Wednesday, 15 December 2021

चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनांक १६ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ४  

पुस्तकाचे नाव 
*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान*
(प्रबंध) 
लेखक सदाशिव आठवले 
प्राज्ञपाठशाळा, वाई. 
पाने ९८  
प्रथमावृत्ती १९५८, 
तिसरी आवृत्ती १९९०; किंमत रू १००/- 

*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान 
परिचयकर्ता डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई*

चार्वाक हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. या नावाचा संबंध बुद्धीप्रामाण्यवादाशी  आहे अशी ओझरती माहिती असते आपल्याला. चार्वाक, लोकायत किंवा बाहर्स्पत्य तत्वज्ञान म्हणून ही विचारधारा प्रसिद्ध आहे.  
चार्वाक दर्शनाचा, म्हणजेच तत्वज्ञानाचा थोडक्यात आढावा घेणारे पुस्तक म्हणजे, ‘चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान’.  

प्राज्ञपाठशाळेची बरीच प्रकाशने  गाजली. पण त्यातलं हे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी लिहिलेले ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ विशेष गाजले.  

या पुस्तकामध्ये नऊ प्रकरण आहेत.   सुरुवातीला विषय प्रवेश मग चार्वाकाची  सूत्रे आणि त्यांचा ऐतिहासिक मागोवा लेखकानी घेतलेला आहे.  मग चार्वाकवाद नेमका काय आहे याचं वर्णन केलेले आहे.  

फक्त प्रत्यक्षप्रमाण हेच प्रमाण मानणारे असे हे चार्वाकवादी  लोक होते.  वेद अपौरुषेय नाहीत, त्यात केवळ पूर्वजांनी रचलेल्या कविकल्पना आहेत;  मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या कल्पनांपेक्षा आजूबाजूच्या जगाचा सुखदुःखासहीत स्वीकार करणे हे अधिक श्रेयस्कर आहे, अशी त्यांची मांडणी आहे. मोक्ष मिळावा म्हणून आहे त्या आयुष्यात स्व-पीडन  करून घेणे; साधनसामुग्रीची, संसाधनांची नासधूस करणे; जीवनाकडे सतत निराश आणि नकारात्मक दृष्टीने पाहणे; हे जीवन केवळ माया  असून सर्वस्वी  दुःखमय आहे, संसार असार आहे, वगैरे वगैरे भ्रम सतत उराशी कुरवाळत बसणे या सगळ्यावर चार्वाकांनी कठोर टीका केली आहे. 

चार्वाक नामे कोणी एकच  ऋषी किंवा मुनी  नव्हता असं दिसतं.  चार्वाकांनी लिहिलेले  एकसंघ असे लिखाण, ग्रंथ,  इतिहासाच्या पोटात लुप्त झाले आहेत. कदाचित असा एखादा ग्रंथ त्यांनी निर्माण केलाही  असेल.  पण सातत्याने आणि सगळीकडूनच विरोध असल्यामुळे असा ग्रंथ इतिहासाच्या पोटात गडप झाला असण्याची शक्यता जास्त आहे. 
चार्वाक दर्शन असा ग्रंथच उपलब्ध नसल्यामुळे,  चार्वाकांचे नेमके विचार काय होते, हे आपल्याला त्यांच्या विरोधातल्या लिखाणातून कळतं.  भारतीय तत्वज्ञान परंपरेत पूर्वपक्ष-उत्तरपक्ष अशा पद्धतीने विचार मांडण्याची, मंडन-खंडनाची पद्धत होती.  त्यामुळे चार्वाकांच्या टीकाकारांनी पूर्वपक्षांमध्ये, ‘चार्वाक असे असे म्हणतो’ अशी मांडणी केलेली दिसते आणि मग ते मत  खोडून काढण्यासाठी उत्तरपक्ष लिहिलेला दिसतो. अशा पद्धतीने अप्रत्यक्षरीत्या आपल्याला चार्वाकांचे विचार समजावून घ्यावे लागतात.  

खरंतर वेद नाकारणाऱ्या  तीन विचारधारा इतिहासात दिसतात. चार्वाक, बौद्ध आणि जैन.  बौद्ध आणि जैनांनी वेद नाकारले तरी पुनर्जन्म, स्वर्ग-नरक वगैरे कल्पना ते बाळगून होते.  जे प्रत्यक्ष आहे तेवढेच प्रमाण असं मानणारे फक्त चार्वाकच. 

