Monday, 26 March 2018

प्रकरण ५ पुरुष काय कामाचे? पुरुषांच्या सहभागाची उत्क्रांती


प्रकरण ५
पुरुष काय कामाचे?
पुरुषांच्या सहभागाची उत्क्रांती

जेराड डायमंड यांच्या व्हाय इज सेक्स फन? या मजेशीर पुस्तकाचे मजेशीर भाषांतर


मागच्या वर्षी एका  दूरच्या विद्यापीठाकडून मला एका महत्वाच्या परिषदेमधे व्याख्यानासाठी निमंत्रण आले.  माझा आणि त्या निमंत्रक व्यक्तीचा काहीच परिचय नव्हता आणि नावावरून ती व्यक्ती प्राध्यापक आहे का प्राध्यापिका आहे याचा अंदाज येत नव्हता. जायचे तर कितीतरी तासांचा विमान प्रवास आणि जवळजवळ आठवडाभर रजा आवश्यक होती. पण आमंत्रण मोठे आग्रहाचे आणि अगत्याचे होते. परिषदही अशीच छान असेल, खूप मजा येईल असे वाटले. मग अगदी वेळात वेळ काढून मी जाण्याचे जमवले.
अपेक्षेप्रमाणे परिषदेचा सोहळा लाजवाब रंगला. मी खूष झालो. परिषदेशिवाय म्या दूरदेशीच्या पाहुण्यासाठी, आसपासचा प्रदेश हिंडण्याची खास सोय केली होती. शॉपिंग, पक्षीनिरीक्षण, पार्ट्या, ऐतिहासिक आणि पुरातन स्थळांना भेटी असा भरगच्च कार्यक्रम होता. हे अफलातून नियोजन आणि ते आग्रही निमंत्रण होते एका प्राध्यापिका बाईंचे.  त्यांनी त्या परिषदेत उत्कृष्ठ भाषण तर केलेच; आपल्या दिलदार, सालस स्वभावाने सगळ्यांना आपलेसेही  केले पण त्याहीपेक्षा त्यांच्या सौंदर्याने मी स्तिमित झालो. आजवर मला भेटलेली सर्वात लावण्यसुंदर स्त्री.



त्यांच्याच तर्फेच्या एका शॉपिंग ट्रिपमध्ये, मी पत्नीसाठी बरीच खरेदी केली. माझ्या बरोबर सोबत म्हणून आलेल्या त्यांच्या विद्यार्थिनीने सगळी बित्तंबातमी त्यांना पुरवली असणार, कारण रात्रीच्या पार्टीत त्यांनीच हा विषय काढला आणि म्हणाल्या, ‘माझा नवरा मला कधीच काही भेट आणत नाही. पूर्वी मी त्याच्यासाठी काय काय घ्यायचे पण त्याचा प्रतिसाद शून्य. मग आता मीही काही घेणे बंद केले आहे.’
इतक्यात कोणीतरी, माझ्या पक्ष्यांच्या अभ्यासाबद्दल विषय काढला. न्यू-गिनीतील स्वर्गीय सौंदर्य लाभलेले पक्षी (Birds Of Paradise) मी अभ्यासले आहेत. मी सांगितले की,
‘ह्यांच्यातले नर पिल्लांकडे मुळीच लक्ष देत नाहीत. ते निव्वळ जास्तीतजास्त माद्या पटवण्याच्या मागे असतात.’
‘अगदी पुरुषांसारखेच की!’, यजमानीणबाई घुश्श्यात बोलल्या. मी आश्चर्यचकित. त्या म्हणाल्या, त्यांचा नवरा, इतरांपेक्षा बराच बरा म्हणायचा. त्यांच्या करिअरला अगदी उत्तेजन वगैरे देतो; पण रोज संध्याकाळी ऑफिसमधल्या मित्रांच्या अड्ड्यात असतो, शनिवार-रविवार तिन्हीत्रिकाळ  टीव्ही पहातो आणि दोन मुलांचे करायला जरासुद्धा मदत करत नाही. बऱ्याच मिनत्या करूनही तो काही घरकामाचे मनावर घेत नाही म्हटल्यावर, नुकतीच त्यांनी एक कामवाली नेमलेली आहे. ह्यात जगावेगळे काहीच नाही. घरोघरी मातीच्या चुली. पण त्या बाईंचे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि लाघव पहाता, अशा स्त्रीचा नवरा तिच्याविना वेळ घालवतो, हे जरा वेगळे वाटले मला.



