Monday, 26 March 2018

प्रकरण ७ जाहिरातबाजीतील सत्य शरीर संकेतांची उत्क्रांती


प्रकरण ७
जाहिरातबाजीतील सत्य
शरीर संकेतांची उत्क्रांती

जारेड डायमंड यांच्या व्हाय इज सेक्स फन ? या बहारदार पुस्तकाचे तितकेच बहारदार मराठी रुपांतर 


मिस्टर आर्ट आणि मिसेस ज्युडी स्मिथ, हे पतीपत्नी (नावे बदलली आहेत), माझ्या चांगल्या परिचयाचे. नुकतेच त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठ्ठ वादळ येऊन गेले. दोघांचीही बाहेर बरीच लफडी होती, शेवटी लग्न मोडले. काही काळानी मुलांचा वगैरे विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मनातल्या, नात्यातल्या जुन्या जखमा हळूहळू भरून येत होत्या. आता पुन्हा विश्वासघात करायचा नाही असे दोघांनी एकमेकांना वचन दिले होते. पण खोल कुठेतरी संशय आणि कडवटपणा होताच.
ह्याच मनःस्थितीत, कामानिमित्त चार सहा दिवसाच्या दौऱ्यावर असताना, एकदा भल्या सकाळी आर्टने घरी फोन केला. खर्जातल्या पुरुषी आवाजात ‘हॅलो’ ऐकताच आर्टच्या तोंडातून शब्द फुटेना. मनात शंकांचे मोहोळ. (काय बरे असेल? राँग नंबर? आपल्या घरी हा पुरुष कोण?) काय बोलावे हे त्याला कळेना. कसाबसा तो पुटपुटला,
‘मिसेस. स्मिथ आहेत का?’
‘ती वरती बेडरूममध्ये चेंज करत्येय.’ त्याचे रोखठोक उत्तर.
क्षणात आर्टच्या मनात क्षोभ पेटला. त्याचे मन आक्रोश करू लागले, ‘तिच्या भानगडी सुरु झाल्या पुन्हा! माझ्याच बेडमध्ये कुठल्यातरी भडव्याबरोबर झोपली होती!! तो तर फोनही घेतोय बिनधास्त.’ आपण घरी गेलोय, त्या भडव्याचा खून करून ज्युडीचे डोके भिंतीवर आपटतोय, अशी चित्रे त्याच्या नजरेसमोरून झरझर सरकू लागली. अजूनही त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता, कसाबसा त्यानी पुढचा प्रश्न केला,
‘पण... तुम्ही.. कोण?’


पलीकडून आवंढा गिळल्याचा आवाज आला आणि तो आवाज किलबिलला,
‘डॅडी, मला नाही ओळखलेत?’
नुकताच आवाज फुटायला लागलेला, आर्ट आणि ज्युडीचा, तो चौदा वर्षाचा छोकरा होता. आर्ट गलबलला; सुटकेचा सुस्कारा, आनंदकल्लोळ आणि डोळा पाणी, असे सगळे एकदम अनुभवले त्यानी.
आर्टची ही कहाणी ऐकताना माझ्या पुन्हा एकदा लक्षात आले की आपण माणसे, विवेकी विचार करणारी एकमात्र प्रजाती आपली, पण आपण अजूनही जनावरांच्याच उपजत वर्तन सूत्रात गुंतलो आहोत. आवाजाची पट्टी थोडीशी बदलते आणि चार नेहमीचेच शब्द कानावर येतात; पण तत्क्षणी पलीकडून बोलणाऱ्याची ‘कोणीतरी दगाबाज प्रतिस्पर्धी’ अशी प्रतिमा पुसून, ‘निरागस मुलाची’ प्रतिमा उभी रहाते. तत्क्षणी आर्ट खुनशी कोपातून ममताळू बापात बदलतो. एरवी  उथळ, वरवरच्या वाटतील अशा संकेतांनुसार आपल्या मनात टोकाच्या प्रतिमा उभ्या रहातात; पोर वा थोर, कुरूप वा सुस्वरूप, अशक्त वा सशक्त. आर्टच्या कथेत जीवशास्त्रज्ञांना दिसते, ती संकेतांची अफाट क्षमता. संकेत; झटकन काही सुचवून जाईल असा इशारा. एरवी हा इशारा तसा शुल्लक, पण आता त्याला जीवशास्त्रीय बाजाचे, गंभीर आणि गुंतागुंतीचे, अनेक अर्थ  चिकटलेत; जसे की वय, लिंग, कामभावना, कामेच्छा, आक्रमकता किंवा नातेसंबंध. प्राण्यांच्या संवादात संकेत अत्यावश्यक. संवाद ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे वर्तन स्वतःला किंवा परस्परांना अनुकूल व्हावे असा प्रयत्न करतो. किरकोळ शक्ती लागणाऱ्या एका किरकोळ इशाऱ्यासरशी  (घशातून काढलेला गुरगुरण्याचा आवाज) संपूर्ण शक्तिपात घडेल असे वर्तन घडून येऊ शकते (जीवावर उदार होऊन शत्रूवर केलेला जीवघेणा हल्ला).


मानवात आणि अन्य प्राण्यांत संकेत रुजले ते नैसर्गिक निवडीतून. कल्पना करा एकाच प्रजातीचे दोन प्राणी, आकारात समतुल्य आणि बळात तुल्यबळ. एकच काहीतरी गोष्ट दोघांनाही हवी आहे. त्यासाठी दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. आपल्या शक्तीचा अंदाज दुसऱ्याला यावा आणि झुंजीचा निकाल काय लागणार हे आधीच स्पष्ट व्हावे, असे इशारे देणे दोघांनाही फायद्याचे ठरणार आहे. झुंज टाळल्याने जो कमताकद आहे त्याची संभाव्य इजा वा मृत्यूतून सुटका होईल आणि जो ताकदवान आहे त्याची शक्ती वाचेल, जोखीम टळेल.
प्राण्यांत हे संकेत रूजले तरी कसे? उत्क्रांत कसे झाले? त्यांचा नेमका अर्थ काय? संकेत, म्हणजे अगदी वाट्टेल ते इशारे, का ह्यांना काही सखोल अर्थ आहे? ह्यांची  विश्वासार्हता वाढावी, ह्यात फसवणूक नसावी, हे कसे साधले जाते? मानवी शरीर-संकेत, विशेषतः काम-संकेतांचा विचार आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी प्राणीसृष्टीतील संकेतांचा लेखाजोखा मांडू या; कारण  प्राण्यांत जे आणि जसे प्रयोग शक्य आहेत, तसे मानवात नाहीत. प्राणीशास्त्रज्ञांना ह्या संकेतांचे आकलन झाले, ते प्राण्यांवर काही शस्त्रक्रीया करून, शारीरिक बदल घडवून, नियंत्रित चाचण्या केल्यामुळे. अर्थात काही मनुष्ये प्लॅस्टिक सर्जरीने स्वतःत शारीरिक बदल करवून घेतातही, पण ह्याला काही सुनियोजित, सुनियंत्रित चाचणी म्हणता येणार नाही.
.....


