का न पाजती पिलांना?
बापाच्या दुधाची अनुत्क्रांती

जेराड डायमंड यांच्या 'व्हाय इज सेक्स फन?' या मती गुंग करणाऱ्या पुस्तकाचे रसाळ मराठी भाषांतर

आज पुरुषांनीही बाल-संगोपनात सहभाग घेतला पाहिजे हे अपेक्षितच आहे. सबब सांगण्यात काही अर्थ नाही कारण बाळासाठी जे जे आई करते, ते ते करण्यास बापही समर्थ आहेच. जेंव्हा १९८७ साली मला जुळे मुलगे झाले, तेंव्हा मी अगदी हौसेने लंगोट बदलायला शिकलो, उलटी काढायला शिकलो आणि इतरही संगोपन कौशल्ये शिकून घेतली.
सुदैवाने एका कामातून मात्र मला सूट होती, मुलांना अंगावर पाजणे! हे किती दमणूक करणारे काम आहे ते माझ्या पत्नीकडे पाहून मला दिसतच होते. मित्र गमतीने म्हणायचे, की मी होर्मोनची इंजेक्शने घेऊन तिचे हेही ओझे हलके करावे. पण मातृ-महतीच्या  किंवा पितृ-अगतिकतेच्या ह्या शेवटच्या बुरुजावर, लिंगसमानता आणू पाहणाऱ्यांसमोर, एक  क्रूर जीवशास्त्रीय सत्य ठामपणे उभे आहे. पुरुषांकडे तशी शरीररचना नाही, स्तन आणि स्तन्यवृद्धी करणारे गरोदरपण नाही आणि आवश्यक संप्रेरकेही (होर्मोन्स) नाहीत. अगदी १९९४ पर्यंत, चार हजार तीनशे सस्तन प्रजातींपैकी, एकाही प्रजातीत बाप पिलांना पाजत असेल, अशी शंकाही कोणी घेतली नव्हती. त्यामुळे बापाच्या दुधाच्या अनुत्क्रांतीची तर चर्चाही करण्याची गरज नाही असे वाटेल. हे तर सुटलेले कोडे. शिवाय खाशा मानवी कामाचाराच्या उत्क्रांती विषयक पुस्तकात तर ही चर्चा अगदीच अप्रस्तुत वाटू शकेल. पिते पिलांना पाजत नाहीत हा उत्क्रांतीभाव नाही; हा तर शरीरक्रियेचा स्थायीभाव झाला. सगळ्याच सस्तनांच्या माद्याच तेवढया दूध स्रवतात  तेंव्हा माणसात खास वेगळे असे काही घडत नाही.




प्रत्यक्षात नर-दुग्ध-स्राव (खरे तर त्याचा अभाव) हा नर-नारीच्या आदीम झगड्याचाच पुढचा भाग आहे. निव्वळ ‘शरीरक्रियेचा हा स्थायीभाव आहे’, ही मीमांसा तोकडी आहे. इथेही मानवी लैंगिकतेबद्दल उत्क्रांतीभाव काय सांगतो हे  समजावून घेणे महत्वाचे आहे.  कोणीही सस्तन नर कधीच गरोदर राहिला नाही हे बरोबरच आहे आणि जवळपास सगळेच सस्तन नर दूधही स्रवत नाहीत हे ही मान्य आहे. प्रश्न असा आहे की सस्तनात निव्वळ माद्यांच्यात दुग्धनिर्मितीची जनुके का? फक्त माद्यांतच दुग्धग्रंथी का विकसित होतात? गर्भारपणाचा दुग्धप्रेरक सोहळा, स्तनपान-पूरक संप्रेरके फक्त त्यांच्यातच का? पुरुषांत का नाही? पारवे, कबुतरातील  नर-मादी दोघांतही पिलांसाठी अन्ननलिकेतून दुधासारखा स्त्राव झरत असतो. हे दूध दोघेही पिलांना पाजत असतात. समुद्रअश्वांत तर नर गरोदर रहातात. मग माणसात का नाही? पुरुषांनी काय घोडे मारलंय?
दुग्धपानासाठी आधी गरोदरपण आवश्यक आहे असे वाटेल पण अनेक सस्तन माद्यांना, यात माणसाच्या माद्याही आल्या, दिवस न जाऊन सुद्धा दुध येऊ शकते. योग्य ती संप्रेरके (होर्मोन्स) दिली तर कित्येक प्राण्यांतील नरांना आणि मानवप्राण्यातील नरवरांना, स्तनवृद्धी होते, दूधही येते. काही विशेष परिस्थितीत कित्येक पुरुषांची थाने वाढतात आणि दूध येते. काही पाळीव मेंढे आणि काही जंगली सस्तनांतही असे घडल्याचे दिसले आहे.




म्हणजेच नरांतही दुग्धनिर्मितीची क्षमता असतेच. मानवी पिते जर अंगावर पाजू लागले  तर अन्य सस्तन नरांपेक्षा आधुनिक मानवी नरांत ते उत्क्रांती सुसंगत ठरेल. कसे ते पुढे पाहू. पण हा काही आपला जन्मदत्त गुणविशेष नाही आणि एखादा अपवाद वगळता अन्य सस्तन नरांतही हे वैशिष्ठ्य आढळत नाही. नैसर्गिक निवडीच्या ओघात नरांत दुग्धस्त्राव निर्माण झालाही असता, पण मग का नाही झाला? हाच तर यक्षप्रश्न. निव्वळ, ‘तसे अवयव नरात घडत नाहीत म्हणून’, एवढ्यावर ह्याची वासलात लावता येणार नाही. नर-स्तन्य-अभाव हा तर मानवी लैंगीकतेच्या उत्क्रांतीतील, सर्व आयामांचे एक ठसठशीत उदाहरण; नर-मादीच्या औत्क्रांतिक झगड्याचे, पितृत्वाबद्दलच्या डळमळीत विश्वासाचे, मातृत्वाच्या पक्क्या खात्रीचे, प्रजननात असलेल्या दोघांच्या गुंतवणुकीतील दरीचे आणि जैविक वारशाशी असलेल्या अटळ बांधिलकीचे.
या विविध पैलूंच्या शोधाची पहिली पायरी, म्हणजे ‘पिते पिलांना पाजू शकतात’,  हा विचारच अस्पर्श ठरवणाऱ्या मानसिकतेवर मात करणे. आपली शरीररचना आणि कार्य बघता हे अशक्यच आहे ह्या आपल्या नि:शंक धारणेवर मात करणे. स्त्री पुरूषांतील जनुकीय भेद, अगदी स्तन्यजनक जनुकांतील भेदही, अत्यंत किरकोळ आणि तकलादू आहेत. ह्या प्रकरणांती नर-स्तन्य-जनन शक्य आहे हे  तुम्हाला पटेल आणि मग हे व्यवहार्य कार्य व्यवहारात का उतरत नाही हेही आपण पाहू.
......



आपल्या लैंगिकतेचा पाया अंतिमतः आपल्या जनुकांनी (Genes) रचलेला असतो. प्रत्येक पेशीच्या  केंद्रकात (Nucleus), गुणसूत्रांच्या (Chromosomes) तेवीस जोड्या असतात. ही गुणसूत्रे म्हणजेच अनेक जनुकांचा समुच्चय. ह्या गुणसूत्रात ही जनुके ओळीने मांडलेली (की माळलेली)  असतात. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीतील एक गुणसूत्र आपल्याला आईकडून मिळते तर एक वडीलांकडून. प्रत्येक गुणसूत्राचा सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारा तोंडावळा वेगवेगळा असतो. ह्यावरूनच त्यांना एक ते तेवीस असे क्रमांक दिलेले आहेत. यातील एक ते बावीस ह्या जोड्यातील दोन्ही गुणसूत्रे दिसायला तंतोतंत एकमेकांसारखी असतात. तेविसाव्वी जोडी सेक्स गुणसूत्र म्हणवली जाते.  स्त्रियात ही जोडी एकसारखीच असते. या दोहोंना ‘एक्स’ गुणसूत्र म्हणतात. पुरुषांच्यात मात्र तेविसाव्या जोडीतील गुणसूत्र एकमेकांपेक्षा वेगळी दिसतात. पुरुषांच्यात एक ‘एक्स’ गुणसूत्र असतेच पण ह्याच्या जोडीला असलेले लहानसे गुणसूत्र ‘वाय’ नामेकरून प्रसिद्ध आहे.
ह्या सेक्स गुणसूत्रांचे नेमके कार्य काय? एक्स गुणसूत्रावरील अनेक जनुके (Genes) सेक्सशी अजिबात संबंध नसलेले गुणविशेष बहाल करतात. उदाहरणार्थ रंगांधळेपणा (लाल व हिरव्या रंगातील भेद न ओळखता येणे). वाय गुणसूत्र मात्र वृषण (Testes) निर्मितीचा आराखडा बाळगून असते. मानवी गर्भात, फलनानंतर पाचव्या आठवडयात, स्त्री अथवा पुरुषबीजग्रंथीत (Ovary किंवा Testes) परिवर्तीत होऊ शकेल, अशी दुहेरी क्षमता असणारी, उभयक्षम बीजग्रंथी (Bipotential Gonad) निर्माण होते. ज्या गर्भात वाय गुणसूत्र असेल त्या गर्भात ही ग्रंथी, वाय-कडून येणाऱ्या इशाऱ्यानुसार, वृषण म्हणून वाढू लागते. साधारण सातव्या आठवडयात हे बदल दिसतात. पण जर वाय गुणसूत्र नसेल, तर तेराव्या आठवड्यानंतर ग्रंथी धोपटमार्ग (Default Pathway) स्वीकारते आणि स्त्रीबीजग्रंथी म्हणून वाढू लागते.  



