प्रदर
डॉ. शंतनू अभ्यंकर
प्रदर याचा अर्थ अंगावरून पांढरे जाणे. काही पेशंटच्या भाषेत ‘व्हाईट ब्लीडिंग’!
पांढरे जाणे ही तर
कितीतरी कॉमन तक्रार. इतकी कॉमन की पेशंटला विचारलं,
‘अंगावरून पांढरे
जाते आहे का?’
तर कधी कधी उत्तर येतं, ‘नॉर्मल जातंय!’
पण असं उत्तर आलं की मला फायनल ईयरच्या
अभ्यासाची आठवण होते. एमडीची परीक्षा जवळ आली होती. अभ्यासाची धामधूम सुरू होती. आणि अशातच एके दिवशी माझ्यावर केस प्रेसेंटेशनची वेळ आली. केस प्रेझेंटेशन म्हणजे, एखाद्या पेशंटची सगळी माहिती, तपासणी, असं सगळं सरांच्या समोर मांडायचं आणि विचारतील त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. ही परीक्षेची
रंगीत तालीम.
जी पेशंट सरांनी तपासायला सांगितली त्या बाईंना
विशेष काही म्हणजे काहीच होत नव्हतं. अंगावरून पांढरं जातंय, ‘नॉर्मल जातंय’, एवढीच त्यांची तक्रार होती. तपासणीतही
अब्नॉर्मल म्हणावं असं काहीही आढळलं नाही. अर्थात विशेष काहीच आजार नसलेली पेशंट
एमडीच्या तयारीसाठी कोण कशाला तपासायला सांगेल? असाच विचार माझ्या मनात थैमान घालू
लागला आणि आपल्या लक्षात न आलेला काहीतरी दोष असणारच असं समजून, मी अनेकदा, अगदी सखोल, तपासणी केली. पण व्यर्थ.
खरोखरच विशेष काहीही आढळलं नाही.
मी परीक्षेला सज्ज झालो. अपेक्षेप्रमाणे आमचं गाडं अंगावरून पांढरे जातंय या पहिल्याच वळणावर अडकलं. सरांनी मला अंगावरून पांढरे जाण्याची कारणं वगैरे विचारायला सुरुवात केली. मी धडाधड सांगितली. त्यातलं या पेशंटला कोणतं लागू आहे ते विचारलं. मी कोणतंही नाही
असं सांगितलं. मग सरांनी पुढील तपासण्या कोणत्या ते विचारलं. मी सांगितलं अमुक तपासणी. सर म्हणाले ती नॉर्मल
आली तर? मी सांगितलं तमुक तपासणी. सर म्हणाले ती नॉर्मल आली तर? हा अमुकतमुकचा खेळ काही वेळ चालला. मग तपासण्या वगैरेवर सखोल चर्चा झाली. पण सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत असं सर सांगत
राहिले. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती.
पण सगळंच नॉर्मल म्हटल्यावर, आता ‘पेशंटला
सांगणार काय आणि औषध काय देणार?’ ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र येत नव्हतं.
मी अगदी वरमलो. मला दरदरून घाम फुटला. सरांनी
पुन्हा तोच प्रश्न केला. शेवटी जीवाचा धडा करून मी उत्तर दिलंच; ‘तुम्हाला काहीही
होत नाहीये. हा प्रकार नॉर्मल आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही, असं सांगीन!!!’
सरांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटलं. ‘मग हे बोलायला इतका का रे वेळ लावलास?’
‘सर, अमुक आजार आहे, असं सांगणं सोपं आहे; पण तुम्हाला काहीही आजार नाही
हे सांगणं अवघड.’
‘छान! हे तर ब्रम्हवाक्य समजायला हरकत नाही.
झालास तू एमडी!!’ प्रसन्न होत्साते सरांनी आशीर्वाद दिला.
अंगावरून पांढरं
जातंय आणि नॉर्मल जातंय, म्हणजे तक्रार करावी असे नाही. हे खरंच आहे. नॉर्मली
सुद्धा अंगावरून जात असतं. निसर्गत: योनीमार्ग किंचित ओलसर राखला जातो. ह्या
स्त्रावाबरोबर तिथल्या मृत पेशी बाहेर पडतात. पाळीच्या चक्रानुसार हा स्त्राव
किंचित बदललतो.
