Tuesday, 21 December 2021

अंग बाहेर येणे

अंग बाहेर येणे  
डॉ. शंतनू अभ्यंकर 

संसाराचा गाडा ओढून जीर्णशीर्ण झालेले आपले शरीराचे मुटकुळे घेऊन सुरकुतलेल्या आज्जी माझ्या पुढ्यात बसलेल्या असतात. 

‘काय होतंय?’ असं विचारताच त्या म्हणतात; ‘आता काय सांगायचं प्वोरा तुला; तू तर माझ्या नातवावाणी दिसतोयस, ग्वोरापान!’

माझं कौतुक मी सराईतपणे कानाआड करतो पण जे काही होतंय ते सांगणं आज्जींना जड जातंय एवढं मला समजतं. शेजारी बसलेला, पेन्शनीकडे झुकलेला, आज्जींचा लेक हळूच सांगतो, ‘तेsss अंग बाहेर येतंय म्हणतीए.’

मग आपोआपच माझ्या डोळ्यापुढे त्यांच्या घरी घडून गेला असणार असा प्रसंग येतो. बरीच वर्ष हे दुखणं आईनी अंगावर काढले असणार. मग नुकतेच ‘दूर देशीचे प्रौढ लेकरू’ गावी आलं असणार. माजघरातील मिणमिण उजेडात त्या वृद्ध काकणांनी आधी त्याला कुरवाळले असणार आणि मग जरा आडवळणाने आपली व्यथा सांगितली असणार. मग इतके दिवस न बोलल्याबद्दल आईने लेकाची बोलणी खाल्ली असणार. तरीही दवाखान्यात यायला का कू केली असणार. आता आज्जी इतक्या संकोचणार की तपासणीसाठी निजणार ते पदराने चेहरा झाकूनच!! हे सगळं दरवेळी तस्सच घडलेलं असतं आणि घडतं.  

अंग बाहेर येणे म्हणजे योनीमार्गातून आतले अवयव बाहेर डोकावणे. जसा खिसा उलटा बाहेर येतो तसं काहीतरी. सुरवातीला गर्भ पिशवीचे तोंड, मग थोडासा भाग (Uterine prolapse) आणि कधीकधी तर संपूर्ण गर्भपिशवी योनीमार्गाबाहेर सरकलेली आढळते (Procidentia). या गर्भ पिशवीच्या पुढे मूत्रमार्ग आणि मूत्राशय असते आणि मागे मलाशय असते. हे अवयव, गर्भपिशवी बरोबर, खाली उतरतात. अर्थात खाली उतरतात याचा अर्थ हे अवयव बाहेर डोळ्यांना दिसतात असं नाही. तर बाहेर आलेल्या योनीमार्गाच्या त्वचेखाली यांचे फुगवटे आहेत, हे लक्षात येतं.  

अंग बाहेर येणे हा वयस्कर स्त्रियांमध्ये आढळणारा प्रकार आहे. विशेषतः गरीब, ग्रामीण, वर्षानुवर्ष काबाडकष्ट करणाऱ्या, कुपोषित, बहुप्रसवा महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. वयस्क, स्थूल महिला, बद्धकोष्ठता, सततचा खोकला अशा कारणेही अंग बाहेर येते. बरीच आणि पाठोपाठची बाळंतपणे, अवघड, वेळखाऊ, चिमटा/वाटी (Forceps/Ventouse) लावून वगैरे झालेली बाळंतपणे, मोठ्या आकाराची बाळे या साऱ्यामुळे कटी तळाच्या स्नायूंना इजा होते. ते अशक्त होतात आणि परिणामी अंग बाहेर येते. 

कधी कधी अगदी खात्यापित्या घरच्या स्त्रियांमध्ये किंवा तरुणींमध्ये देखील हा प्रकार आढळतो. अशावेळी मुळातील आधाराच्या दोऱ्याच सैल आणि अति लवचिक असल्याचा हा परिणाम असतो. काही वेळा पिशवी काढल्यावर देखील उरलेला योनीमार्ग असा उलटा बाहेर येतो. पण हे प्रकार क्वचित दिसतात तेंव्हा त्याबद्दल इथे इतकेच पुरे. 

