Friday 26 November 2021

नरनिवृत्ती

 

 

नरनिवृत्ती

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

९८२२०१०३४९

 

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन. महिला दिनाचे हे नर रूप. बालदिन बालांसाठी आणि फादर्स डे फादरांसाठी. पण जे बालही नाहीत आणि फादरही नाहीत अशा पुरूषांचे काय? असा विचार या मागे होता. त्रिनीदादच्या जेरोम तिलकसिंग यांनी १९९९ पासून हा जरा जोमाने सुरू केला.  १९ नोव्हेंबरच का? तर हा ह्या जेरोम तिलकसिंग यांच्या वडिलांचा वाढदिवस म्हणून! आणि हो, १९८९ साली, याच दिवशी, त्यांच्या देशाच्या फुटबॉल टीमच्या वर्ल्ड कपसाठीच्या निवडीमुळे  सारा देश एकवटला होता!! दिवसाची निवड ही अशी तद्दन पुरुषी निकषांवर आणि  पुरुषसुलभ गांभीर्याने   झालेली आहे.  आता हा  पुरुष दिनाचा संसर्ग पसरू लागला आहे. उत्सवी भारतीयांच्या ‘दिन दिन दिवाळीत’ आणखी एका उत्सवाची भर.

या वर्षी स्त्रीपुरुष सौहार्द अशी थीम आहे. सौहार्द म्हणजे मैत्रभाव वाढायचा तर समानधर्मा भेटायला हवा. स्त्रीधर्म(!) आणि पुरुषधर्म यात साम्यस्थळे शोधायला हवीत. म्हणून हा लेखन प्रपंच.

मेनोपॉज म्हणजे काय हे सर्वज्ञात आहे. सर्वश्रुत तरी आहेच आहे. ते नाही का, वाढत्या वयात बायकांची पाळी जाते मग त्यांना काय काय व्हायला लागतं. भर थंडीत घाम फुटण्यापासून ते अंगभर गरम वाफा जाणवण्यापर्यंत किंवा नैराश्यापासून ते डोके फिरण्यापर्यंत! ह्याचं मुख्य कारण स्त्रीबीजग्रंथीतून होणारा स्त्रीरसांचा (Female sex hormones) निर्झर आटणे आणि मुख्य परिणाम म्हणजे जनन क्षमता संपणे.

पुरुषांचेही वय वाढते. पुरुषरस  निवळतात. पण जनन क्षमता अचानक संपत बिंपत  नाही. थोडी मंदावते. पण अखेरपर्यंत  तेवत रहाते.  म्हणूनच जराजर्जर पुरुष बाप झाल्याच्या बातम्या, आपल्याला अधूनमधून वाचायला मिळतात.  एरवीही स्त्रीबीज निर्मिती महिन्यातून एकदा, तर पुरुषबीज निर्मिती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. शनिवारी हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी वगैरे भानगड नाही.

पण वय  वाढल्यावर, पुरुषरस (Androgens) निवळल्यावर; पुरुषांना नाही का काही त्रास होत? होतो ना. वय वाढलं की पुरुषांत देखील अनेक बदल दिसायला लागतात. शारीरिक आणि बौद्धिक थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, विस्मरण, स्नायू रोडावणे, पोट सुटणे, केस विरळ होणे, कामेच्छा कमी होणे, ताठरता मिळमिळीत होणे वगैरे. लिंगवैदूंच्या जाहिरातीच्या भाषेत सांगायचं तर,   ‘पूर्वीचा जोम आणि जोश’ आता रहात नाही. कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच हे अनुभव येत असले तरी सुमारे २ ते ५ % पुरुषांत त्रासदायक प्रमाणात ही लक्षणे दिसतात.  

बायकांचे एक बरं  आहे, पाळी बंद होणे, हे ऋतूनिवृत्तीचे वय झाल्याचे, एक व्यवच्छेदक लक्षण आहे.  एक पूर्णविराम.  पुरुषांच्यामध्ये असा पूर्णविराम आढळत नाही.  स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, मधूनच प्रश्नचिन्ह असं करत करत वाक्य जारी  रहातं.  ते संपतच नाही.  

पण महिलांमध्ये जसा मेनोपॉज (ऋतूनिवृत्ती) तसा पुरुषांमध्ये  अँड्रॉपॉज (नरनिवृत्ती) असतो का? किंवा का असू नये? किंवा असणारच की! अशी चर्चा सतत चालू असते. पण अँड्रॉपॉजची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या अजूनही नाही. मुळात अँड्रॉपॉज असा शब्द वापरावा; का त्याला अन्य काही नाव द्यावं, हेही अजून ठरलेले नाही. काहींच्या मते तर  अँड्रॉपॉज हा शब्द निव्वळ मेनोपॉजला  खुन्नस म्हणून काढला आहे! तर काही म्हणतात, मेनोपॉजच्या मानानी अँड्रॉपॉज हा अघळपघळ प्रकार असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने कुणी पहातच नाही. गरीब बिच्चाऱ्या पुरुषांना कुढत कुढत, मन मारून जगावं लागतं.

जे बदल होतात ते वयानुरूप होतात?, वाढत्या स्ट्रेसमुळे होतात?, जाडगुलेपणामुळे होतात?, का सोबतच्या डायबिटीसमुळे?, का  इतर  औषधांमुळे? का फक्त आणि फक्त नरनिवृत्तीमुळे आहेत? हा गुंता अजून सुटलेला नाही.

