Friday, 17 December 2021

रविंद्र मनन, रविंद्र वीणा आणि रविंद्र झंकार

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १७ डिसेंबर २०२१ 
पुष्प १४ 
आजचे पुस्तक क्रमांक (५)  (अ, ब आणि क)
पुस्तकाचे नाव 
*रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार*
(कविता)
लेखक काका कालेलकर 



रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार
डॉ. शंतनू अभ्यंकर 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक आणि रसिक परंपरांचे प्रतिनिधी आहेत.  त्यांच्या गीतांजलीला  जागतिक वाङमयात विशेष स्थान आहे.  गीतांजलीतील प्रत्येक गीतात व्यक्त झालेल्या रवींद्रांच्या जीवन तत्वज्ञानाची उकल,  रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार या तीन पुस्तकातून  आचार्य कालेलकर यांनी आपल्या सोप्या शैलीत केली आहे.  प्रत्येक पुस्तकात मूळ बंगाली गीत, त्यातील भाव विशद करणारे मननीय चिंतन आणि कठीण बंगाली शब्दांचे अर्थ देण्यात आले आहेत. गीतांचे मराठी भाषांतर नाहीये.  

हे सर्व आपले कारावासातील साथी श्री. बिसेन यांच्या मदतीने कालेलकर यांनी केले आहे.  कारावास हा अशा पद्धतीने त्यांच्या आणि रसिक वाचकांच्या पथ्यावरच पडला म्हणायचा.  एकूण 157 गीतांपैकी 129 गीते इथे आहेत उरलेली 28 गीते राहिली ती राहिलीच. बहुतेक पुन्हा तुरुंगात टाकले असते तर जमले असते!! 

मला रवींद्र-गीतांचा आणि  रवींद्र-संगीताचा पहिला परिचय झाला तो शाळेत.  शाळेच्या सभागृहाबाहेर रवींद्रनाथांचा पूर्णाकृती पुतळा होता आणि शेजारी ‘व्हेअर द माइंड इज विदआऊट फियर’ ही त्यांची प्रसिद्ध  कविता लिहिलेली होती. ती आपोआप पाठच झाली. शाळेत चित्रकला आणि शिल्पकला शिकवण्यासाठी शांतिनिकेतनचे स्नातक असलेले, रवींद्र डे नावाचे, बंगाली बाबू शिकवायला होते.  त्यांनी आम्हाला शांतिनिकेतनची गोष्ट सांगितली.  चित्र आणि शिल्पकला तर त्यांना अवगत होतीच, पण सतार, तबला आणि गायनकलाही अवगत होती.  त्यांनी ‘चांडालिका’, ‘आम्रपाली’ अशी नृत्यनाट्ये बसवली. रवींद्रनाथांची अतिशय सुमधुर अशी गाणी आम्हाला शिकवली. ‘ओरे गृहबाशी’, ‘ए नहे मोर प्रार्थना’, ‘अंतर्मन विकसित कारो’, ‘एकला चालो रे’ ही गाणी चालींसकट आजही लक्षात आहेत. बंगाली भाषेवर आणि गीत-संगीतावर मी लट्टू झालो ते  तेंव्हापासून. पुढे पुलंचे, ‘रविंद्रनाथ: तीन व्याख्याने’, वाचलं आणि पुलंना पत्र लिहिले! मम भाग्य एवढे थोर की त्यांनी उत्तर दिलं. तो अक्षय अक्षरठेवा आजही मी जपून ठेवला आहे. 

त्यामुळे कालेलकरांची ही तिन्ही पुस्तकं दिसताच मी घेतली आणि कवितासंग्रह मुळीच वाचू नयेत, अशा पद्धतीने वाचली.  म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतच गेलो. तिथे  ‘अंतर्मन विकसित कारो’सारखी परिचित गीते भेटली आणि तिथेच  ‘सतार’ किंवा ‘ए नहे मोर प्रार्थना’सारख्या साक्षात्कारी कविता आपले तळपते वैभव दाखवत मनात रूजल्या.  

आजही एखाद्या आर्त किंवा कृतार्थ क्षणी  रवींद्रनाथांची एखादी ओळ मनात तरळून जाते आणि जणू दीपोत्सव सुरू होतो. अतिशय तरल, अतिशय भावगर्भ, अर्थपूर्ण, प्रासादिक, रसाळ आणि गेय रचना हे रवींद्रनाथांच्या काव्याचे वैशिष्ठ्य. 