अर्थात इतर अनेक बायकांपेक्षा प्राध्यपिकाबाईंच्या घरचे बरे होते म्हणायचे. मी सुरवातीला न्यू गिनीला गेलो, तेंव्हा तिथल्या महिलांचे शोषण बघून माझा संताप व्हायचा. जंगलवाटांवर भेटणाऱ्या जोडप्यांपैकी बाई, डोक्यावरच्या सरपणाच्या ओझ्याने पार वाकलेली, त्यात एका हातात वेचलेला भाजीपाला आणि कडेवर एखादे किरटे पोर. त्या नवऱ्याकडे फक्त त्याचे धनुष्य बाण. तो नवरा तिच्यासोबत आरामात चालत असायचा. पुरुष शिकारीसाठी भटकणार  म्हणजे त्यांना मित्रांचा अड्डा जमवण्याची जणू संधीच. मैत्रभाव वगळता बाकी काही हाती लागायचे नाही. मिळालीच काही शिकार, तर तिथल्या तिथे संपवली जायची. बायका विकल्या जात, विकत घेतल्या जात आणि सोडून दिल्या जात. त्यांच्या मनाला, मताला कोण किंमत शून्य.
पुढे मला स्वतःला मुलेबाळे झाली आणि त्यांना हाकलत हाकलत फिरायला नेताना, ते न्यू गिनीतले पुरुष मला अधिक समजले, असे हटकून वाटायला लागले. मुलांच्या बरोबर जाताना, सतत ते रस्त्यात तर जात नाहीत ना, चुकत तर नाहीत ना, धडपडत तर नाहीत ना, याकडे मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन असायचो. न्यूगीनितल्या माणसाला तर कितीतरी अधिक सतर्क रहावे लागायचे. त्याच्या बायकामुलांना किती तरी अधिक धोके. ओझ्याने वाकलेल्या बायकोसोबत चालणारे ते रिक्तहस्त, तथाकथित रिकामे पुरुष खरे तर सतत टेहेळणीचे आणि रक्षणाचे  काम करत असत. कुठूनही कधीही परक्या टोळीने हल्ला केला, तर तीरकमठा सज्ज करता यावा म्हणून दोन्ही हात मोकळेच हवेत. पण पुरुषांचा शिकारीचा ‘खेळ’ आणि बायकांची खरेदी विक्री हे मला अस्वस्थ करतच होते.




‘पुरुष काय कामाचे?’ हा तर अति नाजूक प्रश्न. आपल्या समाजाची दुखरी नस. पुरुषांनी स्वतःला बहाल केलेले उच्चासन स्त्रियांना असह्य होते आहे. निव्वळ स्वतःपुरते बघणाऱ्या आणि बायका-मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांना महिलांच्या टीकेला तोंड द्यावे लागते आहे. मानववंशशास्त्रासाठी हा मोठाच जटील वैचारिक गुंता आहे. जोडीदाराची आणि पिल्लांची, नर किती काळजी घेतात हा निकष लावला, तर बहुतेक सस्तन नर निव्वळ मादीला फळवण्यापलीकडे काही करत नाहीत असे दिसते. समागम होताच ते काढता पाय घेतात. पुढे लालनपालन, संरक्षण, शिक्षण ही जबाबदारी सर्वस्वी मादीची. माणसाचे नर मात्र वेगळे आहेत. समागमानंतर सहसा ते मादी आणि पिलांसंगे रहातात. पुरुषांची ही जगावेगळी भूमिका, आपल्या प्रजातीच्या जगावेगळ्या लैंगिकतेला करणीभूत आहे असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात. हा युक्तिवाद येणेप्रमाणे...
दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागेपर्यंत सर्व मानवी समाज हा भटका, कंद-मुळांवर आणि शिकारीवर गुजराण करणारा होता. पुरुष मोठ्या शिकारीच्या मागे लागणार तर बायका कंद-मुळे गोळा करता करता, छोटी मोठी शिकार साधणार आणि मुलांकडे लक्ष देणार. आजच्या भटक्या समाजातल्या स्त्री-पुरुषांतही, आर्थिक जबाबदारीतले हे पूर्वापारचे भेद दिसतात.
मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, ह्या सार्वत्रिक कर्म-भेदामुळे, ‘सहकारातून उद्धार’ ह्या धोरणामुळे, एकूणच कुटुंबाचे  हित साधले जाते. शिकारीचा माग काढणे आणि शिकार करणे हे पुरुषांचेच काम. एक तर त्यांना लेकरे अंगावर पाजायची नसतात आणि बायकांपेक्षा ते अधिक तगडे असतात. बायका मुलांना मांस मिळावे म्हणून पुरुष शिकार करतात असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात.



