एन्डोमेट्रीऑसीस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई,
जि. सातारा.
ज्यापुढे भले भले हात
टेकतात अशा दुर्घर आजारांपैकी एक म्हणजे एन्डोमेट्रीऑसीस. गर्भपिशवीच्या
अस्तराच्या पेशी भलत्याच ठिकाणी उगवून
येतात. बहुतेकदा ओटीपोटाच्या पोकळीत, गर्भाशयाच्या आसपास, बीजग्रंथींच्या नजीक, फॅलोपिअन
नलिकांजवळ यांचे ‘तण’ दिसते. ‘तण’ अशासाठी म्हटले की भलत्याजागी उगवल्यामुळे ह्या
पेशी भलत्याच उपद्रवी ठरतात. भलत्या जागी, भलत्या पेशी म्हणजे कॅन्सर हा झाला
एरवीचा ठोकताळा. पण एन्डोमेट्रीऑसीस म्हणजे कॅन्सर नाही.
सुमारे पाच टक्के महिलांत
हा प्रकार आढळतो. एकाच घरात जास्त दिसतो. म्हणजे पेशंटच्या आईला/बहिणीला असू शकतो.
ह्याचा त्रास होतो तो पंधरा ते पंचेचाळीशी दरम्यान. पाळी येण्यापूर्वी हा होण्याचा
प्रश्न नाही आणि पाळी गेल्यावर हा आजार शांत होतो. बराच काळ टिकणारा आणि हळूहळू
वाढतच जाणारा असा हा आजार आहे. वेदना आणि वंध्यत्व हे ह्याचे परिणाम.
उद्भव
काय कारणानी हा आजार होतो
हे आपल्याला नेमके माहित नाहीये. पण असे म्हणतात की पाळीच्या वेळी थोडेसे रक्त
नलिकांद्वारे उलटे वहाते आणि ओटीपोटात सांडते. ह्यातल्या काही पेशी तिथेच घर
करतात. तिथेच वाढतात. ह्या मुळात गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी, त्यामुळे स्त्री
हॉर्मोन्सचे सांगावे त्या मुकाट्याने ऐकतात. पाळीच्या वेळी जसा अस्तरातून
रक्तस्राव होतो, तसा ह्या पेशीसमुच्चयातुनही होतो. अर्थात रक्त वाहून जायला वाटच
नसल्याने ते तिथल्या तिथेच रहाते. त्याची बारीकशी गाठ बनते. आधी पुटकुळी एवढी गाठ
येते, मग वाढत जाते. जोंधळ्या एवढी होते.
असे दर महिन्याला होत राहिले की ही गाठ वाढते. चांगली क्रिकेट बॉल
एवढीसुद्धा होते. ह्या गाठीत बरेच दिवस आत साठलेले रक्त असते, त्यामुळे ते चॉकलेटी
रंगाचे बनते. ह्याला म्हणतातच चॉकलेट सिस्ट. ही गाठ चांगलीच दुखते. गाठीचा आकार
लहान असूनही वेदना तीव्र असू शकते आणि कधी कधी मोठ्या गाठीही फारशा दुखत नाहीत.
गाठी भोवती सूज येते, आजूबाजूचे अवयव तिथे येऊन चिकटतात. यात कधी बीजग्रंथी असतात,
कधी नलिका असतात, कधी कधी आतडीसुद्धा असतात. कधी ह्या गाठी संडासच्या पिशवीच्या
आणि योनीमार्गाच्या मधल्या भागात वाढतात. आतड्यांवर वाढतात. विविध अवयव ह्यात
सापडतात म्हणूच तर विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवतात.
कधी गर्भपिशवीतले रक्त
बाहेर पडण्याऐवजी गर्भपिशवीतच खोल खोल बुडी मारते. अस्तराच्या पेशी आता
गर्भाशयाच्या स्नायूत शिरतात. मग इथे बारीक बारीक गाठी निर्माण होतात. त्याच
तिकीटावर तोच खेळ इथेही सुरु होतो. ह्याला खास नाव आहे, अॅडीनोमायोसीस.
तक्रारी
सुरवातीला काहीच तक्रार
उद्भवत नाही. पण ही तर वादळापूर्वीची शांतता. मग पाळीच्या वेळी दुखते. चार दिवस
आधीच दुखायला सुरवात होते. पाळीनंतर सहसा थांबते. पुढे पुढे पाळी येऊन गेली तरी कळ येतच रहाते. वेदना अशी की
ती स्त्री अगदी वैतागून जाते, कळ इतकी की रोजचे जिणे असह्य व्हावे. कधी संबंधाच्या
वेळी इतके दुखते की समागम अशक्य ठरतो. लघवी, संडास असे सारेच वेदनादायी ठरते. कधी
पाळी अनियमित होते, कधी जास्त जायला लागते.
दिवस रहायला खूप वेळ लागतो.
नलिका, बीजग्रंथी असे सारे एकमेकात लपेटले गेलेले असते. बीज वहनाचे काम नलिका करूच
शकत नाहीत. कधी कधी नलिका बंद होऊन जातात. कधी तिथे आतडी येऊन चिकटतात. गर्भपिशवीचे
अस्तरही निट वाढत नाही. अशा अनेक कारणाने
दिवस रहाण्यात अडचणी येतात.
निदान
निदान करणे अवघडच असते.