हे जरा आश्चर्यकारक वाटेल. तुमची अशी कल्पना असेल, की मुलींत स्त्रीबीजग्रंथी निर्मितीचे काम, त्या दुसऱ्या एक्स गुणसूत्राकडे असेल आणि मुलग्यांत पुरुषबीजग्रंथी वाय गुणसुत्रामुळे निर्माण होत असतील. कधी कधी एक्सच्या जोडीबरोबर एक ज्यादाचे वाय गुणसूत्र असते (XXY, क्लाईनफेल्टर सिंड्रोम). असा गर्भ पुरुषाचा म्हणून वाढतो. चुकून जर तीन एक्स गुणसूत्र (XXX, सुपर फीमेल सिंड्रोम) असली किंवा एकच एक्स गुणसूत्र असले (X_, टर्नर सिंड्रोम, हे XO असे दर्शवतात. उच्चार एक्सओ, इथे ओ म्हणजे शून्य, काहीही नाही.) तरीही गर्भाची वाढ, स्त्रीगर्भ म्हणुनच होते.  म्हणजेच आपल्या उभयक्षम बीजग्रंथीची नैसर्गिक वाढ ही स्त्रीबीजग्रंथीच्या दिशेने होत असते. वाय गुणसूत्राने वेगळी दिशा दाखवली तरच ही ग्रंथी पुरुषग्रंथी म्हणून वाढते. 
हे सारे जरा अलंकारिक भाषेत मांडता येईल. संप्रेरकतज्ञ आल्फ्रेड जोस्टच्या शब्दात, ‘पुरुष होणे म्हणजे एक लांबलचक, कटकटीचा, जोखीमीचा प्रवास आहे; स्त्रीत्वाकडे झुकणाऱ्या निसर्गदत्त प्रेरणेविरुद्ध सततचा झगडा आहे.’ पुरुषप्रधानतेचे पुरस्कर्ते तोऱ्यात म्हणतील की पुरुष होणे ही खरी मर्दानगी, हे खरे पौरुष; स्त्री होणे म्हणजे नुसतेच, जे जे होईल ते ते पहाणे. उलटपक्षी असेही म्हणता येईल, की नारीरुपी जन्म हे तर मानवाचे नैसर्गिक भागधेय आणि नरजन्म म्हणजे नाईलाजाने सहन करावी लागणारी, एक अटळ आणि आवश्यक विकृती. अधिक बायका निर्माण होण्यासाठी बायकांनी मोजलेली किंमत. मी मात्र एवढेच म्हणेन की वाय गुणसूत्राच्या संकेतानुसार उभयक्षम बीजग्रंथी स्त्रीत्वाकडे जाणारा धोपटमार्ग सोडून पुरुषत्वाचा रस्ता धरतात. यातून कोणताही तात्विक निष्कर्ष मी काढणार नाही.
.....



पण पुरुष म्हणजे नुसत्याच पुरूषबीजग्रंथी नाहीत, नुसतेच वृषण नाहीत, पुरुष म्हणजे वृषण आणि बरेच काही. शिश्न (लिंग, Penis), पूरस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्रंथी, Prostate Gland) आणि इतरही काहीबाही पुरुषपणाला आवश्यक आहे. स्त्री म्हणजे सुद्धा निव्वळ स्त्रीबीजग्रंथी नाही, किमान योनीमार्ग असणे सोयीचे. गर्भावस्थेत फक्त बीजग्रंथीच नाही, तर इतरही काही अवयव नर-नारी अशी दोन्हीही रूपे घेऊ शकतात. पण बीजग्रंथींचा विकास वाय गुणसूत्राने निर्देशित असतो. इतर उभयक्षम अवयवांचा विकास वाय गुणसूत्राने थेट निर्देशित नसतो. वाय गुणसूत्राच्या इशाऱ्यावर वृषण तयार होतात आणि वृषणातून स्त्रवणाऱ्या पुरुष संप्रेरकांमुळे हे इतर अवयव पुरुषपणाकडे वळतात. वृषणातील हे स्त्राव नसतात तेंव्हा हे इतर अवयव स्त्रीजननेंद्रीयात रुपांतरीत होतात.
उदाहरणार्थ गर्भावस्थेत आठव्या आठवड्यातच वृषण, टेस्टोस्टेरॉन (Testosteron) हे स्टिरॉईड संप्रेरक स्रवू लागतात. ह्यातल्या काही भागाचे रुपांतर डीहायड्रो-टेस्टोस्टेरॉन मध्ये होते. ह्या पुरुष संप्रेरकांच्या, (अँन्ड्रोजेन्सच्या, Androgens) प्रभावामुळे उभयक्षम भागांपासून शिस्न (Penis), शिस्नमुंड (Glans Penis), आणि वृषणकोश (Scrotum) हे अवयव तयार होतात. मात्र अशा प्रभावाअभावी, स्त्री गर्भात, हेच भाग शिस्निका (Clitoris), लघु व गुरु ओष्ठ (Labia Majora, Labia Minora) म्हणून विकास पावतात. ह्याच बरोबर म्युलेरीयन नलिका आणि वोल्फीयन नलिका नामे, उभयक्षम नलिका असतात. वृषण नसेल तेंव्हा वोल्फीयन नलिका कोमेजून जातात आणि म्युलेरीयन नलिकांपासून, योनीमार्ग, गर्भपिशवी आणि फॅलोपीयन नलिका उमलतात. वृषण असतील तर उलटे घडते. पुरुष गर्भात अँन्ड्रोजेन्सच्या प्रभावाखाली वोल्फीयन नलिका वाढतात. त्यापासून पुरुषबीजकोश  (Seminal Vesicle), पुरुषबीजवाहक नलिका (शुक्रनलिका, नस, Vas Deference) आणि अधिवृषण (Epididymis) निर्माण होते. ह्याच वेळी वृषणातून स्रवणारा म्युलेरीयन-नलिका-विकास-रोधक-संप्रेरक (MIH Mullerian Inhibitory Hormone) नावाला जागून, म्युलेरीयन नलीकांपासून तयार होणारे स्त्री अवयव (योनीमार्ग, गर्भपिशवी आणि फॅलोपीयन नलिका) विकसित होऊ देत नाही. म्युलेरीयन नलिका कोमेजून जातात. (चित्र आवश्यक)



वाय गुणसूत्रामुळे वृषण तयार होतात आणि वृषणस्रावांच्या प्रभावामुळे वा अभावामुळे अंतर्गत जननेंद्रिये तयार होतात. याकारणे असे वाटेल की धड ना स्त्री धड ना पुरुष, अशी जननेंद्रिये निर्माणच होऊ शकत नाहीत. वाय गुणसूत्र असल्यास शंभर टक्के पुरुष इंद्रिये तयार होतात आणि नसल्यास शंभर टक्के स्त्री इंद्रिये.
प्रत्यक्षात बीजग्रंथी वगळता अन्य जननेंद्रिये तयार होण्यासाठी अनेक जैवरासायनिक क्रियांची एक लांबच लांब साखळी कार्यरत असते. यातील प्रत्येक पायरी पार पडण्यासाठी, एकेका जनुकाने संचलित, एकेक खास एन्झाइम (विकर, Enzyme), एकेक खास रसायन, असावे लागते. जनुकात जर काही अचानक बदल घडला (उत्परिवर्तन, Mutation), की एन्झाइम बिघडते किंवा घडतच नाही. अशाच एका एन्झाइम दोषामुळे वृषण असूनही स्त्री अवयव बाळगणारी व्यक्ती निर्माण होऊ शकते (Male Pseudohermaphrodite). यांच्यात सदोष एन्झाइमची पायरी येईपर्यंतचा अवयव विकास, पुरुषेंद्रीयांच्या दिशेने यथास्थित पार पडतो. यापुढे मात्र पुरुषेंद्रीयांची वाढ खुंटते. सदोष एन्झाइमवर किंवा त्यानंतरच्या जैवरासायनिक पायऱ्यांवर अवलंबून असलेली पुरुषेंद्रीये तयारच होत नाहीत. त्या जागी स्त्री इंद्रिये तरी तयार होतात (धोपट मार्ग) किंवा ती जागा तशीच रिकामी रहाते. उदाहरणार्थ एका प्रकारात अशी व्यक्ती दिसायला स्त्री स्वरुप दिसते. अगदी खऱ्या