आधुनिक उद्यमशील समाजातही अशीच काहीशी रचना आहे. आजही पुरुषांपेक्षा बायकाच मुलांसाठी अधिक वेळ देतात. पुरुष आता शिकार करत नाहीत, पण नोकऱ्या करून दिडक्या कमावतात (अमेरिकेत तर बऱ्याच बायकाही कमावतात) आणि बायकामुलांना अन्न-पाणी पुरवतात. घरातला ‘कर्ता पुरुष’ ह्या संज्ञेला असा प्राचीन अर्थ आहे.
पुरुषांनी शिकार घरी आणणे, हे ही खास मानवी वैशिष्ठ्य. लांडगे,आफ्रिकेतील शिकारी कुत्रे अशा इतर मोजक्याच सस्तन प्रजातीत हे आढळून येते. ह्याचा संबंध मनुष्य आणि इतर सस्तन प्राण्यातील भेद ठळकपणे दर्शवणाऱ्या, इतर काही सार्वत्रिक घटकांशी आहे. समागमानंतर माणसे जोडीने रहातात आणि बाल्यावस्थेत बराच काळ माणसाच्या पिल्लांना आपापले अन्न मिळवता येत नाही, हे घटक विशेष महत्वाचे.  (कपिंच्या (Apes) पिल्लांना हे सहज जमते)
पुरुष शिकार करतात ते कुटुंब निर्वाहासाठी, हा सिद्धांत इतका स्वाभाविक वाटतो की त्याची सत्यता गृहीतच धरली जाते. खरेच जर असे असेल तर, यातून पुरुषांच्या शिकारीबाबत दोन भाकिते वर्तवता येतात. पहिले : जर शिकारीचा प्रधान हेतू  कुटुंबासाठी मांस मिळवणे हा आहे, तर अधिकाधिक मोठी शिकार मिळवण्याची व्यूहरचना हवी. म्हणजेच किरकोळ शिकारीच्या मागे लागण्याऐवजी, मोठी शिकार मिळवून, दरदिवशी अधिकाधिक मांस पदरी पडते आहे असे दिसायला हवे. दुसरे : शिकार ही घरी आणली जायला हवी. परक्यांपेक्षा  निदान बायका-मुलांना त्यात भक्कम वाट मिळायला हवा. ही भाकिते प्रत्यक्ष निरीक्षणाशी जुळतात का?
.....



आश्चर्य म्हणजे मानववंशशास्त्राच्या इतक्या प्राथमिक गृहितकावर आधारित भाकीते, आजवर फारशी तपासली गेली नव्हती. शेवटी एका स्त्रीने हे संशोधन करायचे मनावर घेतले यात आश्चर्य ते कसले. उटाह विद्यापीठातील ख्रिस्तीन हॉकेस ह्या विदुषीने (आणि किम हिल, ए. माग्दालेना हुर्टाडो आणि एच. काप्लन ह्यांनी), उत्तर पराग्वेतील आशे इंडिअन टोळ्या दिवसभरात किती कॅलरी अन्न मिळवतात,  हे  मोजले. टांझानियातील हाझ्दा जमातीवरही तिनी (निकोलास बर्टन जोन्स आणि जेम्स ओकोनेल यांच्या सहाय्याने) संशोधन केले. आधी आपण आशे इंडियन बाबतचे निष्कर्ष पाहू.
उत्तरेतील आशे जमाती ह्या कंद-मुळे गोळा करूनच गुजराण करत असत. अगदी १९७०च्या सुमारास मिशनऱ्यांच्या शेती वसाहतीत स्थायिक होऊनही, त्यांचा बराचसा वेळ हा भटकंतीत जायचा. इतर मानवी टोळ्यांप्रमाणेच आशे पुरुष, रानडुक्कराच्या, हरीणाच्या, अशा मोठया शिकारीत पटाईत. पोळी काढून मध गोळा करण्यातही तरबेज. बायकांची कामे म्हणजे ताड (Palm) कुटून  स्टार्च काढणे, फळे, कीटक आणि अळ्या गोळा करणे आणि मुले सांभाळणे. आशे पुरुषाच्या



पोतडीत रोज वेगवेगळे अन्नपदार्थ आढळतात. रानडुक्कर मिळाला, मधाचे पोळे मिळाले तर सगळ्यांना पुरून उरते, पण एक चतुर्थांश वेळा पुरुषांना काहीच मिळत नाही, रिक्त हस्ते परत यावे लागते. याउलट महिलांची आवक मात्र नियमित आणि रोज साधारण सारखीच  असते. ताड सगळीकडे असतातच, तेंव्हा स्टार्च किती निघते हे ती बाई किती वेळ कुटते यावर अवलंबून असते. तिच्या आणि तिच्या मुलाबाळांपुरते तर तिला नक्कीच मिळते. पण सगळ्यांना पुरून उरेल एवढे नक्कीच नाही.
हॉकेस आणि सहकार्यांना पहिला धक्का होता तो स्त्री-पुरुषांच्या आमदनीतील तफावतीचा. अर्थातच स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच बक्कळ मिळायचे. नशिबात रानडुक्कर असेल तर झटक्यात ४०,००० कॅलेरीज घरी यायच्या. पण पुरुषाची सरासरी कमाई (९६३४ कॅलेरीज) ही बाईपेक्षा (१०३५६ कॅलेरीज) कमीच असायची. ह्या विरोधभासाचे कारण हे, की डुकराची शिकार मिळण्याचा एखादाच भाग्यशाली दिवस, इतर बहुतेक दिवशी मान खाली घालून, हात हलवतच परतायचे.
म्हणजेच आशे जमातीच्या मर्दांनी, शिकारीचा बेभान पाठलाग सोडून कुटण्याच्या बायकी कामात लक्ष घातले तर ते अंतिमतः हिताचे झाले असते. पुरुष महिलांपेक्षा अधिक बलवान असल्याने, त्यांनी ठरवले तर  रोज महिलांपेक्षा जास्त कुटणे होईल, जास्त स्टार्च मिळेल, जास्त कॅलऱ्या मिळतील. भरघोस मिळेल ह्या आशेवर बेभरवशाच्या शिकारीच्या मागे लागणारे आशे पुरुष, म्हणजे जॅकपॉटच्या आशेने खेळणाऱ्या जुगाऱ्यांसारखे. जुगाऱ्यांनी पैसे बँकेत ठेवले तर त्यावर, शिकारीतला ‘मझा’ वगळून, निश्चित दराने व्याज मिळेलच की.