 सृष्टीबद्दल कुतूहल तर दोन्ही पक्षांना होतं, पण विज्ञान कल्पनेचा शोध लागण्याआधी, स्वर्ग-नरक ‘आहे’ आणि ‘नाही’ हे दोन्ही युक्तिवाद तितकेच पोकळ होते.  अर्थात त्याकाळी आसपास काय घडते, कसे घडते, हे समजण्यासाठी पंचेंद्रिय हीच मर्यादीत साधने  माणसाकडे होती.  आता आपल्या डोळ्यांना दुर्बिणी आणि सूक्ष्म दर्शक फुटले आहेत,  कानांना रडार फुटले आहेत. असे करता करता आपल्या पंचेंद्रियांना एरवी  गोचर नाही, अशी सूक्ष्म आणि महा सृष्टी आपला मेंदू आता कवेत घेऊ शकतो. माणसाच्या आकलनाची क्षितिजं कितीतरी विस्तारली आहेत. त्यामुळे तेंव्हापेक्षा शब्दप्रामाण्य नाकारणे, अतिनैसर्गिक कारणमीमांसा नाकारणे,   हा  आता, कितीतरी सबळ, घडीव, ठाशीव आणि ठोस युक्तिवाद आहे. 

हा विस्तार झाला तो काही ठाम ग्रह आणि  आग्रह उराशी   बाळगल्यामुळे. ह्यातले काही येणेप्रमाणे.. 
• हे विश्व भौतिक आहे. 
• ते मानवी जाणिवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ही माया नाही.  
• याचे स्वरूप आपल्याला समजावून घेता येतं. 
• कोणत्याही बाह्य, परस्थ, अतींद्रिय, दैवी शक्तीशिवाय आसपासच्या सृष्टीचा अर्थ लावणे शक्य आहे.  
• त्रिकालाबाधित सत्य असे काही नसते. 

असा विश्वास उराशी बाळगून आजचे विज्ञान काम करते.

 चार्वाकांनी अशासारखाच काही विश्वास मर्मबंधातली ठेव जपावी तसा जपला.  पण त्यांची विचारधारा होऊ शकली नाही. चार्वाक कुठल्या राजसत्तेवर, समाजावर फार प्रभाव पाडू शकले  नाहीत  आणि आता तर केवळ सावली पाहून आपण मूळ विचारांचा अंदाज बांधू शकतो. 

पाखंडी विचारांना थेट देहदंड सांगणारे कितीतरी धर्म आहेत. पण काळाच्या ओघात इतके पाखंडी विचार हिंदूभूमीत  दर्शन म्हणून टिकले; नेस्तनाबूत झाले पण नष्ट नाही झाले; खंडन करण्यायोग्य वाटल्याने का होईना, उद्धृत केले गेले; हे आक्रितच म्हणायचे. हिंदू म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ आहे म्हणे,   त्यातील समृद्धी हीच असावी बहुतेक. ‘अत्त दीप भव’, असं सांगणाऱ्या बुद्धाचाही अवतार करणाऱ्या या संस्कृतीने ‘चार्वाकावतार’ कसा  मानला नाही हेच नवल वाटतं मला.  

म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावं;  तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक असा वा अज्ञेयवादी असा.  समविचारी असाल तर प्रगल्भ होण्यासाठी आणि विरोधी असाल तर शत्रूचे डावपेच लक्षात घेण्यासाठी, हे वाचलेच पाहिजे.

‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ हे विचार बीज पुढे युरोपात फोफावलं आणि प्रबोधन युग सुरू झालं. १६६० साली; म्हणजे पन्हाळ्याहून सुटकेच्या साली बरं का; स्थापन झालेल्या, त्या जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीचं बोधवाक्यच मुळी ‘नलीस इन व्हर्बा’ असं आहे. म्हणजे शब्दप्रामाण्य नाकारा. कुणाचा  शब्द हे महत्वाचे  नसून रोकडा  पुरावा हवा. 
कल्पना करा हे ‘नलिस इन व्हर्बा’चं बीज चार्वाक-काळीच इथे रुजलं असतं तर? तर प्रबोधन युग इथे अवतरलं असतं आणि ते सुद्धा काही शतके आधी!

No comments:

Post a Comment