Monday, 1 November 2021

जन्मरहस्याची जन्मकहाणी

 

जन्मरहस्याची जन्मकहाणी   

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

अचेतनातून सचेतनाची उत्पत्ती हे मानवी प्रज्ञेला न सुटलेलं कोडं आहे. पण सचेतनातून सचेतनाची निर्मिती हे कोडं  सुद्धा पूर्ण उलगडलेलं नाहीच्चे. बरीचशी कोडी अशीच असतात म्हणा, एकात एक लपलेली. एक सोडवावं तर त्या उत्तरातून  दुसरं डोकावतं, अशी. मानवी जीवनाची सुरवातच पहा ना.  ह्या कोड्याच्या आनंदकंदाच्या काही पाकळ्या उमललेल्या आहेत आणि काही अजूनी रुसून आहेत.  

स्त्री आणि पुंबीजाचे फलन, हा तुमच्या  माझ्या स्वतंत्र  अस्तित्वाचा पहिला  क्षण. पण  स्वतंत्र म्हणजे अगदीच काही स्व-तंत्र नाही. कारण पुढे तब्बल ३८ आठवडे आपण गर्भवासी असतो, परपोषित, परोपजीवी  असतो.

हे फलन होतं, म्हणजे मीलन होतं दोन पेशींच्या दोन केंद्रकांचं (Nucleus). एक आईची पेशी, म्हणजे स्त्रीबीज आणि एक बाबांची पेशी म्हणजे पुरुषबीज. दोन्ही पेशी एकत्र  येतात.  त्याच्यातला माल/मगज/गर  (गुणसुत्रे, Chromosomes) एकमेकांत मिसळतो. ह्या मिसळीतून एक नवीनच, एकमेवाद्वितीय, न भूतो न भविष्यती, असे गुणावगुण असलेला जीव निर्माण होतो. ह्याला म्हणतात झायगोट (Zygote).

आज आपल्याला पुनरुत्पादनाच्या साऱ्या क्रियेबद्दल सखोल माहिती आहे. दिसामासांनी  त्यात भर पडते आहे. आपल्याला माहीत आहे की, फलन ही क्षणिक प्रक्रिया नाही. अनेक क्रियांची ती  एक मालिका आहे. त्यातील प्रत्येक पायरी महत्वाची आहे. एखादी जरी वगळली तरी साठा उत्तराची कहाणी; विफळ, अपूर्ण.   

आपल्याला माहीत आहे की, पुरुष बीजाला चपटे, अंडाकृती डोके असते. यात केंद्रक (Nucleus) असतो. ह्या डोक्यावर असतात  शीर्षस्थ कोश. स्त्रीबीजाचे आवरण  भेदण्यासाठी आवश्यक तो दारुगोळा ह्या कोशात साठवलेला असतो. मागे एक शेपूट असते. डोके आणि शेपूट जोडणाऱ्या ‘माने’त (Midpiece) मायटोकोंड्रियाची लड असते. हे मायटोकोंड्रिया म्हणजे त्या पुरुषबीजाला  आवश्यक ती ऊर्जा पुरवणारे   जनित्र.

स्खलन होताच पुरुषबीज स्त्रीच्या योनिमार्गात सोडले जाते. पण स्खलनाच्या क्षणीही पुंबीज पूर्ण तयार नसते. स्खलनानंतर  पुढे तीन चार दिवसांनी फलनाची घटिका येते. ह्या काळात आधी योनीमार्ग मग, गर्भाशय आणि शेवटी फलोपियन नलिकांत पुरुष बीजाचा मुक्काम घडतो. हा काही दिवसांचा स्त्री सहवास पुरुषबीजाला ‘शहाणे’  करून सोडतो (Capacitation). हे शहाणपण अंगी येणे आवश्यक असते. यात त्या पुंबिजाच्या अंगावरील प्रथिनांची वस्त्रे उतरवली जातात, कॅल्शियम आयात केले  जाते, आणि इतरही असे अनेकानेक रेण्वीय बदल होतात. असा ‘शहाणा झालेला’ स्पर्म आता कात टाकलेल्या नागिणीसारखा  सळसळत असतो.  या शहाणीवेमुळेच शीर्षस्थ कोश वेळीच फुटतात, स्त्रीबीजाची तटबंदी भेदता येते.

स्त्रीबीजाभोवती पक्की तटबंदी असते. आत झोना पेलूसीडा, मग   पीतक पटल (Vitelline membrane) आणि अगदी बाहेर काही पेशींची प्रभावळ (Corona radiate) अशी आवरणे असतात.  

