Monday 25 October 2021

विज्ञान म्हणजे काय? मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे लेखांक १२

 

विज्ञान म्हणजे काय?

मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक १२

 

विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद  ही प्रगतीची चाके आहेत प्रगतीच्या ह्या चाकांना आपण वंगण घातलं पाहिजे. यासाठी काळजीपूर्वक आपले पूर्वग्रह कसे टाळायचे, चिकित्सकपणे विचार कसा  करायचा हे शिकणं अत्यंत महत्वाचं. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला नेमकं हेच शिकवते.

शास्त्रज्ञ मंडळी नेमके हेच तर करत असतात. पण याबरोबर शास्त्रज्ञ होण्यासाठी  इतरही अनेक गुण अंगी बाणवावे लागतील. उत्तम खेळाडू होण्यासाठी अनेक गुणांचा समुच्चय असावा लागतो. उत्तम वादक, उत्तम नेता, उत्तम अभिनेता, उत्तम लेखक होण्यासाठी सुद्धा काही खास गुण असावे लागतात. तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी देखील काही गुण अंगी असावे लागतात.

बुद्धिमत्ता तर लागतेच पण त्याही पेक्षा एकाच प्रश्नाकडे विविध बाजूने बघण्याची क्षमता लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंगी कुतूहल हवं. हे असंच का? ते तसंच का? हे तसं का नाही? आणि ते असं का नाही?; असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत.

वैज्ञानिक होण्यासाठी पराकोटीची एकाग्रता, स्मरणशक्ती  आणि एखाद्या विषयाचा मागोवा घेण्यासाठी नादिष्टपणा असावा लागतो. अंगी प्रचंड चिकाटी असावी लागते. अक्षरशः आयुष्य वेचलं तरी त्या प्रश्नाचा मागोवा संपत नाही. काही गोष्टी स्पष्ट होतात तर काही नवीन प्रश्न लक्षात येतात. खरा शास्त्रज्ञ नव्या माहीतीने सुखावतो आणि नव्या प्रश्नाच्या आव्हानाने आणखी सुखावतो.  

लाइट बल्बचा शोध लावणारा थॉमस  एडिसन याला लाइट बल्ब मध्ये कोणती तार वापरावी असा प्रश्न होता. अनेक पदार्थ वापरूनही त्याला मनाजोगे गुणधर्म असलेली तार सापडेना. त्याला कोणीतरी विचारलं,  ‘या अपयशानी तुम्हाला खचून जायला होत नाही का?’

तो उत्तरला, ‘छे! हे अपयश कुठाय? इतक्या सगळ्या पदार्थांच्या तारा निरुपयोगी आहेत, हा निष्कर्ष काही कमी महत्वाचा नाही. निरुपयोगी तारा कुठल्या हे मला समजले हे यशच आहे की!!’

पण विज्ञानात लखलखीत यश क्वचित मिळतं. जगणं उलथंपालथं  करणारे शोध रोज थोडेच लागतात?   तेंव्हा अपयश पचवण्याचीही ताकद अंगी बाणवली पाहिजे. 

शाळेत जरी आपण जीव-भौतिक-रसायन-गणित असे वेगवेगळे विषय शिकत असलो आणि त्या त्या विषयाच्या पेपरमध्ये त्या त्या विषयाचे प्रश्न सोडवत असलो, तरी प्रत्यक्षात या  साऱ्यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असतो. वैज्ञानिक हा एकापेक्षा अधिक विषयात तरबेज असावा लागतो. तुम्हीच पहा ना, रसायनशास्त्राच्या मदतीशिवाय कोव्हिडवर  लस   निर्माण होणे शक्य नव्हते. गणिताच्या वापराविना या साथीच्या प्रसाराचा अभ्यास करणे अशक्य होते आणि व्यवस्थापनशास्त्राशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्य नव्हते.