प्राणी अनेक माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधतात. आपल्याला अगदी परिचित आहेत ते आवाज. जोडीदाराला घातलेली सुस्वर साद किंवा आपआपले क्षेत्र जाहीर करण्यासाठीचा कर्कश्य कलकलाट किंवा एकमेकाला भक्षकाच्या आगमनाची धोक्याची सूचना. असेच प्राण्यांचे हावभाव, हेही कितीतरी परिचयाचे. श्वानप्रेमींना माहितीच आहे की कान उभारलेला,  शेपूट फेंदारलेला आणि पाठीवरचे केस ताठ उभे असलेला कुत्रा, हल्ला करण्याच्या बेतात असतो आणि कान, शेपूट आणि पाठीवरचे केस पाडून असलेला कुत्रा मवाळ आणि आपले ऐकण्यातला असतो. आपले क्षेत्र आखण्यासाठी अनेक सस्तन प्राणी आपल्या सीमेवर वास सोडतात. (कुत्री खांबापाशी पाय वर करून लघवीचा दर्प तिथे सोडत असतात) आणि मुंग्या अन्नापाशी जाणारा मार्ग वासाने एकमेकीला  आखून देतात. आपल्याला अपरिचित आणि न जाणवणारे असेही काही इशारे आहेत, उदाः काही मासे विद्युत तरंग सोडतात.  
हे सारे इशारे इच्छेनुसार  तात्काळ चालू बंद होणारे, पण शरीररचनेत कायम अथवा बराच काळ  अंतर्भूत झालेले अनेक संकेत, अनेक प्रकारचे संदेश देत असतात. पक्ष्यांच्या पिसाऱ्यात लिंगनिहाय फरक असतो. गोरिला आणि ओरांग-उटांगची डोकी, नर मादीत वेगवेगळ्या आकाराची असतात. चौथ्या प्रकरणात चर्चिल्याप्रमाणे, अनेक प्रायमेटच्या माद्या बीज निर्मितीची जाहिरात म्हणून, लालभडक बूड मिरवतात.  वयात येताच नर गोरिलाच्या पाठीवर सोनेरी केसांची नक्षी उमटते. पक्ष्यांची पिल्ले वयात येण्यापूर्वी काही वेगळीच पिसे बाळगून असतात. हेरिंग-गल पक्ष्यांत तर वयाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी वेगवेगळा आणि चौथ्या वर्षाच्या पुढे आणखी वेगळा पिसारा फुटतो.


प्राण्यांच्या संकेतांचा अभ्यास करायचा तर प्राण्यांत काही बदल करून किंवा वेगवेगळे संकेत देणारी बाहुली बनवून करता येतो. उदाहरणार्थ नरांना वाटणारे मादीचे शारीर आकर्षण, हे मादीच्या विशिष्ठ अवयवांवर केंद्रित असते. माणसात तर असतेच असते, नाही का? जणू ह्याच मुद्दयाचे प्रात्यक्षिक, अशा एका प्रयोगात, लांब शेपटीवाल्या विडोबर्ड नरांच्या शेपट्या आलटूनपालटून लांब आणि लांड्या करण्यात आल्या. ह्या आफ्रिकन पक्ष्यांत म्हणे, नराच्या सुमारे सोळा इंच लांबचलांब शेपटीवर, मादी फिदा होत असते. ज्या नरांची शेपूट कापून सहा इंच करण्यात आली, त्यांना कोणी मादी फुंकून विचारीना आणि पिसे चिकटवून ज्यांची शेपूट सव्वीस इंचापर्यंत वाढवली गेली, त्यांना कोणी मादी मोकळे सोडेना. हेरिंग-गलची नवजात पिल्ले आईबाबांच्या चोचीखालच्या तांबड्या ठिपक्यावर चोच मारतात आणि ह्या इशाऱ्यासरशी ते गल, आपल्या पोटातला घास ओठावर आणून पिल्लांना भरवतात. लाल ठिपक्यावर चोच मारली की पालक घास भरवतात हे ठीकच; पण चोचीच्या आकाराच्या कोणत्याही वस्तूवर लाल ठिपका दिसला रे दिसला, की पिलांना आपोआपच चोच मारायची हुक्की येते, हेही खरे. लाल ठिपकेवाल्या कृत्रिम चोचीला, बिन ठिपकेवाल्या कृत्रिम चोचीपेक्षा चौपट वेळा टिपले जाते. इतर रंगांना लालपेक्षा अर्ध्याच वेळा टिपले जाते. शेवटचे उदाहरण युरोपिअन ग्रेट टिट पक्ष्याचे बघू या. ह्यांच्यात छातीवरचा काळा पट्टा, टीटचे सामाजिक स्थान दर्शवतो. रिमोट कंट्रोलचे टीटचे मॉडेल वापरून अनेक अभ्यास केले गेले. दाणे टिपायला येणारे खरे टिट पक्षी, मॉडेलवरचा पट्टा स्वतःच्या पट्ट्यापेक्षा रुंद असेल तर दबकत, सरळ मागे फिरत.
शेपटीची लांबी, चोचीवरचा रंगाचा ठिपका किंवा काळ्या पट्ट्याची रुंदी अशा काहीच्या काही गोष्टींमुळे वर्तनात इतका टोकाचा फरक पडतो याचे आश्चर्य वाटते आपल्याला. ही अशी वागणूक उत्क्रांत तरी कशी झाली? अगदी ग्रेट टिट सारख्या ग्रेट टिटने, निव्वळ दुसऱ्या पक्ष्याचा रुंद पट्टा पहातच अन्नापासून पळ का काढावा?  
…..


मुळात शेपटीची लांबी, चोचीवरच्या ठिपक्याचा रंग किंवा काळ्या पट्ट्याची रुंदी इतक्या शुल्लक गोष्टींमुळे वर्तनात इतका टोकाचा फरक पडावा ना? अशी प्राणी वैशिष्ठ्ये उत्क्रांतच कशी झाली? एखाद्या टिटसारख्या टिटनी, निव्वळ आपल्यापेक्षा रुंद पट्टेवाला दिसला म्हणून अन्नापासून माघार का घ्यावी? रुंद काळ्या पट्ट्यात असे काय आहे की त्याचा अर्थ  धमक आणि धमकी असा दोन्ही होतो?  असे वाटेल की एखादा कमअस्सल ग्रेट टिट, निव्वळ रुंद पट्ट्याच्या जनुकीय जोरावर फुकट बाजी मारून जाईल की. मग अशी फसगत सार्वत्रिक होऊन ही संकेत चिन्हे अर्थहीन का होत नाहीत?
ह्या प्रश्नांना सध्या एकचएक उत्तर नाही, संकेताप्रमाणे आणि प्रजातीप्रमाणे उत्तरे वेगवेगळी आहेत आणि त्यावर जीवशास्त्रात बरीच भवती न भवती चालू आहे. कामूक शारीरिक संकेतांच्या संदर्भात आपण ह्या प्रश्नांचा विचार करू या. असे संकेत म्हणजे, संभाव्य जोडीदाराला खुणावण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी किंवा संभाव्य स्पर्धकावर छाप पाडण्यासाठी उपयुक्त असे शरीराचे भाग.  हे नर किंवा मादी, कोणा एकाच्याच अंगात असतात. विरुद्ध लिंगी प्राण्यात नसतात. या संकेतांचा उलगडा करू पाहणारे तीन निरनिराळे सिद्धांत आहेत, प्रारूपे (Models) आहेत.