शारीरिक तपासणीत स्पर्शाला जाणवेल असे काही फार क्वचित आढळते. खूप दुखतय म्हणजे
मोठ्ठी गाठ आणि सौम्य दुखतय म्हणजे लहान गाठ असाही काही प्रकार दिसत नाही. शिवाय
आतड्याच्या इतर काही आजारातही हीच लक्षणे दिसतात, कटी भागात सूज आली तरी हीच
लक्षणे दिसतात. त्यामुळे शारीरिक तपासणीपेक्षाही जास्त भिस्त ही अन्य तपासण्यांवर
असते. सोनोग्राफी ही टेस्ट सोपी आणि स्वस्त. अतीच झाले असेल तर एमआरआय लागतो. मोठी
गाठ असेल तर एवढ्यात दिसते. पण उत्तम टेस्ट म्हणजे लॅपरोस्कोपी (दुर्बिणीतून
तपासणी). ह्यामुळे निदान तर पक्के होतेच पण उपचारही करता येतात. लॅपरोस्कोपीत पोटात
सोडलेल्या छोट्याशा कॅमेऱ्यामुळे आतले सगळे दृश्य पडद्यावर मोठ्ठे दिसते.
छोट्याछोट्या गाठीही स्पष्ट दिसतात. बारीक असतात त्या तिथल्या तिथे ‘लाईट’ने
(कॉटरी) जाळून टाकता येतात. चॉकोलेट सिस्ट फोडून त्यातले द्रावण शोषून स्वच्छ करता
येते. तिथेही आतून डाग देता येतात. आवश्यक तिथे एखादा तुकडा तपासणीला घेता येतो.
जी काही चिकटाचिकटी झालेली असेल ती सोडवता येते. विशेषतः वंध्यत्व हा जर प्रश्न
असेल तर नुसत्या औषधांनी तो सुटत नाही. ऑपरेशनची चांगली मदत होते.
उपचार
वेदनाशमन महत्वाचे.
सुरवातीला गोळ्यांनी बराच फरक पडतो.
मूल नको असेल तर, पाळी
येणारच नाही अशी औषधे ही पुढची पायरी. पाळीबंद म्हणजे रक्तस्राव बंद, म्हणजे वेदना
बंद. पाळी येणार नाही अशा बेताने, सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा सर्वात
स्वस्त पर्याय. इतरही गोळ्या, इंजेक्शने वगैरे आहेत. पाळी न येऊ देणे हा उपचार
आहे. मग हे साध्य होण्यासाठी साधन काहीही वापरा. म्हणजे गोळ्या घेऊन, इंजेक्शने
घेऊन हा परिणाम साधता येतो.
ज्यांना मूल हवय त्यांना
गर्भावस्था हा तर उत्तम उपचार. दिवस राहिले की पाळी बंद झाल्यामुळे हा आजार
थंडावतो. वाढलेले तण, गाठी, आक्रसतात. पुढे पुन्हा पाळी सुरु झाली की पुन्हा
आजाराला सुरवात होते. पण मधे बरेच दिवस सुखाचे जातात.
‘अॅडीनोमायोसीस’साठी एलएनजी
आययुएस नावाची कॉपरटी सदृष ‘गोळी’ मिळते. ही थेट गर्भाशयात बसवता येते. याने
रक्तस्राव कमी होतो आणि कधी कधी पाळीही बंद होते. फक्त प्रोजेस्टेरॉन असलेली
गर्भनिरोधक साधनेही उपयुक्त ठरतात. (गोळ्या इंजेक्शने, इ.)
मुलेबाळे झाली असतील किंवा
आता नको असतील तर गंभीर आजारामध्ये पिशवी, स्त्रीबीजग्रंथी आणि नलिका काढणे हे
ऑपरेशन केले जाते. एन्डोमेट्रीऑसीसचे समूळ उच्चाटन केले जाते. आजूबाजूचे अवयव जर
चिकटलेले असतील तर त्या त्या तज्ञांना देखील यात सहभागी करावे लागते; उदाः
आतड्याचे किंवा मूत्र मार्गाचे सर्जन.
गैरसमज
पाळीच्या वेळी पोटात दुखणे
हे इतके स्वाभाविक समजले जाते की बरेचदा त्याकडे फारश्या गांभीर्याने पहिले जात
नाही. अगदी लहान वयात तर हा प्रकार म्हणजे एन्डोमेट्रीऑसीस असेल अशी शंकाही फारशी
घेतली जात नाही. अती दुखतय म्हणजे ती मुलगीच नाजूक आहे असा समज करून घेतला जातो.
लॅपरोस्कोपी ही निदानाची खात्रीशीर पद्धत पण बरेचदा लहान वयात हे आई वडिलांना
नको वाटते. या भानगडीत तक्रार आणि निदान,
यात सात वर्षाचे अंतर पडते असे एक अभ्यास सांगतो.
एन्डोमेट्रीऑसीस आणि
नैराश्य यांचेही जवळचे नाते आहे. कोणी समदु:खी भेटली की तिच्याशी बोलून बरे वाटते.
आहे त्या परिस्थितीचा धीराने स्वीकार सुलभ होतो. आता इंटरनेटच्या जमान्यात हे सहज
शक्य आहे. पेशंटचे आता स्व-मदत गट असतात.
अशाच एका आंतरराष्ट्रीय मदतगटाची ही लिंक.
भारतातही यांची शाखा आहे. दुर्दैवाने नेटवरची
बहुतेक सगळी माहिती आणि मदत इंग्रजीत आहे पण असो, हे ही नसे थोडके.
No comments:
Post a Comment