वैज्ञानिकांना अनेक विषयात गती असते आणि  त्यांना प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. अमूर्त कल्पना ते  लीलया समजावून घेऊ शकतात. सामान्य माणसे पायरी पायरीने विचार करत बसतात तर शास्त्रज्ञ चार-पाच पायऱ्या गाळून थेट उत्तराशी पोहोचलेले असतात.

बरेचदा आपला प्रश्न, संशोधनाचा विषय, गणिती  भाषेत  मांडावा  लागतो. त्यामुळे तुम्हाला गणित आवडो वा न  आवडो, शास्त्रज्ञ व्हायचं झालं; मग ते कुठल्याही विषयातील असो; गणिताशी गट्टी असावीच लागते. बऱ्याचशा मुलांना शाळेत असताना गणित समजत नाही आणि  आवडतही नाही. पण इंटरनेटच्या मदतीने या दोन्ही गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. गणित छान समजावून सांगणाऱ्या  कितीतरी साइट्स आहेत. तुमच्या शंकांना उत्तर देणारे कितीतरी ऑनलाइन गुरु आहेत.

आपल्याला एखादी गोष्ट समजली आहे का, हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तीच गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगणे. हे जमलं, तर आपल्याला ती गोष्ट समजली आहे असं खुशाल समजावं. उत्तम शास्त्रज्ञ हे उत्तम शिक्षकही असतात.  सोप्या पद्धतीने, समोरच्याला समजेल अशा भाषेत, समजावून सांगण्यासाठी आधी आपले आकलन उत्तम असावं लागतं. इतकंच काय भाषेवर चांगलं प्रभुत्व असावं लागतं.

शेवटी तुम्ही वैज्ञानिक व्हा अथवा राजकीय नेते  व्हा, आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून द्यायला यावच लागतं. तरच तुम्ही पुढे जाल. यासाठी भाषाही चांगली आली पाहिजे.  विज्ञान आणि गणित आलं की झालं. भाषा नाही आली तरी चालेल असं काहीतरी आपल्याला वाटत असतं. विज्ञान आणि गणित म्हणजे अवघड, त्यामानानी भाषा म्हणजे सोप्पं असंही आपल्याला वाटत असतं. पण हा फार मोठा गैरसमज आहे. गणित आणि विज्ञानात धो धो  मार्क पडणाऱ्या स्कॉलर मुलांना भाषा विषयात एवढे मार्क क्वचित मिळतात.   याचा अर्थ भाषा विषयही अवघड आहेच. कित्येक वैज्ञानिक, कित्येक डॉक्टर भाषाप्रभू असतात. ते त्यांच्या विषयावर सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत लिहितातच पण  उत्तमोत्तम ललित लेखनही करतात.  तेव्हा भाषेचाही सराव पाहिजेच.

एकूणच शास्त्रज्ञ व्हायचं तर मनाला, बुद्धीला  तसं वळवावं लागतं, जाणीवपूर्वक शिकवावं लागतं. उत्क्रांतीच्या दरम्यान आपलं शरीर बदलत गेलंय हे तुम्हाला माहीत आहे. मोठा मेंदू, दोन पायावर चालणे, बोटांची चिमूट करता येईल असा अंगठा, अशी मानवी शरीराची वैशिष्ठ्ये तुम्हाला माहीत आहेत. शरीराबरोबर आपला मेंदूसुद्धा उत्क्रांत झाला आहे. आपली विचार करण्याची पद्धत देखील काही गुणदोष घेऊन उत्क्रांत झाली आहे. विचार करण्याची आपली उपजत पद्धत चिकित्सक विचार करायला सोयीची नाही.

उत्क्रांती म्हणजे सतत उन्नतीकडे, भल्याकडे प्रवास; असं नाहीये. उत्क्रांत होताना आता तोट्याचे ठरणारे संचितही आपण पिढ्यानपिढ्या  वागवत असतो. आता हेच बघा हां. आपले जवळचे नातेवाईक आपल्याला सर्वात प्रिय असतात.  मग सगे, मग सोयरे, मग सखे, मग टोळीतले इतर अशी उतरती भाजणी असते. याच भावनेमुळे आपले धर्मबांधव, आपल्या वंशाचे, आपल्या रंगाचे आपल्याला जास्त प्रिय असतात आणि याच भावनेमुळे ‘इतर’ सर्व आपल्याला अप्रिय असतात.  त्यांना समजावून घेणं, त्यांना सहानुभूती दाखवणं अवघड जातं आपल्याला. हा आपपरभाव आपल्या मेंदूत आहेच. ही उत्क्रांतीची देन आहे.

