Tuesday, 4 December 2018

स्तनपान बालकांचा अग्रहक्क.


स्तनपान बालकांचा अग्रहक्क.
डॉ. शंतनू अभ्यंकर
भारतीय समाजाला स्तनपानाचं महत्व पटवून सांगण्याची काही गरज नाही. अनेक बॉलीवूड स्टारांनी आपपली अतिमानवी करतूद ही, पैदा होतेही मां का दूध पिल्यामुळे असल्याचं साफ सांगून टाकलेलं आहे. ते असो, पण अतिमानवी जरी नाही तरी मानवी शक्ती मात्र आईच्या दुधातून प्राप्त होते यात अजिबात अतिशयोक्ती नाही. बाळाची जोमदार, सुदृढ वाढ, त्याची प्रतिकारशक्ती, त्याची बुद्धी, मानसिक आणि भावनिक वाढ इतकंच नाही तर मोठेपणी उद्भवणारे दमा, अॅलर्जी, रक्तदाब या सारखे आजार हे स्तनपानामुळे होत नाहीत हे ही  आता स्पष्ट आहे.
    तेव्हा स्तनपानाला आणि तेही वरचे काहीही न देता, फक्त आणि फक्त अंगावरचे दूध, जास्तीजास्त काळ देण्याला पर्याय नाही.
स्तनाची रचना
          दूध स्त्रवणाऱ्या पेशींचा समूह, पेशी समूहाभोवती स्नायुंच्या पेशी आणि स्तन्य स्तनाग्रापर्यंत आणणाऱ्या १५ ते २० वाहिन्या अशी स्तनाची रचना असते. अगदी स्तनाग्रापर्यंत पोहचण्यापूर्वी या दुग्धवाहिन्या जरा फुगीर बनतात. स्तनाग्राच्या काळ्या भागाखाली हा फुगीर भाग असतो. स्तनाग्रात आणि त्याभोवतीच्या काळ्या भागात भरपूर नसा (Nerves) असतात. त्यामुळे स्तनाग्राला झालेल्या हलक्याश्या स्पर्शाचीही आपल्याला जाणीव होते. स्तनाग्राभोवती बारीक ‘पुरळ’ आलेलं असते. हे ‘पुरळ’ म्हणजे तेल स्त्रवणाऱ्या ग्रंथी होत. यामुळे स्तनाग्र मऊ आणि लवचिक राहतात.
          ही दुग्धनिर्मिती व्यवस्था सर्व स्त्रियांमध्ये सारख्याच प्रमाणात असते. स्तनांचा आकार कमी जास्त असतो, तो यांच्यामधील मेदाच्या प्रमाणामुळे. म्हणजेच स्तनांच्या आकार-उकाराचा आणि यशस्वी स्तनपानाचा अर्थाअर्थी संबंध नाही.
          स्तनपानाच्या क्रियेमुळे मातेच्या शरीरात प्रोलॅक्टीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. बाळ लुचू लागले की, स्तनाग्रापासून मेंदूला प्रोलॅक्टीन सोडण्याबद्दल संदेश जातात आणि मग मेंदूच्या तळाशी असलेल्या पिट्युटरी ग्रंथीतून हे झरू लागते. बाळांनी पिवून पिवून स्तन रिक्त झाले किंवा रात्री-अपरात्री बाळाला पाजलं की प्रोलॅक्टीन आणखी जोरात येतं. दिवसभरात कितीदा आणि किती जोशात बाळ पितं यावर दूध तयार होणं अवलंबून असतं. म्हणूनच कुणाला जुळी असतील तर आपोआपच बराच वेळ आणि दिवसरात्र पाजत रहावं लागतं; आणि दोन्ही बाळांना पुरेल एवढं दुध निश्चित तयार होतं. भरपूर दूध येण्यासाठी बाळाला अधिक वेळा, अधिक काळ आणि विशेषतः रात्री अंगावर घेणं आवश्यक आहे. दूध पिळून काढलं तरी प्रोलॅक्टीनचा प्रवाह वाढू लागतो. (म्हणूनच अंगावरचं दूध बंद करायचं असेल तर दूध पिळून काढून ते ‘संपत’ नाही, उलट जास्त तयार होतं. बाळाला न पाजणे हाच त्यावर उपाय.)