स्त्रीपेक्षाही ‘ही’ अधिक कमनीय, अधिक ऊंच, कटी शेलाटी आणि उरोज कुंभापरी. फॅशन मॉडेल म्हणून गाजलेल्या कित्येक सौदर्यवती या तपासणीअंती, खऱ्याखुऱ्या स्त्रिया नसून, पुरुष गुणसूत्र असलेल्या ‘स्त्रिया’ आहेत असे आढळून आले आहे. अंतर्यामी वृषण असूनही, जनुकीय बदलांमुळे घडलेल्या ह्या बाह्यात्कारी ‘स्त्रीया’ (Phenotypically Females).
ह्या प्रकारातील बाळ हे दिसायला मुलीसारखेच दिसते, वयात आल्यावर बाह्यात्कारी सारी वाढ मुलीसारखीच होते, पण पाळी येत नाही. मग डॉक्टरी तपासणी होते. तपासणीत योनीमार्ग, गर्भाशय आणि स्त्रीबीजवाहक नलिका तयार झाल्या नसल्याचे समजते. योनीमार्गाच्या जागी पेरभर खोल, खळगा तेवढा असतो. पुढे ह्या व्यक्तीत वाय गुणसूत्र असून टेस्टोस्टेरॉन (Testosteron) स्रवणारे वृषणही असल्याचे दिसते. हे वृषण मात्र जांघेत अथवा ‘तिच्या’ बाह्यांगात लपलेले आढळतात. स्पष्ट शब्दात सांगायचे, तर ‘गुलजार नार देखणी’ अशी ही मॉडेल, म्हणजे एक पुरुष आहे. विशिष्ठ जनुकीय बदलांपायी, टेस्टोस्टेरॉनला प्रतिसाद देण्यात त्याच्या पेशींना रासायनिक अडचण आहे.
पेशीतील टेस्टोस्टेरॉन, डीहायड्रो-टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकांना काम करण्यासाठी टेकायला रासायनिक खुर्ची लागते (Androgen Receptors). अशा व्यक्तीत ही रासायनिक खुर्ची नसते. खुर्ची असल्या शिवाय हे संप्रेरक काम करत नाहीत. त्यामुळे अँड्रोजेन गटातील या संप्रेरकांना काम करायला खुर्ची नसेल तर पुरुषेंद्रीयांची पुढील  वाढ  होतच नाही. अशा या व्यक्तीत वाय गुणसूत्र आहे, वृषणही आहेत, त्यांचा म्युलेरीयन-नलिका-विकास-रोधक-स्रावही (MIH, Mullerian Inhibitory Hormone) आहे. परिणामी गर्भाशय, स्त्रीबीज-वाहक-नलिका आणि योनीमार्ग, या म्युलेरीयन नलीकांपासून उमलणाऱ्या स्त्री अवयवांचा विकासही खुंटला आहे. पण त्याचवेळी



टेस्टोस्टेरॉनला प्रतिसाद शक्य नसल्यामुळे  पुरुषेंद्रियांचा विकासही होणे नाही. पुरुषेंद्रीय म्हणून उमलणाऱ्या वोल्फीयन नलिका कोमेजून जातात, पुरुष म्हणून आवश्यक  अंतर्गत जननेंद्रिय तयारच होत नाहीत. अशा परिस्थितीत उरलेले उभयक्षम अवयव स्त्रीत्वाचा धोपट मार्ग (Default Path) निवडतात. पुरुषातही ईस्ट्रोजेन हा संप्रेरक अत्यल्प प्रमाणात स्रवत असतो. स्त्रियांना स्त्रीत्व देणारा हा एक महत्वाचा घटक. वृषण आणि अधिवृक्क ग्रंथी (Adrenal Gland) हे या स्रावाचे पाझर. धडधाकट पुरुषात अँड्रोजेनचा प्रभाव एवढा जबरदस्त असतो की ईस्ट्रोजेन पार झाकोळला जातो. ह्या व्यक्तीत मात्र, खुर्चीचे रेणू नसल्याने, अँड्रोजेन असूनही नसल्यासारखे. त्यामुळे ईस्ट्रोजेनला आता मोकळे रान मिळते. या अल्पशा ईस्ट्रोजेनच्या बेलगाम प्रभावाखालील ही व्यक्ती, ‘...कंचुकी, बापडी मुकी, सोसते भार; शेलटी खुणावे कटी...’ अशी बनून जाते. रंभा, मेनका, रती, उर्वशी अशा रूपगर्वितांत सहज गणली जाते.
थोडक्यात स्त्री पुरुषातील जनुकीय भेद हे किरकोळ असले तरी त्यांचे परिणाम मूलभूत आणि दूरगामी असतात. तेविसाव्या गुणसूत्रावरील काही जनुके इतर काही गुणसूत्रावरील जनुकांसह, स्त्री पुरुषातील भेद प्रत्यक्षात उतरवत असतात. हे भेद म्हणजे निव्वळ जननेंद्रियातील भेद नव्हेत तर दाढी, अंगावरचे केस, आवाज फुटणे, स्तनवृद्धी असे तारुण्यातील इतरही बदल होत.
.....











टेस्टोस्टेरॉनचा परिणाम वय, अवयव आणि प्रजातीनुसार वेगवेगळा असतो. प्राणी प्रजातीगणिक लिंगभेदही विविध रुपात दिसतात. फरक निव्वळ स्तनाच्या वाढीत असतो असे नाही. आपण आणि आपले निकटचे भाईबंध, कपी (Apes), यातले नर-नारी भेद आपल्याला परिचित आहेत. प्राणीसंग्रहालयात किंवा फोटोत नर गोरिला तुम्ही पहिले असतील. हे मादीपेक्षा चांगलेच धिप्पाड दिसतात (मादीच्या दुप्पट वजन भरते त्यांचे), डोक्याचा आकार अगदी वेगळा असतो, पाठीवर सोनेरी केस असतात. पुरुषही स्त्रियांपेक्षा थोडे थोराड असतात (सरासरी वजन २०% जास्त), पिळदार असतात, त्यांना दाढी असते. ह्या भेदातही भेदाभेद आहेत. आग्नेय आशियात आणि मूळनिवासी अमेरिकन जमातीत (रेड इंडियन) हे भेद एवढे भेदक नाहीत. ह्याच्या पुरुषात अंगावर लव जेमतेमच असते आणि दाढीही येते न येते. गिब्बन माकडाच्या काही प्रजातीत नर-मादी दुरून दिसायला अगदी सारखे दिसतात. बाह्यांग तपासल्याशिवाय त्यांच्यातील तो-ती ओळखणे मुश्कील.
अपराप्राप्त सस्तन प्राण्यात (Placentate Mammals, वार असणारे प्राणी) नर-मादी दोघांना स्तन असतात. अर्थात बहुतेक सस्तन नरांत ह्या ग्रंथीचा ना आकार वाढतो ना त्या कार्यान्वित होतात. पण प्रजातीप्रमाणे हे प्रमाण बदलते. एका टोकाला नर मूषकात ना दुग्धग्रंथी तयार होतात ना स्तनाग्र (बोंडशी, Nipple). विरुद्ध टोकाला श्वान आणि प्रायमेट प्रजातीत (यात मानवही आला), दुग्धग्रंथी, दुग्धनलिका, स्तनाग्र इत्यादी सरंजाम नर-मादी दोघातही असतो आणि पौगंडावस्थेपर्यंत समानच दिसतो.