ब्रिटीश जनुकज्ञ सर रोनाल्ड फिशर यांचे आहे ‘चक्रवाढ निवड प्रारूप’ (Runaway Selection Model. यालाच बेलगाम किंवा उत्शृंखल प्रारूप असेही म्हणता येईल). स्त्रिया आणि अन्य प्राण्यांच्या माद्यांपुढे,  जोडीदार म्हणून कोणाला निवडावे हा मोठाच प्रश्न असतो. आपल्या संततीत उत्तम जनुके हवीत तर  नरही तसाच हवा. बायकांना ठाऊक आहे, की हे कर्मकठीण आहे. नराची जनुके कशी आहेत हे जोखण्याचा कोणताही थेट मार्ग उपलब्ध नाही. समजा जगण्याच्या लढाईत इतरांपेक्षा थोडीफार बढत मिळेल, अशा कोणत्यातरी चित्तवेधक शारीर गुणावर (उदाः मोराचा पिसारा) भाळून, त्याच नराची निवड करण्याचे जनुकीय वर्तन (Genetically Programmed) मादीत उत्क्रांत झाले आहे. अशा, मादीला मादक वाटणाऱ्या नरांना, दुहेरी फायदा होईल. त्यांच्याकडे जास्त माद्या आकर्षित होतील आणि त्यांची जनुके अधिक संततीत पोहोचतील. अशा नरांवर लट्टू होणाऱ्या माद्यांचाही फायदा होईल; त्यांच्या मुलग्यांत हा मादी-प्रिय गुण उतरेल. मोठेपणी ह्या मुलांकडेही अधिक माद्या आकर्षित होतील.
अशा तऱ्हेने चक्रवाढ न्यायाने निवड घडत राहील. नरांत तो भाग जितका लक्षवेधक तितकी मादी पटवणे सुकर. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान तो भाग आकाराने वाढत जाईल. दुसरीकडे ह्या भागाने आकर्षित होणाऱ्या माद्यांची संख्याही वाढत जाईल.  पिढ्यांपिढ्या हा भाग आकारानी वाढेल किंवा अधिकाधिक नजरेत भरेल. हे इतक्या टोकाला जाईल की शेवटी त्या भागाचे, जगण्याला पूरक असे मूळ रूप पार लोप पावेल. उदाहरणार्थ किंचित लांब शेपूट असेल तर उड्डाण सोपे होईल. पण मोराच्या लांबच लांब पिसाऱ्याचा उडण्याला उपयोग शून्य. अशी चक्रवाढ उत्क्रांती, (बेलगाम किंवा उत्शृंखल वाढ) शेवटी जेंव्हा ह्या पिसाऱ्याचा, जगायला अडथळा व्हायला लागेल तेंव्हाच थांबेल.



इझ्रायली जीवशास्त्रज्ञ अमोत्झ झाहाव्ही आपल्या सिद्धांतात नेमका हाच मुद्दा पकडतात. बरेचदा हे काम-शकुन सांगणारे भाग इतके अस्ताव्यस्त आणि डोळ्यावर येणारे असतात की जगण्याला तारक ठरण्याऐवजी ते मारक ठरतात. मोराचा पिसारा किंवा विडोबर्डची शेपूट ह्यांचा जगायला तर थेट उपयोग नाहीच उलट अडथळाच जास्त. जड, जाड आणि लांबच लांब पिसाऱ्यामुळे, दाट झाडोऱ्यातून वाट काढणे मुश्कील, उडणे मुश्कील, उड्डाण केलेच तर हवेत तरंगणे मुश्कील आणि भक्षकांपासून सुटणेही मुश्कील.  बॉवर पक्ष्याचा सोनेरी प्रणय-तुरा इतका मोठा, भडक आणि लक्षवेधी असतो की भक्षकांचे लक्ष वेधले जातेच. शिवाय असा तुरा किंवा पिसारा निर्माण करणे महागात पडते, प्राण्याची बरीच उर्जा नाहक खर्च होते. झाहाव्हींच्या मते हे अनावश्यक लोढणे घेऊन बडेजाव मिरवणे ही एका तऱ्हेने, नराने केलेली, जाहिरात आहे. ह्या लोढण्यासकट मी जगतो आहे, ह्या सकट मी तगतो आहे, म्हणजेच माझी जनुके बाकी बाबतीत किती उत्तम असतील ते बघा, असे सांगणे आहे. नराचा हा नखरा बघून मादीला खात्री वाटते, की निव्वळ पिसारे मोठे आणि लक्षण खोटे अशी बनवेगिरी इथे नाही. निव्वळ मोठ्ठ्या पिसाऱ्याच्या जनुकीय वारसा आहे पण प्रत्यक्षात नर  कमअस्सल आहे असा प्रकार नाही. जर मुळात तो अस्सल नसता तर हा पिसारा बनवून, तो बाळगत जगणे त्याला अशक्यच असते.
कित्येकदा माणसाची वागणूकही झाहाव्हींच्या ‘लोढणे सिद्धांताशी’ मिळतीजुळती असते, हे तुमच्या लक्षात आले असेल. ‘मी लय पैशेवाला हाय, माझ्या संगट झोप म्हंज्ये मग लग्नाचं बगू’, अशी ऐट कोणीही मिरवू शकतो. ही बतावणीही असू शकते. पण याबरोबर हिऱ्याच्या अंगठ्या घालणारा, सोन्याच्या साखळ्या मिरवणारा आणि महागड्या गाड्या उडवणारा असेल तर तो खरा. काही कॉलेजकुमार परीक्षेच्या आदल्या रात्री पार्टीत रमतात. त्यांना दाखवायचे असते की, ‘कोणीही पुस्तकी किडा अभ्यास करून मार्क मिळवेल पण पार्टीचे लोढणे गळ्यात घेऊन, अभ्यास न करता, नंबर काढू शकतो, तो मीच.’


काम संकेतांचा उरलेला सिद्धांत मांडला आहे, अॅस्ट्रीक कोड्रिक-ब्राऊन आणि जेम्स ब्राऊन या अमेरिकन शास्त्रज्ञांनी. ह्याचे नाव आहे, ‘प्रामाणिक जाहिरात सिद्धांत’. झाहाव्हीच्या मांडणीप्रमाणे आणि फिशरच्या मांडणी विरुद्ध अशी ब्राऊन द्वयीची मांडणी आहे. प्राण्यांचे महागडे, बडेजावी दिखावे म्हणजे उत्तमाची प्रामणिक जाहिरात असते कारण कोणा ऐऱ्यागैऱ्याला हे परवडणारच नाही, यावर ब्राऊन मंडळींचा जोर आहे. झाहाव्ही हा  बडेजाव जगण्याला अडचणीचा मानतो तर ब्राऊन याला थेट जगण्याला किंवा जगण्यास सहाय्यभूत गुणांना पूरक समजतो. अशी जाहिरात म्हणजे तर दुहेरी खात्री. हा नेत्रदीपक थाटमाट अस्सलांनाच परवडतो आणि हा तुम्हाला अधिक अस्सलही ठरवतो.
नर काळवीटांची शिंगे म्हणजे कॅल्शियम, फॉस्फेट आणि उर्जेची केवढी तरी गुंतवणूक. पण तरीही ही दर मोसमात वाढतात आणि नंतर गळून पडतात. तरुण, धष्टपुष्ट, निरोगी, कळपात वर्चस्व असलेल्या नरोत्तमांनाच ही चैन परवडू शकते. म्हणजेच डौलदार शिंगे ही माद्यांच्या दृष्टीने नर उत्तम असल्याची ग्वाहीच. दरवर्षी, जुनी टाकून, नवी कोरी पोर्श गाडी घेणारा प्रियकर जसा निश्चितच गर्भश्रीमंत,  तसेच हे. पण पोर्श सांगत नाहीत असा एक शकुन ही शिंगे सांगत असतात. पोर्शमुळे भविष्यात समृद्धी वाढेलच असे नाही. पण शिंगे म्हणजे पुढे प्रतिस्पर्धी नरांना हरवून,  भक्षकांना पिटाळून, उत्तम कुरणे चरण्याची खात्री.
......


