विज्ञान म्हणजे काय?
तेची छद्मविज्ञान ओळखावे
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
लेखांक १०
विज्ञान
नावाची युक्ति आपल्याला रोजचे जगणेही
उत्तम आणि विवेकी रीतीने जगायला शिकवते.
म्हणूनच ही युक्ति आपण नीट शिकून घेतली पाहिजे. कारण विज्ञान हा आज परवलीचा शब्द
आहे. म्हणूनच या शब्दाचा गैरवापरही सर्रास सुरू असतो.
विज्ञान जे सांगते ते सत्य, असा विश्वास
लोकांना वाटत असतो. त्यामुळे आपण जे सांगतो, जे दावे करतो, जी औषधे विकतो, ती
‘वैज्ञानिक’ आहेत असं सांगण्याची अहमहमिका (चढाओढ) लागलेली दिसते. इतकंच कशाला,
तुमचा साबण, तुमची टुथपेस्ट, तुमची उशी,
तुमचा एसी, तुमचा फ्रीज असं सगळंच कसं
‘अत्याधुनिक’, ‘वैज्ञानिक’ आहे; विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले आहे; असं
सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली जाते.
निरनिराळ्या ग्रहांचे भाग्यवर्धक खडे,
ताईत, भुतेखेते, परग्रहवासी, पुनर्जन्म, हे ही सारं अत्यंत वैज्ञानिक
असल्याचं अनेक जणं अनेक माध्यमातून पटवायचा प्रयत्न करत असतात.
या लोकांची बोली फसवी असते. विज्ञानाच्या
नावावर अनेक अवैज्ञानिक, असत्य, चुकीच्या कल्पना अशी मंडळी मांडत असतात. या
साऱ्याला म्हणतात छद्मविज्ञान. छद्म
म्हणजे खोटे, कपटी किंवा फसवे. (एखादा ‘छद्मी’ हसतो, असं वर्णन तुम्ही वाचलं
असेल.) तसंच हे खोटे, कपटी किंवा फसवे
विज्ञान.
विज्ञान
नावाच्या युक्तीबद्दल आपण शिकलो. आता छद्मविज्ञान कसे असते तेही बघू या.
इथे कथा, सांगोवांगीच्या गोष्टी पुरावा
म्हणून छातीठोकपणे ठोकून दिलेल्या असतात. भयकथा, गूढकथा, चमत्कार कथा हाच पुरावा
असं मानलं जातं. अमक्या ठिकाणी भूत असल्याचं तमक्या ठिकाणी छापून आलंय, म्हणून ते
खरंच आहे; असं सांगणारी मंडळी छद्मविज्ञान सांगत असतात.
आमचे औषध वापरुन अमक्याला गुण आला, अशी प्रशंसेची पत्रे हाच पुरावा
असं मानलं जातं. हा उतावीळपणा झाला. वास्तविक एखाद्याला गुण आला ही चांगलीच गोष्ट
आहे पण असा गुण हा त्याच औषधामुळे(च) आला हे तपासून घेणं अत्यंत गरजेचे आहे. छद्मविज्ञानात
बरेचदा असा सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा
प्रकार दिसतो. म्हणजे पुरावा जेमतेम,
लेचापेचा, तकलादू, मात्र त्यापासून काढलेले निष्कर्ष अगदी बढवून चढवून सांगितले
जातात.
विज्ञानाच्या विविध क्षेत्रात विलक्षण सुसंगती असते. भौतिकशास्त्राच्या
नियमात बसत नाही पण रसायनाच्या नियमात बसतं. किंवा रसायनाच्या नियमात बसत नाही पण
जीवशास्त्राच्या नियमात बसतं; असं परस्पर विसंगत विज्ञानात काही असत नाही. छद्मविज्ञानात अशी सुसंगती आढळत नाही.
छद्मवैज्ञानिकांची
भाषा अगदी खास असते. आपण विज्ञान
सांगत असल्याचा आभास निर्माण करणारी असते. एनर्जी, नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम एनर्जी, वगैरे शब्द ही मंडळी जिभेवर खेळवत
असतात. मात्र या मागच्या
वैज्ञानिक संकल्पना वेड्यावाकड्या मोडून,
वाकवून वापरल्या गेलेल्या असतात.