पुंबीज स्त्रीबीजापाशी पोहोचताच पुंबीजाचे  शीर्षस्थ कोश फुटतात.  त्यातील हायलोरुनीडेज (Hyaluronidase)आणि लायसीन (Lysin)  बाहेर पडते. हायलोरुनीडेजच्या प्रभावामुळे स्त्री बीजाभोवतीची पेशींची प्रभावळ (Corona Radiata) मोडून पडते आणि लायसीनमुळे  स्त्रीबीजाभोवतीचा पीतक (व्हायटेलाईनचा) पदर विरघळून जातो. आता येतो, स्त्रीबीजाभोवतीचा    पारदर्शक थर. याला म्हणतात    झोना  पेलूसीडा. म्हणजे लॅटिन मध्ये, पारदर्शक थर. पण पारदर्शक असला तरी तो चांगला अभेद्य असतो. ‘तिळा दार उघड’ची विशिष्ठ रासायनिक किल्ली असलेल्या पुंबीजालाच आत प्रवेश असतो.  यात पुरुषबीजाचे डोके असे काही घोसळले जाते, की त्या थराला एक तिरपी फट पडते. हा  पारदर्शक थर पार करणे ही खरी कसोटी असते.

शिवाय ही त्या पुरुषबीजाच्या माणूसपणाचीही  कसोटी असते. म्हणजे असं की मनुष्य प्राण्याच्या नराचे बीज वगळता अन्य कोणत्याही प्राण्याच्या नराचे बीज, झोना-भेद साधू शकत नाही. प्रत्येक जातीच्या (Species) झोनाची अनन्यसाधारण अशी जीव-रासायनिक घडण असते. फक्त सजातीय पुंबीजाशी सलगी साधतील, विजातीयांशी फटकून वागतील, त्यांना स्पर्शही करू देणार नाहीत, अशी ही खाशी रसायने.   ‘सलगी साधतील’, ‘फटकून वागतील’ असं मी लिहिलंय. यातून असं ध्वनित होतं की या झोनाला    काही विचारशक्ती, मन, इच्छा वगैरे असावी. प्रत्यक्षात असं काही नसतं. हे  शब्दप्रयोग निव्वळ सोयीचे, अंगवळणी पडलेले आणि चित्रमय वर्णन करायचं म्हणून योजले आहेत. प्रत्यक्षात ह्या सर्व क्रिया रेण्वीय पातळीवरील बलांचे परिणाम म्हणून घडतात. असो.

मुद्दा काय तर फक्त सजातीय पुंबीजालाच इथे थारा दिला  जातो. सजातीय पुंबीजाशी रासायनिक लगट करणारे, त्याच्याशी शेकहँड करणारी रसायने इथे मौजुद  असतात.  (पुन्हा एकदा आठवण, ‘लगट’,  ‘शेकहँड’ हे शब्द सोय म्हणून वापरले आहेत.)   एका वेळी  एकाच पुंबीजाशी संयोग झाला तरच मानवी गर्भ संभव असतो. अधिकस्य अधिकम् फलम्, इथे लागू नाही. त्यामुळे पहिल्या पुरुष बीजाशी स्त्रीबीज रत होताच इतर पुंबीजांना आत मज्जाव असतो. एकापेक्षा अधिक पुंबीजाचा  शिरकाव झालाच (Polyspermy) तर त्या गर्भाचा अपमृत्यु ठरलेला. 

मानवी स्त्री-पुरुष-बीज  संयोग अगदी लडिवाळपणे चालतो. अन्य सस्तन प्राण्यांची पुरुषबीजे  कपाळाने ढुश्श्या देत रहातात. मानवी पुरुषबीज झोनाला डोक्याने ढोसण्याऐवजी चक्क गाल टेकवते.  ह्या बीज पेशींवरील आवरण  आधी एकमेकाला टेकते, मग ज्या  ठिकाणी ही बीजे परस्परांना स्पर्श करतात त्या बिंदूशी दोन्हीत एक बारीक छिद्र निर्माण होते. पुंबीजाच्या केंद्रकापासून थेट स्त्रीबीजाच्या केंद्रकापर्यंत एक नळी तयार  होते. या नळीतून पुंबीजातील केंद्रक (Nucleus) स्त्रीबीजात प्रवेश करतो.

ह्या फलन क्षणी कितीतरी गोष्टी घडतात.

प्रत्येक बीजपेशीत एरवीपेक्षा निम्मीच (म्हणजे २३) गुणसुत्रे असतात.  दोन बीजपेशी एकत्र आल्या की गुणसुत्रांची मूळ संख्या (म्हणजे ४६) पुन्हा साधली जाते.