प्राण्यांच्या प्रणय संकेतांची उत्क्रांती समजावणाऱ्या ह्या तीन सिद्धांतांपैकी मानवी कामाचाराला कोणता लागू होतो का, ते आता तपासून पाहू. पण मुळात मानवी शरीरात असे काही  कामसंकेत आहेत का? परस्परांचे वय, प्रतिष्ठा, पत, जनुकीय प्रतवारी आणि संभाव्य सहचराचे मूल्य जोखण्यासाठी; इकडे लाल ठिपका, तिकडे रुंद पट्टा असले सांकेतिक जनुकीय बिल्ले; हे निर्बुद्ध प्राण्यांनाच गरजेचे आहेत असेच तुम्हाला वाटेल. कोणत्याही प्राण्यापेक्षा आपली तर्कबुद्धी तल्लख, मेंदू मोठ्ठा. त्यातून वाणीच्या अनन्य देणगीमुळे आपण कितीतरी माहिती, कितीतरी नेमकेपणाने एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतो. निव्वळ एकमेकांशी बोलून आपण एकमेकांचे वय आणि पत जाणू शकतो; मग लाल ठिपक्यांची आणि काळ्या पट्ट्यांची गरजच काय? आपले वय २७ असून, आपण  देशातल्या तिसऱ्या नंबरच्या बँकेच्या उपाध्यक्षांचे द्वितीय सचिव आहोत आणि  वर्षाला  सव्वालाख डॉलर पगार आहे, अशी माहिती कोणता प्राणी कोणा अन्य प्राण्याला देतो बरे? आपले प्रियकर आणि सहचर निवडण्यापूर्वी, प्रणयाराधनाच्या काळात परस्परांच्या अनेक परीक्षाच जणू घेतल्या जातात. यातून संभाव्य साथीदाराची पालकत्वातली गती, नात्याबाबतची नीती आणि जनुकेच तर तपासली जातात, नाही का?


उत्तर सरळ आहे! आपणही विडोबर्डच्या शेपटाइतक्या  किंवा बॉवर पक्ष्याच्या तुऱ्याइतक्याच असंबद्ध कामसंकेतांवर विसंबून असतो. चेहरा, वास, केसांचा रंग, दाढी आणि उरोज हे काही मानवी कामसंकेत आहेत. धर्म, अर्थ अन् काम जीवनासाठी, तसेच मुलांचा सहपालक म्हणून जन्मभराचा जोडीदार निवडताना, हे संकेत आपल्याला; लांब शेपटीइतके हास्यास्पद का वाटत नाहीत? आपल्या संकेत-भाषेत फसवणुकीला वावच नाही असे जर आपल्याला वाटत असेल,  तर मग इतकी मंडळी चेहऱ्याला मेकअप, केसांना कलप किंवा स्तनवृद्धी शस्त्रक्रिया का बरे करून घेतात? आपली निवड म्हणे चतुराईची आणि काळजीपूर्वक केलेली असते; मग एखाद्या अनोळखी घोळक्यात शिरताच आपल्याला कोण ‘आकर्षक’ वाटते आणि कोण नाही हे तात्काळ मनात येते; हा अनुभव सार्वत्रिक का? हा असतो सेक्स अपीलचा परिणाम. सेक्स अपील म्हणजे जाणता-अजाणता, अशा सर्व काम संकेतांची गोळाबेरीज. अमेरिकेत आज घटस्फोटाचे प्रमाण ५०% आहे; म्हणजे जोडीदार निवडीचे आपले प्रयत्न निम्म्या वेळा फसतात अशी कबुलीच नाही का? अल्बॅट्रॉस आणि इतर अनेक जोडीने रहाणाऱ्या प्राण्यांत ‘घटस्फोटाचे’ प्रमाण कितीतरी कमी आहे. सुबुद्ध मानवाच्या आणि निर्बुद्ध प्राण्यांच्या बुद्धीचा हा पंचनामा!
खरेतर इतर प्राण्यांप्रमाणे आपणातही वय, लिंग, प्रजनन-पत  आणि आपली प्रत दाखवणारे अनेक काम संकेत उत्क्रांत झाले आहेत. ह्या आणि अशा संकेत-गुणांना ठरीव प्रतिसादही (Programmed Reponses) उत्क्रांत झाले आहेत. काखेत आणि जांघेत केस येणे हा वयात आल्याचा संकेत आहे. पुरुषात दाढी आणि शरीरावर अन्यत्र केस उगवतात, आवाज फुटतो हे इतर गुण दिसतात. ह्या बदलांना आपला प्रतिसाद, हा गलच्या पिल्लाने लाल ठीपक्याला दिलेल्या प्रतिसादाइतकाच, अगदी ठरीव आणि प्रसंगी नाट्यपूर्ण असतो हे ह्या


प्रकरणाच्या सुरवातीच्या प्रसंगात आपण पाहीलेच.  मानवाच्या माद्यांत वयात येताच स्तनाची वाढ होते. जनन शक्य असल्याची ही एक खूणच. पुढे वय वाढले, की उतरत्या प्रजनन शक्तीची आणि वाढत्या शहाणपणाची जाणीव, ही पांढऱ्या केसातून होत असते. सुडौल, प्रमाणबद्ध आणि पिळदार शरीर ही पुरुषाच्या तब्बेतीची खूण तर आवश्यक तिथे आवश्यक गोलाई ही स्त्रीच्या रसरशीतपणाची. वयात आल्याच्या आणि तब्बेतीत असल्याच्या याच खाणाखुणांनी आपण सहचर आणि प्रियकर निवडतो. वेगवेगळ्या समाजात स्त्री-पुरुषांनी ही  संकेत चिन्हे मिरवण्यात आणि स्त्री-पुरुषांच्या आवडीनिवडीत, थोडे कमीअधिक असते एवढेच. उदाहरणार्थ पुरुषांच्या दाढीत आणि  केसाळपणात जगभर फरक आहेत. महिलांच्या स्तनाच्या आकारात, गोलाईत, आणि स्तनाग्राच्या आकारात अन् रंगात भौगोलिक फरक आहेत. हे शरीर-अलंकार म्हणजे आपले लाल ठिपके आणि काळे पट्टेच आहेत. शिवाय स्त्रियांचे स्तन, हे जसे कामचिन्ह आणि दुग्धग्रंथी अशी दुहेरी कामगिरी बजावतात, तसे पुरुषात शिस्नाचे असते काय? आपण हे नंतर पहाणार आहोत.
.....


