ऐकावे ते नवलच
डॉ. शंतनू अभ्यंकर
‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’
‘येतं की! नाही का जर्राsss मोठा आवाज झाला की ते दचकतं?’
हे उत्तर चुकीचे आहे. आणि ‘तान्ह्या बाळाला ऐकू येतं का हो?’ हा प्रश्न भोंगळ आहे म्हणून उत्तर चुकीचे मिळाले आहे. आपण
नेमका प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की, सगळ्याच तान्ह्या बाळांना ऐकू येतं का?
१००%? का जन्मजात श्रवणदोष असतो? असू शकतो?
उत्तर आहे, काहींना श्रवणदोष, जन्मजात बहिरेपणा, असू शकतो. सुमारे हजारेक
बाळांत श्रवणदोषवाली आठदहा बाळं निघतात. पण
ही आठदहा म्हणजे कोणती हे निव्वळ बाळाकडे बघून ओळखता येत नाही. अनुवंशिक आजार, सी.एम.व्ही. इन्फेक्शन, प्रसूती दरम्यान मूल गुदमरणे,
तान्हेपणी तीव्र स्वरुपाची कावीळ, मेनिंजयटीस, कमी दिवसाची बाळे, आईने अनवधानाने
घेतलेली काही औषधे, कान फुटणे, कानाला इजा... अशा कशाकशानी तान्हेपणीच बहिरेपणा
उद्भवण्याची शक्यता जास्त. पण यांना शक्यता
जास्त म्हणजे बाकीचे यातून सुटले असे नाही. त्यांना बहिरेपणाची शक्यता कमी, पण
शून्य नाही. त्यामुळे तपासणी सगळ्यांचीच व्हायला हवी. निव्वळ अति जोखमीच्या, निवडक बाळांसाठी तपासणी करत बसलं, तर सुमारे
४०% जन्मजात कर्णबधीर मुलं या तपासणीला मुकतील. म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक
बाळाची तपासणी करायलाच हवी.
का करायला हवी? कारण नाही केली तर जन्मजात बहिरेपणा लक्षात यायला दीड ते दोन
वर्ष लागतात. आपलं छकुलं चांगलंच आहे असा
ठाम विश्वास असतो प्रत्येकाला. त्यात काहीतरी न्यून आहे असा विचारसुद्धा नकोसा
वाटतो. त्यामुळे,
‘बाळ अजीबात दचकत नाहीये.’
‘कितीही मोठ्ठा आवाज झाला तरी झोप चाळवत नाही याची.’
अशी वाक्यं कानाआड केली जातात. ‘डॉक्टरला दाखवा’ असं सांगणारा व्हिलन ठरतो.
अप्रिय आणि क्लेशदायक वास्तवाचा स्विकार नकोसा वाटत असतो. पण ही नकारघंटा आत्मघातकी
ठरते. कारण एवढ्या दिवसात बाळाच्या मेंदूत ब्रोकाज एरिया म्हणून जो भाग असतो
त्याची वाढ पूर्ण होते. ह्या एरियात आवाजाचा अर्थ लावला जातो, ऐकलेल्या
आवाजाची नक्कल करायची सवय इथे लागते. आपण
बोलतो, भाषा शिकतो ते या भागामुळे. पण या भागावर जर आवाजच पोहोचला नाही तर ही
क्षमता मुळी निर्माणच होऊ शकत नाही. मूल ऐकू शकत नाही सबब बोलूही शकत नाही. जन्मतः
बधीर मुलं, ही मुकीही असतात ते यामुळेच.
एकदा वय वाढल्यावर, ब्रोकाज एरियाची वाढ पूर्ण झाल्यावर, मूक (बधीर) मुलाला
बोलायला शिकवणे किती अवघड असते हे मी सांगायला हवं असं नाही. अशा मुलांच्या पालकांच्या
अनेक कथा तुमच्या वाचनात असतील. मूकम्
करोति वाचालं, हे पंगुं लंघयते गिरीम् इतकच कठीण.