बरचसं पुरुषत्व  टेस्टोस्टेरोन ह्या पुरुषरसाशी निगडीत असतं. टेस्टोस्टेरॉनचा उगम वृषणामधल्या (Testes) लेडीग  पेशींमधला.   वयाबरोबर या कमी होतात. यांना मेंदूकडून येणारे प्रोत्साहनपर संदेश कमी होतात. ह्या संदेशांना प्रतिसाद अशक्त होतो. त्यामुळे टेस्टोस्टेरोन  कमी निर्माण होतो. इतकंच काय,  वयाबरोबर शरीराकडून  टेस्टोस्टेरोनला मिळणारा प्रतिसादही कमी कमी  होत जातो. शरीरसुद्धा, आज वेड्या पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, असं काहीतरी म्हणत असतं.

टेस्टोस्टेरोन  बद्ध (९८%)  आणि मुक्त (२%) अशा दोन्ही अवस्थांत आढळतो. पैकी बद्ध तो निरुपयोगी.  मुक्त तेवढा उपयोगी.  हा मुक्त टेस्टोस्टेरॉन आणि त्याची इतर काही कार्यप्रवण (जैवोपलब्ध Bioavailable)  रूपे  महत्वाची  आहेत.  वयाबरोबर मुक्त टेस्टोस्टेरोनमध्ये वार्षिक १% घट होत रहाते. काही औषधांचा सहपरिणाम म्हणून आणि   वाढत्या वयाशी संबंधित निरनिराळ्या आजारांमध्येही  मुक्त टेस्टोस्टेरोन कमी होतो. पैकी आटोकाट प्रयत्नाने’ आवर्जून आटोक्यात ठेवावा असा घटक म्हणजे, पोटाचा वाढत घेर.

पण अमुक इतक्या प्रमाणात टेस्टोस्टेरोन घटलं  म्हणून तमुक लक्षणे उद्भवली असा एकास एक परिणाम इथे दिसत नाही. त्यामुळे नेमकं संशोधनही जिकिरीचे आहे.

जर का टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे इतकं  सगळं  होत असेल तर ती कमतरता भरून काढणारी तारुण्याची  गुटिका असायला हवी. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, नरनिवृत्तीच्या  तक्रारी घेऊन येणाऱ्या, प्रत्येक पुरुषाला सहजपणे हातावर टेकवता येईल, अशी गुटिका नाहीये.  ज्यांचं  अगदीच अडलं  आहे अशांना प्रायोगिक तत्त्वावर, साधक-बाधक विचार करून, टेस्टोस्टेरोन देता येतं.  थेट टेस्टोस्टेरोनच्या गोळ्या विशेष उपयोगी पडत नाहीत.  गोळीतले टेस्टोस्टेरोन शरीरात पोचायच्या आधी लिव्हरमध्ये खाल्लास केले जाते. असं होऊ नये म्हणून काही खास प्रकार वापरावे लागतात. इंजेक्शन,  जेल आणि पॅच (चिकटपट्टी) अशा स्वरूपामध्येही  हे उपलब्ध आहे. पण या साऱ्याच्या सुयोग्य डोसबाबत  आणि सुयोग्य कालावधीबाबत  अजूनही संदिग्धता आहे. आधी ते  काही कालावधी पुरतं देऊन, त्यानंतर त्याचे परिणाम आणि सहरिणाम पहात पहात, आवश्यकतेनुसार ते चालू ठेवायचे आहे. उदाहरणार्थ  प्रोस्टेट वाढणे आणि प्रोस्टेटचा   कॅन्सर देखील टेस्टोस्टेरोनशी संबंधित असतो.  त्यामुळे टेस्टोस्टेरोन द्यायचं झालं तर पीएसए आणि इतर तपासण्या करून दमादमाने द्यावे लागते.

टेस्टोस्टेरॉनमुळे चरबीचं प्रमाण कमी होतं,  हिमोग्लोबिन वाढतं (कधी जरा जास्तच वाढतं), स्नायू जरा पिळदार होतात, काही महिने औषधे घेतली तर हाडांची घनताही वाढल्याचे आढळते. एकूणच बरं वाटायला लागतं. कामेच्छासुद्धा वाढते.  पण काम-गिरी  मात्र पूर्ववत होईल असं नाही.  कारण ती बिघडण्यासाठी इतरही अनेक कारणं असतात (डायबेटीस, तंबाखू वगैरे). गरजेनुसार या बरोबर ते जगप्रसिद्ध  व्हायग्राही देता येते.

टेस्टोस्टेरॉनचे असे अनेक इच्छित परिणाम दिसत असले तरी त्याने ईप्सित साध्य होतं का, म्हणजे नरनिवृत्ती सुखावह होते का? ते सरसकट सगळ्यांना द्यावे का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. यासाठीचा पुरावा तसा लेचापेचा आहे.

थोडक्यात नरनिवृत्ती असतेही आणि नसतेही, त्याला उपचार आहेतही आणि नाहीतही.  मुळात बायकांचे सगळेच गहन आणि गूढ असतं असा समज आहे.  पण पुरुषांची ‘ही’ भानगड अजून भल्याभल्यांना उलगडलेली  नाही.

स्त्री पुरुष सौहार्दासाठी एवढे साम्य सध्या रगड.

जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

 

प्रथम प्रसिद्धी

लोकरंग पुरवणी लोकसत्ता

२७/११/२०२१

 

 

 

No comments:

Post a Comment