अशाच खाणाखुणांचा अभ्यास प्राण्यांत करायचा तर प्रयोग योजता येतात. विडोबर्डची शेपूट छाटुन किंवा गलच्या ठिपक्याचा रंग बदलून अभ्यास करता येतो. कायदेशीर  आणि नैतिक बंधनांमुळे माणसात असे प्रयोग शक्य नाहीत. शिवाय या बाबतीतले आपले घट्ट पूर्वग्रह, तीव्र भावना, संस्कृतिक वैविध्य, संस्कारानुरूप बदलणाऱ्या  वैयक्तिक आवडीनिवडी, साजशृंगार, हे सारे मानवी काम संकेतांच्या, वस्तुनिष्ठ मूल्यमापनाच्या आड येते. पण ह्या वैविध्यामुळे, साजशृंगारामुळे, अगदी काटेकोर नसला तरी निश्चितच अभ्यासण्याजोगा असा  प्रयोग आपोआपच घडत असतो. माणसात, पुरुषांचे पिळदार स्नायू, स्त्रीच्या शरीराची गोलाई आणि दोघांच्या चेहऱ्याचे सौंदर्य असे तीन तरी काम संकेत ब्राऊन द्वयीच्या, प्रांजळ जाहिरात सिद्धांताला पुष्टी देतात असे मला वाटते.
पुरुषांच्या पिळदार स्नायुंमुळे स्त्रियावर छाप पडतेच पण इतर पुरुषांवरही पडते. व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूचे, ‘दणकट दंडस्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग’, असे  शरीर काहींना किळसवाणे वाटते. पण एकुणात बायकांना काटकुळ्या पुरुषांपेक्षा घोटीव, सुघटित पुरुष अधिक आकर्षक वाटतात. पुरुषही इतर पुरुषांची शरीरप्रकृती संकेत म्हणून ‘वाचत’ असतात. हातघाईची वेळ आली तर माघार घ्यायची का लढत द्यायची हे ठरवत असतात. मी आणि माझी पत्नी ज्या जिमला जातो तिथे अँडी


म्हणून एक बलदंड आणि धिप्पाड प्रशिक्षक आहे. तो व्यायाम करायला लागला की आपोआप सर्व स्त्री-पुरुषांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. व्यायाम कसा करायचा हे दाखवताना तो स्वतः त्या मशीनवर व्यायाम करून दाखवतो आणि अंगावर हात ठेवायला लावून नेमका कुठला स्नायू हलतोय हे दाखवतो. अर्थात शिकवण्याची ही रीत योग्यच आहे यात शंकाच नाही, पण या कृतीने समोरचा भारावून  जाताच  अँडीला मनातल्या मनात अगदी गुदगुल्या होतात.
जिथे आजही मशीनऐवजी माणूसच सारी कामे करतो अशा समाजात, पिळदार शरीर हे निश्चितच तो पुरुष, पुरुषोत्तम असल्याचा संकेत आहे. काळवीटाच्या शिंगांसारखेच हे. दंडशक्तीचा उपयोग अन्न आणायला होतो, घर बांधायला होतो, शत्रू पळवायला होतो. शिंगे तर फक्त झुंजीत कामी येतात, माणसाचे स्नायू ग्रामीण समाजात तर इतर अनेक भूमिका बजावतात. भरदार शरीर कमावण्यासाठी आणि राखण्यासाठी, लागणारी प्रथिने मिळवायची तर इतरही अनेक सद्गुण असावे लागतात. कलप लावून वगैरे तारुण्याची सगळी सोंगे आणता येतात, पण  दंडा-मांड्यातल्या बेटकुळ्यांचे सोंग आणता येत नाही. अर्थातच अन्य स्त्री-पुरुषांवर छाप पडावी एवढ्याचसाठी पुरुषांत स्नायू उत्क्रांत झालेले नाहीत. बॉवरबर्डचा तुरा हा निव्वळ तिच्यावर इम्प मारण्यासाठी. स्नायूंचे तसे नाही. स्नायू पिळदार बनले ते कष्ट करता यावेत म्हणून. नंतर स्त्रिया त्याकडे एक विश्वासार्ह संकेत म्हणून पहायला शिकल्या किंवा त्या तशा उत्क्रांत झाल्या.


सुंदर चेहरा हाही असाच एक विश्वासार्ह संकेत. शरीरसंपदेप्रमाणे ह्या मागचे कारण मात्र तितकेसे सरळ नाही. जरा विचार केलात, तर आपला लैंगिक आप्त-भाव आणि सामाजिक मैत्र-भाव आपल्या दिसण्यावर किती प्रचंड प्रमाणात अवलंबून आहे, हे पाहून तुम्हाला अचंबा वाटेल. कुणी म्हणेल सौंदर्याचा आणि उत्तम जनुकांचा, उत्तम पालक असण्याचा किंवा उत्तम शिकारी असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. चेहरा हा आरोग्याचा आणि वयाचा आरसा आहे. जुन्या जमान्यात, विद्रूप, वेडावाकडा चेहरा म्हणजे, कसल्या ना  कसल्या जंतूंची किंवा जंतांची बाधा असल्याचा, स्वतःला सांभाळण्याचीही कुवत नसल्याचा, सार्वत्रिक बोभाटाच. विसाव्या शतकात प्लॅस्टिक सर्जरीचा शोध लागेपर्यंत, देखणा चेहरा हा खरोखरच उत्तम आरोग्याचा प्रांजळ संकेत होता. देखणे जे चेहरे ते प्रांजळाचे आरसे अशीच परिस्थिती होती.
खऱ्याखुऱ्या संकेतांपैकी आता राहिला स्त्री शरीराचा टंच उभार, चरबीमुळे आलेली शरीराची गोलाई. स्तनपान आणि बालसंगोपन हा अगदी शक्तिपात घडवणारा प्रकार असतो आणि आई कुपोषित असेल तर दुध आटते. पूर्वी, दुध पावडरी आणि पाळीव दुभती जनावरे नव्हती तेंव्हा, आईचे दुध आटले तर ते पोर मेलेच म्हणायचे. म्हणूनच अंगाने भरलेली बाई, म्हणजे पुरुषाच्या दृष्टीने पोरे पोसण्याची रास्त खात्री. म्हणजेच योग्य तेवढ्याच चरबीची बाई पुरुषांनी निवडली पाहिजे. खूप बारीक असेल तर दुध आटणार आणि खूप जाड असेल तर हलायला त्रास, अन्न गोळा करायला त्रास आणि डायबेटीस वगैरेनी अपमृत्यू.