पौगंडावस्थेत बीजग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी (Adrenal Gland) आणि पिट्युटरी ग्रंथीच्या विविध संप्रेरक स्रावांमुळे  हे लिंगभेद आणखी ठळक होतात. गर्भारपणी आणि अंगावर पाजताना निर्माण होणारी संप्रेरके स्तनांची आणखी वाढ घडवतात आणि पान्हा फुटतो. बाळाने ओढल्याने देखील एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून अधिकाधिक दूध झरू लागते. माणसात दुग्ध निर्मिती प्रोलॅक्टीनमुळे घडते तर गायीत सोमाटोट्रोपिन या संप्रेरकामुळे. सोमाटोट्रोपिन म्हणजेच ग्रोथ हॉर्मोन, दुभत्या गायींना हा द्यावा का नाही यावर सध्या बराच वादंग माजला आहे.
अमुक संप्रेरके फक्त नरांत अमुक फक्त मादीत असा अभेद्य भेद नसतो. नर-मादीतील संप्रेरकांत असलेले फरक हे निव्वळ प्रमाणातले फरक आहेत. नरांत काही संप्रेरकांचे प्रमाण जास्त, त्यांच्यासाठी खुर्च्याही (Receptors) जास्त; मादीत हेच प्रमाण नगण्य, पण शून्य नाही; असा प्रकार असतो. त्यामुळे स्तनवृद्धी आणि दुग्धनिर्मितीसाठी, गर्भार रहाणे एवढाच मार्ग नाही. निसर्गतः उद्भवणाऱ्या संप्रेरकांमुळे कित्येक सस्तनांच्या अर्भकांना जन्मतः थोडेसे दूध येते (Witch’s Milk). ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन (गरोदरपणात निर्माण होणारा संप्रेरक) टोचले तर शेळीत आणि गायीतच नाही तर बोकडात आणि बडवलेल्या खोंडातही (वयात यायच्या आतच वृषण काढून टाकलेला / वृषण



निकामी केलेला), स्तनवृद्धी आणि स्तन्य निर्मिती घडते. हरीण आणि गिनीपिग नरांतही असेच घडते. निव्वळ इंजेक्शने टोचलेल्या गायीही व्यालेल्या, दुभत्या गायींइतकेच दूध देतात. बडवलेले खोंड मात्र गायींपेक्षा खूप कमी दुध देतात. अर्थातच, कारण गायींना आचळे आहेत, सड आहेत, दुग्धग्रंथी इथे वाढू शकतात, खोंडाना मुळातच आचळे नसतात, सड नसतात.
मानव प्राण्यातही, पुरुषांना, गर्भारशी किंवा स्तनदा नसलेल्या स्त्रियांना, संप्रेरकांची मलमे किंवा इंजेक्शने दिल्याने छाती फुगल्याची, पान्हा फुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही कॅन्सरसाठी उपचार म्हणून ईस्ट्रोजेन देतात. अशा स्त्री-पुरुषांना प्रॉलॅक्टीन दिल्यास दूध येऊ लागते. एका प्रयोगातील चौसष्ठ वर्षाच्या गृहस्थांना तर प्रायोगिक उपचार बंद केले तरी पुढे सात वर्ष दूध येत होते. (ही घटना १९४० च्या सुमारासची आहे. त्याकाळी मानवी प्रयोगांवर आजच्यासारखी कडक बंधने नव्हती). काही प्रकारच्या झोपेच्या गोळ्यांचा परिणाम म्हणूनही असा अनाहूत  दुग्धस्राव होतो. ह्या गोळ्यांमुळे मेंदूतील हायपोथॅलॅमसवर परिणाम होतो आणि हायपोथॅलॅमसद्वारेच प्रॉलॅक्टीन नियंत्रित होत असते. मेंदूच्या ऑपरेशन दरम्यान जर लुचण्याच्या नसा उद्दीपित झाल्या असतील तर पुढे काही काळ दुग्धस्राव दिसतो. ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या बराच काळ घेतल्या तरीही असा परिणाम दिसतो. एका गमतीशीर हकिगतीनुसार, आपल्या पत्नीच्या इवल्याशा उरोजांबद्दल सतत नाराज नवरोबांना एके दिवशी स्वतःचीच छाती वाढल्यासारखी आढळली. तपासाअंती कळले की  नवऱ्याची मर्जी प्राप्त व्हावी म्हणून त्या बाई स्तनवृद्धीसाठी ईस्ट्रोजेनचे मलम छातीला चोपडत होत्या आणि हे मलम नवऱ्याच्या छातीला लागून लागून त्याचेच स्तन वर्धिष्णू झाले होते.



......
तुम्हाला वाटेल की वरील उदाहरणे इंजेक्शने किंवा शस्त्रक्रियांची आहेत. ही सारी इथे नर-दुग्ध-निर्मितीच्या चर्चेत असंबद्ध आहेत. पण औषधा-ऑपरेशनाशिवायही आगंतुक दूध निर्मिती होऊ शकते. स्तनाग्रे बराच काळ कुस्करल्यास अनेक सस्तन प्रजातीतील माद्यांना दुध येते.  अगदी कुमारिका मुलीतही दुध झरायला लागते. स्तनाग्रे हाताळल्यामुळे निसर्गतःच  मेंदू उद्दीपित करणारे संदेश जातात आणि एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मेंदूकडून दुग्ध ग्रंथींना संप्रेरके पोहोचतात. उदाहरणार्थ वयात आलेल्या, पण कुमारिका मार्सूपिअल (कांगारू वा तत्सम प्राणी) मादीला कोणतेही पिल्लू लुचायला दिले की पान्हा फुटतो. आचळ पिळत राहिले की कुमारिका शेळीलाही पान्हा येतो. स्तनाग्रे कुस्करल्यास पुरुषात आणि स्त्रियात प्रॉलॅक्टीन पाझरू लागते. ह्याच कारणे, स्तनाग्रे कुस्करत राहिल्यास पितेही पान्हावतील. कुमारवयीन मुलांत अशाप्रकारे दूध झरल्याची बरीच उदाहरणे आहेत.
या बाबतीत, ‘प्रिय अॅबीस’, ह्या वर्तमानपत्रातील एका सदरात (कौटुंबिक प्रश्नांबाबत सल्ला देणारे सदर) प्रसिद्ध झालेले एक पत्र हे माझे लाडके उदाहरण आहे. तान्हे मूल दत्तक घ्यायच्या बेतात असलेल्या एका अविवाहीतेला त्याला अंगावर पाजण्याची अनिवार इच्छा असते. यासाठी संप्रेरके घ्यावीत काय, असा तिचा अॅबीला प्रश्न असतो. अॅबी उत्तर देते, ‘भलतेच, अशाने तुला दाढी मिशा फुटतील!’ पण उत्तरादाखल अनेक वाचकांनी निव्वळ वारंवार लुचायला लावून दत्तक बाळाला यशस्वीरीत्या स्तनपान केल्याचे अनुभव आणि स्वानुभव कळवले होते.



या क्षेत्रातील डॉक्टर आणि नर्सेसचा अनुभव असा आहे की बहुतेक दत्तक मातांना तीन ते चार आठवड्यात अंगावर बऱ्यापैकी दूध येऊ लागते. बाळ घरी येण्यापूर्वी, पूर्वतयारी म्हणून, महिनाभर अशा महिलांना, स्तनाग्रे (निपल) ओढणारा पंप दिला जातो. तासातासाने हा पंप छातीला लावून बाळाने चोखल्यासारखा परिणाम साधला जातो. ब्रेस्ट पंप वगैरे नव्हते अशा काळात, चक्क कुत्र्याचे पिल्लू किंवा दुसरे एखादे छोटे बाळ छातीशी लावून हाच परिणाम साधला जात असे. काही समाजात गर्भवती जर अगदी अशक्त असेल, तर गर्भवतीची आई हा प्रयोग करून, वेळ पडल्यास स्वतः मूल पाजते. अगदी वयाच्या एक्काहत्तरीतही हा प्रयोग यशस्वीरित्या राबवलेल्या आज्या आहेत. बायबलमधील जुन्या करारात रुथची सासू नाओमीने असे केल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ: बायबल, रुथचा ग्रंथ,  प्रकरण ४, वचन १६)
अन्नान दशा संपून पुन्हा एकदा खायला मिळालेल्या पुरुषांत बरेचदा स्तनवृद्धी आणि क्वचित दुग्धस्राव होत असल्याचे आढळते. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस, छळछावण्यातून सुटलेल्या युद्धकैद्यांत अशा हजारो केसेस आढळल्या. जपानमधील एकाच छावणीत तब्बल पाचशे