शिवाय बंगाली आणि मराठीमध्ये बरेच साधर्म्य आहे. कालेलकरांची टिप्पणीही रसग्रहण म्हणावे अशी आहे.   त्यामुळे थोडा प्रयत्न करताच अर्थाचा बराच उलगडा होतो.  काहीवेळा अर्थाचा अनर्थही होतो.  ‘भीषण किंवा दारुण सुंदर’ म्हणजे ‘खूप सुंदर’; ‘बोका’ म्हणजे ‘वेडा’, असे काही अनर्थकारी शब्द. 

रवींद्रनाथ हे खरे आनंदयात्री कवी.  शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याद्वारे या सृष्टीचैतन्याचा आस्वाद मोठ्या रसिकतेने घ्यावा, उगाच संसार असार आहे अशा निरीच्छ,  नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा हे जीवन हे तर सौंदर्याचे आणि आनंदाचे निधान आहे; हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्या ‘सतार’ या गीताचा, मीच केलेला स्वैर मराठी अनुवाद इथे देतो आहे. मूळ बंगाली गीताच्या गद्य रसास्वादावर आधारलेला हा मराठी पद्यावतार आहे. तेंव्हा वाचकांपैकी जाणकारांनी ह्यातील गोच्या जरूर लक्षात आणून द्याव्यात आणि हे गौडबंगाल आणखी उलगडावे.  


सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll 

दिवसाचा सरला मेळा 
मैफिलीच्या झाल्या वेळा 
मांडेल ‘तो’च  स्वरखेळा  
साथ द्यायला तुझी सतार
 
सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

उघड तुझे तू सताड दार
अवकाशाचा घे अंधार 
सप्तलोकीची शांती अपार 
भुवना भरु दे अपरंपार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

विसर जुन्या सूरांचे सार,
तमी दे अर्पून गीत, असार 
विसर होती तुझी जुनी सतार 
छेडी नव्याने नवे हत्यार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

यातील रविंद्रनाथांनी केलेली प्रार्थना तर प्रतिभेची आणि सच्च्या आळवणीची परिसीमा आहे. तुझी मदत मला नकोय, कीव, करुणा,  दया, बक्षीस; काही काही नकोय.  मला स्वतःला सबळ करायचे आहे. एवढं साधेल असं तू बघ; अशी जगावेगळी मागणी टागोर करतात. क्षणभर असं वाटतं की रविंद्रनाथांचा हा सांगाती,  ‘बोट धरोनीया चालविशी’ असा नाहीये. उलट रविंद्रनाथच  त्याला बोट धरून चालवत आहेत;  आपल्याला काय हवं ते दाखवताहेत.    

ए नहे मोर प्रार्थना/ही न माझी प्रार्थना 

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा
माझ्या दुःखी व्यथित मनाचे तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही 
दुःखावर मला विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही
माझं मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा 
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही 
माझं मन खंबीर रहावं एवढीच माझी इच्छा 
माझं तारण तू करावस ही माझी प्रार्थना नाही 
तरुन  जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा 
माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही 
ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा 
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच 
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्या विषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा
भावानुवादकर्ता (मला तरी) अज्ञात 

कॉलेजमध्ये असताना ही कविता माझ्या टेबलासमोर लावलेली होती. कॉलेज संपलं. मित्रांची पांगापांग चालली होती. रूममधल्या माझ्या सख्ख्या मित्राने माझी आठवण म्हणून कवितेचा कागद ठेऊन घेतला. आजही तो त्याच्या टेबलवर विराजमान आहे. 
परवा एका पेशंटनी त्याला विचारलं, ‘ही कविता तुम्ही कुठून मिळवली?’ मग त्यानी कवितेची  गोष्ट सांगितली. 
तो पेशंट म्हणतो कसा, ‘ओह, शांतानू, आमी ताके कोबिता सीखीयेची! (त्याला मीच शिकवली ही कविता!)’ 
आणि कवितेमुळे माझे लाडके सर, रवींद्र डे,  मला पुन्हा भेटले.

No comments:

Post a Comment