दुसरे आश्चर्य असे की, आशे पुरुष बायकामुलांसाठी शिकार घरी आणत नाहीत, तर आसपास जे कुणी असतील त्यांच्याशी वाटून खातात. मध सापडला तरी हीच पद्धत असते. असे वाटून खाण्याच्या पद्धतीमुळे, अन्नाचा फक्त पाव हिस्साच आशे कुटुंबांनी स्वतः कमावलेला असतो.
आशे बायका शिकार का करत नाहीत, हे समजणे सोपे आहे. तितका वेळ ती मुलाबाळांपासून दूर राहू शकत नाही आणि दिवसच्या दिवस  उपास घडूनही चालणार नाही. गर्भारपण, स्तनपान ह्या सगळ्याला उपास बाधक. पण पुरुष स्टार्च कुटणे सोडून, सरासरी कमी कमाई देणाऱ्या शिकारीमागे का धावतो? पारंपारिक मानववंशशास्त्र सांगते, तसे तो शिकार थेट घरी का आणत नाही?
या विरोधभासाचा अर्थ असा की आशे पुरुष  मृगयेच्या मृगजळामागे धावतो, त्यात बायकापोरांचे कल्याण, यापलीकडे काही  हेतू आहे. ख्रिस्तीन हॉकेस स्वतः मला हे अंतर्विरोध समजावून देत होत्या. पुरुषाच्या ‘कर्ते’पणामागचे त्या सांगत होत्या ते करकरीत सत्य, फारसे गोंडस नाही हे माझ्या लक्षात आले. माझ्या अंगावर काटाच आला. ह्या सत्यदर्शनाने मी भांबावलो. माझ्या नरबांधवांच्या वतीने भांडावे असे मला वाटू लागले. नर वर्तनाची थोरवी माझ्याच मनात पुनःश्च ठसावी, म्हणून मी युक्तिवाद शोधू लागलो.




माझी पहिली हरकत होती, की शिकारीची मोजदाद कॅलरीच्या भाषेत केली गेली होती. विचक्षण वाचकांना माहित असेल की सर्वच कॅलरी समान नसतात. शिकारीतून पोषणदृष्टया बहुमूल्य अशी प्रथिने (Proteins) मिळतात आणि स्टार्चमधून फक्त  किरकोळ कर्बोदके (Carbohyadrates). तेंव्हा शिकारीमधे ही प्रथिनांची गरज भागवणे हा प्रधान फायदा असू शकेल. पण आशे पुरुष काही फक्त प्रथिनपुष्ट शिकारच करतो असे नाही, तो मधही गोळा करतो आणि मधातली कर्बोदकेही स्टार्चमधील कर्बोदकांसारखीच किरकोळ असतात. कलहारीतील सॅन पुरुष (बुशमेन) शिकारीला जातात, तेंव्हा त्यांच्या बायका मोन्गोन्गोच्या बिया गोळा करतात. ह्या बियांत तर केवढी तरी प्रथिने असतात. न्यू गिनीतील भटक्या जमातीतील पुरुष, जेंव्हा कांगारूच्या निष्फळ शोधात दिवस-दिवस वाया घालवतात, तेंव्हा त्यांची बायका-मुले, मासे, उंदीर, किडे आणि कोळी पकडून खात्रीची आणि भरपूर प्रथिने मिळवतच असतात. मग सॅन आणि न्यू गीनियन पुरुष त्यांच्या बायकांचेच अनुकरण का करत नाहीत?
नंतर मला वाटायला लागले, की आशे पुरुष शिकारीत पटाईत नसावेत. आजच्या भटक्यांशी विसंगतच हे. तुम्ही एस्किमो किंवा आर्क्टिक प्रदेशातील रेड इंडियन असाल, तर शिकारीत तरबेज असणे अपरिहार्य आहे. शिकार केल्याशिवाय हिवाळ्यात काहीही खायला मिळत नाही. टांझानियातल्या हाझ्दा जमातीतले पुरुष छाटछुट शिकार करण्यापेक्षा मोठ्ठे प्राणी मारतात आणि  आशेंपेक्षा त्यांना बरीच जास्त शिकार मिळते. पण  आशे पुरुष फारसे काही गवसत नसूनही शिकारीच्या मागे लागतो. हाझ्दा तर प्राण पणाला लावून शिकार करतात. एकोणतीसपैकी अठ्ठावीस दिवस त्यांना काहीच हाती लागत नाही. बाप जिराफ आणेल ह्या आशेवर रहाणाऱ्या