स्त्रीबीजाच्या निर्मितीची पूर्तता अद्याप बाकी असते. ही क्रिया शेवटच्या पायरीवर थबकलेली असते.  (Arrested in metaphase of the second meiotic division).  फलन होताच ती पायरी पार करुन  बीज ‘तैय्यार’ होते.

बीजामध्ये आता कॅल्शियमची रेलचेल दिसू लागते. आणि अचानक बीजातील कडेशी असणारे अनेक सूक्ष्मकण(Cortical granules) बाहेर फेकले जातात. यांच्या विद्यमाने झोनाचा पातळ पापुद्रा आता धट्टमुट्ट होतो. पातळ सीमेटचं कॉंक्रीट  बनल्यासारख हे.   तो आता  अन्य बीजांना मज्जाव करणार असतो.

फलन होताच होणाऱ्या बाळाचे लिंग, रंग, डोळ्यांचा रंग, केस वगैरे कसे असणार हे ठरून जातं. अनेक आजार होणार, होणार नाहीत अथवा होण्याची शक्यता अमुक इतकी, वगैरे गोष्टीही ठरतात.     जनुकीय गुणावगुण वज्रलेप होतात जणू. यात पुढे फारसा बदल संभवत नाही.

स्त्री आणि पुरुष बीजांचा संयोग होताच ही फलित बीजे सुफलित व्हावीत म्हणून अनेक क्रिया एकाच वेळी सुरू  होतात. हे फक्त आणि फक्त केंद्रक-मीलन झाले तरच शक्य होते. एखाद्या स्त्री बीजात तुम्ही अख्खा पुरुषबीज टोचले तर ढिम्म फरक पडत नाही.

स्त्रीबीजात प्रवेशीत पुरुषबीजाचा केंद्रक आता फुगायला लागतो, त्यातील गुणसुत्रे ऐसपैस पसरतात आणि स्त्री बीजातील गुणसुत्रांशी सूत  जुळवू लागतात. पुरुष गुणसुत्रांबरोबर दोन भालदार-चोपदार (सेंट्रीओल) सोबतीला असतात. दोन बीजांचे  मीलन होताच, आता केंद्रक आणि पेशी विभाजन, झपाट्याने सुरू होणार असते. ह्या एका पेशीपासून, अख्खे बाळ निर्माण व्हावयाचे असते. त्यासाठी हे  सेंट्रीओल आवश्यक असतात.

या तान्ह्या पेशीला  लगेचच विभाजित  व्हायचं तर प्रथिने आवश्यक असतात. ही प्रथिननिर्मिती सुरू होण्यासाठीचे संदेश एरवी  डीएनए मध्ये असतात. डीएनए च्या संदेशानुसार आरएनए तयार होतात आणि पुढे प्रथिन  निर्मिती होते. पण डीएनए तर अजून नीट तयार नसतो, तर आरएनए कुठून नीट तयार व्हायला? पण स्त्रीबीज तयार होतानाच हे सुरवातीचे संदेश एम्आरएनए स्वरूपात बीजासोबत दिलेले असतात. शिवाय प्रथिन  निर्मितेचे  कारखाने, जे की रायबोसोम, हे ही अ-फलीत स्त्रीबीजात मौजूद  असतात. ह्यातही प्रथिन  निर्मितीच्या काही सूचना असतात.

ह्या सूचनांनुरूप सुरवात होते. पुढे डीएनएच्या हुकुमतीखाली  पेशी विभाजित होतात, वाढतात, त्यांचे विविध अवयव घडतात, पोसले जातात, पिकतात, कार्यरत होतात; त्या मांसाच्या गोळ्याला चांगला आकार उकार येतो, (बहुतेकदा) योग्य समयी प्रसूती होताच आपण म्हणतो मुलगा/गी झाला/ली हो!! वंश सातत्याच्या सुखद जाणीवेने आपण शहारून जातो. पितर-ऋणातून मुक्ती मिळाल्याने मोहरून जातो.

ही सारी माहिती आज इतकी सरळ  सुलभ आणि स्वाभाविक वाटते की ह्या मागे केवढं रामायण, महाभारत दडलेलं आहे याची कल्पनाही येणार नाही. यातलं बरचसं संशोधन झालं युरोपात तेंव्हा रामायण,  महाभारतपेक्षा, इलीयाड आणि ओडिसी म्हणू आपण.