पाळीच्या अलीकडे
पलीकडे एखाद दोन दिवस पांढरट स्त्राव जातो. हे नॉर्मल आहे. दोन पाळ्यांच्या मधल्या दिवशी, साधारण
स्त्रीबीज निर्मितीच्या आसपास,
पाण्यासारखा पातळ स्त्राव जातो किंवा थेंबभर लाल जातं. हे नॉर्मल आहे. गरोदरपणी तिथला रक्त पुरवठा वाढल्याने एकुणात स्त्राव
वाढतो आणि ओलेपणा जाणवतो. हे नॉर्मल आहे.
ह्याला काहीही उपचार लागत नाही. करून काही उपयोगही नाही. शरीराचे ‘नॉर्मल
टेंपरेचर’ कमी करण्यासाठी औषधोपचार घेणे
हास्यास्पद आहे. तसंच हे. साधारण स्त्रावाबरोबर वेदना, कंबरदुखी, खाज, दुर्गंधी, पुरळ अथवा जळजळ असं काही नसेल तर ‘नॉर्मल जातंय’ असं
समजायला हरकत नाही. पण सोबत वरील काही
तक्रारी असतील तर तपास आणि उपचार लागू
शकतात.
हे जे ‘नॉर्मल’ जातं
ना, ते म्हणजे निसर्गत: आसरा दिलेले ‘आरोग्य-जंतू’ (Commensals) तिथे सुखेनैव वास करून आहेत याचं निदर्शक आहे. नॉर्मली
आपल्या अंगप्रत्यंगावर कोट्यवधी जंतू वास करून असतात. कातडी, आतडी, तोंड, डोळे,
मूत्रमार्ग, योनीमार्ग अशी सगळीकडे त्यांची वस्ती असते. हे आरोग्य-जंतू! रोगजंतू, रोग निर्माण करतात. आरोग्य-जंतू,
आरोग्य राखतात. उदाहरणार्थ आतडयात हे काही जीवनसत्वे निर्माण करतात. अन्यत्र हे
आहेत, ठाण मांडून बसून आहेत, म्हणून रोगजंतू तिथे राहू शकत नाहीत! हे तर
परोपकार-जीवी (Commensals). उगीच परोपजीवी (Parasites/बांडगूळ) म्हणून
त्यांना हिणवणे बरे नाही आणि स्वच्छतेच्या नादानी त्यांचा नायनाट करणेही बरे नाही.
योनीमार्ग, साबणाने, आतून धुवून काढण्याची
गरज नसते. रोज झकास आंघोळ करणे एवढी स्वच्छता पुरते.
पण आजकाल काही
बायकांना अतिस्वच्छतेची बाधा होते. दोन
थेंब साबणात भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक.
चार थेंब साबणात कपडे स्वच्छ आणि जंतूरहित. आठ थेंब साबणात फरशी स्वच्छ आणि
किटाणूमुक्त. जाहिरातीतला संडाससुद्धा
चकचकीत, निर्जंतुक, आssणि किटाणूमुक्त, आssणि जंतूरहित झालेला
पाहून ह्या प्रभावित होतात. मग त्या हात
धुवून शरीरशुद्धीच्या मागे लागतात. मग चेहऱ्याचा, हाताचा, पायाचा, अंगाचा असे
वेगवेगळे खास साबण घेतात. इथे मळापेक्षा परिमळाला महत्व असतं. अशात योनीशुद्धीसाठी
खास साबणाचा शोध लागतो. पण यातल्या काही प्रकारांनी तिथल्या आरोग्य-जंतूंची वस्ती
उद्ध्वस्त होते आणि मग नको ते जंतू (गार्डेनेल्ला व्हजायनॅलीस) वस्तीला येतात.