हाझ्दा कुटुंबाला उपाशीच रहावे लागेल. तसेही, आशे किंवा हाझ्दा शिकाऱ्याला अधूनमधून मिळणारी मोठी शिकार, ही केवळ कुटुंबासाठी नसते. त्यामुळे मोठया शिकारीपेक्षा इतर मार्ग लाभदायी आहेत वा नाहीत, ही चर्चा त्यांच्यालेखी फक्त पुस्तकी चर्चा. मोठ्ठी शिकार हा उदरनिर्वाहाचा सर्वोत्तम मार्ग नाही एवढे खरे.
अजूनही पुरुषांची बाजू लढवायची म्हणून मी विचार केला... शिकार आणि मध वाटून खाण्यामागे, ‘उपकार आणि परतफेड’ असे काही गणित असेल का? म्हणजे असे, की मला जिराफ दर एकोणतीस दिवसात एकदाच मिळतो. इतर शिकारी मित्रांनाही अशीच शिकार मिळते. मग  रोज सारेजण भिन्न दिशांना माग काढत गेलो तर प्रत्येकाला वेगळ्या दिवशी जिराफ मिळेल, अशीच शक्यता जास्त. जेंव्हा ज्याला मिळेल, तेंव्हा त्याने सर्वांबरोबर वाटून खाल्ले तर सगळ्यांना रोजच भरपेट मिळेल. ह्याच तर्काने, शिकाऱ्यांनी आपली शिकार इतर निष्णात शिकाऱ्यांशी वाटून खाल्ली तर पुढे केंव्हातरी परतफेड होण्याची शक्यता वाढते.
प्रत्यक्षात मात्र आशे किंवा हाझ्दा लोकं आपली शिकार सर्वांशी वाटून खातात, चांगले शिकारी, वाईट शिकारी, सगळ्यांशीच. शिवाय सगळ्यांच्यातला वाटा जर मिळणारच आहे तर आपण शिकार कराच कशाला; असा आप्पलपोटा विचार आशे किंवा हाझ्दा लोक का करत नाहीत? इतर कुणालाही वाटा न देता कंद-मुळे आणि उंदीर पकडून कुटुंबाचे भागत असेल तर तसेच का करू नये? शिकार करण्यातला पुरुषांचा  काही उदात्त हेतू शोधण्याच्या नादात काही हीन हेतू माझ्या नजरेतून सुटत होता.



आणखी एक संभाव्य उदात्त हेतू म्हणजे मांस सर्वात वाटून खाल्यामुळे साऱ्या टोळीचेच भले होते; किंवा काय जे भले बुरे व्हायचे, ते साऱ्यांचे एकसाथ होते. बाहेरच्या टोळीचा हल्ला परतवायला सारी टोळीच खातीपिती हवी, फक्त आपलेच  कुटुंब धष्टपुष्ट असून उपयोग नाही. पण हा हेतू ग्राह्य मानला, म्हणजे आपण पुन्हा पहिल्या विसंगतीशी आलो. सर्व टोळीला सुपोषित ठेवण्याचा खात्रीचा मार्ग, म्हणजे सर्वांनीच गपगुमान ताड कुटून स्टार्च काढणे आणि फळे, कंद-मुळे, किडे, गोळा करणे. उगीच पुरुषांनी रानडुक्कराची आस धरून वेळ वाया घालवण्यात काय हशील?
पुरुषांच्या शिकार करण्यामागे काही कौटुंबिक मूल्य शोधण्याचा शेवटचा प्रयत्न, म्हणून मी कुटुंबरक्षक म्हणून पुरुषांच्या भुमिकेबाबत विचार करू लागलो. आपापल्या परीसरावर मालकी हक्क सांगणाऱ्या अनेक प्रजातीतील नर, उदाः गाणारे पक्षी, सिंह, चिंपांझी, इ. सतत सीमेवर गस्त घालत असतात. ह्या टेहळणीचे अनेक उपयोग होतात. आसपासच्या घुसखोर, आगंतुक नरांना हुसकावून लावणे, आपण घुसखोरी करायची संधी जोखणे, मादी-पिल्लांवर हल्ला करण्यास कोणी भक्षक येत नाही ना, याची खबरबात ठेवणे आणि बदलत्या ऋतूनुसार अन्न-पाण्याची तजवीज पहाणे. पुरुषही शिकारीला जातो तेंव्हा टोळीसाठी संभाव्य धोके आणि घबाडयोग यावर लक्ष ठेऊन असतो. शिकार करता करता लढायचे प्रशिक्षण मिळत असते. टोळीच्या रक्षणार्थ लढायची तयारी होत असते.



शिकारीचा हा लाभ अत्यंत महत्वाचा आहे. पण प्रश्न असा आहे की हे शिकारी नेमकी कोणती संकटे ओळखू पहात आहेत आणि ह्यातून कोणाचा फायदा आहे? सिंह वगैरे मोठ्या मांसाहारी प्राण्यांचा धोका काही ठिकाणच्या जमातींना आहे. पण भटक्या, शिकारी जमातींचा, सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे इतर माणसांच्या टोळ्या. टोळी युद्धे आणि त्यातील नरसंहार नित्याचाच. कैदी बायका-मुलांची कत्तल केली जाणार किंवा बायका जनान्यात आणि मुले गुलाम म्हणून कामाला जुंपली जाणार. सीमांवर गस्त घालणारे हे पुरुष  इतर टोळ्यांतल्या पुरुषांशी स्पर्धा करत स्वतःचे संकुचित जनुकीय हितसंबंध जपत असतात, असा हेत्वारोप करता येईल... किंवा अन्य टोळ्यांतल्या पुरुषांपासून, ते आपल्या बायका मुलांचे संरक्षण करतात, असा विशाल दृष्टीकोन ठेवता येईल. पण असा विशाल दृष्टीकोन ठेऊनही पुरुषांच्या टेहेळणीमुळे टोळीला होणारा फायदा-तोटा समसमानच ठरेल.
....