          बाळाला वरचं काहीही दिलं (अगदी एखादा-दुसऱ्यावेळी जरी बाटलीनी पाजलं) तरी बाळ कमी ओढतं आणि प्रोलॅक्टीन कमी होवून दूध आटतं. पाणी, साखरेचे पाणी, मध, कसली कसली चाटणं, काढे, ग्राईप वॉटर, अनेकविध टॉनिके आणि नवजात शिशु आहार वगैरे मुळेही हाच परिणाम होतो. जर काही कारणांनी स्तनांना इजा होवून ते दुखत, ठणकत असतील तरी दूध कमी येतं.
         प्रोलॅक्टीन प्रमाणेच ऑक्सिटोसिन हे संप्रेरकही स्तनपानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. बाळ पिऊ लागताच मेंदूच्या तळातील पिट्युटरी ग्रंथीतून हेही स्त्रवते. ऑक्सिटोसिनमुळे स्तनातील दुग्धपेशीभोवतीच्या स्नायूपेशी आकुंचन पावतात आणि दूध स्तनाग्रातून सहजी बाहेर पडू लागते. यालाच पान्हा फुटणे असं म्हणतात. बाळ पिऊ लागताच स्तनात आवळल्यासारखं होतं आणि पान्हा फुटण्याच्या या प्रक्रियेमुळेच दुध येतं. बाळ पितं ते नुसतं बाळाच्या ओढण्यामुळे नाही तर आईच्या ‘सोडण्यामुळे’ सुध्दा. कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळात बाळाला पूर्ण आहार मिळण्यासाठी या दोन्ही क्रिया आवश्यक आहेत.
        आई जर चिंतीत असेल, तिला लाज वाटत असेल अथवा स्तनपानाबाबत नकारात्मक भावना असेल तर या सोडण्याच्या क्रियेत बाधा येते.
        नीट दुग्धपान करता यावं म्हणून निसर्गानंच बाळाला काही अभिजात हालचाली बहाल केल्या आहेत. ‘शोधणे’, ‘ओढणे’ आणि ‘गिळणे’ या त्या तीन हालचाली होत. बाळाच्या तोंडाला आणि गालाला स्तनाग्राचा स्पर्श होताच बाळ त्या दिशेला मान वळवून; ‘आ’ करून शोधाशोध सुरु करते. स्तनाग्र सापडताच ‘चोखण्याची’ हालचाल सुरु करते आणि काही घशात पडतच गिळण्याची क्रिया प्रतिक्षिप्तपणे होत जाते.
दूध पिताना बाळ स्तनाग्र आणि भोवतीचा काळा भाग चांगला तोंडात आत ओढून घेते. इतका की ब्लालच्या तोंडात स्त्नाग्राची एक लांबोडकी नळी तयार होते. हिच्या टोकातून येणाऱ्या दुधाच्या धारा थेट बाळाच्या घशात पडतात. जीभेची पुढेमागे हालचाल करत, टाळं आणि जीभ यांच्यामध्ये स्तनाग्र पिळून पिळून बाळ दूध ओढून घेते. हे सारं व्यवस्थित होण्यासाठी बाळाला योग्य रीतीने अंगावर घेणं महत्वाचं आहे. यासाठी आईनं अगदी आरामात, पाठीला किंचित बाक काढून बसायला हवे. (अपवादात्मक परिस्थितीत झोपूनही पाजता येतं) बाळानं टोकापाशीचा काळा भाग पूर्णतः तोंडात धरला पाहिजे आणि तरीही श्वासासाठी बाळाचं नाक मोकळं रहायला हवं.