केसेसची नोंद आहे. ह्याचे कारण असे की, उपासमारीने संप्रेरके निर्माण करणाऱ्या ग्रंथी थंडावतात पण त्याच बरोबर ही संप्रेरके नष्ट करण्याचे यकृताचे कार्यही मंदावते. पुन्हा अन्न मिळू लागताच संप्रेरक ग्रंथी तात्काळ कार्यरत होतात पण यकृताला मात्र पूर्वपदावर यायला बराच वेळ लागतो. परिणामी संप्रेरकांची पातळी चढत जाते. पुन्हा एकदा बायबलमधील जुन्या करारात आधुनिक शरीरशास्त्राचे जणू संकेत सापडतात (प्रकरण २१ वचन २४). त्यातला जॉब एका पुष्ट माणसाबद्दल सांगतो, की ‘दुधानी त्याची छाती फुगलेली आहे’.
इतर बाबतीत अत्यंत सर्वसाधारण असलेल्या, वृषण असलेल्या, शेळीला गाभण करू शकलेल्या बोकडांना, कधी कधी अचानक, आपोआप सड फुटतो आणि पान्हा सुटतो हे बराच काळ ज्ञात आहे. बोकडाचे दूध शेळीसारखेच असते, उलट चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. आग्नेय आशियातील एका पाळीव स्टंम्प टेल मकाक्वे माकडातही असाच उत्स्फूर्त दुग्धस्राव आढळून आला आहे.
जंगलातल्या मुक्त संचारी नरांत स्तन्य निर्मिती झाल्याचे १९९४ साली सर्वप्रथम नोंदले गेले. मलेशिया आणि आसपासच्या बेटांवरील ड्याक वटवाघळातील (Dyak fruit bat) अकरा नरात स्तनाग्रे पिळताच दूध येत असल्याचे आढळले. बहुतेक बऱ्याच काळ पिलांना न पाजल्याने काहींची थाने तट्ट फुगलेली होती तर काहींची बहुदा नुकतेच पाजल्याने रिक्त झाली



होती. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या तीन वाघळ थव्यांपैकी, दोन थव्यात दुध देणारे नर, दुध देणाऱ्या माद्या आणि पोटुशा माद्या होत्या. तिसऱ्या थव्यातील वाघळे जनन मोसमात नव्हती. ह्याचा अर्थ असा की मादीच्या प्रजनन मोसमाप्रमाणे नरांत दुग्ध निर्मिती होत असावी. यांच्या दुभत्या नरांतही पुरुषबीज निर्मिती निर्वेधपणे सुरु असल्याचे वृषणतपासणीत दिसून आले.
म्हणजेच सहजा जरी आया पाजत असल्या आणि बाप पाजत नसले तरी किमान काही सस्तन प्रजातीतील नरांना तरी आवश्यक शरीर-रचना प्राप्त आहे, शरीर-क्षमता प्राप्त आहे आणि संप्रेरक यंत्रणाही कार्यरत होऊ शकते. थेट संप्रेरके किंवा संप्रेरक-प्रेरके देऊन नरात स्तनवृद्धी आणि दुग्धस्राव घडून येऊ शकतो. अगदी धडधाकट पुरुषांनी मूल अंगावर पाजल्याची काही उदाहरणे आहेत. या दुधातही, आईच्या दुधाप्रमाणेच शर्करा, प्रथिने आणि क्षार आढळले आहेत. ह्या सर्वातून असे दिसते की नर स्तनपान उत्क्रांत होणे शक्य होते. बारीकश्या  जनुकीय उत्परिवर्तनाने (Mutation) काही संप्रेरकांचे प्रमाण वाढले असते किंवा काहींचा नाश मंदावला असता तर  आज पिते पिलांना पाजत असते.
पण अर्थातच उत्क्रांतीच्या खेळात पित्यांची ही क्षमता सुप्त रहावी अशी रचना उत्क्रांत पावली आहे. कॉम्प्यूटरच्या भाषेत सांगायचे तर नरांकडे हार्डवेअर आहे पण पण ते वापरणारा प्रोग्रॅम नैसर्गिक निवडीत इंस्टॉल झालेला नाही. पण का?
......



हे समजण्यासाठी शरीरकार्याच्या दृष्टीने कारणमीमांसा करण्यापेक्षा, दुसऱ्या प्रकरणातल्या प्रमाणे, उत्क्रांतीदृष्टया युक्तिवाद करायला हवा. विशेषतः नर-मादीच्या औत्क्रांतिक  कलगीतुऱ्यात, ९०% सस्तन प्रजातीत, आयाच पिल्लांचा प्रतिपाळ करतात, हे लक्षात असो द्यावे. ज्या प्रजातीत बापाविनाही पिल्ले निभावून जातात तिथे तर नर-स्तनपानाचा प्रश्नच येत नाही. या प्रजातीतील नरांना दुध येण्याची तर गरज नाहीच पण चारा आणण्याची, क्षेत्र राखण्याची, पिलांना सुरक्षित ठेवण्याची,  शिकवण्याची, कसलीच जबाबदारी नाही. अशा प्रजातीत, जनुकीय उत्परिवर्तनाने,  पिलांना अंगावर पाजणारा कोणी माईचा लाल जन्माला आलाच, तर लवकरच त्याचा वंश, खंडित होईल. कारण हा पिले पाजेस्तोवर बाहेर अन्य नरांनी केवढीतरी प्रजोत्पत्ती साधली असेल. 
तेंव्हा नर स्तन्य निर्मितीचा प्रश्न, हा पितृसहभाग अत्याआवश्यक असलेल्या,  उरलेल्या १०% अल्पसंख्य प्रजातींपुरताच विचारात घ्यायला हवा. सिंह, लांडगे, गिब्बन, मार्मोसेट माकडे आणि  माणूस अशा या काही प्रजाती. पण पितृवात्सल्याचा पाझर आवश्यक असलेल्या प्रजातीतही तो  फक्त दुधाच्याच रुपात पाझरेल असे नाही. सिंहरावांनी



छाव्यांचा घास करण्यास  टपलेल्या तरसांना आणि इतर सिंहरावांना पिटाळून लावणे महत्वाचे. गनीम असा चौफेर दबा धरून असताना, छाव्यांना दूध पाजण्यापेक्षा, गस्त घालून आपला प्रदेश राखणे महत्वाचे. (स्तनपान सिद्धीस नेण्यास सिंहीण समर्थ आहेच.) लांडग्याने आपल्या लाडक्या लांडगीसाठी, गुहा सोडून शिकार आणणे हाच त्याचा सहभाग. त्या मासांचे रुपांतर ती लांडगी दुधात करेलच. अजगर किंवा गरुड झडप तर घालत नाहीत ना, यावर डोळा ठेवणे आणि आपली गिब्बीण अन् गिब्बुकली ताव मारत आहेत, त्या झाडावरून इतर उपटसुंभ गिब्बनांना हुसकावून लावणे, हेच तर गिब्बनचे पितृकर्तव्य. मार्मोसेट-वानर नर तर आपल्या जुळ्यांना बराच वेळ अंगाखांद्यावर खेळवत पितृ प्रेमाचा वर्षाव करतात.
पण नरांच्या दुग्ध अभावासाठीच्या ह्या साऱ्या सबबी झाल्या. एका तरी सस्तन प्रजातीत, पिते पिलांना पाजत असतीलच, बापाचे दूध हे बापाला आणि पिलांना फायद्याचे  असेलच, अशी शक्यता उरतेच. ड्याक वटवाघळे ही अशी एक संभाव्य प्रजाती आहे. पण बापाचे दूध हिताचे असलेल्या सस्तन प्रजाती जरी असल्या, तरी हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी ‘औत्क्रांतिक बांधिलकी’चा (Evolutionary Commitment) मोठाच अडथळा असेल.
औत्क्रांतिक बांधिलकी ही संकल्पना समजावून घेण्यासाठी एखाद्या मानव निर्मित यंत्राचे उदाहरण घेऊ. ट्रकची चासी घेऊन त्यावर गरजेनुसार बॉडी बांधली जाते. सामानसुमान वाहून न्यायचे आहे, का घोडे, का आईस्क्रीम, यावर बॉडीची रचना ठरते. ह्या भिन्न गरजा, इंजिन, ब्रेक, अॅक्सेल