जनन या प्रकाराबद्दल मानवाला कुतूहल, कौतुक आणि भीती असं सगळं एकाच वेळी वाटत होतं. समगमात अननुभूत सुख समावलेलं आहे. त्यातून संतती संभव आहे. तेंव्हा समागमाच्या दृश्य अवयवांना अ-लौकिक महत्व दिलं गेलं. साक्षात  देवत्व दिलं गेलं.  जगातील सर्व संस्कृतीत लिंग आणि योनी पूजा, या ना त्या स्वरूपात आहेतच. भूतानमधल्या घरादारावर ताठर लिंगाची चित्रकारी आहे आणि भारतात ठिकठिकाणी   लज्जागौरीची  शिल्पकारी आहे.

प्रत्येक संस्कृतीत    संतती देवता आहेत, नि:संतान करणारे शाप आहेत, ऋतुप्राप्तीचे सोहळे आहेत, झोपाळ्यावर साजरे डोहाळे आहेत, बहुप्रसवेचा सन्मान आहे, वांझोटीचा अनमान आहे. प्राचीन काळी दिवस रहाणे, गर्भ नीट वाढणे, नीट प्रसूती होणे आणि ते मूल जगणे हे सगळंच राम भरोसे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू अधूनमधून हे वचन; काम-कर्माला यथार्थरित्या लागू आहे. म्हणूनच संतान प्राप्तीसाठी दवा आणि दुवा, तोडगे आणि उपाय, नवस आणि सायास यांची अगदी बजबजपुरी माजली.  

अपत्यच मुळात दुष्प्राप्य, त्यामुळे अपत्यसंभव समाप्ती साजरी करण्याचा प्रश्नच नाही. म्हणूनच ऋतुनिवृत्तीचे काहीही कर्मकांड नाही. नहाण, साखरपुडा, लग्न, मधुचंद्र, डोहाळजेवण, बारसं हे सगळं झोकात आहे. ह्या निमित्त सत्यनारायण आहे. जसं ऋतुनिवृत्तीचे कौतुक नाही तसं नसबंदीचेही नाही. कारण नकोशी संतती हा आधुनिक प्रश्न आहे. त्यावर नसबंदी हा आधुनिक उपाय आहे. पण ह्या निमित्त नसबंदी नारायण? नाही!!  

मूल होण्यासाठी स्त्री पुरुष संबंध अत्यावश्यक आहेत हे लक्षात आलं होतं. माणसाला स्वतःच्या शरीराबद्दल लागलेला हा पहीला शोध म्हणता येईल.  म्हणून तर ‘अभोग गर्भसंभवाचं’, मेरीचं ‘कुमारी’ असण्याचं, एवढं प्रस्थ.  पण ह्या भानगडीतून पुढे काय होतं याबद्दल ओ  म्हणत ठो माहीत नव्हतं. कसं असेल? कामक्रीडा दृश्य असली तरी पुढचं सगळं अदृष्यच होतं. मग त्याबद्दल विविध लोकांनी कल्पनांचे पतंग उडवले होते. त्यातले अनेक आज रंजक, मूर्खपणाचे वगैरे वगैरे वाटतात. ताज्या ज्ञान-तंत्रज्ञानाच्या गुबगुबीत खुर्चीत झुलत आपण भूतकाळात डोकावलं की असंच कायकाय वाटायला लागतं.  आता हेच बघा ना, स्त्रीचं दुय्यम स्थान गृहीत असल्याने, आई होण्यामध्ये बाईचा वाटा असतो, हे समजलं तरी  उमजायला जरा जास्तच वेळ लागला.

पण त्या त्या वेळी, ती ती माणसं प्रचलित ज्ञान, उपलब्ध तंत्रज्ञान, धर्म, तत्वज्ञान, राजकीय वातावरण या साऱ्याची गुलाम होती हेच खरं. काळाच्या मर्यादा असतातच. ठराविक अंतरापार नजर पोहोचूच शकत नाही. ह्याची  जाणीव असली तरी त्यावर उपाय काहीच नसतो.  त्यामुळे परंपरा म्हणजे सदोष ज्ञानाची आणि गलत कल्पनांची साखळीच असते. आजच्या आपल्या कित्येक  कल्पनाही उद्या हास्यास्पद ठरतील हे  निश्चित.