येणेप्रमाणे, शिकार म्हणजे आशे इंडियन पुरुषांनी बायकामुलांच्या उत्कर्षासाठी पत्करलेला शहाणपणाचा मार्ग आहे, असा काही उदात्त हेतू शोधण्याचे माझे पाचही प्रयत्न, विफल झाले. वास्तविक शिकारीत बायका मुलांचे नाही, तर आशे पुरुषांचे स्वतःचे हित साधले जात असते, हे अप्रिय सत्य ख्रिस्तीन हॉकेस मला नजर करत्या झाल्या. शिकारीने उदरभरण तर होतेच पण इतरही अनेक कारणाने  शिकारीत फायदा पुरुषाचाच.
आशे जमातीत, इतर टोळ्यांप्रमाणेच, विवाहबाह्य संबंध हे काही दुर्मिळ नाहीत. काही आशे स्त्रियांना, ‘तुमच्या मुलाचा संभाव्य पिता कोण?’ (दिवस राहिले त्या वेळचा जोडीदार) असे विचारताच, एकूण ६६ मुलांच्या आयांनी, मुलामागे सरासरी २.१ पुरुषांचे नाव घेतले. अठ्ठावीस आशे पुरुषांपैकी, शेळपट शिकाऱ्यापेक्षा तरबेज शिकाऱ्याचे नाव, बायकांनी ‘सखा’ म्हणून अधिक वेळा घेतलेच, पण संभाव्य ‘पिता’ म्हणूनही अधिक वेळा घेतले.
व्यभिचाराचा जीवशास्त्रीय अन्वयार्थ लक्षात येण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांचे हितसंबंध हे मूलतः परस्पर तारक नसून, मारक आहेत हे  प्रजनन सत्य आणि तथ्य लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या प्रकरणात आपण हे विस्ताराने पहिले आहे. अनेक जोडीदार असण्याने स्त्रीला प्रजननदृष्टया कोणताही थेट फायदा होत नाही. एकदा एकाशी संबंध राहून पोटुशी राहिल्यावर, इतर पुरुषांची संबंध ठेवल्याने निदान नऊ महिने तरी दुसरे अपत्य होत नाही. भटक्या समाजात तर पुढे कित्येक वर्षे स्तनपान चालू असते आणि मूल रहात नाही. पण किंचित काळ जरी व्यभिचार आचरला, तर एरवी एकनिष्ठ  पुरुषाला दुप्पट संतती होणार असते.
म्हणजेच हॉकेस बाईंच्या मते पुरुषांच्या शिकारीच्या दोन तऱ्हा असतात. दोन्ही प्रकारानुसार प्रजनन लाभाची तुलना करून पाहू. एक आहे खाऊपिऊ तऱ्हा (Provider Strategy) आणि दुसरी आहे भावखाऊ तऱ्हा (Show Off Strategy). खाऊपिऊवाले  खाऊनपिऊन सुखी असतात. स्टार्च, उंदीर अशी त्यांची खात्रीची पण मध्यम कमाई असते.  भावखाऊवाले मोठया शिकारीच्या मागे असतात. बरेचदा ते हात हलवत परत येतात. त्यांना अधूनमधून शिकार मिळते, पण एकुणात खाऊपिऊवाल्यांपेक्षा ह्यांची सरासरी कमी भरते. खाऊपिऊवाले, बायकामुलांना पुरेल एवढे आणतात पण इतरांना देण्यासाठी, जास्तीचे त्यांच्याकडे कधीच काही नसते. भावखाऊवाले, रोज जरी पुरेसे कमवत नसले, तरी अधून मधून त्यांच्या घरी, इतरांनाही पुरून उरेल, इतके रग्गड मांस असते.
समजा स्त्रीने आपले जनुकीय हितसंबंध, आपण किती मुलांना लहानाचे मोठे करू शकतो यावर बेतले, तर अर्थातच मुलांना नीट खाऊपिऊ घालण्याने हे साध्य होईल. अशा गृह्स्वमिनीला खाऊपिऊ  तऱ्हेचा नवरा शोभेल. पण शेजारी म्हणून हिला भावखाऊ असेल तर उत्तम. शरीरसंगाच्या बदल्यात तो अधूनमधून शिकारीतला वाटा देईल. हिला आणि हिच्या मुलांना चार चांगले घास मिळतील. टोळीतही भावखाऊ सगळ्यांना प्रिय; कारण वेळोवेळी शिकारीचा खाना-खजाना तो टोळीसाठी जिंकून आणत असतो.
आपले जनुकीय भले साधण्यात भावखाऊ पुरुषाला फायदा आणि तोटा दोन्ही असतो. त्याची गुणसूत्रे घेऊन जन्मणारी अनौरस संतती हा मोठाच फायदा. भाऊखाऊला सामाजिक प्रतिष्ठाही लाभते. प्रसंगोपात मांस भक्षणासाठी भावखाऊचा मैत्रलाभ व्हावा ही साऱ्यांचीच इच्छा. प्रसंगी आपल्या मुलीबाळी भावखाऊला नजर करण्यास टोळीतले काही तयार असतात.