अशा महत्वाच्या भागांना धक्का न लावता, मूळ रचना तशीच राखून, निव्वळ हौद्यात काही किरकोळ बदल करून, भागवता येतात. विमानातही असे किरकोळ बदल करून तेच मॉडेल प्रवासी वहातुकीसाठी, स्कायडायव्हिंगसाठी अथवा मालवाहू म्हणून वापरता येते. पण ट्रकचे विमान किंवा विमानाचा ट्रक करू म्हटले तर ते शक्य नाही. ट्रक आपल्या ट्रकपणाला हरतऱ्हेने बांधील आहे; जड बॉडी, डिझेलचे इंजीन, ब्रेक, अॅक्सेल आणि काय काय. विमान बनवायचे तर ट्रक घेऊन सुरुवात करण्यापेक्षा संपूर्णपणे नव्याने श्रीगणेशा करणे इष्ट.
प्राणीमात्रांत सुध्दा इच्छित जीवनशैलीला अगदी अनुरूप, अगदी चपखल, अशी रचना दरवेळी नव्याने घडत नाही. प्राणी आहे त्या अवस्थेतून, आहे त्याच प्राणी समुदायातून, उत्क्रांत होतात. जीवनशैलीतील औत्क्रांतिक बदल हे कळसाला पोहोचतात पण ते मुंगीच्या पावलाने. पूर्व जीवनशैलीनुरूप उत्क्रांत झालेल्या रचनेत तीळ तीळ  बदल घडत रहातात, त्यातले नव्याशी सुसंगत टिकतात. त्या त्या समुदायात उदंड होतात.
मूळ जीवनशैलीशी सुसंगत अशी काही रचना असते (मूळ मॉडेल) त्यात किंचित किंचित बदल होत जातात. प्रजोत्पादनाला आणि प्रजावर्धनाला पूरक बदल असतील अशांची संतती वाढते. असे बदल असलेली प्रजा वर्धिष्णू होते (नवे मॉडेल). आता बदल, हा इथून पुढे होऊ शकतो. पूर्वीचे कोणतेतरी मॉडेल निवडून तिथून सुरवात करता येत नाही. एका विशिष्ठ जीवनशैलीशी निष्ठेपायी अनेकानेक बदल (अनुकूलन) अंगी बाणवलेल्या प्राण्याला, नव्या जीवनशैलीशी अनुरूप असे रूप अचानक घेता येत नाही. असे अनेकानेक नेमके बदल घडून नवा अवतार घडायला प्रचंड वेळ लागतो. उदाहरणार्थ पिलांना जन्म देणाऱ्या सस्तन मादीने उद्या पक्ष्यांसारखी अंडी घालू म्हटले तर ते शक्य नाही. फलित अंडे बाहेर सोडण्याबरोबर, किमानपक्षी पिवळा बलक, कवच आणि अशाच इतर पक्षीगुणांची सोय आधी व्हावी लागेल.



पृष्ठवंशीय प्राण्यांच्या, पक्षी आणि सस्तन प्राणी या दोन महत्वाच्या वर्गांपैकी (Class), पक्ष्यांत पित्याने  पिलांचा प्रतिपाळ करायचा, हा नियम आहे तर सस्तनात हा अपवाद आहे. ‘मादीच्या शरीरांतर्गत नुकत्याच फलित झालेल्या स्त्रीबीजाचे करायचे काय?’, ह्या यक्षप्रश्नाचे दोन्ही वर्गांनी, उत्क्रांत होता होता, वेगवेगळे उत्तर शोधले आहे. ह्या औत्क्रांतिक इतिहासाचा हा परिपाक आहे. उत्तरे भिन्न तेंव्हा शरीरांतर्गत बदलही त्यानुसार भिन्न. पक्ष्यांत आणि सस्तनात हे इतके भिन्न की आता यांना चिकटून रहाण्याशिवाय त्यांना तरणोपाय नाही.  
पक्ष्यांचे उत्तर असे, की मादीने फलित बीज हे बलकासकट, कडक कवचात गुंडाळून अंडे म्हणून बाहेर सोडायचे. अंड्यातला पक्षी-जीव इतका कोवळा, इतका दुबळा की गर्भशास्त्राच्या जाणकारशिवाय अन्यांना तो जीव, पक्षी आहे हे ही ओळखणे मुश्कील. फलनापासून ते अंडे घालण्यापर्यंत, मादीच्या पोटात होणारा गर्भविकास  जेमतेम दोन तीन दिवसांचा. ह्या अल्पशा अंतर्गत विकासाच्या टप्यानंतर, बाह्य जगात विकासाला बराच कालावधी लागतो. कवच फोडून पिल्लू बाहेर येईपर्यंत सुमारे ऐंशी दिवस आणि पुढे पिल्लू भुर्र उडून जाईपर्यंत चारापाणी भरवण्याचे, सुमारे २४० दिवस. एकदा अंडे घातल्यावर, आईनेच करायला हवे, असे कोणतेच काम उरत नाही. अंडी बापही उबवू शकतो. बहुतेक पक्ष्यांची पिल्ले, आईबाप खातात तोच चारा खातात. हा चारा आई आणू शकते तसेच बापही आणू शकतो.



बहुतेक पक्षी प्रजातीत घरट्याची, अंड्यांची आणि पिल्लांची काळजी घ्यायला, आईबाप दोन्ही आवश्यक ठरतात. एखाद्याच पालकाचे प्रयत्न पुरतील अशा प्रजातीत, बाबांपेक्षा आया ही जबाबदारी उचलतात. ह्याची कारणे आपण दुसऱ्या प्रकरणात पाहिली आहेत. फलित बीजात असलेली मादीची अटळ अशी अधिकची गुंतवणूक, पालकत्व स्वीकारल्यास नराच्या प्रजनन संधींचा होणारा लोप आणि अंतर्गत फलनामुळे पितृत्वाबद्दलचा सदाचा अविश्वास ही ती कारणे होत. पण सस्तन मादीशी तुलना करता पक्षिणीची गुंतवणूक ही फारच कमी असते. पक्षिणी (अर्धविकसित जीव असलेली) अंडी घालतात आणि सस्तन माद्या (पूर्ण विकसित झालेली संतती) वितात. बाह्य जगात तत्वतः आई बाप दोघेही पिलांची काळजी घेऊ शकतात.  बाह्य जगात विकासाला लागणारा वेळ आणि मातेअंतर्गत विकासाला लागणारा वेळ ह्यांचे गुणोत्तर पक्ष्यांसाठी खूप जास्त आहे. कोणत्याच पक्षिणीचे गरोदरपण नऊ महिन्याच्या मानवी गर्भावस्थेच्या जवळपासही पोहोचत नाही. सस्तनातील गर्भावस्थेचा बारा दिवसांचा किमान कालावधीही, पक्ष्यांशी तुलना करता खूपच जास्त आहे.
म्हणुनच, नर बाहेरख्यालीपणा करत असताना, सस्तन माद्या बालसंगोपनाला सहज तयार होतात, पण पक्षिणी सहजासहजी बधत नाहीत. ह्याचा परिणाम पक्ष्यांच्या उपजत-वर्तन-आज्ञावलीच्या (Instinctive Behaviour Programming) उत्क्रांतीवर होतो; तसेच त्यांच्या शरीररचनेच्या आणि कार्याच्या आज्ञावली उत्क्रांत होण्यावरही होतो. कबुतरे आपल्या पिलांना अन्ननलिकेनजीकच्या ग्रंथीतून (Crop) पाझरणारे ‘दूध’ पाजत असतात. ही व्यवस्था कबुतर माता-पिता दोघांतही उत्क्रांत झाली आहे. दोन्ही पालकांनी पिल्ले सांभाळायची हा द्विजगणातला नियम. एकल पालकत्ववाल्या पक्ष्यांत, सहसा आईच पालकत्व निभावते. बाबा-पक्षी  अगदी क्वचित हे काम करतात आणि सस्तनात तर पित्याचे एकल पालकत्व न भूतो असेच. विपरीत-भूमिका-बहुपतीत्व स्वीकारलेल्या पक्षी प्रजाती, तसेच ऑस्ट्रिच, इमू, टीनामौस आदी पक्ष्यांत एकटा पालक म्हणून, पिता पुढे होतो. 