याला म्हणतात बॅक्टेरियल व्हजायनॉसिस. मग पांढरा, पातळ, धुरकट, हिरव्या रंगाचा स्त्राव
जातो. लघवीला जळजळ, खाज, अंबुस वास अशा
तक्रारी सुरू होतात. यासाठी पाच ते सात
दिवस औषधे घ्यावी लागतात. हा वसा पूर्ण करावा. घेतला वसा टाकला तर वारंवार त्रास ठरलेला.
शरीरसंबंधही काही काळ टाळावेत. म्हणजे शरीरसंबंधातून पुन्हा पुन्हा लागण होणार
नाही.
कधीकधी इतर काही
कारणे अॅंटीबयोटिक्स दिली जातात आणि ती योनिमार्गातील परोपकार-जीवींचाही
खातमा करतात. कधी स्टीरॉईडस दिली जातात.
प्रतिकारशक्ती रोडावते. मग रोगजंतू आपला डाव साधतात. कधी कधी अन्य कारणानी इथे रोगजंतू प्रविष्ट होतात.
अन्य रोगजंतूंमध्ये गुप्तरोग,
ट्रायकोमोनस, बुरशी हे कॉमन. लघवीचे
इन्फेक्शन, गर्भमुखाला इजा/सूज, कुपोषण, अॅनिमिया, डायबेटीस, अस्वच्छता हे पूरक घटक.
ट्रायकोमोनास हा एक
सूक्ष्मजीव (Protozoa) आहे. हा ठाण
मांडून बसला तर पांढरा, पिवळा, फेसाळ स्त्राव जातो, किंचित वास येतो, खाज सुटते, लघविला
जळजळ होते, सारखी लागते. हा आजारही जोडीदाराकडून येऊ शकतो. तेंव्हा गरजेप्रमाणे
कंडोम वापरलेला बरा. पांढरे जाण्यात कॅंडीडा
ही बुरशी कुप्रसिद्ध आहे. यामुळे खाज येते
आणि दह्यासारखे पांढरे जाते.
प्रदर होऊ नये किंवा
वारंवार उद्भवू नये म्हणून नीट काळजी घेतली पाहिजे. शी-शू झाल्यावर, बाह्यांग
पुसून घेताना, नेहमी पुढून पाठीमागे असे पुसावे. शीच्या जागेकडून शूच्या जागेकडे
पुसल्यास, शीच्या जागेचे जंतू, वाटेत, योनीमार्गात ढकलले जाऊ शकतात. दिवसा
सुती अंतर्वस्त्र वापरावीत आणि रात्री वापरूच नयेत. खेळ, पार्टी, वगैरे
वेळी वापरायचे अतिघट्ट कपडे तेवढ्या पुरतेच
वापरावेत. यांनीही इन्फेक्शनचा त्रास वाढतो. आजकाल अनेक प्रकारचे कंडोम मिळतात.
रस-रंग-गंध-स्पर्श अशी सारी सुखे त्यात सामावलेली असतात. पण ह्यातल्या काहींतील
काही घटकांची अॅलर्जी म्हणूनही पांढरे जाऊ शकते. तेंव्हा (कोहिनूरचा) हा पैलूही लक्षात घ्यायला हवा.
पूर्वी बायका, ‘इकडून’
येणं झालं किंवा ‘स्वारीचं’ म्हणजे कसं
अगदी वेंधळंच असायचं; असं नवऱ्याचं नाव न घेता
बोलायच्या. याचं, He came from this side किंवा The horse rider is
absentminded; हे भाषांतर जसं
हास्यास्पद आहे तसंच आजाराबद्दल आहे. भाषांतर नीट जमलं पाहिजे. भाषांतरात गफलत
झाली की गहजब होणारच.
