Friday 17 December 2021

मी अल्बर्ट एलिस

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १८ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ६
पुष्प १४ 
पुस्तकाचे नाव 
मी अल्बर्ट एलिस  
लेखक अंजली जोशी 
शब्द प्रकाशन 
पाने ३४०  
किंमत रू ३९०/-  

परिचयकर्ता डॉ शंतनु अभ्यंकर

 ‘मी अल्बर्ट एलिस’, हे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेलं मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे.  ही एक  चरित्रात्मक कादंबरी आहे.  
डॉ. अल्बर्ट एलिस हे  अमेरिकन मानसोपचारतज्ञ. हे औषध देणारे डॉक्टर नव्हेत. हे सल्ला देणारे डॉक्टर.  विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र ही त्यांची देणगी.  या कादंबरीतून अल्बर्ट एलिस यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य कसे विकसित होत गेले  याची तोंडओळख आपल्याला होते.
आजवर आपण बरीच  स्वमदत पुस्तके वाचली असतील.  ती वाचून आपण काही दिवस भारावूनही गेला असाल आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असेही झाले असेल. 
प्रचंड प्रेरित होऊन आपण माळ्यावरून कॅनव्हासचे बूट काढले असतील आणि महिन्याभरात ते आल्यापावली माळ्यावर गेले असतील किंवा एखाद्या अपमानाने खट्टू होऊन तुम्ही वर्षानुवर्ष कुढत बसला असाल किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या रिपूंशी दोन हात करता  करता  तुम्ही थकत किंवा वहावत किंवा  बहकत गेला असाल. ‘लोक काय म्हणतील’ नावाच्या पिशाच्च-भयापोटी तुम्ही कितीतरी इच्छा आकांक्षा मारल्या असतील किंवा अनिच्छेने लोकानुनयाचा मार्ग धरला असेल. सगळं कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था तर कितीतरी वेळा कितीतरी बाबतीत झाली असेल....      
पण या साऱ्यावर उतारा  म्हणून हे पुस्तक नाही बरं. अल्बर्ट एलिस यांची ही चरित्रात्मक कादंबरी म्हणजे सेल्फहेल्प  पुस्तक नाही.  पण आपला जीवन विषयक दृष्टिकोन बदलण्याची क्षमता या पुस्तकांमध्ये आहे.  
एखाद्या प्रसंगाकडे आपण कसे पाहतो, आल्या प्रसंगाला  आपण कसा प्रतिसाद देतो, यावर सगळं काही अवलंबून आहे; हा अल्बर्ट एलिस यांचा प्रमुख सिद्धांत. 
तत्क्षणी, जणू प्रतीक्षिप्त, म्हणून होणारी प्रतीक्रिया ही बरेचदा चुकीची आणि नंतर पश्चाताप पावायला लावणारी असते. डॅनियल काहनमननी लिहिलेल्या ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ मध्ये या विचारासाठी शास्त्रीय पुष्टी सादर केली आहे. या प्रतिसादावर आपण नियंत्रण मिळवू शकलो, सर्वात विवेकी, सुलभ, सुकर (आणि फायदेशीर) प्रतिसाद निवडण्याची सवय आपण लावून घेऊ  शकलो तर आपलं जीवन आनंदी होईल, असं त्यांचं सांगणं.  

हे शिकण्याची पद्धत म्हणजे विवेकनिष्ठ विचारपद्धती आणि हे वापरण्याचे तंत्र म्हणजे   विवेकनिष्ठ मानसोपचार. वेड्यांइतकीच  शहाण्यांसाठीही  ही विचार-वाट आहे. आपले आपणच यातून शिकत जायचं, सुधारत जायचं आहे. अनेक पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता, हे निवडण्याचा आधार म्हणजे विवेकनिष्ठ विचार.  ही संपूर्ण कल्पना अल्बर्ट एलिस यांना सुचली कशी, त्यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली कशी, त्यावरचे अभ्यास केले कसे आणि स्वतःच्या आयुष्यात बदल घडवले कसे; हे या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते. 

• परिस्थितीचे विवेकी मूल्यमापन, 
• नव्या संदर्भात परिस्थितीचे आकलन, 
• हास्य आणि विडंबन रसाचा वापर, 
• बागुलबुवांना थेट सामोरे जाणे आणि 
• अतार्किक विचारांना खुले आव्हान देणे 
अशी पंचतंत्रे डॉक्टरांनी सांगितली आहेत. कादंबरीच्या माध्यमातून ह्या तंत्रांच्या उत्क्रांतीचा अंदाज येतो. 

अल्बर्ट एलिस यांना काही आजारांमुळे लहानपणापासूनच भरपूर पथ्ये पाळावी लागत होती. मैदानी खेळ बंद, सलग वाचन बंद. असं झाल्यावर त्यांनीही स्वतःला तो जगप्रसिद्ध प्रश्न विचारला; *मीच का?*
  
पण ह्या प्रश्नाला कुरवाळत रडण्यापेक्षा त्यांनी या, अविवेकी प्रश्नाला मनातून हद्दपार कसं करायचे याचे तंत्र शोधून काढले. अडचणी आणि निराशा  त्यांच्याही पदरी आली. पण आपल्या विचारांना योग्य वळणावर आणण्यासाठी त्यांनी चार संदेश सूत्रे तयार केली होती.
१) काही मिळवायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही.
२) प्रतिकूल परिस्थिती हे आपल्याला मिळालेले वरदान आहे.
३) अपरिवर्तनीय परिस्थितीबाबत ऊर पिटून घेण्यापेक्षा तिचा स्वीकार योग्य.
४) हे ही दिवस जातील. 
(अर्थात हे सांगायला एलीस कशाला हवा? ‘कष्टेवीण फळ नाही’, ‘आपत्ती हीच प्रगतीची संधी’, ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’  आणि ‘हे ही दिवस जातील’; ही ज्ञान मौक्तिके तर रिक्षाच्या मागे लिहिलेली असतात!)

पण हे सारं शहाणपण सुसूत्रपणे मांडण्याचं काम एलीस यांनी केलं. त्याला अभ्यासाची जोड देण्याचं काम त्यांनी केलं. परस्पर विसंगत पर्यायातून निरक्षिर विवेक करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले.  प्रत्यक्ष व्यवहारात, उपचारात याचा तंत्रशुद्ध उपयोग त्यांनी केला. ही त्यांची महती.  
हे पुस्तक वाचून प्रेरित होणे आणि डॉ. अल्बर्ट एलीस यांचे अन्य लिखाण अभ्यासणे (जे  फारसे मराठीत उपलब्ध नाही),  त्यांची विचारधारा समजावून घेणे आणि शक्यतर अंगी बाणवणे ही पुस्तकाची महती.

No comments:

Post a Comment