अंतर्गत फलन आणि तद्नंतरच्या गर्भ विकासातल्या अडचणींची उकल, म्हणून पक्ष्यांत विशेष शरीररचना आणि कार्य आढळून येते. फक्त पक्षिणीला अंडनलिका (Oviduct) असते नर पक्ष्याला नसते. अंड नलिकेत एका भागात अल्ब्युमिन स्रवत असते (अंड्यातला पांढरा बलक), एकात कवचाच्या आतील आणि बाहेरील आवरण तयार होते आणि एका भागात प्रत्यक्ष कठीण कवच निर्माण होते. ही सारी संप्रेरकांनी नियंत्रित रचना आणि निर्मिती-यंत्रणा, औत्क्रांतिक बांधिलकी दर्शवते. पक्ष्यांच्या उत्क्रांतीने हा मार्ग धरला, त्याला बराच काळ लोटून गेला असणार. पक्ष्यांच्या उद्भवापूर्वीही, सरीसृप (सरपटणारे प्राणी, Reptiles) सर्रास अंडी घालतच होते. ह्यांच्याकडूनच, वारसा हक्काने पक्ष्यात ही रचना उतरली असावी. हे सरीसृप नाहीत तर पक्षीच आहेत  असे खात्रीने  ओळखता येतील असे जीव, उदाहरणार्थ प्रसिद्ध आर्किऑप्टेरिक्स (Archaeopteryx), जीवाश्माच्या रुपात सुमारे दीडशे कोटी वर्षापुर्वीपासून आढळतात. ह्या आर्किऑप्टेरिक्सची प्रजनन वैशिष्ठ्ये आपल्याला ठाऊक नाहीत, पण ऐंशी कोटी वर्षापूर्वीच्या  एका जीवाश्मात, घरटे आणि अंड्यांवर बसलेला डायनोसोर आहे. ह्यावरून घरटी बांधणे आणि अंडी घालणे हे दोन्ही गुण पक्ष्यांना  सरीसृप पूर्वजांकडून, वारशाने प्राप्त मिळालेले दिसतात.
आजच्या पक्षी प्रजातीत, अधिवास आणि  जीवनशैलीत प्रचंड वैविध्य दिसते. आज गगनगमनी विहंग आहेत, गगनभरारी विसरून धरेवर धावणारे आहेत, तसेच समुद्रात बुड्या मारणारे आहेत. इवल्याश्या हमिंगबर्ड पासून, आता नामशेष झालेल्या महाकाय गज-खगांपर्यंत (Elephant Bird) आणि अंटार्क्टीकाच्या बर्फिल्या थंडीत अंडी घालणाऱ्या पेंग्विनपासून ते वाफाळत्या विषुववृत्तीय



वर्षावनात संसार करणाऱ्या टाउकान पर्यंत अनेकविध पक्षी आहेत. एवढे सारे वैविध्य असूनही, सारेच पक्षी अंतर्गत-फलन साधतात, सारेच अंडी घालतात, ती उबवतात आणि एकूणच पक्ष्यांच्या इतरही प्रजनन वैशिष्ठ्यांशी सारेच निष्ठा बाळगून आहेत.  विविध प्रजातीत काही किरकोळ फरक तेवढे आहेत. (अपवाद सांगायचा तर ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक बेटावरील ब्रश टर्की, आपली अंडी अंगच्या उबेने उबवण्याऐवजी, कुजणाऱ्या पाचोळ्यात, ज्वालामुखीच्या राखेत किंवा उन्हात उबवतात.) जर नव्याने, अगदी सुरवातीपासून पक्षी घडवायचा म्हटले, तर ह्याहीपेक्षा अभिनव आणि पूर्णतः वेगळी प्रजनन व्यवस्था बनवता येईलही. वटवाघळासारखेच उडणारे, पिल्लांना जन्म देणारे, त्यांना अंगावर पाजणारे, असे पक्षी बनवता येतील. ह्या वटवाघूळीय जीवनमानाचे गुणवैभव कितीही असले, तरी आत्ताचे पक्षी मात्र स्वतःच्याच जीवनशैलीला बांधील आहेत. निसर्गतः असे काही व्हायला त्यांच्यात अतीच बदल घडावे लागतील.
.....
‘अंतर्गत फलित बीजाचे करायचे काय?’ या प्रश्नाच्या सस्तनांच्या उत्तरालाही औत्क्रांतिक बांधिलकीचा पुरातन इतिहास आहे. सस्तनाच्या उत्तराची सुरवात गरोदरपणाने होते. आईच्या गर्भाशयात वाढण्याचा अत्यावश्यक पहिला टप्पा, ह्याला पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक वेळ लागतो. गरोदरपणाचा किमान कालावधी आढळतो बँडीकूट मूषकात, फक्त बारा दिवस; आणि कमाल कालावधी, ह्त्तीणीत, तब्बल बावीस महिने. सस्तन माद्यांचे, सुरवातीचेच हे भरमसाठ गुंतलेपण पहाता, नंतर त्यांना त्यातून काढता पाय घेणे, अशक्य होऊन बसते आणि यामुळेच फक्त माद्यांत स्तनपानाची यंत्रणा उत्क्रांत झाली आहे.



पक्ष्यांसारखेच सस्तन प्राणीही आपल्या या आगळ्यावेगळ्या उत्तराशी बराच काळ प्रामाणिक आहेत. स्तनपानाचे काही जीवाश्मासारखे, चिरस्थायी पुरावे सापडू शकत नाहीत, पण सस्तन प्राण्यातील तीनही गट मोनोट्रेम (Order Monotremata), मार्सूपिअल (पिशवीत पिले पोसणारे, Cohort Marsupialia), आणि अपराप्राप्त (वार असलेले, Cohort Placentalia) पिल्लांना स्तन्य देताना आढळतात. सस्तनात हे तीन प्रकार पडले सुमारे १३५ कोटी वर्षापूर्वी. म्हणजेच स्तनपानाची सुरुवात, याही पूर्वी, आपल्या कोणत्यातरी सरपटणाऱ्या, सस्तन सदृश पूर्वजात झाली असणार (यांना थेरापसिड रेप्टाईल म्हणतात, Therapsid Reptile).
पक्ष्यांप्रमाणे सस्तनही खास प्रजननपूरक शरीररचना आणि शरीरकार्य बाळगून आहेत. काही बाबतीत तीनही सस्तन गटात बरेच भेद आहेत. अपराप्राप्त सस्तनात अपरा (वार) तयार होते आणि इतरांच्या तुलनेत बरेच विकसित अपत्य बाहेर पडते. मार्सूपिअल बाळे अविकसित असतात. जन्मानंतर त्यांचा बराच काळ विकास होत रहातो आणि मोनोट्रेम तर आहेत सस्तन, पण  चक्क अंडी घालतात. हे भेदाभेदही १३५ कोटी वर्षापासूनचे.
सस्तनातील तीन गटातील भेदांशी तुलना करता किंवा सस्तन आणि पक्षी अशी तुलना करता, त्या त्या गटांतर्गत फारसे फरक आढळत नाहीत. काळाच्या ओघात कोण्या सस्तनाने पुन्हा बाह्यफलनाचा मार्ग पत्करलेला नाही, असा मार्ग पुन्हा उत्क्रांत झालेला नाही. कोणी स्तनपान सोडून दिलेले नाही. कोण्या मार्सूपिअलने अथवा अपराप्राप्ताने पुन्हा अंडी घातलेली नाहीत. असाही मार्ग पुन्हा उत्क्रांत झालेला नाही. विविध प्रजातीतील स्तनपान वैविध्य हे प्रामुख्याने प्रमाणातील वैविध्य आहे. हे थोडे कमी, ते थोडे जास्त, एवढेच. उदाहरणार्थ आर्क्टिक सीलच्या दूधात पोषण खच्चून, चरबी भरपूर आणि साखर अगदी जेमतेम, आणि माणसाचे दूध त्यामानाने अगदी पातळ, गोड आणि चरबीही कमी. अंगावरचे बंद करून वरचे अन्न सुरु