आपल्याकडे लैंगिक
स्त्रावांना ‘धातू’ असं नाव प्रचलित आहे. धातू मौलिक असून जपावे लागतात असं समजलं
जातं. धातू वाहून जाण्याने अशक्तपणा,
अंगदुखी, चक्कर, ‘कसंतरी होणे’ असे अनेक दोष होतात, अशीही समजूत आहे. तेंव्हा
‘कसंतरी होणे’ छाप तक्रारी उद्भवल्या तर बायका त्याचा संबंध ‘धातू जाण्याशी’
जोडतात आणि नॉर्मल स्त्रावही मग तक्रारीचं स्वरूप घेतात. लोकमानसातील
शरीरशास्त्रानुसार एक थेंब धातू तयार होण्यासाठी शंभर थेंब रक्त लागतं. अशी जर
समजूत असेल तर असं होणारच. विविध शारीरिक तक्रारींसाठी ‘धातू जातोय’ हे एकच कारण
चिकटवणारे, त्यापायी कुढणारे आणि लिंग
वैदूंच्या जाहिरातींना बळी पडणारे, पुरुषही आहेतच.
तेंव्हा प्रदर
म्हणजे बरेचदा अन्य त्रासाची अन्योक्ती.
लेकी बोले सुने लागे, असा प्रकार. माझ्याकडे लक्ष द्या, मला भावनिक, मानसिक,
कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक, वैवाहिक त्रास
होतोय, तो मला सांगता येत नाही, सबब प्रदर ही तक्रार! म्हणजे आता निदान डॉक्टरकडे जाता येईल, कुणाबरोबर तरी
बोलता येईल, कदाचित डॉक्टर मनीची व्यथा ओळखून घेईल.. अशी आशा, अपेक्षा
म्हणजे प्रदर. हे त्या तक्रारीचं योग्य भाषांतर. अ-वैद्यकीय त्रास सांगायची ही पेशंटची शारीर भाषा आहे. डॉक्टरांना
ही अवगत असावी लागते.
असला प्रकार फक्त
भारतात आढळतो असं नाही. कुचंबणेचा शारीर भाषेत उद्गार होणे हर एक देशी दिसते. त्या त्या
संस्कृतीनुरूप आजाराची लक्षणेही ठरलेली असतात. लोककथा असतात तशा ह्या ‘लोकव्यथा’. शरीररचना आणि
कार्य यांच्या बद्दलच्या लोकांतील
समजुतींमुळे उद्भवणाऱ्य व्यथा. आपल्याकडे तेल, तूप, अंडी, मांस वगैरे ‘उष्ण पदार्थ’
खाल्ल्याने शरीरातील ‘हीट वाढते’ आणि परिणामी पांढरे जाते असाही प्रवाद आहे.
इराणी बायकांच्या
कुचंबणेचा उद्गार छातीत दुखणे, धडधड होणे अशा हृदय-विकारांनी होतो म्हणे. दक्षिण अमेरिकेत नर्व्हीओस नावाचा असाच एक
अ-वैद्यकीय आजार आहे. चक्कर चिंता आणि धाप अशी लक्षणे आढळतात म्हणे. चिनी
बायकां-पुरुषांत मुंग्या येणे, अशक्तपणा, चक्कर हे त्रास-त्रिकुट संस्कृतीसंमत
आहे.
प्रदर या तक्रारीला
असे सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक पदर आहेत. अर्थात प्रत्येक दुखण्याला असतात ते.
दुखणं, हे काही निव्वळ शारीरिक दुखणं असेल असं नाही.
म्हणूनच पांढरे
जातंय, असं सांगणाऱ्या बहुतेक बायकांना, तपासणीत शून्य भोपळा त्रास आढळतो.
म्हणूनच कॅंडीडा, ट्रायकोमोनास,
गार्डेनेल्ला अशा भारदस्त नावाचे जंतू नावालाही आढळत नाहीत, पण तक्रार मात्र
सर्रास प्रदर! ही काय भानगड आहे? ही भानगड नसून ही भाषांतरातील गल्लत आहे. भाषांतरात गल्लत झाली की गहजब होणारच. म्हणूनच
‘तुम्हाला काहीही होत नाहीये. हा प्रकार नॉर्मल
आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही’, असं सांगायला अधिक धैर्य लागतं. हे ब्रम्हवाक्य
आहे असं सर म्हणाले ते काही उगीच नाही.
पूर्वप्रसिद्धी
लोकमत
सखी पुरवणी
5/10/2021
No comments:
Post a Comment