गर्भपिशवी एखादा तंबू ठोकावा तशी कटीभागामध्ये ठोकलेली असते. तंबुला जशा तळाशी मध्यावर आणि माथ्याशी दोऱ्या लावून, तो ताणून धरलेला असतो, तशी गर्भपिशवीदेखील तळाशी, मध्यावर आणि माथ्याशी ताणून धरल्यासारखी असते. पैकी तळाच्या दोऱ्या आणि स्नायू बहुतेक भार वाहत असतात. मधल्या आणि वरच्या दोऱ्या या शोभेच्या मात्र. या तळाच्या दोऱ्या आणि/किंवा स्नायू सैल झाले की गर्भपिशवी आपली जागा सोडून कटी भागातून योनीमार्गात उतरते आणि कधीकधी पूर्ण बाहेर पडते. अशा महिलांना बरेच त्रास होतात. सतत कंबर दुखणे, चालताना, बसताना त्रास होणे, सतत जड जड किंवा ओढल्यासारखे वाटणे (उभ्याने काम केले की हा त्रास वाढतो. झोपून आराम वाटतो.), खाज, स्त्राव असे अनेक. अशा स्थितीत शरीरसंबंध सुखावह कसे रहातील? पण याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. पेशंटही नाही आणि डॉक्टरही नाही. एकदा कटीतळाचा आधार लेचापेचा झाला की बाकीचे अवयवही जागा सोडून खाली सरकतात. त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली म्हटल्यावर दुसरे काय होणार? मग मूत्रमार्ग खाली उतरला असेल (cystocele), तर लघवीवर नियंत्रण नसणे, वारंवार लघवीला इन्फेक्शन होणे, अंग आत ढकलल्याशिवाय लघवी न होणे, असे त्रास होतात. कधी कधी आतडी, मलाशय वगैरेही खाली उतरतात (Rectocele) आणि त्यांचेही फुगे दिसायला लागतात. 

अंग बाहेर येणे, हे किरकोळ असेल तर काही विशेष उपचार लागत नाहीत. वजन कमी करणे, खोकला, बद्धकोष्ठ यावर जरूर ते उपचार करणे, जड काम टाळणे, कटी तळाचे खास (केगेलचे) व्यायाम वगैरेचा कमी अधिक फायदा होतो. फायदा होतो म्हणजे बाहेर आलेले अंग आत जात नाही पण त्यापासूनचा त्रास मंदावतो. आतमध्ये बसवायची, गर्भपिशवी आतच राहील अशी योनीमार्गात ठेवायची प्लास्टिकची रिंग (Pessary) वगैरे प्रकार केले जातात. केले जातात म्हणण्यापेक्षा केले जायचे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण याचा फारसा उपयोग होत नाही. रिंग घालणे, काढणे, स्वच्छ करणे, त्यातून कधी जखम उद्भवली तर निस्तरणे, सगळेच जरा कटकटीचे असते. त्यामुळे या त्रासावर अक्सीर इलाज म्हणजे ऑपरेशन करून घेणे. त्यामुळे त्रास असेल तर ऑपरेशनला पर्याय नाही. वयस्कर स्त्रीयांमध्ये गर्भ पिशवी काढून, इतर अवयव वरती ढकलून, योग्य जागी टांगले जातात. मूत्राशय, आतडी, मलाशय असे एकेक भाग नीट तपासून, पुन्हा मूळ स्थानी सरकवून, आवश्यक ती बांधबंदीस्ती करून, टाके घातले जातात. तरुण महिलांमध्ये, ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांच्यामध्ये, गर्भपिशवी न काढता ती नुसतीच वर टांगण्याची शस्त्रक्रिया करता येते.  

नेमके कोणते अवयव, किती प्रमाणात बाहेर आले आहेत?, लघवीवर नियंत्रण सुटले आहे का?, पेशंट आयुष्याच्या आणि पुनरुत्पादनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे?, या सगळ्या बाबी विचारात घेऊन शस्त्रक्रियेचे स्वरूप ठरवले जाते. सहसा योनीमार्गे, क्वचित पोट उघडून आणि आता काही प्रकारात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ऑपरेशनचा ताबडतोब आणि चांगला परिणाम होतो. सुमारे 20% पेशंट मध्ये काही वर्षानी, खरंतर काही दशकांनी, पुन्हा असा काही प्रकार उद्भवू शकतो. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार दुरुस्त करावा लागतो. 

अंग बाहेर येणे हा प्रामुख्याने गरीबाघरचा आजार. कॉलेजमध्ये शिकताना अशा भरपूर केसेस बघायला मिळतात. डॉ. पुरंदरे, डॉ. शिरोडकर वगैरे भारतीय डॉक्टरांनी अशा या शस्त्रक्रियांच्या तंत्रात महत्वाची भर घातली आहे. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी तंत्रे विख्यात आहेत. सर्जरी शिकताना सुरवातीपासून बिलरॉथ, हॅलस्टेड, वर्धाईम्स वगैरेंचा भारदस्त वावर असतो. अचानक पुरंदरे आणि शिरोडकर भेटतात आणि बरं वाटतं; दूर देशी कोणी गाववाला भेटावा तसं.

No comments:

Post a Comment