‘प्रीफॉर्मेशन’ अशी एक कल्पना होती. जिवात जीव मुळात  असतोच. म्हणजे मादीच्या अंड्यात/शरीरात पुढची पिढी सूक्ष्म रूपात असतेच. त्या बीजात आणखी पुढची पिढी असं पुढे, पुढे, पुढे....  आणि मागे, मागे, मागे, सुद्धा... किती मागे?     तर देवाने पहिली स्त्री घडवली तिथपर्यंत! ह्या मताला बायबलचा आधार होता.  हा भक्कम पुरावाच होता. बायबलच्या मते पहिल्या स्त्रीपुरुष जोडीची आपण सारी लेकरे. त्यामुळे त्या कल्पनेत ही ‘प्रीफॉर्मेशन’ची  कल्पना फिट्ट बसत होती. ‘तिच्या’कुशीतून आपण निपजलोय हे कित्ती रोमॅंटिक! पण पुनरुत्पादनातल्या स्त्री सहभागाची महती सांगणारी ही कहाणी अधूरीच होती म्हणायची.

 स्त्रीचा सहभाग जितका आवश्यक होता तसा पुरुषाचा ही होताच की. पुरुषातील ‘काहीतरी’ गरजेच होते खास पण काय याचा थांग लागत नव्हता. संभोगाअंती वीर्यपतन  होतं. ह्या मुळे आतलं,  ऋतुस्त्राववेळी बाहेर पडणारे, रक्त साकळतं आणि त्यातून पोटातला मांसाचा गोळा पोसला  जातो अशीही एक कल्पना होती. थोड्याश्या ‘दह्या’मुळे ‘विरजण’ लागतं, वगैरे तमाशातील विनोदांचा उगम ह्या प्राचीन समजूतीत आहे.    

माकड हाड हे इतकं मोठ्ठं आणि रुंद असतं कारण ते पुं बीजाला संरक्षण पुरवतं अशीही समजूत इजिप्तकर बाळगून होते. म्हणून हे हाड पवित्र, म्हणजे सेक्रेड, म्हणून इंग्रजीत सॅक्रम!

वीर्यात पुंबीज  असतं ही अटकळ बरोबर होती पण ते निर्माण कुठे होते हे सूक्ष्मदर्शकाशिवाय कळणं अशक्यच होतं. मग वृषणांपासून ते योनीपर्यन्त आणि मेंदूपासून ते मेदापर्यंत विविध अवयव विविध संस्कृतींनी बीज निर्मिक म्हणवले होते.  ह्या सगळ्या कल्पनांमध्ये  एम्पेडॉक्लेस ह्या ग्रीकाचा मटका बरोबर लागला!! प्रत्येक पालकांकडून निम्मा ऐवज येतो. त्यात निम्मा जीव असतो. ह्या  जीवाचे अवयव मोडून मिसळून पुन्हा जोडले जातात. आणि जीव वाढीस लागतो; असं त्यांनी सांगितलं.  आता आपल्याला माहीत आहे की स्त्री पुरुष (Gametes) बीजे असतात.  प्रत्येक बीजात  निम्मी गुणसुत्रे (Haploid chromosomes)  असतात. गुणसुत्रे म्हणजे सूत्र रूपी मानवच की!  मग ह्या गुणसुत्रांची सरमिसळ होते (Recombination)  आणि एकमेवाद्वितीय असा मानव वाढीस लागतो!! म्हणजे एम्पेडॉक्लेस हा तर द्रष्टा दार्शनिकच म्हणायला हवा. कट्टर राष्ट्रवादी ग्रीक  म्हणतही असतील कदाचित. ‘अम्च्या पूर्वजांन्ना किनै सग्ळ सग्ळ ठाऊक होतं!’ अशी वडिलांची कीर्ती सांगणारे मूर्ख ग्रीस मध्येही असतीलच.    वास्तविक ‘बीज’ (gamete), ‘निम्मा जीव’ (Haploid chromosomes), ‘अवयवांची सरमिसळ’ (Recombination) वगैरे बद्दल त्याच्या आणि आजच्या संकल्पनांमध्ये ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, इतका फरक आहे. छे! छे!! जमीन आस्मानाचा फरक आहे.  आंधळ्या   पूर्व(ज) गौरवाची  वाट भावी रौरवाकडे जाते हेच खरं.

अर्थात अनेक  ग्रीक पितामहांचं योगदान मोठंच  होतं.  यात वादच नाही. त्याकाळी आणि पुढे कित्येक शतके,   विचारविश्वावर राज्य होतं ते अॅरिस्टॉटल या ग्रीकाचंच. उकिरड्यातून उंदीर, पाण्यातून मासे, मांसातून अळ्या, आपोआप उद्भवतात, (त्यांना आईबाप नसतात) असा त्याचा, ‘उत्स्फूर्त जनन’ सांगणारा  (Spontaneous generation) सिद्धांत होता.  अॅरिस्टॉटल इ. स. पूर्व चौथ्या शतकात होऊन गेला. त्यानंतर जवळपास वीस शतकांनंतर, १६५१ साली प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकांत,  विलियम हार्वेने  (तोच तो, रक्ताभिसरणाचा सिद्धांत मांडणारा) उत्स्फूर्त जनन आणि प्रिफॉर्मेशन या दोन्ही कल्पना धुडकावून लावल्या. एपीजेनेसिस असा एक नवीनच सिद्धांत त्याने मांडला.