स्तनपान म्हणजे मायलेकरांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना. यासाठी अगदी गरोदरपणातचं तयारी करणं महत्वाचं आहे. उदा. स्तनांची बोंडं काही वेळा आत ओढलेली असतात, ती हलकेच चोळून बाहेर ओढणं महत्वाचं आहे. बाळ जन्मतःच त्याला अर्ध्या तासाच्या आत पाजावं असं आधुनिक प्रसुतीशास्त्र सांगतं. हे शक्य नसेल तर निदान १२ तासाच्या आत तरी पाजावंच. कारण पहिल्या १२ तासाच्या दुधात जास्तीत जास्त जंतुविनाशक प्रतिपिंडे असतात.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतील तर बाळाला आईच्या कुशीतच विसावू देणं उत्तम. पाश्चात्यांचं आंधळं अनुकरण करणारी काही पंचतारांकित इस्पितळं तान्हुल्यांना खास विभागात ठेवतात आणि प्रसंगोपात स्तनपानासाठी आईजवळ देतात. हे सर्वस्वी अयोग्य आहे. सुदैवानं ही पद्धत आता लोप पावत आहे. कारण पाश्चात्यांनी आपलं डोळस अनुकरण करून बाळ बाळंतीणीजवळ ठेवायला सुरुवात केली आहे.
        काही संशोधकांनी स्तनपानाची वेळापत्रकंही तयार केली होती. पण काळ-वेळ पाळेल ते बाळ कसलं? कालांतराने ही वेळापत्रकही मोडीत निघाली. ‘बाळाला हवं तेव्हा पाजावं, हवं तेवढं पाजावं आणि त्याला हवं तेवढा वेळ पाजावं’ हाच निसर्गनियम आहे आणि तोच आपण पाळला पाहिजे. सुरुवातीला तान्ही बाळंही थोडा त्रास देवून बघतात, सारखं पिण्यापासून ते पिणं सोडण्यापर्यंत खोड्या काढतात. पण सुमारे २ आठवड्यात व्यवस्थित बस्तान बसतं. वेळाही थोड्याबहुत ठरून जातात. २४ तासात सुमारे ८ ते १२ वेळा अंगावर घेतलं तरी पुरतं. मोठ्यांप्रमाणे तान्ह्यांनाही स्वभाव असतो. दारुड्यांसारखंच बाळांचंही असतं. काही बाळं गटागट पितात तर काही घुटके घेत घेत.  तेव्हा बाळ आपणहून दूर होईपर्यंत पाजणं महत्वाचं.
पण काहीवेळा बाळाला अर्धवट दूर करावं लागतं. याचंही विशिष्ट तंत्र आहे. बाळ पीत असताना त्याला ओढून दूर करू नये. तर स्तनाच्या बाजूनी हलकेच आपली करंगळी बाळाच्या तोंडात सरकवावी. बाळाच्या तोंडात हवा शिरली की त्यानं दिलेली ओढ नाहीशी होते, आणि बाळाला सहज दूर करता येतं. बाळ ओढून दूर केलं तर स्तनाग्रांना इजा पोहचते.
बाळ-बाळंतीण सुखरूप असतात तेव्हा हे सगळं सहज जुळून येतं. पण काही वेळा एखादं कुणी आजारी पडतं आणि सारं चित्रं पालटतं. कमी वजनाची, कमी दिवसाची मुलं नीट ओढू शकत नाहीत. आईला नागीण, एड्स किंवा हिपॅटायटीस बी वगैरेची लागण असेल तर बाळालाही लागण होवू शकते. अशावेळी तज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. तान्हेपणीच ज्यांना मातृवियोग सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी ‘ओली दाई’ ठेवण्याची पद्धत असते. एड्सच्या या जमान्यात स्तनपानामुळे बाळाला काही आजार होण्याची शक्यता लक्षात घेवून आता रक्तपेढ्यांसारखी, दुग्धपेढ्यांची कल्पना प्रत्यक्षात येऊ पहात आहे.
योग्य स्थितीत स्तनपान करणारं बाळ कसं ओळखावं?