शरीरात सगळीकडे समप्रमाणात पसरलेली असेल तर चरबी किती आहे हे कळणे अवघड, म्हणूनच सहज नजरेस येतील अशा काही ठिकाणी चरबीचे साठे दिसतात. जमातीगणिक  चरबीचे प्रमाण आणि जागा बदलते पण सर्वच मानव जमातीत उरोज आणि नितंबात चरबीचा साठा असतोच असतो. दक्षिण आफ्रिकेतल्या सॅन जमातीत (बुशमेन आणि होटनटोट) आणि अंदमान बेटांवरील स्त्रियांच्या कुल्ल्यांवर जरा जास्तच चरबी असते. (ह्याला म्हणतात Steatopygia). जगभरच्या पुरुषांना स्त्रियांच्या उरोजात, नितंबात (Hips) आणि कुल्ल्यात काम-संकेत दिसत असतो. यातूनच आधुनिक समाजात, कृतक, फसवे संकेत देणाऱ्या स्तनवृद्धी शत्रक्रियेचे पेव फुटले आहे. अर्थात यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो, की काही पुरुष, बाई सुपोषित आहे, खात्यापित्या घरची आहे, असे दर्शवणाऱ्या चरबीला भुलत नाहीत. शिवाय सौंदर्याचे फॅशनी आदर्शही दरवर्षी बदलत असतात, अति-नाजूक ते अति-साजूक असे हेलकावे खात असतात. ते काहीही असले तरी सर्वसाधारण पुरुष कशात रस घेतात हे स्पष्ट आहे.
कल्पना करा की आपणच निर्मिक आहोत, किंवा डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे नैसर्गिक निवड आपणच करत आहोत आणि एक सहज दिसणारा काम-संकेत म्हणून स्त्री-शरीरावर चरबी कुठे असावी हे ठरवण्याची आपल्याला मुभा आहे. हात-पाय सुरवातीलाच बाद, कारण जड हाताने काम अवघड आणि जड पायाने चाल अवघड. म्हणजे हालचालींना अडसर होऊ नये म्हणून धडावरच कुठेतरी चरबी साठवावी लागणार. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणाप्रमाणे तीन जागी (स्तन, नितंब, कुल्ले), कमीअधिक प्रमाणात चरबीचे संकेत-साठे दिसतात. प्रश्न असा पडतो, की ही तीन ठिकाणे, उत्क्रांती दरम्यान सर्वस्वी अपघाताने निवडली गेली


आहेत का? अन्य ठिकाणी, म्हणजे समजा पोटावर किंवा पाठीवर चरबी असलेली लोकं का बरे नाहीत? स्तनांवर किंवा कुल्ल्यांवर चरबी असते, तसे पोटावर चरबीचे दोन गोळे असते तरी हालचालीत काही विशेष फरक पडला नसता. जगभरात स्त्रियांच्या स्तनातच चरबीचे साठे उत्क्रांत झाले आहेत. मग स्तनातील चरबीवरून  बाईच्या स्तनपान क्षमतेबाबत पुरुषाला  थेट संकेत मिळत असावा का? काही शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की गच्च, उभार स्तन हा उत्तम पोषणाचा सत्यवचनी संकेत आहेच  पण दुग्धनिर्मितीक्षमतेचा असत्य संकेतही आहे. असत्य अशासाठी की दूध निर्माण होते ते दुग्धग्रंथीत, चरबीत नाही. ह्याच पद्धतीने असे सुचवण्यात आले आहे की कुल्ल्यांवरील चरबी म्हणजे आरोग्याचा सत्य संकेत आणि ऐसपैस जननमार्ग असल्याचा असत्य संकेत. (असत्य, कारण खरोखरचा  रुंद जननमार्ग म्हणजे निर्धोक, इजारहीत प्रसूती पण मेदयुक्त कुल्ले म्हणजे रुंद जननमार्ग नाही)
.....
स्त्री शरीराच्या निसर्गदत्त काम-अलंकरणाला औत्क्रांतिक महत्व असू शकते, ह्या माझ्या  गृहितकाला इथे अनेक आक्षेप मला अपेक्षित आहेत. कोणी कसाही अर्थ लावला तरी स्त्री आपल्या शरीरावर काम-संकेत धारण करून असते आणि पुरुष त्यात विशेष रस घेतात, हे तर निर्विवाद तथ्य आहे. ह्या बाबतीत माणसाच्या माद्याही


अन्य प्रायमेट माद्यांसारख्याच आहेत. माणसे अनेक नरमाद्यांच्या एकत्रित टोळ्यांत रहातात. माणसासारखीच चिंपांझी, बोनोबो आणि मकाक्वे माकडे टोळीने रहातात. त्यांच्याही माद्या (आणि नर) कामालंकृत असतात. या उलट, गिब्बन माद्या आणि जोडीजोडीनेच नांदणाऱ्या अन्य प्रायमेट माद्यांना, फारसे कामालंकरण नसते किंवा अजिबातच नसते. ह्याचा अर्थ असा की नरासाठी जर माद्यांना आपापसात झगडावे लागत असेल, उदाः टोळीत सदैव नर-माद्या समोरासमोर येणारच, तर आणि फक्त तरच माद्यांत कामालंकरण उत्क्रांत होते. इथे अधिकाधिक आकर्षक बनण्याची, त्यांच्यात सततची औत्क्रांतिक स्पर्धा असते. सतत अशी स्पर्धा करावी लागत नाही, अशा माद्यांत  हे महागडे कामालंकरण अनावश्यक ठरते.
मनुष्यासह बहुतेक प्राणी प्रजातीत नराच्या कामालंकरणाचे औत्क्रांतिक महत्व निर्विवाद आहे, कारण नर हे माद्यांसाठी झगडत असतातच. पण स्त्रियांत पुरुषांसाठी स्पर्धा असते आणि त्यास्तव त्यांच्यात कामालंकरण उत्क्रांत झाले आहे ह्या मांडणीला तज्ञांनी तीन आक्षेप घेतले आहेत. एक : पूर्वीच्या काळात ९५% स्त्रियांचे विवाह झालेले असत. म्हणजेच मागेल तिला वर मिळतो आहे. स्पर्धेचा प्रश्नच नाही. एक महिला शास्त्रज्ञ सांगत होती, ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’, त्यातला प्रकार. प्रत्येक कुरूप बाईला कोणीतरी कुरूप पुरुष भेटतोच.


पण हे म्हणणे अर्धसत्य आहे. सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी नट्टापट्टा आणि सौंदर्यवृद्धी शस्त्रक्रीयेत स्त्रिया किती मनापासून रमतात ते बघा. पुरुषांच्याही जनुकीय गुणसंपदेत, धनसंपदेत आणि पालक कौशल्यात भरपूर  फरक असतो. जरी प्रत्येक बाईला कोणी ना कोणी नवरा मिळतो, तरी चांगला नवरा थोड्याच बायकांना प्राप्त होतो. ह्या थोड्या गुणसंपन्न पुरुषांसाठी स्त्रियांत जोरदार चढाओढ असतेच. काही पुरुष शास्त्रज्ञांना माहीत नसले, तरी प्रत्येक बाईला हे गुज ठाऊक आहे.
दुसरा आक्षेप असा की पूर्वी पुरुषांनाही, कामालंकरण वा अन्य गुण पारखून, बायको निवडण्याची संधी नव्हती. भावकीतले मोठेच लग्न ठरवत असत आणि बरेचदा निवड ही राजकीय लागेबांधे घट्ट करण्याच्या दृष्टीने होत असे. मी काम करतो त्या न्यू गिनीत बाईची किंमत हे तिचे दिसणे, तिचे आरोग्य आणि मातृत्वाच्या तयारीनुसार ठरते. मुलगी कामाकर्षक आहे वा नाही याबाबत मुलाच्या मताला किंमत नसली, तरी जी ज्येष्ठ मंडळी मुलगी पसंत करतात ती स्वतःची मते लक्षात घेतातच. शिवाय ‘बाहेर’ संबंध ठेवताना, त्या स्त्रीचे सौंदर्य लक्षात घेतले जातेच. जिथे पुरुषांना पत्नी निवडण्याचे स्वातंत्र्य नाही अशा समाजात, अनौरस संतती कितीतरी अधिक प्रमाणात दिसते. घटस्फोट अथवा पत्नीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह सर्रास आढळतात. या वेळी मात्र पुरुषांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य असते.