श्रवण नाही तर वाणी नाही, वाणी नाही तर भाषा नाही, भाषा नाही तर संभाषण नाही,
संभाषण नाही तर सामाजिक विकास नाही आणि बौद्धिक विकासही नाही असं दुष्टचक्र चालू
होतं. मुळात श्रवणदोष हे एक अदृश्य अपंगत्व आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य एरवीही
आपल्या लक्षात येत नाही. कोणी पांगळा, थोटा, आंधळा दिसला तर आपोआपच सहानुभूतीचा,
मदतीचा हात पुढे होतो. पण बहिरेपणा उघडपणे दिसत नसल्यामुळे पटकन सहानुभूती किंवा मदत मिळत नाही. उलट अशी माणसं बरेचदा
कुचेष्टेची धनी होतात, सिनेमा नाटकात विनोदाच्या जागा यांच्या! (खरंतर पांढऱ्या
काठीसारखी काहीतरी सहज नजरेस येईल अशी खूण अशा व्यक्तींनी वापरली पाहिजे.)
जन्मतः बहिरेपणासाठी तपासणी असते. जन्मतः तिसऱ्या दिवसाच्या आसपास करायची
असते. ओएई तिचं नाव. ओएई म्हणजे ओटो अकॉस्टिक एमिशन टेस्ट. अक्षरशः दहा मिनिटाचे
काम. इथे इयरफोन सारखी एक बारकी गुंडी बाळाच्या कानाशी लावली जाते. यातून कानात
काही ध्वनीलहरी सोडल्या जातात. परिणामी निर्माण होणाऱ्या अंतरकर्णातील विद्युतलहरी
या यंत्राद्वारे मोजल्या जातात. साद-प्रतिसादाचा हा खेळ आपल्याला ऐकण्याबद्दल काही
सांगून जातो.
सादाला प्रतिसाद मिळाला नाही तर त्याचा अर्थ आतलं सर्किट ड्यामेज आहे असा
होतो. पण ही खात्रीची तपासणी नव्हे. ही चाचपणी (Screening Test). मग पुढील तपासणी
करावी लागते ही जास्त गुंतागुंतीची, जास्त खर्चिक, पण खात्रीची. पण अर्थात अगदी
क्वचित करावी लागणारी. याला म्हणतात बेरा (BERA. Brain Stem Evoked Responce
Audiometry).
सहा महिन्याच्या आत नेमके निदान होऊन उपचार सुरु व्हायला हवेत तरच जास्तीजास्त
फायदा मिळतो. तान्ह्या मुलातही श्रवणयंत्र बसवता येतं. आई-बाप पुरेसे जागरूक आणि
चिकाटीचे असतील तर वाचादोष टाळता येतो. जागरूकता आणि चिकाटी महत्वाची खरीच. कारण
श्रवणदोष हा नाही म्हटलं तरी दुर्लक्षितच रहातो, कमीपणाचा मानला जातो. मोठी
माणसंसुद्धा चष्मा कौतुकानी मिरवतील पण श्रवणयंत्र घालयाची त्यांना लाज वाटते.
थोरांची ही कथा तर पोरांचं (म्हणजे त्यांच्या आईबापांचं) विचारायलाच नको. आता
आधुनिक उपचारही उपलब्ध आहेत. कॉक्लीअर इम्प्लांटसारखे उपचार खूप खर्चिक आहेत पण
आयुष्यभरच्या पंगुत्वापेक्षा स्वस्तच म्हणायचे. शिवाय निरनिराळ्या सरकारी आणि
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अगदी मोफत उपचारही होऊ शकतात. पण हे झालं पुढचं.
मुळात जन्मतः तपासणीच केली जात नाही. अशा तपासणीची माहितीच नसते. माहिती असली तर
तशी सोयच नसते. सोय असली तर तपासण्याची वृत्ती नसते.
हे झालं बाळाला ऐकू येतय व नाही याच्या तपासणीबद्दल. अर्थात बाळाला ऐकू आलं
याचा अर्थ ते तुमचं ऐकेलच असं नाही हं. ते तुमच्या आज्ञेत राहील का नाही हे ओळखणारी
तपासणी अजून निघायची आहे.
No comments:
Post a Comment