सूक्ष्मदर्शक नुकताच हाती आला होता. त्यातून डोकावून पहाताच फलित बिजातील पेशी आणि मग त्यातून घडणाऱ्या उती (Tissue), असं काय काय पण अस्पष्टसं दिसत होतं. मंडळी आपल्या मगदुराप्रमाणे आणि मतांप्रमाणे ह्याच अर्थ लावायचा प्रयत्न करत होती. हे निरीक्षण एपीजेनेसिसला साजेसं  होतं. म्हणूनच हार्वेच्या मते वीर्यातील काही अ-भौतिक शक्तीमुळे स्त्रीबीजाच्या वाढीला चालना  मिळते. आधी दोन्ही बीजे निराकार असतात. या शक्तीचा स्पर्श होताच त्यांना आकार येऊ लागतो आणि गर्भ साकार होतो.

कोणतीही गोष्ट श्रुतीस्मृतीपुराणोक्त असली की झटक्यास समजमान्यता मिळते असा आपल्याकडचा अनुभव. हा आपल्या समाजाचा अवगुण असल्याचं सावरकर प्रभृतींनी दाखवून दिलेलं आहे. युरोपात त्याकाळी प्रत्येक विचाराला  बायबलचा आधार असणं महत्वाचं होतं. साऱ्या विचार विश्वावर बायबलचं सावट होतं म्हणा ना. प्रत्येक कल्पना ‘बायबलोक्त’ ठरवण्याच्या नादात कित्येक भरकटले. ह्यातलाच एक स्वामरडॅम. फलित पेशीचे विभाजन वर्णन करणारा पहीला हाच आणि अख्ख्या मानवकुळाचे मूळ  आदम आणि ईवच्या   इंद्रियांत असल्याचा   बायबलीय संदर्भ देणाराही  हाच. प्रिफॉर्मेशनची कल्पना उराशी असल्यानेच सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या इवल्या उतींना, इवले अवयव समजण्याची चूक त्याने केली.

ल्युवेनहोवेकने आपल्या पहिल्यावाहील्या सूक्ष्मदर्शकातून वीर्यातील हे ‘वळवळणारे किडे’; बघितले खरे (१६७७) पण ‘हे’ म्हणजेच ‘ते’ (म्हणजे पुंबीज), हे सिद्ध व्हायला बरीच उलथापालथ व्हावी  लागली. मुळात, ‘माझ्या  स्वतःच्या वीर्यात मी वळवळणारे किडे पाहीले’ हे सांगणंही धडसाचं होतं. ‘वीर्य कसं गोळा केलं?’ हा पहीला सवाल असणार होता. कारण  हस्तमैथुन हे तर पाप होतं. धर्ममतानुसार आजही पापच आहे. तेंव्हा संभोगानंतर ताबडतोब, ‘तिथले’ स्त्राव गोळा केल्याचं, ल्युवेनहोवेकने रॉयल सोसायटी ऑफ लंडनला लिहिलेल्या पत्रात (१६७७) आधीच स्पष्ट केलं आहे. सकल सौभाग्यवती, वज्रचूडेमंडित, पतीपरायण, सौभाग्यवती  ल्युवेनहोवेक यांचे हे सहकार्य विज्ञानाला उपकारक ठरले खास. 