करण्याचा कार्यक्रम भटक्या, रानावनातल्या मानव जमातीत चांगला चार चार वर्षे चालू असतो. दुसऱ्या टोकाला गिनिपिग आणि जॅकरॅबिटची पिल्ले काही दिवसातच वरचे अन्न चघळू लागतात आणि लवकरच अंगावरचे सोडून देतात. गिनिपिग आणि जॅकरॅबिट बहुधा पक्ष्यांच्या दिशेने उत्क्रांत होत आहेत. किनारी पक्षी किंवा कोंबड्यांची पिल्ले कशी तैय्यार असतात, डोळे उघडे, तुरुतुरु चालणे आणि दाणे टिपायला लगेच सुरवात. मात्र उडता येत नाही आणि स्वतःला उबदारही राखता येत नाही. जर मानवी आधाशीपणाला ही सृष्टी आधीच बळी पडली नाही, तर कदाचित येणाऱ्या काळात, गिनिपिग आणि जॅकरॅबिटच्या  वंशजांनी, आपला स्तनपानाचा वारसा नाकारला देखील असेल; फक्त काही कोटी वर्षांची तर बात आहे.
थोडक्यात, प्रजननाचे इतर व्यूहही सस्तनांना लाभदायक असू शकतील आणि थोडेफार बदल घडताच गिनिपिग अथवा जॅकरॅबिटसारख्या सस्तनांची पिल्ले, स्तन्याविना वाढू शकतील असे वाटेल. पण असे  घडणार नाही. उत्क्रांतीने निवडलेल्या आपल्या विशिष्ठ प्रजनन व्युहाला  सस्तन धरून आहेत. जरी नर-स्तन्य–निर्मिती शक्य असल्याचे आपण पाहीले आणि थोडक्याच बदलांनी जरी हे साध्य होणार असले, तरी सस्तन माद्यांची उत्क्रांती याबाबतीत अगदी टिपेला पोहोचलेली आहे. माद्यांत स्तन्य-निर्मिती-क्षमता परिपूर्णपणे विकसित झाली आहे. नरांत नाही तर नारींमध्ये कोट्यवधी वर्ष औत्क्रांतिक निवड होत होत स्तनपान उपजले आहे. नर स्तन्य निर्मिती शक्य असल्याचे ठसवण्यासाठी, मी ज्या ज्या प्रजातींची उदाहरणे दिली; माणूस, गुरे, बोकड, कुत्री, गिनिपिग आणि ड्याक वटवाघळे; त्या साऱ्यांत बापाचे दूध आलेच तर आईच्या मानानी अगदी  जेमतेम येते.
......



ड्याक वटवाघलळांची कुतूहलजनक कथा बघता, कधी कधी असे वाटते, की न जाणो, आजही जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी, आजवर अज्ञात अशी, पिलांना मायबाप दोघेही अंगावर पाजत असलेली प्रजाती असेलही; किंवा कदाचित या पुढे अशी प्रजाती उत्क्रांत होईल. ड्याक वटवाघळाचा जीवनेतिहास आज अज्ञात आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत पित्यांनी पिलांना पाजायला  सुरवात केली, हे नेमके सांगणे शक्य नाही. पिलांना बापाचे (मिळत असल्यास) नेमके किती दुध मिळते, हे ही सांगणे शक्य नाही. पण परिस्थितीच्या कोणत्या रेट्यामुळे पाजणारे पिते उत्क्रांत झाले असतील, याची आपण कल्पना करू शकतो. एकाच वेळी आईला पाजायला झेपणार नाहीत एवढी पिल्ले निर्माण होणे, एकनिष्ठ जोडपी, पितृत्वाची निःसंदेह खात्री आणि पत्नी गरोदर असतानाच पित्यांच्या शरीरात स्तनपान पूरक फरक घडून येणे; अशा परिस्थितीत बापाला पान्हा फुटू शकेल.
वरील परिस्थिती काही प्रमाणात लागू होईल अशी प्रजाती म्हणजे, मनुष्य प्रजाती. वैद्यकीय प्रजनन तंत्रज्ञानाने यातला गैरलागू भागही आता आपल्याला लागू होईलसे दिसते.  आधुनिक  औषधे आणि कृत्रिम प्रजननाच्या अतिप्रगत तंत्रांमुळे जुळी, तिळी सर्रास होत असतात. जुळयांना अंगावर पाजण्याला इतकी उर्जा लागते की अशा बाईच्या भुकेची बरोबरी प्रशिक्षणार्थी सैनिकांच्या



आहाराशीच करता येईल. व्याभिचारावर इतके विनोद आहेत, पण प्रत्यक्षात युरोप-अमेरिकेतले अभ्यास असे सांगतात की, तपासलेली बहुतेक संतती, ही नवऱ्यापासुनचीच असते. आता तर गर्भाचीही जनुकीय तपासणी करून, साशंक बापांना पत्नीच्या पोटातील गर्भ तुमचाच आहे, अशी १००% हमी देता येते.
प्राण्यांत बाह्यफलन हे पितृ-सहभाग-साधक असते तर अंतर्गत फलन पितृ-सहभाग-बाधक असते. ह्यामुळे इतर सस्तन प्रजातीत जरी पितृसहभाग रोखला गेला, तरी माणसात मात्र  आता पितृ सहभाग किफायती असेल अशी चिन्हे आहेत. ह्याचे कारण, गेल्या दोन दशकात टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानात (In Vitro Fertilisation) झालेली विलक्षण प्रगती. आजही जगभरात बहुसंख्य बाळे नैसर्गिक तऱ्हेनेच रहातात पण पालकत्वाची आस लागलेले कित्येक वयस्कर स्त्री-पुरुष, आपली अतृप्त इच्छापूर्ण व्हावी म्हणून ह्या तंत्राची मदत घेतात. जगभरात मानवी प्रजनन क्षमता घटते आहे असेही म्हणतात. खरेच जर तसे असेल तर आता जास्तजास्त मानवी मुले अंतर्गत फलनाने नाही, तर बेडूक आणि माशांसारखी बाह्य फलनाने, (टेस्ट ट्यूब बेबी) गर्भवासी होतील असे दिसते.
ह्या साऱ्या गुणवैशिष्ठ्यांमुळे मानव प्रजातीत नर स्तन्य निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे. नैसर्गिक निवडीतून असे काही उत्क्रांत व्हायला कोट्यवधी वर्षे लागतील खरी, पण तंत्रज्ञानाच्या सहायाने शॉर्टकट मारून आपण हा कालावधी कमी करू शकतो. डीएनए चाचणी, होऊ घातलेल्या बापाला पितृत्वाची ग्वाही देईल आणि मग स्तनाग्रे उद्दीपित करून, काही संप्रेरक



इंजेक्शने देऊन, ‘अवघडलेल्या’ बाईच्या नवऱ्याची, निद्रिस्त स्तन्य-जनन-क्षमता जागृत होऊ शकेल. उत्क्रांतीच्या संथ बदलांसाठी थांबायची गरज नाही. बापाच्या दुधाचे फायदेही अनेक. बापात आणि लेकरांत आता, आजवर फक्त आईला शक्य असलेला, ‘दूधका रिश्ता’ जुळेल. खरेतर कित्येक नवरे ह्या ‘माँ का दुध’ प्रकरणात, आपण उपरे ठरल्यामुळे मनातल्या मनात जळतच असतात. आज पुढारलेल्या देश-समाजात कित्येक आया, कामधंद्यामुळे, आजारामुळे वा दुध आटल्यामुळे,  आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाहीत. स्तनपानाचा फायदा बाळांनाही होतोच. अंगच्या दुधावर पोसलेल्या बाळांची प्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यांना जुलाब, कान फुटणे, लहान वयातला मधुमेह, फ्ल्यू इत्यादी अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. बापाला दुध आले, तर आईच्या अनुपस्थितीत, तो तिची जागा घेईल. बाळाला अंगचे दुध चालूच राहील.
मात्र पित्याने पाजण्यातील अडथळे निव्वळ शारीरिक नाहीत, हे कदाचित ओलांडता येतील, पण मानसिक अडथळेही आहेत.  आजही पुरुषांच्या मते हे ‘बायकांचे काम’ आहे आणि पोरे पाजणारे पहिले पिते अन्य पित्यांच्या कुचेष्टेचे धनी ठरतील. तरीही काही दशकापूर्वी काहीच्याक्काही वाटलेल्या कितीतरी प्रजनन प्रक्रिया आज सर्रास वापरल्या जातात.



यात संभोगाशिवाय  फलन आहे, पन्नाशी गाठलेल्यांची बाळंतपणे आहेत, भाडोत्री मातृत्व आहे (सरोगसी) आणि जेमतेम किलोभर भरणाऱ्या बाळाला इन्क्यूबेटरचे संजीवक सहाय्य आहे. निव्वळ स्त्रीयांतील स्तन-रचनेनेच स्तनपान शक्य होणार हे उत्क्रांती-वचन आपण सहज तोडू शकतो. उद्या कदाचित मनोरचनेच्या शृंखलाही अशाच गळून पडतील. कदाचित एक प्रजाती म्हणून, उत्क्रांती-रीतीच्या विपरीत मार्ग निवडण्यातच, आपले अनन्य आगळेपण आहे. प्राणीसृष्टीत खून, बलात्कार आणि वंशसंहार सर्रास घडतात. मानवी समाजातही पूर्वी हे राजरोस घडत असे. खरेतर या साऱ्यामुळे आपली जनुके पुढे संक्रमित होण्याची शक्यता वाढते. पण आज आपण या साऱ्याला त्याज्य आणि निषिद्ध मानतो.
पित्याने पाजणे ही अशीच उत्क्रांतीरीतीच्या विपरीत निवड ठरेल काय?

No comments:

Post a Comment