योग्य स्थितीत स्तनपान करणाऱ्या बाळानं
१.             मोठा ‘आ’ वासलेला असतो.
२.             त्याचा खालचा ओठ बाहेर दुमडलेला असतो.
३.             हनुवटी स्तनाला टेकलेली असते.
४.             गाल चांगले फुगीर दिसतात.
५.             स्तनाचा काळा भाग जवळ जवळ दिसत नाही.
६.             बाळ प्यायचं थांबत आणि पुन्हा पिऊ लागतं.
७.             बाळाचा घुटके घेण्याचा आवाज येतो.
८.             हा सारा कार्यक्रम शांत चित्तानं चाललेला असतो.
९.             आईला दुखणं, खुपणं वगैरे काहीही त्रास जाणवत नाही.
बाळ पित नसेल तर...............
१.             बाळ आजारी नाही याची खात्री करा.
२.             दिवसा अगर रात्री बाळ रडताच लगेच अंगावर घ्या.
३.             बाळ पिता पिता झोपल्यास त्याला कानामागे गुदगुल्या करून हलकेच जागं करा.
४.             अंगावरच्या शिवाय ‘वरचं’ काही देवू नका.

बाळ वारंवार पीत असेल तर...........
      तासाभरापेक्षाही लवकर लवकर बाळाला घ्यावं लागतं असेल तर बहुदा प्रत्येकवेळी बाळाला पोटभर दूध ओढता येत नसावं. बाळाला एका वेळी एक बाजू रिकामी होईपर्यंत त्याच बाजूला पाजणे महत्वाचे आहे. जे दूध येते त्यात सुरवातीच्या दुधात पाणी अधिक असते. त्यामुळे आधी बाळाची ठाण तेवढी भागते. नंतरच्या दुधात अन्न असते. त्याने भूक भागते. जर बाळाला थोडावेळ एका बाजूला आनिनात्र थोडावेळ दुसऱ्या बाजूला पाजलं तर बाळ सुरुवातीला येणारं ‘तहान दूध’ पीतं मात्र नंतर येणार ‘भूक दूध’ पीतच नाही. ते लगेच ठणाणा करायला लागतं. मग आईच्या आहाराला किंवा दृष्ट लाग्ण्याला बोल लावले जातात. यासाठी.......
१.             बाळाला अंगावर पाजण्याचं योग्य तंत्र समजावून घ्या.
२.             एक बाजू पूर्ण रिक्त झाल्यावर मगच दुसऱ्या बाजूला घ्या.
३.             बाळाने आपणहून सोडेपर्यंत त्याला पाजत रहा.
नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत अपुरी रजा ही एक अडचण असू शकते. अशांनी..........
१.             शक्य तर सहा महिने पर्यंत रजा घ्यावी.
२.             शक्यतितके दिवस निव्वळ स्तनपान द्यावं.
३.             चौथ्या महिन्यानंतर ‘वरचा’ आहार सुरु करावा.
४.             कामावर रुजू झाल्यावर –
                                                                                                   i.          अगदी घराबाहेर पडण्यापूर्वी.
                                                                                                 ii.           घरी परत आल्या आल्या.
                                                                                               iii.           रात्री झोपण्यापूर्वी.
                                                                                               iv.          अधून मधून रात्रीही स्तनपान द्यावं.
५.          सुट्टीच्या दिवशी मुलाला जास्त वेळा घ्यावं.
६.          आई नसताना बाळाला पाजण्यासाठी अंगावरचं दूध पिळून काढून ठेवता येतं. बाहेर ठेवल्यास ८ तास आणि फ्रीजमध्ये २४ तासांपर्यंत हे टिकतं. मात्र हे पाजताना बोंडलं, वाटी, चमचा पूर्णतः निर्जंतुक हवा. बाटली वापरू नये. बाळाला निरसं दुधचं पाजावं. दूध गरम करू नये अथवा उकळू नये.

No comments:

Post a Comment