उरलेला आक्षेप असा की सौंदर्याच्या मापदंडांवर संस्कृतीचा प्रभाव असतो. काळानुसार हे बदलत रहातात. शिवाय प्रत्येकाची वैयक्तिक आवडनिवड असतेच. शिडशिडीत बांधा हा आज आदर्श असेल उद्या कदचित नसेल आणि काही पुरुषांना तो कायमच आवडत असेल. पण हा आक्षेप म्हणजे निव्वळ कुरकुर आहे, मूळ निष्कर्ष अबाधित आहे : सर्व ठिकाणच्या, सर्व काळातल्या पुरुषांना सुडौल आणि सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया आवडतात.
.......
पिळदार पुरुष, सुंदर रूप आणि योग्य तिथे टंच असणारी बाई असे मानवी काम-संकेत; ‘कामसंकेत  म्हणजे विश्वासार्ह जाहिरातबाजीच’; ह्या संकल्पनेशी मिळतेजुळते आहेत. पण प्राण्यांच्या बाबतीत आपण बघितले तसे, काही संकेत काही वेगळ्याच संकल्पनांशी जुळतील. उदाहरणार्थ काखेत आणि जांघेत केस उगवणे, हा वयात आल्याचा एक खात्रीचा पण आगापिछा नसलेला संकेत उत्क्रांत झाला आहे. बलदंड शरीर, देखणा चेहरा किंवा गच्च छातीप्रमाणे या केसांत कोणताही खोलवरचा अर्थ दडलेला नाही. केस उगवण्यासाठी शरीराला विशेष तोशीश नाही की तगण्याला किंवा स्तनपानाला त्यांचा काही उपयोग नाही. अन्नाविना तुमचे शरीर तोळामासा होईल, चेहऱ्याची रया जाईल पण शष्प (झाटे) काही


गळून पडणार नाहीत. किरकोळ, कुरूप पुरुष आणि किरकोळ, कुरूप बायकाही काखेत केस बाळगून असतात. दाढी, सर्वांगावर लव आणि खर्जातला आवाज हे  पुरुष वयात आल्याचे संकेत आणि पांढरे केस हा दोघांतही वय गेल्याचा संकेत; ह्यांनाही काही सखोल अर्थ नाही. गलच्या चोचीवरच्या लाल ठिपक्यासारखे आणि प्राण्यांतल्या इतरही अनेक संकेतांसारखे हे मानवी संकेतही, स्वस्त आणि शेंडा-बुडखा नसलेले संकेत. अशा प्रकारे संकेत ठरू शकतील अशा कितीतरी खाणाखुणाची आपण कल्पना करू शकतो.
फिशरच्या  चक्रवाढ निवड प्रारुपाचे किंवा झाहाव्हीच्या  लोढणे प्रारूपाचे उदाहरण ठरेल असा काही मानवी काम संकेत आहे का? वरवर पहाता विडोबर्डच्या सोळा इंची शेपटीसारखा काही अतिरंजित काम संकेत आपण वागवतो आहोत असे आपल्याला वाटणारच नाही. पण विचारांती असा एक अवयव पुरुषांत असतो असे मला वाटते, तो म्हणजे पुरुषाचे लिंग. कोणी म्हणेल, लिंग हा काही कामसंकेत नव्हे तर लिंग म्हणजे केवळ प्रजनन संस्थेचा एक कार्यकुशल भाग आहे. पण हा काही फारसा गंभीर आक्षेप नाही. स्त्रियांचे स्तन कामसंकेत आणि प्रजनन-अवयव, अशा दोन्ही भूमिका पार पाडतच असतात की. आपल्या कपीबांधवांशी आपली तुलना केली, की मानवी  लिंगाची अनावश्यक लांबी लगेच लक्षात येईल. पण ही अनावश्यक लांबी कदाचित एक आवश्यक काम संकेत असू शकेल. गोरिला आणि ओरांग-उटांग माणसाच्या मानानी असतात भले दांडगे पण गोरिलाच्या ताठर शिस्नाची लांबी सव्वा इंच भरते, ओरांगउटांगच्या ताठर लिंगाची लांबी दीड इंच भरते तर माणसाच्या ताठर शिस्नाची लांबी भरते सहा इंच.


ही ज्यादाची वाढ  म्हणजे अनावश्यक चैन म्हणायची काय? एक विरोधी सूर असा की, लांब लिंगाची ही सोय, मानवाच्या अनेकानेक संभोग-आसनांना सोयीची म्हणून झाली असावी. पण  दीड इंचाचेच शिश्न असूनही ओरांग-उटांग  आपल्यापेक्षा कितीतरी किचकट काम-कसरती, चक्क झाडाला लटकत करत असतात. लांब शिश्नामुळे संभोगाचा कालावधी वाढतो म्हणता? ओरांग-उटांग त्याही बाबतीत आपल्या पुढे आहेत. (त्यांचा संभोग सरासरी पंधरा मिनिटे चालतो, अमेरिकी पुरुषाचा सरासरी चार मिनिटे)
नुसत्या औत्क्रांतिक तर्काने संतुष्ट होण्यापेक्षा, पुरुष स्वतःचे लिंग स्वतः कसे सजवतात हे पाहिल्यास, मोठ्ठे लिंग हा काम-संकेत असल्याचा सुगावा लागतो. न्यू गिनीतील पुरुष आपले शिश्न एका सजवलेल्या पिशवीत घालतात. आपण ह्या पिशवीला शिश्न-गवसणी म्हणूया (Phallocarp). लाल भडक किंवा पिवळी धमक अशी ही गवसणी चांगली चार फूट लांब आणि चार इंच रुंद असते. टोकाशी पानाफुलांनी व दागिन्यांनी शृंगारलेली असते. गेल्या वर्षी, स्टार पर्वतावर, केटेंगबान जमातीत, असे गवसणी घातलेले पुरुष मी पहिल्यांदा पहिले. तोवर मी त्यांच्या ह्या प्रथेबद्दल बरेच काही ऐकले होते. गवसणीचा वापर नेमका कसा करतात आणि तिचा उपयोग काय ह्याची मला उत्सुकता होती. हे पुरुष सततच ही गवसणी घालून होते. प्रत्येकाकडे अनेक प्रकारच्या गवसण्या होत्या. आकार वेगळा, सजावट वेगळी आणि लिंगोथ्थानासाठीचा कोन वेगळा. आपल्या मूड प्रमाणे आपण सकाळी