  ल्युवेनहोएकला  पुरुषबीजाचे सूक्ष्म-दर्शन     घडले आणि त्या वळवळणाऱ्या जीवात प्रिफॉर्मेशनवाल्यांना  लघुरूप माणसंसुद्धा दिसायला  लागली की!! गोतीए नामे उत्साही संशोधकाला, अश्व-पुं-बीजात इवले इवले घोडे आणि कोंबड्याच्या वीर्यात इवले इवले कोंबडे सुद्धा दिसले!!! थोडक्यात मनी वसे ते सूक्ष्मदर्शकातून दिसे. मानवी मन असं स्वतःच स्वतःला फसवतं, याची जाणीव विज्ञानाला तेंव्हा होत होती. मानवी पुं बीजात लघुरूप  स्त्री-पुरुष असतात, त्यांच्या लघु कामक्रीडा चालतात आणि त्यातून लघु-मानव निर्माण होतात; असंही अगदी स्पष्ट  दिसलं काहींना. काही काळ ल्युवेनहोएकही हेच मत बाळगून होता. पण नवी नवी माहिती हाती येत गेली आणि तो बदलत गेला. प्रश्न फक्त बुद्धीचा किंवा प्रामाणिकपणाचा नव्हता. ते पाहीले वाहिले सूक्ष्मदर्शक होतेच तसे. प्रतिमा अस्पष्ट, धूसर दिसायची. फक्त मिळेल तेवढ्या  सूर्यप्रकाशात भागवावं लागायचं.  भिंगेही गोलमटोल असायची;  त्यामुळेही काही अडचणी होत्या.

पुढे या प्रिफॉर्मेशनवाल्यांतही दोन पंथ झाले. पुं-बीजात भावी जीव असतो आणि स्त्रीबीज निव्वळ  त्या जीवाला पोसते असे मानणारे ते पुंबीजवादी  (‘स्परमिस्ट’) आणि  स्त्रीबीजात भावी जीव असतो आणि वीर्य फक्त ‘शक्ती’ देते असे मानणारे ते स्त्रीबीजवादी  (‘ओव्हीस्ट’).

पण ह्या साऱ्या धबडग्यात लोरेंझो स्पालॅनझेनी या इटालियन ओव्हीस्टाने एक बहारदार प्रयोग योजला (१७७५) आणि लोकं फिदीफिदी हसायला लागली. ‘हा! हा! कार’ माजला म्हणा ना! वीर्यातील ‘शक्ती’शिवाय स्त्री बीजातील जीव वाढतो का नाही, हे तपासायचं होतं. मग त्याने चक्क नर-मादी बेडकांच्या जोड्या घेतल्या. त्यांना वेगळे वेगळे ठेवले. त्यातील काही   नर बेडकांना इवले इवले लंगोट घातले! ते मेणाने चांगले ‘सीलबंद’ केले आणि त्यांना इष्ट कर्तव्यावर दिले सोडून.   त्याच्या निरीक्षणानुसार, ‘लंगोटाचं काही बेडकांनी फार मनाला लावून घेतलं नाही. ते आपले मूळ उत्साहानेच  मादीच्या मागे लागले आणि रतले.’ पण अंडी काही फळली नाहीत. अर्थातच वेगळ्या डबक्यात काही बिनलंगोटीचे बेडुकही कामगिरी पार पाडतच होते. त्यांची ‘काम’गिरी मात्र भलतीच नेत्रदीपक होती. त्या डबक्यात  हा हा म्हणता  बेडुकमासेही वळवळू लागले.  म्हणजेच पुरुष ‘शक्ती’ लंगोटात अडकली होती आणि बेडुक उत्स्फूर्तपणे जन्माला येत नाहीत, अशा दोन गोष्टी त्याने एकाच फटक्यात सिद्ध केल्या. आज इटलीतील  स्कॅनडीअनो इथे स्पालॅनझेनीचा  पुतळा आहे. एका हातात भिंग आहे आणि दुसऱ्या हातात बेडुक. बेडकाने कमरेस गुंडाळलेले नाही! स्पालॅनझेनीने आहे!!

ही शक्ती वीर्यात असते हे तर सिद्ध झालं पण वीर्यतील पुंबीजात ती असते हे कळायला  अजून शतकभर लागणार होतं. सूक्ष्मदर्शकाखाली वीर्यात दिसणारे ते बेंगरुळ, कोट्यवधी,  वळवळणारे किडे, हेच  ह्या पुरुष शक्तीचे वाहक आहेत, हे कोणाच्याच पचनी  पडत नव्हते. अगदी स्पालॅनझेनीच्याही नाही. त्या किडयांचे बेंगरुळ रूप आणि अफाट संख्या पहाता हे स्वाभाविकच म्हणायचं...  आणि वळवळणारे असंख्य जीव तर डबक्यातल्या पाण्यातही दिसायचे. त्यांचं काय एवढं?  