भावखाऊच्या मुलांचाही मग टोळीत खास मान राखला जातो. भावखाऊचा तोटा असा, की तो त्याच्या घरी सरासरी कमी अन्न आणतो. यामुळे त्याच्या औरस संततीपैकी कमी मुले जगतात. त्याची पत्नीही त्याच्या अनुपस्थितीत व्यभिचार करू शकते. त्यामुळे तिची मुले ह्याचीच असतील असे नाही. खाऊपिऊला मुले कमी होतात, पण होतात ती स्वतःची, ह्याची खात्री असते. भावखाऊला मुले चिक्कार पण पितृत्वाची खात्री कमी. पितृत्वाच्या खात्रीचा बळी देऊन, खंडीभर पोरांचे पितृत्व पदरी पाडून घेण्यात, भावखाऊचा निश्चित फायदा आहे का?
उत्तर अनेक संख्यांवर अवलंबून आहे. म्हणजे खाऊपिऊवाल्यांच्या बायका अजून किती औरस संतती पोसू शकतात? खाऊपिऊवाल्यांच्या बायकांत अनौरस संततीची टक्केवारी किती? त्यांच्या खाशा स्थानामुळे भावखाऊची किती मुले जास्त तगतात? ही आकडेवारी स्थानिक परिस्थितीनुसार, टोळीगणिक  बदलत रहाणार. जेंव्हा हॉकेस बाईनी आशेंसाठी ही आकडेवारी काढली, तेंव्हा असे दिसून आले की नाना परीच्या संभाव्य परिस्थितीत, खाऊपिऊंपेक्षा  भावखाऊंचे जनुकीय वारस अधिक असतात. म्हणजे शिकारीमागे लागण्यात कुटुंब-निर्वाह हा गौण हेतू असून, जनुक-प्रसार हा प्रधान हेतू आहे असे दिसते. आशे पुरुष शिकार साधतात ती निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी, कुटुंबवात्सल्यामुळे मुळीच नाही.
म्हणजे पुरुषांनी शिकार करणे आणि बायकांनी कंद-मुळे गोळा करणे, ही काही एकत्र कुटुंबाच्या उत्कर्षासाठीची श्रमविभागणी नाही. हे म्हणजे टोळीच्या भल्यासाठी श्रमशक्तीचे जाणते उपयोजनही नाही. उलट भटक्या-शिकारी समाजाची जीवनशैली, म्हणजे नर-मादी हितसंबंधांची नमुनेदार लढाई. दुसऱ्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे, जे पुरुषाच्या जनुकीय हिताचे ते



स्त्रीच्या जनुकीय हिताचे असेलच असे नाही. जोडप्याचा समांतर सामायिक स्वार्थ असतोच पण परस्परांना छेदणारा वैयक्तिक स्वार्थही असू शकतो. खाऊपिऊ तऱ्हेचा नवरा मिळणे हे बायकोसाठी उत्तम, पण खाऊपिऊ तऱ्हेचा नवरा बनणे पुरुषास धार्जिणे नाही.
अलीकडच्या काही दशकातील जीवशास्त्रीय अभ्यासातून, प्राण्यांत आणि माणसांत  असे अनेक तऱ्हेचे आपमतलबी हेवेदावे  लक्षात आले आहेत. पती-पत्नीत (किंवा प्राण्यांच्या कामजोडीदारात) हेवेदावे आहेतच, पण पालक विरुद्ध बालक असेही वैर आहे. गर्भवती विरुद्ध गर्भ अशीही लढाई आहे. भाऊबंदकी आहे, बहीणबंदकी आहे आणि बहीण-भाऊ बंदकीही आहे. पालकांची जनुके बालकात असतात. भावंडातही काही जनुके समान असतात. भावंडे एकमेकांची संभाव्य  (कट्टर) प्रतिस्पर्धी असतात. आईबाप आणि मुलाबाळांतही स्पर्धा असते. पिल्ले वाढवण्यासाठी जन्मदात्यांना  बरेच सायास करावे लागतात आणि बरीच जोखीम पत्करावी लागते. ह्यामुळे लेकुरवाळ्या  प्राण्यांचे आयुर्मान कमी होते, असे अनेक अभ्यासात दिसून आले आहे. जन्मदात्यांच्या दृष्टीने पिल्लू म्हणजे जनुके संक्रमित करण्याची एक संधी. पण जन्मदात्यांना अशी संधी फिरून मिळू शकते. कदाचित एका पिल्लाचा त्याग करून, एकाचेच नीट पालन पोषण करण्यात जन्मदात्यांचा जनुकीय स्वार्थ साधला जाईल.... आणि आई-बापाच्या जीवावर, मिळेल ते मिळवून, तगून रहाण्यात पिल्लाचा स्वार्थ साधला जाईल. माणसाच्या जगाप्रमाणे प्राण्यांच्या जगातही ह्या लढाईत, कधी जनकांकडून भृणहत्या घडते,  कधी पिल्लांकडून जनक-हत्या घडते, तर कधी भावंडे एकमेकांच्या जीवावर उठतात. जनुकशास्त्र, परिसरतील उपलब्ध अन्न, अशी बरीच काही आकडेमोड करून जीवशास्त्रज्ञ ही यादवी समजावून सांगतात. पण कोणतीही आकडेमोड न करता आपल्याला हे अनुभवातून आधीच उमजलेले असते. लग्नाच्या किंवा रक्ताच्या नात्यातले स्वार्थांध वैर, हेच सर्वाधिक शोकांतीकांचे मूळ कारण आहे.
.....