घालयला शर्ट निवडावा, तशी ही मंडळी गवसणी निवडून घालतात. हे का घालता असे विचारताच केटेंगबानचे उत्तर होते, ‘गवसणी नाही घातली तर ते किती उघडेनागडे आणि असभ्य दिसेल’. मी उडालोच. शिश्न-गवसणी वगळता अंगावर चिंधी सुद्धा नव्हती त्यांच्या. अगदी वृषणकोशही बाहेर लोंबत  होते. माझ्या पाश्चिमात्य दृष्टीला गवसणी असूनही ते नागडेच तर दिसत होते.
परिणामी शिश्न-गवसणी म्हणजे आपले ताठर लिंग केवढे असावे ही सुप्त इच्छा  दर्शवणारे एक लटके लिंगच. मानवी लिंगाच्या लांबीच्या उत्क्रांतीला योनीच्या लांबीची मर्यादा होती. शिश्न गवसणी म्हणजे ह्या प्रत्यक्षातल्या मर्यादेवर मात करता आली असती, तर काय झाले असते याची झलक. विडोबर्डच्या शेपटीपेक्षाही हा भडक संकेत. प्रत्यक्षातले लिंग ह्या गवसणीपेक्षा इवलेसेच पण आपल्या कपी पूर्वजांपेक्षा बरेच मोठे. त्यातल्या त्यात चिंपांझीचे शिश्न आपल्याशी मिळतेजुळते,  आपल्यासारखेच वाढत्या मापाने उत्क्रांत पावलेले. शिश्नाची उत्क्रांती फिशरच्या चक्रवाढ प्रारूपाप्रमाणे झाली असावी. आजच्या गोरिला किंवा ओरांग-उटांगप्रमाणेच आपल्या कपी पूर्वजांत, लिंगाची लांबी दीड इंचच असावी. इथून मानवी शिश्नाची बेलगाम वाढ झाली. लांब लिंग हे तो नर, अधिक मर्दानी, अधिक पुरुषी असल्याचा संकेत होता.  शेवटी जेंव्हा अती लांब मापाची लिंगे, योनीला आडमाप ठरू लागली तेंव्हा आपोआपच त्यांची वाढ थांबली.


मानवी शिश्न हे झाहाव्हीच्या लोढणे प्रारुपाचेही उदाहरण ठरावे. लांब लिंग म्हणजे तसा महागडा आणि मालकालाच जरा डोईजड अवयव. मोराच्या पिसाऱ्याच्या मानानी शिश्न अगदीच किरकोळ आहे हे मान्य. पण एवढेच मांस मेंदूसाठी वापरले गेले असते तर ह्या मोठ्या मेंदूवाल्या पुरुषाला कितीतरी फायदे झाले असते. म्हणजे कमावलेल्या मोठ्या शिश्नाची किंमत ही गमावलेल्या मेंदूची किंमत आहे. शेवटी उपलब्ध निर्मितीक्षम उर्जा मर्यादित आहे आणि एक अवयव घडवायचा तर दुसरीकडे काही कमतरता जाणवणार हे उघड आहे. परिणामी पुरुष भाव खात असतो, ‘मी इतका चलाख आणि वरचढ आहे की मला आता आणखी मोठ्या मेंदूची गरज नाही. आता ज्यादाची निर्मिती क्षमता मी लिंगावर उधळू शकतो. असा आतबट्याचा व्यवहार मला परवडतो.’
शिश्नाची ही मर्दानी  फुशारकी कुणासाठी असते या बाबत मात्र मतभेद आहेत. बहुतेक पुरुषांना वाटेल की बायका शिश्नावर भाळतात. पण बायका सांगतात की त्यांना पुरुषांचे बाकी काम-सौष्ठव  कामूक वाटते. लिंगाचे दर्शन तसे अनाकर्षकच असते. शिश्नाच्या आकाराने खरे हरखतात आणि दबकतात ते पुरुषच. पुरुषांच्या सार्वजनिक स्नानगृहात नुसत्या नजरेनेच एकमेकांच्या मापांचा अंदाज लावला जातो.
काही स्त्रियांना मोठ्या आकाराचे  शिश्न बघताच कामोत्तेजना मिळत असेल. किंवा  संभोगाच्या वेळी मोठ्या लिंगामुळे योनीमार्गाचे आणि शिष्निकेचे (Clitoris) सुखद मर्दन होत असेल. पण  तरीही आपल्या युक्तिवादात पुरुष किंवा स्त्री असा एकच पर्याय आहे असे समजायचे कारण नाही. शिश्न-संकेत कोणा एकासाठीच असेल असे नाही.
प्राण्यांच्या अभ्यासात, लैंगिक अलंकरणाला दुहेरी हेतू असल्याचे अनेकवार दिसून आले


आहे. विरुद्धलिंगी जोडीदाराला भुलवणे आणि समलिंगी स्पर्धकांवर वर्चस्व गाजवणे. इतर अनेक बाबींप्रमाणे, ह्या बाबतीतही आपण पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीचा कोट्यानुकोटी वर्षांचा वारसा चालवत आहोत. ही ‘समृद्ध अडगळ’ आपल्या लैंगिकतेत पक्की भिनली आहे. आपली  भाषा,  आपल्या कला आणि आपली संस्कृती ही आपली अगदी अलीकडची झेप. आपल्या भाषेनी, कलेनी आणि संस्कृतीनी ह्या समृद्ध अडगळीवर एक झिरझिरीत पडदा धरला आहे. पण ही समृद्ध अडगळ पूर्णांशाने झाकली गेलेली नाही.
शिश्नाचा आकार ही काम-निशाणी आहे का?, आणि असल्यास ह्या काम-निशाणीचा निशाणा कोण?, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. म्हणूनच या पुस्तकाची सांगता करायला हा विषय मला अगदी यथार्थ वाटतो. मानवी कामाचाराच्या उत्क्रांतीवाचक अभ्यासाचे महत्व, त्यातील मौज आणि खाचखळगे हा पुस्तकातील कळीचा मुद्दा इथे ठळकपणे येतो. शिश्नाचे कार्य हा निव्वळ शरीरशास्त्राशी संबंधित प्रश्न नाही. त्यामुळे द्रव-दाब प्रणालीच्या (Hydrolics) जैव-यांत्रिक (Bio-Mechanical) प्रयोगांनी तो सुटणाराही नाही. शिश्नाचे कार्य हा औत्क्रांतिक प्रश्नही आहे. गेल्या सात ते नऊ कोटी वर्षात मानवी लिंगाची लांबी चौपट वाढली आहे. ह्या वाढीचे काल-सुसंगत आणि कार्य-सुसंगत कारण आपल्याला हवे आहे. फक्त स्त्रियांनाच दुध का येते, बीजधारणा छुपी का, पुरुष काय कामाचे आणि ऋतूसमाप्तीबद्दल उत्तरे शोधताना आपण नैसर्गिक निवडीची किमया पहिली. लिंगाच्या लांबीतली ऐतिहासिक वाढ  आणि एवढे लांबलचक लिंग  आजही टिकणे, ह्यामागे नैसर्गिक निवडीची प्रक्रिया काय हे आपण अभ्यासले पाहिजे.


शिश्न-कार्याने पुस्तकाची अखेर करणे हे उचित आहे ह्याचे आणखी एक कारण म्हणजे शीश्नाच्या कार्यात काही रहस्यमय असेल असे आपल्याला वाटतच नाही. मूत्र-विसर्जन, वीर्य-स्खलन आणि संभोगसमयी योनी-शिश्निका मर्दन ही लिंगाची कामे तर कोणीही सांगेल. पण तौलनिक अभ्यास आपल्याला शिकवतो, की अनेक प्राण्यांत ही सारी कामे आपल्यापेक्षा लहान लिंगे बिनबोभाट करत असतात. लिंगासारखे असे भपकेबाज अवयव विविध कारणाने उत्क्रांत होतात. ही कारणे समजावून घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न जारी आहे. पाहिलत ना, अगदी सुपरिचित आणि  कार्य अगदी उघड असलेला काम-अवयव, उत्क्रांतीवाचक प्रश्नांनी आपल्याला कसा दुग्ध्यात पाडतो ते.

No comments:

Post a Comment