पण पुढील  शतकभरात सूक्ष्मदर्शकांत आणि सूक्ष्म दर्शनात  भव्य प्रगती झाली. फलन म्हणजे अंतिमतः स्त्री आणि पुरुष बीजातील केंद्रकांचे (Nuclei) मिलन हे लक्षात आलं. फलित बीजाला तीन पदर सुटतात (Germ layers) आणि त्यातून विविध अवयव निर्माण होतात हे लक्षात आलं (बेर, १८२७). सी-अर्चीनच्या अंड्यात सी-अर्चीनच्या पुंबीजाने केलेला प्रवेश पाहीला  गेला (१८७५, हर्टविग). केंद्रकात रंगसुत्रे (Chromosomes) असतात (१८७९) यावरच आनुवंशिक गुण अवलंबून आहेत वगैरे बाबीही  यथावकाश प्रकाशात आल्या.

जवळपास एक सहस्त्रकभर चाललेली धडपड आणि फरपट संपुष्टात आली. पण ह्याला ‘धडपड आणि फरपट’ म्हणणे म्हणजे ज्या खात्रीने आणि विश्वासाने प्रत्येकाने आपापल्या थियऱ्या मांडल्या, त्याकडे डोळेझाक केल्यासारखे होईल. धर्मग्रंथ प्रामाण्याचा आणि आचार्य प्रामाण्याचा जमाना होता तो.  धर्ममताशी  आणि आचार्यमताशी सुसंगत कल्पनांना, पुरावा दाखवण्याच्या जाचातून, सूटच होती म्हणा ना.  निसंदिग्ध पुरावा, नेमके निकष, अचूक मोजमापे वगैरे भौतिक आणि रसायनात शक्य होतं.  जीवशास्त्रात ते अवघड होतं.  म्हणून असेल; पण ह्या वैज्ञानिक पद्धतीतील घटकांची जाणीव, जीवशास्त्रज्ञांना जरा सावकाश झाली.

वैज्ञानिक पद्धत ही काही अचानक गवसलेली, साक्षात्काराने उमजलेली, निमिषार्धात सुचलेली युक्ती  नाही. करा - चुका शोधा - चुका सुधारा - पुन्हा करा; असं ते सुष्टचक्र आहे. हे फिरत रहायचं, तर चुका ओळखून त्या मान्य करणे कळीचे  आहे.  पण धर्मग्रंथ प्रामाण्य आणि आचार्य प्रामाण्याच्या जमान्यात,  चुका शोधणारी यंत्रणा कशी मान्य व्हावी बरं? देव आणि गुरुदेव, यांची लुडबूड जितकी अधिक तितकी विज्ञान धारणा कमकुवत होणारच.

विज्ञानाची पद्धती वापरली तर अज्ञाताची पोकळी आज ना उद्या भरून  निघेल, असा समर्थ विश्वास आज विज्ञानाने दिला  आहे. पण हे लक्षात न घेता,  आज अज्ञात असलेली चीज सदा  अज्ञातच राहील अशी भावना  बळावली, की ही पोकळी मुळीच रिकामी  रहात नाही. असल्या रिकाम्या जागा कल्पनाशक्तीने भरून  काढण्याची, मानवी मनाला आदिम खोड  आहे. अज्ञाताचे स्पष्टीकरण सहसा दैवी (आणि दानवी) शक्तींच्या मदतीने दिले जाते. मग ह्या शक्तींबाबत विस्मय किंवा भय येते. पाठोपाठ उपासना, नैवेद्य आणि  नवस येतात. अज्ञाताचे आणि अज्ञानाचे उपास्य दैवत म्हणून ईश्वर (आणि सैतान)  कल्पना कामी येते.

विज्ञानाचा विकास झाला की अज्ञानाचा पैस आक्रसत जातो. जिथले स्पष्टीकरण प्राप्त होते तिथले विस्मय  आणि भय विरत जातात.  तिथली उपासनाही आक्रसत जाते. हेच पहा ना, देवीचा रोग आणि रोगाची देवी, दोन्हीही आज अस्तंगत झाले  आहेत. मग  ईश्वर, दैत्य, विस्मय, भय, उपासना इत्यादी;  अज्ञानाच्या उरलेल्या सांदीकोपऱ्यात ठाण मांडून बसतात.   अज्ञानाचे अधिष्ठात्रे हे ईश्वर अज्ञानेश्वर  म्हणायला हवेत आणि दानवांना (अज्ञान+दानव=) अज्ञानव म्हणता  येईल.

निसर्गातली कित्येक कोडी सुटलेली नाहीत हा काही दैवी शक्तीच्या मतीचा अथवा करामतीचा पुरावा होत नाही. अज्ञातापुढे नतमस्तक होण्यापेक्षा मानवी मतीला  आणि करामतीला इथे आव्हान दिसलेले इष्ट. 

 

प्रथम प्रसिद्धी

महा अनुभव

दिवाळी अंक २०२१

 

No comments:

Post a Comment