Wednesday, 15 December 2021

हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

1 comment:

  1. Excellent review of all books. You have a great talent to summarize complex thoughts. Your Marathi is superb. Keep writing.

    ReplyDelete