ह्या निष्कर्षांना किती सर्वसमावेशक आणि  ग्राह्य समजायचे? हॉकेस बाईंनी केवळ दोन भटक्या-शिकारी टोळ्यांचा अभ्यास केला होता, आशे आणि हाझ्दा. त्यांचे निष्कर्ष अन्य टोळ्यांशी ताडून बघणे बाकी आहे. तिथे टोळीगणिक किंवा व्यक्तिगणिक, कदाचित वेगळी उत्तरे निघतील. माझ्या न्यू गीनितील अनुभवानुसार, हॉकेस यांचे निष्कर्ष तिथे तर प्रकर्षाने लागू पडतात. न्यू गिनीत मोठे प्राणी फारसे नाहीतच, शिकार जेमतेमच मिळते, बरेचदा रिक्त हस्ते परतावे लागते. बरीचशी शिकार पुरुष जंगलातच खाऊन संपवतात. मोठी शिकार मिळाली तरच घरी आणली जाते आणि ती सर्वांत वाटून खाल्ली जाते. कमाईच्या दृष्टीने न्यू गीनितील शिकार व्यवहार्य नाही, पण शिकाऱ्याला मिळणारा मानमरातब हे खरे बक्षीस.
हॉकेसचे निष्कर्ष आपल्या समाजाला लागू आहेत काय? मी असला काही प्रश्न उपस्थित करणार हे ओळखून कदाचित तुम्हाला आधीच राग आला असेल आणि आता मी अमेरिकी पुरुष बिनकामाचे आहेत असे सांगणार अशीही तुमची अपेक्षा असेल. अर्थातच असा काही माझा निष्कर्ष नाही. बरेच (सगळे? जवळजवळ सगळे?)  अमेरिकन पुरुष अगदी निष्ठावान नवरे आहेत, उत्पन्न वाढावे म्हणून सतत कष्टत असतात, मिळेल ते बायको आणि मुलाबाळांसाठी खर्च करतात, मुलांची काळजी घेतात आणि बाहेरख्यालीपणा करत नाहीत.



पण आशेंच्या अभ्यासातील निष्कर्ष आपल्या समाजातील काही पुरुषांना नक्कीच लागू होतात. काही अमेरिकी पुरुष, बायका मुलांना सोडून देतात. ठरलेली पोटगी देण्यास बरेच टाळाटाळ करतात. इतके, की आता सरकारही ह्या प्रश्नात लक्ष घालते आहे. आता अमेरिकेत पालक-जोड्यांपेक्षा  एकल पालक जास्त आहेत आणि यात बहुसंख्य महिला आहेत.
जे पुरुष लग्नबंधनात आहेत, त्यातही पत्नी आणि मुलांपेक्षा स्वतःची हौसमौज  पुरवणारे आपल्या माहितीत आहेत. बाहेरख्यालीपणात आणि ख्यालीखुशालीवर ते वेळ आणि पैसा उधळतात. गाड्या, खेळ आणि आणि दारू ही अगदी सार्वत्रिक उदाहरणे. फारशी कमाई घरी दिली जात नाही. किती टक्के अमेरिकी पुरुष खाऊपिऊवाले आणि किती भावखाऊवाले असा काही मी अभ्यास केलेला नाही, पण भावखाऊंचे प्रमाण काही नगण्य नाही.
दोघेही नोकरीधंदा करतात अशा घरातही बायका पुरुषांपेक्षा दुप्पट वेळ कष्ट करतात (काम, घरकाम आणि मुले सांभाळणे) आणि तरीही त्याच कामासाठी बायकांना सरासरी कमी मोबदला मिळतो. एकदा अमेरिकी पुरुषांना, ते आणि त्यांची पत्नी घरासाठी आणि मुलांसाठी देत असलेल्या वेळेचा अंदाज करायला सांगितले. पुरुषांचा स्वतःबद्दलचा अंदाज अतिरंजित होता आणि बायकोबद्दलचा अति-संकुचित.  ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया, जर्मनी, फ्रान्स, आणि पोलंड  अशा उद्योगप्रधान देशात पुरुषांचा घरातील सहभाग सरासरीपेक्षा आणखी कमी असेल असा माझा कयास आहे. मला ओळखीचे असलेले हे काही देश, बाकी बरेच आहेत. म्हणूनच ‘पुरुष काय कामाचे?’ हा प्रश्न आपल्या समाजात आणि मानववंशशास्त्रात नेहमीच चर्चिला जातो.

No comments:

Post a Comment