कोणत्याही
मशीनला किंवा मानवी पंचेंद्रियांना कळणार नाही असे गूढ फोर्स, एनर्जी, वेव्ह्,
शक्ती, किरणे, असं काय काय असतं आणि त्याद्वारे हे परिणाम दिसून येतात असंही
सांगितलं जातं. अशा न तपासता येणाऱ्या, न मोजता येणाऱ्या गोष्टींवर यांच्या
युक्तिवादाचा डोलारा उभारलेला असतो. पण कोणत्याच मानवी इंद्रियांना किंवा मशीनला न
जाणवणाऱ्या, न ओळखता येणाऱ्या ह्या शक्ती;
ह्या शक्तींचा शोध लावणाऱ्या मंडळींना तरी कशा ओळखता आल्या? ह्या प्रश्नाचे उत्तर
कोणीच देऊ शकत नाही. साक्षात्कार, गुरुमहात्म्य, प्राचीन ग्रंथात लिहिलेले काही
अशी उत्तरे येतात.
या कल्पना अवैज्ञानिक आहेत असं सिद्ध करूनही यांचे दावेदार ही सिद्धता
मानत नाहीत. आम्ही मुळातच विज्ञान, पुरावा वगैरेच्या वरचढ आहोत, तुमच्या
तपासणीच्या पद्धती आम्हाला मान्य नाहीत, अशी त्यांची मांडणी असते. ‘जिथे विज्ञान संपतं तिथे हे सारे ज्ञान सुरू
होते’, असे एक चमकदार वाक्य ही मंडळी फेकत असतात. पण खरंतर जिथे विज्ञान संपतं
तिथे अज्ञान सुरू होतं.
विज्ञानाला न कळणारी किंवा निसर्गनियमाविरुद्ध घडणारी कोणतीही गोष्ट अशा
मंडळींना अनैसर्गिक शक्ती असल्याचा ठोस पुरावा वाटते.
मात्र विज्ञान नावाची युक्ति आपल्याला वेगळंच सांगते.
विज्ञान नावाची युक्ति आपल्याला वेगळंच शिकवते.
विज्ञान असं मानतं की विज्ञानाला न कळणारी किंवा निसर्गनियमाविरुद्ध
एखादी गोष्ट घडली तर ती संशोधनाची मोठी
संधी आहे. असं का घडलं, कसं घडलं, हे
शोधून काढायची संधी आहे. आपण शोधलेले नियम
सुधारायची संधी आहे. गरज पडली तर ‘नवीन
विज्ञान’ शोधून काढायची संधी आहे.
वर्षभरापूर्वी करोनाची साथ आली. ही साथ, पृथ्वीवर पाप वाढल्यामुळे आली,
असं समजून जर आपण स्वस्थ बसलो असतो, तर ह्या विषाणूचा शोध आपल्याला लागला
असता का? हा भुताटकीचा प्रकार मानून आपण
स्वस्थ बसलो असतो तर त्यावर लस निघाली
असती का?
कोणत्याही अतर्क्य गोष्टीला गूढ, अतीनैसर्गिक (निसर्गाच्या नियमापार
काहीतरी), पराभौतिक (भौतिक शास्त्राला समजणारच
नाही असे) कारण जोडलं की आपण
त्यामागील कार्यकारणभाव शोधण्याची संधी
वाया दवडत असतो. आज तर आम्हाला हे कळत नाहीच पण यापुढेही ह्याचा उलगडा होण्याची सुतराम शक्यता नाही अशी शरणागती पत्करत असतो.
याचा अर्थ जे जे आपल्याला पटत
नाही किंवा आपल्या आकलनाबाहेरचं आहे ते ते बोगस आहे असा मात्र नाही हं.
भुतेखेते नसतात असं म्हणतानाच ती असल्याचे कोणते पुरावे असायला हवेत हे ही सांगता आलं पाहिजे. असे पुरावे जर
दाखवले तर आपण भुतावर विश्वास ठेवू असा मनाचा मोकळेपणाही पाहिजे. विज्ञान नेहमी नव्या कल्पना आणि नव्या ज्ञानाचे स्वागत करते.
पण दरवेळी हे ज्ञान तपासून घेतले जाते.
पूर्वप्रसिद्धी
किशोर
दिवाळी अंक
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१
No comments:
Post a Comment