आपल्या विचार करण्याच्या सवयीत, उत्क्रांतीने पेरलेल्या अशा इतर अनेक अडचणी आहेत.  

स्वतःच्या ज्ञानेंद्रियांवर आपला गाढा विश्वास असतो. पण विज्ञान सांगतं तू स्वतःवरही विश्वास ठेऊ नकोस. भले सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे हे तुला रोज दिसत असेल पण प्रत्यक्ष तसं नाही.

टोळीतल्या वरिष्ठांवर आणि बलिष्ठांवर विसंबून रहा अशी मेंदूची उपजत शिकवण आहे; पण जिथे तिथे शंका घे, असं विज्ञान आपल्याला सांगतं.

दोन गोष्टी पाठोपाठ घडल्या तर पहिली मुळे दुसरी घडली असा निर्णय आपला मेंदू देतो. पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही, असं विज्ञान आपल्याला शिकवतं. ‘म्हातारीनं कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही’; ही गोष्ट आपण नवव्या लेखांकात  पाहिलीच आहे.

जिथे तिथे परिचित आकार शोधायला आपला मेंदू शिकला आहे. असंबद्ध ठिपके जोडून आपल्या मनात जे वसते ते आपल्याला दिसायला लागते.  मग आपल्याला ढगात राक्षस दिसतात, चंद्रावर ससा दिसतो, बटाट्यावर आपली उपास्य देवता उमटलेली भासते आणि झाडोऱ्यात वाघोबा दिसायला लागतो. प्रत्यक्षातल्या   अंधुक आकारात आपला मेंदू कल्पनाशक्तीचे रंग भरतो आणि झटपट निष्कर्ष काढतो. विज्ञान शिकायचं, वैज्ञानिक व्हायचं तर मेंदूची ही खोड जिरवावी लागते. झटपट निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट तोलूनमापून मग निष्कर्ष काढायला शिकावं लागतं.

आपल्या मेंदूत आणखी एक गैरविचार घट्ट कोरला गेलेला आहे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्यासारखाच मेंदू असतो आणि  निसर्गातील शक्ती आपल्यासारखाच  विचार करतात असं आपल्याला वाटत असतं. नैसर्गिक घटना घडण्यामागे निसर्गाचा काही हेतु असतो, असं आपल्याला वाटत असतं.   आपण जसे हेतुतः काही करतो; हल्ला करतो, बदला  घेतो, मदत करतो; तसेच नैसर्गिक शक्तींचेही असते, असं आपल्याला भासतं. अशीच आपल्या मेंदूतील आदिम भावना आहे. पावसाची देवता कोपल्यामुळे पूर येतात किंवा दुष्काळ पडतात. समृद्धीची देवता प्रसन्न झाली की आबादीआबाद होते; हे आपल्याला सहज पटतं. अगदी ठाम, खात्रीशीर  निष्कर्ष म्हणूनच आपण याकडे बघतो. पण ही आपणच आपली केलेली फसगत आहे. 

ही सगळी उपजत शिकवण प्रयत्नपूर्वक खोडून चिकित्सक विचार करण्याची पद्धत मेंदूला   शिकवावी लागते. तेंव्हाच तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता. या सृष्टीच्या विस्मयाचा विलक्षण आनंद उपभोगू शकता. आपल्याला हा विस्मय जाणवतोय ही तर आणखी विस्मयकारी घटना!! हा तर चढत्या भाजणीचा विस्मय. या विस्मयाचा निरतिशय आनंद तुम्हाला लाभो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो.

 

पूर्वप्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

 

No comments:

Post a Comment